অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महावंस

महावंस

सिंहलद्विपाचा (विद्यमान श्रीलंका) पाली भाषेत लिहिलेला पद्यमय, बखरवजा इतिहास. सिंहल देशाचा राजा धातुसेन (इ.स. पाचवे शतक) ह्याच्या कारकीर्दीत महानाम नावाच्या ग्रंथकाराने तो रचिला. ह्या इतिहासग्रंथात ३७ परिच्छेद किंवा उपविभाग असून सदतिसाव्या परिच्छेदाच्या पन्नासाव्या गाथेशी तो संपलेला आहे. सिंहल देशाचा पौराणिक राजा महासम्मत ह्याच्यापासून राजा महासेन ह्याच्या कारकीर्दीपर्यंतचा (कार. इ. स. सु. ३२५–५२) इतिहास महावंसात अंतर्भूत आहे. ओक्काक (इक्ष्वाकू) वंशातील शाक्य कुळात जन्माला आलेल्या गौतमबुद्धाची पूर्वपीठिका, त्याने स्थापन केलेला बौद्ध धर्म ‘देवानंपिय‘ तिस्स राजाच्या कारकीर्दीत सिंहल देशात कसा पोहोचला, तसेच सिंहल देशाच्या निरनिराळ्या राजांच्या प्रयत्नांमुळे तो तेथे कसा स्थिर झाला, ह्यांसारखे विषय महावंसात आलेले आहेत. गौतमबुद्धाने सिंहल देशाला तीन वेळा भेट दिल्याचे या ग्रंथात म्हटले असून ह्या भेटींचे वर्णन महावंसाच्या पहिल्या परिच्छेदात आहे, तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या परिच्छेदांत बौद्धांच्या तीन धर्म संगीतींचा वृत्तांत आलेला आहे. बौद्ध धर्माच्या आगमनानंतर महाविहार, अभय-गिरिविहार, उत्तर विहार वगैरे मठांची सिंहलद्विपात स्थापना झाली. बौद्धधर्माच्या उत्कर्षार्थ तेथील राजांनी स्तूप बांधले. वट्टगामणी अभय ह्याच्या कारकीर्दीत (इ. स. पु. ८८–७६) पाली भाषेतील बौद्ध साहित्य प्रथमच लेखनबद्ध करण्यात आले, हा इतिहासही महावंस सांगतो. सम्राट अशोकपूर्व भारतातील आणि सिंहलद्वीपातील समकालीन राजांची नावे, त्यांच्या कारकीर्दीची वर्षे ह्यांसारखे महत्त्वपूर्ण तपशीलही ह्या ग्रंथात आहेत. भारतातून सिंहलद्वीपात पहिली वसाहत करण्यासाठी आलेल्या विजय राजापासून पुढे दक्षिण भारतातून निरनिराळ्या काळी ‘दमिळ’ किंवा ‘तमिळ ’ देशातील लोकांनी सिंहलद्वीपातील उत्तरेकडील प्रांतावर केलेल्या स्वाऱ्या व राज्यस्थापना तसेच सिंहल देशातील लोकांनी त्यांना केलेला कडवा प्रतिकार ह्यांचेही वर्णन ह्या ग्रंथात आहे. ह्या ग्रंथात दैवी चमत्कार, आख्यायिका ह्यांनाही स्थान देण्यात आले आहे. ह्या ग्रंथाची लेखनशैली, विशेषतः दीपवंसाच्या तुलनेने, अधिक आलंकारिक व काव्यमय आहे. वंसत्थप्पकासिनी नावाची एक टीका महावंसावर असून तो महानामानेच लिहिली असावी, असा एक तर्क आहे.

डॉ. गायगर ह्याने महावंसाचा केलेला इंग्रजी अनुवाद, लंडनच्या पाली टेक्स्ट सोसायटीतर्फे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाला. भदन्त आनंद कौसल्यायन ह्यांनी ह्या ग्रंथाचा हिंदी अनुवाद केला आहे. (१९४२).

संदर्भ : 1. Law, B. C. A History of Pall Literature, 2 Vols., London, 1933.

2. Winternitz, M. A History of Indian Literature, Vol.II, Calcutta, 1933.

३. उपाध्याय, भरतसिंह, पालि साहित्यका इतिहास, प्रयाग, १९५१.

४. भागवत, एन्. के. महावंस (मूळ देवनागरी ग्रंथ व उपयुक्त इंग्रजी प्रस्तावना), मुंबई, १९३६.

लेखक: पु. वि. बापट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate