অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- संशोधनपर साहित्य

मराठी वाङ्‌मयाच्या संशोधनकार्याचा खरा आरंभ एकोणिसाव्या शतकात झाला. मुद्रणकलेच्या आगमनामुळे तोपर्यत हस्तलिखित असलेले साहित्य मुद्रणबद्ध करण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. एल्‌फिन्स्टन, मालकम ह्यांसारख्या इंग्रज राज्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या कामाला उत्तेजन दिले. डॉ. विल्सनसारख्या धर्मोपदेशकांनी संशोधनक्षेत्रात महत्त्वाची भर घातली. अज्ञानामुळे किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे त्यांच्या संशोधनात काही अपसिद्धान्त येऊ लागले. ते खोडून काढण्यासाठी आपणाकडे इतिहास, भाषा, वाङ्‌मय इत्यादींच्या संशोधनाला विशेष चालना मिळाली.

प्राचीन काळी महानुभाव पंडित म्हाइंभट ह्यांनी महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर ह्यांच्या आठवणी किंवा लोळा संकलित करण्याच्या दृष्टीने केलेले संशोधन वैशिष्ट्यपूर्ण आहे. महानुभवांचे तत्त्वज्ञान व आचारधर्म सांगणाऱ्या सूत्रांचे केशवराज सूरी ह्यांनी केलेले संकलनही प्राचीन संशोधनाचे एक उदाहरण. सोळाव्या शतकात संत एकनाथांनी ज्ञानोश्वरीची तयार केलेली पाठशुद्ध प्रतसुद्धा ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरते.

जुनी हस्तलिखिते मिळवून प्राचीन मराठी वाङ्‌मय करण्याचे जे प्रयत्‍न एकोणिसाव्या शतकात झाले, त्यांत परशुरामपंतातात्या गोडबोलो ह्यांनी काढलेले नवनीत (१८५४) हे विशेष लक्षणीय. प्राचीन संत व पंडित कवींच्या निवडक वेच्यांचा हा संग्रह त्या कवींची ओळख करून देण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर माधव चंद्रोबा डुकले यांनी सर्वसंग्रह मासिक काढले (१८६०). विविध कवींच्या ग्रंथांचा संग्रह प्रसिद्ध करणे हे ह्या मासिकाचे धोरण होते.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेने (१८७४) इतिहास व वाङ्‌मय ह्यांच्या संशोधनात चालना दिली. त्यांच्या ‘इतिहास’ हा निबंध वाचून प्रसिद्ध इतिहाससंशोधक वि. का. राजवाडे यांना व इतर अनेकांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. काव्येतिहास संग्रहाचे (१८७८) संपादन जनार्दन बाळाजी मोडक व काशिनाथ नारायण साने यांनी केले असले, तरी त्यामागील प्रेरणा विष्णुशास्त्री यांची होती.

अप्रसिद्ध संस्कृत – मराठी काव्ये व महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे काव्येतिहाससंग्रहातून प्रसिद्ध करावी, असे ठरले. आरंभीच्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकरही त्याच्या संपादनात होते. का. ना. साने यांनी चित्रगुप्तविरचित शिवाजी महाराजांची बखर, भाऊ – साहेबांची बखर, पाणिपतची बखर, पेशव्यांची बखर, ह्यांसारख्या बखरींचे संपादन केले. निरनिराळी हस्तलिखिते मिळविणे, त्यांवरून पाठशुद्ध प्रत तयार करणे, निरनिराळ्या पाठभेदांची चिकित्सा करणे, बखरींचा कालनिर्णय करणे इ. अनेक गोष्टींमुळे संशोधनक्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे ठरले आहे.

शाहिरी वाङ्‌मयाच्या संशोधनाला सुरूवात ह्या काळाच्या सुमारासच झाली होती. विविधज्ञानविस्ताराने १८७२ साली प्रथम नारायणरावाच्या वधाचा पोवाडा (पहिला) छापून काढला. त्यानंतर निबंध माला व काव्येतिहाससंग्रह यांतूनही पोवाडे प्रसिद्ध झाले. त्यांपासून स्फूर्ती घेऊन शाहिरी वाङ्‌मयाच्या संशोधनाचे कार्य शं. तु. शाळिग्राम यांनी हाती घेतले. गोंधळ्यांकडून पोवाडे मिळवून त्यांतील काही निवडक, पुस्तकरूपाने त्यांनी १८७९ साली प्रसिद्ध केले (थोर पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे – पूर्वार्ध). त्यांना नंतर जोड मिळाली ऑक्कर्थ या इंग्रज विद्वानाची. या दोघांनी मिळून पोवाड्यांच्या संशोधनाचे कार्य केले.

१८९१ साली त्या दोघांच्या नावे पोवाड्यांचा एक नवीन संग्रह निघाला (इतिहासप्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे). त्यानंतर गोविंद बल्लाळ शितूत ह्यांनीही जुन्या इतिहासाची विश्वसनीय साधने मिळविण्याच्या दृष्टीने पोवाड्यांचा संग्रह सुरू केला. शाळिग्रामांनी रामजोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, परशराम यांच्या लावण्या- पोवाड्यांचे संग्रहही यथावकाश प्रसिद्ध केले. हे प्रयत्‍न प्रशंसनीय होते; पण तितकेसे व्यवस्थीत नव्हते. शाळिग्रामांच्या संग्रहात संपादनाच्या, मोडी वाचनाच्या, गोंधळ्यांच्या तोंडून पोवाडा ऐकताना उतरून घेण्याच्या, अशा अनेक चुका आहेत; पण त्यांनी या बाबतीत घेतलेले परिश्रम मात्र मोलाचे आहेत.

जनार्दन बाळाजी मोडक यांनी काव्यसंग्रह हे मासिक १८९० मध्ये काढले. पुढे वामन दाजी ओक हे ह्या मासिकाचे संपादक झाले. त्यातून प्राचीन कवींच्या पुष्कळच कविता त्यांनी प्रसिद्ध केल्या. वामनपंडितांची यथार्थदीपिका, मुक्तेश्वराच्या महाभारताची काही पर्वे, मोरोपंतांची कविता, विविध कवींची स्फुट पद्यरूप कविता, विठ्ठल  कवीची कविता इ. कितीतरी प्राचीन कविता त्यांनी प्रसिद्ध तर केलीच; पण हे करीत असताना विवेचक प्रस्तावना लिहून, तळटीपांमध्ये निरनिराळे पाठ देऊन त्यांनी प्राचीन कवितेचे पाठशुद्ध व यथार्थ दर्शन घडविण्याचा प्रयत्‍न केला. त्यांचा हा प्रयत्‍न संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता. हा आणि अशा प्रकारचे अन्य प्रयत्‍न महत्त्वाचे होतेच; परंतु त्यांत संशोधनापेक्षा संकलनच अधिक होते. प्राचीन काव्याची हस्तलिखिते मिळवून ती प्रकाशित करणे, त्यांवर चरित्रविषयक व अर्थनिर्णायक टीपा देणे, क्वचित पाठभेद हेच कार्य या काळात अधिक झाले.

वि. का. राजवाडे ‘इतिहासाचार्य’ म्हणून ओळखले जातात व त्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने त्यांनी २२ खंड प्रसिद्ध केले आणि त्यांतील काहींना त्यांनी विस्तृत व चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या. या संदर्भातच त्यांनी ऐतिहासिक मूल्य या दृष्टीने बखरींचे मूल्यमापन केले व त्यातून स्थल, काल, व्यक्ती, प्रसंग व कारणविपर्यास हे पंचविध विपर्यास कसे दिसून येतात, ते सप्रमाण सिद्ध केले.आपली चिकित्सक दृष्टी त्यांनी साहित्याकडेही वळविली. त्या दृष्टीने एकनाथपूर्वकालीन ज्ञानेश्वरीचे संशोधन व संपादन (१९०९) हे त्यांचे महत्त्वाचे कार्य.

राजवाडे ह्यांच्या हाती आलेल्या ज्ञानेश्वरीच्या पोथीतील भाषेचे स्वरूप, शब्दसंहिता व व्याकरण या  सर्वाच्या आधारे, ही पोथी एकनाथपूर्वकालीन असून प्राचीनतेच्या दृष्टीने ज्ञानेश्वरकाळाच्या ती अधिकात अधिक जवळ असावी, असा सिद्धांत त्यांनी प्रस्थापित केला. त्यांच्या संशोधित ज्ञानेश्वरीची (ज्ञानदेवीची) प्रत भाषेच्या दृष्टीने आजही प्रमाण मानली जाते. याशिवाय राधामाधवविलासचंपू व महिकावतीची बखर यांचे संपादन (१९२२ , १९२४) व त्यांना लिहिलेल्या चिकित्सा प्रस्तावना त्यांच्या संशोधनदृष्टीची साक्ष देतात. १९१० मध्ये महानुभवांची संकेत लिपी स्वतंत्रपणे उलगडून महानुभाव  वाङ्‌मयाचे दालन त्यांनी संशोधनासाठी खुले केले.

महानुभाव पंथ व त्यांचे वाङ्‌मय यांबद्दलची माहिती मिळवून ती प्रकाशित करणे, संकेत लिपीमध्ये असलेल्या ग्रंथांचे रूपांतर करून ती प्रसिद्ध करणे या कार्याला जोमाने सुरूवात झाली. वि. ल. भावे यांनी महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत महानुभाव पंथ –साहित्याचा परिचय करून दिला. याच आवृत्तीत त्यांनी महानुभाव पंथाच्या सकळी, सुंदरी व पारमांडिल्य यांसारख्या लिपींचा उलगडाही करून दाखविला. १९२४ मध्ये त्यांनी महानुभव – महाराष्ट्र – ग्रंथावली, कविकाव्य सूची व वच्छहरण ही प्रकरणे संपादून प्रसिद्ध केली. शिशुपालवध हे भास्करभट्ट बोरीकरांचे, वि, ल, भावे ह्यांनी संपादिलेले काव्य १९२६ मध्ये प्रसिद्ध झाले. या सर्व कार्यात त्यांना दत्तराज महंत आणि हरिराज बाबा महंत या महानुभावीय महंतांचे खूपच साहाय्य झाले. वि. ल. भावे यांचे महाराष्ट्रात हे कार्य चालू असताना विदर्भात य. खु. देशपांडे यांचेही या संशोधनाकडे लक्ष वळले होते.

महानुभावीयमराठी वाङ्‌मय (१९२५) हा महानुभवांच्या वाङ्‌मयाचा इतिहास देणारा संशोधनपर ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. तसेच त्यांनी यवतमाळ येथे ‘शारदाश्रम’ नावाची स्वतंत्र संशोधनसंस्था स्थापन केली (१९२६). त्या संस्थेतर्फे त्यांनी पंडित नारायण व्यास बहाळियेकृत श्रीऋद्विपूरवर्णन हा महानुभवांचा काव्यग्रंथ प्रकाशित केला (१९२९). १९३६ मध्ये श्रीचक्रपाणीचरित्र या नावाचा महानुभाव गद्यग्रंथ शारदाश्रम मालेत त्यांनी प्रकाशित केला. याशिवाय महानुभाव वाङ्‌मयावर त्यांनी अनेक स्फुट लेख लिहिले. य. खु. देशपांडे यांच्याबरोबरच शारदाश्रमाचे दुसरे आधारस्तंभ वामन नारायण देशपांडे यांनी आद्य मराठी कवयित्री हे महदंबेवरील पुस्तक प्रसिद्ध केले (१९३५). याशिवाय स्मृतिस्थळ हा महानुभाव चरित्रग्रंथही संपादिला (१९३९). नागपूर आणि अमरावती येथेही संशोधनकेंद्रे स्थापन झाली होती. नागपूरचे संशोधक हरि नारायण नेने ह्यांनी नीलकंठ बलवंत भवाळकर ह्यांच्या साहाय्याने श्रीचक्रधर – सिद्धांतसूत्रे

भाग पहिला – लक्ष्मणान्वय सूत्रपाठ (१९३१), दृष्टांत – पाठ (१९३७) हे ग्रंथ प्रकाशित केले. यांशिवाय ह. ना. नेने ह्यांनी लीळाचरित्राचे संपादन केले. ह्या उल्लेखनीय संपादनांखेरीज महानुभाव वाङ्‌मयावर संशोधनरप स्फुट लेखनही त्यांनी पुष्कळच केले.

महानुभाव वाङ्‌मयाच्या संशोधनात सर्वात मोठा वाटा आहे

  1. विष्णु भिकाजी कोलते यांचा. भास्करभट्ट बोरीकर चरित्र व काव्यविवेचन (१९३५),
  2. महानुभाव तत्त्वज्ञान (१९४५)
  3. महानुभावांचा आचारधर्म (१९४८),
  4. श्रीचक्रधरचरित्र (१९५२)
  5. महानुभाव संशोधन (१९६२)

हे त्यांचे ग्रंथ व्यासंगपूर्व आणि चिकित्सक संशोधनदृष्टीची साक्ष देणारे आहेत. भास्करभट्ट बोरीकरकृत उद्धवगीता (१९३५) आणि शिशुपालवध ( १९६०), मुनीव्यासकृत स्थानपोथी (१९५०), म्हाइंभटकृत गोविंदप्रभुचरित्र (१९४४), आणि रवळो व्यासाचे सह्याद्रिवर्णन (१९६४) हे त्यांनी संपादित केलेले काही महानुभाव ग्रंथ होत. ग्रंथांना जोडलेल्या प्रस्तावनांतून त्या त्या कवीच्या कालाचा, चरित्राचा, भाषाशैलीचा व त्या काव्यातील वादग्रस्त प्रश्नांचा अत्यंत विद्वत्तापूर्ण रीतीने ऊहापोह केला आहे. अगदी अलीकडेच त्यांनी लीळाचरित्राची हा महानुभावांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ अनेक पोथ्या व हस्तलिखिते यांचा आधार घेऊन संपादिला आहे  (१९८२). लीळाचरित्राची ही पाठशुद्ध संशोधित आवृत्ती हा त्यांचा संशोधनकार्याचा कळस मानावा लागेल.

यांशिवाय महानुभाव पंथाच्या संशोधनात अनेक विद्वानांनी रस घेतला. डॉ. सुरेश डोळके यांनी नरेंद्राच्या रूक्मिणी- स्वयंवराची संपूर्ण प्रत उपलब्ध करून देऊन एक वादळ निर्माण केले (१९७१). डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी लीळाचरित्राचे साक्षेपपूर्वक संपादन केले व महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्‌मय हा ग्रंथही लिहिला (१९७६). याशिवाय दत्तराज महंत, गोपीराज महंत, यक्षदेव महंत इ. अनेक महानुभाव पंथीय महंतांनी महानुभाव वाङ्‌मयाच्या संशोधनाला प्रत्याक्षा – प्रत्यक्ष साहाय्य केले.

ग्रंथसंशोधनाला अधिक शास्त्रशुद्ध स्वरूप विसाव्या शतकात विशेष प्रापत झाले. जुन्यातील जुनी हस्तलिखिते व पोथ्या मिळवून त्या हस्तलिखितांच्या आधारे पाठशुद्ध प्रत तयार करण्याचे संशोधनशास्त्र अवगत झाल्यामुळे अनेक विद्वानांनी अशा जुन्या काव्याच्या पाठशुद्ध प्रती संपादित करून प्रसिद्ध केल्या. या क्षेत्रात संस्कृत ग्रंथांचे अशा पद्धतीने संपादन करण्याचे कार्य भांडारकर प्राच्यविद्यासंशोधनमंदिर, डेक्कन कॉलेज या संस्थामधून चाललेच होते. मराठी संशोधन – क्षेत्रातही भारत इतिहाससंशोधक मंडळ (पुणे), राजवाडे संशोधन मंदिर (धुळे), शारदाश्रम (यवतमाळ), विदर्भ संशोधन मंडळ, (नागपूर) समर्थ वाग्देवता मंदिर (धुळे), मराठी संशोधन मंडळ (मुंबई) इ. संस्थांनी प्राचीन हस्तलिखित मिळवून त्यांची वर्गवारी लावणे, त्यांची जोपासना करणे, त्या हस्तलिखितांच्या आधारे अनेक पाठभेद विचारात घेऊन त्यांची पाठशुद्ध प्रत तयार करणे व ती प्रसिद्ध करणे असे मोलाचे काम केले आहे. या कार्याला नंतर महाराष्ट्रातील वेगवेगळी विद्यापीठे व साहित्यसंस्था यांनीही हातभार लावला. यांशिवाय व्यक्तिगत प्रयत्‍न चालले होते ते वेगळेच.

महानुभावीय वाङ्‌मयाची जुन्यात जुनी हस्तलिखिते मिळणे शक्य होते. कारण ती पंथीयांनी संकेतलिपीत बद्ध करून जतन केली होती. जुन्या संतकवींच्या बाबतींत हे शक्य नव्हते. त्यांच्या ग्रंथांची अथवा अभंगांच्या गाथांची भाषादृष्ट्या व अनेकदा आशयदृष्ट्या स्थित्यंतरे होत होती. त्यामुळे ज्ञानेश्वर- नामदेवकालीन हस्तलिखिते उपलब्ध होणे कठीण झाले. सोळाव्या शतकानंतरची हस्तलिखिते उपलब्ध होतात. तत्पूर्वींची हस्तलिखित दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे या काळातील संशोधकांना प्राचीन वाङ्‌मय प्रकाशित करण्याच्या बाबतीत अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. प्राचीन कवींच्या जन्मस्थळांबद्दल आणि जन्मशकांबद्दल अनेक वाद निर्माण झाले व त्याची निर्णायक उत्तरे देणेही पण अवघड होऊन बसले. उपलब्ध होणारी सर्व हस्तलिखिते जमवावयाची, त्यांतून जुन्यात जुनी संहिता निश्चित करावयाची, इतर हस्तलिखितांच्या आधारे पाठभेद निश्चित करावयाचे, हेच एक कार्य या संशोधकांपुढे मुख्य होते. या कार्यात महत्त्वाचा वाटा अनेकांनी उचलला.

कृ. पां. कुलकर्णी यांनी मुकुंदराजाचा विवेकसिंधु हा ग्रंथ संपादित केला (१९५७) आणि मुकुंदराजाच्या स्थलकाबद्दल चर्चाकेली. याशिवाय बंकटस्वामी, साखरेबुवा, बाळकृष्ण अनंत भिडे, शं. वा. दांडेकर, केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये अशा अनेकांनी ज्ञानेश्वरीची संहिता मिळवून पाठशुद्ध प्रत काढण्याचा प्रयत्‍न केला; पण त्यांच्या प्रयत्‍नांत शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीपेक्षा पारंपारिक – सांप्रदायिक दृष्टीच अधिक दिसून येते. १९४७ मध्ये रा. ग. हर्षे संपादित ज्ञानेदेवीच्या चिकित्सक आणि भाषाशास्त्रीय आवृत्तीचा पहिला अध्याय प्रसिद्ध झाला. त्यानंतर श्री. ना. बनहट्टी ह्यांनी अनेक हस्तलिखितांच्या साहाय्याने ज्ञानदेवीची पाठशुद्ध संहिता निष्पन्न करण्याचे कार्य आरंभिले. विविध हस्तलिखित पोथ्या मिळवून व त्यांचे नीट अवलोकन करून त्यांनी प्रथम बारावा अध्याय १९६७ साली प्रकाशित केला; त्याला प्रदीर्घ प्रस्तावनेची जोड दिली.

त्यानंतर आणखी एकदोन अध्याय झाले; पण त्यांच्या मृत्यूमुळे ते काम बंद पडले. ज्ञानदेवीच्या मूळ संहितेच्या शोधप्रयत्‍नात तिची ओवीसंख्या चर्चाविषय झाला. ज्ञानेश्वरीची ओवीसंख्या (१९५६) या ग्रथांत वि. मो. केळकर यांनी संदर्भ, अर्थ, रचना व भाषा या निकषांवर विवाद्य ओळ्यांबाबत निर्णय ओवीसंख्या निश्चित करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांनी व अरविंद मंगरूळकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायांत संशोधनाची एक नवी दृष्टी दिसते. द. सी. पंगू यांच्या संपादनात शास्त्रशुद्ध दृष्टी बऱ्याच प्रमाणात आढळते. ज्ञानेश्वरीचे सुटे अध्याय पुष्कळांनी संपादित केले, पण त्यांत संशोधनाची दृष्टी फार थोड्या प्रमाणात दिसून येते.

संतांच्या अभंगगाथा सिद्ध करणे हाही संशोधनक्षेत्रातील एक उपक्रम. ह्यात प्रक्षिप्त अभंग विपुल येत असल्याने प्रमाणगाथा सिद्ध करणे कठीण. तथापि असे प्रयत्‍न साखरे महाराज, वि. न. जोग. प्र. न. जोशी आदींनी केले. त्यात पुन्हा संशोधनापेक्षा सांप्रदायिक दृष्टीच अधिक आली. वि. ल. भावे यांनी ‘तुकाराम महाराजांची अस्सल गाथा’ म्हणून त्यांना मिळालेल्या जगनाडे या टाळकऱ्याच्या हस्तलिखितावरून तुकाराममांच्या काही अभंगांचे प्रकाशन केले; पण ते फारसे मान्य झाले नाही. त्यानंतर तुकारामांची गाथा संशोधित करण्याचे बरेच कार्य पु. मं. लाड यांनी केले. महाराष्ट्र सरकारने ही गाथा प्रसिद्ध केली (१९५०).  वा. सी. बेंद्रे यांनी तुकाराम महाराज कृत ...मंत्रगीता १९५० साली प्रकाशित करून तुकारामांचा गीतेचा व्यासंग किती होता याबद्दल आपला सिद्धांत मांडला.

सोळाव्या शतकानंतरची हस्तलिखिते उपलब्ध असल्याने त्यानंतरच्या पंडितकवींच्या किंवा संतकवींच्या काव्याच्या संपादनाच्या वा प्रकाशनाच्या कामी फारशा अडचणी नव्हत्या; परंतु या काळातील एकेका ग्रंथांची अनेक हस्तलिखिते उपलब्ध होत असल्याने याही काव्याच्या बाबतींत संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यात  अनंत काकबा प्रियोळकर यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी रघुनाथ पंडिताचे दमयंतीस्वयंवर ( १९३५) व मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व यांचे संपादन केले (खंड १ ते ४; १९५१ , १९५३, १९५६ आणि १९५९).  ल. रा. पांगारकर यांनी मोरोपंती वेचे (१९०५) प्रसिद्ध केले. तसेच श्रीसमर्थ ग्रंथमांडार (१९२७) आणि समर्थाचा श्रीदासबोध संपादिला (१९३१). रामदासांच्या ग्रंथांच्या संपादनात महत्त्वाचा हातभार लावला शं. श्री. देव यांनी.

धुळ्यांला श्रीसमर्थ वाग्देवतामंदिराची स्थापना करून त्यांनी समर्थाच्या ग्रंथांची, समर्थ संप्रदायातील कवींची व इतरही अनेक कवींची हस्तलिखिते मोठ्या काळजीने जपून ठेवली व मोठ्या साक्षेपाने त्यांनी समर्थ रामदासांचे साहित्य संपादित करून प्रसिद्ध केले. शाहिरी वाङ्‌मयाच्या संशोधनालाही एक नवी अशी प्रेरणा मिळाली. यशवंत नरसिंह केळकर यांनी ऐतिहासिक पोवाड्यांचे खंड संपादित केले (१९२८ , १९४४, १९६९). ते करताना शाळिग्राम किंवा इतर संशोधक यांच्या संपादनात पाठभेदामुळे न मोडी लिपीच्या सदोष वाचनामुळे जे दोष राहिले होते, ते त्यांनी दुरुस्त केले. अनुपलब्ध लावण्या मिळवून अंधारातील लावण्या (१९६५) या नावाने त्यांनी अनेक शाहीरांच्या प्रकाशात न आलेल्या लावण्या संपादित करून प्रसिद्ध केल्या. याशिवाय ख्रिस्ती साहित्याच्या संशोधनाचे कार्य अ. का. प्रियोळकर (सांतु आंतोनीची जीवित्वकथा, १९५४, दौत्रिन क्रिस्तां – १९६५), स. गं. मालशे (क्रिस्तपुराणा वरील प्रबंध) , वि. बा. प्रभुदेसाई (सतराव्या शतकांतील गोमंतकी बोली, १९६३) यांनी मोठ्या साक्षेपाने केले.

संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रबंधात्मक लेखनही पुष्कळ झाले. पण त्यातील पुष्कळसे समीक्षाणात्मक होते. काही आढाव्याच्या व वाङ्‌मयेतिहासाच्या स्वरूपाचे होते, तर काही विशिष्ट वाङ्‌मयीन प्रवृत्तींचा व प्रवाहांचा शोध घेणारे होते. मराठी वाङ्‌मयेतिहास लिहिण्याच्या प्रयत्‍नांत संशोधनापेक्षा संकलनाचा व रसग्रहणाचा भाग अधिक होता. तत्कालीन जीवनाच्या व साहित्याच्या परस्परसंबंधांतून वाड्‍मयाच्या अन्त:प्रवाहाचा शोध लावण्याचा प्रयत्‍न फार थोड्यांनी केला. किंबहुना असा प्रयत्‍न झालाच नाही, असे विधान केले तर फारसे चुकणार नाही. वाङ्‌मयेतिहासाच्या प्रयत्‍नात महाराष्ट्र सारस्वतकार  वि. ल. भावे यांचे नाव सर्वप्रथम येते. प्रतिकूल परिस्थितीत आणि साधनसामग्री फारशी उपलब्ध नसताना त्यांनी वाङ्‌मयेतिहास लिहिण्याचा केलेला प्रयत्‍न नि:संशय कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र सारस्वतमध्ये १८१८ पर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास आला आहे. ल. रा. पांगारकर यांनी मराठी वाडंमयाच्या इतिहासाचे तीन खंड लिहिले; पण त्यांच्या लेखनात कोणतीही शास्त्रीय पद्धती नव्हती. त्यांना आवडलेल्या कवींच्या कार्याचाच त्यांत प्रामुख्याने परामर्श आढळेल.

त्यामुळे पहिला खंड ‘ज्ञानेश्वर-नामदेवां’चा दुसरा एकनाथ-तुकारामांचा व तिसरा ‘रामदासां’चा अशीच फक्त विभागणी झाली आहे. या कवीव्यतिरिक्त इतर कवींची फारच त्रोटक माहिती त्यांत आहे आणि रामदासांच्या पुढे ते गेलेच नाहीत. मूल्यमापनापेक्षा रसग्रहणाची दृष्टीच या वाङ्‌मयेतिहासात त्यांनी अवलंबिली आहे. त्यानंतर प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास लिहिण्याचे जे जे प्रयत्‍न झाले ते सामान्यत: अपुरे तरी राहिले किंवा विशिष्ट काळापुरते वा प्रवाहापुरते मर्यादित राहिले. बाळकृष्ण अनंत भिडे यांचा प्रयत्‍न असाच अपुरा राहिला. शाहिरी वाङ्‌मयाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्‍न श्री. म. वर्दे यांनी केला ( मराठी कवितेचा उप:काल किंवा मराठी शाहीर ). त्यानंतर शाहिरी वाङ्‌मयावर य. न. केळकर, म. ना. सहस्त्रबुद्धे ( मराठी शाहिरी षाड्‍मय, १९६१ ), वि. कृ. जोशी ( लोकनाट्याची परंपरा, १९६१ ) यांनीही लिहिले.

संशोधनाचा भाग काही प्रमाणात तिघांच्याही ग्रंथांतून दिसत असला, तरी विवेचन रसग्रहणात्मक अधिक आहे. प्राचीन मराठी साहित्यातील एकेका कवीवर व त्याच्या काव्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. ते सारेच संशोधनात्मक नव्हते. त्या त्या कवीच्या काव्याचा परिचय व त्याच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन असेच या ग्रंथांचे स्वरूप असे. तो कवी संतकवी असेल, तर त्याच्या काव्यातील तत्त्वज्ञानमीमांसा व चिकित्सा अशा ग्रंथांतून येई. ल. रा. पांगारकर,  ज. र. आजगावकर, न. र.फाटक, शं. दा. पेंडसे ह्यांसारख्या अनेकांची नावे या संदर्भात घेता येतील. संतकवी किंवा पंडित कवी यांच्या चरित्रांचे संशोधन करताना अनेक वादही निर्माण झाले. मुकुंदराजांचा काल व त्यांचे समाधिस्थळ, ज्ञानेश्वर एक की दोन, नामदेवांचे व वामनपंडितांचे अनेकत्व, मुक्तेश्वराचा शोध, दमयंतीस्वयंवराचा कर्ता रघुनाथपंडित कोणता, असे अनेक प्रश्न संतकवींच्या व पंडित कवींच्या चरित्रांच्या संदर्भात निर्माण झाले.

अव्वल इंग्रजी काळापासून वाङ्‌मयाच्या प्रवृत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्‍नही अनेक संशोधकांनी व समीक्षकांनी केला. चिपळूणकरपूर्वकालीन वाङ्‌मयाच्या प्रवृत्ती सांगण्याचे कार्य दत्तो वामन पोतदार व गं. बा. सरदार यांनी अनुक्रमे मराठी गद्याचा इंग्रजी अवतार ( १९२२ ) व अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका ...( १९३७ ) या पुस्तकांतून केले. इंदूरचे वि. सी. सरवटे यांचा मराठी साहित्य समालोचन ...( ४ खंड १९३७ – ७१ ) हा ग्रंथ परिचयात्मक म्हणून उल्लेखनीय आहे. यांशिवाय आधुनिक मराठी काव्याचा आढावा घेऊन त्यातील प्रवृत्ती व प्रेरणा शोधण्याचे कार्य रा. श्री. जोग ( अर्वाचीन मराठी काव्य : केशवसुत आणि नंतर – १९४६ ) व भ. श्री. पंडित ( आधुनिक कवितेचे प्रणेते – १९७५ ) यांनी केले. मराठी कादंबरीचा चिकित्सक आढावा कुसुमावती देशपांडे यांनी घेतला ( मराठी कादंबरी : पहिले शतक, २ भाग, १९५३; १९५४ ).

नरहर कुरुंदकर यांचेही या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. ( धार आणि काठ ). वाड्‍मयप्रकारांचा असा समालोचनात्मक परामर्श अनेक विद्वान साहित्यिकांनी घेतला. या सर्व प्रयत्‍नांत संशोधनापेक्षा समालोचन व समीक्षणच अधिक होते. त्यात मूल्यमापनाचाही प्रयत्‍न होता. प्राचीन आणि अर्वाचीन मराठी वाङ्‌मयाचे स्वरूप स्पष्ट करण्याचे आणि त्याचे यथार्थ मूल्यमापन करण्याचे वाङ्‌मयसंशोधकांचे प्रयत्‍न निश्चित मोलाचे आहेत. श्री. ना. बनहट्टी, वि. पां. दांडेकर, र. वि. हेरवाडकर, शं. गो. तुळपुळे, गं. दे. खानोलकर, अ. म. जोशी, वा. ल. कुळकर्णी, ल. ग. जोग, व. दि. कुलकर्णी इ. अनेक विद्वानांची नावे या संदर्भात विशेषत्वाने घेण्यासारखी आहेत. त्यांचे संशोधन समालोचनाच्या व समीक्षणाच्या पातळीवरील होते. मराठी साहित्यातील प्रेरणा व प्रवृत्ती यांचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न होता आणि त्या मर्यादेत त्यांची कामगिरी उल्लेखनीय वाटते.

स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा, शिवाजी व एस्‍. एन्‍. डी. टी. या सर्वच विद्यापीठांतून संशोधनकार्याला चालना मिळाली. पीएच्‍. डी. पदवीच्या निमित्ताने वेगवेगळ्या दिशेने संशोधन होऊ लागले. याशिवाय अनेक विद्वानांनी संशोधनाकडे आपली दृष्टी वळविली. या संशोधनाचे क्षेत्र केवळ पाठचिकित्सा करून संशोधित आवृत्ती काढण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. संशोधनाला वेगवेगळे फाटे फुटले. मराठीत प्रगत होत चाललेल्या समीक्षशास्त्राच्या साहाय्याने मराठी साहित्याचा वेगवेगळ्या अंगांनी शोध घेण्याचा प्रयत्‍न सुरू झाला आणि केवळ साहित्यापुरतेच हे क्षेत्र मर्यादित राहिले नाही. देव –देवता, लोकसाहित्य, महाराष्ट्रीतील वेगवेगळे संप्रदाय आणि त्यामधील तत्वप्रणाली, मराठीतील शिलालेख अशा अनेक विषयांकडे संशोधकांचे लक्ष वळले. पीएच्‍. डी. च्या निमित्ताने प्रबंधलेखनाला शिस्त येण्यासाठी त्याची मार्गदर्शक तत्वे चर्चलि गेली (स. गं. मालशे, शोधनिबंधाची लेखनपद्धती ९ १९७५), दु. का. संत. संशोधन : पद्धती, प्रक्रिया, अतरंग (१९६६) व शोध विज्ञान कोश.

रा. चिं. ढेरे हे मराठीतील संशोधनाच्या संदर्भातील महत्त्त्वपूर्ण नाव. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासापासून ते लोकसाहित्यापर्यत सर्व क्षेत्रांत त्याची शोधप्रतिमा सहजतेने विहार करते आणि त्यातून नवे नवे पैलू शोधण्याचा प्रयत्‍न करते. वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या बहुश्रुततेची, त्यांच्या चिकित्सक दृष्टीची साक्ष पटविते. संपादन हे त्याचे एक अंग.

प्राचीन मराठी साहित्यकृतीची विपुल संपादने त्यांनी केली आहेत.

  1. श्रीकृष्णचरित्र (१९७३)
  2. महिकावतीची बखर ( १९७३)
  3. नरेंद्राचे रूक्मिणीस्वयंवर (१९६५)
  4. शिवदिग्विजय ( १९७५ )
  5. समुद्रास्वयंवर ( १९६७ )
  6. मुरारिमल्लाची बालक्रीडा (१९७७)

ही त्यांतील काही प्रमुख. ही संपादने विविध वाङ्‌मयप्रकारांतील आहेत व विवेचक प्रस्तावना, प्रमाणसंहिता व स्पष्टीकरणात्मक टीपा यांनी ती संपन्न आहेत. विविधा (१९६७), गंगाजली ( १९७२), शोधशिल्प (१९७७) यांतून त्यांचे अनेक स्फुट शोधनिबंध आले आहेत. या शोधनिबंधांतील प्रत्येक निबंध काही तरी नवा दृष्टी देणारा आहे.

त्यांच्या काही ग्रंथांतून संतचरित्रांचा वेध घेण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला आहे. त्यांतूनही काही तरी नवी दृष्टी ते देतात. त्यामुळे हे चरित्रग्रंथ केवळ परिचयात्मक राहात नाहीत. मराठी वाङ्‌मयाला प्रेरक ठरणाऱ्या व महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण करणाऱ्या वेगवेगळ्या संप्रदायांचा अर्थपूर्ण अभ्यास हाही त्यांच्या संशोधनाचा एक विषय आहे... नाथसंप्रदायाचा इतिहास (१९५९), दत्त संप्रदायाचा इतिहास (१९६४) प्राचीन मराठीच्या नवधारा (१९७२), चक्रपाणी (१९७७), श्री विठ्ठल : एक महासमन्वय (१९८४) हे त्यांपैकी महत्त्वाचे ग्रंथ. त्यांतील चक्रपाणी हा त्यांच्या अभ्यासाचा व संशोधनपद्धतीचा उत्तम नमुना आहे. षट्‍स्थळ या विसोबा खेचरांच्या नवीन उपलब्ध ग्रंथातील गुरूपरंपरेचे निमित्त करून त्यांनी चक्रधरांच्या जीवनावर एक नवा प्रकाशझोत टाकला आहे. चक्रधर – चांगदेव राऊळ व हरिनाथ यांचे एकत्व प्रतिपादताना व षट्‍स्थळामधील गुरूपरंपरेचे संबंध उकलून दाखविताना त्यांनी महानुभवीयांच्या पारंपारिक श्रद्धांना धक्का दिला आहे. आपले निष्कर्ष ते निर्भींडपणे मांडतात, हा त्यांच्या संशोधनाचा एक विशेष.

त्यांनी देवताविषयक केलेले संशोधन तितकेच महत्त्वाचे आहे. खंडोबा (१९६१) रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे (१९६६) महाराष्ट्राचा देव्हारा (१९७८), लज्‍जागौरी (१९७८) हे त्यांपैकी महत्त्वाचे ग्रंथ. त्यांतील लज्‍जागौरी हा त्यांच्या शोधबुद्धीचा उज्‍जवल आविष्कार आहे. उत्खनात सापडलेली कमलशीर्षा योनिमूर्तीची प्रतीकात्मकता स्पष्ट करता करता आदिमातेचे स्वरूप व उपासना यांचा अनेकांगी विचार लज्‍जागौरीत आला आहे. नवजीवन निर्मिणारी भूमी व वंशसातत्य अखंड राखणारी स्त्री यांच्या एकरूपतेच्या जाणिवेत मातृदेवतांचा उगम ते शोधतात.

ढेऱ्‍यांच्या देवतावैज्ञानिक अभ्यासाचा एक धागा धर्मसंप्रदायाच्या शोधाशी बांधलेला आहे, तसा एक धागा लोकसंस्कृतीशी निगडित झाला आहे.

  1. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक (१९६४)
  2. लोकसंस्कृतीची क्षितिजे ( १९७१)
  3. संससाहित्य व लोकसाहित्य : काही अनुबंध (१९७८)

यांमधून लोकसंस्कृतीतून अस्तंगत होऊ घातलेल्या उत्सव-महोत्सवांचा, कथा-कहाण्यांचा, वासुदेव-गोंधळी, भुत्ये-वाघ्या-मुरळी अशा धार्मिक व लोकानुरंजन करणाऱ्या अनेक परंपरांचा त्यांनी अभ्यासपूर्ण परामर्श घेतला आहे. संतसाहित्याने लोकश्रद्धास लोकप्रतीके व लोकमाध्यमे यांचे साहाय्य घेऊन त्यांचे अंतरंग अव्यात्मविचाराने कसे भारून टाकले याचा त्यांनी संतसाहित्य व लोकसाहित्य या ग्रंथांतून केलेला विचार मूलगामी वाटतो.

एखाद्या कवीचा किंवा लेखकाचा, एखाद्या वाङ्‌मयप्रकाराचा, एखाद्या कालखंडाचा संपूर्ण व सूक्ष्म अभ्यास करून त्याबद्दलचे निर्णायक सिद्धान्त मांडण्याचे कार्य अनेक संशोधक हाती घेत आहेत. ‘हरिभाऊ’ पासून ‘मर्ढेकरां’ पर्यंत सर्व महत्त्वाचे लेखक व कवी; त्याचप्रमाणे कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, चरित्र आणि आत्मचरित्रवाङ्‌मय, एकांकिका इ. वाङ्‌मयप्रकार प्रबंधांच्या अभ्यासाचे विषय झाले आहेत.पीएच्‍. डी. करिता केलेले दर्जेदार संशोधन अनेक प्रबंधांतून झालेले आढळते. पण अशा संशोधकांचे कार्य प्रबंधापुरतेच थांबत नाही. ते पुढे चालू असतेच. वि. रा. करंदीकर, स. गं. मालशे, वि. बा. प्रभुदेसाई, म. रा. जोशी, प्र. न. जोशी. भालचंद्र फडके, यू. म. पठाण, निर्मलकुमार फडकुले, वसंत स. जोशी, आनंद यादव, भीमराव कुलकर्णी, द. भि. कुलकर्णी, अ. ना. देशपांडे, सुधीर रसाळ इ. कितीतरी विद्धानांचे संशोधनकार्य प्रबंधलेखनानंतर पुढे चालू आहे आणि संशोधनक्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.

संशोधनाची आवड म्हणून आपापल्या आवडीच्या विषयात संशोधन करणारे अनेक विद्वान संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करताना आढळतात. लोकसाहित्य व लोकवाङ्‌मय यांत अनेकांनी संशोधन करून लोकसाहित्याचे वेगवेगळे पैलू प्रकाशात आणले आहेत. सरोजिनी बाबर यांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतील व वेगवेगळ्या बोलीभाषांतील लोकगीते व लोककथा जमवून त्यांनी त्या संग्रहरूपाने प्रकाशित केल्या आहेत. दुर्गा भागवत यांचा लोकसाहित्याची रूपरेखा (१९५६) हा ग्रंथ लोकसाहित्याच्या अनेक अंगांवर महत्त्वपूर्ण प्रकाश पाडणारा आहे. कमलाबाई देशपांडे, मालतीबाई दांडेकर, नांदापूरकर, प्रभाकर मांडे, वामनराव चोरघडे इ.

अनेक संशोधकांनी लोकसाहित्य जमवून ते प्रकाशात आणण्याचे प्रयत्‍न केले आहेत. लावणीवाङ्‌मयावरील संशोधन व त्यांचे मूल्यमापन म. वा. धोंड (मर्‍हाडी लावणी, १९५६) व गं. ना. मोरजे (मराठी लावणी वाङ्‌मय, १९७४) यांनी चिकित्सापूर्वक केले आहे. कीर्तनसंस्थेचा उगम आणि विकास यांचा मार्मिक शोध यशवंत पाठक यांनी घेतला आहे. संशोधनाचे क्षेत्र अशा अनेक दिशांनी विकसित होत आहे व त्यात नित्य नव्या नव्या प्रकल्पांची भर पडत आहे.ग्रामीण साहित्य व दलित साहित्य हे दोन आजच्या संशोधकांचे नवे विषय झाले आहेत. ह्या बाबतीत स्वंत्रपणे, विद्यापीठीय स्तरावर विशेषत: पीएच्‍. डीच्या प्रबंधांच्या रूपाने – संशोधन केले जात आहे.

‘मराठी रंगभूमी व नाट्यसृष्टी’ हेही संशोधनाचा विषय झाले असले, तरी या विषयासंबंधी हवे तितके शास्त्रशुद्ध संशोधन झालेले दिसत नाही. मराठी रंगभूमी (१९०३) हा आ. वि. कुलकर्णी यांचा ग्रंथ मराठी रंगभूमीच्या सुरूवातीच्या अवस्थेची मीमांसा करणारा आहे; पण तो संशोधनपर आहे असे म्हणता येणार नाही. नाटके आणि नाटककार यांवर समीक्षात्मक ग्रंथरचना अनेकांनी केली. त्यात संशोधनापेक्षा गुणदोषदर्शनाचा भागच अधिक होता. मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङ्‌मय (१९५९) हा ग्रंथ श्री. ना. बनहट्टी यांनी लिहिला. त्यात मात्र रंगभूमीविषयक बरेचसे संशोधन आहे. मराठी नाटकातील तंत्राचा विकास, स्वगते, पौराणिक – सामाजिक – ऐतिहासिक नाटके इ. विषयांचा संशोधनपर, समीक्षणात्मक अभ्यासही काहींनी केला.

मराठी संशोधनाचे स्वरूप हे असे मिश्र आहे. आरंभी केवळ प्राचीन हस्तलिखित मिळवून ती प्रकाशित करण्याइतपतच संशोधनाचे स्वरूप होते. नंतर पाठचिकित्सा सुरू झाली आणि प्राचीन मराठी साहित्याच्या पाठशुद्ध, संशोधित आवृत्त्या काढण्याकडे संशोधकांचे लक्ष वेधले. स्वातंत्र्योत्तर काळात संशोधन व समीक्षा ह्यांचा समन्वय झालेला आढळतो. साहित्यात पाठचिकित्सेइतकेच साहित्यातील अंतरंगाचा, आशयाचा शोध घेण्याला महत्त्व आहे. ह्याची जाणीव संशोधकांना होऊ लागली. साहित्यातील मूल्यांचा, साहित्यातील सामाजिक – राजकीय जाणिवांचा, लेखक-कवी ह्यांच्या व्यक्तिमत्वांचा शोध घेण्याचा विशेष प्रयत्‍न सुरू झाला. किंबहुना साहित्य हा एक अखंड, न संपणारा शोध आहे, ह्याची जाणीव नव्या संशोधकांना होऊ लागली. त्यामुळे संशोधनाच्या कक्षा रूंदावल्या. आज हाच शोध अनेक अंगांनी पुढे चालला आहे आणि नवीन क्षितिजे शोधण्याचा संशोधकांचा प्रयत्‍न चालू आहे.

लेखक: म. ना. अदवंत

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate