অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- व्याकरण

मध्ययुगापासून मराठीत विपुल ग्रंथरचना झालेली असली, तरी मराठीचा भाषिक दृष्टीने अभ्यास करण्याची परंपरा नसल्याने भाषेचे नियमन आणि व्यनस्थापन करणाऱ्या व्याकरणग्रंथांची मात्र रचना झाली नाही. भीष्माचार्य या महानुभाव पंथातील कवीच्या नावावर मोडणारी ‘पंचवार्त्तिक’,  ‘नामविभक्ति’, यांसारखी स्फुट प्रकरणे किंवा रामदासी संप्रदायातील गिरिधराने रचलेले छोटेसे ‘व्याकर्ण’ यांखेरीज मराठीचे व्याकरणलेखन झाले नाही.

फादर स्टीफन्सने पोर्तुगीजमध्ये मात्र एक व्याकरण लिहिले होते (१६४०). एकोणिसाव्या शतकात, विशेषत: मुद्रित ग्रंथांचा हळूहळू प्रसार होण्यास प्रारंभ झाल्यानंतर, ज्यांनी व्याकरणे लिहिली अशांत विल्यम कॅरे (१८०५), महमद इब्राहीम मखबा (१८२५), रे. स्टिव्हन्सन (१९३३), जेम्स आर. बॅलेंटाइन (१८३९) व रे. बर्जेस ( १८५४ ) इत्यादींचा समावेश होतो.मुंबईच्या हैंद शाळा पुस्तक मंडळीच्या सूचनेवरून जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे ह्यांनी एक हस्तलिखित व्याकरण तयार केले होते. (१८२४).

पुढे गंगाधरशास्त्री फडके यांचे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण प्रसिद्ध झाले (१८३६). मराठीतील हे पहिले मुद्रित व्याकरण. याच वर्षात बाळशास्त्री जांभेकर यांचे बाल व्याकरण तयार झाले. दादोबा पाडुरंग तर्खडकर यांचे मराठी भाषेचे व्याकरणही ह्याच वर्षी प्रसिद्ध झाले. संस्कृत व इंग्रजीच्या व्याकरणांचा अभ्यास करून हे लिहिले होते व त्यात मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लाविली होती. १८५० मधील दुसऱ्या आवृत्तीमध्ये दादोबांनी या व्याकरणात बरेच फेरफार केले. १८८१ मध्ये त्यानी याच व्याकरणाची एक ‘पूराणिक’ प्रकाशित केली. व्याकरणविषयक अनेक प्रश्नांची सविस्तर चर्चा करणारे आणि पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरलेले व्याकरण म्हणून दादोबांच्या व्याकरणाचे विशेष महत्त्व आहे. आपल्या याच व्याकरणाची एक छोटी आवृत्ती लघु व्याकरण या नावाने दादोबांनी १८६५ मध्ये तयार केली होती.

दादोबांच्या व्याकरणाने मराठीत व्याकरण-लेखनाची अखंड परंपरा निर्माण झाली. गंगाधर रामचंद्र टिळक (मराठी लघु व्याकरण, १८५८), कृष्णशास्त्री गोडबोले (मराठी भाषेचे नवीन व्याकरण, १८६७), रा. भि. गुंजीकर (लहान मुलांकरिता सुबोध व्याकरण, १८८६), रा. भि. जोशी (प्रौढबोध मराठी व्याकरण, १८८९), गो. ग. आगरकर (वाक्यमीमांसा) अशी अनेक छोटी – मोठी पुस्तके तयार झाली. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी व्याकरणविषयक अनेक मूलभूत प्रश्नांचा उहापोह करणारे लेख .. शालापत्रक मासिकात लिहिले, ते १८९३ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

विसाव्या शतकाला प्रारंभ झाल्यानंतर १९११ मध्ये मोरो केशव दामले यांनी लिहिलेला शास्त्रीय मराठी व्याकरण हा मराठी व्याकरणात मेरूमण्याप्रमाणे शोभणारा ग्रंथराज प्रकाशित झाला. पूर्वसूरीच्या प्रतिपादनाचा चिकित्सक परामर्श घेऊन मराठी व्याकरणातील विविध मतमतांरांची सांगोपांग चर्चा करणारा प्रौढ ग्रंथ म्हणून दामल्यांच्या व्याकरणाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

म. पां. सबनीस कृत मराठी उच्चतर व्याकरण (१९५१) या ग्रंथात दामल्यांच्या अनेक मतांचे आग्रहपूर्वक खंडन करण्याचा प्रयत्‍न आहे. अरविंद मंगरूळकरांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार, ( १९६४ ) या आपल्या पुस्तकात मराठीचे व्याकरण केवळ मराठीच्याच स्वभावानुरूप सिद्ध केले पाहिजे, या विचाराचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा केलेला आहे.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नवीन भाषाशास्त्राचा उद्‍य होऊन त्यातील विचारप्रणालीच्या आधाराने मराठी भाषा व तिच्या पोटभाषा यांचे अध्ययन होऊ लागले.

त्यातूनच कृ. पां. कुलकर्णी यांचे मराठी भाषा

 

  1. उद्‌गम व विकास ( १९३३ )
  2. डॉ. गं. ब. ग्रामोपाध्येलिखित पेशवे दप्तरांतील मराठी भाषेचे स्वरूप ( १९४१ )
  3. डॉ. शं. गो. तुळपुळेकृत यादवकालीन मराठी भाषा ( १९४२ , सुधारित दुसरी आवृ. १९७३ )
  4. डॉ. वि. बा. प्रभुदेसाईकृत सतराव्या शतकातील गोमंतकी बोली ( १९६३ )
  5. डॉ. व. कृ. वर्‍हाडपांडेकृत नागपुरी बोली ( १९७२ )

असे अनेक उल्लेखनीय ग्रंथ निर्माण झाले. नव्या व्याकरणिक दृष्टिकोणाचा मागोवा घेऊन मराठी व्याकरणाची नव्या शास्त्रीय आणि स्वतंत्र पायावर उभारणी करण्याचे प्रयत्‍न आता नेटाने चालू आहेत.

लेखक: मु. श्री. कानडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate