অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- समीक्षा

प्राचीन मराठी साहित्यात ‘भटो ग्रंथु निका जाला परिनिवृत्ताजोग नव्हेचि’ यासारखे उद्‌गार आढळतात; त्यांतून काहीएक वाड्मयीन दृष्टी सूचित होते. तथापि आधुनिक मराठी साहित्यसमीक्षा अव्वल इंग्रजीच्या कासखंडात सुरू झाली. अव्वल इंग्रजीच्या काळापासून १९८० – ८४ पर्यतच्या प्रदीर्घ कालखंडात मराठी समीक्षेचा विस्तार झाला आहे. स्थूल मानाने ह्या दीर्घ कालखंडाचे १८१८ ते १८७४; १८७४ ते १९२०; १९२० ते १९४०; १९४० ते १९६० आणि १९६० नंतर असे पाच कालखंड पाडता येतात. १८७४ पूर्वी विविध नियतकालिकांमधून येणाऱ्या पुस्तकपरीक्षणांमधून साहित्यसमीक्षात्मक विचार आढळतात. विविधविज्ञानविस्तार, मराठी ज्ञानप्रसारक अशांसारख्या नियतकालिकांचे कार्य ह्या संदर्भात उल्लेखनीय होय.

ह्या कालखंडातील साहित्यविचारावर प्राचीन संस्कृत साहित्याचा प्रभाव दिसतो. त्याचप्रमाणे वाड्‌मयविषयक पश्चिमी विचारही पुढे येऊ लागलेले दिसतात. गणेशशास्त्री लेलेकृत साहित्यशास्त्र ( १८७२ ), दाजी शिवाजी प्रधान ह्यांचा रसमाधव ( १८६८ ) हे ह्या कालखंडातील ग्रंथ संस्कृत साहित्यविचाराचे प्रतिनिधी होत. दादोबा पांडुरंग तर्खडकर व परशुरामपंततात्या गोडबोले ह्यांनी मोरोपंतांच्या केकावलीकर लिहिलेल्या अनुक्रमे यशोदा पांडुरंगी ( १८६५ ) आणि केकादर्श ( १८६७ ) ह्या टीका जुन्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. दादोबांची टीका पांडित्यप्रचुर आहे; परंतु मोरोपंतांसारखा कवी सामान्य वाचकाला समजावा, असा हेतू परशुरामपंततात्यांचा होता.

महादेव मोरेश्वर कुंटे ह्यांनी आपल्या राजा शिवाजी ह्या काव्याला लिहिलेल्या इंग्रजी प्रस्तावनेतू पश्चिमी साहित्यशास्त्रातील तत्त्वांच्या आधारे काव्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न केला आहे. तसेच ह्या विवेचनात काव्यभिरूची, टीकाप्रकार, महाकाव्याचे स्वरूप, ‘रोमँटिक’ आणि ‘क्लासिकल’ संप्रदाय इ. विषयांचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे. का. बा. मराठे ह्यांच्या नावल व नाटक ह्यांविषयी निबंधात ( १८७२ ) वास्तववादाचा पुरस्कार दिसतो. हे सर्व लेखन ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.

१८७४ – १९२०

ह्या कालखंडात मराठी समीक्षेला भक्कम पाया दिला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी. वाङ्‌मयविषयक तात्विक विचार करणारे निबंध त्यांनी लिहिले. ‘विद्वत्व आणि कवित्व’ हा निबंध त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. ग्रंथटीका कशी केली जावी. ह्याचेही विवेचन त्यांनी केले. पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान असणारे व त्याचे भान ठेवून लेखन करणारे पहिले समीक्षक चिपळूणकर ठरतात. त्यानंतरच्या समीक्षापर लेखनात आगरकरांची त्यांच्या विकारविलसित ...ह्या नाटकासाठी लिहिलेली प्रस्तावना, तसेच ‘कवि, काव्य व काव्यरति’, ‘शेक्सपिअर, भवभूती, कालिदास’ हे निबंध अंतर्भृत होतात. ह्या लेखनामुळे वाङ्‌मयाच्या स्वरूपाचा मानसशास्त्रीय दृष्टीने वेध घेणारे पहिले मराठी समीक्षक म्हणून आगरकरांचा उल्लेख करण्यात येतो.

१८७४ ते १९२० ह्या कालखंडातील समीक्षेच्या संदर्भात आरंभी हरिभाऊ आपटे ह्यांचे नाव प्रामुख्याने द्यावे लागेल. हरिभाऊंनी साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भात नीतिवादी दृष्टीने विचार मांडले. कलावंताचे स्वातंत्र्य नष्ट होता कामा नये; परंतु कलेने आपले नियम आपणच तयार करावेत; मधुर अनुपानातून रसिकांना सत्याचे औषध द्यावे, अशी त्यांची भूमिका होती. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘कादंबरी’ हा लेख लिहून त्या साहित्यप्रकाराचा तात्त्विक परामर्श घेतला. अद्‌भुत व वास्तविक असे कादंबऱ्यांचे दोन प्रकार, अद्‌भुत व काल्पनिक सृष्टी, तिचा सामाजिक जीवनावरील प्रभाव, मराठीतील अद्‌भुत व वास्तविक कादंबऱ्या, कादंबरीरचनेचे मर्म ह्यांसारखे अनेक मुद्दे ह्या लेखात राजवाड्यांनी विवेचिले आहेत. कादंबरी या वाड्‌मयप्रकाराची ही महत्त्वपूर्ण समीक्षा होय. रामदास, मराठी छंद ह्या विषयांवरील राजवाड्यांचे लेखही महत्त्वाचे आहेत. शि. म. परांजप्यांनी ठाकूरसिंगांच्या ‘प्रणयिनीचा मनोभंग’ या चित्रावर लेख लिहिला. संस्कारवादी, रसग्रहणात्मक कलासमीक्षेचा हा प्रारंभ म्हणता येईल. वासुदेव बळवंत पटवर्धन ह्यांनी काव्य आणि काव्योद्‍य ( आवृ. दुसरी, १९२१ ) ह्या आपल्या ग्रंथातून अर्वाचीन कवितेचा पुरस्कार व विवेचन केले.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी वाड्‌मयनिर्मिती बरोबरच वाङ्‌मय विचारही केला. ‘पण लक्ष्यांत कोण घेतो’, ‘संगीत सौभद्र’,  ‘तुलसी रामायण’, ‘मॅक्‌बेथ नाटकाची दोन भाषांतरे’ ‘रागिणी व तिची भावंडे’ असे अनेक परीक्षणात्मक लेख त्यांनी लिहिले मराठी वाङ्‌मयातील विशेष, मराठीतील कथात्मक वाङ्‌मय मराठी वाड्‌मय व स्वालंबन अशा विषयांवरही त्यांनी व्यासंगपूर्ण लेख लिहिले. (कोल्हटकरांचा लेखसंग्रह, १९३२ ). कोल्हटकरांची भूमिका कलावादी होती. त्यांच्या समीक्षालेखनाने मराठी समीक्षेला तात्त्विक बैठक, शास्त्रीयता, पद्धतशीरपणा, वाड्‌मयेतिहासाची दृष्टी, जागरूकता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तोतयाचे बंड या न. चिं. केळकरांच्या नाटकावरील त्यांचे प्रदीर्घ परीक्षण या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांप्रमाणेच न. चिं. केळरकांनी विपुल टीकात्मक लेखन केले आहे. सुभाषित आणि विनोद ( १९०८ ), हास्यविनोदमीमांसा ( १९३७ ) हे त्यांचे ग्रंथ, त्यांनी केलेली भाषणे, अभ्यासलेख आणि ग्रंथपरीक्षणे ह्यांतून त्यांचे वाङ्‌मयविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांनी मांडलेल्या ‘सविकल्प समाधी’ या काव्यानंदाच्या उपपत्तीने काव्यानंद हा ब्रह्मानंदसहोदर असतो हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. खरी सविकल्प समाधी निर्माण करू शकते. ते वाङ्‌मय अशी वाङ्‌मयाची व्याख्या त्यांनी केली. अनेक वाङ्‌मयीन प्रश्र्नांची चर्चा त्यांनी केली.

केळकरांच्या लेखनाने एक वाङ्‌मयीन वातावरण तयार झाले; सर्वसाधारण वाचकाला वाङ्‌मयाची आणि वाङ्‌मयचर्चेची गोडी लागली. ह्या कालखंडातील एक समीक्षक बाळकृष्ण अनंत भिडे ( १८७४ – १९२९ ) ह्यांचाही निर्देश आवश्यक आहे. भिडे ह्यांनी आधुनिक मराठी कवितेवर समीक्षात्मक लेखन केले. मराठी कवितेच्या संदर्भात केशवसुतांनी केली, ती उत्क्रांती; क्रांती नव्हे, असा विचार त्यांनी मांडला होता. ना. म. भिडे ( १८८४ – १९६७ ) ह्यांनीही आधुनिक कवितेवर लिहिले. केशवसुतांची समग्र कविता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांनी केशवसुतांवर लेख लिहून त्यांच्या कवितेचे अंतरंगदृष्ट्या वर्गीकरण केले.ह्या कालखंडात मराठी समीक्षा अधिक विस्तारली. साहित्याचे स्वरूप, प्रयोजन; पारंपारिक व पाश्चात्य साहित्यशास्त्रातील तत्वाविचार ह्यांचा कधी निर्ययात्मक आणि तुलनात्मक पद्धतीने, तर कधी रसग्रहणात्मक भूमिकेवरून ती विचार करू लागली.

१९२० – १९४०

‘कलेकरता कला की जीवनासाठी कला’? हा वाद ह्या कालखंडात प्रभावी ठरला. वि. स. खांडेकर हे जीवनवादाचे खदे पुरस्कर्ते होत, तर ना. सी. फडके हे कलावादाचे. साने गुरूजीनी टॉलस्टॉयच्या ‘कला म्हणजे काय?’ ( मराठी शीर्षकार्थ ) ह्या ग्रंथांचा मराठी अनुवाद करून जीवनवादाची पाठराखणी केली. अर्थात जीवनवाद आणि कलावाद हे परस्परांच्या पूर्ण विरोधात नव्हते. लोकजागृती, लोकशिक्षण हा ललित साहित्याचा आद्य आणि प्रधान हेतू ठरतो काय, ह्या प्रश्नाबाबत खरा वाद होता. न. चिं. केळकर आणि वामन मल्हार हे जीवनवादाचे, तर श्रीपाद कृष्ण हे कलावादाचे पूर्वप्रतिनिधी म्हणता येतील. वामन मल्हार जोशी ह्यांचा विशेष म्हणजे समन्वयवादी दृष्टीकोणातून त्यांना वाङ्‌मयीन प्रश्नांकडे पाहिले. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांची वाङ्‌मयीन दृष्टी मुख्यत: समाजशास्त्रीय होती. आंग्‍लपूर्व महाराष्ट्रातील वाङ्‌मयाभिरूचीचा इतिहास सांगण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ( १९२८ ) ह्या ग्रंथात त्याचा प्रयत्‍न येतो.

ह्या कालखंडातील समीक्षात्मक ग्रंथांत लालजी पेंडसे ह्यांचा साहित्य आणि समाजजीवन ( १९३५ ) या ग्रंथाचा उल्लेख आवश्यक आहे. विशिष्ट भौतिक परिस्थितीत विशिष्ट प्रकारच्या विचारसरणी व कलाकृती निर्माण होत असतात व भौतिक परिस्थितीतील प्रत्येक फरकाला अनुकूल असे कलेचे स्वरूप व तंत्र बनत असते, असा विचार पेंडसे ह्यांनी आपल्या ग्रंथांत मांडलेला आहे. ⇨ रामचंद्र श्रीपाद जोग ( १९०३ – ७७ ) ह्यांचा अभिनव काव्यप्रकाश हा ग्रंथ १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. आपल्या पारंपारिक साहित्यशास्त्रावर योग्य ते संस्कार करून अर्वाचीन वाङ्‌मयाची, विशेषत: काव्याची, समीक्षा करण्याच्या दृष्टीने ते समर्थ करण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. मराठीतील समीक्षेला ह्या ग्रंथाने खोल, व्यापक आणि मजबूत पाया घालून दिला. सौदर्यशोध आणि आनंदबोध ( १९४३ ) आणि काव्यविभ्रम ( १९५१ ) ह्या त्यांच्या ग्रंथाचा उल्लेखही ह्या संदर्भात करायला हवा.

ह्याच कालखंडात काव्यालोचन ( १९३१, द. के. केळकर ), सारस्वतसमीक्षा ( १९३४, य. र. आगाशे ) ह्यांसारखे ग्रंथ लिहिले गेले. के. ना. वाटवे ह्यांचा रसविमर्श हा ग्रंथ १९४२ साली प्रकाशित झालेला असला, तरी त्याचे स्वरूप लक्षात घेता, परामर्शासाठी त्याचा अंतर्भाव ह्याच कालखंडात करणे उचित होईल. संस्कृत साहित्यशास्त्रातील रसव्यवस्थेचा विचार श्रीपाद कृष्णांनी खोलात जाऊन केला होता. न. चिं. केळकरांनीही अलंकार व रस ह्यांचा परस्परसंबंध काय, असा प्रश्न उपस्थित करून त्याची चर्चा केली होती. वाटवे ह्यांनी रसविमर्शात मानसशास्त्राच्या अंगाने रसव्यवस्थेचा विचार करून आधुनिक मराठी साहित्याशी त्याचा संबंध लावण्याचा प्रयत्‍न केला आहे.

१९४० – १९६०

ह्या कालखंडावर बाळ सीताराम मर्ढेकर ह्यांचा प्रभाव विशेषत्वाने पडलेला दिसतो. वाङ्‌मयीन महात्मता ( १९४१ ), सौदर्य आणि साहित्य ( १९५५ ) हे मर्ढेकरांचे समीक्षात्मक ग्रंथ. साहित्य आणि सौंदर्यशास्त्र ह्यांचा संबंध कोणता, कलाकृतीच्या सुसंघटनेच्या संदर्भात लयतत्वांचा विचार किती महत्त्वाचा आहे, काव्यात नवीनता कशामुळे निर्माण होते, वाङ्‌मयीन महात्मता कशात आहे. सौंदर्यवाचक विधानांचे स्वरूप कसे असते, सौंदर्यभावना म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची मर्ढेकरांनी सखोल चर्चा केली. मराठी समीक्षेला मर्ढेकरांनी एक काटेकोर कलाविषयक परिभाषा व दृष्टी दिली. कलाविषयक प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक निश्चित भूमिका मर्ढेकरांकडून मराठी समीक्षेला मिळाली. मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारातील काही उणिवा नंतरच्या मे. पुं. रेगे, प्रभाकर पाध्ये, रा. भा. पाटणकर यांसारख्या समीक्षकांनी दाखवून दिलेल्या आहेत. पु. य. देशपांडे ह्यांनी नवी मूल्ये ( १९४६ ) ह्या आपल्या ग्रंथातून सामयवादी तत्त्वज्ञान व कलावंताची आत्मपरता ह्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्‍न केला आहे.

वामन लक्ष्मण कुळकर्णी

(१९११ - ) ह्यांचे समीक्षात्मक लेखन विपुल असून ललित वाङ्‌मयाची प्रकृती, प्रयोजन, भाषा; आशय आणि अभिव्यक्ती; सुखात्मिक आणि शोकात्मिका हे नाट्यप्रकार; साहित्य आणि इतिहास; नाट्य आणि काव्य अशा अनेकविध विषयांचा परामर्श त्यांनी मुख्यत: रूपवादी भूमिकेत घेतला. त्यांच्या समीक्षालेखनात तात्विक भागाबरोबरच त्याचे उपयोजन म्हणून नवे लेखक, नवे वाङ्‌मयीन प्रवाह यांच्यावाटे नवेपण नेमकेपणाने दाखवून देण्याची रसिक वृत्ती आढळते. लेखक-रसिकांत अधिक सामंजस्य निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या समीक्षेने केले. तात्विक व उपयोजित समीक्षा हे गंगाधर गाडगीळ यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य, खडक आणि पाणी ( १९६० ), साहित्याचे मानदंड ( १९६२ ), पाण्यावरची अक्षरे ( १९७९ ) आणि आजकालचे साहित्यिक ( १९८० ) ह्या त्यांच्या ग्रंथांतील लेखांवरून दिसून येते. मर्ढेकरांच्या सौंदर्यविचाराच्या काही छटा त्यांच्या समीक्षेत दिसतात. गो. वि. करंदीकर ह्यांचे परंपरा आणि नवता ( आवृ. २ री, १९८० ) हे पुस्तकही उल्लेखनीय आहे.

पु. शि. रेग्यांनी आपल्या छांदसीमधून रूपवादी सौंदर्यविचाराची मीमांसा वेगळ्या दृष्टीकोणाने केलेली आहे. कलाकृतीतील आकारिक संघटना आणि लय यांची निर्मिती व प्रक्रिया यांचा ऊहापोह त्यांनी केला आहे आणि हे करताना लेखक व वाचक या दोन्ही बाजू ते विचारात घेतात. परंपरेकडे एका नव्या, ताज्या दृष्टीने पाहणे हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य.

या रूपवादी समीक्षेला प्रतिरोध करणारे ⇨ दिनकर केशव बेडेकर ( १९१० – ७३ ) व कुसुमावती देशपांडे यांचे लेखन आहे.साहित्य : निर्मिती आणि समीक्षा ( १९५४ ), साहित्यविचार ( १९६४ ) या ग्रंथातून बेडेकरांनी साहित्यनिर्मितीच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे. कलावंताचे व्यक्तिमत्व व बाह्य वास्तव ह्यांच्या द्वंद्वात्मक प्रक्रियेतून कलाकृती कशी निर्माण होते. कलाकृतीची समीक्षा करीत असताना सामाजिक शास्त्रांचे साहाय्य कसे आवश्यक ठरते, सौदर्यमूल्ये ही इतिहासनिष्ठ कशी असतात, ह्यांसारख्या बाबींचा परामर्श बेडेकरांनी घेतला आहे.

कुसुमावतीबाई कलेचा विचार व्यक्तिसमाज संबंधाद्वारे करतात. त्यांच्या मते सामान्याला व कलावंताला जी सोंदर्यप्रतीती येते, ती त्यांच्या सांसकृतिक संचितांनी रंगलेली असते. पण सामान्यांची प्रतीती समष्टीमध्ये रूळलेल्या कल्पनांनी मर्यादित असते, तर प्रतिभावंताची सौंदर्यप्रतीती ही ठराविकाला आश्लेषून ज्ञानाच्या पलीकडे जाते. म्हणून मानवी अनुभवाचे क्षितिज विस्तारण्यासाठी या प्रतीतीचा उपयोग होतो. श्रेष्ठ कलेचे हे सामाजिक क्रांतिकार्य पासंग ( आवृ. २ री, १९६१ ) मधील अनेक लेखांतून त्यांनी मांडलेले आहे. त्यांच्या मते मराठी टीकेत विविधता. व्यासंगप्रियता आधिक्याने आली : पण टीकावाङ्‌मय समाजजीवनाजवळ आले नाही. कला आणि जीवन यांच्या संबंधावर दि. के. बेडेकर आणि कुसुमावती देशपांडे ह्यांनी चांगला प्रकाश टाकलेला आहे.

१९६० नंतर

आपल्या सांस्कृतिक जीवनाला १९६० नंतरच्या कालखंडात आणखी एक छेद गेला. या कालखंडात लघुमासिकांची चळवळ, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे तीन प्रवाह अधिक जोरकसपणे पुढे आले.माधव आचवलांचे जास्वंद ( १९७४ ), रसास्वाद...( १९७२ ) इ. टीकालेखन याच काळातले. ही समीक्षा सौंदर्यतत्वाधिष्ठित आस्वादक समीक्षा आहे. कलावंतांचे व्यक्तिमत्त्व, कलाकृतीच्या आविष्काराची समस्या, त्या समस्येच्या सोडवणुकीची पद्धत यांवर ती भर देते.

द. ग. गोडसे यांच्या पोत ( १९६३ ), शक्तिसौष्ठत ( १९७२ )इ. ग्रंथांतून आशयवादी समीक्षा साकार होते. त्यांच्या विवेचनामागे समूहसापेक्षा हे सूत्र आहे. ते जेव्हा आपल्या जीवनविषयक निष्ठांचे विश्लेषण करतात. तेव्हा प्रवृत्त निसर्गाशी संवादी अशा निष्ठा आणि निवृत्त, कृत्रिम संकेतांशी जखडलेल्या निष्ठा असा मुख्य भेद करतात.आशयवादी आणि रूपवादी अशा दोन्ही प्रकारच्या समीक्षेत सौंदर्यसंकल्पनेचा उहापोह कमीअधिक प्रमाणात झालेला आहेच; पण या सौंदर्यसंकल्पनेचे अधिक मूलगामी विवेचन प्रभाकर पाध्ये आणि रा. भा. पाटणकर यांनी केलेले आहे.

प्रभाकर पाध्ये यांच्या मते कलाकृतीत ज्या अनुभवाची प्रतिमात्मक मांडणी असते, तो अनुभव कसदार असला पाहिजे. त्या अनुभवाने आपल्या मनातील चैतन्यशक्तीच्या मूलस्त्रोताला जाग आली पाहिजे. कलेचे हेच अंतिम कार्य आहे. प्रभाकर पाध्ये यांचा सौंदर्यविचार कलेची क्षितिजे ह्या ग्रंथातून व आस्वाद ( १९७७ ) मधील ग्रंथसमीक्षेतून अधिक स्पष्ट झालेला आहे. पाध्ये ह्यांच्या सौंदर्यनुभव ( १९७९ ) ह्या ग्रंथात कलेचे अनुभवपूर्व तत्व, कलात्मक अनुभव, कलेचे प्रयोजन, प्रतिमा, आस्वाद आणि समीक्षा अशा बाबींचा परामर्श त्यांनी सखोलपणे घेतलेला आहे.

कलाव्यवहार हा स्वायत्त आहे आणि कलाव्यवहार हा सर्वसामान्य जीवनव्यवहाराचा एक अविभाज्य भाग आहे, ह्या दोन परस्परविरोधी संकल्पनाव्यूहांचा विचार पाटणकरांनी केला असून त्यांना अनुक्रमे अलौकिकतावाद आणि लौकिकतावाद अशी नावे दिलेली आहेत. दोन ध्रुवांसारखे असणारे हे संकल्पनाव्यूह परस्परविरोधी असले, तरी परपस्परपूरकही आहेत आणि बहुतेक कलांमध्ये ते निदान बीजरूपाने उपस्थित असलेले दिसतात, असे पाटणकरांचे प्रतिपादन आहे ( सौंदर्यमीमांसा , १९७४ ).

सौंदर्य व कलास्वरूप यांविषयी शरच्चंद्र मुक्तिबोधांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मते मानुषता हे तत्व मानल्याने ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण वेगळे व श्रेष्ठकनिष्ठतेचा निकष वेगळा ही आपत्ती येऊ शकत नाही. वाङ्‌मयीन ललितकृतीचे या दृष्टिकोणाच्या आधाराने मूल्यमापन करता येऊ शकते ( सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य ).ह्या कालखंडाच्या आरंभी लघुमासिकांच्या प्रवाह मराठीत अवतरला होता. त्या प्रवाहाचे एक अध्वर्यू अशोक शहाणे ह्यांचा ‘मराठी साहित्यावरील क्ष किरण’ हा लेख, तसेच दिलीप चित्रे ह्यांची ‘आधुनिक कवितेला सात छेद’ ही लेखमाला, हे नव्या दृष्टीकोणाने केलेले टीकालेखन आहे.

ह्या कालखंडात ग्रामीण-दलित अस्मिता जागृत झाली. ग्रामीण साहित्याची भूमिका ज्यांनी कंबीरपणे मांडली, त्यांत आनंद यादव आणि गो. मा. पवार ह्यांची नावे विशेष उल्लेखनीय होत. दलित साहित्य अवतरल्यामुळे कलेची स्वायत्तता आणि सामाजिक बांधिलकी ह्यांच्या संदर्भात जोरदारपणे विचार सुरू झाला. ह्या संदर्भात म. ना. वानखडे, म. भि. चिटणीस, बाबूराव बागूल, गंगाधर पानतावणे इत्यादींचे समीक्षात्मक लेखन महत्त्वपूर्ण ठरले.

स्वातंत्र्योत्तर काळातील समीक्षा केवळ अर्वाचीन साहित्याचा विचार करीत होती असे नाही, तर ती प्राचीन साहित्याचा आणि साहित्यशास्त्राचाही विचार करीत होती. ग. त्र्यं. देशपांडे, र. पं. कंगले ह्यांसारख्या अभ्यासकांनी हा विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे गंगाधर गाडगीळांनी संस्कृत साहित्यातील रसचर्चेला अडगळ मानल्यावर ती रसचर्चा अडगळ कशी नाही, गाडगीळांच्या विवेचनातल्या त्रुटी कोणत्या आहेत, याचे साधार विवेचन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत ( १९७२ ) या ग्रंथात केलेले आहे.

प्राचीन संस्कृत साहित्यातील रसविचार, व्यूहकल्पना इत्यादींचा सखोल विचार गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर, नरहर कुरूदंकर यांनी केला. प्राचीन साहित्याकडे एका वेगळ्या दृष्टीने रा. चिं. ढेरे, गो. म. कुलकर्णी, म. रा. जोशी,  म. वा. धोंड, रा. ग. जाधव, व. दि. कुलकर्णी, ल. ग. जोग, द. भि. कुलकर्णी इत्यादींनी पाहिले. या समीक्षकांच्या लेखनाने प्राचीन साहित्याचे नवे अनुबंध रसिकांसमोर आले.

मर्ढेकरयुगात आणि १९६० नंतरही कवितेचा विचार आधिक्याने झालेला दिसतो. काव्याचे आढावे, कवींचा स्वतंत्रपणे अभ्यास, मार्क्सवादी, रूपवादी दृष्टींनी झालेला काव्य समीक्षा, कवितांची उपयोजित समीक्षा असे तिचे स्वरूप आहे. रसग्रहण – कला आणि स्वरूप ( गो. म. कुलकर्णी, आवृ. २ री, १९७३ ), अंधारयात्रा ( त्र्यं. वि. सरदेशमुख, १९६८ ), कविता फुलते कशी ? ( संपा. वा. रा. ढवळे, व. दि. कुलकर्णी, १९७५ ), दीपस्तंभ ( ल. ग. जोग, १९७१ ) इत्यादींचा या दृष्टीने उल्लेख करावयास हवा.

इतर वाड्‍मयप्रकारांत काही कथा व कथाकार ह्यांच्या संदर्भात विश्लेषणपर असे लेखन झाले आहे. [मरण आणि वेलबुट्टी ( म. द. हातकणंगलेकर ) आणि निळे पाणी (१९८२, रा. ग. जाधव )]. भालचंद्र नेमाडे ह्यांनी कादंबरीवर एक प्रदीर्घ लेख लिहून त्या वाड्‌मयप्रकारची सांगोपांग, मार्मिक चर्चा केली आहे. नरहर कुरूंदकरांचा धार आणि काठ ( १९७१ ) हा ग्रंथही मराठी कादंबरीच्या संदर्भात उल्लेखनीय होय.

आधारभूत पाश्चात्य समीक्षाग्रंथांची काही निर्देशनीय भाषांतरे विवेचने अशी : अँरिस्टॉटलचे काव्यशास्त्र ( आवृ. २ री, १९७८ गो. वि. करंदीकर ). क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य ९ १९७४ ) व कांटची सौंदर्यमीमांसा ( १९७७, रा. भा. पाटणकर ); साहित्य सिद्धान्त, स. गं. मालशे, ( रेने वेलेक आणि ऑस्टिन वॉरनलिखित थिअरी ऑफ लिटरेचरचे भाषांतर ) उपलब्ध झाले ( १९८२ ).

ही नवा समीक्षा कलेचा, तिच्या सारतत्वाचा, अंतिम उद्देशाचा, निर्मितिप्रक्रियेचा अधिक सजगपणे विचार करते आहे. वामन मल्हार जोशी, खांडेकर इ. समीक्षकांपुढे टॉलस्टॉय, कोलरिज, वर्ड्‌स्वर्थ, मॅथ्यू आर्नल्ड इ. आदर्श होते. आजच्या समीक्षकापुढे टी. एस्. एलियट, सार्त्र, काम्यू हे आदर्श आहेत. जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय तात्विक सौंदर्यशास्त्रीय , भाषावैज्ञानिक अशा विविध दृष्टीकोणांमुळे ही समीक्षा कलाविषयक जाणिवा विकसित करणारी ठरली आहे.

समीक्षेच्या विकासास ज्या नियतकालिकांनी विशेष साहाय्य केले त्यांचा निर्देश करणे आवश्यक आहे. विविधज्ञानविस्तार, रत्‍नाकर, अभिरूचि, सत्यकथा, आलोचना, प्रतिष्ठान इ. नियतकालिकांनी समीक्षाविचारास हातभार लावला. युगवाणी, प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाज प्रबोधन पत्रिका, अनुष्टुम, ललित इत्यादीचेही या संदर्भात कार्य उल्लेखनीय आहे. विद्यापीठांतूनही शोधप्रबंध लिहिणारी जी मंडळी बाहेर पडली, त्यांच्या लेखनानेही समीक्षाविचारात काहीएक भर घातलेली आहे. व्यामिश्र, तरल आणि अनेकार्थ व्यक्त करणाऱ्या कलाकृतींचा वेध घेताना मराठी समीक्षा अधिक लवचिक आणि स्वागतशील झालेली आहे. मानव्यविद्या, नैसर्गिक व सामाजिक विज्ञाने यांच्यातील विविध प्रमेयांचा आणि दृष्टिकोणांचा ती लीलया स्वीकार करते आहे. साहित्याने दिलेली आव्हाने नम्रपणे स्वीकारण्याचे सामर्थ्य या समीक्षेत खचितच आहे.

लेखक: पंडित टापरे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate