অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाकाव्य

महाकाव्य

एक काव्यप्रकार, मराठी काव्यविचारातील ‘महाकाव्य’ या संज्ञेत संस्कृत पंचकाव्ये व इंग्रजी ‘एपिक’ या संकल्पनांचा संकर झालेला आढळून येतो. महाभारत आणि रामायण ह्यांचा उल्लेख आता महाकाव्य या संज्ञेने होत असला, तरी पूर्वी त्यांस ‘इतिहास’ म्हणत आणि पुराणांसारख्या इतिवृत्तात्मक वाङ्मयाबरोबर त्यांचा उल्लेख होई. त्यांना चौदाव्या शतकात विश्वनाथाने आर्ष (श्रषिप्रणित) महाकाव्य असे संबोधले. तथापि तोशब्द फारसा रुढ नव्हता. या आर्ष महाकाव्यांपासून भेद दर्शविण्यासाठी पंचमहाकाव्यांस किंवा त्यासारख्या इतर काव्यांस ‘विदग्ध’ महाकाव्य म्हणावे, अशी सूचना के. ना. वाटवे यांनी केली आहे. महाकाव्यांच्या या दोन प्रकारांत काही भेद असले, तरी दोन्ही प्रदीर्घ आणि कथास्वरूपाची असतात साहजिकच ती आजच्या भावगीतात्मक काव्यापेक्षा स्वरुपतः वेगळी आहेत. भावगीतामध्ये आत्माविष्कार आणि स्फुटत्व (लहान, सुटे किंवा अ-निबद्ध) हे दोन विशेष असतात; तर महाकाव्य हे प्रदीर्घ (निबद्ध) व वस्तुनिष्ठ दृष्टीने केलेले कथानिवेदन असते पहिले ‘स्वार्थ’ म्हटले, तर दुसरे ‘परार्थ’ म्हणावे लागेल.

महाकाव्याच्या उपरनिर्दिष्ट दोन प्रकारांकरिता इंग्रजी काव्यचर्चेत सामान्यतः पुढील विशेषणे योजली जातात : ‘आर्ष’ माहाकाव्ये मानवी जीवनाच्या आद्य अवस्थेत निर्माण झालेली असल्याने त्यांना आदिम (प्रिमिटिव्ह); तर विदग्ध माहाकाव्ये समाजाच्या प्रगत सांस्कृतिक जीवनाची द्योतक असल्याने त्यांना सांस्कृतिक महाकाव्ये (एपिक्स ऑफ कल्चर) असे संबोधण्यात येते. आद्य अवस्थेत कृत्रिमता नसल्याने आर्ष महादाव्यांस स्वाभाविक असे स्वरुप लाभलेले असते. तर विदग्ध माहाकाव्ये त्यांच्यापेक्षा पुढील अवस्थेत असल्याने त्यांत बरीच कृत्रिमता आल्याने त्यांना कृत्रिम असेही म्हणता येईल. आर्ष महाकाव्ये इतर कोणत्याही काव्यांवर किंवा कथांवर आधारलेली नसल्याने त्यांना मूळ वा आद्यतन (प्रायमरी) म्हटल्यास, विदग्ध महाकाव्ये या आद्यडरी) म्हणता येईल. आर्ष महाकाव्यांत−उदा., महाभारतात−बहुजनसमजाचे दर्शन होत असल्याने ती सामाजिक म्हटली, तर विदग्ध महाकाव्यांतून बहुधा दरबारी वा खानदानी व्यक्तिजीवन प्रतिबिंबित झाल्याने त्यांना दरबारी वा राजवंशीय म्हणता येईल. आर्ष महाकाव्ये दीर्घकाळ मुखपरंपरेने प्राप्त होत गेल्याने ती मौख्यिक म्हटली, तर दुसरी प्रथमपासून लिखित स्वरुपातच उपलब्ध असल्याने ती लिखित महाकाव्ये ठरतात. आर्ष महाकाव्यांत-निदान महाभारतात तरी वेळोवेळी भर पडत गेल्याने त्यांना क्रमविकासाचे (एपिक्स ऑफ ग्रोथ) स्वरुप येते. विदग्ध महाकाव्ये आरंभापासून पूर्ण लिखित स्वरुपात उपलब्ध असल्याने त्यात नवीन भर पडत नाही. तसेच त्यांत नियमबद्धता आणि आदर्शानुसारित्व असल्याने त्यांना ‘अभिजात’ स्वरूप येते. महाभारतादी काव्ये बरीच लोकरूढ असतात; तर विदग्ध महाकाव्ये ही आलंकारिक काव्यशैलीने युक्त असल्याने प्रायः साहित्यस्वरूप होतात.

महाकाव्याचे महाकाव्यत्व त्याच्या महान आकारमध्ये असतेच, पण त्याचा आशय आणि विषयही तसाच महान असावा लागतो. विशालता आणि भव्योदात्तता हे त्याचे विशेष गुण असतात. महाभारत हे या कसोटीस चांगले उतरते. मानवी जीवनावरील हे एक अत्यंत उद्‌बोधक असे भाष्य आहे.

इंग्रजी साहित्यातील पॅरडाइस लॉस्ट हे महाकाव्य मिल्टनने परमेश्वरी कृतींचे समर्पकत्व मानवाला पटवून देण्याच्या उद्देशाने लिहले. दान्तेने दिव्हीना कोम्मेदीआ (इं. शी. डिव्हाइन कॉमेडी) या इटालियन महाकाव्यातून मानवी आत्म्याची अगदी खालच्या अवस्थेतून वरच्या अवस्थेमध्ये होणारी आध्यात्मिक उन्नती रुपकात्मक पातळीवर चित्रित केली आहे. आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ अरविंद घोष यांनीही आपल्या सावित्री या महाकाव्यात आध्यात्मिक जाणिवेतून मानवी जीवनास लाभणाऱ्या उदात्त्तेचे व दैवी साक्षात्काराचे चित्रण केले आहे.

महाकाव्याची भाषाही त्याच्या आशयाला अनुरूप अशी भारदास्त व प्रौढ असावी, ही अपेक्षा असते. त्यामुळे अनेकदा ती क्लिष्ट होण्याचाही संभव असतो. तथापि भाषा फार सोपी करण्याच्या मागे लागून काव्यरचना केल्यास ते महाकाव्य फसते, ह्याचा प्रत्यय कुटे यांच्या राजा शिवाजी या अयशस्वी महाकाव्याबाबत येतो. तथापि इंग्रजीतील ‘हिरोइक एपिक’ या प्रकारच्या धर्तीवर रचलेले वीरसप्रधान महाकाव्य या दृष्टीने हा आद्य प्रयत्न उल्लेखनीय ठरतो. तद्वतच त्याच्या इंग्रजी प्रस्तावनेतील काव्यविषयक महत्त्वपूर्ण आहे.

महाकाव्यास अभिप्रेत असलेल्या मोठ्या आशयाच्या अपेक्षेतून कित्येक वीर राजपुरुषांची चरित्रे हाही त्याचा विषय ठरतो. रामायणामध्ये तसे झाले आहे. रामायण हे महाभारताइतके मानवी जीवनाचे विशाल चित्र होऊ शकत नाही. राम आणि त्याच्याशी संबद्ध अशा राजकुलातील व्यक्ती यांच्या जीवनापुरतेच ते पर्याप्त आहे. तथापि स्वतः रामाचे एकूण व्यक्तिजीवन हे राजा म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही उदात्त व आदर्श दाखविल्यामुळे रामायण हेही तसेच भव्योदात्त महाकाव्य ठरते. महाभारतापेक्षा त्यात काव्यदृष्ट्या सरस असा भागही बराच आहे. या दृष्टीने ते महाभारत आणि पुढील पंचमहाकाव्ये यांमध्ये मोडते.

संस्कृतमधील रामायण-महाभारतानंतरची द्वितीयावस्थेतील महाकाव्ये ही त्यांतील एखाद्या कथाभागावर आधारलेली आहेत.  किरातार्जुनीय,  शिशुपालवध,  नैषधीय चरित यांचे आधार प्रसिद्ध आहेत.  रघुवंश आणि  कुमारसंभव हीही तशीच म्हणावी लागतील, किंबुहुना त्याआधीच  अश्षघोषाची बुद्धचरित आणि सौंदरनंद ही महाकाव्येही तत्पूर्वीच्या बौद्ध चरित्र कथांवर आधारलेली होती. सर्गात्मक, आलंकारिक महाक्व्य पद्धतीला तेव्हापासूनच प्रारंभ झालेला आहे. तिचा प्रकर्ष मात्र प्रसिद्ध संस्कृत पंचमहाकाव्यांमध्ये झाला.

संस्कृत साहित्यग्रंथांतून जी महाकाव्याची लक्षणे देण्यात आली आहेत, ती बहुधा या पंचमहाकाव्यांवरूनच ठरविण्यात आली असावीत. दंडीने महाकाव्यांची कथा इतिहासकथोद्‌धृत असावी, असे म्हटले आहे. त्याच्या काळापर्यंत महाभारत, रामायण यांना इतिहासच समजत असावेत. नायक देवांपैकी असणेही शक्य आहे. उदा., कुमारसंभवातील शंकर. ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे महाभारत-रामायणातील व्यक्ती आणि देव यांच्याप्रमाणेच नलासारखी थोर व्यक्तीही महाकाव्याचा नायक होऊ शकते. नायक धीरोदात्त असावा एकापेक्षा अधिक व्यक्तीही नायकाचे स्थान घेऊ शकतील. उदा., रघुवंश. नायिका अर्थात नायकानुरूप व सुंदर असते. कारण घेतलेल्या मूळ कथाभागात ती तशी असते.यांशिवाय मुनी, योद्धे, दूत-दूती इ. व्यक्ती मूळ कथाभागत जशा असतील, तशा असतात. त्यांच्या उल्लेखापेक्षा अधिक काही तपशील दिलेला नाही. कथेमधील संघर्षाकरिता खलनायक आवश्यक असतो, खल नसला तरी निदान विरोधक तरी हवा. किरातार्जुनीयात विरोधक शंकर आहे. रघुवंशात रामचरित्रभागात रावण आहेच, पण परशुरामही विरोधक म्हणून काही काळा येतोच. कथाभागत पुत्रजन्म, विवाह, राजकारण-चर्चा (मंत्र), दूतप्रेषण, रणप्रयाण, विप्रलंभ व मीलन, मृगया इत्यादींचे वर्णन येते. वर्णनांमध्ये नगर, अर्णव, ऋतू, पर्वत, नद्या, अरण्ये, सूर्य-चंद्रांचे उदयास्त, उद्यानक्रीडा, जलविहार, मद्यपान, सुरतक्रिडा. मुनिजनांचे आश्रय, यज्ञ, स्वर्ग इ. अनेक विषय येऊ शकतात. या वर्णनांतून आणि एकंदर कथनामधून अलंकारप्रचुरता असते. म्हणून एकंदर महाकाव्यशैली ही प्रौढ व अलंकारप्रचुरता असते. ती रसभावपूर्ण असावी, ही अपेक्षा असते. रसांमध्ये शृंगार-वीर-शांत यांना प्राधान्य असावे आणि इतर रस त्यांना पोषक आणि दुय्यम म्हणून योजण्यात यावे, तद्वतच कथारचना कशी असावी, यांविषयीही सूचना दिलेल्या आहेत. आरंभी देवतेस नमन वा तिच्याकडून आशीर्वाद-याचना असावी; तथापि एकदम कथावस्तूला प्रारंभ केला तरी चालेल. कारण कुमारसंभवात तसे केलेले आहे. कथाभागात त्यातील प्रसंगांनुसार लहान-लहान खंड केलेले असावेत. त्यांना ‘सर्ग’ असे नाव असे. विश्वनाथास महाभारत-रामायणासही (आर्ष) महाकाव्य म्हणावयाचे असल्याने या लहान खंडांस ‘अध्याय’ असे म्हणता येईल. या सर्गातून वेगवेगळ्या अनेक वृत्तांतून रचना केलेली असावी. ते रचनाप्रभुत्वाचे द्योतक होते. तरी का सर्गात अखेरच्या दोनचार श्लोकाशिवाय एकच वृत्त योजिलेले असावे. सर्गसंख्या किमान आठ आणि कमाल तीस (ईशान संहिता) असावी, असे मत होते. किमान आठ ही संख्या कुमारसंभवाचा महाकाव्यात अंतर्भाव करता यावा, म्हणून दिलेली दिसते. कारण ते काव्य मुळात आठच सर्गांचे होते, अशी कल्पना होती. पण एंकदरीत महाकाव्य यापेक्षा मोठे असल्याखेरीज ते ‘महा’ होते, असे वाटत नसावे. कारण इतर काव्ये साधारणपणे वीस सर्गांची होती. सर्गांना शीर्षक द्यावयाचे असल्यास ते त्यांतील कथाप्रसंगास अनुरुप असावे. संपूर्ण महाकाव्याचे शीर्षक त्यातील कथाविषयाची कल्पना देणारे असावे, असे संकेत होते. उदा., रघुवंश, शिशुपालवध. तथापि काही वेळा नुसते नायकाचे नावही काव्यास दिले जाई. उदा., नैषधीयचरित.

पंचमहाकाव्ये नजरेसमोर ठेवून केलेल्या या वर्णनांनी महाकाव्याचे फक्त बाह्यरूपवर्णन होते. ते महाकाव्य होण्यास त्यामागे वायपक, उदात्त आशय असावा, अशी जी आधुनिक काळातील पाश्चात्त्य व आपल्याकडील रूढ कल्पना आहे, तिचे दर्शन या वर्णनांमधून होत नाही. इतर काव्यांप्रमाणे महाकाव्याचेही धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थसाधन हे प्रयोजन काहींनी सांगितले आहे आणि त्याला पोषक अशा प्रकारचे चित्रण महाकाव्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येत असते, हेही मान्य होईल. तथापि त्या आशयाचे अधिक नेमके स्वरुप काय, याचे प्रतिपादन या महाकाव्य-विवेचनातून होत नाही. अलीकडे विदग्ध काव्याच्या मुळाशीही असा एखादा उदात्त हेतू असतो, असे के. ना. वाटवे यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि उदात्त आशयाचा नियम हा निरपवाद नव्हे, असे त्यांनाही माघाच्या शिशुपालवध या काव्याबाबत म्हणावे लागले आहे. नैषधीयचरितातही तसा हेतू पाहणे कठीणच जाईल.

पंचमहाकाव्यांनंतर गुणवत्तेच्या दृष्टीने संस्कृत महाकाव्यांना उतरती कळा लागली. बाह्यतंत्रदृष्ट्या महाकाव्ये माक्ष लिहली जात होती व अगदी अलीकडेपर्यंत संस्कृतमधील महाकाव्यांची परंपरा चालूच आहे. त्यांची संख्या सु. साडेतीनशेपर्यंत जाते, असे काव्येतिहासकार सांगतात. पण सामान्यतः वाचनीय अशा महाकाव्यांची संख्या १०−१५ वर जाणार नाही. पंचमहाकाव्यांच्या काळानंतर ऐतिहासिक राजपुरुषांवरही महाकाव्ये लिहिली जाऊ लागली. त्यांचे कवी बहुधा राजाश्रयावर अवलंबून असावेत. उदा., विक्रमांकदेवचरित आणि नवसाहसाङ्कचरित चम्पू. काही काव्ये अनेकार्थसूचक आहेत.उदा., राघवपाण्डवीय. तथापि राववनैषधीय, पार्वतीरुक्मणीय ह्या काव्यांत दोन कथा आहेत; चिदंबराच्या राघवपाण्डवीयादवीयात तीन कथा असाव्यात. तथापि त्यांना कलेपेक्षा कसरतीचे स्वरूप आले असल्यास नवल नाही. ही मूळ महाकाव्ये युद्धवीरांची असल्याने त्यांना वीरमहाकाव्ये (हिरोइक एपिक) म्हणता येईल. तथापि युद्धवीरांप्रमाणे धर्मवीरही महाकाव्यविषय होतात, हे अश्वघोषाच्या बुद्धचरिता सारख्या काव्यावरून दिसून येते. धार्मिक हेतूने लिहिल्या गेलेल्या महाकाव्यांत इटालियन कवी तास्सो याच्या जेरूसालेमे लिबेराता (इं. शी. जेरुसलेम लिबरेटेड) या काव्याचा उल्लेख करता येईल. तात्त्विक महाकाव्यांत मिल्टनचे पॅरडाइस लॉस्ट, तसेच अरविंदांचे सावित्री या महाकाव्यांचा समावेश होऊ शकेल. त्यांना अर्थातच संस्कृतमधील विदग्ध महकाव्यांचे नियम लागू पडत नाहीत.

मराठीमधील आद्य महाकाव्यरचनेबाबतही हेच दिसून येते. त्यांत नरेंद्राच्या रुक्मणीस्वयंवराच्या आणि भासकरांच्या शिशुपालवधाचा उल्लेख आवश्यक ठरतो. दोघांच्या डोळ्यांपुढे संस्कृत विदग्ध महकाव्ये होती, यात शंका नाही. कारण त्यांनी विदग्ध महकावींची शैली स्वीकारून अलंकारप्रचुर अशी रचना केली आहे. शिशुपालवधात वीररसापेक्षा शृंगारच प्रभावी ठरतो. रुक्मिणीस्वयंवर ही तर शृंगाराला अवसर देणारी अशीच कथा आहे. दोन्ही ओवीबद्ध काव्ये आहेत. त्यांत वृत्तवैचित्र्य नाही. सर्गात्मक खंड किंवा वृत्तात्मक रचना नसली, तरी त्या काव्यांची गणना संस्कृत कलेपनेप्रमाणे महाकाव्यवाङ्मयातच करावी लागेल. त्यांच्यापुढे एकनाथकाली झालेली श्लोकबद्ध आणि सर्गात्मक विभागणी नाही. बाकी वर्णने व कल्पनासौंदर्य ही संस्कृत विदग्ध महकाव्यांचीच आहेत.

एकनाथांची अध्यात्म रामायण आणि रुक्मिणीस्वयंवर ही दोन काव्ये विषयदृष्ट्या महाकाव्यरचनेस अनुरुप म्हणता येतील. तथापि एकनाथांचा मुख्य हेतू काव्यनिर्मितीपेक्षा अध्यात्मविवेचन हाच होता. त्यामुळे काव्यदृष्ट्या ती उणी ठरतात. त्यांचा नातू मुक्तेश्वर याचे श्लोकबद्ध रामायण व ओवीबद्ध ‘भारतपर्व’ हा काव्येही महाकाव्याच्या कसोट्यांना उतरत नाहीत. उत्तरकालीन विठ्ठल, नागेश, सामराज या पंडितकवींनी आपल्या स्वयंवर-कथा विदग्ध महकाव्ये डोळ्यापुढे ठेवून लिहिल्या; परंतु त्यांच्या प्रतिमेच्या अंगभूत मर्यादेमुळे त्यांना महाकाव्याची गुणवत्ता लाभली नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मराठीमध्ये विदग्ध संस्कृत महकाव्ये आणि पाश्चात्त्य ‘एपिक’ यांमागील कल्पनांनुसार काव्यरचना होऊ लागली. या काळातील आद्य महाकाव्य म्हणून वासुदेवशास्त्री खरे यांच्या यशवंतराय महाकाव्याचा (१८८८) उल्लेख करता येईल. ते संपूर्णपणे विदग्ध महकाव्याचा आदर्श पुढे ठेवून लिहिले होते. त्यात ऐतिहासिक वातावरणनिर्मिती व व्यक्तिचित्रण असले, तरी त्याचा नायक मात्र काल्पनिक आहे. २४ सर्गांच्या व १,७२६ श्लोकांच्या या रचनेत वीररस प्रधान असून इतर शृंगार, करूण या रसांचाही आविष्कार आहे. यानंतर साधुदास कवींनी वनविहार, रणविहार आणि गृहविहार ही रामायणावर आधारित तीन महाकाव्ये तोच नमुना पुढे ठेवून लिहिली (सु. १९०१−३०). वि. वा. भिडे यांच्या राघवीय परीवाह या महाकाव्यातही रामायणकथाच वर्णिली आहे; पण रुक्ष व क्लिष्ट शैलीमुळे ते रसिकांच्या मान्यतेस उतरले नाही. खरेशास्त्री यांच्या महाकव्याच्या आसपास गणेश सदाशिव लेले यांचे कृष्णा-कुमारी, गोविंद वासुदेव कानिटकर यांची अकबर बादशाहा व श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध ही ऐतिहासिक कथाकाव्ये झाली; परंतु त्यांचे स्वरूप महाकाव्याचे नव्हते. शिवाजीचे चरित्र आणि कार्य हा महाकाव्यरचनेस अत्यंत अनुकूल असा विषय आहे. त्यावर तीन वेगवेगळी महाकाव्ये अर्वाचीन काळात लिहिली गेली. एक कवी यशवंत यांचे, दुसरे ना. रा. मोरे यांचे आणि तिसरे वि. स. घाटे अंशतः प्रकाशित असे शिवाजीभारत हे होय. तीनही काव्यांचा आवाका मोठा असला तरी ती विदग्ध महाकाव्याच्या साच्यात पूर्णपणे वसणारी नाहीत. हाच विषय घेऊन पण इंग्रजी कवी मिल्टन याचे महकाव्य डोळ्यांपुढे ठेवून म. मो. कुंटे यांनी राजा शिवाजी ह्या महाकाव्याचे ६ भाग प्रसिद्ध केले. पण महाकाव्यास अनुरूप अशी रचनेची आणि भाषेची प्रोढी त्यामध्ये नसल्याने ते अयशस्वी व हास्यपद ठरले. परिणामी ते पूर्ण करण्याचा नाद त्यांना सोडून द्यावा लागला. वि. दा. सावरकर यांनी करावासात असतानाच आपले गोमान्तक हे काव्य रचले. धर्मभावना आणि राष्ट्रभावना ये दोहांचे उदात्त दर्शन त्यात घडते. त्याची शैली भारदस्त व ओजस्वी आहे. त्यामागील महाकाव्यकल्पना ही मिल्टनच्या एपिकची आहे. त्यांच्या प्रभावातून ना. ग. जोशी यांनी जीवनयोग, विश्वमानव इ. आकाराने लहान पण शैलीने महाकाव्यसदृश असी काव्ये लिहिली. अर्वाचीन काळात सामाजिक विषय घेऊन, सर्गांसारख्या अनेक खंडांतून, एकाच वृत्तात प्रथमापासून अखेरपर्यंत लिहिली गेलेली कथात्मक दीर्घकाव्ये पुष्कळच आहेत. परंतु त्यांचे विषम, बेताचा आकार आणि आवाका यांमुळे त्यांस खंडकाव्ये म्हटले जाते. त्यांत महाकव्याची भव्योदात्ता अभिप्रेत नसते. [⟶ खंडकाव्य मराठी].

संदर्भ : 1. Clark, J. History of Epic Poetry, 1900.

2. Dixon, W. M. English Epic and Heroic Poetry, 1912.

3. Merchant, Paul, The Epic, 1974.

४. वाटवे, के. ना. संस्कृत काव्याचे पंचप्राण, पुणे, १९४७.

लेखक: रा. श्री. जोग

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate