অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- लघुनिबंध

लघुनिबंध मराठीमध्ये १९२७ च्या आसपास जन्माला आला. तो जन्माला यायला १९२७ पूर्वीची मराठीची वाङमयीन पार्श्वभूमी जशी कारणीभूत आहे; त्याचप्रमाणे त्याला नीटस आकार यावयाला इंग्रजीतील ‘पर्सनल एसे’ हाही कारणीभूत आहे.

मराठी साहित्यातील लघुनिबंधपूर्व तत्सदृश लेखनाकडे पाहात असताना असे दिसून येते, की शि.म. परांजपे यांचे काळातील काही लेख, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे विनोदी लेख, न. चिं. केळकर यांचे निबंध यांनी लघुनिबंधमाला अनुकूल वातावरण तयार केले. तसेच या काळात अनेक नियतकालिकांतून अनेक प्रकारचे ज्ञान, माहिती ही ललित पद्धतीने, ललित भाषेत लेख लिहून सांगितली जात होती.  जीवनातील सामान्य, क्षुद्र विषयांवर चुरचुरीत लेख लिहून वाचकांचे मनोरंजन केले जात होते.  अशा प्रकारच्या लेखनाला या काळात ‘पानपूरके’ म्हणूनच केवळ स्थान होते.  त्याला विशेष असे ‘प्रकारनाम’ नव्हते.  शिवाय या काळात काही इंग्रजी लघुनिबंधांची भाषांतरे होऊन तीही पानपूरकासारखी प्रसिद्ध झालेली आहेत.  अशा रीतीने या जवळच्या पूर्वकाळात लघुनिबंधाची जातकुळी सांगणारे स्फुटलेखन प्राकारिक नाव न घेता विपुल प्रमाणात जन्माला येत होते.

या वाङमयीन वातावरणाचा व अनुषंगाने इतर काही वाङमयबाह्य परिस्थितीचा परिणाम लघुनिबंधाचा जन्म होण्यात झाला. लघुनिबंधात ‘मीत्वा’ चा आविष्कार असतो. एखाद्या चिंतनाच्या, भावावस्थेच्या, वस्तूच्या, समानतेच्या सूत्रानुषंगाने ‘मी’ चा अनुभव अगर अनुभवगुच्छ लघुनिबंधात व्यक्त होत असतो.  या ‘मी’  च्या अनुभवाचे महत्व पटून १९२७ मध्ये वि.स. खांडेकर प्रथम वैनतेय ह्या नियतकालिकातून ‘लघुलेख’ या प्रकारनामाने लेखन करू लागले. १९२६ ते १९३१ पर्यंत ना.सी. फ़डके कंसात ‘निंबधात्मक’ असे म्हणून ‘गुजगोष्टी’ या नावाखाली साधेसुधे विषय घेऊन केळकरी वळणाचा निबंधच आपल्या (आरंभीच्या केळकरी भाषेचीच छाप असलेल्या) भाषाशैलीत लिहिताना दिसतात.  प्राथमिक स्वरूपातही ज्याला लघुनिबंध म्हणता येईल, अशा प्रकारचे हे लेखन नव्हते. शिवाय अशा प्रकारचे लेखन पूर्वी अनेकांनी केलेलेही आहे. १९३१ मध्ये आणि त्यानंतर मात्र फडके यांनी इंग्रजी ‘पर्सनल एसे’ चे अनुकरण करून मराठीमध्ये लघुनिबंध आणला व तो लोकप्रिय केला. त्यामुळे मराठी लघुनिबंधाचे जनक म्हणून वि.स. खांडेकर व प्रवर्तक म्हणून ना.सी. फडके यांना मान्यता द्यावी लागते.

खांडेकरांच्या लघुनिबंधाची जातकुळी मराठी वाटते. मराठी साहित्यपरंपरेत तो जन्माला आला आणि इंग्रजी ‘पर्सनल एसे ’ च्या आधारे तो वाढला.  त्यांच्या लघुनिबंधातून व्यक्त होणारे मन आणि व्यक्तित्व हे मराठीतील हरिभाऊ आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शि.म. परांजपे, राम गणेश गडकरी यांची परंपरा सांगणारे वाटते. खांडेकरांच्या लघुनिबंधांची त्या काळातील भाषा काहीशी कृत्रिम, अलंकरणाचा सोस असणारी असली, तरीही तिला वरील परंपरेचाच वारसा आहे. लघुनिबंधकार खांडेकरांच्या ‘मीत्वा’ वरील संस्कारही अव्वल दर्जांच्या मराठी मनाचे, मराठी संस्कृतीचे वाटतात. चिंतनाला प्राधान्य देऊन त्यांनी बहुसंख्या अनुभव व्यक्त केले आहेत.

ना.सी. फडके यांचे लघुनिबंध आस्वादशील वृत्तीने प्रेरित झाले आहेत. एरव्ही जीवनात सामान्य आणि क्षुद्र वाटणाऱ्या घटना-वस्तूंना त्यांनी लघुनिबंधात विषयाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या घटनावस्तूंबद्दलचे आपले अनुभव ते रसिक वृत्तीने व्यक्त करतात. लघुनिबंधाच्या इंग्रजीतील तंत्राचा जाणीवपूर्वक वापर मराठीत त्यांनी केला आहे.  मित्रांशी मारलेल्या गप्पांसारखे त्यांच्या लघुनिबंधाचे स्वरूप आहे. भाषाशैली प्रसन्न राहण्याविषयी त्यामुळे ते सतत दक्षता घेतात.  त्यांनी लघुनिबंधाला लोकप्रियता प्राप्त करून दिली.

घटनावस्तूंविषयीचे ‘मी’ चे अनुभव व्यक्तिविशिष्ट रसिकतेने व्यक्त करणे ही त्यांच्या लघुनिबंधाची प्रेरणा दिसते.  अनंत काणेकरांच्या लघुनिबंधांचा मध्यवर्ती विषय आपल्याभोवतीचा समाज, आधुनिक मानवी जीवन, मानवी स्वभाव यांविषयी विचार व्यक्त करणे हा असतो. विनोदी आणि चटकदार उदाहरणे देऊन विचारविषय मनोरंजक करण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे.  एखादा विचार मनाशी पक्का करून तो चटकदार उदाहरणांनी मांडणे; ही त्यांची लघुनिबंधविषयक कल्पना त्यांच्या बहुसंख्य लघुनिबंधांत दिसते. या त्यांच्या वृत्तीला फारच थोडे लघुनिबंध अपवादभूत आहेत.

या तिघांचेही लघुनिबंध आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. खांडेकरांचे लघुनिबंध संख्येने अधिक व विविध स्वरूपाचे आहेत. व्यापक अनुभव व चिंतन यांचा तोल साधणारे, समृद्ध व विकसनशील असे त्यांचे स्वरूप आहे. फडके यांनी मराठी लघुनिबंधमाला तंत्र, लोकप्रियता. आस्वादशील वृत्ती दिली, तर अनंतक काणेकरांनी विचार चटकदारपणाने मांडण्याची हातोटी दिली.  या तिघांनी जो विषयांचा आवाका निर्माण केला तोच पुढे १९४५ पर्यंत स्थिर राहिला.  या तिघांच्या छायेत राहूनच अनेक लघुनिबंधकारांनी १९३४ ते १९४९ पर्यंत व तेथूनही पुढे आणखी काही लेखकांनी काही काळ लेखन केलेले दिसते.

असे असले, तरी या काळात गं.भा. निरंतर, कुसुमावती देशपांडे, ना.मा. संत यांचे अपवाद मानावे लागतात.यांतील गं.भा. निरंतर हे पहिले प्रयोगशील लघुनिबंधकार.  रूढ लघुनिबंधाची चौकट मोडण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न केला. विषयाची हाताळणी गप्पांच्या सुरात न करता गंभीरपणे, अंतर्मुख वृत्तीने त्यांनी प्रथम केली.  प्रदर्शनीय ‘मी’  ला नाकारून ‘मी’  च्या व्यक्तित्वाचे मन:पूर्वक दर्शन घडविले. कथेची, शब्दचित्राची, चिंतनशीलतेची भिन्नभिन्न भावावस्थांची वेगळी परिमाणे आणि वैशिष्ट्ये लघुनिबंधमाला मिळवून देण्याचा त्यांनी प्रथमच प्रयत्न केला.  साखरझोप (१९३८) व नवी साखरझोप (१९४८) असे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.

कुसुमावती देशपांडे यांनी आपल्या उण्यापुऱ्या तीनचार लघुनिबंधांनी लघुनिबंधाचे एक सतेज रूप दाखवून दिले. निसर्गाच्या रेखाटनातूनच ‘मी’ चा भावगर्भ सूचक आविष्कार, अल्पाक्षरत्व, प्रतिमायुक्त संयमी भाषा, एका वेगळ्या भावात्म पातळीवर स्पंदणारे चिंतन, अनुभवातील गंभीरपणा व भोगलेपणा त्यांच्या लघुनिबंधातून मराठी लघुनिबंधात प्रथमच अवतरला.या दोघांनी लघुनिबंधाला वेगळी दिशा लावण्याचा प्रयत्न केला, तर ना.मा. संत यांनी आपल्या कुवतीनुसार फडकेपद्धतीच्या लघुनिबंधाचे निखळ रूप शोधले आणि फडके पद्धतीच्या लघुनिबंधाला त्याच्या जन्मापासूनच्या तंत्रनिष्ठेच्या आणि वाटकनिष्ठेच्या ज्या मऱ्यादा पडल्या होत्या, त्यांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. उघडे लिफाफे (१९४४) हा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

या काळातील वि.पां. दांडेकर, वि.ल. बरवे, रघुवीर सामंत यांचे लघुनिबंधही विशेष दर्जाचे नसले, तरी उल्लेखनीय आहेत.

  1. वि.पां. दांडेकर यांचे फेरफटका (१९३६)
  2. टेकडीवरून (१९३७)
  3. एक पाऊल पुढे (१९४१)
  4. काळ खेळतो आहे (१९४८)
  5. पंचवीस वर्षांनंतर (१९४९)

हे लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.  वि.ल. बरवे यांचा पिसारा हा लघुनिबंधसंग्रह १९३७ साली प्रसिद्ध झालेला असला, तरी ते १९२८ पासून लघुनिबंधलेखन करीत आहेत.  रघुवीर सामंत यांची पणत्या (१९३९), तारांगण (१९४०), रज:कण (१९४१), दिलजमाई (१९५९) अशी चार पुस्तके प्रसिद्ध असून त्यांत लघुनिबंधाबरोबरच इतर साहित्यप्रकारांतील लेखनेही प्रसिद्ध केलेली आहेत.  या लघुनिबंधकारांचे मोजके अपवाद सोडता, या काळातील बहुतेक लघुनिबंध सामान्य दर्जाचे आणि संख्यने विपुल आहेत.  त्यामुळे या काळात लघुनिबंधाला जी लोकप्रियता मिळाली होती, ती गमवायलाही हा विस्तारवादी लघुनिबंधच कारणीभूत झाला आहे.  सामान्य विस्तारवादी लघुनिबंधकारांनी लघुनिबंध उथळ करून टाकला, लघुनिबंधाची संकल्पना सामान्य पातळीवर नेऊन ठेवली. विचार गंभीरपमे केला तर तो निबंध होईल आणि अनुभवांना विशेष स्थान दिले तर विचार नीट सांगता येणार नाहीत, या शृंगापत्तीत सापडल्यामुळे त्यांचे विचार आणि अनुभव सामान्य पातळीवरच राहिले. विषयांची पुनरावृत्ती होत राहिली. त्यामुळे १९४५-४६ पर्यंत तो विस्तारवादी पातळीवरच, अपवाद वगळता रेंगाळत राहिला.

इरावती कर्वे यांचा परिपूर्ती हा लघुनिबंधसंग्रह १९४९ मध्ये प्रसिद्ध झाला आणि वरील प्रकारच्या लघुनिबंधाला नवे वळण स्पष्टपणे मिळाल्याचे त्या संग्रहाने दाखवून दिले.  १९४५ च्या आसपासच याची चाहूल येत होती.  नवा लघुनिबंध घडविणाऱ्या ⇨ दुर्गा भागवत, गो.वि. करंदीकर ह्यांनी १९५० त्या आगेमागेच लघुनिबंधलेखनाला प्रारंभ केला.  असे जरी असले, तरी १९५० नंतरही जुन्या वळणाने लिहिणारे अनेक लघुनिबंधकार आहेत. या जुन्या वळणाने लिहिणाऱ्या लघुनिबंधकारांमध्येही म.ना. अदवंत, भगवंत देशमुख, श्रीपाद जोशी, सरोजिनी बाबर ही नावे उल्लेखनीय आहेत.

गो.रा. दोडके हे लघुनिबंधकार संधिकाळात (म्हणजे १९४५ च्या आसपासच्या काळात) लेखन करणारे एक उल्लेखनीय लेखक होत. या काळात त्यांनी पूल बांधण्याचे कार्य केले.  जुने नकोसे वाटते आहे, पण नवे काय हवे आहे ते नीटसे दिसत नाही किंवा आत्मसात करता येत नाही, अशा अवस्थेत त्यांनी लघुनिबंधलेखन केलेले दिसते.  त्यामुळे ते संधिप्रदेशातच स्थिर झालेले आहेत. माहेरवाशिण (१९५३) हा त्यांचा लघुनिबंधसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश इरावतीबाई कर्वे यांच्या परिपूर्तीला आणि नंतरच्या त्यांच्या लघुनिबंधांना प्राप्त झाले आहे. जुन्या लघुनिबंधाचे मौलिक रूप (म्हणजे ‘मी’ च्या अनुभवांचे गुच्छरूप) एवढेच त्यांनी स्वीकारले आणि बाकीचे सारे तंत्र व त्याविषयीच्या उपऱ्या जाणिवा (सामान्य – क्षुद्र विषय घेणे, गप्पांचा सूर, प्रसन्न भाषाशैली इ.)  त्यांनी नाकारल्या. त्यांनी आपले मौलिक स्वरूपाचे आणि वेगळे,  कौटुंबिक, समाजशास्त्रीय, परदेशीय, जगभरच्या प्रवासातील सांस्कृतिक व्यापक अनुभव सखोलपणे आणि जोमदारपणे आविष्कृत केले.  भाषा तितकीच मन:पूर्वक, प्रांजळ, पारदर्शी, साधी ठेवली. या सर्वांना हळूहळू गहिरी होत जाणारी चिंतनाची, विद्वत्तेची, विचारवंत मनाच्या स्पंदनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड मिळत गेली. त्यामुळे त्यांचा लघुनिबंध अंतर्बाह्य वेगळा झाला. लघुनिबंधालाही खऱ्याच अर्थाने अव्वल दर्जाचे व्यक्तिमत्व लागते, हे त्यांनी लक्षात आणून दिले.

जुन्या लघुनिबंधाला चाचपून पहात, त्याची शक्तिस्थाने हेरून आत्मसात करत, उपऱ्याप बाबींना नाकारत, लघुनिबंधाच्या प्रत्येक घटकातील मूळ रूप शोधून त्याचा वापर करत आणि नंतर विविध रूपांत आविष्कृत करत करत लेखन करणारा लघुनिबंधकार म्हणजे गो.वि. करंदीकर (विंदा करंदीकर).  त्यांच्या लघुनिबंधामुळेही जुना लघुनिबंध अंतर्बाह्य बदलला. लघुनिबंधाच्या आशयाच्या आवश्यकतेनुसार ते लघुनिबंधाचे नवेनवे घाट शोधत गेले. कधी अनुभवांचे गुच्छरूप, कधी एक अनुभव व शेवटी चिंतन, कधी अनुभवाच्या पोटातच चिंतन, कधी चिंतनगर्भ एकच अनुभव, कधी कवितेप्रमाणे प्रतीकात्म, पुनरावर्तनशील रूप, तर कधी कहाणीचे रूप अशी त्यांच्या लघुनिबंधांची विविध मांडणी आहे.

खरे तर ही त्यांच्या अनुभवांची व्यक्त रूपे आहेत.  त्यांचा आशयही सामाजिक, वस्तुनिष्ठ, आधुनिक स्वरूपाचा आहे. टीकात्म, उपरोधात्म, विनोदात्म, काव्यात्म, भयात्म अशा विविध भाववृत्ती त्यांच्या लघुनिबंधाला लाभल्या आहेत.  ‘मी’ ची संपूर्ण स्वतंत्र विचारशील वृत्ती, विचारातील गुंतागुंत आणि बारकावे उलगडून दाखविण्याचे विलक्षण सामर्थ्य, नवी भाषिक जाणीव ह्याही वैशिष्ट्यांमुळे मराठी लघुनिबंधाचा बहुमुखी विकास गो.वि. करंदीकरांनी केला आहे.  करंदीकरांचे व्यक्तिमत्व विशेषत्वाने वाङमयाच्या संदर्भात जागरूक वाटते.  जाणीवपूर्वक ते लेखनात प्रयोगशील असते.  स्पर्शाची पालवी (१९५८) आणि आकाशाच अर्थ (१९६५) हे त्यांचे दोन लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.

दुर्गाबाई भागवतांच्या लघुनिबंधांनी तर भावमुद्रेमध्ये (१९६०) आरंभापासूनच स्वतंत्र रूप धारण केले आहे.  त्यांनी जुन्या लघुनिबंधाला मुळातूनच वाट पुसण्याचे नाकारले.  आपणास आलेले अनुभव जास्तीत जास्त आत्मनिष्ठेने व्यक्त करण्याच्या गरजेतून त्यांचे लघुनिबंध आकाराला आलेले दिसतात.  म्हणजे असे की, साहित्यप्रकारांत अनुभव घालण्यापेक्षा अनुभवांनाच संपूर्ण शरण जाऊन त्यांनाच व्यक्त करत राहण्यात दुर्गाबाईंचे ललितलेखन बहुधा रमते.एका उत्कट भावावस्थेने त्यांचा लघुनिबंध सुरू होतो.  त्या भावावस्थेत ज्या आठवणी येतील त्यांचा हळूहळू अनुभवगुच्छ तयार होतो.  त्या भावावस्थायुक्त अनुभवगुच्छानंतर त्यातूनच चिंतन सुरू होते.

ते चिंतन तेवढेच तीव्र, सखोल असते.  हे चिंतन जिथे संपल्यासारखे वाटते तिथे लघुनिबंध संपतो.  झपाटून टाकणारी तीव्र भावावस्था, घनिष्ठ निसर्गसंबंध, पराकोटीची चिंतनशीलता, भावावस्थेमुळे सर्वच अनुभवगुच्छाला आलेली गतिमानता ही त्यांच्या लघुनिबंधाची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृतिनिष्ठ अभिजात वृत्तीला जवळची अशी त्यांची भाषाही मराठी लघुनिबंधाला जवळची आहे.मंगेश पाडगावकरांनीही नव्या लघुनिबंधात आपली काव्यात्म वृत्ती आपल्या परीने आणून सोडलेली आहे.  निंबोणीच्या झाडामागे (१९५६) हा त्यांचा लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहे.'प्राणहिता’ या लेखिकेने आपल्या बालमनाचा शोध आपल्या मोजक्या असंग्रहित लघुनिबंधांत ज्या नव्या प्रेरणेने आणि प्रवृत्तीने घेतला, तीही धडपड मराठी नव्या लघुनिबंधात मोलाची आणि महत्वाची आहे.

पुढे बालमनाच्या शोधाला श्रीनिवास कुलकर्णी यांनी विकसित अवस्थेला नेले आणि मराठी लघुनिबंधाला वेगळी परिमाणेही प्राप्त करून दिली. डोहमध्ये (१९६५) त्याचे प्रत्यंतर येते.  संवेदनशील, तरल, स्वप्नमय, पुराणकथा आणि प्रत्यक्ष वास्तव व स्वप्न यांचे मिश्रण करणाऱ्याय, अदभुताची सतत ओढ असलेल्या, कल्पक, निसर्ग, प्राणी यांत रमणाऱ्या ‘मी’ च्या बालमनाचा शोध त्यांनी सूक्ष्मतेने घेतलेला आहे. एका बाजूस प्राप्त विषयाचे भान ठेवून निवेदन करणे आणि त्यातच दुसऱ्याल बाजूने ‘बाल-मी’ चा शोध घेणे असे दुहेरी परिमाण त्यांनी आपल्या लघुनिबंधाला प्राप्त करून देऊन खऱ्या अर्थाने ललित लेख व लघुनिबंध एकजीव करून टाकले.  तसे करून त्यांनी त्या दोन्हीही प्रकारांचा विकास केला व त्यांच्या शक्यता, वाढवून दाखविल्या. ‘ललित निबंध’ हे नामाभिधान योग्य अर्थाने याच लेखनाला द्यावेसे वाटते.

याच पाच-सहा नव्या लघुनिबंधकारांनी अशा रीतीने लघुनिबंध वेगळ्या दिशांनी विकसित केला.  या कथेतच देवीदास बागूल, वसुंधरा पटवर्धन, वामन इंगळे, शिरीष पै इत्यादींचे लेखन कमीअधिक प्रमाणात येते.नव्या लघुनिबंधाने उपऱ्या तंत्राचे भान कधी ठेवले नाही. स्वाभाविक आकाराच्या शोधातच तो धडपडताना दिसतो.  त्यामुळे आंतरिक स्वभावानुसार नवा लघुनिबंध आविष्कृत होत गेला.  तसेच तो आरंभापासून अखेरपर्यंत सघन, अंतर्मुख, गतिशील आणि विकसनशील वाटतो. नव्या लघुनिबंधकारांचा ‘मी’ वरचा विश्वास वाढलेला दिसतो.  नवलघुनिबंध जुन्या वर्णनपरतेतून बाहेर पडून आत्मशोधात मग्न झालेला जाणवतो. त्यामुळे त्याच्यातील अनुभवांना ‘चटकदार अनुभव’ असे स्वरूप न राहाता ‘व्यक्तिमत्वाचे मनःपूत अनुभव’ असे स्वरूप आले. त्या अनुषंगानेच अनेकविध भावावस्था आणि त्या व्यक्त करणारी नवी प्रतिमायुक्त भाषा लघुनिबंधाला प्राप्त झाली.  १९५० नंतरचा लघुनिबंध प्रामुख्याने अंतर्मुख कविमनाने घडविलेला वाटतो.

आज लघुनिबंध विरळ प्रमाणात लिहिला जाताना दिसतो. ललित गद्याचा हा एक उपप्रकार आहे, साहित्यप्रकार म्हणून त्याची शक्तीही मऱ्यादित आहे.आत्मनिष्ठ लेखनाला व लघुनिबंधीय वृत्तीला आज इतर अनेक साहित्यप्रकारांतून वाटही मिळत आहे.  शिवाय आज घडीला ‘ललित निबंध’ या व्यापक प्राकारिक नावाखाली लघुनिबंधाबरोबरच ललित गद्याच्या इतर उपप्रकारांचे लेखनही होत असल्याने कदाचित तो वेगळेपणाने उठून दिसत नसावा.  ‘ललित गद्य’ या व्यापक नावाने काही लेखनसंग्रह प्रसिद्ध होतात. ललित गद्याचे सगळे उपप्रकार त्यांत एकत्र येतात.  त्यामुळे ‘लघुनिबंध ’ शोधूनच काढावा लागतो.  एके काळी स्वतंत्रपणे चमकणारा हा साहित्यप्रकार अशा रीतीने आता एका व्यापक प्रकारात समाविष्ट होऊन गेलेला आहे.

लेखक: आनंद यादव

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate