অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य-इतिहासलेखन

मराठी साहित्य-इतिहासलेखन

मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी १८१८ मध्ये जिंकून घेतले. पेशवे आणि त्यांची जुनी राजवट जाऊन नवे इंग्रजी शासन आले. इंग्रजी राज्यकर्त्यानी नव्या पद्धतीचे शिक्षण सुरू केले. नव्या विद्येबरोबर मराठी समाजात नवे विचार, नव्या समजुती रूजू लागल्या. अठराव्या शतकात बखरवाङ्‌मय विपुल प्रमाणात निर्माण झाले होते. त्यापैकी बरेच काव्येतिहाससंग्रहात १८८० ते १८८२ च्या दरम्यान प्रकाशित झाले व काही विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नाशीत प्रकाशित झाले. तथापि नव्या शिक्षित समाजाचे बखरवजा लिखाणाने समाधान होण्यासारखे नव्हते; पण अर्वाचीन चिकित्सक इतिहास लेखनाचीही त्याची अद्याप तयारी झाली नव्हती. बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ दाजी लाड यांनी प्राचीन कालातील काही ताम्रशिला – शासनांचे वाचन केले, त्यांवर टिपणे लिहिली; पण हे अपवादात्मक कार्य होते. शिवाय या त्रोटक माहितीवर महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासही लिहिता येण्यासारखा नव्हता.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र मराठ्यांच्या इतिहासाचा शोध सुरू केला. पुणे दरबारी असलेला इंग्रज वकील मॅलेट याने कित्येकदा आपल्या पत्रांत आपण मराठ्यांचा इतिहास लिहिण्यास घेतला आहे, असा उल्लेख केलेला आहे. मॅलेटचा मराठ्यांचा इतिहास तयार झाला नाही; तथापि १७८१ मध्ये एक जर्मन संशोधक श्प्रेंगेल आणि १८१० मध्ये स्कॉट वेअरिंग या दोघांनी मराठ्यांचे उणेअधिक पुरेअपुरे इतिहास प्रसिद्ध केले. महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात जाताच एल्फिन्स्टनने ऑन द टेरिटरीज कॉकर्ड फ्रॉम द पेशवाज हे पुस्तक लिहिले. हे मराठ्यांच्या तत्कालीन सर्वागीण इतिहासाचा सारांश आहे. यापेक्षा अधिक प्रामाण्य मिळविणारा इतिहास १८२६ मध्ये प्रसिद्ध झाला. तो म्हणजे ग्रँट डफ याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास होय. डेव्हिड केपेन ह्याने इतिहासाचे मराठी भाषांतर बखर मराठ्यांची ह्या नावने केले आहे (१८३०).

डफ हा सातारा दरबारी १८१८ मध्ये नेमलेला पहिला इंग्रज रेसिडेंट. सातारचे राजे प्रतापसिंह यांच्या शिक्षणावर व कार्यावर देखरेख ठेवून त्यांच्या मार्फत सातारा संस्थानाचे राज्य चालवावयाचे हे रेसिडेंटचे काम. हे काम करताना पूर्वीची पद्धत कशी होती याची विचारपूस डफ करू लागला आणि त्यातून त्याच्या इतिहासलेखनाची सुरूवात झाली. सातारकर राजे, त्यांचे चिटणीस, दरबारातील मानकरी, बाळाजीपंत नातू इत्यादीकडून डफने अगदी कसोशीने आणि चिकाटीने माहिती जमा केली, बखरी मिळविल्या, काही फार्सी- मराठी कागदपत्र मिळविले. दरबारी मंडळीकडून डफ कसोशीने माहिती जमा करी. सुमारे अर्ध शतक डफकृत मराठ्यांचा इतिहास हा प्रमाणभूत म्हणून सर्वजण मानत आले.

डफच्या इतिहासापासून महाराष्ट्रात इतिहाससंशोधननास सुरूवात झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ मध्ये झाली. नवविद्येचा प्रसार समाजात होऊ लागला, समाजातील काही घटकांना नवीन दृष्टी प्राप्त झाली. देशाभिमानाचे वारे वाहू लागले तसे आमच्या भूतकालाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहिले पाहिजे, अशी जाणीवही निर्माण झाली.डफच्या इतिहासात मराठ्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्‍न केला आहे. पण ह्या इतिहासककथनातही कित्येक वेळा त्याने मराठ्यांना प्रतिकूल व अनैतिहासिक अशी विधाने केली आहेत. सर्वसाधारण मराठ्यांना व मराठा राज्यसंस्थापक शिवाजी महाराजांना डफने नावे ठेविली. त्यामुळे त्याच्या इतिहासाबद्दल मराठी मनात अढी निर्माण झाली.

नीलकंठ जनार्दन कीर्तने ह्यांनी ग्रांट डफकृत मराठ्यांच्या बखरीवर टीका (१८६८) ह्या निबंधात डफच्या इतिहासग्रंथातील उणिवा दाखवून दिल्या. डफने कालविपर्यास केला आहे आणि त्याचे निरूपण काही ठिकाणी अपुरे, चुकीचे व मराठेविरोधी आहे, असा या टीकेचा रोख होता. कीर्तन्यांचा आवाज एकाकी नव्हता. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी लिहून ठेवले. की डफच्या इतिहासातील राजकारणी इतिहास चुकीचा आहे आणि त्यात मराठ्यांचा धर्म, कला, विद्या, वाड्‍मय, चालीरीती यासंबंधीची माहिती अगदी जुजबी आहे. त्यांनी मागणी केली, की मराठ्यांचा समग्र, शास्त्रशुद्ध इतिहास नव्याने लिहिला पाहिजे.

जनार्दन बाळाजी मोडक आणि काशीनाथ नारायण साने ह्यांनी काव्येतिहाससंग्रह हे मासिक १८७८ मध्ये काढले होते. देशसेवेच्या दृष्टिकोणातून इतिहास, बखरी आदी जुन्या ग्रंथपत्रांचा जीर्णोद्धार करणे हे ह्या मासिकाचे उद्दिष्ट होते. अकरा वर्षानी काव्येतिहाससंग्रह मासिकाचे प्रकाशन थांबले; पण मासिकाने दाखवून दिले, की इतिहास- लेखनास आवश्यक अशी साधने- समकालीन कागदपत्रे, कैफियती, नाणी, कोरीव लेख, जुने स्थापत्य, जुनी भांडी, चित्रे इ. – महाराष्ट्रात विखुरलेली आहेत. ती उजेडात आणण्याचा खटाटोप अभ्यासकांनी केला पाहिजे. पाश्चात्य संशोधकांनी समकालीन कागदपत्रांच्या शोधा करता घेतलेल्या परिश्रमांची वि. का. राजवाडे यांच्यावर विशेष छाप पडली.

जुन्या कागदपत्रांचा त्यांना ध्यास लागला. कागदपत्रे नाहीत तर इतिहासलेखन शक्य नाही. अशा आशयाचे उद्‍गार फ्रेंच कवी आणि मुत्सद्दी लामातींन ह्याने काढले आहेत. त्यांचा त्यांनी सर्वार्थाने स्वीकार केला. विश्वसनीय अस्सल इतिहाससाधने शोधून काढून आणि त्यांचे संपादन करून ती प्रसिद्ध करण्याच्या कार्याला त्यांनी आपले आयुष्यच वाहुन घेतले. त्यांच्या सुदैवाने पेशव्यांनी उत्तरेस पाठविलेल्या येरंडे व कानिटकर या अधिकाऱ्यांचे दप्तर त्यांच्या वाई येथील मित्रांच्या मध्यस्थीने त्यांच्या हाती लागले. राजवाड्यांनी सर्व दप्तर वाचून काढले. त्यातील १७५० – ६१ या अकरा वर्षातील हिंदुस्थानातील हालचाली देणाऱ्या ३०४ पत्रांचा एक भाग १८९८ मध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पहिला खंड म्हणून प्रसिद्ध केला.

त्यात पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या झालेल्या पराभवाची मीमांसा, महाराष्ट्र धर्म, बाळाजी बाजीराव, सदाशिवभाऊ तसेच मल्हारराव होळकर, जयाप्पा व दत्ताजी शिंदे इत्यादिकांच्या हालचाली, प्रवासाचे मार्ग व मुक्काम, ग्रँट डफच्या चुका इत्यादीविषयक विवेचक प्रस्तावनाही आहे. राजवाडे निर्धन होते; पण तीव्र बुद्धिमत्ता, अफाट वाचन, अलोकिक प्रतिमा, ज्ञानाची एकनिष्ठ उपासना आणि अचाट परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी सर्व अडचणींवर मात केली. जुनी राजघराणी, संस्थानिक, सेनापती, इनामदार, देखमुख- देशपांडे- यांच्या वाड्‍यांचे उंबरठे झिजविले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील किल्ले, देवळे- रावळे, मशिदी, मठ, घाट, गुंफा त्यांनी पाय़ी प्रवास करून नजरेखाली घातल्या. कधी प्रेमाने, कधी रागाने तर कधी मित्रांच्या मध्यस्थीने मालकास समजावून त्यांनी कागदपत्रे, पोथ्या, बाडे मिळविली.

मोडी लिपीतील जुनी पत्रे वाचणे, तारखांचा, स्थळांचा व व्यक्तींचा मेळ बसविणे, घटनांचा क्रम लावणे ही कामे सतत अभ्यासाने त्यांना साधत गेली. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे एकूण बावीस खंड त्यांनी आपल्या हयातील प्रसिद्ध केले. १९२२ मध्ये राधामाधवविलासचापू हे जयराम पिंड्येविरचित शहाजीचे संस्कृत काव्यमय चरित्र, १९२४ मध्ये महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर हे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. यांशिवाय केसरी, इतिहास आणि ऐतिहासिक, सरस्वती मंदिर, ग्रंथमाला, चित्रमयजगत्‍यांसारख्या नियतकालिकांतून त्यांचे संशोधनात्मक लेख प्रसिद्ध होत राहिले. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ आणि ‘ महाराष्ट्राचा वसाहतकाल’ या त्यांच्या दोन लेखमाला अनेक कारणांनी गाजल्या. राजवाडे ह्यांना फार्सी व कानडी येत नसल्याने त्यांच्या संशोधनात सहज हाती आलेले कागद त्यांना सोडावे लागले. त्यांपैकी अगदी थोडे आजवर हाती आले आहेत.

राजवाड्यांनी सर्व मराठेशाहीचा इतिहास लिहून काढला नाही; पण इतिहासाच्या साधनांचे २२ खंड प्रसिद्ध करताना त्यांनी काही खंडांना प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने मराठी इतिहासातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांचे विवेचन केले आहे. मराठ्यांचे ध्येय काय असावे, पानिपतावर त्यांचा पराभव का झाला, महाराष्ट्राचा वसाहतकाल, मराठे कोण, इ. विषयांची मार्मिक चर्चा त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रस्तावना म्हणजे विद्धत्ताप्रचुर प्रबंधच आहेत. राजवाड्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतिहासाच्या अभ्यासाला नवी कलाटणी दिली. हे इतिहासाचे क्षेत्र किती विस्तृत आहे. सर्वागीण इतिहास म्हणजे काय, किती गोष्टींचा त्यात अंतर्भाव होतो हे प्रस्तावनांत त्यांनी सांगितले आहे. केवळ राजकीय वृत्तांतास राजवाडे इतिहास मानीत नसत. धर्म, समाज, विचार, चालीरीती, वाङ्‌मय, कला, अर्थव्यवस्था, व्यापारसंवर्धन इ. साऱ्या मानवी जीवनाच्या अंगवर्णनांचा इतिहास समावेश होतो हा त्यांचा आग्रह. त्यांचा हा इतिहासविषयक दृष्टीकोण आता मान्यता पावला आहे.

राजवाड्यांचे समकालीन इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे मराठेशाहीच्या इतिहासक्षेत्रात काम करीत होते. खरे मिरजेच्या शाळेत संस्कृत शिक्षक होते. मिरजेच्या पटवर्धनांचे दप्तर तपासण्याची परवानगी त्यांनी म्हत्प्रसाने मिळविली. पटवर्धन घराणे पेशव्यांचे निकटवर्ती व विश्वासू सरदार. १७६० – १८०३ या कालात पुणे, हैदराबाद आणि कर्नाटक या भागांमधील त्यांच्या प्रतिनिधींनी पाठविलेली पत्रे अगदी बोलकी आहेत. खऱ्यांनी १८९७ पासून १९२४ पर्यत सु. पाचशे पृष्ठांचा एक खंड. असे ऐतिहासिक लेखसंग्रहाचे बारा खंड प्रसिद्ध केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चिरंजीवांनी आणखी तीन खंडाची भर घालून वडिलांचे कार्य पूर्ण केले (१९२६ , १९३०, १९४८).

राजवाडे हे महान संशोधक आणि इतिहासकार होते हे  नि:संशय, पण त्यांच्या लेखनात ते कधी कधी विलक्षण लोकरुचिविरूद्ध प्रमेये मांडीत. खऱ्यांनी असे केल्याचे दिसत नाही. त्यांची प्रमेये पल्लेदार नसतील; पण साधार असत. प्रत्येक खंडात जी कागदपत्रे त्यांनी छापली, त्यांच्या आधारावर आपल्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या आहेत. या प्रस्तावना एकत्र करून एका खंडात प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे पानिपतोत्तर मराठेशाहीचा - प्राधान्यत: दक्षिण विभागाचा – सुसंबद्ध इतिहास वाचावयास मिळतो. त्यांशिवाय खऱ्यांचे ऐतिहासिक लिखाण म्हणजे आधिकारयोग अथवा नानास राज्याविकार मिळाल्याचा इतिहास (१९०८), इचलकरंजी संस्थानचा इतिहास (१९१३), मालोजी व शहाजी ( १९२० ), मराठी राज्याचा उत्तरार्ध (खंड पहिला, १९२७).

राजवाडे यांचे समकालीन तिसरे संशोधक म्हणजे रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस ( १८७० – १९२६). त्यांनी महाराष्ट्र कोकिल काढले (१८८७). ते काही वर्षे चालले. १८९६ साली पारसनिसांनी मराठी इतिहासाच्या अभ्यासाला वाहिलेले भारतवर्ष नावाचे मासिक हरि नारायण आपटे यांच्या साहाय्याने प्रसिद्ध करावयास सुरूवात केली. हे मासिक दोन वर्षे चालले; पण त्यात पारसनिसांनी अनेक अस्सल कागदपत्रे छापली आणि मराठेशाहीच्या इतिहासातील काही घटनांची चर्चा केली. १९०८ साली त्यांनी इतिहाससंग्रह हे मासिक सुऱू केले. नाना फडणीस यांच्या कारकीर्दीतील सरकारी पत्रव्यवहार त्यांच्या इनामाच्या गावी – मेणवली येथे – नेण्यात आला होता. पारसनीस यांनी पुरूषोत्तम मावजी शेट यांच्या आर्थिक साहाय्याने त्यातील काही निवडक पत्रव्यवहार मिळविला. तसेच साताऱ्याच्या राजघराण्यातील कागदपत्रे, सनदा, चित्रे इ. त्यांनी मिळविली. ही कगदपत्रे व काही संकलने इतिहाससंग्रह मासिकात आणि नंतर स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली. ग्‍वाल्हेर संस्थानविषयक ६०८ पत्रे निवडून ती त्यांनी ग्‍वाल्हेर दरबाराकरिता गोपनीय म्हणून पाच खंडांत प्रसिद्ध केली. जदुनाथ सरकारांच्या आग्रहावरून ग्‍वाल्हेर दरबाराने १९३७ साली ही सर्व एक खंडात छापून प्रसिद्ध केली.

बारभाईच्या कारस्थानापासून (१७७४) ते महादजी शिंदे यांच्या मृत्यूपर्यत (१७९४) झालेल्या घटना समजून घेण्यास पूर्वीच्या सातारा इतिहास संशोधक मंडळाचे याच विषयावरील दोन साधन खंड आणि आ. भा. फाळके व अनंत वामन वाकणकर यांचे शिंदेशाही इतिहासाची साधने (४ खंड. १९२९ – १९३५ ) हेही महत्त्वाचे साधन होत.

पारसनिसांना इतिहास विषयाची आवड होती. न्यायमूर्ती रानडे यांच्या कृपेने त्यांना पुण्याच्या पेशवे दप्तरात प्रवेश मिळाला. त्यांनी चिटणीसी विभाग आणि रोजकीर्दी तपासल्या. त्यातून बऱ्याच नकला करून घेतल्या. शाहू छत्रपती आणि पेशवे यांच्या रोजकीर्दीतील निवडक उतारे घेऊन १५ खंड त्यांनी उभे केले; त्यांच्या संपादनात महत्त्वाचा वाटा उचलला. यात केवळ राजकारणावर दृष्टी ठेवण्यात आलेली नाही. राज्यव्यवस्था, न्यायदान, अर्थव्यवस्था, व्यापार, दान – धर्म इ. अनेक अराजकीय बाबींचा या उताऱ्यांत समावेश आहे. मराठी राज्यातील राजकीय  घटनांचा अर्थ, आर्थिक – सामाजिक इ. विषयांची चर्चा करणारा ‘इंट्रोडक्शन टू द पेशवाज डायरीज’ (१९००) हा निबंध रानडे यांनी हे रोजकीर्दीतील उतारे वाचून तयार केला व मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या सभेत वाचला. तशाच प्रकारचा एक निबंध न्या. तेलंग यांनीही वाचला व तो प्रकाशितही झाला. (१८९२). तो बखरवाड्‍मय व थोडेसे कागदपत्र यांवर आधारित आहे.

उच्च सिक्षणाच्या अभावी पारसनीस यांचे बुद्धिचातुर्य जुनी दप्तरे, जुनी चित्रे, सतराव्या – अठराव्या शतकांत प्रसिद्ध झालेले हिदुस्थानविषयक इंग्रजी ग्रंथ यांची जमवाजमव करण्यापलीकडे जाऊ शकले नाही.

  1. पूना इन बाय्‍गॉन – डेज (१९२१)
  2. महाबळेश्वर (१९१६)
  3. झाशीची राणी लक्ष्मीबाई
  4. अयोध्येचे नबाब
  5. बायजाबाई शिंदे ह्यांची चरित्रे (१८९४ , १८९९ , १९०२)
  6. मराठ्यांचे पराक्रम – बुंदेलखंड प्रकरण (१८९५)
  7. महापुरूष ब्रह्मेद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार) (१९००)

इ. काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले. तंजावरचे राजघराणे (१९१२) यांसारखी त्यांनी इतिहाससंग्रहात प्रकाशित केलेली काही प्रकरणे पुस्तकरूपाने पुन्हा प्रकाशित केली.पेशवे दप्तरातील वेच्यांचे १५ खंड मराठेशाहीचा आर्थिक, सामाजिक इ. इतिहास लिहिण्यास फार उपयुक्त आहेत. दीक्षित- पटवर्धन यांच्या हिशेबाच्या वह्या भारत इतिहास संशोधक मंडळाकडे आल्या. त्यांचा प्रथम वामन गोविंद काळे यांनी अभ्यास करून आपले निष्कर्ष मंडळापुढे निबंधरूपाने मांडले.

त्याचप्रमाणे तुळशीबागवाले, कल्याणचे सुभेदार बिवलकर, खाजगीवाले, वैद्य, चिपळूणकर यांची दप्तरे तपासून त्यांतील निवडक उतारे ना. गो. चापेकर (१९६९ – १९६८) यांनी आपल्या पेशवाईच्या सावलीत ( १९३७) या ग्रंथात प्रसिद्ध केल आहेत. त्यांच्या दीर्घ प्रस्तावनेत अनेक विषयांची चर्चा त्यांनी केली आहे. राज्यविभाग, सरकारी नोकरांचे तनखे, कारकुनी, जकात. जमीनमहसूल, पट्ट्या, करवसुली, हुंड्या, चलन, सावकारी व्यवहार, वाहने, टपाल, गुन्हे, दानधर्म, अनुष्ठाने, व्रते, ज्योतिष, ब्राह्मणभोजने इ. विषयांचा यात समावेश आहे. समाजजीवनाला आर्थिक व्यवहार वळण लावतात म्हणून आर्थिक इतिहासाला अलीकडे फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजवाडे, खरे, साने, पारसनीस यांच्या कामगिरीमुळे मराठ्यांच्या इतिहासाबाबत कुतूहल वाढत चालले. इतिहाससंशोधनाचे कार्य एकट्यादुकट्या व्यक्तीच्या बाहेर असून संस्थेच्या तर्फे ते व्हावे, या विचाराला चालना मिळाली. त्याचा परिपाक म्हणजे १९१० मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची ( भा. इ. सं.) स्थापना करण्यात आली व अनेक संशोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्यास उपयुक्त असे एक केंद्र तयार झाले. पहिल्या पाच – सहा वर्षात राजवाडे यांनी मंडळाच्या कामात  मोठ्या हिरिरीने भाग घेऊन दोनशेवर निबंध वाचले. पण त्यानंतर मंडळावर राजवाड्यांनी गैरमर्जी झाली आणि त्यांनी मंडळ  सोडले. पण साने, मेंहेंदळे, दत्तो वामन पोतदार, औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी व काही इतर संस्थानिक, न. चिं. केळकर, मालोजीराव राजे नाईक – निंबाळकर यांनी मंडळाची जोपासना केली.

स. ग. जोशी, शं. ना. जोशी, कृ. वा. पुरंदरे, द. वि. आपटे, द. वा. पोतदार, दि. वि. काळे, चिं. ग. कर्वे, विशेषत: ग. ह. खरे यांनी अनेक ठिकाणी जाऊन कागदपत्रे, कैफियती, बखरी, पोथ्या, नाणी, ताम्रपट, जुनी चित्रे, संदर्भग्रंथ मंडळाकरता मिळविले. त्यांचा अभ्यास करून मंडळाच्या पाक्षिक वा वार्षिक सभांपुढे निबंध वाचले. ते पुढे मंडळाच्या विविध प्रकाशनांत छापले गेले. मंडळाची इतिवृत्ते, संमेलनवृत्ते, त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला, पुरस्कृत ग्रंथमाला इत्यादींची संख्या दोनशेपर्यत जाते.

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचे बरेच लेखन स्फुट स्वरूपाचे आहे; पण त्याची संख्या आणि आवाका मोठा. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२), मराठी इतिहास व इतिहाससंशोधन (१९३५), टिळकांचे सांगाती (१९७५) ही त्यांची विशेष उल्लेखनीय पुस्तके. भा. इ. सं. च्या एका त्रैमासिक अंकात (अंक ३ – १९८०) त्यांच्या २४७ लेखांची सूची दिली आहे. त्यांच्या लेखांतून त्यांच्या तल्लख बुध्दीची, अमर्याद वाचनाची व सूक्ष्म अवलोकनाची कल्पना येते. या मंडळात अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे आणखी एक इतिहास – संशोधक म्हणजे ⇨ गणेश हरी खरे (१९०१ -) हे होत.

भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शिवचरित्रसाहित्याचे पाच खंड त्यांनी संपादिले तसेच ऐतिहासिक फार्सी साहित्याचे सहा खंड सिद्ध केले (१९३४ , १९३७, १९३९, १९४९, १९६१, १९६९).

  1. श्रीक्षेत्र आळंदी (१९३१)
  2. मंडळांतील नाणी (१९३३)
  3. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर (१९३८)
  4. मूर्तिविज्ञान ( १९३९ )
  5. पंढरपूरचा विठोबा (१९४७)
  6. हिंगणे दप्तर (२ खंड; १९४५, १९४७)
  7. शिव –चरित्र- वृत्त – संग्रहाचे खंड २ आणि ३ (१९३९, १९४१)
  8. दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने (३ खंड, १९३०, १९३४, १९४९), संशोधकाचा मित्र ( भाग १, १९५१)
  9. महाराष्ट्राची चार दैवते (१९५८)
  10. स्वराज्यातील तीन दुर्ग (१९६७)
  11. मराठी इतिहासाची विस्तृत शकावली (१९७७)

दोन मराठी व एक इंग्रजी लेखसंग्रह इ. खरे ह्यांनी लिहिलेले – संपादिलेले काही उल्लेखनीय ग्रंथ होत. त्यांचे पाचशेहून अधिक इंग्रजी, मराठी व क्वचित कानडी लेख प्रकाशित आहेत.या दोघांशिवाय मंडळाच्या संशोधनकार्यात सहभागी होणाऱ्या संशोधकांत न. चिं. केळकर, शं. ना. जोशी, चिं. वि. वैद्य, दत्तोपंत आपटे, वि. सी. चितळे, वा. सी. बेंद्रे, चिं. ग. कर्वे. य. नय केळकर आदींचा समावेश होतो.

न. चिं. केळकर ह्यांचा मराठे व इंग्रज (मराठेशाहीचे शतसांवत्सरिक वाड्‍मयश्राद्ध (१९१८) हा मराठेशाहीच्या अस्ताचे अर्थपणे विवेचन करणारा ग्रंथ खूप लोकप्रिय झाला. ह्या ग्रंथावरील दत्तो वामन पोतदार ह्यांची टीका मराठे व इंग्रज (१९२२) ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आयर्लदचा इतिहास (१९०९), इतिहासविहार ... (इतिहासविषयक लेख, १९२६) आणि फ्रेंच राज्यक्रांति ( १९३७ ) हे त्यांचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ होत. भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही ऐतिहासिक साधनग्रंथांचे संपादन उदा., शिवकालीन – पत्र- सार – संग्रह –खंड– ३, (१९३७), शंकर नारायण जोशी ह्यांनी केलेले आहे. शिवाजी आणि चंद्रराव मोरे (१९२४), गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या ... (१९२५), मध्ययुगीन भारत अथवा हिंदु राज्यांचा उद्‍भव, उत्कर्ष आणि उच्छेद (३ भाग; १९२०, १९२३, १९२६) हे चिं. वि. वैद्यांचे निर्देशनीय ग्रंथ.

वैद्यांचे ऐतिहासिक निबंधही पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत (१९३१). भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चंद्रचूड दप्तर – कला १ ली ह्या ग्रंथांचे संपादन दत्तात्रय विष्णू आपटे ह्यांनी केले.तसेच मराठ्यांच्या इतिहासाचे साहित्य (१९२४) ह्या ग्रंथाच्या सिद्धीसाठी रियासतकार  गो. स. सरदेसाई ह्यांना त्यांनी साहाय्य केले होते.

  1. वि. सी. चितळे ह्यांनी पेठे दप्तराचे संपादन केले ( भाग – १, १९४८; भाग – २ , १९५०)
  2. वा. सी. बेंद्रे ह्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत साधनचिकित्सा ( १९२८)
  3. गोवळकोंड्याची कुत्बशाही (१९३४)
  4. छत्रपति संभाजी महाराज (१९६०)
  5. मालोजी राजे व शहाजी महाराज (१९६७)
  6. श्रीछत्रपती शिवाजी महाराज(१९७२)

हे विशेष उल्लेखनीय होत. चिं. ग. कर्वे ह्यांनी मानवी संस्तीचा इतिहास (१९३१) लिहिला न. चिं. केळकरांचे चिरंजीव यशवंत न. केळकर ह्यांचा विशेष बोलबाला शाहिरी वाड्‍मयाचे संशोधक म्हणून मुख्यत: झाला. त्याचे ३ खंड त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. वसईची मोहीम (१७३७ – १७३९) (१९३६), मूतावर भ्रमण (१९४०), ऐतिहासिक शब्दकोश (२ भाग, १९६२) हे त्यांचे काही इतिहासविषयक ग्रंथ होत त्र्यंबक शंकर शेजवलकर (१८९५ – १९६३) ह्यांनी निजाम – पेशवे संबंध (१९५९), पानिपत ... (१९६१), कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमि (१९६१), श्रीशिवछत्रपति : संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने (१९६४), ह्यांसारखे महत्तवपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांचे निवडक लेख १९७७ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यापूर्वीही त्यांच्या लेखसंग्रहाचे दोन भाग प्रसिद्ध झाले होते (१९४०; १९५९). रायगडची जीवनकथा (१९६२) हा शां. वि. आवळसकरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय.

खाजगी व्यक्ती आणि सार्वजनिक संस्था यांचे संशोधनकार्य चालू राहिलले.तरीपण जनमानसात एक भावना कायम घर करून वसली, की जोपर्यत मराठी राज्यकर्त्याचा दप्तरखाना संशोधकांना खुला नाही, तोपर्यत मराठी इतिहासाचे संशोधन अपुरे राहणार, पेशव्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर (१८१८) त्यांचे दप्तर, रोजकीर्दी, हुकम, परराज्यातील वकिलांना पाठविलेल्या पत्रांचे तर्जुमे, त्यांची उत्तरे, पथके, पागा तसेच फौजांचा व किल्ल्यांचा खर्च यांसंबंधी सर्व कागदपत्रे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात आली.त्यानंतर इनाम कमिशनपुढे इनामदार, सरदार, संस्थानिक यांनी सादर केलेल्या सनदा, कैफियती वगैरे कागदपत्रांची त्यांत भर पडली. शिवाय गावांचे महालांचे जमीनमहसूल, कर, पट्ट्या यांच्या हिशोबांची कागदपत्रे  जिल्हा महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ही सर्व कागदपत्रे पुण्यात निरनिराळ्या वाड्यांतून प्रवास करून १८९० पासून एका भक्कम दगडी इमारतीत ठेवण्यात आली आहेत.

कचेरीचे नाव आहे, ‘एलीअनेशन ऑफिस आणि पेशवा दप्तर’. हे दप्तर संशोधकांना पहावयास मिळावे असे ठराव भारतीय ऐतिहासिक अभिलेखागार समितीने १९२० पासून मंजूर केले. जदुनाथ सरकार यांच्या सल्‍लयाने १९२९ साली मुंबई सरकारने रियासतकार  सरदेसाई यांची पेशवे दप्तरातून ऐतिहासिक कागदपत्रे निवडण्याच्या व प्रकाशित करण्याच्या कामावर नेमणूक केली. सरदेसाई हे मुख्यत: ‘रियासतकार’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी मुसलमानी व मराठी रियासतींवर लिहिले. ह्या रियासतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील घटना आतापर्यत राजवाडे, खरे, साने इत्यादींना उजेडात आणलेल्या बखरी – कागदपत्रांवर आधारलेल्या आहेत. किंबहुना या सर्व कागदपत्रांना सरदेसाई यांनी बोलके केले. सरदेसाई यांची पेशवे दप्तरच्या कामावर नेमणूक होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची मराठे शाहीच्या इतिहासाशी अत्यंत जवळून असलेली ओळख हे होय.

सरदेसाई यांनी आपले मदतनीस म्हणून कृ. पां. कुलकर्णी; कृ. वा. पुरंदरे, य. न. केळकर, मा. वि. गुजर, वि. गो. दिघे ह्यांसारख्या संशोधकांची निवड केली. अनेक रूमालाची तपासणी झाली. यातील चिटणीशी विभागातील रूमालांत पेशव्यांचा राजकीय पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्यातील निवडक कागदपत्रे बाजूला करून त्याच्या नकला करण्यात आल्या. तारखा लावून, विषयवार विभागणी करून ती छापण्यात आली. पण एवढ्याने पेशवे दप्तरातील चिटणीशी आणि हिशेबी कागदपत्रांचे संशोधन पूर्ण झाले असे नाही. आपल्या मदतनीसांच्या साह्याने आणि लोगन, जॅक्सन यांच्या अहवालांच्या आधारे या दप्तराच्या मराठी – इंग्रजी मार्गदर्शिकाही सरदेसाई यांनी तयार केल्या. त्यांत निरनिराळ्या विभागांचे सामान्य स्वरूप दाखवून त्यात कोणत्या प्रकारचे कागद मिळतात याचे विवेचन केले आहे. या कामातून पंचेचाळीस मराठी व दोन फार्सी कागदपत्रांचे खंड प्रकाशित झाले.

या पेशवे दप्तरातील नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या कागदपत्रांमुळे पहिले बाजीराव पेशवे आणि निजामाचा संघर्ष, दाभाडे सेनापतीचा पाडाव. उत्तर हिंदचे राजकारण, वसईची मोहिम, नानासाहेब पेशवे, रामराजा प्रकरण, कर्नाटकातील मोहिमा, पानिपत, माधवराव पेशवे यांची कारकीर्द, बारभाईचे राजकारण, नागपूरकर भोसले इ. प्रकरणांची नव्याने मांडणी करणे आवश्यक झाले. भा. इ. शं. मंडळाप्रमाणे पेशवेदप्तर संशोधनकचेरी हे एक इतिहाससंशोधनाचे केंद्र बनले व त्यांतून वि. गो. दिघे. मा. वि. गुजर यांसारखे काही संशोधक नव्याने तयार झाले.

पेशवेदप्तराचे संशोधन पूर्ण झाल्यावर या कचेरीत पुणे दरबारी असलेल्या ब्रिटिश वकीलांच्या, गव्हर्नर जनरल व इतरांशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या फायलींचा अभ्यास सुरू झाला. पहिला कायम वकील मॅलेट १७८६ मध्ये पुण्यात दाखल झाला होता. शेवटच्या वकीलाने  -एल्फिन्स्टनने – १८१८ च्या सुरूवातीस पेशव्यांचे राज्य खालसा केले. १७८६ – १८१८ या बत्तीस वर्षातील इंग्रज वकीलांचा पत्रव्यवहार वाचताना पेशवाईच्या शेवटच्या काळातील राजकारणाचा जवळून अभ्यास करावयास मिळतो.

मराठी इतिहास –साधने प्रसिद्ध होत असताना संशोधकांनी इतर भाषांतील साधनांकडे दुर्लक्ष केल नाही. सतराव्या- अठराव्या शतकांतील मुसलमानी रियासतीत पत्रव्यवहार व तवारीखा लिहिण्याचे काम फार्सी भाषेत चाले. फार्सी साधनांचा शोध सुरू झाला. एलियट आणि डाउसन यांनी १८६७ – ७७ या दशकात हिंदी इतिहासकारांनी सांगितलेला हिंदुस्थानचा इतिहास हिस्टरी ऑफ इंडिया अँज टोल्‌ड बाय इट्‌स ओन हिस्टॉरिअन्स या मालेच्या ८ खंडात प्रसिद्ध केला होता. पैकी सातव्या आणि आठव्या खंडांत प्रसिद्ध झालेल्या फार्सी तवारीखांच्या फार्सी भाषेतील नकला मिळवून त्यांचा बारकाईने अभ्यास सुरू झाला. अबदुल हमीद लाहोरीचा बादशाहनामा, इनायतखानाचा शाहजहाननामा, मिर्झा मुहम्मदखानाचा आलमगीरनामा, खाफी – खानाचा मुन्तखब – उल्‌लुबाब, इरादतखानाची तारीख, मुहम्मद बिन कासीमचा इब्रुतनामा, भीमसेनाचा नुस्खा – इ- दिलकुश अशा किती तरी फार्शी ग्रंथांची भाषांतरे झाली.

अशा रीतीने गेल्या शंभर वर्षात ऐतिहासिक साधनांचा शोध सुरू झाल्यापासून आजतागायत काव्येतिहाससंग्रहाने प्रसिद्ध केलेली सु. ६, ३०० पृष्ठे, वासुदेवशास्त्री खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाची सु. ७०० पृष्ठे, राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांची ५ ते ७ हजार पृष्ठे, सरदेसाई यांनी संपादिलेल्या पेशवे दप्तरातील निवडक कागदपत्रांची सु. ८,००० पृष्ठे आणि भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या साधनांची मिळून पन्नास हजार पृष्ठे भरतील इतकी मराठेशाही इतिहासाची साधनसंपत्ती निर्माण झाली आहे. या साधनांचा अभ्यास करून मराठेशाहीचा समग्र इतिहास लिहिणे आता एकट्या दुकट्या संशोधकाच्या आवाक्यातील काम राहिले नाही.

मराठेशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बरीच चरित्रे मराठीत लिहिली गेली आहेत.

  1. चिंतामण विनयक वैद्य (मराठा- स्वराज्य- संस्थापक श्रीशिवाजी महाराज, १९३२),
  2. कृ. अ. केळूसकर ( क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र, १९०७),
  3. सर यदुनाथ सरकारकृत शिवाजी व शिवकाल (अनु. वि. स. वाकसकर, १९३०),
  4. विजय देशमुख (शककर्ते शिवराय, २ खंड, १९८२),
  5. ब. मो. पुरंदरे, (राजा शिवछत्रपति, १९६५)

ही त्यांतील काही होत.

कमल गोखले ह्यांचे संभाजीचरित्रही मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांत (म. १९७१, इं. १९७८) प्रसिद्ध आहे.

  1. ह्यांखेरीज ताराबाई (हरिश्चंद्र नारायण नवलकर – १८९८ ; रंगूबाई जाधव – १९४६),
  2. थोरले बाजीराव पेशवे (ना. के. बेहेरे – १९३० ;गो. स. सरदेसाई – १९४२ ; म. श्री. दीक्षित – १९७८),
  3. नानासाहेब पेशवे (गो. स. सरदेसाई – १९२६ , १९४४ ; चिं. ग. गोगटे – १९०८),
  4. नाना फडणवीस (वासुदेवशास्त्री खरे – १८९२ ; घनुर्धारी – १८९३),
  5. महादजी शिंदे (वा. रं. शिरवळकर; वि. त्रिं. मोडक – १८९३ ; बा. रा. मावळकर – १९३७),
  6. थोरले माधवराव पेशवे (धनुर्धारी – १८९७ ; स. अ. सहस्त्रबुद्धे – १९३८ , द. वा. पोतदार – १९४५),
  7. सखाराम बापू (य. गो. कानेटकर), अहिल्याबाई होळकर (ग. चिं. देव - १८९५; धनुर्धारी – १८९५ ; ‘पुरूषोत्तम’ – १९१३ ; वा. दा. गोखले – १९४९),

ह्यांसारख्या मराठेशाहीतील विविध ऐतिहासिक व्यक्तीची चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत.

मराठेशाहीला शासनपद्धती या विषयावर मंडळातील शं. ना. जोशी यांनी लिहिलेला अर्वाचीन महाराष्ट्रेतिहासकालातील राज्यकारभाराचा अभ्यास माग १ ला १६०० ते १६८० (१९५९) हा ग्रंथही उल्लेखनीय आहे.मराठ्यांच्या युद्धनीतीचे विवेचन करणारे ग्रंथही लिहिले गेले. ग्‍वाल्हेरच्या फैजेतील कॅप्टन गणेश वासुदेव मोडक यांनीलिहिलेला प्रतापगडचे युद्ध (१९२७), बडोद्याचे सेनापती जनरल नानासाहेब शिंदे यांनी लिहिलेला मराठ्यांच्या प्रसिद्ध लढाया (१९२२) हे असे काही ग्रंथ होत. द. ब. पारसनीस यांनी लिहिलेला मराठ्यांचे आरमार (१९०४) हा ग्रंथही उल्लेखनीय आहे.

कागदपत्रांचे युग आले, तेव्हा महाराष्ट्रातील संस्थानेसुद्धा जागी झाली. बहुतेक संस्थांनांनी इंग्रज सरकारास पेश करण्याकरता आपले इतिहास इंग्रजीतून प्रसिद्ध केले होते. संशोधकांच्या साहाय्याने सावंतवाडी, बावडा, औंध, इचलकरंजी, कोल्हापुर, धार, देवास, इंदूर यांनी आपले इतिहास या विसाव्या शतकात लिहून घेतले. कुलाबकर आंग्र्यांचा इतिहास दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहून काढला (१९३९). यादव माधव काळ्यांनी नागपूरकर भोसल्यांची बखर प्रसिद्ध केली (आवृ. २ री १९३६). शेजवलकरांनी त्यांच्याबाबतची कागदपत्रे प्रसिद्ध केली. मराठ्यांच्या इतर सत्तांशी आलेल्या संबंधांबाबतही ग्रंथलेखन झाले. उदा., मराठे व इंग्रज ..... (१९१८ – न. चिं. केळकर), निजाम – पेशवे संबंध ( १९५९ – त्र्यं. शं. शेजवलकर), मोगल आणि मराठे (१९६३ – सेतुमाधवराव पगडी), पोर्तुगेज – मराठे संबंध ( १९६७ – पां. स. पिसुर्लेकर) इत्यादी.

मराठेशाहीतील व्यापक समाजजीवनाची आर्थिक व्यवहारांची, धार्मिक कर्मकांडांची, सणांची, कपड्यांची, खेळांची, भांडी-दागिन्यांची, घरे, किल्ले, देवळे, पाटबंधारे, तलाव ह्यांच्या बांधणीची माहिती देणारे प्रमाणभूत ग्रंथ मराठीत फारसे नाहीत. किल्ले पुरंदर (१९४०, कृ. वा. पुरंदरे), मोर संस्थान ऐतिहासिक – स्थळ – दर्शन, सिंहगड, शनिवारवाडा, स्वराज्यातील तीन दुर्ग (अनुक्रमे १९४५, १९४८, १९४९, १९६७- ग. ह. खरे), रायगडची जीवनकथा (१९६२, शां. वि. आवळसकर) असे काही ग्रंथ उल्लेखनीय होत.

महाराष्ट्राचा मध्ययुगीन काळ म्हणजे बहामनी आणि त्यांतून फुटलेल्या शाह्यांचा काळ. बा. प्र. मोडक ह्यांनी बुसातीने सलातीन आणि अन्य काही फार्सी ग्रंथांच्या आधारे ...विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास (१८८६) लिहिला. बुर्हान – इ – मासिर ह्या फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचे मराठी रूपांतर अहमदनगरची निजामशाही भ. ग. कुंट्यांनी केले आहे. (१९६२). बुसातीने सलातीन ह्या ग्रंथांचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस ह्यांनी केले होते. ते वा. सी. बेद्रे ह्यांनी संपादिले आहे ( विजापूरची आदिलशाही, १९६८). अशी काही उदाहरणे असली, तरी महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळाचा महाराष्ट्रात व्हावा तसा अभ्यास झालेला नाही. याचे एक कारण फार्सींचे सामान्यत: अज्ञान आणि दुसरे समकालीन साधनांचा अभाव.

पाश्चात्य विद्येचे वारे वाहू लागताच महाराष्ट्रातील विद्वान मंडळी प्राचीन इतिहासाच्या साधनांकडे वळली. काही प्राचीन शिलालेख वाचून त्यांचा अर्थ लावणारे पहिले चिकित्सक पंडित म्हणजे आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर. या पंडिताने एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकातून लेख लिहिले. भाऊ दाजी लाड यांनाही ताम्रपट, शिलालेख वाचण्याचा, जुनी नाणी, पोथ्या जमा करण्याचा नाद होता. त्यांनी जमा केलेल्या अवशेषांचा संग्रह मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने जतन करून ठेवला आहे.

महाराष्ट्रात प्राचीन अवशेषांकरिता उत्खनकार्य केलेल्या विद्वानांत सहा-सात विद्धानांची नावे प्रामुख्याने येतात, ती म्हणजे डॉ. सांकलिया, म. ना. देशपांडे, मो. गं. दीक्षित, शां. भा. देव, म. के. ढवळीकर, अ. प्र. जामखेडकर, म. श्री. माटे इत्यादी. या उत्खननाने महाराष्ट्राचा इतिहास अश्मयुगापर्यत पोहोचतो; पण हा काळ अंधुक आहे. वेदकालापासून आपण ठसठशीत पायावर उभे राहू शकतो. श्रुतिस्मृतिपुराणे व ताम्रशिलाशासने यांचा अभ्यास करून महाराष्ट्राचा सांसकृतिक इतिहास लिहिणारे पंडित म्हणजे महामहोपाध्यायपांडुरंग वामन काणे, रा. गो. भांडवलकर, देवदत्त भांडारकर, फ्लीट, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इ. होत. यातील काही अंश इंग्रजीत आहे.

काणे यांनी हिंदु धर्मशास्त्राचा इतिहास पाच खंडांत इंग्रजीत लिहून काढला. हा इतिहास सांगताना हिंदु धर्माच्या पुनर्रचनेच्या मार्गदर्शक तत्वांचा वेधही काणे ह्यांनी घेतला आहे. यशवंत आवाजी भट ह्यांनी ह्या ग्रंथाचा सारांशरूपाने दोन खंडात केलेला मराठी अनुवाद महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळानो प्रसिद्ध केला आहे (१९६७; १९७०).

महाराष्ट्राच्या सास्कृतिक इतिहासाच्या संदर्भात शं. दा. पेंडसेकृत महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास (१९३१) व इरावती कर्वे ह्यांचे मराठी लोकांची संस्कृती (१९५१) ही दोन पुस्तके उल्लेखनीय होत. ‘महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ज्ञानेश्वरादि साधुसंतांचा जितका जिव्हाळ्याचा संबंध आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचा संबंध श्रुतिस्मृतीचा आहे’ अशी भूमिका हा ग्रंथ लिहिताना पेंडसे ह्यांनी घेतलेली असून श्रुति-स्मृती-सूत्रकालीन माहितीची ह्या ग्रंथात अंतर्भूत केलेली आहे. मराठी माणसांच्या संसकृतीच्या काही अंगांचे विवरण करणे, हा इरावतीबाईच्या पुस्तकाचा मुख्य हेतू असला, तरी त्या विवरणाच्या ओघात महाराष्ट्राच्यासांसकृतिक इतिहासाबाबतमहत्त्वाचे उल्लेखयेऊन जातात.

महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर काम करून श्री. व्यं. केतकर ह्यांनी प्राचीन महाराष्ट्रा शातवाहन पर्व (१९३५) हा ग्रंथ लिहिला. कलाचुरि नृपति आणि त्यांचा काल (१९५६), वाकाटक नृपति आणि त्यांचा काल (१९५७), शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख (१९७४), सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप ह्यांचा इतिहास आणि कोरीव लेख ( १९७९) हे महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ह्यांचे ग्रंथही महत्तवपूर्ण होत. पु. ग. सहस्त्रबुद्धे ह्यांनी इ. स. पू. २३५ ते इ. स. १९४७ पर्यतचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास महाराष्ट्र संस्कृति (१९७९) ह्या आपल्या ग्रंथात सांगितला आहे.

महाराष्ट्राच्या प्राचीन मध्ययुगीन इतिहासाला उपयोगी पडतील अशा उल्लेखनीय ग्रंथांपैकी काही असे : ग. ह. खरेकृत दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने (३ खंड, १९३० , १९३४, १९४९); मो. गं. दीक्षितसंपादित- विवेचित महाराष्ट्रातील काही प्राचीन ताम्रपट व शिलालेख (१९४७), शं. गो. तुळपुळेलिखित प्राचीन मराठी कोरीव लेख (१९६३), शां. भा. देवांचे महाराष्ट्र : एक पुरातत्वीय समालोचन (१९६८) इत्यादी.अर्वाचीन कालखंडातील सामाजिक- राजकीय इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने फुले, रानडे, गोखले, टिळक, गांधी, आंबेडकर इत्यादींची मराठीत लिहिली गेलेली चरित्रे उपयुक्त आहेत. उदा., न. चिं. केळकरकृत टिळकचरित्र (३ खंड, १९२३, १९२८, १९२८), न. र. फाटक ह्यानी लिहिलेले गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचे चरित्र – आदर्श भारत सेवक (१९६७). धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले जोतिबा फुले ह्यांचे चरित्र – महात्मा जोतिराव फुले (१९६८).

शं. दा. जावडेकर ह्यांनी लिहिलेला आधुनिक भारत (१९३८) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. पेशवाईच्या अस्तापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यत हिंदुस्थानात- विशेषत: महाराष्ट्रात – ज्या वैचारिक चळवळी झाल्या, त्यांचे विश्लेषण जावडेकरांनी ह्या ग्रंथात केलेले असल्यामुळे तो निव्वळ राजकीय इतिहासाचे निरूपण करणारा ग्रंथ राहिलेला नाही. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सांगणाऱ्या निर्देशनीय ग्रंथांपैकी इंग्रजांनी हिंदुस्थान कसा सोडला? (रा. गो. भिडे, १९४८), भारतीय स्वातंत्र्यसंग्राम ( वसंत नगरकर, १९८१) , छोडो भारत (श्रीपाद केळकर, १९८३) आणि सत्तांतर (गोविंद तळवळकर २ खंड, १९८३) हे काही होत.

मराठी भाषेत हिंदुस्थानच्या पलीकडील देशांविषयी एक ओळही ब्रिटिश अमलापूर्वीच्या मराठी वाङ्‌मयात सापडत नाही, म्हणून म. म. पोतदारांनी खेद व्यक्त केला होता. अलीकडे मध्य आशियातील अठऱाव्या शतकातील अनेक घडामोडींच्या बातम्या देणारे व पेशव्यांकडे आलेले काही फार्सी अखबार मराठी रूपांतरासह ग. ह. खरे यांनी प्रकाशित केले आहेत. तत्पूर्वी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी राष्ट्रकथामाला काढून भारताबाहेरील राष्ट्रांवर ग्रंथ तयार करवून प्रसिद्ध केले. इराण ( १८९३, शंकर विष्णु पुराणिक), कार्थेज्‍(१८९३, नागेश आबाजी काथवटे), तुर्कस्थान (१८९३, रावजी भ. पावगी), जर्मनी (१८९४ ,हरि सदाशिव बेलवलकर), रोम (१८९६ ,विनायक कोंडदेव ओक), फ्रान्सचा जुना इतिहास (१८९३, कृ. अ. केळुसकर) अशी काही पुस्तके या मालेत प्रसिद्ध झाली.

विजापूरकरांनी चालविलेल्या ग्रंथमालेनेही फ्रीमनकृत युरोपचे संक्षिप्त इतिवृत्त (वि. गो. विजापूरकर), जपान (१९०५, ग. मो. गोरे), जगातील क्रांतिकारक लढाया (१९०७ , ज. स. करंदीकर, सर एडवर्ड क्रीसीकृत एका पुस्तकाच्या आधारे) असे काही ग्रंथ प्रसिद्ध केले. पहिले महायुद्ध झाले तेव्हा आधुनिक जर्मनीची उत्क्रांती (१९१५ , ना. कृ. आगाशे), जर्मन साम्राज्याची पुन:स्थापना (१९२८, वि. ग. आपटे) हे ग्रंथ तयार झाले. न. चिं. केळकरांचा आयर्लदचा इतिहास (१९०९) व वि. गो. दिघेकृत फ्रेंच राज्यक्रांती (१९८१) हे ग्रंथही उल्लेखनीय होत.

भारताबाहेरील महान व्यक्तींची चरित्रेही मराठीत झालेली असून त्यांतूनही ऐतिहासिक माहिती मिळते. उदा., जॉर्ज वॉशिंग्टन, १८९२, मो. वि. वाळकेकर), रॉबर्ट क्लाइव्ह (१८७३, वि. ना. भागवत), मौंट स्ट्यूअर्ट एल्‌फिन्स्टन (२ भाग, १९११ ; १९१२, कृ. ब. गोडबोले), एडमंड बर्क (ना. गो. चापेकर), जोसेफ मॅझिनी (१९०७, वि. दा. सावरकर), लेनिन (एस्‌. जी. पाटकर). लीओ टॉलस्टॉय (१९७८, सुमती देवस्थळे).

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने प्रकाशित केलेल्या इतिहास – विषयक ग्रंथांत मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (न्या. म. गो. रानडे लिखित राइज ऑफ द मराठा पॉवर ह्या ग्रंथाचा न. र. फाटक ह्यांनी केलेला अनुवाद), महाराष्ट्रातील दप्तरखाने (वि. गो. खोबरेकर) ह्यांचा समावेश होतो. साहित्य संसकृति मंडळाने इतिहासविषयक ग्रंथांना अनुदानही दिले. उदा., स. मा. गर्गे ह्यांनी लिहिलेला करवीर रियासत ( १९६८) हा ग्रंथ. १९३४ साली विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना झाली. १९८४ पर्यत मंडळाने २६ वार्षिके प्रसिद्ध केली. त्यांतूनही इतिहासविषयक लेख प्रसिद्ध झाले. १९६१ पासून विदर्भ संशोधन मंडळाला वार्षिकांच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे अनुदान मिळत आहे.

लेखक: वि. गो. दिघे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate