অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेघदूत

मेघदूत

महाकवी कालिदासाचे संस्कृत खंडकाव्य. त्याची श्लोकसंख्या निरनिराळ्या प्रतींत ११०, १११, ११७, ११८, १२० अशी वेगवेगळी आढळते. तथापि अधिकृत प्रतीप्रमाणे ती १११ आहे. कोणा यक्षाला कर्तव्यच्युतीमुळे कुबेराने शाप देऊन एका वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा केली. रामगिरीवर विरहाचे आठ महिने त्याने कसेबसे काढले. आषाढाच्या प्रथमदिनी वर्षामेघाला पाहून आपल्या पत्नीकडे संदेश पाठविण्याची कल्पना त्याला आली. या भूमिकेवर मेघाला विनंती, प्रवासमार्ग, अलकेतील घराच्या खाणाखुणा आणि विरहव्यथित यक्षपत्नी यांचे वर्णन, तिला धीराचा संदेश, अशी काव्यकथेची मांडणी आहे.

रचनेची ही सरलता भावदर्शनाला पोषक झाली आहे. संदेशाची मूळ कल्पना रामायणावरून सुचली असावी; कारण पवनतनयाने मैथिलीकडे नेलेल्या रामसंदेशाचा उल्लेख काव्यातच आहे. कदाचित ⇨ कालिदासाच्या वैयक्तिक अनुभूतीमधूनही या काव्याचा जन्म झाला असेल.

मेघाला संदेशवाहक बनविण्याची कविकल्पना भामहाला सदोष वाटली; आधुनिकांना अशक्य वाटेल. विराहाला कारण होणारा शाप असाच असंभाव्य. त्याहून, विरहाचा मर्यादित अवधी आणि त्यानंतर होणारे निश्चित पुनर्मीलन वेदनेची धार बोथट करून यक्षाच्या शोकाला भाबडा भावनातिरेक बनवितात, असे काही टीकाकारांना वाटते.

कालिदासाला हे कच्चे दुवे दिसले आहेत. शापाचा हेतू त्याच्या काळी संभाव्य वाटण्यास अडचण नव्हती आणि कामार्तांना चेतनअचेतनांचा विवेक कसा सुचावा? ही यक्षाने मेघाला केलेल्या विनवणीची त्याची संपादणी आहे. खरे म्हणजे, या भावकाव्याकडे प्रखर वास्तवाच्या दृष्टीतून पाहाणे हाच प्रमाद होईल, यक्ष आणि त्याची अद्‌भूत नगरी, विरहाचे कारण, मेघाचे मानुषीकरण इत्यादी तपशील काव्यदृष्ट्या साधन आहे; त्याचा कोटेकोरपणा कवीने राखला नाही. कवीचे साध्य आहे, प्रेमविव्हल विरही मनाची नाजूक व्यथा. मेघदूतात कविमनाचा कानोसा आहे, एका चिरंतन अनुभूतीची काव्यात्म अभिव्यक्ती आहे.

पूर्वार्धात रामगिरी चे अलका या प्रवासमार्गाचे वर्णन करताना अनेक भौगोलिक प्रदेश, शहरे, नद्या, पर्वत, पक्षी इत्यादींची चित्रे अचूक रेखीव तपशील भरून कालिदासाने साक्षात उभी केली आहेत. या वर्णनातील वास्तव, अलका आणि यक्षभूमी यांच्या अद्‌भुतरम्यतेमध्ये हरवते; पण यक्षपत्नीची मानवी मूर्ती आणि तिची बोलकी विरहव्यथा भावसत्याशी पुन्हा हातमिळवणी करतात. संवेदनशील मानवी हृदयाचे हे भावनिक सत्य हेच मेघदूताचे काव्यरूप सत्य म्हटले पाहिजे.

मेघदूतातील एकेक श्लोक स्वयंपूर्ण चित्रासारखा आहे. संकल्पित मेघप्रवासात निसर्गचित्रे रंगविली आहेत; पण त्यांना मानवी भावांची चौकट आहे. यक्षपत्नीच्या चित्रणात निसर्गरंगाची चौकट भावमूर्तीला घातलेली आहे. अनिवार्य प्रेमाची उत्कटता आणि विरहाची जीवघेणी व्यथा येथे भावाची मृदुता, अर्थान्तन्यासाची विश्वात्मता आणि शब्दार्थाचे लाघव घेऊन प्रकटली आहे. येथे विरहाचे आक्रंदन नाही; पण शृंगाराचे रंग मात्र मधूनच उत्तान होतात. विरहित पतीने चिरयौवना पत्नीच्या केलेल्या अहर्निश चिंतनातून ते आलेले आहेत. मुख्य चित्र अर्थात विरहव्यथेचे आहे. त्याला साजेशी मंदाक्रांता वृत्ताची संथ धीरगंभीर चाल म्हणजे सुरावट आणि लय यांचा युगुलबंधच.

मेघदूताची मोहिनी रसिक मनावर अशी, की त्याचे अनुकरण करणारी अनेक काव्ये संस्कृतात-देशी भाषांत झाली आणि मेघदूताचा भाषानुवाद करण्याचा मोह अजूनही कोणाला टाळता येत नाही.

मेघदूताचा अनुवाद विविध भाषांत झालेला आहे. उदा., एच्. एच्. विल्सनकृत इंग्रजी पद्यानुवाद (१८१३), माक्स म्यूलर ह्याने केलेला जर्मन पद्यानुवाद (१८७४), ए. ग्वेरिनॉट ह्याचा फ्रेंच अनुवाद (१९०२) इत्यादी. मराठीत कृष्णशास्त्री चिपळूणकर, बा. ल. अंतरकर (मेघदूतच्छाया, १९०५) आदींचे अनुवाद प्रसिद्ध आहेत. चिपळूणकरांनी केलेला अनुवाद त्यांच्या पद्यरत्नावलीत (१८६५) अंतर्भूत आहे; अलीकडच्या काळात कवी बा. भ. बोरकर ह्यांनी मेघदूताचा पद्यानुवाद केला आहे (१९८१).

लेखक: गो. के. भट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate