অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्रातील तमोयुग साहित्य

सन १३५० नंतरची दोनशे वर्षे केवळ सुनी गेली. १३१८ मध्ये यादवांच्या अडीचशे वर्षांच्या साम्राज्याचा अस्त झाला आणि महाराष्ट्रावर पारतंत्र्याऱ्याऱ्याऱ्याची काळोखी रात्र पसरली. १३४७ मध्ये स्थापन झालेली बहामनी राजवट १६४८ मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची तुतारी फुंकली तोवर आपली अप्रतिहत सत्ता गाजवीत होती. जुलूम, अत्याचार आणि कठोर असहिष्णुता हे या इस्लामी राजवटीचे विशेष होते. त्यांच्या छायेत मराठी कर्तृत्व केवळ कोळपून गेले, त्याचाच परिणाम वाङ्मयाच्या क्षेत्रातही झाला.

सत्यामलनाथांचा सिद्धांतरहस्य ऊर्फ ललितप्रबंध हा बारा हजार ओव्यांचा तत्वज्ञानपर ग्रंथ, बहिरा पिसा जातवेद याची भागवताच्या दशमस्कंधावरील ३६,००० ओव्यांची मराठीतील पहिलीच टीका आणि चोंभा कवीचे उषा-अनिरुद्धांची प्रेमकथा वर्णन करणारे उखाहरण हीच काय ती पंधराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील नाव घेण्यासारखी रचना होय. वडवाळसिद्ध नागेशाचा शिष्य अज्ञानकवी, बांदगड येथील राजाच्या पदरी असलेला सेना न्हावी, मंगळवेढ्याचे संत दामाजी, एकनाथांचे पणजे संत भानुदास आणि नर्तकीची मुलगी असलेली संत कान्होपात्रा ही पंधराव्या शतकात होऊन गेलेली कवि-कवियित्री होत. कान्होपात्रेच्या अभंगांना वारकरी संप्रदायाच मानाचे स्थान मिळाले, ही त्या पंथातील उदारता जागी राहिल्याची खूण होय. तिच्या दु:खाचे करूण प्रतिबिंब तिच्या अभंगांत उमटले आहे.

पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात श्रीपादश्रीवल्लभ व नरसिंहसरस्वती (सु. १३७८-सु. १४५८) या दोन संन्याशांनी दत्तसंप्रदायाची स्थापना केली. सूफी संप्रदायाच्या द्वारा इस्लाममधील उदार प्रवृत्तीशी या संप्रदायाचा काही धागा होता, असे सांगतात. एकनाथांचे (१५३३ – ९९) गुरू जनार्दनस्वामी यांना मलंगवेशात दत्तात्रयाचे दर्शन होत असे आणि जनार्दनस्वामींचे गुरू सूफीसंप्रदायी साधू चांद बोधले हे होते, तसेच योगसंग्रामकर्ते मुसलमान कवी शेख महंमद हे जनार्दनस्वामींचे गुरुबंधू होते, हे नवीन संशोधनाच्या आधारे मांडले जाणारे तपशील त्या दृष्टीने लक्षणीय आहेत; पण ते बरेच विवाद्यही आहेत. ‘बहुधा मूळ’ कानडी असलेल्या सरस्वतीगंगाधरांनी १५३८ च्या सुमारास लिहिलेल्या⇨गुरुचरित्रात श्रीपादश्रीवल्लभ व नरसिंहसरस्वती या दोघांची सविस्तर चरित्रे आलेली आहेत. बावन्न अध्यायांचा (काही प्रतींत ५३) व सु. सात हजार ओव्यांचा हा ग्रंथ अनेक चमत्कार वर्णन करणारा असून त्यात तीर्थयात्रा, व्रतेवैकल्ये व आचारधर्म यांचे विवरण केलेले आहे. गुरुभक्तीवर विशेष भर दिलेला आहे. भाषा सरळ व सुबोध आहे. काव्यदृष्ट्या हा ग्रंथ विशेष सरस नसला, तरी ज्याची पारायणे आजही महाराष्ट्रात सर्वत्र केली जातात, अशा धार्मिक ग्रंथांमध्ये गुरुचरित्राचा अंतर्भाव होतो. एकनाथ, दासोपंत व मुक्तेश्वर हे यानंतरचे महत्वाचे कवी दत्तसंप्रदायी होते. जनार्दनस्वामींचीही थोडीशी स्फुट रचना आहे.

एकनाथांचे ग्रंथकर्तृत्व

१३५० ते १६५० या मराठी वाङ्मयाच्या दुसऱ्या कालखंडातील सर्वात महत्वाचे कवी दोन : एकनाथ व संतश्रेष्ठ तुकाराम. एकनाथ हे वंशपरंपरेने वारकरी पंथाचे, तर गुरुपरंपरेने दत्तसंप्रदायी होते. पण त्यांनी त्या दोन पंथांचा समन्वय साधला. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी ह्यांच्या शिकवणुकीचा या समन्वयात मोठाच वाटा होता. भागवतामधील चार श्लोकांवर (२.९.३२-३५) एकनाथांनी गुरूच्या आज्ञेवरून १,०३६ ओव्यांची टीका-चतुःश्लोकी भागवत- लिहिली. ही त्यांची पहिली रचना. त्यांच्या पुढील ग्रंथकर्तृत्वाची चुणूक या पहिल्या रचनेतच दिसून आली. भागवताच्या एकादशस्कंधावर एकनाथांनी लिहिलेली व एकनाथी भागवत या नावाने विख्यात झालेली टीका हा त्यांचा सर्वांत महत्वाचा ग्रंथ होय. हा ग्रंथ सन १५७३ मध्ये काशीत पुरा केला व तेथे विद्वानांना तो मान्य झाल्याने त्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली, अशी कथा सांगतात. या ग्रंथावर ज्ञानेश्वराची मोठीच छाप आहे. मराठीबद्दलचा अभिमान, गुरुविषयी आदरभाव, श्रीकृष्णाविषयी नितांत प्रेम, अद्वैताचा पुरस्कार, भक्तिभावनेच्या विविध छटा, अध्यायांची सरस प्रास्ताविके व उपसंहार, सांग रूपके, उपमादृष्टांतांच्या मालिका, अशा सर्व बाबतींत नाथांनी ज्ञानदेवांचे अनुकरण केले आहे, हे जाणवते. ज्ञानदेवांचे हे ऋण त्यांनी पुढे आणखी एका मार्गाने फेडले. ज्ञानेश्वरीच्या प्रतीमध्ये अनेक अपपाठ शिरले होते. एकनाथांनी सन १५८४ मध्ये तिची शुद्ध प्रत सिद्ध केली. मराठी भाषेतील संहितासंशोधनाचा हा पहिलाच प्रयत्न म्हणावा लागेल.

एकनाथांनी १५७१ मध्ये काशीतील वास्तव्यातच रुक्मिणीस्वयंवर हे काव्य लिहिले. १७१२ ओव्यांचे व १८ अध्यायांचे हे स्वयंवरकाव्य त्यांनी आपल्या नेहमीच्या प्रसन्न व अलंकारपूर्ण शैलीत लिहिले असले, तरी त्यातील अध्यात्माने काव्यावर मात केलेली आहे. भावार्थरामायण हा नाथांचा चाळीस हजार ओव्यांचा दुसरा प्रदीर्घ ग्रंथ. हा ग्रंथ अपूर्ण असतानाच नाथांनी इहलोकाचा निरोप घेतला आणि गावबा या त्यांच्या शिष्याने अखेरच्या पंधरा हजार ओव्या तंतोतंत त्यांच्या शैलीने लिहून तो पुरा केला. दैत्यांच्या त्रासातून देवांची मुक्तता करणे हे श्रीरामचंद्रांचे अवतारकार्य होते, अशी मांडणी नाथांनी केली आहे. यानंतर पन्नास वर्षातच स्वराज्याचा उदय झाला, त्यासाठी आवश्यक अशी समाजाची मनोभूमिका तयार करण्यास भावार्थरामायणाचा हातभार लागला असे काही अभ्यासकांचे मत आहे. पदे, अभंग, भारुडे, गौळणी, विराण्या, अशी स्फुट रचनाही नाथांनी केलेली आहे. भारुडे हा प्रकार त्यांच्यामुळेच रूढ झाला. विविध देवता, व्यवसाय, प्राणी, खेळ यांचा या भारुडांमध्ये त्यांनी कौशल्याने उपयोग करून घेतला आहे. १२५ विषयांवर सु. ३०० भारुडे त्यांनी रचिली आहेत. नाथांचे सूक्ष्म समाजनिरीक्षण व परिचित गोष्टींच्या आधाराने नीतिबोध आणि अध्यात्मबोध करण्याचे त्यांचे सामर्थ्य या भारुंडामध्ये विशेषत्वाने दिसते. अर्जदास्त, अभयपत्र, ताकीदपत्र अशा स्फुट गद्य रचनेमध्ये तत्कालीन राज्यव्यवहाराची समर्पक चित्रे त्यांनी काढली आहेत.

ज्ञानदेवांनंतरचे श्रेष्ठ ग्रंथकार म्हणजे एकनाथ. ज्ञानेश्वरीच्या खालोखाल एकनाथी भागवताला वारकरी पंथात मान्यता लाभली. विविधता हा नाथांच्या वाङ्मयाचा विशेष होय (शंकराचाऱ्याच्या हस्तामलकावरील टीका). जवळजवळ चार हजार अभंग त्यांच्या नावावर आहेत. त्याशिवाय त्यांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन केले, रुक्मिणीस्वयंवर काव्य लिहिले, प्रदीर्घ कथापर रचना केली, एकादंशस्कंधावर विस्तृत टीका लिहिली आणि नाना प्रकारची स्फुट रचनाही केली, थोडेसे गद्यही लिहिले. हे सारे लेखन त्यांनी समाजाला बोध करण्यासाठी केले. ते प्रापंचिक संत होते, पण तितकेच मोठे लोकशिक्षक होते. त्यांच्या शैलीतील पाल्हाळ व पसरटपणा त्यांच्या या भूमिकेमुळेच आलेला आहे. त्यांच्या अध्यात्मशीलतेची छाया त्यांच्या कथानिवेदनावर काही वेळी वाजवीहून अधिक पडली आहे हे जाणवते. बुद्धीची वा प्रतिभेची असामान्यता एकनाथांत नव्हती, पण त्यांच्याइतकी विपुल, विविध व गुणसंपन्न रचना फार थोड्या कवींनी केलेली आहे.

दासोपंत आणि मुक्तेश्वर

दासोपंत (१५५१ – १६१५), रामा जनार्दन, जनी जनार्दन, विठा रेणुकानंदन व स्वत: एकनाथ या पाचांचे मिळून नाचपंचक मानले जाते, पण या पाचांमध्ये वाङ्मयीन दृष्टीने तसे कोणतेही साम्य नाही. जोगाईचे आंबे येथे राहणाऱ्या दासो दिगंबर ऊर्फ दासोपंत यांनी संस्कृत-मराठी मिळून सु. ५० ग्रंथ लिहिले आहेत. अनेक देवतांची स्तोत्रे, कवने अशी रचनाही त्यात आहे. प्रचंड रचना हा त्यांचा प्रमुख विशेष. त्यांच्या पदार्णवामध्ये सव्वा लाख पदे आहेत, असे मानले जाते. गीतार्णव ही सव्वा लाख ओव्यांची गीताटीका आहे. एवढी विस्तृत गीताटीका मराठीत दुसरी नाही. गीतार्थबोधचंद्रिका ही सु. ९,००० ओव्यांची दुसरी गीताटीका आहे. ग्रंथराज या सुटसुटीत ग्रंथात वेदान्तविषयाचे विवरण आहे. या ग्रंथराजाची छाया समर्थांच्या दासबोधावर आहे, असे म्हणतात. नाना आकृत्यांनी सजवलेला व ठसठशीत अक्षरात लिहिलेला पंचीकरण हा त्यांचा ग्रंथ एका अडीच हात रुंद व चोवीस हात लांब पासोडीवर आहे. तो पासोडी म्हणूनच प्रसिद्ध आहे. विपुलता व पांडित्य हेच या लेखनाचे विशेष आहेत. शैलीचे लालित्य दासोपंतात नाही.

दासोपंतांच्या आगेमागे ज्यांचा उल्लेख करावा असे बरेच लेखक मराठीत झाले. बालबोधकर्ते त्र्यंबकराज, समग्र महाभारत मराठीत प्रथमच आणणारा विष्णुदास नामा, दशमस्कंधावर विस्तृत, तर अनुभवामृतावर सु. सहा हजार ओव्यांची अतिशय सरस अशी नित्यानंदैक्यदीपिका ही टीका लिहिणारे शिवकल्याण, गीतेवर चित्सदानंदलहरी ही चमत्कारी टीका लिहिणारे रंगनाथ मोगरेकर, असे अनेक कवी सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. लोलिंबराजाने लिहिलेले ८५ श्लोकांचे रत्नकलाचरित्र यवन सुभेदाराच्या कन्येवरील कवीचे प्रेम वर्णन करणारे काव्य आहे. लौकिक प्रेमाला मराठी साहित्यात हे स्थान प्रथमच मिळाले असावे. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात फादर स्टीफन्स या गोव्यातील इंग्रज मिशनऱ्या ने मराठीच्या गोमंतकी बोलीचे व्याकरण लिहिले व मराठीत क्रिस्तपुराण सांगितले. स्टीफन्सची मराठी रचना व मराठीवरील त्याचे प्रेम थक्क करणारे आहे. दीडदोनशे वर्षांच्या निद्रेनंतर मराठीला नव्याने जाग कशी येत होती ते या त्रोटक उल्लेखांवरून ध्यानात यावे.

कलात्मक निर्मितीची खरीखुरी प्रेरणा ज्याच्या ठायी होती अस मुक्तेश्वर हे एकनाथांचे नातू होत. यांच्या चरित्राबद्दल काही वाद आहेत. श्लोकबद्ध संक्षेप रामायण, गरुडगर्वपरिहार, कालिया मर्दन, अहिमहि आख्यान, मूर्खांची लक्षणे, शुकरंभासंवाद आदी त्यांची बरीच रचना असली, तरी मुक्तेश्वरांची प्रसिद्धी त्यांच्या भारती पर्वासाठी आहे. त्यातील आदि, सभा, वन व विराट ही आरंभीची व अखेरच्यांपैकी सौप्तिक अशी पाचच पर्वे उपलब्ध आहेत. ही भारतरचना म्हणजे मराठी साहित्यातील जणू ‘कोहिनूर’ आहे. कथानिवेदन, प्रसंगवर्णन, व्यक्तिदर्शन यांतील मुक्तेश्वरांचे चातुर्य अव्वल दर्जाचे आहे. शृंगार, वीर व करुण या तीनही रसांचा परमोत्कर्ष त्यांची भारती रचनेत आढळतो. विशेषत: त्यांची युद्धवर्णने व निसर्गवर्णने अप्रतिम आहेत. शृंगारातील उत्तानता व घटनांबाबतचा कालविपऱ्यास हे त्यांचे प्रमुख दोष आहेत. तथापि मुक्तेश्वरी भारताची सर अन्य कोणाही कवीच्या रचनेस येत नाही याबद्दल एकमत आहे.

तुकोबांची अभंगवाणी

ज्ञानदेवांनी ज्याचा पाया घातला त्या भागवतधर्माच्या मंदिराचा कळस तुकाराम (१६०८-५०) झाले असे सांप्रदायिक मानतात, साहित्याच्या दृष्टीनेही ते मत यथार्थ आहे. मंत्रगीता या नावाने गीतेचा सुबोध अभंगात्मक अनुवाद तुकारामांनी केला आहे, असे वा.सी बेंद्रे यांचे मत आहे; पण ते विवाद्य आहे. सुमारे साडेचार हजार अभंगांची गाथा हेच त्यांचे वाङ्मय होय. परमार्थाची वाटचाल करताना जे अनुभव आले, ते तुकारामांनी या अभंगांमध्ये शब्दबद्ध केले आहेत. ‘अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी’ हेच त्यांच्या अभंगांचे योग्य वर्णन आहे. ही केवळ सहज, उत्स्फूर्त अशी वाणी आहे. ही सहजताच सौंदऱ्याला जन्म देते व तीमुळेच ते उदगार वाचकांच्या अंतःकरणाला भिडतात. तुकारामांनी बोलण्याचालण्यातील रोजची भाषा संपन्न केली आहे. त्यांचे अनेक उदगार हे मराठी भाषेचे वाक्प्रचार होऊन गेले आहेत. हा खराखुरा जनसामान्यांचा कवी आहे. तुकाराम संत असले तरी वृत्तीने परखड आहेत.

नामदेवांची भावकोमलता किंवा ज्ञानदेवांची अभिजातता त्यांच्यात नाही. जन्मसिद्ध उच्चनीचभाव, विद्वत्तेचा दंभ, कर्मकांडावरील वृथा भर, धार्मिकतेचे ढोंग यांवर त्यांनी कठोर प्रहार केले आहेत. त्यांच्या वाणीत आढळणारी वास्तवाची प्रखर जाणीव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक विशेष आहे. त्यांनी आपले कैक दृष्टांत रोजच्या अनुभवांतून उचलले आहेत. त्यांची भाषा मेणाहून मऊ होते तशीच प्रसंगवशात ती वज्राहून कठोर होऊ शकते. त्यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या गेल्याची जी आख्यायिका आहे तीवरून असे दिसते, की केवळ ग्रांथिक विद्वत्ता मिरवणाऱ्या ब्राह्मणांकडून त्यांनी काही उपसर्ग पोहचला असावा. पण अखेर ‘अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची’ या उदगारात म्हटल्याप्रमाणे मराठी अभंगवाङ्मयातील सर्वश्रेष्ठ स्थान तुकोबांना देण्यात आले. वारकरी पंथाला आलेले तुकाराम हे अमृतमधुर फूल होय.

प्रवृत्तिपर संत रामदास

शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या काऱ्याचा प्रारंभ होत असतानाच तुकारामांचे जीवन समाप्त झाले. सन १३५० ते १६५० हा मराठी साहित्याचा दुसरा कालखंड त्यांच्यापाशी संपतो. १६५० ते १८१८ या तिसऱ्या कालखंडांचे पहिले कवी म्हणजे समर्थ रामदास (१६०८-८१) होत. मूळ परमार्थाचा गाभा एकच असला, तरी रामदासांची रचना तुकारामांहून अगदी निराळी आहे. त्यांच्या जीवनाची पार्श्वभूमीच वेगळी होती आणि त्यांचे व्यक्तिमत्वही भिन्न होते. स्वराज्याच्या उभारणीचे रामदास हे जाणकार साक्षी होते. मुसलमानांची राजवट समाप्त होऊन तेथे स्वराज्या आले याचा त्यांना मनापासून आनंद वाटला, त्याआधी ‘परचक्र’ व ‘अस्मानी सुलतानी’ यांमुळे ते अंत:करणातून दु:खी होते. इतर संतांहून रामदास काहीसे निराळे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वाङ्मयाचे रूपही निराळे झालेले आहे.

समर्थांची रचना विपुल आहे. सुंदरकांड आणि युद्धकांड अशी रामायणावरील त्यांची कथापर रचना आहे, पण ती विशेष महत्वाची नाही. पूर्वारंभ, आत्माराम, चतुर्थमान, जुनाट पुरुष अशी काही आध्यात्मिक प्रकरणे त्यांनी लिहिली आहेत. उत्तरवयात लिहिलेल्या परचक्रनिरूपण, अस्मानी सुलतानी; आनंदवनभुवन, क्षात्रधर्म, भवानीस प्रार्थना, संभाजीस पत्र, आदी छोट्या छोट्या प्रकरणांतून तत्कालीन राजकीय परिस्थितीचे पडसाद उमटले आहेत. त्यांचा सर्वांत महत्वाचा ग्रंथ म्हणजे वीसदशकी आणि दोनशे समासांचा दासबोध. ७,७५१ ओव्यांचा हा ग्रंथ निरनिराळ्या वेळी लिहिलेले समास एकत्र करून सिद्ध झालेला आहे. त्याआधी त्यांनी लिहिलेल्या एकवीस समासी जुन्या दासबोधात व मोठ्या दासबोधाच्या पहिल्या आठ दशकांत केवळ निवृत्तिपर उदगार असून अद्वैत व भक्ती यांचा पुरस्कार आहे. त्याच्याही आधी पूर्ववयात लिहिलेल्या करुणाष्टकांमध्ये त्यांच्या मनाची पारमार्थिक जिज्ञासा, वैराग्याची इच्छा आणि ईश्वरदर्शनाची तळमळ प्रकट झाली आहे. ही करुणाष्टके म्हणजे त्यांच्या आर्त मनाचा सहजसुंदर आविष्कार आहे.

समर्थांच्या उत्तरायुष्यामध्ये त्यांच्या विचारांत देशकालपरिस्थितीच्या जाणिवेमुळे एक परिवर्तनच घडून आले. त्यामुळे दासबोधाचा उत्तरार्ध व उत्तरकालीन स्फुट प्रकरणे यांमध्ये त्यांनी प्रपंचपरमार्थाचा विवेक सांगितला, ज्ञानी आणि उदास अशा महंताने महंत तयार करावेत असे म्हटले, प्रयत्नवादाचा महिमा गायिला, स्वधर्मरक्षणार्थ स्वराज्याची आवश्यकता प्रतिपादन केली, हरिकथानिरूपणाबरोबर राजकारण व सर्वविषयी सावधपण यांचा पुरस्कार केला, महाराष्ट्रात स्वराज्य आले तेव्हा ‘आनंदवनभुवनी’ स्वप्नाची पूर्ती झाल्याचे समाधान प्रकट केले आणि लोकसंग्रहाची व मराठा तितुका मेळवून महाराष्ट्रधर्म वाढविण्याची आवश्यकता स्पष्ट केली. समर्थांसारखा समाजसन्मुख, ऐहिक वृत्तीचा व रोकडा वास्तववादी संत दुसरा दाखवता येत नाही. ते एकनाथांप्रमाणेच लोकशिक्षक होते, पण त्याबरोबर मठांची उभारणी करून शिष्य तयार करणारे कुशल संघटकही होते. सुमारे दोनशे श्लोकांच्या ‘मनोबोधा’ त त्यांचा हा समर्थ गुरुभाव उत्तम प्रकारे प्रकट झाला आहे. रामदासांच्या या उत्तरकालातील वाणीला तुकारामांहून थोडा निराळा, पण वास्तवाचा स्पर्श आहे. त्यांची भाषा स्पष्ट व रोखठोक आहे. येथे शब्दांची कोवळीक नाही, तर धनुष्याचा टणत्कार आहे. सामर्थ्याचा, आत्मविश्वासाचा हुंकार त्यात जाणवतो. रामदासांचे शब्दभांडार केवळ अपार आहे. या शब्दांवर ते कोणताही संस्कार करीत नाहीत, त्यांची कशीही रूपे ते बेधडक वापरतात. पण असा त्यांचा उदगारही अंतःकरणाला जाऊन भिडतो, कारण त्यातील प्राजंळपणा केवळ निकोप आहे.

नाथपंचायतनाप्रमाणेच दासपंचायतनही सांगतात. त्यामध्ये समर्थांबरोबर जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथस्वामी निगडीकर, केशवस्वामी भागानगरकर व आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांचा समावेश केला जातो. या सर्वांची थोडीफार रचना आहे, पण त्यांचे परस्परांशी कोणते साम्य नाही. दिनकर गोसावी यांचा स्वानुभवदिनकर, वेणाबाईंचे सीतास्वयंवर, गिरिधरांचा समर्थप्रताप, आत्माराममहाराज येक्केहाळीकरांचा दासविश्रामधाम अशी काही समर्थशिष्यांची व सांप्रदायिकांची रचना आहे; पण समर्थांच्या वैशिष्ट्यांचा आढळ तीमध्ये कोठेही होत नाही.

यथार्थदीपिकाकार वामनपंडित

गीतेचे विद्वान भाष्यकार वामनपंडित (१६०८ ? - १६९५) हे समर्थांचे समकालीन; पण अगदी निराळ्या प्रकृतीचे ग्रंथकार होत. सतराव्या शतकात तुकाराम, रामदास व वामनपंडित हे तिघे तीन भिन्न प्रवृत्तींचे पण तितकेच कर्तृत्वसंपन्न कवी महाराष्ट्रात होऊन गेले. नांदेडच्या शेष घराण्यात जन्मलेल्या वामनांची सारी विद्या काशीला झाली. दक्षिणेतील मलयपर्वतावर सच्चिदानंद यतीकडून त्यांना उपदेश मिळाला. यथार्थदीपिका ही बावीस हजार ओव्यांची गीताटीका. हा त्यांचा सर्वांत महत्वाचा ग्रंथ ज्ञानेश्वरीप्रमाणे अद्वैत व भक्ती सांगणारा, पण त्याचे रूप अगदी निराळे आहे. मराठीत हा ग्रंथ गाजला तो त्यात चार-दोन स्थळी आलेल्या ज्ञानदेवांवरील टीकेमुळे, पण तो त्याचा महत्वाचा भाग नव्हे. ही टीका संस्कृत भाष्यग्रंथांच्या पंक्तीत बसणारी आहे.

साधार विवेचन, सुसंगत तत्वज्ञान आणि तर्कशुद्ध प्रतिपादन हे तिचे विशेष आहेत. गीतेवर वामनांनी समश्लोकी टीकाही लिहिली आहे. ती अतिशय सुबोध असून यथार्थदीपिकेशी संपूर्ण मिळतीजुळती आहे. शंकराचाऱ्याच्या अपरोक्षानुभूतीचा सरस अनुवाद वामनांनी केला आहे. निगमसार, कर्मतत्व चित्सुधा, प्रियसुधा, द्वारकाविजय, चरमगुरुमंजरी इ. तत्वज्ञानपर रचना त्यांनी केली आहे, त्यांतील काही प्रकरणांना भागवताचा आधार आहे. सिद्धांतविजय व अनुभूतिलेश ही वामनांची संस्कृंतमधील रचना आहे. यांतील अनुभूतिलेशाचा पुढे साम्राज्यवामनांनी (१६५२- ?)मराठीमध्ये समश्लोकी अनुवाद केला आहे.

‘सुश्लोक वामनाचा’ ही कीर्ती वामनांना त्यांच्या आख्यानकवितेमुळे मिळाली आहे. अध्यात्माचा धागा या सर्व आख्यानांतही आहेच. वनसुधा, वेणुसुधा, मृत्तिकाभक्षण आदी भागवती आख्याने त्यांच्या कीर्तीस शोभावित अशी आहेत. रासक्रीडा, राधाविलास, राधाभुजंग अशा काही आख्यानांत उत्तान शृंगारवर्णने आहेत. वामनांची सारी रचना अद्याप निश्चित करता आलेली नाही. वामन प्रसंगवर्णन सुरेख करतात; शब्दचित्रे रेखीव व मोहक काढतात; यमकांचा सोस व अलंकारांचा हव्यास जेथे नसतो तेथे त्यांची रचना सुबक असते; पण कथानिवेदन आणि व्यक्तिदर्शन यांत ते उणे पडतात. किंबहुना त्यांची आख्यानकाव्ये ही कथाकाव्ये नसून प्रसंगकाव्ये आहेत असे म्हणावेसे वाटते. एकंदरीत विचार करता आख्यानकवी या दृष्टीने वामनांचे स्थान दुय्यम आहे, तत्त्वज्ञानाचे भाष्यकार या दृष्टीने मात्र ते पहिल्या दर्जाचे आहे.

अनेक कवी, विपुल रचना : वामनपंडितांबरोबरच सतरावे शतक संपते व मराठी वाङ्मयाचा एक उज्वल अध्यायही तेथे समाप्त होतो. यानंतरची शंभर वर्षे विस्ताराची, अमाप निर्मितीची व एका नव्या वाङ्मयप्रकाराच्या उदयाची आहेत. जुन्या परंपरेने रचना करणारे अनेक कवी अठराव्या शतकात झाले; पण दोनतीन कवींचा अपवाद वगळता कोणामध्ये विशेष चमक आढळत नाही. नागेश, विठ्ठल (बीडकर), सामराज , रघुनाथपंडित आदी कवी पंडित परंपरेतील आहेत. पांडित्याचा डौल, संस्कृतचे अनुकरण, बहिरंगावर भर, अक्षरगणवृत्तांचा वापर, अलंकाराची योजना, संस्कृत प्रचुर भाषा, कलात्मकतेचा अभाव आणि कृत्रिम कारागिरीची रचना हे या पंडितरकवींचे विशेष आहेत. नागेशाची रचना ग्राम्य व बाष्कळ आहे. विठ्ठल विविध बंधांतील चित्ररचना करण्यासाठीत प्रसिद्ध आहे आणि सामराजांनी आपल्या अष्टसर्गात्मक रुक्मिणीहरणात महाकाव्यरचनेचा सारा बाह्य डौल आणला आहे. विविध वृत्तांत रचलेले रघुनाथपंडितांचे २५४ श्लोकांचे दमयंतीस्वयंवर त्यातील सुबक कथानकरचना, प्रवाही निवेदनशैली, रेखीव स्वभावचित्रे, सरस संवाद, संयमित शृंगार , समर्पक अर्थान्तरन्यास आणि इतर अलंकारांची चपखल योजना यांमुळे मराठीतील एकंदर आख्यानकाव्यांत वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे;भाषा मात्र संस्कृतप्रचुर आहे. बहिणाबाई व कचेश्वर ब्रह्मे यांची आत्मचरित्रपर रचना आधीच्या शतकाच्या अखेरीस येते, तर निळोबा पिंपळनेरकर हे तुकारामांच्या परंपरेतील अखेरचे महत्वाचे अभंगकार आहेत.

हरिवरदा ही कृष्णदयार्णवांची भागवताच्या दशमस्कंधावरील ४२,४८७ ओव्यांची प्रचंड टीका सफाईदार रचना, सरस अलंकारयोजना आणि प्रौढ संस्कृतप्रचुर भाषा या गुणांमुळे मराठीत सर्वोत्तम मानली जाते. या कवीवर एकनाथांची विशेष छाप आहे. उत्तरवयात कुष्ठरोगाने ग्रासले म्हणून कृष्णदयार्णवांनी ही रचना हाती घेतली, सत्याऐंशीव्या अध्यायाचे लेखन चालू असताना त्यांना मृत्युने गाठले आणि पुढचे तीनसाडेतीन अध्याय त्यांचा शिष्य उत्तमश्लोक याने पूर्ण केले;अशी या ग्रंथाची जन्मकथा आहे. शिवदिनकेसरी, त्यांचा पुत्र नरहरी, ⇨उद्धव चिद्घन आदींनी पदरचना केली आहे. मध्वमुनी व अमृतराय हे खटकेबाज कटावांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रचनेवर हिंदी कवितेची छाप आहे. ५८१ श्लोकांच्या शशिसेन या काव्यात जगन्नाथाने प्रेमविवाहाची एक अदभूत कथा वर्णिली आहे.⇨ महिपती ताहराबादकर हे संतचरित्रकार म्हणून गाजलेले आहेत. त्यांनी अनेक संतांची चरित्रे वर्णन केली आहेत, पण चरित्रातील तपशिलाचा अचूकपणा व वर्णनशैली या दोन्ही दृष्टींनी त्यांचे लेखन बेताचे आहे. निरंजनमाधवांच्या रचनेत विविधता आहे. सिद्धेश्वर संप्रदायाचे तत्वज्ञान सांगणारा व आत्मचरित्रात्मक असा सांप्रदायपरिमळ हा ग्रंथ, तसेच मराठीतील एकमेव चंपूकाव्य असलेला समुद्राचंपू, चिदबोधरामायण, ज्ञानेश्वरविजय, एक प्रवास वर्णनपर व आत्मचरित्रपर काव्य, काही छंदःशास्त्रविषयक ग्रंथ, अनेक देवतांची श्लोकबद्ध छोटीमोठी स्तोत्रे अशी रचना त्यांच्या नावावर मोडते. तथापि सांप्रदायपरिमळ हा त्यांनीच लिहिला किंवा काय, ह्याबद्दल विद्वानांत ऐकमत्य नाही.

लोकप्रिय कवी श्रीधर

अठराव्या शतकामधील या सर्वांहून महत्वाचा आणि एक अत्यंत लोकप्रिय कवी म्हणजे श्रीधरस्वामी होय. श्रीधरांच्या कवितेने गेली अडीचशे वर्षे मराठी मनावर सदाचाराचे संस्कार केले आहेत. वेदान्तसूर्य हा एकच तत्वज्ञानपर ग्रंथ त्यांनी लिहिला. ईश्वरावतारांच्या कथा सांगणे हा त्यांच्या ग्रंथांचा प्रमुख विषय. हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आणि शिवलीलामृत हे श्रीधरांचे चार ग्रंथ फार लोकप्रिय ठरले आहेत. जैमिनी अश्वमेघ ही त्यांची आणखी एक प्रदीर्घ रचना असून इतर स्फूट प्रकरणेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी व सुबोध आहे. त्यांच्या काव्यात कोठेही थोडीशीदेखील रुक्षता नाही. सर्वत्र एक सहज, प्रसन्न अशा रसाळपणाचा प्रत्यय येतो व वाचकाचे मन केवळ तल्लीन होते. शिकवण्याचा आव न आणता शिकवणारा आणि तत्वज्ञानाचा पसारा न मांडता नीतिबोध मनावर ठसवणारा असा श्रीधर हा कवी होऊन गेला.

पंडित कवी मोरोपंत

मोरोपंत हे स्वराज्याच्या कालातील शेवटचे आणि पंडित कवींच्या परंपरेतील सर्वश्रेष्ठ कवी होत. बाबूजी नाईकांच्या घरातील स्त्रियांना पुराण सांगणे हा त्यांचा मुख्य उद्योग होता. त्यातून त्यांची प्रतिभा जागृत झाली आणि संस्कृत महाकाव्ये व पुराणे यांतील कथाभाग त्यांनी प्रचंड परिश्रम करून मराठीत आणला. मोरोपंतांची रचना केवळ प्रचंड आहे. त्यांची एकूण रचना जवळजवळ साठ हजार आऱ्या भरते. त्यांचे आऱ्याभारत ही सर्वांत सरस व प्रदीर्घ अशी रचना होय. मोरोपंतांच्या परिणत प्रज्ञेचे व परिपक्व प्रतिभेचे दर्शन येथे घडते. यातील विविध प्रसंग व निरनिराळ्या व्यक्ती यांची त्यांनी केलेली वर्णने अतिशय वेधक उतरली आहेत.

आऱ्याभारताखालोखाल त्यांची रामायणावर रचना आहे. रामकथा त्यांनी एकशेआठ वेळा गायिली आहे. हा एक अदभुत चमत्कारच म्हणावयास हवा. रचनेचे नाना प्रकार त्यांत त्यांनी केले आहेत. त्यानंतर कृष्णविजय ऊर्फ बृहद्दशम, मंत्रभागवत आणि ब्रह्मोत्तरखंड ही प्रदीर्घ काव्ये येतात. भागवती प्रकरणे, संतचरित्रे, कुशलव्याख्यान,

संशयरत्नावली इ. अनेक छोटीमोठी प्रकरणे त्यांनी लिहिली आहेत. भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद त्यांनी आऱ्याछंदात केला आहे व त्यावर वामनांच्या समश्लोकीची गाढ छाया आहे. संसारतापाने श्रांत झालेल्या मोरोपंतानी केकावलीमध्ये ईश्वराची करुणा भाकली आहे. सीतागीत, रुक्मिणीगीत यांमधील भाषा, भावना व आविष्कार स्त्रीमनास शोभेल असा आहे. पंतांची ही रचना साधी, प्रसादपूर्ण व वैदर्भी रीतीची आहे. अन्यत्र त्यांची शैली गौडी आहे.

मोरोपंतांनी आऱ्याछंदास प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकोबाचा अभंग आणि वामनांचा श्लोक यांबरोबरच मोरोपंतांच्या आर्येस जुन्या मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळाले आहे. यमकांचा हव्यास, अपरिचित शब्दांची योजना, संस्कृतप्रचुरता आणि समासप्रचुरता यांमुळे त्यांच्या रचनेत अनेकदा क्लिष्टता, दुर्बोधता व प्रसादहीनता शिरलो आहे. त्यामुळेच मोरोपंत हे कवीच नव्हेत, असे मतही व्यक्त केले गेले आहे, पण ऐकांतिक मत झाले. योग्य घटनांची निवड व संक्षेपातील विवेक. निवेदनातील ओघ व प्रवाहीपणा, व्यक्तिदर्शनातील चातुर्य व प्रसंगवर्णनातील कसब, त्याचबरोबर नाट्यपूर्ण संवाद व विविध उपमादृष्टांतांची पेरणी यांमुळे मोरोपंतांची कविता, ही एकदा त्यांच्या संस्कृतप्रचुर भाषेचा तट ओलांडला, की रसिकाला मोहविणारी ठरते. काही ढोबळ व स्पष्ट जाणवणारे असे दोष असूनही त्यांची कविता मान्यता पावलेली आहे, यातच त्यांचे यश व मोठेपण आहे. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांची कविता संस्कृत जाणणाऱ्या विद्वानांनाही मान्य झाली, कीर्तनप्रसंगी तिचा सर्वत्र उपयोग केला गेला आणि अव्वल इंग्रजीच्या काळात त्यांची एक परंपराच निर्माण झाली.

शाहिरी कविता

अठराव्या शतकामध्ये मराठी कवितेत एक नवीन प्रवाह निर्माण झाला व तो म्हणजे शाहिरी वाङमयाचा. हे शाहिरी वाङ्मय पोवाडे व लावण्या असे दोन प्रकारचे असून, त्यांतील पोवाड्यांचा उगम शिवरायांचा पराक्रम महाराष्ट्रात नावारूपाला येत असताना अफझुलखानवधावरील अज्ञानदासाच्या रचनेने झाला, तर लावणीचा उदय त्या स्वराज्याचे साम्राज्य होऊन मराठेशाहीस वैभवाचे दिवस आल्यावर झाला. पुढे पराक्रम कमी झाल्यावर वीररसात्मक पोवाडा कमी झाला आणि रंगढंग व विलासी प्रवृत्ती वाढल्यामुळे स्वराज्याचा अस्त होण्याच्या काळातही इष्काचे गान गाणाऱ्याव लावणीची निर्मिती मात्र होत राहिली. या शाहिरी कवितेत तत्कालीन मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनातील वास्तव अनुभवांचे सच्चे प्रतिबिंब उमटले आहे. त्यामुळेच शाहिरी कविता हीच काय ती खरीखुरी मराठी कविता असेही श्री.म.वर्दे यांनी म्हटले आहे. यातील आविष्कार काहीसा रांगडा, असंस्कारित आणि म्हणूनच उत्कट व ह्रदयाला तात्काळा भिडणारा आहे. यातील आशयात एक प्रत्यक्षता आहे आणि अभिव्यक्तीत एक धीट थेटपणा आहे. ही रचना खास मराठी ढंगाची व वळणाची आहे. पोवाडा व लावणी ही केवळ वाचावयाची आहे. लावणीला तर नृत्याची, अभिनयाची जोड मिळते व घुंगरांच्या नादाचा ताल व सूर मिळतो, मग ती केवळ श्राव्य राहत नाही, तर दृश्यगी होते, तेथे सवालजबाब झडतात व जाणकारांकडून दादही मिळते. रचनेची शिथिलता, अभिरुचीतील ग्राम्यता, शृंगारातील उत्तानता आणि क्वचित अश्लीलता व बीभत्सता असे दोष या कवितेत आढळतात; एक प्रकारचा तोचतोचपणाही येतो. तुलनेने हे दोष पोवाड्यात कमी आढळतात.

एकूण सुमारे तीनशे पोवाडे उपलब्ध आहेत. त्यांतील शिवकालामधील केवळ चार आणि पेशवेकालातील सुमारे दीडशे आहेत, उरलेले अव्वल इंग्रजीतील आहेत. राक्रमाची वीररसपूर्ण गाथा हा पोवाड्याचा मुख्य विषय असला, तरी थोर व्यक्तींचे मृत्युदैवतांच्या अद्भूत लीला, तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य तसेच दुष्काळासारख्या आपत्ती यांवरही पोवाडे लिहिले गेले आहेत. राजे, सरदार, धनिक त्यांचे वैभव आणि कर्तृत्व हा सुद्धा काही पोवाड्यांचा विषय आहे. पोवाडा हा प्राधान्याने कथात्मक वाङ्मयाचा प्रकार आहे. त्यामुळे त्यात कथानिवेदन, प्रसंगवर्णन व संवाद यांना महत्व असते. लावणीत प्राधान्याने शृंगारभावना येत असली, तरी पौराणिक, भक्तिपर, उपदेशपर व केवळ आध्यात्मिक अशी लावणीही पुढे लिहिली गेली. त्तरपेशवाईच्या काळात रामजोशी,अनंत फंदी, सगनमाऊ, परशराम, प्रभाकर, होनाजी बाळा असे प्रमुख लावणीकार झालेले आहेत.यातील रामजोशी, प्रभाकर व अनंत फंदी हे ब्राह्मण, परशराम शिंपी व होनाजी हे गवळी, तर सगनभाऊ हा मुसलमान आहे. त्या त्या शाहिराची सामाजिक परिस्थिती, पार्श्वभूमी, त्याला मिळालेले शिक्षण यांमुळे रचनेत काही वेगळीक उत्पन्न झालेली आढळते. अव्वल इंग्रजीत नवी विद्या आली तशी शाहिरी कविता मागे पडली.

बखरवाङ्मय

स्वराज्याच्या काळात काव्याच्या क्षेत्रात शाहिरी कवितेचा उदय झाला, तसा गद्याच्या प्रांतात बखरवाङमय हा नवा प्रकार जन्माला आला. शालिवाहनाची बखर अत्यंत जुनी मानतात. या बखरीच्या उपलब्ध प्रतींतली भाषा मात्र जुनी वाटत नाही. राक्षसतागडीची बखर आणि महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर या दोन बखरी शिवपूर्वकालीन आहेत. तवारिखा, शाहनामे, फेरिस्ते आदी मुसलमानांच्या ऐतिहासिक वृत्तांतलेखनाच्या प्रकारांपासून प्रेरणा घेऊन मराठीमध्ये बखरींचे लेखन सुरू झाले. मुख्यतः सन १६८० नंतरच्या काळातील हे लेखन आहे. एकूण दोनअडीचशे बखरी मराठीत लिहिल्या गेल्या, असे राजवाड्यांनी म्हटले आहे. पण टिपणे, निवाडे, रोजनिशा आदींचा समावेश त्यांनी त्यांत केला आहे. समकालीन लेखकांनी लिहिलेल्या, दंतकथा व आठवणी यांच्या साहाय्याने तयार केलेल्या, जुने ग्रंथ व ऐतिहासिक कागदपत्र यांचा आधार घेऊन लिहिलेल्या, व्यक्तींची चरित्रे किंवा घराण्यांचे इतिहास सांगणाऱ्या, पौराणिक कथा वर्णन करणाऱ्यात अशा प्रकारचे बखरींचे  निरनिराळे वर्ग अभ्यासकांनी मानले आहेत. पण साऱ्याच बखरी या वर्गीकरणात बसतात असे नाही. सवाई माधवरावाला शिक्षण देण्यासाठी नाना फडणिसांनी पेशव्यांची बखर लिहविली (१७८२), नारायणव्यवहारशिक्षा’ हे प्रकरण तसेच आहे. नाना फडणिसाचे आत्मचरित्र हे लेखन तर उघडउघड आत्मचरित्रपर आहे

शिवछत्रपतींचा यशस्वी पराक्रम आणि पानिपता अयशस्वी संग्राम या दोन परस्परविरोधी घटना बखरलेखनाला सर्वाधिक प्रेरक ठरल्या आहेत. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासदी बखर (१६९७), दत्ताजी त्रिमल वाकेनवीस व अनाजी रंगनाथ मलकरेकृत ९१ कलमी बखर (१७६०ते १७००), रघुनाथ यादव चित्रेकृत चित्रगुप्ताची बखर (१७६१), मल्हार रामराव चिटणीस ह्यांचे सप्तप्रकणात्मक शिवचरित्र (१८१०), खंडो बल्लाळ चिटणीस ह्यांचा श्रीशिवदिग्विजय (१८१८) तंजावर येथील बृहदीश्वराच्या भिंतीवर खोदले गेलेले भोसलेवंशचरित्र या शिवचरित्रावरील प्रमुख बखरी होत. छत्रपतींविषयीचा अपार आदर या सर्वच बखरीत उमटला आहे. रघुनाथ यादव चित्रकृत पाणिपतची बखर, भाऊसाहेबांची कैफियत, मुळात फार्सी भाषेत लिहिली गेलेली काशिराजाची बखर, कृष्णाजी शामराव यांची भाऊसाहेबांची बखर, एका वेगळ्या दृष्टिकोणातून लिहिली गेलेली होळकरांची थैली या पानिपतविषयक बखरी युद्धानंतर केवळ आठ-दहा वर्षांत लिहिल्या गेल्या आहेत. यांतील भाऊसाहेबांची बखर ही ऐतिहासिक व वाङमयीन अशा दोन्ही दृष्टींनी एकंदर बखरवाङमयात केवळ अद्वितीय आहे. उत्कृष्ट व्यक्तिचित्रे, सरस प्रसंगवर्णने, नाट्यपूर्ण संवाद, म्हणी व वाक्प्रचार यांचा समर्पक उपयोग, परिणामकारक शैली, कारुण्याचा परिपोष अशा अनेक गुणांचा आढळ तीमध्ये होतो. तत्कालीन मराठी गद्याचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. इतर बखरीमध्ये नागपूरकर भोसल्यांची बखर, खरड्याच्या स्वारीची बखर, पेशव्यांची बखर, पटवर्धनी वाका, अशा काही उल्लेखनीय आहेत. हरिवंशाची बखर बाळकृष्ण हरिहर पटवर्धन यांनी १८४२ मध्ये लिहिली. ही शेवटची बखर असे म्हणता येईल. त्यानंतरच लगेचच अर्वाचीन मराठी गद्य वाङ्मयाचे नवे प्रकट झाले.

कालविपऱ्यास, व्यक्तिविपऱ्यास, प्रसंगविपऱ्यास, साधार लेखनाचा अभाव, अपुरी माहिती अशा दोषांमुळे बहुतेक बखरी ऐतिहासिक दृष्ट्या अविश्वसनीय ठरल्या आहेत. त्यामुळेच अस्सल कागदपत्रांचे मोल अधिक मानले गेले. साहित्यगुणांच्या दृष्टीने बखर सरस ठरणे हे त्या त्या लेखकांच्या ठायी असलेल्या प्रतिभाशक्तीवर व वर्णनशैलीवर अवलंबून राहते. पौराणिक थाटाची वर्णने, अद्भूताचा वापर, अतिशोयक्ती अशा दोषांमुळे बऱ्या च बखरी या दृष्टीनेही उण्या ठरल्या आहेत. तथापि या नव्या लेखनप्रकारामुळे मराठीतील गद्यलेखनाची दीर्घकाल लुप्त झालेली परंपरा पुनरुज्जीवित झाली, तत्कालीन श्रेष्ठ व्यक्तींची काही सरस शब्दचित्रे रेखाटली गेली, त्या काळच्या मराठी समाजाचे जीवन काही प्रमाणात चित्रित झाले आणि त्यावेळच्या गद्य मराठीचे भाषिक रूप उपलब्ध झाले; एवढ्या गोष्टी जमेच्या बाजूला टाकता येण्यासारख्या आहेत. अठराव्या शतकाच्या प्रारंभी रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या शिवरायांच्या राजनीतीचा व राज्यव्यवस्थेचा आढावा घेणारा ⇨ आज्ञापत्र हा छोटेखानी व अतिशय नेटक्या भाषेत लिहिलेला ग्रंथ ध्यानात घेतला, म्हणजे शिवकालानंतरच्या गद्य वाङमयाचा हा आढावा पूर्ण होतो. तत्कालीन मराठा सरदारांनी व मुत्सद्यांनी लिहिलेली हजारो पत्रे अलीकडे छापली गेली आहेत. त्यांतील निवडक पत्रांचा अंतर्भावही कोणी कोणी या वाङ्मयात करतात.

सिंहावलोकन

असा हा प्राचीन मराठी साहित्याचा आलेख आहे. हा इतिहास एकूण सु. साडेपाचशे-सहाशे वर्षांचा आहे. प्रारंभ ते सन १३५०, १३५० ते १६५०, आणि १६५० ते १८१८ असे या इतिहासाचे तीन कालखंड सामान्यतः कल्पिले जातात. साहित्याच्या दृष्टीने या कालखंडाचे वर्णन करावयाचे असेल, तर महानुभाव ज्ञानदेव, एकनाथ-तुकाराम आणि पंडित-शाहिरी या शब्दांमध्ये करावे लागेल. यादवकालात ग्रंथरचनेचा प्रारंभ होऊन महत्वाचे असे वाङ्मय प्रकार जन्माला आले. बहामनी कालाच्या पूर्वार्धात परकी संस्कृतीच्या दमनशील आघातमुळे ही निर्मिती बरीच थंडावली. त्या राजवटीच्या उत्तरार्धात आक्रमकांची धार बोथट झाल्यामुळे वाङमयनिर्मितीस नवे धुमारे फुटले आणि पुढे स्वराज्याचा काल आल्यावर नाना अंगांनी हा मराठी वाङमयाचा वृक्ष बहरला.

या कालातील लेखनामध्ये निखळ वाङमयीन प्रेरणा फारच कमी आढळते. नरेंद्र किंवा मुक्तेश्वर अशा काही कवींत ती अपवादाने आढळते. एकनाथ व फादर स्टीफन्स यांचे अगदीच अल्प असे गद्य सोडले, तर प्रारंभीच्या काळात महानुभावांनी लिहिलेले व अखेरच्या शंभरसव्वाशे वर्षांत बखरींच्या रूपाने निर्माण झालेले, एवढाच गद्यवाङमयाचा एकूण पसारा आहे. बाकीचे सारे वाङमय पद्यबद्ध आहे. अभंग आणि ओवी हे छंद आरंभापासून अखेरपर्यत आढळतात. अभंग हा पारमार्थिक जीवनातील अनुभवांच्या आविष्कारासाठी, तर ओवी ही कथापर व विवेचनपर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनासाठी योजिली गेली. अक्षरगणवृत्तांचा अवलंब पंडितकवींनी अधिक केला, तर मात्रावृत्तात्मक जातिरचना शाहिरी कवितेत आढळते. आऱ्या हे मोरोपंतांच्या कवितेचे मुख्य वाहन होते, तर मध्वमुनीश्वर, अमृतराय यांनी कटाव लिहिले. इतर स्फुट रचना म्हणजे पदे, स्तोत्रे, आरत्या, भारुडे, विराण्या, गवळणी इ. होत. चरित्र-आठवणी, टीकापर-विवेचनपर, कथात्मक-भावगीतसदृश, स्थलवर्णनपर-व्यक्तिवर्णनपर अशा वाङमयप्रकारांचा उगम प्रारंभीच्या तीस-चाळीस वर्षांतच झाला. त्यांतील काही प्रकार नंतर मागे पडले व काही नाहीसे झाले. प्रदीर्घ कथापर, बखर व पोवाडा–लावणी या प्रकारांची पुढे नवी भर पडली. साहित्यदृष्ट्या अव्वल दर्जाचे असे लेखन प्राधान्याने संतांनीच केले, विद्वत्ताप्रचुर व कृत्रिम कारागिरीचे काव्य पंडित कवींनी लिहिले आणि लौकिक विषयांवरील उत्स्फूर्त अशी रचना शाहिरांनी केली. हे अर्थाच सामान्य वर्णन आहे, यात काही अपवाद इकडे तिकडे आढळतात.

मराठी साहित्याला तेराव्या शतकात जी धर्मपर, अध्यात्मपर व परलोकपर दिशा मिळाली, तीच बखरवाङमय व शाहिरी कविता वगळता पुढच्या पाचशे वर्षांत स्थूलमानाने कायम राहिली. व्यक्तिनुसार व कालानुसार अभिव्यक्तीचे रूप थोडेफार बदलले, पण गाभा तोच राहिला. किंबहुना शृंगारिक अशी लावणीही काही वेळा उपदेशपर व आध्यात्मिक झाली. निखळ वाङमयीन प्रेरणा व शुद्ध कलादृष्टी हा साहित्याचा भाग जवळजवळ आढळत नाही. साहित्याचे असे स्वतंत्र प्रयोजन, स्वयंसिद्ध मूल्य आणि साहित्यकृतींचा सौंदर्यदृष्ट्या आस्वाद या गोष्टी उत्पन्न होण्यास एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन घडून यावे लागले आणि त्यासाठी इंग्रजीसारख्या परकी भाषेतील साहित्याचा परिचय व्हावा लागला.

 

लेखक: वि.रा. करंदीकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/21/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate