অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यजुर्वेद

अध्वर्यु, होता, उद्‌गाता व ब्रह्मा या चार प्रमुख ऋत्विजांपैकी अध्वर्यु नावाचा ऋत्विज यज्ञतंत्रासाठी ज्या वेदातील मंत्रांचा उपयोगात करतो, त्या वेदास यजुर्वेद म्हणतात. यासाठीच यजुर्वेदास अध्वर्युवेद  अशीही संज्ञा आहे. यज्ञप्रक्रिया आणि यज्ञानुष्ठानातील क्रम लक्षात घेऊनच या वेदाचे संकलन केले असल्याने या वेदाच्या संहितांना ‘याज्ञिकी संहिता’ असे म्हणतात.

वैदिक मंत्रांचे तीन प्रमुख प्रकार

ऋक्‌, यजुस्‌ व साम असे वैदिक मंत्रांचे तीन प्रमुख प्रकार होत. छन्दोबद्ध मंत्र अथवा पद्य म्हणजे ऋङ्मंत्र. छंदोमय नसलेल्या गद्यमंत्रांना यजुर्मंत्र म्हणतात. तसेच गीतिस्वरूप मंत्रांना साम-मंत्र म्हटले जाते. यांपैकी यजुर्मंत्रांच्या संग्रहास आणि त्यावरील विवरणात्मक ब्राह्मण ग्रंथास यजुर्वेद असे नाव मिळाले आहे. यजुर्वेदात ऋङ्मंत्र अंतर्भूत असले, तरी ते अधिकाशाने ऋग्वेदातून संकलित केले आहेत.

यजुर्वेदाच्या शाखा

चरणव्यूहया परिशिष्टग्रंथात यजुर्वेदाच्या ८६ शाखा असल्याचा उल्लेख मिळतो. पातञ्जलमहाभाष्यातही यजुर्वेदाच्या १०१ शाखा असल्याचा निर्देश आहे. यांपैकी सध्या सहाच शाखा उपलब्ध असून त्यांपैकी दोन शाखा फक्त ग्रंथनिविष्ट स्वरूपात आहेत.

यजुर्वेदाचे भेद

यजुर्वेदाचे ‘कृष्ण यजुर्वेद’ आणि ‘शुक्ल यजुर्वेद’ असे दोन भेद आहेत. ‘कृष्ण यजुर्वेदा’च्या सर्व शाखांत मंत्र आणि ब्राह्मण भागाची सरमिसळ झालेली दिसते.‘शुक्ल यजुर्वेदा’त मंत्र आणि ब्राह्मण भाग यांची व्यवस्थित विभागणी केली असून मंत्र भागाच्या संकलनात्मक ग्रंथांच्या ‘शुक्ल यजुर्वेद संहिता’ तयार झाल्या. स्वतंत्र केलेला ब्राह्मण भाग शतपथब्राह्मण म्हणून ओळखला जाऊ लागला.

‘कृष्ण’ आणि ‘शुक्ल’ अशा यजुर्वेदाच्या विभागणीसाठी पुराणात पुढीलप्रमाणे आख्यायिका आढळते : यजुःसंहितेचा पहिला पाठक वैशंपायन होता. त्याच्या ब्रह्महत्येच्या पातकाचे निरसन करण्यासाठी त्याच्या शिष्यांनी व्रताचरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शिष्यांना ‘चरक’ असे नाव मिळाले. या प्रसंगी ‘हे दुबळे शिष्य कसले व्रताचरण करतील, मीच आपणासाठी व्रताचरण करतो’, असे वैशंपायनाचे एक शिष्य याज्ञवल्क्य म्हणाले. हे ऐकून वैशंपायनांनी, आपल्या शिष्यांचा अवमान करणाऱ्या याज्ञवल्क्यास, ‘माझ्याकडून शिकलेले वेद परत दे’ असे सांगितले. याज्ञवल्क्यांनीही गुरूच्या सांगण्याप्रमाणे शिकलेली यजुःसंहितातत्काळ ओकून टाकिली. ते ओकलेले वेद, ऋषींनी तित्तिरिपक्ष्यांचे रूप घेऊन स्वीकारले. तित्तिरींनी स्वीकारलेल्या यजुर्वेदास ‘तैत्तिरीय’ अशी संज्ञा मिळाली. नंतर याज्ञवल्क्याने सूर्याची उपासना केली व ‘अयातयाम’, म्हणजे यापूर्वी कुणाच्याही तोंडी राहून शिळे न झालेले नवीन यजुर्मंत्र सूर्यापासून मागून घेतले. सूर्याने वाजीचे म्हणजे घोड्याचे रूप घेऊन याज्ञवल्क्यास ताजे यजुर्मंत्र दिले. नवीन मिळालेल्या यजुर्मंत्रांच्या याज्ञवल्क्याने पंधरा शाखा केल्या. त्या माध्यंदिन, काण्व इ. ऋषींनी स्वीकारल्या म्हणून ‘शुक्ल यजुर्वेदा’च्या माध्यंदिन, कण्व इ. शाखा प्रचलित झाल्या. (भागवतपुराण१२·६·६१– ७४).

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या तैत्तिरीय, मैत्रायणी, काठक आणि कपिष्ठल अशा चार शाखा उपलब्ध असल्या, तरी सध्या मैत्रायणी आणि तैत्तिरीय अशा दोनच शाखा प्रचारात आहेत. उरलेल्या दोन फक्त ग्रंथरूपात मिळतात.

कृष्णयजुर्वेद-तैत्तिरीय:तैत्तिरीय शाखेचे संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक असे स्वतंत्र विभाग केलेले आहेत. ही शाखा ‘कृष्ण यजुर्वेदा’ची असल्याने संहितेत आणि ब्राह्मणग्रंथांतही मंत्र व ब्राह्मणाची सरभेसळ आहेच. त्यात यज्ञांचा क्रमही पाळलेला दिसत नाही. ‘कृष्ण यजुर्वेद’ प्रापश: ‘शुक्ल यजुर्वेदा’च्या पूर्वीचा समजल्यास ऋग्वेदाच्या संहिता व ब्राह्मण अशा विभागणीच्या कृत्रिम अनुकरणासाठी तैत्तिरीय शाखेचीही अशी विभागणी केलेली असावी. या संदर्भात तैत्तिरीयब्राह्मण  व आरण्यक  संहितेप्रमाणेच सस्वर आहेत. ऋग्वेदाचेऐतरेयब्राह्मणसस्वर नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

तैत्तिरीयब्राह्मण आणि आरण्यकयांचा पदपाठ नाही. तैत्तिरीय संहितेचा पदपाठ उपलब्ध असून अत्रिऋषी हे तैत्तिरीयाचे पदकार म्हणून परंपरेस ज्ञात आहेत. म्हणून या शाखेस आत्रेयी शाखा असे म्हणतात.

तैत्तिरीय शाखेचे विषयविभागदर्शक ‘सारस्वत’ व ‘आर्षेय’ असे दोन पाठ कल्पिलेले असावेत. त्यांपैकी आर्षेयपाठक्रम अनुक्रमणीमध्ये निर्दिष्ट असून प्रचारात फक्त सारस्वतपाठक्रम आहे.

तैत्तिरीयसंहिते ची सात व ब्राह्मणाची तीन काण्डे असून, काण्डांची प्रपाठकांत (प्रश्न) आणि अनुवाकांत विभागणी केलेली आहे.

तैत्तिरीयसंहिते त दर्शपूर्णमास, सपशु अग्निष्टोमादि सोमसंस्था, पुनराधान, ऐष्टिक याजमान, चातुर्मास्यासहित राजसूय, काम्यपशु, काम्येष्टि, अग्निचिति, अश्वमेध, सत्रे, गवामयन इ. विषयांचा अंतर्भाव आहे.

तैत्तिरीयब्राह्मणात अग्न्याध्येय, गवामयन, वाजपेय, नक्षत्रेष्टि, राजमृय (अनुब्राह्मण), अग्निहोत्र, दशहोतृ, उपहोत्र, सौत्रामणि, एकाह, बृहस्पतिसव, दर्शपूर्णमास (ब्राह्मण), पुरुषमेध, इष्टि, हौत्र, पशुहौत्र, प्रायश्चित्त, अश्वमेध (ब्राह्मण), सावित्रचिति, नाचिकेतचिति, चातुहोर्तृचिति (मंत्र), (दिवःश्येनेष्टि, अपावेष्टि), वैश्वसृजचिति इ. विषयांचा अंतर्भाव आहे.

तैत्तिरीय शाखेचे स्वतंत्र आरण्यक असून परंपरेनुसार आरण्यक ‘व्रती’ने अरण्यात म्हणावयाचे असते. ‘व्रती’ने आचरावयाची व्रते तैत्तिरीयआरण्यकात दिली आहेत. तैत्तिरीयआरण्यकाच्या प्रपाठकसंख्येत आणि क्रमात परंपरेनुसार भिन्नता आढळते. मैसूर आवृत्तीप्रमाणे तैत्तिरीयआरण्यकात आठ प्रपाठक असून-(१) आरुणकेतुकचिति, (२) स्वाध्याय ब्राह्मण, (३) चातुहोर्तृ (मंत्र), (४) पितृमेध, (५) तैत्तिरीय उपनिषद, (६) नारायणोपनिषद व (७–८) प्रवर्ग्य असा विषयक्रम आहे. पुण्याच्या आनंदाश्रम आवृत्तीत दहा प्रपाठक असून त्यांचा विषयक्रम–(१) आरुणकेतुकचिति, (२) स्वाध्याय ब्राह्मण, (३) चातुहोर्तृ (मंत्र), (४–५) प्रवर्ग्य, (६) पितृमेध, (७–९) तैत्तिरीय उपनिषद, (१०) नारायणोपनिषद असा आहे. या क्रमातही सायणाचार्यांनी नववा प्रपाठक स्वतंत्र न मानता तो आठव्या प्रपाठकाचाच शेवटचा अनुवाक मानलेला दिसतो.

नारायणोपनिषदास याज्ञिकी उपनिषद अशी संज्ञा असून या उपनिषदाच्या पाठपरंपरेतही बहुविधता असल्याचे सायणाचार्यांनी निर्दिष्ट केले आहे. या निर्देशानुसार द्राविडांचा ६४ अनुवाकांचा, आंध्रीयांचा ८० अनुवाकांचा, कर्नाटकीयांचा ७४ अनुवाकांचा तर इतरांचा ८९ अनुवाकांचा पाठ दिसतो. तैत्तिरीयब्राह्मणात अंतर्भूत केलेली-सावित्रचिति, नाचिकेतचिति, चातुहोर्तृचिति-ब्राह्मण (दिवःध्येनेष्टि व अपाघेष्टींसह) व वैश्वसृजचिति, तसेच तैत्तिरीयआरण्यकात निर्दिष्ट केलेला आरुणकेतुकचिति, स्वाध्याय ब्राह्मण ही प्रकरणे परंपरेनुसार कठ ऋषींनी दृष्ट समजली जातात.

तैत्तिरीय शाखेची रचना विस्कळित असल्याने एकदा संकलित केलेल्या विषयांचे शेषांश पुन्हा अन्यत्र संकलित केलेले आढळतात.

कृष्ण यजुर्वेद-मैत्रायणी

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या मैत्रायणी शाखेची फक्त संहिता आणि उपनिषद अस्तित्वात आहेत. चरणव्यूहाप्रमाणे चरकांच्या १२ शाखांपैकी मैत्रायणी एक शाखा आहे. या शाखेच्या ७ उपशाखांचा उल्लेख चरणव्यूहात असला, तरी सध्या मानव आणि वाराह या दोनच उपशाखा सूत्र स्वरूपाने उपलब्ध आहेत.

बौधायनश्रौतसूत्राने (३०·८) मैत्रायणीब्राह्मणातून उद्‌धृत केलेले उद्धरण आज उपलब्ध असलेल्या मैत्रायणी संहितेत नाही. यावरून बौधायनासमोर स्वतंत्र मैत्रायणीब्राह्मण असावे असे वाटते.

मैत्रायणी शाखेचे स्वतंत्र आरण्यक नाही. तथापि मैत्रायणीसंहितेच्या अंतर्गत प्रवर्ग्यकाण्डास (मैसं. ४·९) मानवश्रौतसूत्राने (माश्रौ. ६·१·७·२०; ४·४·४३) व मैत्रायणीसंहितेतील ब्राह्मण वचनानेही (मैसं. ३·३·१०) आरण्यक म्हणून संबोधिले आहे. तैत्तिरीय शाखेने प्रवर्ग्यकाण्ड आरण्यकात अंतर्भूत केले आहे.

उपलब्ध मैत्रायणीसंहितेची चार काण्डे असून शेवटचे काण्ड खिल काण्ड म्हणून प्रसिद्ध आहे. या शाखेची मैत्रायणी-मंत्र-संहिता हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध असून ती ३० प्रपाठकांत विभागली आहे. ऋग्वेदादिमंत्रसंहिता जशा अर्वाचीन काळी स्मार्तकर्मासाठी संकलित केलेल्या आहेत तशी ही मंत्रसंहिता नसून श्रौतयज्ञांसाठी ही मंत्रसंहिता संकलित केलेली दिसते. अशा रचनेचा निर्देश अष्टावक्र कारिकेत असल्याने ती प्राचीन असावी. मंत्र ब्राह्मणांची सरभेसळ दूर करून अध्वर्यूच्या यज्ञतंत्रास आवश्यक मंत्रसंकलनाचा उद्देश या रचनेत दिसतो.

काठकसंहिता

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या काठकशाखेची संहिता उपलब्ध असून इठिमिका, मध्यमिका आणि ओरमिका या नावांनी ज्ञात असलेल्या तीन विभागांत संहितेची विभागणी केलेली आहे. याज्यानुवचन हा भाग ‘ओरमिका’चा भाग म्हणून अंतर्भूत केला असून, अश्वमेध प्रकरण परिशिष्ट स्वरूपात जोडले आहे. कठशाखासुद्धा चरकांची एक शाखा मानला जाते. या शाखेची स्वराक्‌ङन पद्धती उपलब्ध नाही. पूर्वी काठकब्राह्मणस्वतंत्र असावे. सध्या उपलब्ध नाही. डॉ. सूर्यकांत यांनी काठकब्राह्मणातून उद्‌धृत केलेल्या उद्धरणांचे संकलन करून ते काठकसंकलननावाने प्रसिद्ध केले आहे. काठक-आरण्यक स्वतंत्र रीत्या उपलब्ध असून त्यात प्रवर्ग्य अंतर्भूत आहे. शाखेचे कठोपनिषदप्रसिद्ध आहे.

कृष्ण यजुर्वेद-कपिष्ठल शाखा

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या कपिष्ठलशाखेची फक्त संहिता त्रुटित स्वरूपात उपलब्ध असून ती ४८ अध्यायांत विभक्त आहे. वस्तुतः ऋग्वेदीय होण्यासाठी असलेल्या याज्यानुवाक्यांचा संग्रह कपिष्ठलसंहितेत अंतर्भूत नाही. असे याज्यानुवाक्यांचे संग्रह तैत्तिरीय, मैत्रायणी व काठक संहितांत आढळतात. कपिष्ठल ही चरकांचीच एक शाखा होय.

शुक्ल-यजुर्वेद-माध्यंदिन व काण्वशाखा

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या वर उल्लेखिलेल्या चारही शाखामध्ये मंत्र आणि ब्राह्मण यांची सरभेसळ आहे. यज्ञतंत्रात विनियुक्त मंत्रांना ब्राह्मणभागापासून वेगळे करण्याच्या आवश्यकतेतून ‘शुक्ल यजुर्वेदा’चा जन्म झालेला दिसतो. परिणामतः ‘शुक्ल यजुर्वेदा’च्या संहिता ब्राह्मणग्रंथ यांच्या स्वतंत्रपणे रचना होऊन अध्वर्यूंसाठी स्वतंत्र यजुर्वेदाची शाखा निर्माण झाली. अशी रचना परंपरेनुसार महर्षी याज्ञवल्क्यांनी केलेली आहे.

‘शुक्ल यजुर्वेदा’च्या सध्या माध्यंदिन व काण्व अशा दोन शाखा प्रचारात आहेत. माध्यंदिन आणि काण्व या दोनही संहितांचे ४० अध्याय आहेत. माध्यंदिन आणि काण्व ब्राह्मण उपलब्ध असून ते शतपथब्राह्मणया नावाने ओळखले जाते. माध्यंदिनशतपथब्राह्मणांची १४ काण्डे असून त्याचे १०० अध्याय आहेत. १०० अध्यायांचा ग्रंथ म्हणून ‘शतपथ’ ही संज्ञा सार्थ ठरते. तथापि काण्वशतपथब्राह्मणात मात्र १७ काण्डांची विभागणी १०४ अध्यायांत केलेली दिसते.

या शाखांचे स्वतंत्र आरण्यक नाही. प्रवर्ग्याचे मंत्र संहितेत, तर ब्राह्मणभाग शतपथब्राह्मणात अंतर्भूत आहे.

‘शुक्ल यजुर्वेदा’च्या ईशोपनिषदाचा अंतर्भाव संहितेत असून बृहदारण्यकोषनिषदाचा अंतर्भाव शतपथब्राह्मणात केलेला आहे.

सामान्यतः तैत्तिरीय शाखेचे विषय यजुर्वेदाच्या इतरही शाखांत कमीअधिक प्रमाणात आढळतात.

यजुर्वेदाची रचना ऋग्वेदसंकलनाच्या शेवटच्या कालखण्डात झाली असावी. मैत्रायणी, काठक आणि कपिष्ठल यांचा एक कालखण्ड, तैत्तिरीय शाखेचा दुसरा कालखण्ड आणि ‘शुक्लयजुर्वेदा’चा तिसरा कालखण्ड असे सामान्यत:यजुर्वेदरचनेच्या कालखण्डांचे पौर्वापर्य मानता येईल.

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या तैत्तिरीय संहितेचे इंग्रजी भाषांतर ए. बी. कीथ ह्यांनी केले आहे (१९१४). ह्या संहितेचे संपादन ए. वेबर (१८७१), इ. रोएर व इ. बी. कॉवेल (पदपाठ व सायणभाष्य ह्यासह १८६०), श्री. दा. सातवळेकर (१९४५), काशीनाथशास्त्री आगाशे (पदपाठ व सायणभाष्य ह्यांसह १९००), ना. श्री. सोनटक्के व त्रि. ना. धर्माधिकारी (पदपाठ, सायणभाष्य आणि भट्टभास्करभाष्य ह्यांसह; १९७०–८५) ह्यांनी केले आहे.

‘कृष्ण यजुर्वेदा’च्या तैत्तिरीयब्राह्मणाचे संपादन गोडबोले (१८९८) आणि शामशास्त्री (भट्टभास्करभाष्यासह, १९०८) ह्यांनी केले आहे, तर तैत्तिरीयआरण्यकाचे संपादन बाबाशास्त्री फडके (सायणभाष्यासह, १९२६) आणि महादेवशास्त्री व रंगाचार्य (भट्टभास्करभाष्यासह, १९००) ह्यांनी केले आहे.

श्रडर (१८८१) आणि श्री. दा. सातवळेकर (१९४२) ह्यांनी संपादिलेल्या ‘कृष्ण यजुर्वेदा’च्या मैत्रायणीसंहितेच्या व काठकसंहितेच्या आवृत्त्या उल्लेखनीय आहेत. ‘कृष्ण यजुर्वेदा’ची कपिष्ठलव कठसंहिता  रघुवीर ह्यांनी संपादिली (१९३२). ‘शुक्ल यजुर्वेदा’ची वाजसनेयीमाध्यंदिनसंहिता  ए. वेबर ह्यांनी महीधरभाष्यासह प्रसिद्ध केली (१८५२), तर निर्णयसागर प्रेसने ती उव्वट व म्हीधर भाष्यांसह प्रसिद्ध केली आहे (१९१२). धुंडिराजशास्त्री बापट व श्रीधरशास्त्री पाठक ह्यांनी ही संहिता मराठी भाषांतरासह प्रसिद्ध केली (अनुक्रमे १९४०, १९४२). ह्या शाखेची हिंदीतही भाषांतरे झालेली आहेत.

लेखक: त्रि.ना.धर्माधिकारी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate