অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रघुवंश

रघुवंश

सूर्यप्रभव वंशाचा काव्येतिहास गुंफणारे कालिदासाचे १९ सर्गांचे महाकाव्य.

आत्मविश्वासाला साजेल अशा लीनतेने आरंभ करून, निपुत्रिक दिलीपराजास कामधेनूकन्येच्या निरलस, जीवनसमर्पणाच्या सेवेमुळे झालेली पुत्रपाप्ती (सर्ग १, २); रघूचे बालपण, राज्याभिषेक, दिग्विजय आणि सर्वमेध (सर्ग ३-५); अज-इंदुमतीचा स्वयंवरपूर्वक विवाह, स्वर्गीय माला हृदयावर पडून इंदुमतीचा मृत्यू, अजाचा करुण विलाप आणि आत्महत्या (सर्ग ५-८); श्रावण-हत्येमुळे शापित दशरथाचे जीवन (सर्ग ९); रामायणाची करुणोदात्त कथा (सर्ग १०-१५); कुशाला राज्यलक्ष्मीचे स्वप्नात दर्शन, अयोध्येची पुनःस्थापना आणि कुशाचा राज्यकारभार (सर्ग १६); कुशाचे वंशज आणि पुढील एकवीस राजे यांची राजवट (सर्ग १७, १८); सुदर्शनाचा पुत्र अग्निवर्ण या विलासी पण कलावंत राजाच्या मृत्यूने अखेर (सर्ग १९) - अशी रघुवंशाची कथा मांडलेली आहे.

रघुवंशाचा विषय एकजिनसी नाही. ही एक चित्रमालिका आहे. मुळातली ही विविधता प्रत्येक चित्रातील वेगवेगळ्या प्रसंगयोजनेमुळे आणखी खुलली आहे. वर्णनाच्या तटस्थपणात जिवंत संवादाचा रुचिपालट वारंवार आला आहे. कालिदासाची वर्णने संयमित आहेत. कथेचा ओघ सोडून ती वहावत जात नाहीत. प्रदीर्घ रचनेत निवेदन अपरिहार्य असते. पण रघूचा दिग्विजय, दशरथाची मृगया, रामाचा लंकेहून अयोध्येकडे प्रवास, अशा ठिकाणी अलंकृत शैलीचे रंग पसरून किंवा भावमृदू आठवणींचा गंध भरून, कालिदास आस्वादनाला उणेपणा येऊ देत नाही. शब्दप्रभुत्व, वृत्तरचनेची कुशलता, सहज सौंदर्याने नटलेली कुलकन्येसारखी प्रसन्न, मधुर, कांत अशी शैली, स्वरझंकारासारखी निनादणारी सुभाषिते आणि अजोड उपमा हे कालिदासाच्या कलाविलासाचे वैभव आहे.

रघुवंशाचे आणखी एक आकर्षण म्हणजे त्यातील व्यक्तिचित्रे. रघुवंशातले हे महान राजे एरव्ही आपल्या मोठेपणात हरवून गेले असते. पण कालिदासाने कुठेतरी त्यांच्यातली मानवता, त्यांची वेदना, संवेदना नेमकी पकडली आहे. त्यामुळे हे राजे झगमगाटाने दिपवीत असले, तरी दृष्टीवाटे आपल्या हृदयात जाऊन बसतात. निरपत्यतेच्या वेदनेने हळवा झालेला, ग्रामस्थ गोपालांची विचारपूस करणारा दिलीप; गुरुदक्षिणा मागायला आलेला कौत्स विन्मुख जाऊ नये म्हणून धडपडणारा रघू; मृगांचे नेत्र पाहून पत्नीची आठवण होणारा अज; अजाणता शापाचा बळी झालेला दुदैवी दशरथ; पर्वतासारखे दुःख झेलून राजकर्तव्यासाठी पत्नीचा त्याग करणारा अलौकिक राम; कामुक असूनही अनुपम कलाविज्ञानाने चटका लावणारा अग्निवर्ण या व्यक्तिरेखा अविस्मरणीय आहेत.

‘कवियशःप्रार्थी’ कालीदासाची प्रेरणा कलेचीच आहे. पण या महाकाव्यात चार आश्रमांचे आणि पुरुषार्थाचे वैभवही त्याने सूचित केले आहे. रघुवंशीय राजांनी गृहस्थाश्रम भोगला तो वंशवर्धनाचे कर्तव्य म्हणून; शत्रूंवर पराक्रम गाजविला तो राजशासनाचा आब राखण्यासाठी; मितभाषित्व स्वीकारले, सत्याला वाचा फुटावी म्हणून; अपार वैभव मिळविले ते दानाला मर्यादा पडू नये म्हणून. समर्पित जीवनाचा, कर्तव्यनिरत उपभोगाचा हा आदर्श समाजाला उन्नतीला नेल्यावाचून रहाणार नाही, अशी श्रद्धा या महाकाव्यात आहे.

कलेच्या आनंदाबरोबरच श्रेयाचा अप्रत्यक्ष उपदेश करणारी उदात्त गाथा रचून महाकाव्याचा एक मानदंडच कालिदासाने निर्माण केला. ‘क इह रघुकारे न रमते?’ असे उद्‌गार रसिक परंपरेने सार्थपणे काढले आहेत.

लेखक: गो. के.भट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate