অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुक्तच्छंद (फ्री व्हर्स)

मुक्तच्छंद (फ्री व्हर्स)

आधुनिक काव्यरचनेचा प्रकार. फ्रेंच काव्यक्षेत्रात १८८० च्या दशकात 'व्हर्स लिब्रे' अशी एक चळवळ उदयास आली. ग्यूस्ताव्ह कान, लाफॉर्ग, रँबो हे प्रतिकवादी कवी या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. कवितेला पारंपरिक छंदोरचनेच्या बंधनातून मुक्त करून बोलभाषेच्या स्वाभाविक लयीला कवितेत प्राधान्य देण्याचा प्रयत्न या चळवळीतील कवींनी केला. या चळवळीने प्रभावित झालेल्या टी. एस्. एलियट, एझरा पाउंड, टी. ई. ह्यूम, एफ्. एस्. प्लिंट, रिचर्ड ऑल्डिंग्टन इ. कवींनी इंग्रजी काव्यात 'फ्री व्हर्स' ची कल्पना विसाव्या शतकाच्या प्रारंभी रूढ केली. एमी लोएल, कार्ल सँडबर्ग, विल्यम कार्‌लॉस विल्यम्स, इ. इ. कमिंग्ज, स्टीव्हन स्पेंडर, वॉलिस स्टीव्हन्स इ. कवींनी आपापल्या काव्यप्रकृतीनुसार मुक्तछंद-रचनांचे विविध प्रयोग केले. इंग्रजीबरोबर अन्य यूरोपीय भाषांतही मुक्तछंदात्मक काव्य विविध व विपुल प्रमाणात निर्माण झाले आहे. जॉर्ज एल्. बोर्जेस (अर्जेंटिना); सँ-जॉन पॅर्स (फ्रान्स); बेर्टोल्ट ब्रेक्ट (जर्मनी); जूझेप्पे उंगारेत्ती (इटली); फेदेरिको गार्सीआ लॉर्का (स्पेन); व्हल्‌द्यीम्यीर मायकोव्हस्की (रशिया) इ. कवींचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

मुक्तछंदाची चळवळ आधुनिक काळात उदयास आली. अशाच प्रकारची बंधमुक्त व निर्भरशील काव्यनिर्मिती स्वच्छंदतावादी कवींनीही केली आहे. उदा., कोलरिजचे 'ख्रिस्ताबेल' हे काव्य (१८१६). अमेरिकन काव्यात इमर्सननेही असे प्रयोग केले. वॉल्ट व्हिटमनचे 'लीव्हज ऑफ द ग्रास'(१८५५) हे काव्य ध्वन्यानुसारी आरोहावरोहात्मक आंदोलनाचा वापर करून लिहिले आहे.

मुक्तच्छंद हा काव्यनिर्मितीच्या आंतरिक गरजेतून निर्माण झालेला एक नवा छंद म्हणता येईल. पूर्वीची छंदोबद्ध कविता गेय व श्रवणीय होती; तर मुक्तच्छंद हा डोळ्यांना व मनाला आवाहन करणारा ध्वन्यानुसारी व उच्चारानुसारी रचनाप्रकार आहे. मुक्तच्छंद विशिष्ट धाटणीने वाचल्यास त्यातील लय-तालाचा प्रत्यय येतो. अनियमित पण गतिमान व सतत परिवर्तनशील अशी तालबद्धता (ऱ्हिदम), तोल (बॅलन्स), शब्दरचनेतील ध्वन्यानुसारी आरोहावरोह व आंदोलने (केडेन्स) व लय (टेंपो) ही मुक्तच्छंदात्मक पद्यरचनेची मूलतत्त्वे साधारणपणे मानली जातात. वृत्तबद्ध काव्यात कवीच्या अभिव्यक्तीवर अपरिहार्यपणे काही मर्यादा येतात; मुक्तच्छंदामध्ये कवीला अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य लाभते, असेही म्हणता येईल. मुक्तच्छंदाची बंडखोरी तालाविरुद्ध नसून तालावर वृत्तबद्धतेत जे जाचक निर्बंध लादले जातात, त्यांविरुद्ध आहे. अक्षरांची आणि चरणांची संख्या, तालाची विशिष्ट आवर्तने, अन्त्य यमकादी संकेत यांसारख्या सांकेतिक व साचेबंद निर्बंधांतून मुक्त झालेला छंद तो मुक्तच्छंद, असे म्हणता येईल. मुक्तच्छंद हा सयमक व निर्मयक असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. मात्र ते यमक स्वाभाविकपणे नादसाम्याच्या अंतर्गत प्रचितीने आले पाहिजे; कृत्रिम जुळलेले नसावे.

आधुनिक मराठी काव्यक्षेत्रात निर्मयक कवितेच्या रचनेचे काही प्रयत्न झाले; परंतु १९३० नंतर झालेले मुक्तच्छंदात्मक रचनेचे प्रयोग, ही मराठी काव्यक्षेत्रातील महत्त्वाची क्रांतीकारक घटना होय. या प्रयोगांचे स्फूर्तिस्थान इंग्रजीतील 'फ्री व्हर्स' हेच असले, तर त्याच्या जोडीला मिल्टनने प्रसृत केलेली 'ब्लँक व्हर्स' व त्याच थाटावर बंगालीत मायकेल मधुसूदन दत्त यांनी निर्माण केलेल्या ‘अमित्राक्षर’ यांचाही मराठीतील मुक्तच्छंदात्मक प्रयोगांवर फार मोठा परिणाम झालेला आढळतो. वि. दा. सावरकरांनी स्वतंत्रपणे निर्माण केलेले ‘वैनायक’ वृत्त हे अशा प्रयत्नांचे एक आद्य उदाहरण म्हणता येईल. ते धावत्या प्रवाही रचनेला बरेचसे अनुकूल आहे. पाश्चात्त्य मुक्तपद्य साघात, आरोहावरोही लयतत्त्वावर आधारलेले आहे. मराठीत येताना मुक्तपद्याने मराठीला सहज अशा विलंबित छांदस उच्चारणाची ढब स्वीकारली. पु. शि. रेगे यांनी  ‘सहज काव्य’ या नावाच मात्रिक आवर्तनाची छटा असलेला, ‘म्हणणी’योग्य छंद वापरात आणला. पण पुढे त्यांनी छांदस मुक्तच्छंदस स्वीकारला. हा मुक्तच्छंद मुख्यत्वे कवी अनिल आणि वा. ना. देशपांडे यांनी प्रचलित केला. त्याची मांडणी भृंगावर्तनी षण्मात्रक असते. क्वचित षडक्षरी-पंचाक्षरी तुकडेही एकत्र आलेले असतात. अनिलांच्या प्रेम आणि जीवन (१९३५), भग्नमूर्ती (१९४०), निर्वासित चिनी मुलास (१९४३), पेर्तेव्हा (१९४०) या काव्यरचनांमध्ये हा मुक्तच्छंद समर्थपणे वापरला आहे. रेगे  यांचे हिमसेक, ना. ग. जोशींचे विश्वमानव इ. काव्यांचाही या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा लागेल. वा. ना. देशापांडे यांनीही मुक्तच्छंदाचा विशेष प्रचार केला. गद्यपद्याच्या सीमेवर येईल अशी मुक्तशैली आणि कसलीही चाल न लावता, केवळ विरामचिन्हांच्या आधारे सरळ गद्यसदृश वाचता येईल अशी मुक्त ओवी हे रचनाप्रकार त्यांनी आणले. याबरोबरच गद्यगीतासारखे प्रयोगही होत राहिले. त्याचे स्फूर्तीस्थान रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली गीतरचनांचे इंग्रजीत भाषांतर करताना जे तालबद्ध मुक्त गद्य वापरले, त्यात होते. उदा., कांती बुधे यांचा हिमशिखरे हा गद्यगीतसंग्रह. कुसुमाग्रजांच्या समीधा संग्रहातील काही काव्यरचना, ना. ग. जोशींच्या विश्वमानवातील काही खंड हे या धर्तीचे आहेत.

मराठी नवकव्याच्या प्रभावकाळात,स्थूलमानाने १९४५ नंतरच्या कालखंडात मुक्तच्छंद-रचनेचा एक नवा टप्पा दिसून येतो. या कालखंडातील कवींनी छंदाचा स्वतंत्र वा अलगपणे विचार न करता काव्याचा एकंदर रूपाचाच व्यापक तत्त्वातून शोध घेण्यास प्रारंभ केला. त्यामळे मुक्तच्छंदाची विविध रूपे या काळात प्रकट झालेली दिसून येतात. वृत्त-जाती-छंदाचे काही तयार साचे काव्याला उपयोगी पडू शकतात, यावर या कवींचा विश्वास नव्हता. आशयातील अंतर्गत लयीला त्यांनी प्राधान्य दिले. जुन्या पादाकुलकी मात्रावर्तनी रचनेचा प्रयोग मर्ढेकरांच्या काव्यात दिसतो. छांदस मात्रावर्तनी मुक्त पद्यरचनेपासून ते सूक्ष्म आघात-आंदोलनांतून व्यक्त होणाऱ्या लयीपर्यंत मुक्त रचनेचे नानाविध प्रयोग या कालखंडात झाले. पु. शि. रेगे यांची कविता आघात-आंदोलनांतील सूक्ष्म भावार्थ-छटा व्यक्त करते. बोलीतील आणि वक्तृत्वशैलीतील सहज लयीची विविध रूपे प्रकट करणारे विंदा करंदीकरांचे प्रयोग महत्त्वपूर्ण आहेत. र. कृ. जोशींच्या कवितेतून दृश्य ध्वनिगुणांचा प्रभावी वापर केलेला दिसून येतो. आजच्या पद्यरचनेत याप्रमाणे सांगितिक, श्रवणसुभग असा केवळ श्राव्य लयीऐवजी आघात-आंदोलनात्मक रचनेवर भर देण्याची प्रवृत्ती दिसून येत असली, तरी ही रचनातत्त्वे परमार्थाने लयतत्त्वाशीच निगडित आहेत.

संदर्भ : 1. Fraser, G. S. Metre, Rhyme and Free Verse, London, 1970.

२. अनिल, भग्नमूर्ती : परिशिष्टे, पुणे, १९६५.

३. जोशी, ना. ग. मराठी छंदोरचनेचा विकास, मुंबई, १९६४.

४. तेंडुलकर, रमेश, “छंदोमुक्ती”: अनुष्टम्, सप्टेंबर-ऑक्टोबर, १९८४, धुळे.

लेखक: वि. का.

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate