অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

याज्ञवल्क्य स्मृति

याज्ञवल्क्य स्मृति

संस्कृतातील एक महत्त्वाचा ऋषिप्रणीत धर्मशास्त्रविषयक ग्रंथ. याज्ञवल्क्यस्मृतीच्या प्रायश्चित्ताध्यायातील (श्लोक ११०) ‘ज्ञेयं चारण्यकमहं यदादित्यादवाप्तवान्‌’ या श्लोकाने, आदित्यापासून बृहदारण्यक प्राप्त करून घेणारा याज्ञवल्क्यच याज्ञवल्क्यस्मृतीचाही कर्ता असल्याची सूचना मिळते; तथापि बृहदारण्यकाचा द्रष्टा याज्ञवल्क्य ऋषी याज्ञवल्क्यस्मृतीचाही कर्ता असल्याचे परंपरेलाही मान्य दिसत नाही; कारण या स्मृतीचे प्रसिद्ध टीकाकार श्री. विज्ञानेश्वर यांनी आपल्या मिताक्षरा नावाच्या टीकेच्या प्रस्तावनेतच मनुस्मृति ज्याप्रमाणे भृगूने रचिली, त्याप्रमाणे याज्ञवल्क्याच्या कुणी एका शिष्याने याज्ञवल्क्यप्रणीत धर्मशास्त्र संक्षेपाने या स्मृतीत सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे. या स्मृतीतील भाषाशैलीचा विचार केला असता, याज्ञवल्क्यस्मृति व बृहदारण्यक यांचे एककर्तृत्व संभवत असल्याचे दिसत नाही. याज्ञवल्क्यस्मृतिचा काल म. म. डॉ. काणे यांनी इ. स. १०० ते ३०० असा मानला आहे.

याज्ञवल्क्यस्मृति आचार, व्यवहार व प्रायश्चित अशा तीन प्रकरणांत विभागली गेली आहे.

आचाराध्यायांत-धर्मलक्षण, ब्रह्मचारिधर्म, विवाह, वर्णजातिविवेक, गृहस्थधर्म, स्नातकव्रते, भक्ष्याभक्ष्यविचार, द्रव्यशुद्धि, दान, श्राद्ध, गणपतिकल्प, ग्रहशान्ति, राजधर्म इ. विषयांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे.

व्यवहाराध्यायांत व्यवहारात म्हणजे न्यायालयप्रविष्ट वादाचे लक्षण, व्यवहारसभेचे सभासद व न्यायाधीश, अभियोग, प्रत्यभियोग, प्रतिभू (जामीन), दण्डप्रकार, ऋणादान, उपनिधी, साक्षी, लेख्य, दिव्य, दायभाग, दत्तकपुत्र, स्त्रीधन, क्षेत्रसीमाविवाद, स्वामिपालविवाद, दत्ताप्रदानिक, वेतन, द्यूत, वाक्पारुष्य, दण्डपारुष्य, साहस, स्तेय, स्त्रीसंग्रह, कूटस्वर्णादि व्यवहार इ. न्यायालयीन विषयांचा समावेश आहे.

प्रायश्चित्ताध्यायांत - आशौच प्रकरण, आपद्धर्म, वानप्रस्थधर्म, यतिधर्म, कर्मविपाक, विविध पातकांसाठी प्रायश्चित्ते, चान्द्रायणादि विषय याचे संक्षेपाने विवेचन केलेले आहे.

मनुस्मृतीत आलेले विषय याज्ञवल्क्यस्मृतीने पुनरुक्ती टाळून संक्षेपाने, परंतु अधिक सुसंगत रीतीने मांडले आहेत. मनुस्मृतीचा विस्तार २,६८४ श्लोकांचा आहे. याज्ञवल्क्यस्मृतीने मनुस्मृतीच्या विषयांचा संक्षेप १,००३ श्लोकांत केलेला आहे.

याज्ञवल्क्यस्मृतीत अंतर्भूत असलेले गणपतिकल्प, ग्रहशांति हे विषय मनुस्मृतीत नाहीत; तथापि याज्ञवल्क्यस्मृतीने गणपतिकल्पाचा विषय (आचाराध्याय श्लोक २७१–२९४) मानवगृहसूत्रावरून (२·१४) घेतलेला दिसतो.

याज्ञवल्क्यस्मृतीने तुला, अग्नि, जल, विष आणि कोश ही पाच दिव्ये व्यवहाराध्यायात (श्लोक ९५–११३) सविस्तर वर्णिली आहेत. मनुस्मृतीत (८·११४) काही दिव्यांचा ओझरता संदर्भ फक्त आलेला आहे.

याज्ञवल्क्यस्मृतीत (प्रायश्चित्ताध्याय ७५–१०८) असलेले निर्दिष्ट गर्भातील अर्भकाच्या अवस्था, शरीरांचे भेद व अवस्था हे विषय मनुस्मृतीत आढळत नाहीत. याज्ञवल्क्यस्मृतीत विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्याचे विवेचन मात्र दिसत नाही. ते मनुस्मृतीत दिले आहे.

याज्ञवल्क्यस्मृतीचा प्रभाव तदुत्तरकालीन वाङ्‌मयावर पडलेला दिसतो. गरुडपुराण (अध्याय ९३ ते १०६) व अग्निपुराण (अध्याय २५६) यांनी याज्ञवल्क्यस्मृतीतून अनेक श्लोक उद्‌धृत केले आहेत.

याज्ञवल्क्यस्मृतिकारांनी त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या धर्मशास्त्रविषयक वाङ्‌मयाचा व्यासंग केला असलाच पाहिजे. याज्ञवल्क्यस्मृतीचे कर्ते शुक्लयजुर्वेदसंहिता व पारस्करगृह्यसूत्र या ग्रंथांचे विशेष अभ्यासक असणे स्वाभाविकच आहे, ही वस्तुस्थिती डॉ. काणे व डॉ. स्टेन्झलर यांनी अंतर्गत पुराव्यानिशी स्पष्ट केली आहे.

याज्ञवल्क्यस्मृतीत याज्ञवल्क्यांच्या बरोबरच मनु, अत्रि, विष्णु हारीत, उशनस्‌, अंगिरस, यम, आपस्तम्ब, कात्यायन, व्यास, गौतम, शातातप, वसिष्ठ इ. वीस ऋषींचा धर्मशास्त्राचे प्रवर्तक म्हणून उल्लेख केला आहे. यावरून वरील ऋषींनी प्रणीत धर्मशास्त्रे याज्ञवल्क्यस्मृतिकारापुढे असली पाहिजेत. विशेषतः प्राचीन गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मनुस्मृति यांचा मागोवा घेत ही स्मृती रचली गेलेली दिसते. मनुस्मृतीनंतर सामान्यतः  तीन-चार शतकांच्या काळातच याज्ञवल्क्यस्मृति रचली गेली असावी. त्यामुळे मनुस्मृतीत प्रतिबिम्बित झालेल्या समाजाचेच दर्शन याही स्मृतीत घडते.

वर्णधर्म, आश्रमधर्म, स्त्रीधर्म, राजधर्म, चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील त्रैवर्णिकांचे−विशेषतः ब्राह्मणवर्णाचे-विशेष स्थान, अधिकार आणि कर्तव्ये, अनुलोम-प्रतिलोम विवाहांतून निर्माण झालेल्या अम्बष्ठ, निषाद, पाराशर, सूत, वैदेहक, चण्डाल, क्षत्ता, अयोगव, रथकार या जाती इत्यादींचे विवेचन तत्कालीन समाजाचे दर्शन घडविते. मानवी मनाचे धर्म, त्यांच्या आशा, आकांक्षा आणि भयस्थाने या गोष्टी विशेषतः  व्यवहार आणि प्रायश्चित्त या अध्यायांतून उलगडतात.

या स्मृती भारतीय समाजाच्या इतिहासाचे साधन म्हणून बहुमोल उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे स्मृतींतील काही सनातन विधाने आजही मार्गदर्शक ठरतात.

याज्ञवल्क्यस्मृतीच्या अनेक टीकाकारांपैकी प्राचीन टीकाकार विश्वरूप याचा काल ८०० ते ८२५ च्या सुमाराचा असून, मिताक्षरा या टीकेचे कर्ते विज्ञानेश्वर यांचा काल १०५० च्या आसपास असावा. याशिवाय अपरार्क, शूलपाणी इत्यादिकांनी याज्ञवल्क्यस्मृतीवर टीका लिहिल्या आहेत.

लेखक: त्रिं. ना.धर्माधिकारी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate