অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुद्राराक्षस

मुद्राराक्षस

सात अंकी संस्कृत नाटक. कर्ता विशाखदत्त. मुद्राराक्षसाच्या प्रारंभकात त्याने स्वतःच म्हटल्याप्रमाणे, सामन्त वटेश्वरदत्ताचा तो नातू व महाराज भास्करदत्ताचा पुत्र. विशाखदत्ताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि इ. स. च्या नवव्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला, असे दिसते.

भारतवाक्यात ‘अवन्तिवर्मा’ (मौखरी वंशीय, इ. स. सातवे शतक; किंवा काश्मीर वंशीय, इ. स. नववे शतक) किंवा 'चन्द्रगुप्त' (गुप्त वंशीय दुसरा चंद्रगुप्त, इ.स. ३७५–४१३) असा राजांचा उल्लेख आहे. त्याअनुरोधाने विशाखदत्ताचा व मुद्राराक्षसाचा काल ठरावा.

चंद्रगुप्त मौर्याचे राज्यशासन स्थिर करण्यासाठी चाणक्याने राजकारणी डावपेच लढवून नंदराजाचा अमात्य राक्षस याच्यावर जी बौद्धिक मात केली ती या नाटकात वर्णिली आहे. राक्षसाच्या सर्व कारस्थानांना जागरूक चाणक्य आतूनच सुरूंग लावतो. राक्षसाची 'मुद्रा' (अंगठी) गुप्त हेराकरवी हाती येताच, कपटलेख लिहवून, राक्षसाच्या साहाय्यक राजांचा तो धुव्वा उडवितो. एकीकडे चंद्रगुप्तात व आपल्यात वेबनाव झाल्याचे दाखवून दुसरीकडे राक्षसाच्या कुटुंबाला आश्रय देणाऱ्या चन्दनदासावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याला सुळी देण्याचे नाटक चाणक्य रचतो. मित्राचे प्राण की शत्रूचे अमात्यपद असा बिनतोड डाव राक्षसापुढे टाकून चाणक्य त्याला जिंकतो आणि मग प्रतिज्ञापूर्तीच्या आनंदात निरिच्छ मनाने तपस्येसाठी निघून जातो. नाटकाला इतिहासाची छटा आहे. पण त्याचा विषय आहे राजनीती. चाणक्य आणि राक्षस या धुरंधर मुत्सद्यांचा बौद्धिक संघर्ष हे नाट्यकथेचे सूत्र आहे. त्यांच्या डावपेचांची, गुप्त हेरांच्या कामगिरीची, वाद-चर्चेची नाट्ययोजना, कुशल सेनानीने केलेल्या व्यूहरचनेसारखी किंवा तार्किकाच्या प्रमेयमांडणीसारखी आहे.

प्रणयाचे रंग, हळुवार भावचित्रे, भाषेचा विलास इ. रंजकतेचे संकेत डावलण्याचे धैर्य विशाखदत्ताने दाखविले आहे, हे ह्या नाटकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. मुद्राराक्षसात नायिका नाहीच; स्त्रीपात्रही एकच-चंदनदासाची पत्नी-आणि तेही कामापुरतेच योजिलेले. विशाखादत्ताच्या शैलीतही तशी काव्यात्मकता नाही; पण विचार आणि संघर्ष पेलण्याचे सामर्थ्य तिच्यात निश्चित आहे.

मुद्राराक्षस रुक्ष नव्हे; पण गंभीर नाटक आहे. भासाचे प्रतिज्ञायौगंधरायण सोडल्यास, राजनीतीच्या विषयावरील, तर्कनिष्ठेने रचलेले, बुद्धिविलासाने नटलेले हे एकच नाटक संस्कृत साहित्यात पाहावयास मिळते.

इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, आणि इटालियन अशा विविध भाषांत मुद्राराक्षसाचे अनुवाद झालेले आहेत. मराठीत कृष्णशास्त्री राजवाडे ह्यांनी (१८६७) आणि जयराम केशव अनसारे ह्यांनी (१९००) ह्या नाटकाची केलेली भाषांतरे उल्लेखनीय आहेत.

लेखक: गो. के. भट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate