অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- कथा

हरिभाऊ आपटे यांनी १८९० साली करमणूक पत्र सुरू केले. आधुनिक मराठी कथेचा जन्म त्याच सुमारास झाला.  हरिभाऊंच्या ‘स्फुट गोष्टी’ पासून आधुनिक मराठी कथावाङमयाचा प्रवाह सुरू झाला.  त्यापूर्वी मराठीत कथालेखन होत नव्हते असे नाही.  आख्यानक कविता, कथागीत, पोवाडा, लावणी वगैरे माध्यमांतून प्राचीन काळी कथा प्रगट होत होती.  लोकांचे मनोरंजन करून त्यांना अध्यात्माचे व भक्तिमार्गाचे धडे देणे हेच त्या वेळी तिचे प्रयोजन होते.  तेराव्या शतकात प्राचीन महानुभावीय गद्यामध्ये अवतरलेली कथासुद्धा याच प्रयोजनाने भारून गेली होती.  महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सांगत असताना चक्रधरस्वामींनी वेळोवेळी दिलेले दृष्टान्त दृष्टांतपाठ या ग्रंथात संगृहित केले आहेत.  ‘जात्यंध आणि हत्ती’,  ‘कठियाचा दृष्टान्त’ इ.  दृष्टान्तांतून कथा सांगण्याचे कौशल्य तर दिसतेच, पण त्याबरोबर पंथाचे तत्वज्ञान दृष्टान्तांच्या साहाय्याने स्पष्ट करण्याची भूमिकाही दिसते.  लीळाचरित्र, गोविंदप्रभुचरित्र या म्हाइंभट्टांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथांत व स्मृतिस्थळ या ग्रंथात प्रत्येक आठवण कथेचा मोहक वेष धारण करून पुढे येते. या काळात कथेचा आणखी एका रूपाने झालेला अवतार विलोभनीय वाटतो.

त्या कथा म्हणजे कहाण्या, लोककथा.  प्रत्येक व्रताची वा देवतेची एकेक कहाणी असते. छोटी छोटी भावपूर्ण वाक्ये, त्यांमधील आशयगर्भता आणि त्यांतील बोध यांमुळे या कहाणीचे स्वरूप मोठे रम्य झाले आहे. तत्कालीन स्त्रीजीवनावर या कहाण्या चांगला प्रकाश पाडतात.  आटपाट नगरात सुरू झालेली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण होताना मनाला विलक्षण चटका लावून जाते. मराठी लोकसाहित्याचा कथावाङमयातील हा मोठा वारसाच म्हणावा लागेल.  प्रत्येक गावात व प्रदेशात परंपरेने चालत आलेल्या या लोककथा जितक्या अदभुत, तितक्याच चटकदार वाटतात व तेथील लोकजीवन उजळतात. तथापि आधुनिक मराठी कथा हरिभाऊ आपटे ह्यांच्या करमणूक ह्या नियतकालिकातून सुरू झाली.  त्यापूर्वी सत्तर वर्षे म्हणजे अव्वल इंग्रजीच्या काळात, ज्या कथा लिहिल्या गेल्या, त्यांचे स्वरूप बहुतांशी भाषांतरित, अनुकरणात्मक व अदभुतरम्य असेच होते.

१८०६ मध्ये तंजावर येथील सरफोजी राजे यांनी इसापस फेबल्स ह्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर सक्खन –पंडित ह्यांच्याकडून करवून बालबोध मुक्तावलि या नावाने प्रसिद्ध केले.  त्यानंतर हितोपदेश (१८१५), पंचतंत्र (१८१५), राजा   प्रतापदित्याचे चरित्र (१८१६), सिंहासनबत्तिशी (१८२४) यांची भाषांतरे छापली गेली.  सदाशिव काशीनाथ छत्रे (१७८८-१८३० ?) यांनी बरक्विन्स चिल्ड्रन्स फ्रेंड ह्या पुस्तकावरून बाळमित्र भाग १ ला (१८२८) हे पुस्तक लिहिले.  त्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे मुलांकरिता नीतिबोध सांगणाऱ्या( कथांची एक लाटच निर्माण झाली.  अन्य वाङमयातील अदभुतरम्य कथांनीही मराठी मनाची पकड घेतली व आरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, १९१३, कृष्णशास्त्री चिपळूणकर), हातिमताई (७ भाग,१८५४-५५ कृष्णराव माधवराव प्रभु), गुलबकावली (१८७३,  वि.स. नवलकर) ह्यांसारख्या गोष्टींची भाषांतरे मराठीत प्रसिद्ध झाली.   या अद्भुतरम्यतेचा त्या काळच्या वाचकांवर इतका पगडा बसला, की त्याच धर्तीचे व त्याच वळणाचे मराठी भाषेतील सुरस गोष्टी – भाग १ ला (नारायण गोपाळ दामले – साहा.  विनायक हरि सिनकर, १८७०), महाराष्ट्र भाषेत मनोरंजक गोष्टी (केशव रघुनाथ चोंचे, ५ भाग, १८७० – ७३) अशांसारखे गोष्टींचे संग्रह प्रसिद्ध होऊ लागले.  अदभूतरम्यतेबरोबरच ठकसेनाच्या गोष्टी, बिरबल व बादशहा यांच्या गोष्टी, भोजराजा आणि कालिदास ह्यांच्या गोष्टी इ. चातुर्यकथांनाही याच काळात बहर आला.

करमणुकीतून हरिभाऊंनी लिहिलेल्या गोष्टींच्या पूर्वी पुष्कळच गोष्टी त्या काळच्या मराठी ज्ञानप्रसारक, विविधज्ञानविस्तार, निबंधचंद्रिका, मनोरंजन या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या.  तथापि त्या गोष्टींचे स्वरूप बहुतांशी अनुवादित असेच होते. त्यांमधून काही दंतकथांवर आधारलेल्या ऐतिहासिक कथा आल्या आहेत,  उपदेशपर रूपकात्मक कथा आल्या आहेत आणि फार थोड्या अशा सामाजिक कथाही आल्या आहेत. त्या सर्वांचे स्वरूप अदभुतरम्य व अवास्तव असे.करमणूकपूर्वकालातील कथा ही अशी परप्रकाशित, सामान्य व दुबळी होती.  तिला स्वत:ची शैली नव्हती, स्वत:चा आकार नव्हता व स्वत:चे विश्व नव्हते.  संस्कृतमधून वा इंग्रजीमधून भाषांतरित झालेल्या कथांमधूल नीतिबोध व कल्पनारम्यता होती, तर फार्सीतून मराठीत आलेल्या कथांमधून अधभुतता व भडक शृंगार होता.

करमणूक कालखंड-स्फुट गोष्ट

अशा अदभुताच्या व अवास्तवतेच्या पार्श्वभूमीवर हरिभाऊंची ‘स्फुट गोष्ट’ एकदम उठून दिसते.  मराठी कथावाङमयाला वास्तवाभिमुख करण्याचे कार्य हरिभाऊंच्या स्फुट गोष्टींनी केले व कथेला स्वतंत्र आकारही दिला.

मात्र लघुकथेला आज जे तंत्रबद्ध व विकसित स्वरूप आहे, ते हरिभाऊंच्या कथांना नव्हते.  लघुकथा हे नावही त्यावेळी प्रचलित नव्हते.  हरिभाऊंची कथा ही ‘स्फुट गोष्ट’ होती व या वाङमयप्रकारासंबंधी हरिभाऊंच्या कल्पनाही संदिग्ध होत्या करमणुकीच्या एका किंवा दोन अंकातून संपणारी छोटी गोष्ट म्हणजे स्फुट गोष्ट एवढीच त्यांची कथेबद्दलची भूमिका होती.  त्यामुळे ‘अपकाराची फेड उपकारानेच’, ‘थोड्या चुकीचा घोर परिणाम’, ‘काळ तर मोठा कठीण आला’  अशांसारख्या त्यांच्या काही कथा कादंबरीप्रमाणे ऐसपैस झालेल्या आहेत.  कादंबरीप्रमाणे त्या प्रकरणांतही विभागलेल्या आहेत.  त्यांमधील पाल्हाळ, प्रसंगाची गर्दी व अगदी बारीक सारीक तपशील पुरविण्याचा त्यांत दिसून येणारा आग्रह पाहिला, म्हणजे या दीर्घकथा कादंबरीला जवळ आहेत, असे वाटू लागते.

पण हरिभाऊ जसजसे एखाद्याच घटनेवर किंवा एखाद्याच व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित करू लागले, तसतसा त्यांच्या स्फुट गोष्टींना आकार येऊ लागला.  कथा सांगण्याची एक वेधक पद्धत असते,  वाचकांची उत्कंठा सतत जागृत राहील अशी काळजी कथा सांगणाऱ्याचने घ्यावयाची असते, याची जाणीव ज्यावेळी हरिभाऊंना होऊ लागली वेळी ‘पक्की अद्दल घडली’, ‘पुरी हौस फिटली’, ‘डिप्सेसिया’, ‘पहिले यांसारख्या लघुकथेच्या चौकटीत बसणाऱ्याह कथा त्यांच्या लेखणीतून बाहेर पडू लागल्या.  विशेषतः कथेच्या शेवटी कथानकाला अनपेक्षित कलाटणी देऊन वाचकांना विस्मयाचा धक्का देण्याचे त्यांचे चातुर्य पाहिले म्हणजे अभिजात कथाकाराच्या ठिकाणी आवश्यक असणारे गुण त्यांच्या ठिकाणी कसे वास करीत होते याची कल्पना येते.

हरिभाऊंची स्फुट गोष्ट प्रामुख्याने कौटुंबिक स्वरूपाची आहे. मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबांच्या जीवनातच ती रमते.  त्यांची सुखदु:खे, त्यांच्या आशाआकांशा अगदी आपल्याच आहेत, असे वाचकांना वाटावे असा हरिभाऊंचा प्रयत्न असे.  त्यामुळे हरिभाऊंची स्फुट गोष्ट म्हणजे लेखकाने वाचकांशी केलेला सुखसंवादच आहे असे वाटते.  गोष्ट लिहिताना त्यांच्या समोर सतत वाचक उभा असतो आणि म्हणूनच कथेचा ओघ सोडून अनेकदा ‘वाचकहो’  म्हणून त्यांच्याशी हरिभाऊंचे हितगुज सुरू होते.

बोधप्रधानतचा हा त्यांच्या गोष्टीतील सर्वांत महत्वाचा विशेष. कथेच्या वाचनामुळे वाचकांच्या मनात सद्भाव, सद्विचार वाढावा अशी त्यांची कथालेखनामागील भूमिका असते.  कथानकात मधूनमधून भाष्य येते, ते त्यामुळेच.  या नैतिक व बोधवादी दृष्टिकोणामुळे कथा सुखान्त करण्याकडे त्यांचा कल असतो.  सत्प्रवृत्त माणसांना सत्प्रवृत्तीचे फळ मिळते; दुष्ट माणसांचा नाश तरी होतो किंवा त्यांना पश्चाताप तरी होतो.  हरिभाऊंच्या ‘स्फुट गोष्टी’ मुख्यत: घटनाप्रधान आहेत.  या घटना सांगताना बारीकसारीक तपशीलसुद्धा वाचकांना पुरविला पाहिजे, अशी त्यांची इच्छा असते.  त्यांच्या कथेतील पाल्हाळाचे हे एक महत्वाचे कारण होय.

दुष्काळाने ग्रासलेल्या ग्रामीण जीवनावर हरिभाऊंनी लिहिलेल्या करुण कथा सोडल्या, तर त्यांच्या कथांतून होणारे जीवनदर्शन मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवनापुरतेच मऱ्यादित आहे.  त्यातही ते फार खोलवर शिरत नाहीत.  त्यांच्या बहुतेक कथांतील प्रमुख पात्रे सत्प्रवृत्त आहेत, सहनशीलपणाने छळाला तोंड देणारी आहेत व क्षमाशीलही आहेत.  त्यांच्या साहाय्याला दैव आणि योगायोग येतात व त्यांचे जीवन सुखी होते.  नैतिक बोध करण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्या कथा जीवनातील विविधता टिपत नाहीत.  मात्र जीवनाचे मऱ्यादित दर्शन व नेटकेपणाने व जिव्हाळ्याने घडवतात.  हरिभाऊंच्या ‘स्फुट गोष्टीं’ चे स्वरूप हे असे आहे.

त्यांच्या स्फुट गोष्टींचा ठसा त्यांच्या काळात लिहिणाऱ्याट बऱ्यावच लेखकांवर स्पष्ट उमटला आहे.  १८९० पासून १९१० पर्यंतची कथा ‘स्फुट गोष्टीं’ च्याच वळणावर गेली आहे.  समाजाला काही तरी नीतिपाठ देण्याच्या भूमिकेतूनच या काळातील बरेच कथालेखन झाले; पण हरिभाऊंच्या लेखणीतील जिव्हाळा व गोडवा या कथांतून उतरला नाही.  त्यामुळे यांपैकी पुष्कळच गोष्टी पाल्हाळीक, चर्चाप्रधान व अतिरंजित झाल्या आहेत.  या काळातील करमणुकीतील किंवा मनोरंजनमधील कथा वाचली, की याची साक्ष पटते.  या काळात काही ऐतिहासिक गोष्टीही लिहिल्या गेल्या; पण त्या बहुधा दंतकथांवर आधारलेल्या असल्याने त्यांचे स्वरूप रहस्यमय व कल्पनाप्रधान झाले आहे.  पात्रांच्या नावापुरती ऐतिहासिकता असली, तर तेवढीच. अनुवादित कथांचा मात्र या काळात पूर आला होता.

त्यांतील पुष्कळच अनुवादित कथा गुप्तपोलिसी चातुऱ्याच्या असत, काही भूतपिशाचांच्या असत, काही हास्यप्रधान असत.  त्या कथांचा अनुवादही सामान्यच आहे.  त्यामुळे या वीस वर्षांत कथालेखनाच्या दृष्टीने पाऊल पुढे पडले असले, तरी कथावाङमयाचा विकास होऊ शकला नाही.  याचे एक महत्वाचे कारण असे, की कथेला नियतकालिकाच्या दृष्टीने किंवा लेखकाच्या दृष्टीने फारसे महत्व नव्हते.  कादंबरीची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती; कथा उपेक्षित राहिली होती. १९१० पर्यंत गोष्टींवर कथालेखकांची नावे देण्याचीही आवश्यकता वाटत नव्हती.  नावे असलीच, तर टोपणनावे असत. लेखकाला सुद्धा कथेचे जनकत्व मान्य करावेसे वाटत नव्हते, असा हा कथावाङमयाच्या उपेक्षेचा काळ.  ‘स्फुट गोष्ट’ यामधील स्फुट या विशेषणातच कथेची उपेक्षा जाणवत असे.  नियतकालिकाच्या कोपऱ्यारत कुठे तरी अंगचोरपणे तिला आपला संसार जेमतेम थाटावा लागे.

मनोरंजन कालखंड

संपूर्ण गोष्ट: उपेक्षा दूर करून कथेला मानाचे स्थान देण्याचे कार्य मनोरंजन मासिकाने केले. १९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने ⇨वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) या लेखकाकडे जाते. गुर्जराची कथा ही ‘संपूर्ण गोष्ट’ म्हणून ओळखली जाते.  ह्या कथा मुख्यत:  दीर्घकथाच आहेत, हे ह्याचे कारण.  गुर्जरांनी कथालेखनाला १९१० च्या आसपास सुरुवात केली.  १९६२ पर्यंत – म्हणजे त्यांच्या मृत्युपर्यंत त्यांचे कथालेखन अव्याहत चालू होते.  त्यांनी सु. ७०० कथा लिहिल्या.  त्यांच्या कथालेखनाचा काळ जरी १९६२ पर्यंत असला, तरी १९२० पर्यंतचे त्यांचे क्षेत्रातील कार्य महत्वाचे आहे.  मनोरंजन मासिकातून प्रकाशित होणारी गुर्जरांची कथा हे त्या वेळी वाचकांचे प्रमुख आकर्षण होते.

गुर्जरांनी मराठी कथेची दृष्टी बदलली.  मराठी कथा आतापर्यंत बोधप्रधान होती; ती त्यांनी रंजनप्रधान केली, हे त्यांचे महत्वाचे कार्य.  त्यामुळे त्यांच्या कथांतून आपोआप रहस्याला व घटनांना प्राधान्य मिळू लागले.  कथानकांमध्ये वाचकांची उत्कंठा वाढविण्यासाठी कोणते ना कोणते तरी रहस्य निर्माण करायचे. त्यातील गुंतागुंत वाढवून वाचकांचे कुतूहल शेवटपर्यंत जागृत ठेवावयाचे व शेवटी कथानकाला अनपेक्षित कलाटणी देऊन वाचकांना विस्मयाचा धक्का द्यावयाचा, या तंत्राचा गुर्जरांनी आपल्या गोष्टींतून अवलंब केला होता.  त्याच्या जोडीला त्यांनी कथांतून चुरचुरित संवाद आणले;  नर्म विनोद आणला; खेळकर भाषाशेलीही आणली.  त्यामुळे त्यांच्या कथांना तत्कालीन वाचकवर्गांच्या मनाची चांगलीच पकड घेतली.  मध्यमवर्गीय नवविवाहित पतिपत्नींच्या संसारातील गोड वादळे हा त्यांच्या बऱ्याच कथांचा विषय होता.  गुर्जरांनी रंगविलेली प्रणयाची सृष्टी मोहक होती.

त्यातील रंग भडक नव्हते; पण त्याबरोबरच ती जीवनात खोलवर गेलीही नव्हती.  संसारात होणाऱ्या. गैरसमजांचे व चहाच्या पेल्यातून निर्माण झालेल्या वादळांचे गोड पऱ्यावसान करण्याच्या भरात त्यांना अनेकदा योगायोगाचा आश्रय घ्यावा लागे.  त्यामुळे त्यांची कथा मधुर स्वप्नरंजनात्मक वाटते.  प्रणयाखेरीज इतरही विविध प्रकारच्या घटना त्यांच्या कथांतून येतात; पण कथेचे रचनातंत्र ठरलेले असल्याने त्या ठराविक वळणानेच जातात.  ‘पुरुषांची जात’, ‘बायकांची जात’,  ‘लाजाळूचे झाड’ , ‘इलम-इ-हिंद’  इ. अनेक कथांतून गुर्जरांचे हे गुणदोष स्पष्ट दिसतात.  त्यांच्या कथांचे हे रचनातंत्र त्यांनी आपले आवडते बंगाली लेखक प्रभातकुमार मुखर्जी यांच्या कथांवरून उचलेले आहे.  त्यांनी प्रभातकुमार मुखर्जीच्या पुष्कळशा कथांचा मराठीत अनुवाद पण केला आहे.

त्यांच्या कथांची या रचनातंत्रामुळे जशी लोकप्रियता वाढली, तसेच त्यांच्या कथांना त्यामुळे मऱ्यादाही पडल्या.  त्यांच्या संपूर्ण गोष्टींमधील जीवनदर्शन त्यामुळे उथळ झाले. योगायोग व रहस्य यांचाच आश्रय त्यांना सतत घ्यावा लागल्याने व्यक्तीपेक्षा घटनांनाच त्यांच्या कथातून महत्व मिळू लागले ; पण चतुर निवेदनशैलीमुळे व रचनेच्या त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांमुळे त्यांची कथा कल्पनारम्य असूनही (किंबहुना त्यामुळेच) विशेष लोकप्रिय झाली.  १९१०-२५ पर्यंतच्या कालखंडावर गुर्जरांचे अधिराज्य चालले म्हणून हा कालखंड गुर्जरांचा कालखंड किंवा ‘संपूर्ण गोष्टी ’ चा कालखंड म्हणून ओळखला जातो.

गुर्जरांचा कालखंड अनेक कथालेखकांनी गजबजलेला आहे.  या सर्वांवर गुर्जरांची छाप पडलेली आढळते.  काही कथालेखकांनी मात्र हरिभाऊंचे वळणच पुढे गिरविले.  नारायण हरि आपटे यांनी हरिभाऊंचा बोधप्रधान दृष्टिकोण व गुर्जरांची रंजकता उचलली व दोहोंचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला.  कृ.के. गोखले यांनी रंजकता हाच दृष्टिकोण डोळ्यांपुढे ठेवून लेखन केले व पुष्कळशा इंग्रजी कथांचा मराठीत उत्कृष्ट अनुवाद करून कथेचे दालन समृद्ध केले.  श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या कथेने कल्पनारम्य रूप धारण केले, तर उपहास,  उपरोध व काव्यात्म कल्पनाविलास या गुणांनी शिवरामपंत परांजपे यांची कथा नटली.  सरस्वतीकुमार व वाग्भट नारायण देशपांडे (१८९२-१९३६) यांच्या कथा पाल्हाळिक व जुन्याच वळणावर गेल्या आहेत.

अतिरंजितता आणि अवास्तवता यांचे प्रमाण या दोघांच्याही कथांतून विपुल आहे.  न.चि. केळकरांनी थोडेसेच कथालेखन केले; पण स्वाभाविक संवाद, मार्मिक स्वभावलेखन व विनोददृष्टी यांमुळे त्यांच्या कथा आकर्षक झाल्या आहेत.  वामन मल्हार जोशी यांनी केलेल्या कथालेखनात विचारविलास व चमत्कृती यांचे गंमतीदार मिश्रण झालेले आढळते.  असा अनेक लेखकांनी गजबजलेला हा कालखंड विविधतेने नटला आहे.  काशीबाई कानिटकर, आनंदीबाई शिर्के, गिरिजाबाई केळकर, वामनसुता इ. काही कथालेखिकांनीही मराठी कथाविश्व समृद्ध करण्यास मदत केली आहे.  पण हरिभाऊ व गुर्जर यांच्या कथेच्या पलीकडे त्यांची कथा जाऊ शकली नाही.

या काळात विनोदी कथांचे दालन अगदीच रिकामे नाही.  गुर्जरांच्या, कृ. के. गोखले यांच्या व इतर काही लेखकांच्या कथांतून गुंतागुंतीच्या घटना व चहाच्या पेल्यातील वादळे रंगवून विनोदनिर्मिती होत होती; पण तो विनोद बहुतांशी घटनाप्रधान होता.  उपहास व अतिशोयक्तीचा आश्रय घेऊन विनोद निर्माण करण्याचे कार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी सुदाम्याचे पोहे (१९१०) सादर करताना केले.  त्या अतिशोयक्तीचे व उपहासाचे अतिरेकी स्वरूप राम गणेश गडकरी यांच्या ‘बाळकराम’ मध्ये दिसू लागले.  याशिवाय वा. रा. टिपणीस, पं. मा. कामतकर यांनीही थोडीफार या दालनात भर घातली. पण एकंदरीत विनोदी कथांचे दालन या काळात उपेक्षितच राहिलेले दिसते.

या कालखंडात ‘संपूर्ण गोष्ट’ लोकप्रिय झाली, तरी ती संग्रहरूपाने फारशी लोकांच्या नजरेसमोर येऊ शकली नाही.  मनोरंजन, नवयुग, चित्रमयजगत्, उद्यान इ. काही मासिकांनी कथेला महत्वाचे स्थान देऊन कथेच्या विकासाला हातभार लावला; तरीपण याही काळात कादंबरीची लोकप्रियताच अधिक होती.  प्रत्येक प्रमुख नियतकालिकातून चालू कादंबरी असेच. या काळातील कथांचे स्वरूपही घटनाप्रधान व रहस्यप्रधान असल्यामुळे व त्यातील जीवनदर्शनही अगदी उथळ असल्याने त्या पुढे फारशा टिकू शकल्या नाहीत. आज या काळातील कथांचा आढावा घेतानासुद्धा नियतकालिकांकडेच धाव घ्यावी लागते. हाताच्या बोटावर मोजण्याइतके संग्रह या काळातील कथांचे उपलब्ध असावेत याचा अर्थ हाच, की यातील बहुतेक कथा आज इतिहासजमा झाल्या आहेत.  पण त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य मात्र आपणास विसरता येणार नाही.  नियतकालिकांच्या जगात या काळातील कथांनी थोडेफार मानाचे स्थान मिळविणे व लोकांचे लक्ष आपणाकडे ओढून घेणे हे तर केलेच; पण या काळातील कथेने बोधाचे जोखड फेकून देऊन आपणामध्ये रंजकता आणली आणि रचनेत थोडीफार रेखीवता आणली.  संपूर्ण गोष्टीने केलेले हे कार्यमराठी कथेच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा या दृष्टीने महत्वाचे आहे.

यशवंत-रत्नाकर कालखंड

संपूर्ण गोष्टीच्या कालखंडातून १९२६ च्या सुमारास आपण लघुकथेच्या कालखंडाकडे येते.  १९२६ साली रत्नाकर मासिक सुरू झाले व १९२८ साली प्राधान्याने लघुकथेला वाहिलेले यशवंत मासिक सुरू झाले.  किर्लोस्कर, ज्योत्स्ना, प्रतिमा, सममीक्षक  इ. मासिकांनी १९२६ ते १९४० या कालखंडात मराठी लघुकथेचे दालन चांगलेच समृद्ध केले.  लघुकथा हे नाव याच काळात रूढ झाले व लघुकथेच्या तंत्राची आणि स्वरूपाची सर्व बाजूंनी चर्चा होऊ लागली.  कथानकाच्या अभिव्यक्तीसाठी अनेक तंत्रपद्धतींचा अवलंब करण्यात येऊ लागला आणि त्याबरोबरच व्यक्ती हा जो कथानकातील महत्वाचा घटक, त्याच्याकडे कथालेखकाचे अधिकाधिक लक्ष जाऊ लागले.  बाह्य घटना व प्रसंगांची गुंतागुंत यांतच अधिक गुंतून न राहता व्यक्तिमनाचे कानोसे घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न होऊ लागला.  त्याबरोबर मऱ्यादित वर्तुळात फिरणारी गुर्जरकालीन कथा जीवनाच्या विविध क्षेत्रांत शिरू लागली.  नागरी जीवनाबरोबर जानपदजीवनाची विविध क्षेत्रांत शिरू लागली. नागरी जीवनाबरोबर जानपदजीवनाची चित्रेही ती रंगवू लागली. घटनांपेक्षा भावनांना या काळात अधिक महत्व येऊ लागले.  त्याबरोबरच वास्तव जीवनातील अनेक पदर ती मोठ्या कुशलतेने उकलू लागली.

फडके व खांडेकर हे या काळातील प्रमुख मानकरी असले, तरी मनोरंजनकाल व रत्नाकरकाल यांमधील सांधा जोडण्याचे काम प्रामुख्याने दिवाकर कृष्ण (१९०२-१९७३) यांनी केले.  समाधी व इतर सहा गोष्टी (१९२७) या त्यांच्या कथासंग्रहातील कथा वास्तविक गुर्जर कालखंडातच शेवटीशेवटी प्रसिद्ध झाल्या.  ‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा मनोरंजनाच्या एका अंकातून १९२२ मध्ये प्रसिद्ध झाली.  त्यानंतर १९२२ ते १९२५ या काळात ‘हातरहाट’ ‘संकष्ट चतुर्थी’,  ‘मृणालिनीचे लावण्य’,  ‘वेड्याची कहाणी’ या त्यांच्या कथा मनोरंजनमधून प्रसिद्ध झाल्या व त्यांच्या निराळेपणाने वाचकांची मने त्यांनी आकृष्ट केली.  आतापर्यंत कथा बाह्य घटनांमध्ये व कथानकाच्या गुंतागुंतीमध्येच रमली होती.  ती आता व्यक्तिमनातील भावनांची गुंतागुंत सोडवू लागली.

बाह्य संघर्षाकडून ती आंतरिक संघर्षाकडे वळली.  कथेचा अवतार केवळ रंजविणारी, उदबोधक गोष्ट सांगण्यासाठी नसून तिचा अवतार आपल्याला जाणवलेल्या जीवनांगांचे दर्शन घडविण्यासाठी आहे, ही त्यांची धारणा होती.  त्यामुळे कथेतील माणसाचे ह्रदय काव्यात्मपणे, हळुवारपणे व्यक्त करण्यात, बालमनाच्या व स्त्रीमनाच्या विविध भावछटा रंगविण्यात त्यांची कथा रमू लागली.  त्यांच्या सर्व नायकनायिका अतिशय हळव्या व भावनाप्रधान आहेत.  व्यवहारी जगाशी त्यांचे न जमल्यामुळे त्या चटकन कोमेजून जातात.  त्यांच्या ह्रदयातील अबोल दु:ख बोलके करताना दिवाकर कृष्ण त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांच्या व्यथा समजावून घेतात.

त्यामुळे भावप्रगटीकरण करणारी त्यांची शैलीही अत्यंत हळुवार आणि काव्यात्म झाली आहे.  त्यांच्या मोजक्या कथांनी रसिकांच्या मनांची विलक्षण पकड घेतली आहे.  मराठी कथेत मनोविश्लेषणात्मक कथेचा एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला.  बाह्य घटनांकडून आंतरिक संघर्षाकडे कथेला वळवून तिची क्षितिजे विस्तृत करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या कथेने केले.  याच सुमारास कॅ. ⇨गो.ग. लिमये यांनीही कथालेखनास सुरुवात केली होती.  या काळात त्यांनी लिहिलेल्या ‘किस्मत’ आणि ‘मेकॅनो’ यांसारख्या कथा मनोविश्लेषणात्मक कथांचा नमुना म्हणून उल्लेखनीय आहेत.  त्यानंतर मात्र त्यांचे लक्ष विनोदी लेखनाकडे वळले.

दिवाकर कृष्णांनी मराठी लघुकथेला जे वळण लावले त्यात वैशिष्ट्यपूर्ण भर घालून लघुकथेला नावारूपाला आणण्याचे कार्य १९२६ ते १९४० या कालखंडात ना.सी. फडके व वि.स. खांडेकर यांनी केले; म्हणून या कालखंडाला फडके-खांडेकर युग अथवा लघुकथायुग असेही संबोधिले जाते.

ना.सी. फडके यांची ‘मेणाचा ठसा’ ही पहिली कथा १९१२ मध्ये केरळ कोकिळ ह्या मासिकात प्रसिद्ध झाली.  १९२६ च्या आसपास त्यांचे कथालेखन बहरास आले.  त्यानंतर त्यांच्या कथांकडे दृष्टी टाकली म्हणजे त्यांच्या कथांतील काही विशेष स्पष्टपणे दिसतात.  तंत्रशुद्धता, रेखीवपणा, डौलदारपणा व लालित्यपूर्ण भाषा ह्या त्यांनी मराठी कथेला दिलेल्या खास देणग्या, लघुकथेच्या तंत्राचा त्यांनी ऊहापोह केला आणि स्वतःच्या कथांतून त्यांनी त्या तंत्राचा त्यांनी ऊहापोह केला आणि स्वतःच्या कथांतून त्यांनी त्या तंत्राचा अवलंबही केला.  लघुकथेची सुरुवात आकर्षक पाहिजे; तिचा शेवटपरिणामकारक पाहिजे; तिच्या कथानकात निरगाठ, गुंतागुंत व उकल असावयास हवी; कमीत कमी पात्रप्रसंगांच्या साहाय्याने ती सांगितली गेली पाहिजे;  तिची शैली खेळकर व लालित्यपूर्ण असावयास हवी, ही लघुकथेच्या बाबतील त्यांनी पुरस्कारलेली तत्त्वे त्यांच्या कथांतून पूर्णपणे प्रतिबिंबित झालेली आढळतात.

त्यामुळे त्यांच्या बहुसंख्य कथा आदर्श तंत्रशुद्धतेचे नमुने झाल्या आहेत.  फडके-पूर्वकालातील कथांमधून येणारा पाल्हाश व विस्कळीतपणा लक्ष्यात घेतला म्हणजे फडक्यांचा तंत्राबद्दलचा आग्रह ही ऐतिहासिक गरज कशी होती याची कल्पना येईल. पण तंत्राच्या अतिरिक्त हव्यासामुळे त्यांचे कथेतील आशयाकडे दुर्लक्ष झाले.  गुंतागुंत-निरगाठ व उकल या त्रयीच्या आग्रहामुळे त्यांच्या कथांतून गुर्जरांच्या, कथेप्रमाणे रहस्य येऊ लागले.  शिवाय सुखवस्तू जीवनाची चित्रेच ती अधिक रंगवू लागली.  त्यातही तरुणतरुणींच्या प्रेमभावनेच्या चित्रणावर त्यांनी अधिक भर दिला.  त्यांची कथा त्यामुळे जीवनात खोलवर शिरलीच नाही.  जीवनातील वरवरच्या विसंगतीवरच त्यांनी अधिक भर दिला.  त्यांच्या कथेचे स्वरूप त्यामुळे स्वप्नरंजनात्मक झाले; वास्तवापासून ती खूपच दूर गेली.

खांडेकरांनी कथेत सामाजिक आशय लक्षणीयपणे आणला. एका दृष्टीने फडके व खांडेकर हे परस्परांना पूरकच म्हटेल पाहिजेत.  एक शुद्ध कलावादी तर दुसरा जीवनवादी. एकाने मराठी कथेला सौंदर्यदृष्टी दिली, तर दुसऱ्या ने तिला जीवनाभिमुख बनविले. १९२३ मध्ये खांडेकरांची ‘घर कुणाचे  ही पहिली कथा महाराष्ट्र साहित्य ह्या मासिकात प्रसिद्ध झाली.  सुरुवातीच्या कालखंडात त्यांची कथा गुर्जर आणि दिवाकर कृष्ण यांच्या सीमारेषेवर कुठे तरी होती.  पुढे मात्र जीवनातील सामाजिक सुखदु:खे चित्रित करण्यात त्यांची कथा विशेष रस घेऊ लागली.  विशेषतः आर्थिक विषमता, ध्येयवादी व्यक्तीच्या वाट्याला येणारे वैफल्य, दलितांवर होणारा अन्याय, वरच्या थरातील जीवनात दिसून येणारी दांभिकता यांसारखे विषय त्यांच्या कथांतून सतत येत गेल्यामुळे त्यांच्या कथांना आशयगर्भता प्राप्त झालेली आहे.  मात्र त्यांच्या कथांतून सामाजिक जीवनातील जी शल्ये व्यक्त होताता ती प्रत्ययकारी असली, तरी त्यामुळे त्यांच्या कथेला काही मऱ्यादा पडलेल्या आढळतात.  त्यांची प्रतिभा प्रथम जीवनातील समस्या निवडते आणि त्यांवर कथा रचते.  त्यामुळे त्या कथेतील पात्रे त्या त्या समस्यांची प्रतीके बनतात किंवा त्यांच्या बुद्धिनिष्ठ कल्पना व्यक्त करणारी साधने बनतात.  त्यांच्या जोडीला त्यांचा प्रतिमांचा वापर करण्याचा आलंकारिक भाषा वापरण्याचा हव्यास लक्ष्यात घेतला, म्हणजे त्यांच्या कथा अनेकदा कृत्रिम का वाटतात, याची कल्पना येते.  त्यांनी लिहिलेल्या रूपककथा हा त्यांच्या काव्यात्म व तत्वचिंतक प्रतिभेचा एक विलास.  त्यांच्या बुद्धिनिष्ठ दृष्टीला व त्यांच्या कल्पनाविलासाला या रूपककथांनी चांगले खाद्य पुरविले आहे.

फडक्यांनी मराठी कथेला सौंदर्यदृष्टी दिली आणि खांडेकरांनी तिला जीवनाभिमुख बनविले; पण त्याबरोबरच इतर अनेक प्रवाह कथेला येऊन मिळत होते व कथा अधिकाधिक सकस व समृद्ध बनत होती. १९२६ ते १९४०  या काळात कथेची अनेक अंगांनी वाढ झाली.  रचनेत विविध प्रयोग झाले, निवेदनशैलीत वैचित्र्य व विविधता आणण्याचे प्रयत्न झाले.  जीवनाच्या विविध अंगांची चित्रणेही कथांत येऊ लागली. कौटुंबिक जीवनातील जिव्हाळा कथांतून उत्कट रीतीने प्रगट होऊ लागला.  भाऊ-बहीण,  आई-मुलगा, वहिनी-भाऊजी इ. अनेक कौटुंबिक नात्यांतील भावविश्व य.गो. जोशी (१९०१-१९६३) ह्यांनी अतिशय नाजुकपणे रंगविले.  त्यांच्या काही कथांना उपरोधाची धार आहे, काही चिंतनाच्या पातळीवर जातात. फडक्यांच्या तंत्रवादाविरुद्ध बंडाचे निशाण य.गो. जोशी ह्यांनी आपल्या कथांतून उभारले असले, तरी त्यांच्या उत्कृष्ट कथा तंत्रशुद्ध आहेत, हे त्यांच्याही लक्षात आले नसेल.  कौटुंबिक जीवनाचे नाट्यमय भावचित्रण करणारे दुसरे लेखक म्हणजे दत्त रघुनाथ कवठेकर.  य.गो. जोशी आपल्या कथांतून अनेकदा भाष्य करतात.  त्यामुळे त्यांच्या कथेतील नाट्य अनेकदा घसरते.

तसे कवठेकरांचे होत नाही.  मात्र भावना ताणून त्या अतिरंजनाच्या पातळीवर नेण्याचा त्यांना फार हव्यास आहे. नवविवाहित पतिपत्नींच्या संसाराचे अवखळ चित्रण करण्यात, त्यांचे कृतक कलह रंगविण्यात आणि त्यांच्या जीवनातील वास्तव समस्या रंगवून क्षणभर वाचकांना अंतर्मुख करावयास लावण्यात बोकिलांचे कौशल्य विशेष प्रगट होते, तर जीवनातील प्रखर वास्तवावर विदारक प्रकाश टाकणाऱ्याल अनंत काणेकरांच्या कथा आपणाला निराळ्याच विश्वात नेतात.  मानवी स्वभावातील वैचित्र्याऱ्याऱ्याऱ्याचे प्रत्ययकारी दर्शन त्यांच्या कथांतून घडते. रुपेरी वाळू (१९४७) ह्या संग्रहातील त्यांच्या रूपककथाही नावीन्यपूर्ण आहेत.  खं.सा. दौंडकर, अ.वा. वर्टी, प्र.शां. मांजरेकर ह्यांसारख्या काही लेखकांची नावेही कथेच्या विकासाच्या संदर्भात चटकन पुढे येतात. त्यात मोत्याची कुडी (१९३४) हा खं. सा. दौंडकरांचा कथासंग्रह त्यामधील कथांच्या रेखीव आकृतिबंधामुळे विशेष गाजला.

प्रादेशिक व ग्रामीण कथांचा ओघही याच सुमारास या कथाप्रवाहास येऊन मिळाला.  वि.स. सुखटणकर, लक्ष्मणराव सरदेसाई, बा.द. सातोस्कर, बी. रघुनाथ, व्यंकटेश पै, रायकर इ. अनेक लेखकांनी प्रादेशिक कथांच्या विकासाला आपापला हातभार लावला.  यांतील बहुतेकांनी गोमंतकीय पार्श्वभूमीवर आपल्या कथांची उभारणी करून कथेला आगळ्या सौंदऱ्याने नटविण्याचा प्रयत्न केला.  त्या त्या प्रदेशातील भावजीवन, सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसौंदर्य घेऊन या कथा आपणापुढे येतात. वातावरणाचे निराळेपण जाणवते, पण जीवनाचे खोलवर दर्शन मात्र या कथांतून होत नाही. फडके-खांडेकरांच्या कथांनाच गोमांतकाच्या पार्श्वभूमीची झालर लावल्याचा भास या कथा वाचताना होतो.  त्यांतून वापरण्यात आलेली प्रादेशिक बोली हा या कथांचा खास विशेष.

प्रादेशिक कथांबरोबर ग्रामीण कथा या काळात मराठीत विपुलतेने येऊ लागल्या.  मात्र जानपद जीवन रंगविण्याच्या भूमिकेतून निघालेली ही कथा वास्तव जीवन न रंगविता अदभुतात शिरते . खेडेगावातील अज्ञान, दैन्य आणि व्यथा दाखविण्याच्या ऐवजी तेथील अतिरंजित, भडक आणि अवास्तव घटना रंगविण्यातच ती रमते. र.वा. दिघे (१८९६-१९८०) व ग.ल. ठोकळ यांच्या कथा वाचताना कल्पनारम्यतेचा पगडा त्यांच्यावर किती बसला आहे, याची कल्पना येते.  खेडेगावातील अदभूत व नाट्य हुडकण्यातच या दोघांची प्रतिभा विशेष रमते.  कोकणचे दैन्य चित्रित करणारे वि.ल. बर्वेच याला काहीसे अपवाद आहेत.

या काळात कथांचा एक ओघ दलितांच्या आणि उपेक्षितांच्या चित्रणाकडे वळला आणि त्यांतून अतिशय वास्तव व रेखीव शब्दचित्रे वाचकांच्या समोर आली.  भ.दि. गांगल, माधवराव बागल, मामा वरेरकर, कुमार रघुवीर, बा. वा. फाटक, वि.द. घाटे, कमलाबाई देशपांडे इ. काही लेखकांनी वास्तव शब्दचित्रांची जी भर मराठीत घातली, ती उल्लेखनीय आहे.  कुमार रघुवीर यांची ह्रदय (आवृ. ३री, १९५०) मधील शब्दचित्रे किंवा मामा वरेरकरांची शब्दचित्रे वाचली, की उपेक्षित व्यक्तींचे अंतर्बाह्य दर्शन अगदी मोजक्या शब्दांतच ते कसे घडवितात याची सहज कल्पना येते.  मात्र कुमार रघुवीर यांच्या शब्दचित्रांत सूक्ष्मता अधिक आहे, तर मामांच्या शब्दचित्रांतून प्रचारकी अभिनिवेश अधिक जाणवतो.

या कालखंडात विनोदी कथांचेही अमाप पीक आले. ना.सी. फडके, वि.स. खांडेकर,  य.गो. जोशी, वि. वि. बोकील, अ.वा. वर्टी यांनी तर या क्षेत्रात प्रवेश केलाच, पण खास उपहास, उपरोध व विसंगतींवर आधारलेल्या विनोदी कथांचे दालन सजविण्याचे कार्य काही खास लेखकांनी केले. चिं.वि. जोशी (१८९२-१९६३) आणि प्र.के. अत्रे हे दोघे त्यांत अग्रभागी.  एकीकडे गुदगुल्या करीत दुसरीकडे लहान मोठ्या विसंगतींची जाणीव वाचकांना करून द्यावयाची; व्यक्तिजीवनातील व समाजजीवनातील अनेक नव्या-जुन्या विसंवादी गोष्टींवर प्रकाश टाकावयाचा आणि हसतखेळत, त्यांना न बोचेल अशा रीतीने, वाचकांना अंतर्मुख करावयाचे ही चिं.वि. जोशी यांच्या विनोदी कथांची बैठक आहे. वास्तवता हे त्यांच्या विनोदाचे अधिष्ठान आहे व सह्रदयता हा त्याचा गुण आहे.  त्यामुळे त्यांच्या कथेतील विनोद मोठा प्रसन्न वाटतो.  त्यांनी निर्माण केलेल्या चिमणराव, गुंड्याभाऊ, आजीबाई इ. व्यक्तिरेखाही आपण सहजासहजी विसरू शकत नाही.  कल्पनाविलास, बुद्धिचापल्य आणि कोटिबाजपणा यांमुळे अत्र्यांऱ्याऱ्याऱ्याचा विनोद गडकऱ्या च्या वळणावर गेला आहे. याशिवाय ‘दाजी’ निर्माण करणारे ना.धों. ताम्हनकर, ‘जिवा’ निर्माण करणारे वि.मा.दी. पटवर्धन, ‘सत्यंकाकू’ व ‘वसंत’ निर्माण करणारे वि.वि. बोकील ही नावेही विनोदाच्या संदर्भात पुढे येतात.  अनुवादित व स्वतंत्र विनोदी कथा लिहून शामराव ओक यांनीही या क्षेत्रात स्पृहणीय भर घातली आहे.

स्त्रीजीवनाच्या समस्या रंगविण्याचा व स्त्रीमनाचे विश्लेषण करण्याचा पुरुषलेखकांनी जसा प्रयत्न केला, तसाच स्त्रीजीवनातील समस्या रंगविण्यासाठी बऱ्यालच लेखिकाही या काळात पुढे आल्या.  विभावरी शिरूरकर या टोपणनावाने लेखन करणाऱ्या मालतीबाई बेडेकरांचा कळ्यांचे निःश्वास (१९३३) हा कथासंग्रह या काळात खूपच गाजला.  स्त्रीमनाचे सखोल विश्लेषण, स्त्रियांपुढे निर्माण झालेल्या निरनिराळ्या सामाजिक समस्या; रूढीच्या आणि बदलत्या परिस्थितीच्या कात्रीत सापडल्यामुळे त्यांच्या जीवनाची झालेली परवड या सर्वांचे चित्रण विभावरी शिरूरकर यांनी अतिशय जिव्हाळ्याने केले आहे.  कृष्णाबाई, कमलाबाई टिळक यांनीही आपल्या कथांतून स्त्रीमनाचे काही पदर अतिशय हळुवार रीतीने उकलून दाखविले आहेत. याशिवाय क्षमाबाई राव, शांताबाई नाशिककर, पिरोज आनंदकर, कुमुदिनी रांगणेकर, आनंदीबाई किर्लोस्कर, मालतीबाई दांडेकर अशा किती तरी लेखिकांची नावे या काळात पुढे येतात.  त्यांच्या कथांतून स्त्रीजीवनाच्या काही समस्या रंगविल्या गेल्या असल्या, तरी त्यांच्या कथांनी विभावरी शिरूरकर ह्यांच्या कथांएवढी कलात्मक पातळी गाठली नाही.  त्यांचे आदर्श फडते-खांडेकरच होते.  पुष्कळ जणींच्या कथांमधून बोधवादी भूमिका अधिक प्रमाणात दिसते.

मराठी कथेत १९२६ ते १९४० या कालखंडात तंत्रदृष्ट्या, विषयदृष्ट्या व प्रकारदृष्ट्या खूपच विविधता आली.  रूपककथा, लघुतमकथा यांसारखे नवीन कथाप्रकार पुढे आले.  प्रादेशिक, ग्रामीण व शहरी वातावरणातून ती अप्रतिहतपणे संचार करू लागली. या काळात रत्नाकर, यशवंत, किर्लोस्कर, ज्योत्स्ना, प्रतिभा यांसारख्या नियतकालिकांनीही लघुकथेच्या विकासाला चांगला हातभार लावला.  स्त्रियांसाठीसुद्धा स्त्री, महिला, गृहलक्ष्मी, मनोरमा, सरस्वती, संजीवनी अशी खास नियतकालिके निघाली होती.  त्यांतून लेखिकांचे कथालेखन सुरू होते. पण या काळात आशयाची खोली मात्र वाढली नाही. तंत्राचा बडेजाव माजल्यामुळे आशयापेक्षा अभिव्यक्तीलाच अधिक महत्व देण्यात येऊ लागले.  तंत्राविरुद्ध बंड करणाऱ्याय य.गो. जोशी यांच्या कथेचीही एक विशिष्ट चाकोरी निर्माण झाली.  त्यामुळे या काळात कारागिरी वाढली; बाह्य सौंदऱ्याचा दिमाख वाढला; पण अनुभूतीच्या कक्षा वाढल्या नाहीत. काही लेखकांच्या कथांतून जिवंतपणा व ताजेपणा यांचा प्रत्यय येत होता; पण तो ताजेपणा संपल्यावर त्याच त्या अनुभूतींची ज्या वेळी आवर्तने होऊ लागली त्यावेळी कथा कृत्रिम व सांकेतिक बनू लागली.  १९४० च्या सुमारास त्यामुळे कथाक्षेत्रात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली.  कथा-स्पर्धा लावूनही चांगल्या कथा येईनात.  ‘आजकाल चांगल्या कथा का लिहिल्या जात नाहीत’ याची मासिकांतून चर्चा होऊ लागली.

नवकथेची चाहूल

१९४३-४४ नंतर मात्र हे स्वरूप पालटले.  नवे कथालेखक क्षितिजावर चमकू लागले व त्यांच्या कथेचे स्वरूपही जुनी चाकोरी सोडून नवे स्वरूप धारण करू लागले.  या नव्या लघुकथांमधून जीवनाचे अधिक वास्तव, अधिक सूक्ष्म आणि अनुभवांच्या विविध पातळ्यांवरून घडणारे दर्शन होऊ लागले.  ती मानवी मनाचा खोलवर वेध घेऊ लागली.  मानवी मनाच्या आतील गाभ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना त्यात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले; संशोधकवृत्ती बळावली.  अमुकच एक प्रकारचा अनुभव कलाविषय होऊ शकतो ही समजुत नाहीशी झाली, त्यामुळे अनुभूतीच्या कक्षा रुंदावल्या.

नव्याने येऊ घातलेल्या या लघुकथेची पूर्वचिन्हे गो.के. भट, उमाकांत ठोमरे, शशिकांत पुनर्वसु, रा.भि. जोशी,  प्रभाकर पाध्ये यांसारख्या कितीतरी कथालेखकांच्या कथांतून दिसून येत होती; पण प्रामुख्याने ही चाहूल स्पष्टपणे ऐकू येऊ लागली, ⇨ती वामन चोरघडे (१९१४) व कुसुमावती देशपांडे (१९०४-६१) यांच्या कथांतून.  चिंतनशील मनोवृत्ती व काव्यात्म आविष्कार यांमुळे या दोघांच्या कथांतून फडकेप्रणीत कथांपेक्षा निराळा घाट स्पष्टपणे दिसतो.  कथानकाच्या काचातून कथेला मुक्त करण्याचे पहिले श्रेय वामनरावांच्या कथेला दिले पाहिजे.  कहाणी, लोककथा, लोकवाङमय यांचा वारसा घेऊन आलेल्या त्यांच्या कथांतून मांगल्य, संस्कार व चिरंतन जीवनमूल्ये यांचा ठसा स्पष्टपणे खोलवर उमटलेला दिसतो.  त्यांच्या कथाविश्वाची विविधताही उल्लेखनीय आहे.

नाजुक व तरल वैयक्तिक भावनेपासून तीव्र सामाजिक भावनेपर्यंत अंतःकरणाच्या विविध तर्हेतच्या छटा ते सूक्ष्मपणे रंगवू शकतात. त्यांच्या कथेत कहाणीवाङमयाची सहजता व उत्कटता आहे, चित्रकाराच्या कुंचल्याचे सामर्थ्य आहे आणि कविह्रदयाचा हळुवारपणा व कल्पनाविलास आहे.  या सर्वांच्या जोडीला मानवी जीवनाबद्दल वाटणारी निष्ठा व सांस्कृतिक मूल्ये जतन करण्याचे सामर्थ्य आहे. कुसुमावतीबाई देशपांडे यांनी थोड्याच कथा लिहिल्या; पण त्यांतून त्यांची काव्यात्म वृत्ती आणि चिंतनशीलता यांचा उत्कटतेने प्रत्यय येतो.  बाह्य घटनांपेक्षा व्यक्तिमनामध्ये त्यांची प्रतिभा रंगते आणि व्यक्तिव्यक्तींच्या जीवनात घडणाऱ्यात क्षुल्लक प्रसंगांतून ती मानवी जीवनातील गुंतागुंत,  त्यातील भावनांची आंदोलने आणि त्यांमधील विसंगती यांचे चित्रण अतिशय नाजुकपणे आणि अतिशय सहानुभूतीने करते.  त्यांच्या या चिंतनशीलतेला सामाजिकतेची जोड मिळाल्याने त्यांच्या कथांना आगळीच आशयगर्भता प्राप्त झाली आहे.  त्यांची कथा त्यामुळे वाचकांना चटकन अंतर्मुख बनवते.  अंतर्मुखता व मनोविश्लेषणपरता ही या दोघांही कथाकारांच्या कथांत बऱ्याबच प्रमाणात आढळत असल्याने व तंत्राची ठराविक चौकट त्यांनी झुगारून दिल्यामुळे आजच्या नवकथांची बीजे आपणाला त्यांच्या कथांतून आढळतात. जुन्या-नव्याच्या संगमावर त्यांची कथा उभी आहे.

सत्यकथा-अभिरुची युग-नवकथा: १९४५ च्या सुमारास मराठी लघुकथेच्या बदललेल्या स्वरूपाची कल्पना स्पष्ट येऊ लागली. सत्यकथा, अभिरुची साहित्य यांसारखी नियतकालिके नवी कथा आणि नवी कविता आवर्जून प्रकाशित करू लागली.  आशय व अभिव्यक्ती या दोन्हीं बाबतींत कथेचा व कवितेचा तोंडवळा बदलल्यामुळे नवकथा व नवकविता ही नावे नव्या प्रवृत्तीच्या कथेला व कवितेला रूढ होऊ लागली. दुसऱ्यान महायुद्धाने जगावर जी विफलतेची व विकलतेची छाया पाडली होती व मानवी मूल्य धडाधड कोसळून पडल्यामुळे जी अश्रद्ध वृत्ती समाजाच्या ठिकाणी निर्माण झाली होती, त्याचे कटु, प्रत्ययकारी चित्रण कविता आणि कथा या दोहोंतही येऊ लागले.  यंत्रयुगीन संस्कृतीमुळे यंत्राचा गुलाम झालेला अगतिक मानव, शास्त्रांनी निर्माण केलेल्या नव्या नव्या विध्वंसक अस्त्रांनी बावरलेला मानव, भोवतालच्या परिस्थितीशी जमवनू घेता न आल्याने आतल्या आत गुदमरलेला मानव हा मराठी कथेचा विषय झाला.  मनोविश्लेणाच्या तंत्राचा आश्रय करून ही कथा माणसाच्या मनात खोलवर दडून बसलेल्या सुप्त व अर्धसुप्त आशाआकांक्षांची, दबलेल्या विकारांची व विकृत भावनांची चित्रे रंगवू लागली.  त्यासाठी तिने आपले बाह्य स्वरूप व आकारही बदलला.  १९४५ सालानंतरच्या काळातील कथेत होत असलेला हा अंतर्बाह्य बदल प्रामुख्याने अरविंद गोखले (१९१९), गंगाधर गाडगीळ (१९२३),  पु. भा. भावे (१९१०-८०) आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांतून स्पष्टपणे जाणवू लागला.

मराठी कथेच्या विकासाला या चौघांचा प्रामुख्याने हातभार लागला असला, तरी प्रत्येकाच्या कथेचे स्वरूप वेगळे आहे.  व्यक्ती हेच अरविंद गोखले यांच्या कथांचे केंद्र आहे.  व्यक्तिमनाचा कानोसा घेत असताना ते त्या व्यक्तीच्या अंतरंगात खोलवर शिरतात व तिच्या अंतर्मनातील व्यथा बोलक्या करतात.  त्यांच्या कथाविश्वातील व्यक्ती अनेक थरांतील आहेत. मात्र गोखल्यांचा ओढा सामान्यापेक्षा असामान्याकडे अधिक आहे.  त्यामुळे त्यांच्या कथांतून भेटणाऱ्याप व्यक्ती व त्याची दुःखे ही सामान्यापेक्षा काही वेगळी असतात.  त्यांच्या कथांची निवेदनशैली आकर्षक आणि प्रभावशाली आहे.

गंगाधर गाडगीळ यांच्या कथेने मराठी कथेच्या दालनात इतके नवे नवे प्रयोग केले आहेत, की नवकथाकार ही पदवी यथार्थतेने त्यांनाच लागू पडावी.  हे सर्व प्रयोग त्यांच्या अनुभूतीतून, आशयाच्या वेगळेपणातून आणि त्यांच्या बहुविध व संपन्न व्यक्तिमत्वातून निघाले आहेत.  अनुभव घेण्याच्या विविध पद्धती व ते आविष्कृत करण्याच्या वेगवेगळ्या तर्हा, यांतून त्यांच्या कथेची विविध रूपे प्रकट झाली आहेत. जीवनातील अनेकविध व्यक्ती व प्रसंग पाहताना त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे विश्लेषण करण्याचे आणि आपल्या आकर्षक शैलीत त्याना सशब्द करण्याचे गाडगिळांचे सामर्थ्य त्यांच्या कथांतून प्रत्ययास येते.

मध्यमवर्गीय समाजात परिस्थितीमुळे, व्यक्तित्वापरील बंधनांमुळे, रूढ समजुती व नीतीकल्पनांमुळे, दारिद्र्याऱ्याऱ्याऱ्यामुळे आणि जीवनात आलेल्या यांत्रिक चाकोरीमुळे ज्यांच्या भावना दडपल्या आहेत, ज्यांची मने मुर्दाड झाली आहेत, ज्यांच्या अंतःकरणाला व्यथांचे अनेक तडे गेले आहेत अशा दुबळ्या, व्यथित मनांचे चित्रण गाडगिळांच्या कथांतून विशेष झाले आहे. या व्यथित मनांच्या संवेदना, त्यांतील विकृती व विसंगती, त्यांच्या जाणिवा व नेणिवा यांचे रंगीबेरंगी चित्रण गाडगीळ अत्यंत परिणामकारक रीतीने करतात.  त्यांचा भर व्यक्तीपेक्षा व्यक्तिमत्वावर असतो, वर्णनापेक्षा सूचनावर असतो. गाडगिळांचा शोध हा खराखुरा माणसाचा शोध आहे.  लहान मुलांच्या अंतर्मनाचा कानोसाही त्यांच्या काही कथांतून त्यांनी समर्थपणे घेतलेला आहे.  तो घेत असताना बालमनातील तरल, चंचल व क्षणोक्षणी निरनिराळे रंग घेणाऱ्या भावनांशी व संवेदनांशी ते एकरूप झालेले आहेत.

गाडगिळांच्या निवेदनशैलीत अनेक अर्थांची वलये निर्माण करणारे तपशील आहेत. त्याचप्रमाणे उपमा, उत्प्रेक्षा व प्रतिमा यांचा कल्पकतापूर्वक केलेला वापर आहे. आशयाशी एकरूप झालेली त्यांची शब्दसंहिता आहे.

गाडगिळांच्या कथांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची प्रयोगशीलता. कथालेखनात नवे नवे प्रयोग बेडरपणे करून वाचकांना ते स्तिमित करीत असतात. कथानकाचा ठरीव सांगाडा तर त्यांनी केव्हाच झुगारून दिला आहे.  अनेकदा कथेतून रूढार्थाने कथा म्हणता येईल काय अशी शंका येण्याइतके ‘गोष्टी’ चे जोखड त्यांनी दूर केले आहे.  विशिष्ट भाववृत्ती संक्रांत करणे हेच त्यांच्या कित्येक कथांचे प्रयोजन दिसते.  ह्या प्रयोगशीलतेमुळेच त्यांच्या कथेत आवर्त न येता ती सदैव नवी, टवटवीत राहिली.

पु.भा. भावे यांचे कथाविश्व या दोघांच्या कथाविश्वापेक्षा निराळे आहे. उद्दाम भावना व तिला तोलणारी कणखर, प्रभावी भाषा यांतून त्यांनी आपले कथाविश्व फुलविले आहे. कोणताही धुंद, थरथरता क्षण जिवंत करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथेत आहे.  त्यांच्या कथांतून व्यक्त होऊ पहाणारे काही अनुभन इतके अपूर्व असतात, की त्यांना कथानकाच्या बंधनात आकसून राहणे आवडत नाही.  किंबहुना कोणतीच बंधने स्वीकारावयास भावे ह्यांची कथा तयार नसते.  त्यामुळे त्यांच्या प्रेमकथा सांकेतिक स्वरूप धारण करत नाहीत. प्रेमानुभव हा एक अपूर्व अनुभव आहे.  तो माणसाचा पशू तरी बनवील किंवा देव तरी बनवील.

माणसाचे जीवन उदध्वस्त तरी करील किंवा त्याचे नंदनवन बनवील. प्रेमानुभवाची ही विविध रूपे भाव्यांनी मोठ्या समर्थपणे रंगविली आहेत.  प्रेमभावनेच्या पहिल्या अस्फुट आविष्कारापासून ते तिच्या उद्दाम वासनेच्या स्वरूपापर्यंत सर्व अवस्था भाव्यांनी उत्कटपणे रंगविल्या आहेत आणि त्यांचे चित्रण त्यांनी अगदी मोकळेपणाने केले आहे.  पण हे चित्रण करताना भावे सुसंस्कृतपणाला व सनातन जीवनमूल्यांना अधिक किंमत देतात.  भाव्यांच्या प्रेमकथांतील स्त्रीपुरुष सुसंस्कृत आहेत, निरोगी आहेत व कणखर मनोवृत्तीचे आहेत.  त्यामुळे त्यांच्या प्रेमकथा एक वेगळाच संस्कार करून जातात.

भाव्यांच्या सामाजिक मनाचा आविष्कार त्यांच्या बऱ्या च कथांतून झाला आहे.  ज्या ज्या ठिकाणी पाश्चात्यांचे अंधानुकरण आहे,  दंभ आहे, ढोंग आहे त्या ठिकाणी भाव्यांच्या लेखणीला उपरोधाची धार आलेली आहे.  अशा वेळी काही कथांतून भाव्यांच्या प्रतिभेची झेप विलक्षण प्रभावी असते.  गद्याच्या क्षेत्रातून नकळत काव्याच्या क्षेत्रात ते नेतात.  असे भाव्यांच्या कथेचे स्वरूप विविध आहे. लोकविलक्षण पात्रे शोधण्याचे त्यांना वेड आहे.  अशा व्यक्तींचा भाव्यांनी घेतलेला शोधही भारावून टाकणासारखा असतो.  त्यांची भाषाशैली-कधी उद्दाम, कधी धारदार, कधी हळवी, कधी काव्यात्म – त्यांच्या कथेतील आशयाला संवादी अशी असते.

‘माणदेशी माणसा’ चे दर्शन घडविणारे व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या कथांतून वेगळेच विश्व उभे केले आहे.  ग्रामीण जीवनाचे चित्रण आजवर कथांतून अनेकांनी केले.  पुष्कळांच्या कथांतून अदभुतता आली; काहींच्या कथांतून कृत्रिमता व ग्रामीण जीवनाचे पारंपारिक संकेत आले;  पण माडगूळकरांची कथा माणदेशच्या अस्सल कसदार मातीतून निर्माण झाली आहे.  म्हणूनच तिच्यातील जिवंतपणा आपणाला जाणवतो.  माणगंगेच्या परिसरातील व्यक्तींचे दारिद्र्य, त्यांचा भोळेपणा, त्यांची कणखर वृत्ती, त्यांचा अडाणीपणा व विकारसुलभता, त्यांच्या समजुती या सर्वांचे दर्शन ते त्यांच्याच अस्सल भाषेतून घडवितात.  त्यामुळे त्यांच्या कथा वाचताना आपण माणदेशाच्या परिसरात वावरत आहोत की काय, असा भास होतो.  ग्रामीण कथेला अदभुताच्या आणि कल्पनारम्यतेच्या कोंडीतून सोडवून वास्तव ग्रामीण कथेचा आदर्श त्यांनी निर्माण केला.

या चार नवकथाकारांनी जे महत्वाचे कार्य केले त्याचाच विस्तार करण्याचे कार्य या व नंतरच्या काळातील प्रमुख कथाकारांनी केले. गोखले-गाडगीळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून नव्या प्रवृत्तीचा मागोवा घेणारे अनेक कथाकार या काळात आढळतात.  शांताराम, दि.बा. मोकाशी, सदानंद रेगे, श्री.ज. जोशी यांसारखी नावे सहजच या संदर्भात पुढे येतात.  शांतारामांची सुरुवातीची कथा जुन्या वळणावर जाणारी आहे; पण १९५५ नंतरच्या त्यांच्या कथेत व्यक्तिचित्रणाची सूक्ष्मता, भावनेची तरलता आणि आविषकाराचा हळुवारपणा यांचा प्रत्यय येऊ लागलतो.  जीवनातील लहानसहान सत्ये ती शोधते; विरोध तिच्या नजरेला चटकन दिसतो; पण ती जीवनात खोलवर कुठे शिरत नाही.  दि.बा. मोकाशी यांच्या कथातून मात्र प्रयोगशीलता जाणवते.  व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य अनेक कथांतून आढळते.  ‘आमोद सुनासि आले’  किंवा ‘एक दिवस कळण्याचा’ यांसारख्या त्यांच्या कथा सूक्ष्म व तरल भावानुकंपाची आणि काव्यात्म आविष्काराची प्रचीती देतात.  जीवनाचे प्रखर आणि वास्तव दर्शन त्यांच्या अनेक कथांतून घडते.

सदानंद रेगे यांची कथाही अशीच तरल व अंतर्मनाचा वेध घेणारी आहे.  त्यांच्या कथांतून त्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाची साक्ष पटते.  जीवनातील विविध अनुभव त्यांनी निरनिराळ्या पातळ्यांवरून घेतले आहेत.  कधी तिरकस, तर कधी विक्षिप्त, कधी तरल, तर कधी गूढ.  काही कथांतून त्यांची अदभूताची आवड व्यक्त होते.  पण त्याबरोबर मुंबईच्या कारकुनांच्या जीवनांतील हेवेदावे, आशानिराशा, लाचारी व यांत्रिक चाकोरी पण ते स्पष्ट करतात.  सदानंद रेगे यांच्याबरोबर दुसरे रेगे आठवतात ते पु.शि. रेगे.  मूळ पिंड कवीचा; पण ‘रूपकथ्थक’ या नावाखाली ज्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत त्यांत कविमनाचे नाजुक पदर प्रगट झालेले दिसतात. अत्यंत मोजक्या शब्दांत समर्थपणे भाव व्यक्त करण्याची कला त्यांना साधली आहे.  याशिवाय शशिकांत पुनर्वसु, गो.रा. दोडके व पंडित शेटे या तिघांच्या कथांतून तरल भावाविष्कार आणि व्यक्तिमनाचा खोलवर शोध घेण्याचे सामर्थ्य या विशेषांचा प्रत्यय येतो.  त्यांच्या कथेचे विश्व पांढरपेशांचे आहे, पण त्यांच्या जीवनातील बारीक सारीक मनोव्यथा, दुःखे आणि समस्या यांचे हळुवारपणे केलेले चित्रण मोठे मनोज्ञ वाटते.

श्री.ज. जोशी यांची कथा जुन्या व नव्या संगमावरची आहे. मध्यमवर्गीय जीवनापुरते तिने आपले क्षेत्र मऱ्यादित केले असले, तरी त्या जगातील विविध समस्या व बदलते जीवन, त्यातील ताण आणि भावनात्मक गुंतागुंत यांचे दर्शन ते सूक्ष्मपणे घडवतात. ‘माणूस’ या नावाने लेखन करणाऱ्या अंबादास अग्निहोत्री यांचेही कथाविश्व पांढरपेशाचेच आहे. मात्र त्यांच्या कथांमधून पात्रे व प्रसंग यांची दिसणारी विविधता आश्चर्यजनक आहे. याशिवाय मध्यमवर्गींयांचे जीवन चित्रित करणारे व त्यातील समस्यांचे दर्शन घडविणारे अच्युत बर्वे, रा.भि. जोशी, र. गं. विद्वांस, शं.ना. नवरे, स.आ. जोगळेकर इ. कथालेखकांची नावे या संदर्भात सहज पुढे येतात. हेसर्व कथालेखक काही अंशी रुळलेल्या मार्गानेच जात होते.  प्रत्येकाच्या कथेचा रंग व ढंग निराळा असला, तरी कथेचा घाट जुना, रुळलेलाच होता.  जुन्या निवेदनपद्धतीचा व जुन्या वळणाचा आश्रय करूनही आपले कथाविश्व फुलविणाऱ्या व रसिकांचे मन आकृष्ट करणाऱ्या कथाकारांत महादेवशास्त्री जोशी (१९०६) यांचीही गणना करावयास हवी.  त्यांची कथा पुष्कळदा गोमंतकीय पार्श्वभूमीवर रमते व त्यातील जीवनाचे संघर्ष नाट्यपूर्ण रीतीने ते रंगविते.  त्यांच्या कथेतील व्यक्ती सरळ व एकेरी पदराच्या आहेत.  भावनांची गुंतागुंत कुठे असलीच, तर वरवरची आहे. जीवनातील मांगल्य व सदभावना यांचीच जोपासना करण्याचा प्रयत्न त्यांची कथा करते.

व्यंकटेश माडगूळकरांनी ग्रामीण कथेला दिलेले निराळे वळण या काळात अनेकांनी गिरविले.  १९५५ नंतरच्या काळात ग्रामीण कथा अतिशय लोकप्रिय झाली.  त्या अगोदर श्री.म. माटे व म. भा. भोसले यांच्यासारख्या जुन्या पिढीतील कथाकारांनी उपेक्षितांचे अंतरंग रंगवावयास सुरुवात केलीच होती.  त्यात भर घालू ग्रामीण कथेला एक निराळेच परिमाण देण्याचे कार्य शंकर पाटील, द.मा. मिरासदार, उद्धव शेळके, ग.दि. माडगूळकर, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, गो.नी. दांडेकर, मधु मंगेश कर्णिक, रा.रं. बोराडे, आनंद यादव, मनोहर तल्हार इ. कथाकारांनी साक्षेपाने केले.  या कथाकारांपैकी प्रत्येकाचे कथाविश्व वेगळे आहे, परिसर वेगळा आहे, अनुभव व्यक्त करण्याची पद्धती वेगळी आहे.  काहींनी कोल्हापूर-साताऱ्यागचा परिसर घेतला आहे, काहींनी विदर्भाकडील परिसरातील जीवन रंगविले आहे, काहींनी कोकण विभागात कथा नेली, तर काहींनी मराठवाड्याचा परिसर निवडला आहे.

या भिन्न भिन्न परिसरांत रुजलेली कथा त्या त्या परिसरातील ग्रामीण जीवनाचे अंतरंग उकलून दाखवते.  तेथील व्यथा, यातना, दु:ख यांना वाचा फोडते, तेथील विरोध व विसंगतीचे दर्शन घडविते आणि तो परिसर त्यातील रूपरंगांसह व भावभावनांसह आपणापुढे जिवंतपणे साकार करते.  यातील प्रत्येक कथाकाराची कथा वास्तवाच्या पायावर उभी आहे. मात्र या कथा वाचताना एक गोष्ट जाणवते : खेडेगावातील दारिद्र्य, दैन्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचेच चित्रण करण्यात बहुतेक कथाकारांनी समाधान मानले आहे.  काही वेळा ग्रामीण जीवनातील विसंगतीचे दर्शन घडवून विनोदनिर्मितीही त्यांनी साधली आहे.  पण राजकीय व शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने बदललेल्या ग्रामीण जीवनाचे भान त्यांच्या कथांतून पुरेशा प्रमाणात व्यक्त झालेले दिसत नाही.  मात्र ग्रामीण कथा त्या त्या प्रदेशाच्या बोलीभाषेतून साकार झाल्याने मराठी भाषेला एक नवीन शब्दकळा तिने दिली.

विनोदी कथांचे पीक १९४५ नंतरच्या काळात अमाप आले.  विनोदाला वाहिलेली वार्षिके याच काळात निघाली आणि केवळ विनोदी वाङमयाला वाहिलेली मासिकेही निघाली.  पण इतके असून कथांचा दर्जा सुमारच राहिला.  ग्रामीण कथांतून मानवी स्वभावातील विसंगतीवर आधारलेला विनोद भरपूर आहे. द.मा. मिरासदार यांची कथा या दृष्टीने उल्लेखनीय आहे.  ग्रामीण जीवनाचे अनेक किस्से आपल्या विनोदी शैलीत त्यांनी कथांतून रंगविले आहेत.  रा.रं. बोराडे व शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांतूनही प्रसंगनिष्ठविनोद बर्या्च प्रमाणात आढळतो.  अतिशोयक्तीवर, चमत्कृतीवर आणि मानवी स्वभावातील विसंगतींवर आधारलेला विनोद अनेक कथाकारांच्या कथांतून आढळतो.

रमेश मंत्री, जयवंत दळवी, बाळ सामंत, बाळ गाडगीळ, पद्माकर डावरे इ. काही लेखकांची नावे या क्षेत्रात विशेष नजरेत भरतात.  वि.आ. बुवा यांनी सातत्याने भरपूर विनोदी लेखन केले; परंतु त्यातील बरेच विनोदी लेखांच्या स्वरूपाचे आहे. बुवांकडे कल्पनाशक्ती आहे.  उपहास, उपरोध, परिहास, विडंबन, शाब्दिक चमत्कृती इ. विनोदनिर्मितीच्या अनेक साधनांचा त्यांची लेखणी स्वैरपणे वापर करते; पण कथांचे प्रमाण त्यांच्या लेखनात कमी आहे.  पु.ल. देशपांडे यांचे बरेच विनोदी लेखन स्फुट स्वरूपाचे आहे. त्यात अनेक संकेतांचे व विसंगतीचे त्यांनी खेळकरपणे विडंबन केले आहे.  त्यांच्या विनोदात सह्रदयता आहे, कल्पनाविलास आहे आणि पुष्कळशी चिंतनशीलता पण आहे.  मात्र कथेच्या पातळीवर त्यांचे लेखन येत नाही.  एक मात्र खरे, की या काळात उत्साहाने विनोदी वाङमय लिहिले गेले आणि उत्साहाने वाचले गेले.

स्त्रीजीवनाच्या समस्या, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या भावभावना रंगविण्यासाठी अनेक कथालेखिकांनी या काळात कथाक्षेत्रात गर्दी केली आहे.  कथालेखकांच्या बरोबरीने आज त्या कथेच्या क्षेत्रात वावरताना दिसत आहेत.  उदाहरणार्थ, कमला फडके, शांता शेळके, सुमती क्षेत्रमाडे, योगिनी जोगळेकर इ. अनेक कथालेखिकांनी या क्षेत्रात उत्साहाने पाऊल टाकले.  पण बहुतेक लेखिकांच्या लेखनाचे वळण जुनेच आहे.  त्यात आशयगर्भताही फारशी आढळत नाही.  वसुंधरा पटवर्धन व स्नेहलता दसनूरकर यांच्या कथेने मात्र थोडे निराळे वळण घेतले.  नवकथेच्या काळात त्यांची कथा जुन्या वळणाने जात असली, तरी तीतून स्त्रियांच्या जीवनातील भीषण व करुण नाट्य अतिशय उत्कटपणे व्यक्त झाले आहे.

मराठी कथावाङमयात १९६० पर्यंतच्या काळात दोन प्रवाह निश्चितपणे आढळतात.  एक गोखले-गाडगीळ यांच्या पावलावर पाऊल टाकत जाणारी नवकथा व जुने वळण स्वीकारून सरळ साधी गोष्ट उत्कटपणे सांगणारी कथा.  नवकथेचा या कालखंडावर पडलेला प्रभाव मराठी कथेला एक निराळेच वळण लावणारा आहे.  व्यक्ती हे कथेचे केंद्र झाले व कथेतून माणसाचा खरा शोध सुरू झाला;कथा सूक्ष्म बनू लागली, मानवी भावनांचे विविध पदर व तिची गुंतागुंत ती उकलून दाखवू लागली आणि जीवनदर्शन वास्तव व सखोल करू लागली.  नवकथेने मराठी कथेला अधिक चिंतनशील बनवले, तिला तत्वज्ञानाची दृष्टी दिली; पण हे करताना ती कथेची चौकट अपुरी पडू लागली.  आशय व अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टींनी नवकथा लघुकथेपेक्षा किती तरी पुढे गेली.

१९६० नंतर: १९५८ ते १९६० च्या सुमारास मराठी नवकथेला साचलेपणाची कळा आली; तिच्यात तोचतोचपणा जाणवू लागला. नवकथा म्हणजे मनोविश्लेषण हे समीकरण एकदा मान्य झाल्यावर मराठी कथेत मनोविश्लेणषाकरिता मनोविश्लेषण येऊ लागलं. फडके युगात ज्याप्रमाणे कथेच्या तंत्राचा साचा बनला होता, तसाच प्रकार नवकथेच्या बाबत झाला. ज्या जाणिवा घेऊन नवकथेने जुन्या कथेची चौकट मोडली, त्याच जाणिवांनी एक नवी चौकट नवकथेच्या भोवती उभी केली. त्यामुळे नवकथेतही मनोविश्लेषणाचे साचे, निवेदनपद्धतीचे साचे असे काही साचे निर्माण झाले.  आघाडीच्या नवकथाकारांचे कथालेखन मंदावले आणि नवीन कथालेखकांचे कथालेखन केवळ अनुकरणामुळे कृत्रिम होऊ लागले.  पुन्हा एकदा मराठी कथेत पोकळी निर्माण झाली.

पण ही मरगळ फार काळ टिकली नाही.  १९६० च्या सुमारास मराठी साहित्यात पुन्हा एकदा नवनिर्मितीची लाट आली.  जी.ए. कुलकर्णी, चिं.त्र्यं. खानोलकर, विद्याधर पुंडलीक, दिलीप चित्रे, कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, श्री.दा. पानवलकर, शरच्चंद्र चिरमुले इ. नवीन कथालेखांची पिढी पुढे आली.  त्यांची कथा एका व्यक्तीच्या भोवती न फिरता समूहमनाचे दर्शन घडवून त्यांतून माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागली.  हा माणसाचा शोध घेताना त्यांना जाणीव झाली ती त्याच्या जीवनाच्या अर्थशून्यतेची, वैफल्याचीआणि एकाकीपणाची या जाणिवेने नैराश्याचे एक सावट या काळातील कथांवर पडलेले आढळते.

मराठी कथेला अगदी वेगळ्या टप्प्यावर आणण्याचे महत्वाचे कार्य करणारे या काळातील आघाडीचे कथाकार आहेत, जी. ए. कुलकर्णी. नवकथेतील सर्व सामर्थ्य आपणात एकवटून ती त्या कथेच्याही पुढे गेली आहे.  नवकथेप्रमाणे त्यांची कथा जीवनातील सूक्ष्म, खोल व्यथांचा शोध घेत असतेच; पण जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांतील यातना जीवघेण्या असतात आणि म्हणून त्यांचा आविष्कारही तितकाच भेदक असतो.  माणसाच्या मनात खोलवर जाऊन त्याच्या आंतरिक संवेदनांचे चित्रण करताना ते त्या व्यक्तीचे सर्व अंतरंग ढवळून काढतात.  मनोविश्लेषणाची सूक्ष्मता इतकी, की भावनांचे आणि संवेदनांचे एकेक पदर वेगवेगळे करून माणसाच्या मनाचे दर्शन उघड्या नागड्या स्वरूपात ते घडवितात आणि ही माणसेसुद्धा लोकविलक्षण असतात. वरून वाटतात साधी, पण अंतरंगात लाव्हा खळखळत असतो.  या साऱ्या व्यक्तींच्या जीवनात काही लोकविलक्षण घडत असते.  त्यांचे अंतरंग म्हणजे प्रचंड ज्वालामुखी असतो.

जी.ए. कुलकर्णी यांची कथा मानवाच्या अथांग दुःखाचा वेध घेते.  त्यांच्या कथांचा आणखी एक विशेष असा, की त्यांच्या प्रमुख पात्रांच्या भावनांत अनेक पात्रांचे पदर गुंतलेले आढळतात.  त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांची जी गुंतवळ तयार होते, ती सोडवताना अनेक व्यक्ति मनांच्या व्यथांचे दर्शन जी.ए. आपणाला घडवितात.  त्यांच्या कथांतून भेटणाऱ्याव प्रत्येक पात्राचे दु:ख वेगळे असते, त्याच्या यातना विपरीत असतात.  या दु:खाचा उगम अनेक वेळा नियतीत असतो, अनेकदा सामाजिक विद्रोहात असतो, तर पुष्कळदा त्या व्यक्तीच्या मनातच असतो.  या साऱ्याचे चित्रण करणारी जी.ए. कुलकर्ण्यांची शैली पण अगदी वेगळी झाली आहे.  तीतून प्रतिमांचा होणारा मुक्त वापर आशयाची सघनता वाढवतो.  कथेतून येणारा बारीकसारीक तपशील त्या कथेतील अनुभवविश्वाचे रंग अत्यंत गडद करतो.  त्यामुळे जी.ए. कुलकर्ण्यांची प्रत्येक कथा म्हणजे, एक वेगळा अनुभव, असा ती कथा वाचताना प्रत्यय येत असतो.  जी.ए. कुलकर्ण्यांच्या, कथेचा आणखी एक विशेष असा, की नवकथेप्रमाणे ती कथानक गमावून बसली नाही.  त्यांच्या कथेला ठसठशीत कथानक असते.  ते पेचदार, बांधेसूद असते.  त्यात बरेच काही घडत जाते.  महाकाव्याप्रमाणे तिचा पल्ला व तिची झेप मोठी आहे व महाकाव्याप्रमाणे जीवनाचा विशाल पट ती उलगडून दाखविते.  त्यांच्या कथेला महाकाव्याचे परिमाण लाभले आहे, असे म्हणावेसे वाटते.  जीवनाच्या गाभ्याला स्पर्श करून त्यातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या कथा रूपकात्मक पद्धतीचाही वापर करतात.  त्या कथांत लोकसाहित्याचे वैचित्र्य आहे, मिथ्यकथांचे सामर्थ्य आहे आणि वैश्विक सत्याचा शोध घेण्याचा तत्वचिंतक ध्यास आहे.  मराठी कथावाङमयात जी.ए. कुलकर्ण्यांची कथा अशी पृथगात्म आहे.

चि.त्र्यं. खानोलकरांनी थोड्याच कथा लिहिल्या; पण काव्य, नाटक व कादंबरी या क्षेत्रांप्रमाणे कथेच्या क्षेत्रातही त्यांनी आपले वेगळेपण टिकविले आहे.  सूक्ष्म अवलोकन, कल्पनाविलास आणि मानवी जीवनातील अतर्क्य आणि अदभूत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न यांमुळे कथेच्या क्षेत्रात त्यांचे असे खास निराळेपण जाणवते.  कोकणच्या परिसराची त्यांच्या अनेक कथांना पार्श्वभूमी लाभली आहे.  त्या परिसराभोवती जे समजुतींचे, दंतकथांचे व अदभुततेचे वलय पसरले आहे त्याचा, तसेच कोकणच्या परिसराने जे मन घडविले आहे त्याचाही उपयोग खानोलकरांनी आपल्या कथेसाठी प्रभावीपणे करून घेतला आहे. एक प्रकारच्या गूढ व धूसर वातावरणाचा  झिरझिरीत पडदा त्यांच्या कथेवर पडल्यासारखे वाटते.  तसेच त्यांच्या काही कथा काव्याच्या पातळीवर गेल्यासारख्या वाटतात.

दिलीप चित्रे या कालखंडातील एक महत्वाचे कथाकार. त्यांच्या कथांचे स्वरूप मराठीतील आजवरच्या कथांपेक्षा भिन्न आहे. माझा लेखनस्वभाव निव्वळ वाङमयीन संस्कारातून उत्पन्न झालेला नाही; स्वत:च्या अस्तित्वशोधाशी तो जडलेला आहे, असे एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे.  हा अस्तित्वशोध हाच त्यांच्या कथेचा गाभा आहे. तो ते निकराच्या आत्मभानाने घेतात. त्याच्या कथा नीति-अनीती, श्लील-अश्लील या वर्गीकरणाच्या पलीकडील असतात.  एका दृष्टीने त्यांची भूमिका सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांवर आघात करणाऱ्याय विद्रोहाची वाटतो.  त्यांची कथा त्यामुळे खूपच वादग्रस्त झाली आहे.

याशिवाय ज्यांनी या काळात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले आहे आणि ज्यांचे कार्य अद्याप चालू आहे अशा कथालेखकांची संख्या बरीच आहे. विद्याधर पुंडलिक, ज्ञानेश्वर नाडकर्णी, जयवंत दळवी, सिनिक, ए.वि. जोशी, श्री. दा. पानवलकर, शरच्चंद्र चिरमुले आणि व.पु. काळे ह्यांसारखी अनेक नावे मराठी कथेच्या वाटचालीत महत्वाची म्हणून पुढे येतात. या सर्वांचे कथेच्या क्षेत्रात आगळे असे स्थान आहे. या सर्वांचे प्रयोग चालू आहेत.  प्रत्येकाचे वेगळेपण जाणवतेच असे नाही; पण नव्या नव्या अनुभूतीचे आणि जीवनाच्या नव्या नव्या पैलूंचे त्यांच्या कथांतून जे दर्शन घडते, त्यामुळे प्रत्येकाची अनुभव घेण्याची, व्यक्त करण्याची पद्धती कशी भिन्न आहे, हे जाणवते.  काम-विकृतीचा गंड हा बऱ्यातच कथाकारांच्या कथांचा विषय झाला आहे.  मानवी जीवनाच्या अर्थशून्यतेची, वैफल्याची व एकलेपणाची जाणीव अनेकांच्या कथांतून पुन्हा पुन्हा होते. याशिवाय जीवनातील वास्तवाचे वर्णन करण्याच्या भरात अनेकांच्या कथांतून कुरूप, ओंगळ, बीभत्स व अश्लील गोष्टींवर भर देण्यात येतो.

स्त्रियांचे कथालेखन

१९६० नंतर आशय व अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टींनी मराठी कथेला जी नवी परिमाणे मिळाली, ती मिळवून देण्यात पुरुष कथाकारांइतका कथालेखिकांचा वाटा मोठा आहे. कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, सरिता पदकी, तारा वनारसे, वसुधा पाटील अशा काही लेखिकांची नावे या संदर्भात सहज नजरेत भरतात. कमल देसाई यांची कथा आशयाची सूक्ष्मातिसूक्ष्मता व अभिव्यक्तीचा तरलपणा यांमुळे एक वेगळीच झेप घेते.  त्यांच्या कथेचा घाटच वेगळा आहे. संवेदनांच्या व प्रतिमांच्या आधारे त्या आपल्या कथेचा आशय मूर्त करत जातात.  मात्र या साऱ्या तून निरर्थकतेची, वैफल्याची व निष्क्रियतेची छाया पडली आहे. जीवनाची क्षुद्रता व किरटेपणा यांची भेदक जाणीव त्यांच्या प्रत्येक कथेतून होते.  त्यांची कथा एका सरळ मार्गाने कधी जात नाही.  ती सारखा मार्ग बदलते.

कधी विरोधी मार्गाने, कधी संवादी मार्गाने, जर कधी समांतर मार्गाने वळणे घेत ती आपले उद्दिष्ट साधते.  विजया राजाध्यक्ष यांच्या कथा वाचताना काही तरी अस्पष्ट, धूसर आणि स्वप्नाळू जगाचे दर्शन आपणाला घडू लागते. त्यांच्या कथेतील व्यक्ती स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्याप, वास्तवापासून दूर सरकून अंधातरी झेप घेणाऱ्याक व स्वतःच्या भावविश्वात स्वतःच हरवून बसलेल्या दिसतात. सरिता पदकी, तारा वनारसे व वसुधा पाटील यांचीही कथा नवा तोंडावळा घेऊन जाते याच काळात कथालेखनात आपले वेगळे असे व्यक्तिमत्व प्रगट करणाऱ्याच सुधा नरवणे, ज्योत्स्ना देवधर, इंद्रायणी सावकार, शकुंतला गोगटे, शैलजा राजे इ. किती तरी नावे पुढे येतात. काहींच्या कथा जुन्या वळणाने जात आहेत, तर काहींच्या कथांतून नवे नवे प्रयोग करण्याचे सामर्थ्य व्यक्त होत आहे.  समाजजीवनातील वेगवेगळ्या स्तरांवर त्यांची कथा आपणाला नेते व त्या जीवनातील व्यथा बोलक्या करते. अगदी आजच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरी देशपांडे, उर्मिला शिरूर, राणी उपाध्ये, सानिया या कथालेखिका आपला असा वेगळा ठसा कथांवर उमटवीत आहेत.

अन्य कथालेखन

१९६० नंतरच्या ग्रामीण कथेत आनंद यादव, सखा कलाल, चारुता सागर, महादेव मोरे यांनी काही लक्षणीय भर घातली असली, तरी ती एका आवर्तातच फिरत असल्याची जाणीव होते. खेड्यातील जीवनाचे चित्रण आता अधिक वास्तव आणि अधिक परिणामकारक व्हावयास लागले हे खरे असले, तरी बदलत्या खेडेगावातील जीवनाचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न क्वचितच झालेला दिसतो.

विपुल विनोदी साहित्य निर्माण होऊनही त्यात विविधता आढळत नाही, अवलोकन आढळत नाही किंवा विसंगतीचे दर्शन घडविण्याइतकी प्रतिभेटी झेप पण दिसत नाही. बहुतेक विनोदी कथाकार स्थूल, प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ कथेभोवतीच घोटाळत राहिले. अतिशयोक्ती हे त्यांचे महत्वाचे हत्यार व घटनांची हास्योत्पादक गुंतागुंत हे त्यांच्या विनोदाचे साधन. क्वचित उपरोध व उपहासही त्यांच्या कथांतून जाणवतो. त्यांच्या विनोदाचे विषयही ठरलेले. आपले कुटुंब, शिक्षक किंवा कारकून आणि अनेकदा खुद्द कथानायक. प्रथमपुरुषी लेखनाचाच अवलंब बरेचजण करत असल्याने विनोदाला कथानिवेदक हा चांगला विषय मिळतो. ग्रामीण जीवनातील किस्से हा आणखी एक विनोदाचा विषय.  विसंगतीदर्शन घडवून वाचकांना अंतर्मुख करावयास लावण्याचे सामर्थ्य मात्र फारच थोड्या विनोदी लेखकांच्या लेखनातून आढळते.

एक महत्वाचा कथाप्रवाह या दशकातच मराठी कथेत येऊन मिळाला आहे.  तो म्हणजे दलित कथेचा प्रवाह.  दलितांबद्दल आतापर्यंत अनेकांनी लिहिले–हे खरेच; पण दलितांनी आपल्या जीवनातील व्यथा ज्या तीव्रतेने उभ्या केल्या, त्यांत एक विलक्षण जिवंतपणा आहे, कारुण्य आहे आणि चीड पण आहे.  विद्रोह हा दलित साहित्याचा आत्मा या कथांतून धारदारपणे जाणवतो.  शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे ही दलितलेखकांची जुनी पिढी झाली.  आज नव्या संवेदना व प्रखर वास्तव जाणिवा घेऊन  बाबुराव बागूल, केशव मेश्राम, अर्जुन डांगळे, योगीराज वाघमारे, वामन होवाळ ही नवी पिढी या क्षेत्रात उतरली आहे.  विद्रोहाने जरी ही पिढी पेटलेली असली, तरी तिच्या कथांतून व्यक्त झालेले प्रखर वास्तव आपणाला नाकारता येणार नाही.  आजच्या मराठी कथेत हा जिवंत प्रवाहाचा ओघ साऱ्याल समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

भयकथा, अद्भूतखता, रहस्यकथा व विज्ञानकथा यांचा एक नवा प्रवाह या कालखंडात आढळून येतो. पण तो अतिशय क्षीण आहे. जीवनातील भयानक व अदभूत अनुभव परिणाकारक रीतीने रंगविणे फारसे कुणाला जमलेच नाही. नारायण धारप, द.पा. खांबेटे, रत्नाकर मतकरी अशी काही नावेच या संदर्भात आपल्या नजरेसमोर येतात.  गेल्या काही वर्षात जे काही या दालनात निर्माण झाले, त्यातील बरेचसे अनुवादित आहे.  पूर्वी करमणुकीतून भुतांच्या गोष्टी येत असत.  आता नवल अशा कथांचा प्रयोग करते.  रहस्यकथा, गुप्तपोलीसचातुऱ्याच्या कथा, गुन्हेगारांच्या कथा हाही ओघ आजच्या कथावाडमयातून आढळतो.  ‘विज्ञान कथा ’  हा अगदी नवा प्रवाह.  जयंत नारळीकरांनी या कथेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

समारोप

१८९० पासून १९८० पर्यंतच्या गेल्या नव्वद वर्षांच्या मराठी कथेचे स्वरूप हे असे आहे.  स्फुट गोष्ट, संपूर्ण गोष्ट, लघुकथा व नवकथा अशा विकासाच्या चार टप्प्यांतून मराठी कथा गेली.  हे चार टप्पे पहात असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते. स्थूलाकडून सूक्ष्माकडे तिचा प्रवाह चालला आहे.  बाह्य घटनांच्या वर्णनात रमणारी हरिभाऊकालीन कथा आज मानवी मनाच्या अंतरंगात खोलवर शिरून तेथील संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडवू लागली आहे.   जीवन जितके गुंतागुंतीचे होऊ लागते, तितकीच मानवी मनाची गुंतागुंतही वाढत असते. आज मानवी जीवन विलक्षण गुंतागुंतीचे झाले आहे. मानवाला वेगवेगळ्या आणि अतर्क्य अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि एक विलक्षण गती त्याच्या जीवनाला मिळाली आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. मानवालाही त्याबरोबरच बदलावे लागत आहे.  त्याच्या सुप्त वा अर्धसुप्त मनात भावभावनांचे व विकारांचे रासायनिक मिश्रण तयार झाले आहे. अशा मानवाचा, तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आणि त्यांच्या एकमेंकावर होणाऱ्याअ क्रियाप्रतिक्रियांचा सूक्ष्म वेध घेत आजची कथा पुढे चालली आहे.

 

लेखक :  म.ना. अदवंत

माहिती स्रोत :  मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate