অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रशियन साहित्य

रशियन साहित्याची परंपरा दीर्घ, संपन्न आणि वैशिष्टयपूर्ण अशी आहे. ह्या साहित्येतिहासाचे चार कालखंड पाडता येतील : (१)प्राचीन साहित्याचा कालखंड – अकरावे ते सतरावे शतक. (२)अठराव्या शतकातील साहित्य. (३) एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून रशियन क्रांती पर्यंतचे साहित्य. (४) क्रांत्युत्तर किंवा सोव्हिएत साहित्य.

प्राचीन साहित्य (अकरावे ते सतरावेशतक)

रशियन साहित्याचे जुन्यातले जुने नमुने अकराव्या शतकातले आहेत. 'चर्च स्लाव्होनिक' ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाषेत ते आहेत. प्राचीन रशियाची ती वाङ्मयीन भाषा होती. संत सिरिल (८२७–६९) आणि संत मिथोडिअस (८२६–८५) ह्यांच्यासारख्या, स्लाव्ह जगतातील संतांनी ‘चर्च स्लाव्होनिक'ला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली होती. वाङ्‌मयीन भाषा म्हणून रशियन भाषेचा जाणीवपूर्वक उपयोग सुरू झाला सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात.

कीव्ह हे शहर प्राचीन रशियातील समृद्ध सांस्कृतिक केंद्र होते आणि सर्वांत प्राचीन रशियन साहित्य ह्याच शहराच्या सांस्कृतिक वातावरणात निर्माण झाले. ते धार्मिक आणि बोधवादी स्वरूपाचे आहे. बायझंटिन ग्रीक साहित्याचा लक्षणीय प्रभाव ह्या साहित्यावर आहे. उदा., इलेरिअनकृत यूलॉजी ऑफ सेंट व्ह्‌लद्यीम्यिर (अकरावे शतक, इं. शी.). धार्मिक वक्तृत्वाचा हा उत्कृष्ट नमुना होय. त्यूरॉव्हचा बिशप सिरिल ह्याने दिलेली प्रवचनेही (बारावे शतक) संपन्न वक्तृतवशैलीच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. आरंभीच्या लौकिक साहित्यात मुख्यतः इतिवृत्तांचा अंतर्भाव होतो. रशियाच्या प्राचीन इतिहासाचे धागेदोरे जुळवण्याच्या दृष्टीने ही इतिवृत्ते मोलाची आहेत.

ह्या कालखंडातील सर्वांत लोकप्रिय इतिवृत्त म्हणजे पोव्हेस्त ओ व्हरेमेन्निख ल्येत(अकरावे शतक, इं. शी. द टेल ऑफ बाय्‌गॉन यीअर्स) हे होय. कीव्ह येथील ख्रिस्ती मठातला एक संन्यासी न्येस्तर हा ह्याचा कर्ता. मागील काही इतिवृत्तांचा पुढील भाग लिहून इतिवृत्तलेखनाच्या परंपरेचे सातत्य टिकवण्याच्या हेतूने न्येस्तरने ह्या इतिवृत्ताची रचना केलेली दिसते. रशियन साहित्याच्या उपलब्ध असलेल्या अत्यंत प्राचीन नमुन्यांत ह्या इतिवृत्तांचा अंतर्भाव करण्यात येतो. ह्या इतिवृत्तात आलेल्या घटना १११२ पर्यंतच्या आहेत.

अकराव्या शतकात जे कथालेखन झाले, त्यात ‘ओ व्हरलामे इ झ्योसफे' ही कथा निर्देशनीय आहे. ही कथा म्हणजे गौतम बुद्धाच्या जीवनावरील एका भारतीय कथेला देण्यात आलेले ख्रिस्ती रूप आहे.

रशियन लोककाव्यात ‘बिलीन' ह्या काव्यप्रकाराचा अंतर्भाव होतो. ही रशियन महाकाव्ये म्हणता येतील. दहाव्या शतकापासून ती रचिली जाऊ लागली. लोकविद्येचे (फोक्‌लोअर) आजचे अभ्यासक ह्या महाकाव्यांची विभागणी, कीव्हची महाकाव्ये आणि नॉव्हगोरॉडची महाकाव्ये, अशा दोन प्रकारांत करतात. कीव्हच्या महाकाव्यांत काव्यनायकांचे असामान्य शौर्य आणि त्यांची निरपेक्ष सेवावृत्ती ह्यांचे चित्रण पहावयास मिळते, तर नॉव्हगोरॉडच्या महाकाव्यांत कौटुंबिक जीवनाची आणि व्यापार-उद्योगातील समाजाची चित्रे आढळतात.

बाराव्या शतकाच्या आरंभी, कीव्ह आणि नॉव्हगोरॉड ह्यांच्या जोडीला–च्येर्निगोव्ह, व्ह्‌लघीम्यिर, रॉस्टॉव्ह व स्मोलेन्स्क ह्यांसारखी, वाङ्‌मयनिर्मितीची अन्य केंद्रेही उभी राहिलेली दिसतात. ह्याचे कारण, सरंजामशाही समाजरचनेमुळे निर्माण झालेली अनेक छोटी छोटी राज्ये, हे होय.

ह्या शतकात निर्माण झालेली सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणजे स्लोवो ओ पल्कू ईगरवे(इं. शी. द ले ऑफ इगॉर्स कँपेन) हे काव्य. १७९५ मध्ये ह्या कवितेची संहिता सापडली आणि १८०० मध्ये ती प्रकाशित झाला. संपन्न प्रतिमासृष्टी आणि शब्दकळा; तसेच उत्कट भावगेयता ही ह्या काव्याची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. परकीय शत्रूंशी मुकाबला करणाऱ्या इगॉर ह्या वीरपुरुषाची ही कथा. ह्या काव्यकृतीचा कर्ता अज्ञात आहे. लोककवितेच्या मौखिक परंपरेचा त्याला उत्तम परिचय असला पाहिजे, असे त्याच्या ह्या रचनेवरून वाटते.

‘द ले ऑफ इगॉर्स कँपेन' ह्या कवितेत व्यक्त्त झालेली देशभक्त्ती नंतरच्या साहित्यातूनही दिसू लागली. तार्तर-मंगोलांनी रशियावर केलेल्या आक्रमणाची वेदना त्यामागे प्रामुख्याने दिसते.

दळणवळणाच्या अभावामुळे रशियन साहित्यात प्रादेशिकता आलेली असली, तरी साधारणतः १५ व्या शतकापासून मॉस्कोच्या साहित्याचा प्रभाव वाढू लागला, कारण मॉस्कोहे रशियन राष्ट्रवादाचे केंद्रस्थान म्हणून १४ व्या शतका पासूनच पुढे येऊ लागले होते.

पंधराव्या शतकात भारतीय पंचतंत्रातील कथा-बहुधा यूगोस्लाव्हियातून–रशियात प्रसृत झाल्या. स्काजानिये ओ मामायेव्हम पबइश्चे (इं. शी. द टेल अबाउट द बॅटल ऑफ मामाई) ही पंधराव्या शतकातली सर्वांत लोकप्रिय अशी साहित्यकृती होय. अशा अन्य काही युद्धकथाही आहेत. ऱ्यझानच्या साफोनीने लिहिलेली ‘जादोनश्र्चीना' (पंधराव्या शतकाचा प्रारंभ) ही अशीच एक युद्धकथा होय. कुलीकवोच्या युद्धाची ही कथा ‘द ले ऑफ इगॉर्स कँपेन'चा प्रभाव दर्शविते. अशा प्रकारच्या युद्धकथांत ऐतिहासिक घटनांच्या वर्णनाबरोबरच, व्यक्त्तिरेखनाकडेही लक्ष पुरविल्याचे दिसून येते.

अफानासी निकितीन ह्याने लिहिलेले खझेनिये जा त्री मर्या(इं. शी. व्हॉयेज अक्रॉस थ्री सीज) हे प्रवासवृत्तही निर्देशनीय आहे. निकितीन हा त्वेर येथला व्यापारी. व्यापाराच्या हेतूने तो भारतात आला. प्रवासाच्या काळात त्याने लिहिलेल्या संस्मरणिका ‘व्हॉयेज अक्रॉस...'मध्ये आहेत. भारतीय जीवनाची जिवंत आणि वेधक चित्रे ह्या प्रवासवृत्तात त्याने रंगवली आहेत. भारतीय राजे-नबाबांची जीवनशैली, भारतीय वास्तुकला, भारतातील मंदिरांची सजावट, भारतीय निसर्गसौंदर्य ह्यांचे उत्तम वर्णन त्याने केले आहे. एकोणिसाव्या शतकात ते प्रवासवृत्त उपलब्ध झाले. रशियन साहित्यात प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार आणण्याचे श्रेय निकितीनकडे जाते.

पंधराव्या शतकातील आणखी एक महत्त्वाची साहित्यकृती पोवेस्त ओ पित्रे इ फेंव्हनोनी मुरोम्‌स्किख(इं. शी. टेल अबाउट प्योत्र अँड फेव्हरोनी मुरोम्‌स्कीज) ही होय. एका साधासुध्या लाकूडतोड्याच्या घरी जन्म घेणाऱ्या पण काउंटेसपद आणि नंतर संतत्व प्राप्त करून घेतलेल्या एका स्त्रीची ही कथा, रशियन स्त्रीची एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा आपणापुढे उभी करते.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस (१४८०), सु. २५० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर, रशिया तार्तरांच्या वर्चस्वातून मुक्त्त झाला. इव्हान तिसरा (कार. १४६२–१५०५) ह्याने रशियाचे एकीकरण घडवून आणले. मॉस्कोला रोमसारखी प्रतिष्ठा प्राप्त झाली. ‘इव्हान द टेरिबल' म्हणून ओळखला जाणारा इव्हान ग्रोजनी वा इव्हान चौथा (कार. १५४७–८४) ह्याने झार (हा रोमन ‘सीझर'चा रशियन पर्याय) ही पदवी धारण केली.‘इव्हान द टेरिबल' आणि त्याचा ऐकाकाळचा सेनापती अंद्रेई कुर्बस्की ह्यांच्यातील वादविवादात्मक पत्रव्यवहार ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. लाय्‌व्होनीआ येथील लढाई हारल्यानंतर, ‘इव्हान द टेरिबल'च्या रोषाला बळी पडू नये म्हणून कुर्बस्की लिथ्युएनियात पळून गेला होता, पण त्याने पत्रे लिहून इव्हानवर परखड टीका केली होती. रशियन सरदारांचा छळ केल्याचा आरोप कुर्बस्कीने इव्हानर केला होता. दोघांच्याही पत्रांतून त्यांचे वादपटुत्व प्रत्ययास येते. द कॉरस्पाँडन्स बिट्‌वीन न प्रिन्स ए. एम्‌. कुर्बस्की अँड झार इव्हान फोर्थ, (१५६४–६९)हा त्या पत्रव्यवहाराचा सटीप इंग्रजी अनुवाद (१९५५). दमस्त्रोई (इं. शी. ऑर्गनायझेशन ऑफ अफेअर्स ऑफ होम) हा सोळाव्या शतकातील एक उल्लेखनीय ग्रंथ होय. ‘इव्हान द टेरिबल'चा सल्लागार सिल्व्हेस्टर ह्याच्या नावावर हा ग्रंथ मोडतो. तत्कालीन रशियातील कौटुंबिक व्यवस्थेचे चित्र ह्या ग्रंथात पहावयास मिळते. पत्नी, मुले, घरातले नोकर ह्या सर्वांवर चालणारी कुटुंबप्रमुखाची सत्ता आणि त्याची हुकूमशाही हे ह्या कुटुंबव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य होते. तत्कालीन रशियात, एक समाजोपयोगी ग्रंथ म्हणून हा ग्रंथ ओळखला जाई; पण आज हा ग्रंथ वाचला, तर त्यातून त्या वेळच्या कुटुंबव्यवस्थेचे दोष ठळकपणे नजरेत भरतात.

सतराव्या शतकात, रशियामध्ये कृषकांची काही बंडे झाली. त्यांचा लक्षणीय परिणाम ह्या शतकातील रशियन साहित्यावर झालेला दिसतो. ह्या बंडांची आणि त्यांत स्वीडन व पोलंडासारख्या परकीय सत्तांनी केलेल्या हस्तक्षेपाची वर्णने अनेक ग्रंथांतून आढळतात. ह्या बंडांमुळे घडून आलेल्या सामाजिक-राजकीय उलथापालथीचे प्रतिध्वनी ज्याप्रमाणे ह्या ग्रंथांत ऐकू येतात, त्याचप्रमाणे परकीय सत्तांच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली देशभक्त्तीची प्रखर भावनाही प्रत्ययास येते.

कृषकांच्या बंडांमुळे निर्माण झालेल्या ह्या अव्यवस्थेच्या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडून आली आणि ती म्हणजे तत्कालीन रशियाच्या सांस्कृतिक जीवनात ज्या सामाजिक गटांचा सहभाग अत्यल्प होता, ते आता वाङ्मयनिर्मिती करू लागले. ह्या नव्या लेखकांबरोबरच नवा वाचकवर्गही निर्माण झाला. लौकिक विषय, वास्तववादी दृष्टिकोण आणि लोकसाहित्याचे काही लक्षणीय सूर ह्या साहित्यात आढळून येतात. तुर्कांपासून ॲझॉव्ह ह्या शहराचा बचाव कसा केला, त्याचा कॉसॅकांनी झारला दिलेला एक अहवाल ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. एखाद्या कथेसारखा तो लिहिण्यात आलेला असून स्टोरी ऑफ द डिफेन्स ऑफ ॲझॉव्ह (इं. शी.) ह्या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली होती.

रशियन भाषेतील आरंभीचे उपरोधप्रचुर लेखन ह्याच शतकातले. उदा., स्काजानिएओकूरेइ ओलिसित्से (इं. शी. टेल अबाउट ए हेन अँड ए फॉक्स) व पोवेस्त ओ एरशे एरशोविचे (इं. शी. टेल ऑफ एर्श एरशेविच). समाजातील अपप्रवृत्तींवर हल्ला करण्यासाठी उपरोधाचे धारदार हत्यार साहित्यिक वापरू लागले. ‘शोम्याकिन सूद' ह्या कथेत श्रीमंतांचा लहरीपणा आणि न्यायाधीशांचा भ्रष्टाचार ह्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ह्या शतकाच्या उत्तारार्धात चरित्र आणि सामाजिक विषयांवरील कथा लिहिल्या जाऊ लागल्या.

इस्तोरियाओसेमिमुद्रेत्साख हा एक लोकप्रिय लोककथासंग्रह. त्याचे सर्वांत जुने हस्तलिखित १६३४ चे. १८१२ साली मॉस्कोत लागलेल्या आगीत ते भस्मसात झाले; पण त्याच्या सतरांहून अधिक अन्य प्रती उपलब्ध आहेत. पोलिश भाषेतून ह्या कथा रशियात आल्या असल्या, तरी त्या कथांचा अगदी मूळचा आधार भारतीय असल्याचे सांगितले जाते. ह्या शतकातील कथासाहित्यात चर्च व तेथील धर्मगुरू ह्यांचे महत्त्व सांगणाऱ्या काही कथा जशा आहेत, तशाच पूर्णतः लौकिक म्हणता येतील, अशाही काही आहेत. ‘पोवेस्त ओ गोर्ये ज्लोशास्ती' (इं. शी. द टेल ऑफ मिस्‌फॉरच्यून) ह्या कथेत तर संन्यासी बनणे भाग पडल्यामुळे दुःखी झालेल्या तरुणाची कथा आहे.‘स्काजानिए ओ पपे साव्हे' (इं. शी. टेल अबाउट पोप साव्हा), ‘स्काजानिए ओ क्रेस्त्यान्‌स्कम सूपे' (इं. शी. टेल अबाउट पीझंट्स सूप), ‘पोवेस्त ओ कार्पे सुतूलव्हे' (स्टोरी ऑफ कार्प सुतूलव्ह) ह्या काही उल्लेखनीय कथा होत.

ह्या शतकातले चरित्रात्मक-आत्मचरित्रात्मक लेखनही लक्षणीय आहे. ह्या शतकारंभी संत जूल्यानीया लाझारेवस्काया (मृत्यू १६०४) हिचे चरित्र तिचा पुत्र कालीस्त्रातस ओसोरीन ह्याने लिहिले. त्यात चरित्रकाराचा लौकिक दृष्टिकोण दिसून येतो. आर्चप्रीस्ट अव्हॅकम ह्याने लिहिलेले आत्मचरित्रही महत्त्वाचे आहे. लोकांच्या दैनंदिन व्यवहारात बोलली जाणारी रशियन भाषा अव्हॅकमने त्याच्या वाङ्मयीन अभिव्यक्त्तीसाठी वापरली, हा त्याच्या लेखनाचा विशेष होय. ह्या भाषेच्या अंतःशक्त्तीचा पुरेपूर उपयोग त्याने करून घेतला आहे. उत्स्फूर्तपणा आणि त्याबरोबर येणारा ताजेपणा ही त्याच्या लेखनशैलीची निर्देशनीय वैशिष्ट्ये. त्याच्या आत्मचरित्राचे इंग्रजी भाषांतर दलाइफऑफद आर्चप्रीस्टअव्हॅकमबायहिमसेल्फप्रसिद्ध झाले आहे (१९२४).

एक वाङ्‌ममयीन आविष्कार, ह्या जाणिवेने कविता लिहिली जाऊ लागली, ती सतराव्या शतकात. ह्या संदर्भात ‘सिमेऑन ऑफ पोलोत्स्क' (१६२९–८०) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका संन्याशाचे नाव महत्त्वाचे. आरंभी काहीशा अनघड असलेल्या रशियन कवितेला त्याने, स्वतःच्या कवितालेखनाने, अक्षरवृत्ताचा (सिलॅबिक व्हर्स) परिचय करून दिला. पोलिश कवितेच्या अनुकरणाने रशियन कवितेत अक्षरवृत्ताचा वापर त्याने प्रथम सुरू केला.

रशियन नाटक आणि रशियन रंगभूमी ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने ह्या शतकात काही लक्षणीय घटना घडून आल्या. सोळावे शतक संपण्यापूर्वीच धार्मिक नाटके पश्चिम रशियातील शाळांतून केली जात होती; पण सतराव्या शतकाच्या मध्यास त्यांच्या प्रयोगांची परंपरा दृढावली. ही नाटके लॅटिन किंवा पोलिश असत; किंवा त्या भाषांतून अनुवादिलेली असत. त्यांचे नाते होते अद्‌भूत (मिरॅकल प्ले) वा रहस्यनाटकांशी (मिस्टरी प्ले).

झार अलेक्सिस ह्याने १६७२ साली डॉ. योहान गोटफ्रीट ग्रेगरी नावाच्या जर्मन पास्टरला (धार्मिक पद) एक हौशी नाटकमंडळी काढावयास लावली. फिरत्या जर्मन नाटकमंडळ्यांच्या संग्रही असलेल्या संहितांचे स्लाव्होनिक गद्यात अनुवाद करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे राजप्रासादातच रंगमंच उभा करण्यात आला. ग्रेगरीच्या पाठोपाठ सिमेऑन ऑफ पोलोत्स्क ह्याने नाट्यलेखनक्षेत्रात प्रवेश केला. द कॉमेडी ऑफ द पॅरबल ऑफ द प्रॉडिगल सन (१६८५ इं. शी.) हे त्याचे नाटक उल्लेखनीय आहे. बायबलमधली उधळ्या पुत्राची प्रसिद्ध कथा समोर ठेवून त्याने रशियातील पिता-पुत्र संबंध आपल्या ह्या नाट्यकृतीतून रंगविले.

आधुनिक रशियन साहित्याचा इतिहास अठराव्या शतकापासून सुरू होतो. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील रशियन साहित्य हे प्राचीन आणि आधुनिक ह्यांच्यातील संक्रमणावस्थेचे दर्शन घडविणारे आहे.

अठरावे शतक

सतराव्या शतकाची अखेर आणि अठराव्या शतकाचा आरंभ रशियन साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. १६९५ साली रशियाची संपूर्ण सत्ता पीटर द ग्रेटच्या (१६७२–१७२५) हाती आली. पीटरने रशियाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आपली सत्ता राबविली. विद्या-कलांना उत्तेजन दिले. क्रांतिकारक स्वरूपाच्या शैक्षणिक-सांस्कृतिक सुधारणा घडवून आणल्या. रशियन भाषेची वर्णमाला सोपी करून आणि अरबी अंकांचा स्वीकार करून शिक्षण अधिक सुलभ करण्याची व्यवस्था त्याने केली. रशियातले आणि रशियन भाषेतले पहिले नियतकालिक पीटरच्या कारकीर्दीत सुरू झाले. चर्चला त्याने त्याच्या धोरणांच्या आड येऊ दिले नाही. रशियाला यूरोपशी जलमार्गांनी सांधून ‘यूरोपकडे उघडणारी खिडकी' त्याने निर्माण केली.

अठराव्या शतकातील रशियन साहित्याचे एकूण पाच कालखंड पाडता येतील : (१) १६९०–१७३०; (२) १७३०–५०; (३) १७५०–७५; (४) १७७५–९० व (५) १७९० नंतरचा.

उपर्युक्त्त पाच कालखंडांपैकी पहिल्या (१६९०–१७३०) कालखंडावर पीटर द ग्रेटच्या कारकीर्दीची छाया आहे. पीटर द ग्रेटचा एक निकटवर्ती, नॉव्हगोरॉडचा आर्चबिशप फिओफान प्रोकोपोव्हिच (१६८१–१७३६) हा ह्या कालखंडातील विशेष उल्लेखनीय साहित्यिक. प्रोकोपोव्हिच सुविद्य होता. इटलीत तो शिकला. यूरोपीय संस्कृतीच्या मूलस्रोताचे भान त्याला आलेले होते. त्याच्यापाशी एक आधुनिक दृष्टी होती. उत्तम वक्त्ता म्हणून त्याची ख्याती होती. त्याने लिहिलेली शोक-सुखात्मिका व्ह्‌लद्यीम्यिर(१७०५) ही रहस्यनाटकांच्या परंपरेतून बाहेर पडून अभिजाततावादी साहित्यसंकेतांना अनुसरणारी होती. प्रबोधनकालीन इटालियन नाटकांचा आदर्श प्रोकोपोव्हिचसमोर होता. त्याने काही भावकविताही लिहिल्या, तसेच पुस्तपत्रलेखनही केले. उस्ताव्ह दुखोव्हनिआ कोल्लेगीय (इं. शी. रूल्स ऑफ द स्पिरिच्यूअल अकॅडमी) हे त्याने लिहिलेले उपरोधप्रचुर पुस्तपत्र उल्लेखनीय. पीटर द ग्रेट ह्याच्या सुधारणांना विरोध करणाऱ्या धर्मोपदेशकांच्या विरुद्ध ते लिहिण्यात आलेले आहे. ‘ट्रूथ ऑफ ए मॉनार्क्‌स विल' (इं. शी.) ह्या त्याच्या लेखनात त्याने प्रतिपादिले, की लोकहित हाच अनियंत्रित राजसत्तेचा अंतिम हेतू होय.

ह्या कालखंडात जी कविता लिहिली गेली तिचे विषय प्रेम, रशियन सैन्याने मिळविलेले विजय, एखाद्याच्या निधनाबद्दलचे दुःख इ. आहेत.

लौकिक स्वरूपाची साहित्यनिर्मिती हे ह्या कालखंडाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. ह्या संदर्भात इव्हान पोसोश्कॉव्ह (१६५२–१७२६) आणि व्हासिली निकीतिच तातीश्र्चेव्ह (१६८६–१७५०) ही नावे विशेष निर्देशनीय होत. पोसोश्कॉव्हने ‘ऑन इंडिजन्स अँड वेल्थ' (१७२४) हा अर्थशास्त्रीय स्वरूपाचा ग्रंथ लिहिला. तातीश्र्चेव्हने रशियाचा इतिहास लिहिला. ॲडम स्मिथने मांडलेल्या अर्थशास्त्रीय विचारांचा पूर्वसूरी म्हणून पोसोश्कॉव्हकडे काहींनी पाहिले; परंतु तसे पाहणे सर्वमान्य नाही. तातीश्र्चेव्हने रशियाच्या इतिहासासंबंधीची प्रचंड सामग्री, परकीय ग्रंथकारांचे पुरावे विचारात घेऊन, अभ्यासपूर्वक वापरली आणि त्याचा इतिहासग्रंथ उभा केला.

ह्या कालखंडात लौकिक स्वरूपाचे नाट्यलेखनही झाले. त्यात अनुवादांचे प्रमाण बरेच आहे. कर्तव्य आणि विकारवशता, भावना आणि बुद्धी, व्यक्त्ती आणि समाज ह्यांच्यातील संघर्ष हे ह्या कालखंडातील नाटकांचे मुख्य विषय होत.

ह्यानंतरचा म्हणजे १७३० ते १७५० हा वीस वर्षांचा कालखंड रशियन साहित्यातील नव- अभिजाततावादाच्या प्रभावाचा. ह्या कालखंडाची अन्य लक्षणीय वैशिष्ट्ये अशी : रशियन साहित्यातील पहिले नामवंत ह्याच कालखंडातले. ह्याच कालखंडाच्या आगे-मागे काही महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संघटना रशियात स्थापन झाल्या. उदा., रशियातील पहिली विज्ञान अकादमी सेंट पीटर्झबर्ग येथे १७२५ सालीच स्थापन झाली होती, तर मॉस्कोमधले पहिले विद्यापीठ १७५५ मध्ये. १७५६ मध्ये सेंट पीटर्झबर्गमध्ये पहिले नाट्यगृह उभारले गेले. वाङ्‌मयीन भाषेचे निकष ठरविण्याचे प्रयत्न झाले आणि छंदःशास्त्रातही सुधारणा घडवून आणल्या गेल्या.

ह्या काळातील विशेष उल्लेखनीय लेखकांत अंतिओख दमित्रियेव्हिच कांतेमीर (१७०८-४४), व्हासिली किरिल्लोव्हिच त्रेदियाकोव्हस्की (१७०३–६९), म्यिखईल लमनॉसॉव्ह(१७११–६५), अलेक्सांद्र पित्रोव्हिच सुमारोकॉव्ह (१७१८–७७) व म्यिखईल मात्‌व्हेयेव्हिच खेरास्कॉव्ह (१७३३–१८०७) ह्यांचा अंतर्भाव होतो.

कांतेमीर हा खऱ्या अर्थाने लौकिक स्वरूपाची काव्यरचना करणारा पहिला रशियन कवी मानला जातो. त्याने लिहिलेली प्रेमगीते आणि नऊ उपरोधिका (लेखनकाळ १७२९–३९; प्रकाशित १७६२) ह्यांवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. आनाक्रेऑनच्या कवितांचा व हॉरिसच्या काही रचनांचा त्याने अनुवादही केला. त्रेदियाकोव्हस्कीचे शिक्षण पॅरिसला झाले होते. रशियनप्रमाणेच फ्रेंचमध्येही तो काव्यरचना करीत असे. तथापि कवी म्हणून तो विशेष मान्यता पावलेला नाही. रशियन छंदःशास्त्रावर ग्रंथलेखन करून त्याने त्या छंदःशास्त्रात सुधारणा घडवून आणली. पोलिश कवितेतून स्वीकारलेल्या छंदांपेक्षा रशियन भाषेच्या प्रकृतीला अधिक स्वाभाविक असणारे; अधिक मानवणारे छंद व वृत्ते त्याने पुरस्कारिली.

म्यिखईल लमनॉसॉव्ह ह्याला आधुनिक रशियन साहित्याचा संस्थापक मानले जाते. तो केवळ कवीच नव्हता, तर व्याकरणकार आणि साहित्यसमीक्षकही होता. विज्ञानातही त्याला खूप स्वारस्य होते. रशियातील वैज्ञानिक विकास आणि रशियन साहित्य ह्यांनी पश्चिमी देशांतील विज्ञानाशी आणि साहित्याशी स्पर्धा केली पाहिजे, असे त्याला वाटे. भौतिकी आणि रसायनशास्त्र ह्या क्षेत्रांत त्यानेही त्याच्या परीने काम केले होते. ‘रशियन गटे' असाही त्याचा उल्लेख केला जातो. लमनॉसॉव्हने लिहिलेल्या उद्देशिका (ओड) हा त्याच्या काव्यरचनेचा विशेष लक्षणीय असा भाग होय. त्यांत फारशी आत्मपरता नाही; आपल्या देशाच्या-रशियाच्या-भावना आणि आकांक्षा ह्यांची ती अभिव्यक्त्ती आहे. रशियन साम्राज्य आणि रशियन लष्कर ह्यांचा त्याने गौरव केला. विज्ञान आणि विद्याभ्यास ह्यांचेही गोडवे गाइले. लमनॉसॉव्हच्या काही कविता तत्त्वचिंतनात्मक आहेत. साहित्यसमीक्षक ह्या नात्याने त्याने वाड़्मयीन रशियन भाषेचे निकष निश्चित केले; छंदःशास्त्रात नवी दृष्टी आणली; उच्च, मध्यम आणि कनिष्ठ असे काव्यशैलीचे तीन प्रकार प्रतिपादिले. लमनॉसॉव्हची वाड़्मयीन दृष्टी अभिजाततावादी होती. रशियन भाषेचे व्याकरण त्याने लिहिले. सौंदर्य, सामर्थ्य आणि संपन्नता ह्यांच्या संदर्भात रशियन भाषा कोणत्याही यूरोपीय भाषेपेक्षा जराही उणी नाही, ही त्याची ठाम धारणा होती.

सुमारोकॉव्ह हा नाटककार आणि कवी. खोर्‌येव्ह (१७४७) ही त्याची नाटयकृती उल्लेखनीय आहे. ती लिहिताना फ्रेंच भाषेतील अभिजाततावादी नाटकांचा आदर्श त्याच्या समोर होता, असे दिसते. अभिजाततावादी तंत्राने लिहिलेली रशियन भाषेतील ती पहिली शोकात्मिका होय. सुमारोकॉव्हने अन्य काही शोकात्मिका, तसेच सुखात्मिकाही लिहिल्या. त्याच्या बहुतेक नाटकांची संविधानके रशियाच्या इतिहासातून, भूतकालीन घटनांतून घेतलेली आहेत. वाड़्मयीन गुणवत्तेपेक्षाही उत्तम सादरीकरणामुळे सुमारोकॉव्हची नाटके लोकप्रिय ठरली.

छंद, घाट, भाववृत्ती ह्यांच्या संदर्भात सुमारोकॉव्हच्या कवितेचे वैविध्यपूर्ण स्वरूप लक्षणीय आहे. उद्देशिका, विलापिका, प्रेमगीते, गोपगीते इ. कवितेचे वेगवेगळे प्रकार त्याने हाताळले. अस्सल भावना आणि साधीसुधी भाषाशैली ही त्याच्या काव्यरचनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये होत. त्याने उपरोधिका आणि बोधकथाही लिहिल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्याने काम केले. ‘द इंडस्ट्रिअस बी' (इं. शी.) ह्या नावाचे नियतकालिक तो चालवीत असे. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि भूदासांचा जमीनदारांकडून होणारा छळ ह्यांविरुद्ध त्याने आपली लेखणी चालवली होती.

अभिजाततावादी प्रवृत्ती मागे पडू लागल्याचे पहिले प्रत्यंतर मिळते खेरास्कॉव्हच्या लेखनातून. आपल्या ‘द व्हेनिशियन नन' (१७५८, इं. शी.) ह्या शोकात्मिकेत अभिजाततावादी नाट्यनियमांना त्याने दूर सारल्याचे दिसून येते. उत्कट आणि अविनाशी प्रेमभावनेला गौरविणाऱ्या ह्या पाच अंकी नाट्यकृतीत सामान्य माणसांच्या व्यक्तिरेखाही त्याने रंगविल्या आहेत.

१७५० ते १७७५ हा तिसरा कालखंड. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धाचे वर्णन ज्ञानोदयाचा (एन्‌लाय्‌टन्‌मेंट) कालखंड, असे करण्यात येते. त्याचा आरंभ १७५० पासून सुरू होणाऱ्या ह्या तिसऱ्या कालखंडात होतो. ह्याच कालखंडात स्वतःला तिसरा पीटर म्हणवणाऱ्या पुगाच्योव्ह ह्या कॉसॅक सैनिकाच्या नेतृत्वाखाली रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट (कॅथरिन दुसरी कार. १७६२–९६) हिच्याविरुद्ध बंड झाले (१७७३–७५). त्याचाही काही परिणाम ह्या कालखंडातील साहित्यावर झाल्याचे दिसून येते. भूदासपद्धती, जमीनदार-कृषक संबंध हे विषय ह्या कालखंडाच्या अखेरीअखेरीच्या साहित्यकृतींतून मुख्यत्वाने येताना दिसतात. साहित्याच्या व समाजाच्या परस्परांवरील प्रभावाचे क्षेत्रही विस्तारलेले दिसते आणि परिणामतः वाचकवर्गही वाढलेला दिसतो.

ह्या कालखंडातले दोन महत्त्वाचे साहित्यिक म्हणजे न्यिकलाय इवानोविच नोव्हिकॉव्ह (१७४४–१८१८) आणि दिनीस इवानोविच फनवीजिन (१७४५–९२). नोव्हिकॉव्ह हा पत्रकार. त्याने आपल्या (सर्व इं. शी.) ‘द ड्रोन', ‘द विंडबॅग', ‘द पेंटर' ह्यांसारख्या नियतकालिकांतून सामाजिक अन्यायाविरुद्ध उपरोधप्रचुर टीका केली. भूदासपद्धतीचा तो प्रखर विरोधक. उमरावांचा अज्ञानीपणा, ते करत असलेला फ्रेंच संस्कृतीचा अंधानुनय त्याने आपल्या नियतकालिकांतून उघड केला. नोकरशाहीमधल्या भ्रष्ट्राचारावर प्रकाश टाकला. फनवीजिन हा नाटककार. रशियन उमरावांवर त्याने आपल्या सुखात्मिकांतून उपरोधपूर्ण टीका केली.

परभाषांतील कथात्मक साहित्याचा अनुवाद, तसेच स्वतंत्र कथाकादंबऱ्यांचे लेखन ह्या कालखंडात नजरेत भरते. इंग्रजीतील डेफो, फील्डिंग, स्विफ्ट ह्यांचे लेखन रशियनमध्ये अनुवादिले गेले. विख्यात इंग्रज कादंबरीकार सॅम्युएल रिचर्ड्‌सन ह्याच्या पामेला ह्या कादंबरीच्या प्रभावातून पाव्हेल लव्हॉव्ह ह्याने ‘द रशियन पामेला ऑर द स्टोरी ऑफ मारिआ, द व्हर्च्यूअस कंट्री गर्ल' (१७८९, इं. शी.) ही कादंबरी लिहिली. सामान्यांच्या मानसिकतेचे विश्लेषण करण्याचा रशियन साहित्यातील आरंभीचा निर्देशनीय प्रयत्न म्हणून फ्योडर अल्यिक्सांद्रव्ह्यिच एमीन (सु. १७३५–७०) ह्याच्या ‘लेटर्स ऑफ अर्नेस्ट अँड डॉराव्ह्‌रा,' (१७६६, इं. शी.) ह्या कादंबरीचा उल्लेख करता येईल. समकालीन सामाजिक विषमतेची जाणीवही ह्या कादंबरीकारात होती. भावविवशतेकडे झुकणारे कादंबरीलेखन ह्या कालखंडातील काही लेखकांनी केले. फ्योडर अल्यिक्सांद्रव्ह्यिच एमीनचा पुत्र न्यिकलाय एमीन (१७६१–१८१४) हा अशा लेखकांपैकी होय.

रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट ही स्वतः लेखिका होती. ‘ऑल सॉर्ट्‌स अँड संड्रीज' (इं. शी.) नावाचे एक उपरोधप्रचुर नियतकालिक तिने सुरू केले होते. तथापि नोव्हिकॉव्हसारख्यांनी काढलेल्या उपरोधप्रचुर नियतकालिकांतून समकालीन सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने स्वतःच्या राजवटीवर होणारी टीका तिला मानवली नाही. १७७३ मध्ये तिने बंदी घालून अशा नियतकालिकांचा आवाज दडपला. काही कथा, सुखात्मिका असे लेखनही तिने केले आहे.

फ्रेंचमधील काही विनोदी संगीतिकांची (ऑपेरा) रूपांतरे ह्या कालाखंडात झाली. तसेच काही विनोदी संगीतिका स्वतंत्रपणेही लिहिल्या गेल्या. सामाजिक विषमतेविरुद्धचा एक सावध सूर त्यांतील काहींत आढळतो. न्यिकलाय पित्रोव्हिच निकोलेव्ह (१७५८–१८१५), याकोव्ह बोरिसोव्हिच क्‌न्याझनीन (१७४२–९१),  इव्हानक्रिलॉव्ह (१७६९–१८४४), अल्यिक्‌सांडर अब्लेसिमॉव्ह (१७४२–८३) हे या कालखंडातले, फनवीजिनव्यतिरिक्त्त, उल्लेखनीय नाटककार. त्यांच्या विनोदी संगीतिकांतून त्यांच्या काळातील रशियन जीवनाचा एक जिवंत चित्रसज्जाच उभा राहतो.

क्‌न्याझनीनने काही शोकात्मिकाही लिहिल्या; परंतु त्याच्या विनोदी संगीतिका ह्या शोकात्मिकांपेक्षा अधिक चांगल्या आहेत. देशातले कायदे हे सम्राटालाही लागू असले पाहिजेत; निरंकुश सत्ता दुःस्थिती आणते अशा आशयाचे विचार क्‌न्याझनीनने आपल्या काही नाटयकृतींतून व्यक्त्त केले. पूर्वी उल्लेखिलेल्या सुमारोकॉव्हनेही जुलमी सत्ताधीशाला लोकांनी उलथावे असे विचार आपल्या नाटकांतून मांडले आहेत. क्रिलॉव्हने जशा विनोदी संगीतिका लिहिल्या, तशाच उपरोधगर्भ बोधकथाही (फेबल्स) लिहिल्या. वरवर साध्यासुध्या वाटणाऱ्या ह्या बोधकथांतून त्याने समकालीन समाजातील अपप्रवृत्तींवर टीकात्मक भाष्य केले. ह्या बोधकथांना फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. १८०९ साली त्याच्या बोधकथांचा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आणखी आठ संग्रह प्रसिद्ध झाले. विख्यात फ्रेंच बोधकथाकार ला फाँतेन ह्याच्या काही बोधकथांचा रशियन अनुवादही त्याने केला. इव्हान इव्हानोव्हिच खेमनिस्टर (१७४५–८४) हाही एक बोधकथाकार. ह्यानेही कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत, हा विचार आपल्या बोधकथांतून, जपून का होईना, पण मांडलेला आढळतो.

१७७५ ते १७९० हा अठराव्या शतकातील रशियन साहित्याचा चौथा कालखंड. गाव्हरीना रमानोव्हिच दिरझाविन (१७४३–१८१६) ह्या अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ रशियन कवीचे कर्तृत्व ह्याच कालखंडातले. दिरझाविनची वाड़्मयीन दृष्टी अभिजाततावादी होती. उद्देशिका हा त्याचा विषेश आवडता कविताप्रकार. त्याच्या कवितेची विषयकक्षा व्यापक असून त्याची धर्मपरायणता, देशभक्त्ती, निसर्गप्रेम; त्याची जीवनासक्त्ती आणि उत्कट भावगेयता; एखाद्या चित्रकाराला साजेल असे रंगारूपांचे, सूक्ष्म तपशिलांचे भान ह्यांचा प्रत्यय तीतून येतो. ‘फिलित्सा' ही रशियाची सम्राज्ञी कॅथरिन दुसरी हिच्यावर त्याने लिहिलेली उद्देशिका प्रसिद्ध आहे. ह्या कवितेत त्याने कॅथरिनचे गुण गायिले; परंतु तिचा अनुग्रह लाभलेल्यांच्या दुर्गुणांवर उपरोधप्रचुर टीका केली. दिरझाविनला भव्यतेची ओढ होती. ही भव्यता ईश्वराच्या अस्तित्वाची; कोसळणाऱ्या धबधब्याची; महान साम्राज्याची अशी वेगवेगळ्या प्रकारची होती. विख्यात रशियन साहित्यिक गोगोल ह्याने दिरझाविनला ‘महानतेचा कवी' म्हणून गौरविले आहे.

इपॉलित बोगदानोव्हिच (१७४३–१८०३) हे या कालखंडातले आणखी एक उल्लेखनीय नाव. दुशेंकाहे त्याचे कथाकाव्य ख्याती पावले. ला फाँतेनच्या एका बोधकथेचे हे मुक्त्त रूपांतर. रशियन साहित्यातील अभिजाततावादाचा प्रभाव ओसरून एक प्रकारची भावविवशतेची प्रवृत्ती त्यात हळूहळू दिसून येऊ लागली. ह्या परिवर्तनाच्या स्पष्ट खुणा बोगदानोव्हिचच्या उपर्युक्त्त कथाकाव्यात दिसून येतात.

१७९० नंतरच्या कालखंडात पुत्येशेस्तव्हीयेइजपीतरबुर्गाव्हमस्कव्हू (१७९०, इं. शी. जर्नी फ्रॉम पीटर्झबर्ग टू मॉस्को) हा स्फोटक ग्रंथ लिहिणाऱ्या अलेक्‌सांद्र निकलायेव्हिच रादीश्चेव्ह(१७४९–१८०२) ह्याचे नाव ठळकपणे समोर येते. कॅथरिनच्या राजवटीत रशियातील कृषकवर्गावर कसा अन्याय होत आहे, ह्याचे विदारक चित्र त्याने ह्या ग्रंथात उभे केले आहे. अन्यायग्रस्त कृषकांना बंड करण्याचा हक्क आहे, असेही त्याने ह्या ग्रंथात प्रतिपादिले.

व्हासिली व्हस्यील्येव्ह्यिच काप्‌निस्त (१७५७–१८२३) ह्याने फनवीजिनप्रमाणेच नाटकाच्या माध्यमातून सामाजिक अन्यायावर उपरोधप्रचुर टीका केली. चिकाने (१७९८) हे त्याचे नाटक उल्लेखनीय आहे. क्रिलॉव्हचे ‘पोस्ट ऑफ स्पिरिट्स' (१७८९, इं. शी.) हे नाटकही उपरोधपूर्ण सामाजिक टीकेच्या संदर्भात निर्देशनीय.

ह्या कालखंडात भावोत्कटतावाद (सेंटिमेंटॅलिझम) ही मुख्य वाड़्मयीन चळवळ ठरली. तिचे नेतृत्त्व होते न्यिकलाय म्यिकाय्‌लव्ह्यिच करमझ्यीन (१७६६–१८२६) ह्याच्याकडे. लेखकाने स्वतःचा आत्मा आणि अंतकरण ह्यांचे चित्र रंगविले पाहिजे, असे करमझ्यीन म्हणत असे. त्याने लिहिलेली ब्येदनाया लीजा (१७९२, इं. शी. द पूअर लिझा) ही कथा भावोत्कटतावादी साहित्यनिर्मितीचे उत्तम उदाहरण होय. करमझ्यीनने पुरस्कारिलेल्या भावोत्कटतावादामुळे एक नवी संवेदनाशीलता रशियन साहित्यात अवतीर्ण झाली. भावावेगाला त्याने महत्त्व दिले. भावावेगांचा उत्तम उपयोग करण्यात सुख साठवलेले आहे; सुखी व्हायचे असेल, तर आपला आपल्या भावनांवर विश्वास असला पाहिजे; कारण भावना नैसर्गिक असतात आणि निसर्ग चांगलाच असतो, अशी त्याची धारणा होती.

रशियन साहित्यासाठी नवी साहित्यभाषा घडविणे हे करमझ्यीनसमोर असलेले आणखी एक उद्दिष्ट होते. स्लाव्होनिक, जर्मन, लॅटिन ह्या भाषांपेक्षा फ्रेंच भाषेचे संस्कार ह्या साहित्यभाषेवर व्हावेत, अशा दृष्टीने त्याचे प्रयत्न होते. अनेक फ्रेंच शब्द त्याने रशियन भाषेत प्रचलित केले. तसेच ह्या वाड़्मयीन भाषेला त्याने बोलभाषेच्या निकट आणले.

करमझ्यीनने कविताही लिहिल्या. संवेदनशील आत्म्यांची फुलबाग, ही त्याची कवितेकडे पाहण्याची दृष्टी होती. आपल्या अंतर्जीवनाची अभिव्यक्त्ती घडवून आणण्याचे वाहन म्हणून कवितेकडे पाहणारा पहिला रशियन कवी, असा त्याचा गौरव रशियन साहित्याच्या काही अभ्यासकांनी केलेला आहे. फ्रेंच कवितेतील पारंपारिक रचनाप्रकार संस्कारून त्याने रशियन कवितेत आणले; तसेच मूळ जर्मानिक असलेले काही नवे रचनाप्रकारसुद्धा हाताळले.

करमझ्यीनने लिहिलेल्या काही कादबऱ्यांतून-उदा., ‘आयलंड बोर्नहोम' (इं. शी.)-रशियन साहित्यातील स्वच्छंदतावादी कादंबऱ्यांची चाहूल लागते.

एकोणिसावे शतक

एकोणिसावे शतक हे रशियन साहित्यातील सुवर्णयुग म्हणता येईल. ह्या शतकात, रशियन साहित्याचाच विकास घडून आला असे नाही, तर चित्रकला, संगीत, रंगभूमी अशी विविध ललित कलाक्षेत्रेही समृद्ध झाली. वाड़्मयीन विकास तर खूपच वेगाने घडून आला. वाड़्मयाच्या क्षेत्रात जी परिवर्तने सामान्यतः पंचवीस ते पन्नास वर्षांच्या कालखंडात घडून येतात, ती ह्या शतकातील रशियात एकेका दशकात घडून आली, असे म्हटले जाते.

ह्या शतकारंभी, अठराव्या शतकातील विविध वाड़्मयीन प्रवाह आणि प्रवृत्ती क्षीण होऊ लागल्या. नवी वाड़्मयीन वर्तुळे अस्तित्वात येऊ लागली. नव्या-जुन्याचा संघर्ष अटळ ठरला. करमझ्यीनच्या वाड़्मयीन भूमिकेच्या विरोधात बिस्येदा नावाचा एक गट उभा राहिला. मात्र हा गट जुन्या, अभिजाततावादी शैलीचा पुरस्कर्ता होता. अल्यिकसांडर सिमेनोव्हिच शिश्कोव्ह (१७५३–१८४१) हा ह्या गटाचा नेता. वाड़्मयीन भाषेच्या संदर्भात ग्रीक-स्लाव्होनिक परंपरेचा आग्रह त्याने धरला. इव्हान अंद्र्येयेव्ह्यिच क्रिलॉव्ह ह्याचा उल्लेख अठराव्या शतकातील रशियन साहित्येतिहासाच्या संदर्भात आधी येऊन गेलेला आहेच. क्रिलॉव्ह हा बिस्येदा गटाचा; परंतु त्याच्या लेखनातील वास्तववादी प्रवृत्ती लक्षणीय आहेत. त्याच्या बोधकथा (ज्यांचा पहिला खंड एकोणिसाव्या शतकाच्या आरंभकाली प्रसिद्ध झाला) त्या दृष्टीने वाचण्यासारख्या आहेत. ह्या बोधकथांचे लोकसाहित्याशी असलेले नातेही लक्षात घेण्यासारखे आहे. राजकीय-सामाजिक आशय मनात धरून लिहिलेल्या ह्या बोधकथांत रशियन लोकांचे जीवन, त्यांचे नैतिक संकेत, त्यांचे व्यावहारिक चातुर्य ह्यांचे अस्सल चित्रण आढळते. बोलभाषेतील वाक्‌प्रयोग, सुभाषिते, म्हणी आणि नर्मविनोद ह्यांनी त्यांच्या भाषेच्या ताजेपणात भर घातली आहे. आरंभी बिस्येदा गटात असलेल्या क्रिलॉव्हचे नंतर आरजामास ह्या गटाशी निकटचे नाते निर्माण झाले. अभिजाततावादी बिस्येदा गटाला शह देण्यासाठी आरजामासची स्थापना झाली होती. ह्या गटाचा संस्थापक होता, करमझ्यीनचा अनुयायी आणि विख्यात रशियन कवी व्हस्यील्यई अंद्र्येयेव्ह्यिच झुकॉव्हस्की (१७८३–१८५२).

झुकॉव्हस्की हा रशियन साहित्यातील स्वच्छंदतावादाच्या प्रणेत्यांपैकी एक होय. हा स्वच्छंदतावाद करमझ्यीनप्रणीत भावनोत्कटतावादातूनच विकसित झालेला होता. आपल्या अंतःस्थ भावजीवनाची आणि उदास स्वप्नांची अभिव्यक्त्ती झुकॉव्हस्कीने आपल्या कवितेतून घडवून आणली. ‘ल्यूदमीला', ‘स्वेतलाना' ह्यांच्यासारखे सुंदर बॅलड त्याने रचिले. उत्कट आत्मपरता, समृद्ध शब्दकळा आणि तंत्रावरील प्रभुत्व त्याच्या कवितेतून प्रत्ययास येते. करमझ्यीनच्या वाड़्मयीन दृष्टिकोणावर आधारित अशी कवितेची नवी भाषा झुकॉव्हस्कीने घडविली. नादमाधुर्य हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. झुकॉव्हसकीने जर्मन आणि इंग्रजी साहित्यकृतींचे उदा., शिलर, गटे, स्कॉट, बायरन ह्यांच्या साहित्यकृतींचे केलेले रशियन अनुवादही निर्देशनीय आहेत. संस्कृतातील नल-दमयंतीची भारतीय कथाही त्याने रशियन भाषेत आणली. ग्रीक महाकवी होमर ह्याच्या ओडिसीचाही त्याने रशियन अनुवाद केला.

झुकॉव्हस्कीने केलेल्या अनुवादांमुळे जर्मन-इंग्रजी साहित्यांतील स्वच्छंदतावादी प्रवाहांचा परिचय रशियनांना झाला.

रशियन साहित्यातील स्वच्छंदतावादाच्या संदर्भात महत्त्वाचे, असे अन्य एक नाव म्हणजे कन्स्तांतीन निकलायेव्ह्यिच बात्युश्कव्ह (१७८७–१८५५) ह्याचे. बात्युश्कव्हची वृत्ती पेगन आणि विशुद्ध इंद्रियभोग्यतेकडे (सेन्शुॲलिटी) झुकणारी होती आणि तिचा प्रत्यय त्याच्या कवितेतून येतो. इटालियन कवितेतील माधुर्य आणि मृदुता रशियन कवितेत आणण्याची त्याची मनीषा होती. थोडया विलापिका आणि भावकविता एवढीच त्याची काव्यरचना. झपाटून टाकणारी भावनोत्कटता आणि एक प्रकारचे अद्भुत, अनोखे सौंदर्य त्याच्या कवितेत आढळते.

१८१२ साली रशियाचे नेपोलियनबरोबर जे युद्ध झाले, त्याचा लक्षणीय परिणाम रशियन समाज व संस्कृती ह्यांवर आणि अर्थातच साहित्यावरही झाला. एक नवेच वातावरण ह्या युद्धाने रशियात निर्माण केले. राष्ट्राभिमानाची एक प्रचंड लाट देशात उसळली; तसेच पश्चिमी विचार-कल्पनांचा शिरकावही रशियात झाला. रशियन साहित्यातील स्वच्छंदतावादी प्रवाहाला क्रांतिकारकतेचे एक नवे परिमाण लाभले. स्वातंत्र्याची, मुक्त्ततेची ओढ साहित्यातून अधिक प्रमाणात व्यक्त्त होऊ लागली. ‘जिल्योनाया लांपा' (इं. अर्थ द ग्रीन लँप) ह्या वाड़्मयीन वर्तुळाने ही ओढ विशेषत्वाने व्यक्त्तविली.

ह्या नव्या वातावरणाला तरुण पिढीचा त्वरित प्रतिसाद मिळाला. त्यातून अनेक गुप्त संघटना निर्माण झाल्या. रशियात घटनात्मक राजेशाहीची मागणी करण्यासाठी १८२५ सालच्या डिसेंबरात काही तरुण लष्करी अधिकारी एकत्र आले. त्यांना ‘डिसेंबरवाले' (डिसेंबरिस्ट्स) म्हणून संबोधिले जाते. डिसेंबरवाल्यांना चिरडून टाकण्यात आले. त्यांच्यांपैकी काहींना देहान्त शासन देण्यात आले, तर काहींना सायबीरिआत हद्दपार करण्यात आले. ह्या डिसेंबरवाल्यांत काही साहित्यिकांचा समावेश होता. उदा., व्हिलेल्म क्यूखेलबेकर (कवी १७९७–१८४६), अल्यिक्‌सांडर बेस्तूझेव्ह (कवी आणि कादंबरीकार १९९७–१८३७) आणि अल्यिक्‌सांडर अदोयेव्हस्की (कवी १८०२–३९). जनतेने जुलुमाविरुद्ध लढले पाहिजे, ही ह्या साहित्यिकांची भूमिका होती.

डिसेंबरवाल्यांपैकी विशेष निर्देशनीय साहित्यिक म्हणजे कनड्राट्यई फ्यॉडरॉव्ह्यिच रिल्येयेव्ह(१७२५–१८२६) हा होय. डिसेंबर बंडाचा हा एक प्रमुख नेता. ते बंड चिरडून झाल्यानंतर त्याला फाशी देण्यात आले. आपल्या कवितांतून रिल्येयेव्हने डिसेंबरवाल्यांची वाड़्मयीन भूमिका आणि कार्यक्रम मांडला. डिसेंबरवाल्यांच्या सामाजिक-राजकीय कल्पना; त्यांना हवी असलेली घटनात्मक राजेशाही आणि व्यक्त्तिस्वातंत्र्य; भूदास पद्धतीला असलेला त्यांचा विरोध ह्यांतून त्यांची वाड़्मयीन भूमिका उभी राहिलेली होती. जुलुमशहांच्या विरुद्ध झगडताना मरण आले, तरी ते हसत स्वीकारणारे वीर रिल्येयेव्हच्या कवितांतून आढळतात. ‘व्हइनारोव्हस्की' आणि ‘नालिव्हाइको' ही त्याची कथाकाव्ये उल्लेखनीय आहेत. ‘मेडिटेशन्स' (इं. शी.) ही त्याची आणखी एक महत्त्वाची कविता. झारशाहीतल्या जुलुमांबद्दलची त्याला वाटणारी चीड तीत प्रभावीपणे व्यक्त्त झालेली आहे. परंतु अलिक्सांद्र सिर्गेयेविच पुश्किन (१७९९–१८३७) हा एकोणिसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ रशियन कवी होय. रादीश्चेव्हच्या विचारांनी पुश्किन प्रभावित झालेला होता. डिसेंबरवाल्यांशी त्याच्या मनाचे सूर जुळले होते. ‘वोल्नस्त' (इं. शी. फ्रीडम) सारखी त्याची विख्यात कविता त्या दृष्टीने लक्षणीय आहे. वृत्तीने तो बंडखोर होता आणि त्याच्या वाड़्मयीन कारकीर्दीच्या आरंभी स्वच्छंदतावादाने तो भारलेला होता. ‘रुस्लान-इ-ल्यूदमीला' ही कविता त्या दृष्टीने वाचण्यासारखी आहे. पण हळूहळू तो वास्तववादाकडे वळला. ‘म्येदनी व्सादनीक 'सारख्या कवितांत तसेच येवगेनीअनेगिन ह्या त्याच्या सर्वश्रेष्ठ काव्यकृतीतून वास्तववादी प्रवृत्तीचा स्पष्ट प्रत्यय येतो. ह्या कथाकाव्यांतून सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टी प्रत्ययास येते, तीही रशियन साहित्यात नवी होती.

पुश्किनने गद्यलेखनही केले आणि रशियन गद्याला आधुनिक वळण लावले. पोवेस्ती ब्येल्‌किना(कथासंग्रह, १८३१, इं. शी. द बेल्किन स्टोरीज), दुब्रोव्‌स्की(कादंबरी, १८३३), कापितान्स्काया दोच्‌का (कादंबरी, १८३६, इं. शी. द कॅपटन्स डॉटर), अराबपित्रा वेलीकव्ह(कादंबरी-अपूर्ण, इं. शी. अरब ऑफ पीटर द ग्रेट) आणि इस्तोरिया पुगाच्योवा(इतिहासग्रंथ, १८३४, इं. शी. पुगाच्योज हिस्टरी) ह्या त्याच्या गद्यकृती निर्देशनीय आहेत. बरीसगदुनोव (लेखनकाळ १८२४-२५; प्रकाशित १८३१) ही त्याची पद्यनाट्यकृती. ह्या शोकात्मिकेत झारशाहीतला सत्ताधारी वर्ग आणि सर्वसामान्य जनता ह्यांच्यातील संबंधांचा प्रश्न प्रभावीपणे हाताळलेला आहे.

इतिहासनिष्ठ दृष्टिकोण, उत्कट राष्ट्रभक्त्ती आणि सामाजिक विषमतेला कडवा विरोध ह्या पुश्किनच्या वास्तववादामागील मुख्य प्रेरणा होत्या. आपल्या साहित्यात जिवंत लोकभाषेचा वापर त्याने केला. सामान्यातल्या सामान्य माणसाच्याही प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे, असे त्याला वाटे. थोर प्रतिभावंत, तसेच राष्ट्रीय प्रबोधनाचा महान पुरस्कर्ता म्हणूनही पुश्किन गौरवार्ह ठरतो.

पुश्किनच्या निधनानंतर, त्याच्यावर लिहिलेल्या उत्कट शोककाव्यामुळे म्यिखईल ल्यर्मंटॉव्ह(१८१४–४१) हा ख्याती पावला. डिसेंबरवाल्यांच्या अपयशी बंडानंतर रशियात जे नैराश्याचे वातावरण पसरले, त्याचा प्रत्यय ल्यर्मंटॉव्हच्या कवितेतून येतो. पुश्किनवरील आपल्या शोककाव्यात रशियन उमराव वर्गावर ल्यर्मंटॉव्हने टीका केली होती आणि झारच्या दरबाराशी निकट असलेल्या मंडळींवर पुश्कीनच्या मरणाची जबाबदारी टाकली होती. परिणामतः त्याला कॉकेशसमध्ये हद्दपार करण्यात आले होते. ल्यर्मंटॉव्हची कविता दुर्दम्य स्वातंत्र्याकांक्षेने भारलेली आहे. कारुण्य आणि औदासिन्य ह्या स्वच्छंदतावादातील अन्य प्रवृत्तीही त्याच्या कवितेत लक्षणीयपणे आढळतात. ‘डेमन' (१८३९) आणि ‘मत्सीरी' (१८४०) ह्या त्याच्या महत्त्वाच्या काव्यकृती होत. त्याच्या कवितेचे स्वच्छंदतावादी वळण त्यांतून स्पष्टपणे दिसून येते. त्याने काही नाटकेही लिहिली. मस्काराद् हे त्याचे नाटक ख्याती पावले. गिरोइ नाशेव्हो व्ह्रेमिनी (१८४० इं. भाषांतरे ए हीरो ऑफ नाउ-अ-डेज, १९२०; ए हीरो ऑफ अवर टाइम, १९२८ आणि ए हीरो ऑफ अवर ओन टाइम्स, १९४०) ही त्याची कादंबरी विशेष उल्लेखनीय. आपल्याच समाजात आपल्याला योग्य असे स्थान न गवसलेल्या एका तरुणाचे प्रभावी चित्रण तीत करण्यात आले आहे.

अन्य उल्लेखनीय कवींत फ्यॉडरइव्हानव्ह्यिच ट्यूट्चेव्ह (१८०३-७३) आणि न्यिकलाय न्येक्रासॉव्ह (१८२१-७८) ह्यांचा अंतर्भाव होतो. ट्यूट्चेव्हची बरीचशी कविता निसर्गपर तसेच तात्त्विक स्वरूपाची आहे. आर्ष आणि प्रतिमाप्रचुर शैली ही त्याच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. रशियातील सर्वसामान्यांच्या दुःखीकष्टी जीवनाचे प्रातिनिधिक दर्शन न्येक्रासॉव्हने आपल्या कवितेतून घडविले. कवितेला सामाजिक कार्य आणि प्रयोजन आहे, अशी न्येक्रासॉव्हची भूमिका होती. डिसेंबरवाले कवी आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या पादातील सोव्हिएत कवी ह्यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून न्येक्रासॉव्हच्या कवितेकडे पाहता येते. त्याच्या नंतरच्या एकूण रशियन कवितेच्या विकासातही त्याचा प्रभाव लक्षणीय आहे. मुळात पुश्किनने काढलेल्या सव्हरेमेन्निक (इं. अर्थ कंटेपररी) हे मासिक पुश्किकनच्या निधनानंतर न्येक्रासॉव्हने नावारूपाला आणले. त्याला श्रेष्ठ वाड़्मयीन नियतकालिकाचा दर्जा प्राप्त करून दिला.

यिव्हगेन्यी बॅराटिन्स्की (१८००–४४), प्रिन्स प्यॉटर अंद्रेयेव्ह्यिच व्ह्याझेम्‌स्की (१७९२–१८७८) आणि न्यिकलाय म्यिखाइलोव्ह्यिच याझिकॉव्ह (१८०३–४६) हे अन्य काही कवी. बॅराटिन्स्कीने काही कथाकाव्ये लिहिली. व्ह्याझेम्‌स्कीने काही उपरोधप्रचुर काव्यरचना केली आहे. मद्य, स्त्रिया हे याझिकॉव्हच्या कवितेचे विषय.

निकोलस अगारयोव्ह (१८१३–७७), अफानासी फ्येत (१८२०–९२) आणि अपोलॉन निकलायेव्हिच माइकव्ह (१८२१–९७) हे कवीही उल्लेखनीय होत. अगारयेव्हच्या कवितेत भ्रमनिरास आणि हरवल्या सुखाच्या स्मृती हे विषय पुन्हा पुन्हा येतात. फ्येत ह्याची काव्यविषयक भूमिका विशुद्ध कलावाद्याची होती. त्याच्या निसर्गकवितांत त्याची कवित्वशक्त्ती विशेषत्वाने प्रत्ययास येते. माइकव्हच्या कवितेत प्रतिमांना विशेष स्थान असल्याचे दिसते.

रशियनमधील वास्तववादी नाटकांचा प्रवर्तक समजला जाणारा अल्यिक्‌सांडर ग्यिऱ्यबयेडॉव्ह(१७९५–१८२९) हा एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ख्यातकीर्त नाटककार होय. गोर्ये ऑत उमा(लेखनकाळ १८२२–२४; इं. शी. वो फ्रॉम विट) ह्या त्याच्या प्रसिद्ध नाट्यकृतीत, गुलामगिरीची प्रथा पाळणाऱ्या रशियन समाजाच्या ऱ्हासाचे उपरोधप्रचुर चित्रण केले आहे (द मिस्‌फॉर्‌च्यून ऑफ बीइंग क्लेव्हर, १९१४; द मिस्‌चीफ ऑफ बीइंग क्लेव्हर, १९२५ ही ह्या नाटकाची काही इंग्रजी भाषांतरे).

ह्या शतकाच्या आरंभी कवितेला आलेला बहर पुश्किन आणि ल्यर्मंटॉव्ह ह्यांच्या निधनाबरोबरच ओसरू लागला आणि रशियन साहित्यातील श्रेष्ठ गद्यकृतींचे महान युग अवतरले. आपल्या आयुष्याच्या अखेरीस स्वतः पुश्किनही गद्याकडे वळलेला होता. ल्यर्मंटॉव्हनेही ए हीरो ऑफ अवर टाइम्स(इं. भा.) ही कादंबरी लिहिली होती.

तथापि एकोणिसाव्या शतकात सर्वदूर ख्याती पावलेला पहिला रशियन कादंबरीकार म्यिखईल निकोलायेव्हिच झागोस्किन (१७८९–१८५२) हा होय. ‘युरी मिलोस्लाव्हस्की ऑर द रशियन्स इन १६१२' (१८२९, इं. शी.) ही त्याची कादंबरी निर्देशनीय आहे. एक प्रकारच्या अनघड राष्ट्रवादाने ही कादंबरी भारलेली आहे. अल्यिक्‌सांडर बेस्तूझेव्ह हाही एक लोकप्रिय कादंबरीकार; परंतु आपल्या कथात्मक आणि अन्य लेखनाने आपल्या तसेच पुढील पिढ्यांवरही खोल ठसा उमटवणारा साहित्यिक म्हणजे निकोलाय गोगोल(१८०९-५२). गोगोलच्या वाड़्मयीन कर्तृत्वामुळे रशियन साहित्याने एक नवी उंची गाठली. कथा, कादंबऱ्या, नाटके असे विविध प्रकारचे गद्यलेखन त्याने केले. सखोल मानवतावादाचा प्रत्यय गोगोलच्या लेखनातून येतो. पददलितांच्या दारिद्र्याचे, तसेच तत्कालीन रशियातील वरिष्ठ वर्गांत वावरणाऱ्यांच्या नैतिक अधःपाताचे प्रभावी चित्रण गोगोलने केले. त्यासाठी विनोदाचाही वापर केला; पण गोगोलच्या विनोदामागचे उत्कट कारुण्य प्रत्ययाला आल्यावाचून राहत नाही. ह्या संदर्भात डॉस्टोव्हस्कीचे उद्‌गार लक्षणीय आहेत. ‘आयुष्यभर गोगोल स्वतःला आणि आम्हाला हसत राहिला. आम्हीही हसत सुटलो. इतके, की अखेरीस हसता हसता आमच्या डोळ्यांतून अश्रू आले’. ‘शिन्येल' (इं. शी. द ग्रेट कोट) ही त्याची जगद्विख्यात कथा. पीटर्झबर्गमधल्या एका गरीब कारकुनाची ही कथा, सर्वसामान्यांच्या वाट्याला येणारा अन्याय आणि लुबाडणूक ह्यांची विलक्षण परिणामकारक अशी प्रचीती देते. मोर्तव्ह्यियेदुशि(भाग १, १८४२, इं. भा. दडेडसोल्स) ह्या त्याच्या कादंबरीत न्यायनीतीची जाणीव आणि करुणा ह्यांचा पूर्ण अभाव असलेले जमीनदार आणि गुलामांचे मालक ह्यांचे उपरोधप्रचुर चित्र त्याने उभे केले आहे. रशियन कादंबरीचा विकास आणि रशियन साहित्यातील वास्तववाद ह्यांचे आकलन होण्याच्या दृष्टीने ह्या कादंबरीचे महत्त्व मोठे गणले जाते. रिविजोर(१८३५-प्रयोग, १८३६, इं. भा. द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर, १९४७) हे गोगोलचे नाटकही गाजले. लाचलुचपत, जुलुमशाही ह्यांनी बरबरटलेल्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे दर्शन ह्या सुखात्मिकेतून घडते. गोगोलच्या ह्या नाटकाचे मराठी रूपांतर पु. ल. देशपांडे ह्यांनी अंमलदारह्या नावाने केले आहे (१९५२).

श्रेष्ठ रशियन साहित्यसमीक्षक व्हिससर्यिऑनब्यिल्यीन्‌स्कई(१८११–४८) हा गोगोलचा समकालीन. एका श्रेष्ठ साहित्यिकाचा समकालीन आणि जाणता समीक्षक ह्या नात्याने गोगोलच्या साहित्यकृतींचा अर्थ आणि मर्म उकलून दाखविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याने पार पाडलीच; पण भूतकालीन रशियन साहित्यिकांच्या कर्तत्वाचाही चिकित्सकपणे परामर्श घेतला. असे म्हणता येईल, की एकोणिसाव्या शतकातील एकूण साहित्यसमीक्षेची दिशा त्याने निश्चित केली. वास्तववादाचा तो एक प्रखर पुरस्कर्ता. रशियातील समाजवादी वास्तववादात अनुस्यूत असलेल्या अनेक प्रवृत्तींचा तो जनक मानला जातो. त्याच्या समीक्षात्मक लेखनाचा प्रभाव रशियातील अनेक सर्जनशील साहित्यिकांवर पडला.

ह्या शतकातील आणखी एक थोर रशियन साहित्यिक फ्यॉडर डॉस्टोव्हस्की (१८२१–८१) ह्याने आपल्या आरंभीच्या लेखनात गोगोलचीच वास्तववादी परंपरा पुढे चालविली. गोगोलचा वास्तववाद आणि नंतर पूर्णतः विकसित झालेला रशियन वास्तववाद ह्यांच्यात अर्थातच फरक आहे. गोगोलप्रणीत वास्तववादात जीवनाच्या हीन, हिणकस आणि विरूप बाजूचे दर्शन घडविले जात होते; परंतु परिणतावस्थेतील रशियन वास्तववादाने जीवनाच्या कुरूप अंगांपुरतेच स्वतःला मर्यादित करून घेतले नाही, तर अवघे जीवनच त्याने आपल्या कवेत घेतले.

डॉस्टोव्हस्कीची पहिली स्वतंत्र साहित्यकृती बेदनिये ल्यूदि(१८४६, इं. शी. पूअर फोक) ही होय. पुढे त्याला सायबीरियात सक्त्त मजुरीसाठी हद्दपार करण्यात आले. ही शिक्षा भोगून १८५९ मध्ये तो पीटर्झबर्गला परतल्यानंतर त्याच्या साहित्यिक जीवनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. ह्या टप्प्यात डॉस्टोव्हस्कीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभेला अधिक अनुकूल आणि साजेसे विषय आपल्या साहित्यकृतींसाठी निवडले आणि प्रिस्तुप्लेनियेइनकझानिये(१८६६, इं. भा.क्राइम अँड पनिशमेंट, १९५१), इदिओत (१८६८, इं. भा. द इडिअट, १९३५), ब्येसी(१८७१-७२, इं. भा. द पझेस्‌ड, १९३६), ब्रात्या कारामाझवि (१८७९-८०, इं. भा. ब्रदर्स करमझोव, १९२७) सारख्या जगद्विख्यात कादंबऱ्या त्याने लिहिल्या. उत्कृष्ट कथालेखनही त्याने केले. रशियन माणसाच्या जीवनातील करुण अंतर्विरोध हा डॉस्टोव्हस्कीच्या बहुतांश लेखनाचा मूलभूत विषय होय. मनाची पकड घेणारे नाटय त्यांच्या साहित्यकृतींत भरून राहिलेले आहे. समाजातील नैतिक अधःपतन आणि क्रूर विसंगती ह्यांचे प्रत्ययकारी चित्र तो उभे करतो. मानवी अंतःकरणाचे सूक्ष्म, सखोल आकलन करून देणारी अंतःप्रज्ञा डॉस्टोव्हस्कीच्या ठायी होती. त्यामुळे त्याच्या व्यक्त्तिरेखांच्या मनांचे गहन तळ तो गाठतो.

रशियन साहित्याला श्रेष्ठ कादंबऱ्यांची देणगी देणारा इव्हान टुर्ग्येन्येव्ह(१८१८–९३), झापिस्की अखोत्‌निका (१८५२, इं. शी. स्पोर्ट्‌समन्स नोटबुक) ह्या त्याने रंगविलेल्या ग्रामीण जीवनाच्या शब्दचित्रांमुळे ख्याती पावला. माणुसकी, बुद्धिमत्ता आणि सुसंस्कृतपणा अशा सर्व संदर्भात भूदास हे त्यांच्या मालकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे ह्या शब्दचित्रांतून टुर्ग्येन्येव्हने दाखविले होते. टुर्गेन्येव्हच्या कादंबऱ्यांत रुदिन(१८५६), द्व-यान्स्कये ग्निझदो (१८५९, इं. शी. अ नेस्ट ऑफ जेंटल फोक), नाकानून्ये(१८६०, इं. शी. ऑन द ईव्ह), अत्सी इ द्येती(१८६२, इं. शी. फादर्स अँड सन्स), दीम(१८६७, इं. शी. स्मोक) आणि नोफ्‌(१८७७, इं. शी. व्हर्जिन सॉइल) ह्यांचा अंतर्भाव होतो. आपल्या काळातील तरुणांसमोर उभ्या ठाकलेल्या अनेक सामाजिक प्रश्र्नांना टुर्ग्येन्येव्हने आपल्या कादंबऱ्यांतून वाचा फोडली. ह्या सामाजिक प्रश्र्नांची त्याला असलेली उत्तम जाण ह्या कादंबऱ्यांतून दिसून येते. आपल्या साहित्यकृतींतून रशियन स्त्रियांचे त्याने केलेले व्यक्त्तिरेखनही त्याच्या वाड़्मयीन श्रेष्ठत्वाला साजेसे आहे. रशियन स्त्रियांचा उच्च ध्येयवाद आणि त्यांचे गहिरे भावबळ त्याने चित्रित केले. सुंदर, काव्यात्म निसर्गचित्रे हे त्याच्या लेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. टुर्ग्येन्येव्हने काही नाटके आणि कविताही लिहिल्या; पण त्याची कीर्ती आज मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या कादंबऱ्यांवर.

रशियन साहित्याची कीर्ती अनेक पटींनी वाढविणारा आणि एकोणिसाव्या शतकातील अनेक साहित्यिकांना प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे प्रभावित करणारा महान साहित्यिक लीओटॉलस्टॉय(१८२८–१९१०). कथा, कादंबऱ्या, नाटके असे विविध प्रकारचे लेखन त्याने केले. आरंभीच्या लेखनात त्याने सामान्य माणसांच्या आयुष्यांचा सरदार-जमीनदारांच्या हितसंबंधांशी होणारा संघर्ष चित्रित केला.

व्हय्‌नाइ मीर्‌ (लेखनकाळ १८६३–६९, इं. शी. वॉर अँड पीस) आणि ॲना करेनिना(लेखनकाळ १८७३–७७; कादंबरीचा पहिला भाग १८७५ मध्ये पूर्ण) ह्या दोन कादंबऱ्यांनी त्याला केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक कीर्ती प्राप्त करून दिली. रशियाचे नेपोलियनशी झालेले युद्ध ही ‘वॉर अँड पीस' मधील मध्यवर्ती घटना. तिच्या भोवती, रशियन समाजाच्या विविध स्तरांतील लोकांच्या जीवनाचे ठळक चित्रण टॉलस्टॉयने केलेले आहे. ह्या कादंबरीचा प्रचंड आवाका, तिची रचना, तिच्यातील अनेकविध व्यक्त्तिरेखा कादंबरीच्या कोणत्याही विवक्षित प्रकाराच्या मर्यादांपलीकडे जाणाऱ्या आहेत. ऐतिहासिक, इतिहासाचे तत्त्वज्ञान सांगणारी, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, राजकीय अशा कुठल्याही एका विशेषणाने ह्या कादंबरीचे वर्णन करता येत नाही, कारण हे सर्वच विशेष ह्या कादंबरीत एकात्म झालेले आहेत. ॲना करेनिनाह्या कादंबरीत ॲना ह्या संवेदनाशील, उत्साही आणि चैतन्यपूर्ण अशा एका स्त्रीचा, रशियन समाजातील परिस्थितीने करून टाकलेला कोंडमारा टॉलस्टॉयने दाखविला आहे. टॉलस्टॉयच्या अन्य निर्देशनीय साहित्यकृतींत वस्क्रेसेनिये(१८९९, इं. शी. रेसरेक्शन) ह्या कादंबरीचा तसेच ष्मेर्त इवाना इलिचा(कथा १८८०, इं. शी. द डेथ ऑफ इव्हान इलिच), क्रेइत्सेरवासनाता(१८८७–८९, इं. शी. द क्राइट्सर सोनाता) ह्यांसारख्या कथांचा समावेश होतो. व्लास्त तमी(१८८६, इं. शी. द पॉवर ऑफ डार्कनेस) आणि झिवोय्‌त्रूप्‌(१९००, इं. शी. द लिव्हिंग कॉर्प्‌स) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. टॉलस्टॉयच्या लेखनकृती म्हणजे केवळ रशियनच नव्हे, तर जागतिक साहित्यातील वास्तववादाच्या विकासाने गाठलेले एक टोक होय. रशियन साहित्याच्या इतिहासात टॉलस्टॉयच्या साहित्याने एक युग निर्माण केले.

इव्हानअल्यिक्‌सांद्रव्ह्यिचगनचरॉव्ह(१८१२–९१) ह्याच्या अबिक्नोव्हेन्नाया इस्तोरिया(१८४७, इं. भा. अ कॉमन स्टोरी, १९१७), अब्‌लोमव्ह(१८५०) आणि अब्रीव्ह(१८६९, इं. भा. दप्रेसिपिस, १९१५) ह्या कादंबऱ्यांतून निरुद्योगी आणि निरुपयोगी अशा रशियन सरंजामदारांच्या जीवनाचे प्रभावी चित्रण आढळते. ह्या कादंबऱ्यांपैकी अब्‌लोमव्हह्या कादंबरीचा समावेश रशियन साहित्यातील श्रेष्ठ कादंबऱ्यांत केला जातो. वरवर महत्त्वशून्य वाटणाऱ्या तपशीलांचा, कलात्मकतेने उपयोग करून इच्छित परिणाम साधणे हे गनचरॉव्हच्या लेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. अल्यिक्सेइ पिसेमस्की (१८२०–८१) हाही एक उल्लेखनीय कादंबरीकार. ‘अ थाउजंड सोल्स' (१८५८, इं. शी.) ह्या कादंबरीमुळे त्याला लोकप्रियता प्राप्त झाली. तथापि बदलत्या काळाशी त्याच्या मनाचा सांधा जुळत नव्हता. प्रागतिक सामाजिक विचारांबद्दल त्याला फारशी आस्था नव्हती आणि ‘ट्रबल्ड सी' (१८६३, इं. शी.) ह्या त्याच्या कादंबरीतून त्याची ही वृत्ती प्रकर्षाने प्रकट झाल्यामुळे त्याची लोकप्रियता ओसरली. ‘अ हार्ड लॉट' (१८५९, इं. शी.) ह्या त्याच्या शोकात्म नाट्यकृतीत वास्तववादी जीवनचित्रण एका टोकाला नेलेले आढळते. ही नाट्यकृतीही लोकप्रिय झाली होती.अल्यिक्‌सांडर इव्हानव्ह्यिच क्यूप्रिन(१८७०–१९३८) ह्याची वाड़्मयीन कारकीर्द एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा दोन्ही शतकांतील. गरीबांची दुःखे, सैनिकी जीवनातले अनुभव हे त्याने आपल्या कथांतून मांडले. तथापि यामा (१९०९–१५, इं. भा. यामा : द पिट१९२७, मराठी अनुवाद यामा, २ भाग १९३४; १९३६) ह्या वेश्याजीवनावर आधारलेल्या त्याच्या कादंबरीला मोठी कार्ती लाभली. बूर्झ्वा समाजातील अनीतीवर तीत प्रकाश टाकला आहे.

एकोणिसाव्या शतकातील रशियन नाट्यलेखनाच्या संदर्भात अल्यिक्‌सांडर अस्ट्रॉव्हस्की(१८२३–८६) ह्याचा निर्देश, गोगोलच्या खालोखाल महत्त्वपूर्ण नाटककार म्हणून केला जातो. ‘द बँक्‌रप्ट' (१८५०, इं. शी.) आणि ‘स्टॉर्म' (१८६०, इं. शी.) ही त्याची दोन विशेष लोकप्रिय नाटके. रशियन व्यापाऱ्यांचे जीवन, त्यांचा अधाशीपणा, त्यांच्या लबाडया, हा ‘बँक्‌रप्ट'चा विषय. ‘स्टॉर्म' मध्ये रशियातील व्यापारी कुटुंबांच्या प्रमुखांची सत्ता गाजविण्याची वृत्ती, त्यांचा अविवेकीपणा उघड केला आहे. तत्कालीन रशियन तरुणांनी प्रागतिक विचार घेऊन पुढे जावे, असे आवाहन अस्ट्रॉव्हस्कीच्या नाट्यकृतींत होते.

ह्या शतकातील एक श्रेष्ठ उपरोधकार एन. श्चेड्र्यिन(१८२६–८९–म्यिखईल सलटिकॉव्ह हे त्याचे खरे नाव) हा पत्रकार, नाटककार आणि कादंबरीकार. न्यिकलाय न्येक्रासॉव्ह हा सवरेमेन्निकचा संपादक असताना, ‘प्रॉव्हिन्शिअल स्केचिस' (इं. शी.) ह्या नावाने श्चेड्र्यिनने रंगविलेली, नोकरशाहीच्या जगातली, काही उपरोधप्रचुर शब्दचित्रे त्याने आपल्या नियतकालिकात प्रसिद्ध केली व सुधारणांना, प्रागतिक विचारांना अनुकूल झालेल्या तत्कालीन रशियतील सामाजिक वातावरणात त्या शब्दचित्रांचे स्वागत झाले. पुढे श्चेड्र्यिनने न्येक्रासॉव्हबरोबर ‘फादरलँड ॲनल्झ' (इं. शी.) ह्या नियतकालिकाच्या संपादनातही भाग घेतला.

स्म्येर्त पाजूखिना(इं. शी. पाजूखिन्स डेथ) ही त्याने रशियन व्यापाऱ्यांवर लिहिलेली सुखात्मिका प्रसिद्ध आहे. त्याने उपरोधप्रचुर अशा काही बोधकथाही (फेबल्स) लिहिल्या. परंतु श्चेड्र्यिनची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या गस्पदागलव्हल्योवि (१८७२–७६ इं. शी. द गल्व्हल्यॉव्ह फॅमिली) ह्या वास्तववादी सामाजिक कादंबरीकार. भूदास बाळगून राहणाऱ्यांच्या पशुतुल्य वृत्तीचे प्रभावी चित्र ह्या कादंबरीत श्चेड्र्यिनने उभे केले आहे. न्यिकलायल्येस्कॉव्ह(१८३१-९५) ह्याने कथालेखनाच्या क्षेत्रात लक्षणीय कर्तृत्व दाखविले. ‘लेडी मॅक्‌बेथ ऑफ द मिसेन्स्क डिस्ट्रिक्ट' (१८६५, इं. भा. १९६१) ही त्याची सर्वोत्कृष्ट कथा. तथापि ‘द टेल ऑफ क्रॉस-आइड लेफ्टी फ्रॉम तुला अँड द स्टील फ्ली' (१८८१) ह्या त्याच्या कथेला सर्वाधिक लोकप्रियता प्राप्त झाली. संपन्न आणि वैविध्यपूर्ण शब्दकळा हे ल्येस्कॉव्हच्या कथेचे एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य. विनोदनिर्मितीसाठी त्याने काही वेळा चर्च स्लाव्होनिकचा वापर केला. त्याच्या कथांमधील अशा वैशिष्ट्यपूर्ण जागा तर अनुवादाच्या शक्यतेपलीकडच्या आहेत. विलक्षण प्रभावी असे कथनकौशल्यही त्याच्या ठायी होते. चित्रमय शैली आणि वेगाने उलगडत जाणारी गुंतागुंतीची संविधानके ह्या दोन वैशिष्ट्यांमुळे ल्येस्कॉव्ह अन्य रशियन कथा-कादंबरीकारांपेक्षा काहीसा वेगळा उठून दिसतो. तथापि रशियातील क्रांतिकारी चळवळीविरुद्ध त्याचा रोख असल्यामुळे प्रागतिकांच्या कठोर टीकेला त्याला तोंड द्यावे लागले. ल्येस्कॉव्हच्या विचारांत पुढे बदल घडून आला.

रशियन साहित्यातील श्रेष्ठ परंपरांचे संपन्न संस्कार थोर रशियन कथाकार आणि नाटककार अंतॉनचेकॉव्ह(१८६०–१९०४) ह्याच्या साहित्यकृतींतून प्रत्ययास येतात. साहित्यिकाच्या सामाजिक जबाबदारीची तीव्र जाणीव चेकॉव्हमध्ये होती आणि ती त्याने व्यक्त्तही केली. तथापि राजकारणाच्या संदर्भात तो उदासीन होता. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्याचा संबंध नव्हता. चेकॉव्हच्या कथांमध्ये प्रसन्नविनोद आहे; मानवी मनांचे अंतःस्फूर्त आकलन आहे; जीवनाच्या क्षुद्रतेमुळे येणारा कंटाळवाणेपणा, सामाजिक विसंगती, दुःख, अन्याय ह्यांची जाणीवही आहे. साध्यासुध्या घटनांतून आणि तपशिलांतून प्रभावी कथा उभी करण्याचे सामर्थ्य चेकॉव्हच्या ठायी होते. चेकॉव्हच्या प्रभावातून कथालेखनाची एक जागतिक परंपरा उभी राहिली ह्याचे एक महत्त्वाचे कारण, कथा ह्या साहित्यप्रकारालाच त्याने नव्या परिणामांचा लाभ करून दिला, हे आहे.

चेकॉव्हने वैशिष्ट्यपूर्ण असे नाटालेखनही केले आणि यूरोपीय नाटयपरंपरेच्या विकासात मोलाची भर घातली. च्याइका(१८९६, इं. शी. द सी गल), द्याद्या व्हान्या (१८९७, इं. शी. अंकल व्हान्या) आणि व्हिश्न्योविसाद(१९०३, इं. शी. द चेरी ऑर्चर्ड) ही त्याची काही निर्देशनीय नाटके. चेकॉव्हच्या नाट्यकृती तरल, मर्मस्पर्शी आशयाने संपन्न आहेत. ‘द चेरी ऑर्चर्ड' चा मराठी अनुवाद सुमति कानिटकर ह्यांनी केला आहे. (चेरीचा मळा, १९८२). लिओनिद आंद्रेयेव्ह (१८७१-१९१९), व्हसेव्हलॉट गार्शिन (१८५५–८८) आणि व्ह्‌लद्यीम्यिर कोरोलेंको (१८५३–१९२१) हे कथेच्या क्षेत्रातले काही अन्य साहित्यिक. ‘रेड लाफ' (१९०५, इं. भा.) व ‘द सेव्हन दॅट वेअर हँग्‌ड' (१९०९, इं. भा.)  ह्या आंद्रेयेव्हच्या उत्कृष्ट कथा, तर फोर डेज’ (१८७७, इं. शी.) आणि ‘द रेड फ्लॉवर' (१८८३, इं. शी.) ह्या गार्शिनच्या. ‘मकार्स ड्रीम' (१८८५, इं. शी.), ‘ॲट नाइट' (इं. शी.) आणि ‘द डे ऑफ अटोनमेंट' ह्या कोरोलेंकोने लिहिलेल्या कथा प्रसिद्ध आहेत. आंद्रेयेव्ह हा वास्तववादाकडून प्रतीकात्मकतेकडे वळला. गार्शिनने फारसे लेखन केले नाही; जे केले, त्यातून जग आणि जीवन ह्यांबाबतच्या तीव्र असमाधानाची जाणीव प्रत्ययास येते. कोरोलेंकोच्या कथांत भावकवितेची काही वैशिष्ट्ये आढळून येतात.

अल्यिक्‌सांडरहेर्टसेन(१८१२–७०) हा पत्रकार व राजकीय विचारवंत. ‘माय पास्ट अँड थॉट्स' (१८६१–६७, इं. शी.) ह्या त्याच्या संस्मरणिका म्हणजे रशियन साहित्यातील एक उत्कृष्ट गद्यकृती. ह्या शतकातील रशियन साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात न्यिकलाय गव्ह्‌ऱ्यीलव्ह्यिच चेरनिशेव्हस्की(१८२८–८९)न्यिकलायढब्रल्यूबॉव्ह(१८३६–६१) व डम्यीट्रई पिसारेव्ह(१८४०–६८) ह्या तीन समीक्षकांनी आपला ठसा उमटविला. सवरेमेन्निकह्या नियतकालिकाचा काही काळ संपादक असलेला चेरनिशेव्हस्की हा केवळ समीक्षक म्हणूनच नव्हे, तर विचारवंत म्हणूनही ख्याती पावला. कला आणि वास्तववाद ह्यांच्यातील सौंदर्यशास्त्रीय नातेसंबंधावर त्याने केलेले लेखन रशियातील जडवादी विचारसरणीच्या विकासात मोलाचे ठरले. सौंदर्यशास्त्रीय विचाराच्या संदर्भात त्याने जडवादी दृष्टिकोण बाळगला. जीवनाच्या आकलनावर सौंदर्य अवलंबून असते, असा विचार त्याने मांडला. ललित कलांचा आणि वैचारिकतेचा जो वारसा आपणास प्राप्त होतो, त्याच्याकडे एका चिकित्सक दृष्टीने पाहण्याची भूमिका त्याने पुरस्कारिली. कलावंताने कलेच्या माध्यमातून जीवनाची केवळ पुनर्निर्मिती करून भागणार नाही, तर जीवनाचा अर्थही त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्याचे मत होते. ‘कलेकरता कला' त्याला मान्य नव्हती. ह्या विचारांचा प्रभाव पुढील रशियन समीक्षेवर ठळकपणे जाणवतो. ‘व्हॉट टू डू ?'(लेखनकाळ - १८६२-६३ इं. शी.) ही कादंबरीही त्याने लिहिली. क्रांती आणि समाजवाद हाच देशमुक्त्तीचा एकमेव मार्ग होय, ही त्याची धारणा ह्या कादंबरीतून स्पष्टपणे दिसून येते. रशियन साहित्यातील गोगोलच्या कालखंडावर त्याने केलेले लेखनही महत्त्वपूर्ण आहे.

ढब्रल्यूबॉव्हने सवरेमेन्निकच्या संपादकमंडळात प्रमुख समीक्षक म्हणून काम केले होते. भूदासपद्धती, जुलुमशाही आणि निरंकुश सत्ता ह्यांबद्दल त्याला तिटकारा होता. समता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये त्याच्या मनात रुजली होती. साहित्यातील वास्तववादाचा त्यानेही हिरिरीने पुरस्कार केला. त्याच्या समीक्षात्मक लेखांत गनचरॉव्हकृत अब्‌लोमव्ह(कादंबरी), अस्ट्रॉव्हस्कीकृत ‘अ किंगडम ऑफ डार्कनेस' (नाटक, इं. शी.), टुर्ग्येन्येव्हकृत ‘ऑन द ईव्ह’ (कादंबरी, इं. शी.) ह्यांसारख्या साहित्यकृतींवरील लेखांचा समावेश होतो. ह्या साहित्यकृतींतून चित्रित झालेल्या रशियन जीवनाच्या समीक्षेवर ढब्रल्युबॉव्हचा विशेष भर होता, असे दिसून येते. प्रगतीवर विश्र्वास असलेला आणि लोकसेवेच्या भावनेने भारलेला लोकशाहीवादी बुद्धिजीवी वर्ग घडविणे आणि त्याच्या समीक्षात्मक लेखनामागची एक महत्त्वाची प्रेरणा होती. जुनाट रशिया आणि त्यातील परंपरेने पोसलेल्या प्रतिगामी संस्था ह्यांबद्दल त्याला मनस्वी तिटकारा होता. ह्या संस्थांपासून बुद्धिजीवी वर्ग आणि सर्वसामान्य लोक दूर जावेत, दूर राहावेत हेही त्याचे एक उद्दिष्ट होते. रशियन क्रांतिकारकांना त्याच्या लेखनाने प्रभावित केले होते.

कलेचा विचार केवह उपयुक्त्ततावादी दृष्टिकोणातून केला पाहिजे, ही पिसारेव्हची भूमिका होती. विशुद्ध कलावादाला त्याचा विरोध होता. समाजाच्या शैक्षणिक-वैज्ञानिक-भौतिक प्रगतीच्या आड जे येईल ते विघातक असे त्याने मानले. कवितेलाही त्याचा विरोध होता. पिसारेव्हची भूमिका वादग्रस्तः पण महत्त्वाची ठरली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील रशियन साहित्यात कवितेपेक्षा गद्यकृतींनी आपला ठसा उमटविला. ह्या संदर्भात पिसारेव्हची काव्यविरोधी भूमिकाही प्रभावी ठरली.

विसावे शतक

रशियाच्या संदर्भात ह्या शतकारंभीचा काळ फार मोठया उलथापालथीचा होता; आणि त्याचे प्रतिसाद रशियन साहित्यातही अपरिहार्यपणे उमटलेले दिसतात. प्रतीकवाद, नवकालवाद (फ्यूचरिझम), प्रतिमावाद (इमेजिझम) असे विविध वाड़्मयीन प्रवाह आणि प्रवृत्ती साहित्यात दिसू लागल्या. जीवनातल्या नव्या वास्तवाच्या अभिव्यक्त्तीसाठी कवितेत नवी तंत्रे वापरली जाऊ लागली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रतीकवादाने रशियन कवितेत चैतन्य ओतले. सिमेन याकोव्ह्‌लेव्हिच नाडसन (१८६२–८७), अलेक्सी निकोलायेव्हिच अपुख्‌तीन (१८४१–९३) आणि मुख्यतः व्ह्‌लद्यीम्यिर सोलोव्ह्योव्ह (१८५३–१९००) हे ह्या प्रतीकवादाचे अग्रदूत होत. सोलोव्ह्योव्ह कवी, तत्त्वज्ञ आणि गूढवादी. गूढवादाचा प्रभाव त्याच्या कवितेवरही दिसून येतो. संपूर्ण जग ही एक प्रतीकांनी घडविलेली व्यवस्था आहे आणि अमूर्त सत्यांचा आविष्कार ही प्रतीके घडवितात अशी सोलोव्ह्योव्हची धारणा होती. कन्स्तांतीन बालमाँत (१८६७–१९४३) हाही प्रतीकवादी कवी. अल्यिक्‌सांडर ब्लॉक(१८८०–१९२१) हा श्रेष्ठ प्रतीकवादी कवी. ‘व्हर्सिस अबाउट द ब्यूटिफुल लेडी' (१९०४, इं. शी.) ह्या आपल्या काव्यसंग्रहातील कवितांतून एका स्त्रीसंबंधीचे आपले भावानुभव त्याने एका गूढोत्कट पातळीवर नेऊन ठेवले. ह्या स्त्रीत त्याने सोफिआचे-ईश्वरी प्रज्ञेचे-प्रतीक पाहिले. नव्या जगात रशियाची भूमिका ‘मेसिया'ची आहे असे त्याला वाटत होते. ‘द ट्वेल्व्ह' (इं. शी.) ही त्याची एक प्रसिद्ध कविता. पेट्रग्राडच्या रस्त्यातून गस्त घालणारे बारा लाल रक्षक ह्यात दिसतात. बारा हा आकडा एक प्रतीक म्हणून ह्या कवितेत आला आहे. ह्या प्रतीकाचे वेगवेगळे अर्थ भाष्यकारांनी लावलेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रमुख शिष्यांचे (अपॉसल्स) प्रतीक म्हणून तो आलेला आहे, असेही म्हटले जाते. अंड्र्येईब्येलई(१८८०–१९३४) ह्या प्रतीकवादी कवीवर सोलोव्ह्योव्हच्या गूढवादी विचारांचा प्रभाव होता. त्या प्रभावातूनच तो प्रतीकवादी काव्यसंप्रदायाकडे वळला. ‘गोल्ड इन ॲझर' (१९०४, इं. शी.), ‘ॲशिस' (१९०८, इं. शी.) आणि ‘अर्न' (१९०८, इं. शी.) हे ब्येलईचे निर्देशनीय काव्यसंग्रह होत. काव्याभिव्यक्त्तीच्या दृष्टीने रशियन भाषेच्या अंतःशक्त्तीचा जास्तीत जास्त उपयोग ब्येलईने करून घेतला. रशियन प्रतीकवादी कवींची तत्त्वचिंतनाची वृत्ती त्याच्यातही आढळून येत असली, तरी तिच्या जोडीला आपली मार्मिक विनोदबुद्धी त्याने अनेकदा प्रकट केली आहे. ब्येलईने कादंबरीलेखनही केले. पौर्वात्य आणि पश्र्चिमी संस्कृतींतील विरोध चित्रित करणारी ‘सिल्व्हर डव्ह' (१९१०, इं. शी.) आणि क्रांतिपूर्व रशियातील ढासळत्या स्थितीचे दर्शन घडविणारी पीटर्झबर्ग(१९१६) ह्या त्याच्या कादंबऱ्या. तालबद्ध, नादवती शब्दकळा हे ‘सिंफनी (सेकंड ड्रॅमॅटिक, १९०२, इं. शी.)' ह्या नावाने त्याने लिहिलेल्या गद्यकाव्यांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होते. शब्दांचा ताल आणि शब्दांचे संगीत ब्येलईच्या ह्या दोन कादंबऱ्यांतही प्रत्ययास येते. अन्य उल्लेखनीय प्रतीकवादी कवींत व्हालेरी ब्य्रूसॉव्ह (१८७३–१९२४), व्ह्याचेस्लाव्ह इव्हानोव्हिच इव्हानॉव्ह (१८६६–१९४९) आणि फ्यॉडर सोलोगब (१८६३–१९२७) ह्यांचा अंतर्भाव होतो. ब्य्रूसॉव्ह हा रशियन प्रतीकवादी चळवळीतला आरंभीचा कवी. ब्र्यूसॉव्हने १९०४ साली ह्या चळवळीचा एक भाग म्हणून ‘द स्केल्स' (इं. शी.) ह्या नावाने एक प्रतीकवादी नियतकालिक सुरू केले होते. ब्य्रूसॉव्हवर फ्रेंच प्रतीकवादाचा एक प्रमुख कवी पॉल व्हर्लेअन ह्याचा प्रभाव होता. इव्हानॉव्ह हा विद्वान आणि कवी. ग्रीक धर्म आणि संस्कृती ह्यांचे त्याला आकर्षण होते. त्यामुळे त्याच्या समकालीन कवींपेक्षा तो वेगळा उठून दिसतो. ‘पायलट स्टार्स' (१९०३, इं. शी.) हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर आर्ष पण संपन्न अशा त्याच्या काव्यशैलीने समकालीनांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रतीकवाद्यांना त्याच्यात एक समर्थ समानधर्मा गवसला. नव्या प्रतीकवादी चळवळीचा एक नेता म्हणून त्याला स्थान प्राप्त झाले. कोर आर्देन्स(दोन खंड, १९११) आणि ‘द विंटर सॉनेट्स' (१९२०, इं. शी.) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यग्रंथ. कोर आर्देन्स मधील कवितेने मात्र अलंकृततेचा एक ऐश्वर्यशाली नमुना उभा केला. मौल्यवान बायझंटिन वस्त्राची उपमा त्याच्या ह्या कवितेला देण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रतिमा, शब्द, ध्वनी ह्यांचा अत्यंत जाणीवपूर्वक वापर त्याने केलेला दिसतो. ‘द विंटर सॉनेट्स' चे स्वरूप तुलनेने साधे म्हणता येईल. इव्हानॉव्हने काही ग्रीक साहित्यही अनुवादाच्या रूपाने रशियनमध्ये आणले. त्यात पिंडर, सॅफो ह्यांच्या भावकवितांचा अंतर्भाव आहे. इव्हानॉव्हने गद्यलेखनही केले. ‘बाय द स्टार्स' (१९०५, इं. शी.) आणि ‘फरोज अँड बाउंडरीज' (१९१६, इं. शी.) हे त्याचे निबंधसंग्रह.‘ए कॉरस्पॉन्डन्स बिट्‌विन टू कॉर्नर्स' (१९२०, इं. शी.) मध्ये गेरशेनझॉन ह्या तत्त्वज्ञाबरोबर त्याने केलेला वैचारिक पत्रव्यवहार आहे. अनेक शतकांच्या सांस्कृतिक जोखडातून मुक्त्त होण्याचा ध्यास गेरशेनझॉनने घेतलेला आहे,  तर इव्हानॉव्हने सांस्कृतिक मूल्यांचे आणि मानवाच्या गतकालीन कर्तबगारीचे जोरदार समर्थन केल्याचे ह्या पत्रव्यवहारावरून दिसते. सोलोगबच्या कवितेत शब्दच प्रतीके होतात. एकच शब्द दोन अर्थांनी वापरण्याची त्याची प्रवृत्ती अनेकदा प्रत्ययास येते. साधेसुधे छंद त्याने योजिले; त्याची शब्दकळाही मर्यादित होती; पण ती त्याने अतिशय काटेकोरपणे आणि परिणामकारकपणे वापरली. विख्यात सोव्हिएत कवी आणि कादंबरीकार बरीस पास्तेरनाक(१८९०–१९६०) ह्याच्या कवितांवरही प्रतीकवादाचा प्रभाव आढळतो.

प्रतीकवादी चळवळीचे १९१० नंतर विघटन होऊ लागले आणि अन्य प्रतिस्पर्धी काव्यसंप्रदायांचा उदय झाला. अक्‌मेइस्त संप्रदाय आणि नवकालवादी संप्रदाय हे त्यांतील विशेष उल्लेखनीय होत. प्रतीकवादाविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून अक्‌मेइस्त संप्रदाय अस्तित्वात आलेला होता. वस्तूंकडे कशाचे ना कशाचे तरी प्रतीक म्हणून पाहावयाला ह्या संप्रदायातील कवींचा विरोध होता. गुलाबाचे फूल आम्हाला आवडते, ते त्याच्या सौंदर्यामुळे; कसल्या तरी गूढ विशुद्धतेचे प्रतीक म्हणून नव्हे. निर्मितीच्या प्रभातकाली आदमने जगाकडे ज्या ताज्या, पूर्वग्रहरहित दृष्टीने पाहिले, तीच दृष्टी आम्हालाही हवी आहे; मान्य आहे; अशी भूमिका ह्या कवींनी घेतली. कवी आणि कविता ह्यांच्याभोवती प्रतीकवाद्यांनी जे एक गूढवादी वलय निर्माण केले होते, तेही अक्‌मेइस्त संप्रदायाला मान्य नव्हते. ह्या संप्रदायाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे कवी हा एक कारागीर असून कविता ही त्याची कारागिरी होय, असे त्याने मानले. आना आख्‌मातोव्हा म्हणजेच आना अंर्द्रेअव्ह्‌न गोरेंको(१८८९–१९६६) ह्या कवयित्रीचा आरंभी ह्या काव्यसंप्रदायाशी निकटचा संबंध होता. न्यिकलाय गुमिल्योव्ह (१८८६–१९२१), ओसिप मँडलस्टाम (१८९१-१९४५) हे ह्या संप्रदायातील अन्य उल्लेखनीय कवींपैकी होत.

नवकालवाद हा ह्या शतकातील एक विशेष लक्षणीय असा काव्यसंप्रदाय होय. व्हिक्त्तर खल्येबनिकव्ह (१८८५–१९२२) हा रशियन नवकालवादाचा संस्थापक मानला जातो. १९१० पासून ही चळवळ अस्तित्वात आली असे म्हणता येते. रशियन साहित्यातील प्रतीकवादी चळवळ फ्रेंच प्रतीकवाद्यांच्या प्रभावातून उभी राहिली होती; तथापि रशियन नवकालवादी संप्रदाय हा मूलतः रशियन होता. १९०९ च्या सुमारास, इटलीतील कला-साहित्यक्षेत्रांत जो नवकालवाद उदयाला आला, त्याच्यापासून रशियन नवकालवादाने त्याचे नाव आणि काही प्रेरणा घेतली, असे दिसत असले, तरी रशियन नवकालवादाचे स्वरूप

इटालियन नवकालवादापेक्षा भिन्न आहे. आधुनिक यंत्रयुगातील गतिमानतेचे आविष्करण कलेतून साधण्याची इटालियन नवकालवाद्यांची आकांक्षा होती. रशियन नवकालवाद्यांना काव्यात्मतेचा पारंपारिक अर्थ मान्य नव्हता आणि तो अर्थ गृहीत धरून तयार केले गेलेले काव्यनियमही मान्य नव्हते. छंदांच्या प्रकारांत क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणे; रशियन छंदशास्त्राच्या संदर्भात नव्या शक्यतांचा शोध घेणे; कवी हा कोणी द्रष्टा वा धर्मगुरू नसून तो श्रमिक आहे; कारागीर आहे, असे मानणे ही रशियन नवकालवादाची वैशिष्ट्ये होती. सौंदर्याच्या सांकेतिक कल्पना आणि आदर्श त्यांनी झुगारून दिले. कवितेची नवी भाषा घडविण्याची धडपड केली. शब्दांची नवी दुनिया घडविणे हे खल्येवनिकव्हने कवी म्हणून आपले कार्य मानले आणि प्रत्येक वस्तू ही नवशब्दनिर्मितीची सामग्री होय, अशी भूमिका घेतली. शब्दांना आणि आकृतिबंधांना स्वतःचे असे एक पृथगात्म अस्तित्व असते, अशी त्याची धारणा होती. स्मेख (हास्य) ह्या शब्दाची विविध रूपे अभिव्यक्त करणारी त्याची एक कविता प्रसिद्ध आहे. ‘ए स्लॅप इन द फेस ऑफ पब्लिक टेस्ट’(इं. शी.) ह्या नावाने नवकालवाद्यांनी जो जाहीरनामा काढला होता (१९१२) त्यावर व्ह्‌लद्यीम्पिर माय्‌कोव्हस्की (१८९३-१९३०) ह्यांचीही सही होती. ‘ए क्लाउड इन ट्राउझर्स’ (१९१५, इं. शी.) ही त्याची आरंभीची एक कविता वनकालवादी म्हणता येईल. माय्‌कोव्हस्की नवकालवादाने प्रभावित झाला, तरी ह्या प्रभावाच्या पलीकडील अशी त्याची एक स्वतंत्र कविप्रतिमा लवकरच प्रस्थापित झाली. १९१७ साली रशियात झालेल्या महान ऑक्टोबर क्रांतीनंतर त्या क्रांतीचे स्वागत करणाऱ्या काही कविता-उदा., ‘ओड टू रेव्हलूशन’ (१९१८, इं. शी.) आणि ‘लेफ्ट मार्च’(१९१९, इं. शी.) त्याने लिहिल्या. सोव्हिएत रशियाची कोंडी करू पाहणाऱ्या पाश्चिमात्यांना उत्तर म्हणून त्याने १५,००,००,००० ही कविता लिहिली. कवितेचे शीर्षक असलेली संख्या ही तत्कालीन रशियाची लोकसंख्या होय. माय्‌कोव्हस्कीने काही नाट्यलेखनही केले.

रशियन क्रांतीनंतर सोव्हिएत रशियातील वाङ्‍मयीन वातावरणात अपरिहार्यपणे परिवर्तन  घडून आले. साहित्यातील घाट आणि  आशय ह्यांचा विचार नव्याने सूरू झाला. सोव्हिएत साहित्याला नवी दिशा मिळाली. ह्या संदर्भात मॅक्झिम गॉर्की (१८६८–१९३६) हे नाव विशेष महत्त्वाचे. कष्टाचे, श्रमिकाचे जीवन जगत गॉर्की लेखक झाला. गॉर्की ह्या शब्दाचा अर्थच ‘दुःखी’ असा आहे. कथालेखक म्हणून गॉर्कीने साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. तळागाळातले लोक त्याच्या साहित्याचा विषय झाले. गॉर्कीच्या आरंभीच्या साहित्यकृतींत समकालीन समाजावरील टीकेबरोबरच भविष्यकालावरील विश्वास आणि तत्संबंधीचा आशावाद ह्यांचे मिश्रण आढळून येते; स्वच्छदतावादी प्रवृत्तीही आढळतात. १९३२ साली सोव्हिएत साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली. गॉर्कीने समाजवादी वास्तववाद ह्या वाङ्‌मयीन तत्त्वज्ञानाचा पुरत्कार केला. क्रांतिकार्यावरील निष्ठेमुळे एक भित्री, दडपलेली स्त्री कशी निर्भय बनते, हे दाखविणारी द मदर (१९०७, इं. भा. १९२९) ही त्याची कादंबरी समाजवादी वास्तववादाचा थोर आदर्श मानली गेली. लोअर डेप्थ्‌स (१९०२, इं. भा. १९१२) हे त्याचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटक. चाइल्डहूड (१९१३, इं. भा. १९१५, म.भा. माझे बालपण, १९४६), इन द वर्ल्ड (१९१५, इं. भा. १९१७) आणि माय युनिव्हर्सिटीज (१९२३, इं. भा. १९२४)हे त्याच्या आत्मचरित्राचे तीन खंडही विख्यात आहेत. झारच्या कारकीर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि नव्या क्रांतिकारक विचारांनी झपाटलेली नवी पिढी ह्यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे चित्रित करणारी ‘द लाईफ ऑफ क्लिम सॅमगीन’ (इं. शी.) ही कादंबरीही त्याने लिहिली (लेखनकाळ १९२७-३६).

गॉर्कीने पुरस्कारिलेल्या समाजवादी वास्तववादाच्या वाङ्‌मयीन तत्त्वज्ञानास सोव्हिएत साहित्याच्या संदर्भात प्रमुख स्थान प्राप्त झाले. समाजवादी समाजरचनेच्या निर्मितीप्रक्रियेत असलेल्या नव्या व्यवस्थेत जे नवे सामाजिक नातेसंबंध निर्माणे झाले, त्यांतून हे नवे तत्वज्ञान अस्तित्वात आले. कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली साम्यवादाच्या दिशेने जाणाऱ्या चळवळीचे भान हे तत्त्वज्ञान मानणाऱ्या प्रत्येक लेखकाने ठेवायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. समाजवादी वास्तववादाच्या भूमिकेतून सोव्हिएत साहित्यात नायकाची एक नवी प्रतिमा निर्माण झाली. सामूहिक, सर्जनशील आणि मुक्त श्रमांवर ह्या नायकाचा ठाम विश्वास होता; सोव्हिएत राष्ट्रभक्ती आणि उत्कट पक्षप्रेम त्याच्या ठायी होते; समाजवादी वास्तववादात चिकित्सेला वाव असला, तरी ही चिकित्सा नव्या व्यवस्थेच्या विरूद्ध असता कामा नये. समाजवादी वास्तववाद मानणारा भूतकालाकडे बघतो, ते भूतकालीन अनुभवांच्या आधारावर वर्तमानकाळावर प्रकाशझोत टाकण्यासाठी. १९३४ ते १९४१ हा समाजवादी वास्तववादाचा प्रकर्षकाळ म्हणता येईल.

रशियन क्रांतीच्या आणि क्रांतीनंतरच्या काळात अनेक वाङ्‍मयीन गट अस्तित्वात आले होते. १९१७ साली स्थापन झालेला ‘प्रल्येतकुल्त’ हा अशा गटांपैकी एक. श्रमिक वर्गीय संस्कृतीचा पुरस्कार करून त्या संस्कृतीचे सर्वश्रेष्ठत्व मान्य करून घेण्याची प्रल्येतकुल्तची भूमिका आणि धडपड होती. क्रांतिपूर्व काळातील सर्व सांस्कृतिक वारसा बूर्झ्वा म्हणून नाकारण्याच्या प्रवृतीला विरोध करणारे नेमस्तही होते. श्रमिक संस्कृतीचे आणि श्रमिकांचा दृष्टिकोण असलेले साहित्यिक एकत्र आणून त्यांची संघटना बांधण्याचे प्रल्येतकुल्तचे उद्दिष्ट होते. श्रमिक चळवळीचे स्वरूप त्रिविध आहे. राजकीय संघटना (पक्ष), आर्थिक संघटना (कामगार संघटना) आणि सांस्कृतिक संघटना अशा तीन संघटनांतून ही चळवळ समाजवादाच्या दिशेने सरकत असते. ह्या तिन्ही संघटना मिळून श्रमिकांची एकसंघ चळवळ उभी राहात असली, तरी ह्या तीनही संघटना स्वायत्त होत, असा विचार प्रल्येतकुल्तचा वैचारिक नेता ए. बोग्‌दानॉव्ह ह्याने मांडला होता. त्याच्याच पुढाकाराने १९१७ सालच्या सप्टेंबरमध्ये प्रल्येतकुल्तचा वैचारिक पाया घातला गेला. जे नेमस्त होते, त्यांना क्रांतिपूर्व संस्कृतीतले सारेच त्याज्य आहे, असे वाटत नव्हते आणि प्रल्येतकुल्तला अभिप्रेत असलेली श्रमिकांची संस्कृती सरकारी आदेश काढून निर्माण करता येईल, हेही त्यांना मान्य नव्हते.

‘सेरेपिअन ब्रदरहूड’ (इं. अर्थ) ह्या नावाची एक संघटना १९२१ मध्ये स्थापन झाली. सोव्हिएत राजवटीला विरोध न करता आपले स्वातंत्र्य जपणारी, सोव्हिएत युनियनमधली ही पहिली वाङ्‌मयीन संघटना होय. सेरेपिअन ब्रदरहूड ह्या संघटनेत म्यिखईल झॉश्चेंकॉ (१८९५-१९५८), कन्स्तांतीन अलेक्सांद्रोविच फेदिन (१८९२–१९७७), न्यिकलाय तीखॉनॉव्ह (१८९६–) ह्यांसारख्या साहित्यिकांचा समावेश होता. साचेबंदपणा टाळावा व जीवनाची विविध अंगे कवेत घेऊ शकतील, अशी नवनवी कलारूपे शोधावी, ह्यासाठी ‘सेरेपिअन ब्रदर्स’ एकत्र आले होते.

‘पीरिव्हल’ हा सोव्हिएत लेखकांचा आणखी एक उल्लेखनीय गट. ह्या गटातील अनेक साहित्यिक कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. १९२४ साली ह्या गटाची स्थापना झाली. ‘रेड व्हर्जिन सॉइल’ (इं. शी.) ह्या मासिकाचा संपादक अल्यिक्‌सांडर व्होरोन्स्की ह्याचा सक्रिय सहभाग ह्या गटाला मिळाला. पक्षीय भावना किंवा पक्षसदस्यत्व ह्यांच्या पलीकडे जाऊन लेखन करण्याची पीरिव्हलच्या सदस्यांची भूमिकाहोती. आम्ही सर्व जनतेची लेकरे आहोत आणि नवे जीवन घडविण्यास उत्सुक आहोत, ह्या भावनेने ते उभे राहिले होते. १९२७ साली त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. क्रांतिकाळात आम्ही क्रांतीच्या यशस्वितेसाठी लढलो; आता साहित्याच्या क्षेत्रात क्रांतीची सेवा आम्ही करणार आहोत. कलात्मक वास्तववाद, मानवतावाद, तळमळ आणि उघड्या डोळ्यांनी जग पाहण्याची क्षमता ह्यांतूनच क्रांतीशी सुसंगत अशा साहित्यकृती निर्माण होऊ शकतील, असा आत्मविश्वास ह्या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला होता. कम्युनिस्ट नसलेल्या साहित्यिकांना सहप्रवासी-फेलो ट्रॅव्हलर्स-असे म्हटले जात असे. त्यांच्याशी पीरिव्हलच्या सदस्यांचे सहकार्याचे संबंध होते. १९३२ पर्यंत हा गट अस्तित्वात होता. इव्हान कटायव्ह ह्या गटाचा ठळक सदस्य. ‘मिल्क’ (इं. शी.) ही त्याची प्रसिद्ध कथा. ह्या कथेचा नायक माणुसकीची ऊब मानतो; तिच्यावर प्रेम करतो. ही ऊब आणि प्रामाणिकपणा असलेली चांगली माणसे नसतील, तर प्रत्येक गोष्ट विध्वंसून जाईल असे ह्या नायकाला वाटते. कटायव्हच्या कथाकादंबऱ्यांचा संग्रह सोव्हिएत रशियात १९५७ साली प्रकाशित करण्यात आला. साहित्यनिर्मितीवर सरकारची हुकमत असली पाहिजे, अशी  ‘ऑन गार्ड’ ह्या गटाची भूमिका होती. सहप्रवाशांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण अत्यंत कडवा होता. १९२५ साली कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने एका ठरावाद्वारे वाङ्‌मयीन स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि तो नेमस्तांना अनुकूल ठरला.

सोव्हिएत साहित्याच्या अगजी आरंभीच्या कालखंडातले विषय मुख्यतः यादवी युद्ध, क्रांती ह्यांच्याशी संबंधित होते. बरीस पिलन्याक (१८९४–) ह्याची द नेकिड यीअर (१९२२, इं. भा. १९२८) ही कादंबरी ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. अल्यिक्‌साडर सिराफिमोव्हिच (१८६३-१९४९) हा ऑक्टोबर क्रांती होण्यापूर्वीच्या काळातही लेखन करीत होता. क्रांतीनंतर त्याने कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले. द आयर्न फ्लड (१९२४, इं. भा. १९३५) ही त्यांची कादंबरी, काही सोव्हिएत समीक्षकांच्या मते, समाजवादी वास्तववादाची अग्रदूत होय. आल्यिक्‌स्पेई टॉलस्टॉय (१८८३–१९४५) ह्याच्या द रोड टू कॅल्व्हरी (१९२०–४१, इं. भा. १९४६) ह्या त्रिखंडात्मक कादंबरीत राज्यक्रांतीच्या आणि यादवी युद्धाच्या काळातील रशियन लोकांचे जीवन वर्णिले आहे. सायबीरीयातील गनिमी युद्ध व्ह्‌स्येव्हलॉट इव्हानॉव्ह ह्याच्या आर्मर्ड ट्रेन नंबर १४–६९ (१९२२, इं. भा. १९३३) ह्या कादंबरीत प्रभावीपणे चित्रित केलेले आहे. द्‌मीत्री अंद्रेयेविच फुरमानव  (१८९१–१९२६) ह्याने चापायेप (१९२३) आणि मित्येझ (१९२५, इं. शी. रिव्होल्ट) ह्या आपल्या कादंबऱ्यांतून राष्ट्रीय वीरांच्या प्रभावी व्यक्तीरेखा निर्माण केल्या. अल्यिक्‌सांडर निव्हेरव्ह ह्याने लिहिलेल्या ‘ताश्कंद; सिटी ऑफ ब्रेड’ (१९२१, इं. शी.) ह्या कादंबरीत दुष्काळपीडित मिशा डोडोनव्हची कहाणी प्रत्ययकारीपणे सांगितलेली आहे. भाकरीसाठी ताश्कंद शहरी यावयास निघालेल्या मिशाचा प्रवास; धान्य मिळवून त्याचे घरी परतणे आणि दरम्यानच्या काळात आपल्या आईचे निधन झाले आहे, हे त्याला समजणे हे सर्व हृदयस्पर्शी आहे. ईसाक बाबल (१८९४–१९४१) ह्याला गॉर्कीचे वाङ्‍मयीन मार्गदर्शन लाभले होते. गॉर्कीच्याच सूचनेवरून अनुभवसमृद्ध होण्यासाठी, बाबलने सात वर्षे विविध व्यवसाय करण्यात घालवली. रेड कॅव्हल्‌री (१९२६, इं. भा. १९२९) हा त्याचा उल्लेखनीय कथासंग्रह. युद्धाच्या विविध अंगांचे दर्शन एका अननुभवी, परंतु बुद्धिमान ज्यू  तरूणाच्या दृष्टिकोणातून बाबल ह्या कथासंग्रहात घडवितो. कथाविषयातील नाट्य नेमके पकडून त्याचा कलात्मक विकास बाबल प्रभावीपणे घडवून आणतो.

सोव्हिएत क्रांतीला ज्याचा विरोध होतो, असा कथा-कादंबरीकार इव्हान बूम्यिन (१८७०–१९५३). हा १९२० मध्ये फ्रान्स देशात जाऊन राहिला. तथापि त्याच्या साहित्यकृतींतून दृष्टीस पडतात, ती रशियन जीनवाची वास्तववादी चित्रे ‘अंतोनॉव्ह  ॲपल्स’ (इं. शी.) ‘द जंटलमन फ्रॉम सानफ्रान्सिस्को’ (इं. भा.) ह्यांसारख्या त्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. ‘मित्याज लव्ह’ (१९२५, इं. भा. १९२६) आणि ‘द वेल ऑफ डेज’ (१९३०, इं.भा. १९३३) ह्या त्याच्या कादंबऱ्या त्याने रशियातून बाहेर पडल्यानंतर लिहिल्या. १९३३ मध्ये त्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळविणारा तो पहिला रशियन साहित्यिक.

म्यिखईल बूलगाकॉव्ह (१८९१–१९४०) ह्याने कथा, कादंबऱ्या नाटके लिहिली. स्वार्थ, भेकडपणा ह्यांसारख्या बृर्झ्वा प्रवृत्तींवर त्याने आपल्या उपरोधप्रचुर विनोदातून टीका केली.

अलिक्‌सांद्र अलिक्‌सांद्रोविच फादेयेव्ह (१९०१–५६) हा १९१८–२० ह्या कालखंडात झालेल्या यादवी युद्धात कम्युनिस्टांच्या बाजूने लढला होता. राजग्रोम (१९२७, इं. शी. द राउट; इं. भा. द नाइंटीन, १९२९) ही त्याची कादंबरी त्याने ह्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. पुरोगाम्यांपासून प्रतिगाम्यांना वेगळे काढण्याची एक सहज प्रक्रिया क्रांतीमुळे घडून येते, कारण प्रागतिक विचारांचे शत्रू क्रांतीकाळात उघडे पडतात असा विचार ह्या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मलदाया ग्व्हार्दिया (१९४६, सुधारित आवृ. १९५१, इं. शी. द यंग गार्ड्‌स) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबरीचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील देशभक्त सोव्हिएत तरूणतरूणींच्या भोवती गुंफण्यात आले आहे. भूमिगत राहून ते जर्मनांना प्रतिकार करतात. कन्स्तांतीन अलेक्सांद्रोविच फेदिन हा सहप्रवासी म्हणून गणला गेलेला साहित्यिक. गरदा अ गोदी (१९२४, इं. शी. सिटीज अंड यीअर्स) आणि ब्रात्या (१९२८, इं. शी. ब्रदर्स) ह्या त्याच्या कादंबऱ्यांतून त्याने क्रांत्युत्तर रशियातील बुद्धिवंत वर्गावर क्रांतीचे झालेले परिणाम दाखविले आहेत. पुढे संपूर्ण सोव्हिएत रशियातील जीवन आणि त्या देशाचे भागधेय हा विषय त्याने पेरविये रादस्ती  (१९४५, इं. शी. अर्ली जॉइज), निअविक्नोव्हेन्नोये ल्येतो (१९४७-४८, इं. शी. नो ऑर्डिनरी समर), पखिश्चेनिये येवरोपी (१९३३–३५, इं. शी. अब्‌डक्शन ऑफ यूरोप) व कस्त्योर (१९६१, इं. शी. कॉनफ्लग्रेशन)ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून मांडला. लिओनिद लिओनॉव (१८९९–), बारसुकी  (१९२४, इं. शी. द बॅजर्स) ह्या त्याच्या कादंबरीमुळे ख्याती पावला. रूस्की ल्येस (१९५३, इं. शी. द रशियन फॉरेस्ट) ही त्याची एक विशेष उल्लेखनीय कादंबरी. एका सोव्हिएत नागरिकाच्या जीवनातील पन्नास वर्षे ह्या कादंबरीत त्याने चित्रित केली आहेत. त्याने काही नाटकेही लिहिली. समाजवादी सदसद्विवेकबुद्धी निर्माण करणे, हा लिओनॉवच्या साहित्यकृतींचा प्रमुख हेतू होता. युरी ओलेशा (१८९९–१९६०) ह्याच्या एन्‌व्ही (१९२६, इं. भा. १९३६) ह्या कादंबरीत नव्या सोव्हिएत समाजामुळे निर्माण झालेल्या मूल्यसंघर्षाचा प्रश्न हाताळला आहे. व्हल्यिंट्यीन प्यिट्रोव्हिच कटायव्ह  (१८९७ –  ) ह्याच्या द इंबेझ्‌र्ल्स (१९२६, इं. भा. १९२९ ) ह्या कादंबरीत एका रासायनिक कारखान्यातील कामगार आणि तंत्रज्ञ ह्यांच्या कामगिरीचे चित्रण केले आहे. सोव्हिएत रशियामधील नव्या आर्थिक धोरणानुसार (१९२१–२९ ) शहरी विभागात औद्योगिकीकरण सुरू झाले. त्याचे पडसाद साहित्यकृतींतून उमटणे अपरिहार्य होते.

फ्यॉडर ग्लटकॉव्ह (१८८३–१९५८) ह्याच्या त्सेमेंत (१९२५, इ. शी. सिमेंट) ह्या कादंबरीत यादवी युद्धानंतरच्या रशियातील औद्योगिकीकरणाचे आणि कामगारवर्गाचे चित्रण आहे. वरील पिलन्याकची द व्होल्गा फ्लोज इंटू द कास्पिअन सी (१९३०, इं. भा. १९३१) आणि व्हल्यिंट्यीन प्यिट्रोव्हिच कटायव्ह ह्याची टाइम फॉरवर्ड । (१९३२, इ. भा. १९३३) ह्या कादंबऱ्यांही उल्लेखनीय.

थोर सोव्हिएत कवी स्यिरग्येई अल्पिक्‌सांद्रव्हिच थिस्येन्यिन (१८९५–१९२५) ह्याला मात्र क्रांत्युत्तर रशियातील औद्योगिरीकरण आणि शहरीकरण ह्यांच्याशी जुळवून घेता आले नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ह्या कवीला क्रांतीनंतर बदलत जाणारे ग्रामीण जीवन व्यथित करीत होते. लोककाव्याच्या परंपरेशी त्याच्या कवितेचे निकटचे नाते होते आणि पारंपारिक ग्रामीण जीवन आणि समाज ह्यांबद्दल त्याला उत्कट प्रेम होते. ‘कन्फेशन्स ऑफ ए हूलींगन’ (१९२४, इं.शी.) आणि ‘मॉस्को ऑफ द टॅव्हर्न्‌स’ (१९२४, इं. शी.) ह्या यिस्पेन्यिनच्या विशेष निर्देशनीय अशा काव्यकृती होत. म्यिखईल इसाकोव्हस्की (१९००–) हा यिस्येन्यिनप्रमाणेच शेतकरी कुटुंबातून आलेला. त्याची कविताही लोकगीतांशी नाते सांगणारी. तीतून मातृभूमीवरील आपले उत्कट प्रेम त्याने व्यक्त केले. ‘कात्यूशा’ सारख्या त्याच्या काव्यकृतींना आज जिवंत लोककाव्याचेच स्थान प्राप्त झाले आहे. सोव्हिएत कवी द्यिम्पान व्येदन्यी (१८८३–१९४५) ह्याने समूहगीते, क्रांतीगौरवगीते लिहून लोकमानस चेतविले.

न्यिकलाय अस्ट्रोव्हस्की (१९०४–३६) ह्याच्या काक जाकाल्यालास स्ताल (१९३४, इं. शी. हाउ स्टील वॉज टँपर्ड; इं. भा. द मेकिंग ऑफ ए हीरो, १९३७) ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला मोठी कीर्ती प्राप्त झाली. प्रबल इच्छाशक्ती लाभलेला आणि क्रांतीसाठी लढणारा पावेल कर्चागिन हा नायक ह्या कादंबरीत अस्ट्रोव्हस्कीने निर्माण केला.

नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळविणारा (१९६५) सोव्हिएत कादंबरीकार म्यिखईल शॉलखॉव्ह (१९०५-   ) ह्याने १९२३ मध्ये लेखन करावयास सुरुवात केली. १९२५ साली टेल्स ऑफ द डॉन (इं. भा. १९६१) हे याचे पहिले पुस्तक (हा कथासंग्रह आहे)प्रसिद्ध झाले. तीखी दोन (४ खंड, १९२८–४०; इं. भा. दोन खंड; अँड क्वाएट फ्लोज द डॉन, १९३४ आणि द डॉन फ्लोज होम टू द सी, १९४०),पोद्‌न्याताया त्सोलिना (१९३२–६०, इं. भा. खंड, व्हर्जिन सॉइल अप्‌टर्नंड, १९३५ आणि हार्व्हेस्ट ऑन द डॉन, १९६०)ह्या त्याच्या दोन कादंबऱ्यांनी अग्रगण्य सोव्हिएत कादंबरीकार म्हणून त्याला मान्यता मिळवून दिली. युद्ध आणि क्रांती ह्यांनी जळत राहिलेल्या प्रदेशांतून वाहणाऱ्या महानदीची उपमा तीखी दोनला देण्यात आली आहे. पोदन्याताया त्सेलिनामध्ये शेतीला सामुदायिकीकरणाचे चित्रण दिसते. शेतीचे सामुदायिकीकरण हे एक प्रागतिक पाऊल आहे, असा विश्वास बाळगून ही कादंबरी शॉलखॉव्हने लिहिलेली आहे.

व्होस्‌व्होल्ड व्हिश्न्येव्हस्की (१९००–५१) ह्याच्या पेरवाया कोन्नाया (१९२९, इं. शी. द फर्स्ट कॅव्हल्‍री) आणि पस्‌ल्येदनी रिशीत्येलनी (१९३१, इ. शी. द लास्ट डिसाय्‌सिव्ह) ह्यांसारख्या नाट्यकृतींतून समाजवादी वास्तववादाचे दर्शन घडते.

न्यिकलाय पगोदीन (१९००–६२) ह्या सोव्हिएत नाटककाराची ‘त्येंप’ (१९३०, इं. शी. टेंपो) ही नाट्यकृती सोव्हिएत सरकारच्या पंचवार्षिक योजनेवर आधारलेली होती. सोव्हिएत रशियातील प्रगती आणि तेथील श्रमिकांमधील नव्या जाणिवा त्याच्या अनेक नाटकांतून त्याने मांडल्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात राष्ट्रप्रेम आणि वीरकृत्ये हे सोव्हिएत साहित्याचे प्रमुख विषय बनले. बरीस गोर्बाटॉव्ह (द फॅमिली ऑफ तारास, १९४३, इं. शी.), कन्स्तांतीन सिमॉनॉव्ह (डेज अँड नाइट्‌स, १९४४, इं. भा. १९४५), लिओनिद लिओनॉव (चॅरिअट ऑफ रॉथ, १९४४, इ. भा. १९६४), अल्यिक्‌सांडर फादेयेव्ह (द यंग गार्ड, १९४५, इं. शी.) ह्यांच्या कादंबऱ्यांतून जर्मनीचे आक्रमण, स्टालिनग्राडचा लढा, जर्मनव्याप्त प्रदेशांत तरूण कम्युनिस्टांनी भूमिगत राहून दिलेले लढे चित्रित केलेले आहेत.

युद्धविषयक नाट्यकृतीही (लिओनिद लिओनॉवकृत इन्‌व्हेजन १९४२, इं. भा. १९४५; अल्यिक्‌सांडर कोर्नेइचूककृत द फ्रंट, १९४२, इ. भा. १९४३; कन्स्तांतीन सिमॉनॉव्हचे द रशियन्स, १९४२, इं. भा. १९४५) लिहिल्या गेल्या.

युद्ध लढत असल्याच्या जाणिवेची अभिव्यक्ती कवितेत विशेष उत्कट झालेली दिसते. अलेक्सी सुरकॉव्ह (१८९९–  ), अल्यिक्‌सांडर  प्रोकोफयेव्ह (१९००–), न्यिकलाय तीखॉनॉव्ह, अलिक्‌सांद्र त्व्हार्दोव्हस्की (१९१०–७१) हे ह्या युद्धकाळातील उल्लेखनीय कवींपैकी काही होत.

दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ पुनर्बांधणीचा होता. त्याचे प्रतिबिंब सोव्हिएत साहित्यात अपरिहार्यपणे उमटलेले आहे. युद्धकाळाचा विषयही अर्थातच साहित्यकृतींतून येत राहिलेला दिसतो. व्ह. अकोपाख स्तालिनग्रादा  (१९४६ मध्ये एका नियतकालिकातून प्रसिद्ध. इ. शी. इन द ट्रेंचीस ऑफ स्तालिनग्राड) ही व्हिक्‌तोर न्येक्रासॉव्हची (१९१०–  ) कादंबरी ह्या संदर्भात निर्देशनीय आहे. व्हेरा पानोव्हा (१९०५–   ), बरीस पल्येव्हई (१९०८–  ) ह्यांनी दर्जेदार कादंबरीलेखन केले. पानोव्हाच्या ट्रॅव्हलिंग कंपॅनिअन्स (१९४६, इं. शी.), कुझिलिखा (१९४७, इं. भा. द फॅक्टरी, १९४९) ह्या कादंबऱ्या, तर पल्येव्हईची ‘द टेल ऑफ ए रिअल मॅन, (१९४७, इं. शी.) ही कादंबरी उल्लेखनीय. इल्या  रिऱ्यगॉर्येव्हिच एरेनबुर्क (१८९१–१९६७) ह्याची द स्टॉर्म (१९४८, इं. भा. १९४९) दुसऱ्या महायुद्धावर आधारलेली आहे. व्हर्ल्यिट्यीन कटायव्ह ह्याची ‘फॉर द पॉवर ऑफ द सोव्हिएट्‌स’ (१९४८, इं. शी.) हीसुद्धा युद्धावरील एक कादंबरी होय. प्योत्र पाव्हलेंको (१८९९–१९५१) ह्याची हॅपिनेस (इं. भा. १९४७) आणि सिम्यॉन बाबायेव्हस्की (१९०९–  ) ह्याची ‘कॅव्हलिअर ऑफ द गोल्डन स्टार’ (१९४७, इं. शी.) ह्या कादंबऱ्यांत पुनर्बांधणीच्या कार्याचे दर्शन घडले.

कन्स्तांतीन पाउस्तोव्हस्की (१८९२–१९६८) हा कथाकार. आपल्या प्रवासातील अनुभव त्याने कथांच्या द्वारा मांडले. त्याच्या कथांतून रशियातील निसर्ग अनेकदा उत्कटपणे सशब्द झालेला दिसतो. युरी नागीवीन (१९२०–  ) ह्याने अनेक युद्धकथा लिहिल्या. मिखाइल प्रीश्वीन (१८७३–१९५४) हा लेस्नाया कापेल (१९४३, इं. शी. फॉरेस्ट ड्रॉप) ह्या त्याच्या शब्दचित्रसंग्रहासाठी प्रसिद्ध आहे. प्रीश्विनने निबंध, कथा, कादंबरी असेही लेखन केलेले आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात सोव्हिएत कवितेचाही विकास घडून आला. युद्ध आणि युद्धामुळे सोसाव्या लागलेल्या यातनांबरोबर युद्धोत्तर जीवनाचे चित्रही ह्या कवितेतून उमटलेले दिसते. दर वर्षी, डिसेंबर महिन्यात एक कवितादिन मॉस्को आणि लेनिनग्राड शहरांत साजरा केला जाऊ लागला. ह्या कवितादिनाच्या निमित्ताने विविध कवींच्या कवितांचे जाहीर वाचन होऊ लागले आणि अनेक कवींच्या कविता अंतर्भूत असलेले काव्यसंग्रहही प्रकाशित केले जाऊ लागले.नोव्हेल्ला मात्रेयेल्ला, युरी स्तेपानॉव्ह, जोसेफ ब्रॉड्स्की, पिव्हगेन्यी अल्यिकसांद्रव्हिच थिव्हटशेंको (१९३३–  ) हे युद्धोत्तर कालखंडातील काही कवी. ब्रॉड्‌स्कीची कविता तत्त्वचिंतनात्मक असून व्यापक नैतिकता हा त्याच्या कवितेचा लक्षणीय आशय होय, असे म्हणता येईल. ‘पोएम्स’ (१९६५, इं. शी.), ‘हॉल्ट इन द विल्डरनेस’ (१९७०, इं. शी.) ह्या त्याच्या काव्यकृतींतून दुःखाचा आणि निराशेचा सूर उमटताना दिसतो. मनुष्याचे एकाकीपण त्यांतून प्रत्ययास येते. १९८७ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक त्यास देण्यात आले. आपल्या विशिष्ट राजकीय दृष्टिकोणामुळे ब्रॉड्स्कीला देशत्याग करावा लागला. यिव्हटशेंकोचे कवितेच्या क्षेत्रातील कर्तृत्व विशेष उल्लेखनीय. ‘द प्रॉस्पेक्टर्स ऑफ द फ्यूचर’ (१९५२, इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘झिमा जंक्शन’ (१९५६, इं. शी.) ही वादग्रस्त ठरलेली कविता त्याने लिहिली. नाझी जर्मनांनी युक्रेनियन ज्यूंच्या केलेल्या कत्तलीवर त्याने लिहिलेल्या उत्कट शोकगीत ‘बाबीयार’ (१९६१) हेही निर्देशनीय आहे. यिव्हटर्शेकोला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली. अंड्र्‌येई व्होझनेसेन्स्की ह्याच्या कवितेत प्रयोगशीलता आढळते. ‘द ट्रँग्युलर फीअर’ (१९६०, इं. शी.) आणि ‘अँटी-वर्ल्ड’ (१९६७, इ. शी.) ह्या त्याच्या काव्यकृतींतून भाषेचा मौलिकपणे केलेला वापर, त्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमासृष्टी आणि विषयांचे वैविध्य प्रत्ययास येते. न्यिकलाय झाबोलॉट्‌स्की (१९०३–५८) हा १९२० नंतरच्या दशकातला कवी. ‘कॉलम्स’ (इं. शी.) हा त्याचा पहिला लक्षणीय कवितासंग्रह १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला होता. स्टालिनच्या राजवटीत काही काळ तुरूंगवास भोगल्यानंतर त्याला पुन्हा मान्यता प्राप्त झाली. ‘ओल्ड टेल’ (१९५२, इं. शी.), ‘फ्लाइट इंटू ईजिप्त’ (१९५५) ह्या त्याच्या काही सुंदर काव्यकृती होत. बरीस स्लट्‌स्कीच्या कवितेत कडवट उपरोध आढळतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर आठ वर्षाच्या कालावधीत ‘द थॉ’ ह्या नावाने ओळखला जाणारा महत्त्वाचा कालखंड सोव्हिएत साहित्यात सुरू झाला. १९५३ च्या मार्चमध्ये स्टालिनचे निधन झाले. १९४५ ते १९५३ ह्या कालखंडात कला, मग ती कोणतीही असो, पक्षहिताच्या दृष्टीने निर्माण झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेण्यात आली होती आणि तिचा साहित्यावर प्रतिकूल परिणाम जाणवू लागला होता. ह्या स्थितीबद्दलच्या नाराजीचा सूर साहित्यातून हळूहळू उमटू लागला होता. इल्या एरेनबुर्क ह्याच्या ‘द थॉ’ (१९५४,  इं. शी.) ह्या खळबळजनक कादंबरीने हा असंतोष विशेष लक्षवेधकपणे व्यक्तविला. थॉ हे ह्या कालखंडाचे नाव ह्या कादंबरीच्या शीर्षकावरून दिले गेले आहे. स्टालिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत रशियातील अनेक ताण कसे सैल होत गेले, हे एरेनबुर्कने आपल्या कादंबरीत दाखविले आहे. तत्पूर्वी लिओनिद झोरिन ह्याचे ‘द गेस्ट्‌स’ (१९५३, इं. शी.) हे नाटकही पक्षाच्या कलाविषयक भूमिकेत बसणारे नव्हते. व्हेरा इनबर (१८९०–) आणि ओल्गा बरगोल्ट्रस (१९१०–) ह्या कवयित्रींनीही चोकटबद्ध कवितेबद्दल नाराजी व्यक्तविली. वरीस पास्तेरनाक ह्याने १९५६ मध्ये डॉ. झिवागो ही आपली जगद्‌विख्यात कादंबरी लिहिली. स्वातंत्र्यप्रेमी अशा कविमनाने मांडलेल्या व्यक्तीजीवनाच्या समस्या ह्या कादंबरीत दिसतात. १९५७ साली ही कादंबरी सोव्हिएत रशियाबाहेर प्रसिद्ध झाली आणि १९५८ साली पास्तेरनाकला साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. पास्तेरनाकने हे पारितोषिक नाकारले होते. १९५६ साली पक्षाच्या विसाव्या काँग्रेसपुढे ख्रुश्र्वॉव्ह ह्यांनी स्टालिनच्या अनेक कृत्यांवर कठोर टिका करणारे भाषण केले. त्यानंतर कलाविष्कारावरील बंधने सैल करण्याची मागणी नव्याने सुरू झाली. स्टालिनशाहीवर, तसेच सोव्हिएत जीवनातील विसंगतींवर टिका करणारे लेखन तरूण साहित्यिक करू लागले. व्ह्‌लद्यीम्यिर दुदिन्‌त्सेव्ह (१९१८–) ह्याच्या ‘नॉटबाय ब्रेड अलोन’ (१९५७) ह्या कादंबरीनेही रशियात आणि रशियाबाहेरही प्रचंड खळबळ माजवली. सोव्हिएत रशियातील नोकरशाहीतल्या काही अप्रमाणिक माणसांविरूद्ध एकाकी लढणारा नायक दुदिन्‌त्सेव्हने ह्या कादंबरीत उभा केला.

त्व्हार्दोव्हस्कीच्या नोवये ब्रेन्या (इं. शी. द न्यू टाइम्स) नियतकालीकात काही वादग्रस्त कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांत आलेक्सांद्र सोल्झेनित्सीन (१९१८ ) ह्याच्या अदीन देन इवाना दिनीसोविचा (वन डे इन द लाइफ ऑफ इव्हान दिनीसोविच, इं. भा. १९६३) ह्या कादंबरीचा अंतर्भाव होता. थिव्हटशेंकोच्या काही कविताही ह्या नियतकालिकाने प्रसिद्ध केल्या.

सोल्झेनित्सीनच्या अन्य कादंबऱ्यांत कॅन्सर वॉर्ड (१९६८), द फर्स्ट सर्कल (१९६८), ऑगस्ट १९१४ (१९७१), द गुलाग आर्चिपेलागो (संपूर्ण इं. भा. ३ खंड, १९७४–७८) ह्यांचा समावेश होतो. सोल्झेनित्सीनला १९७०९ चे साहित्याचे नोबेले पारितोषिक देण्यात आले. सोल्झेनित्सीनचे बरेचसे लेखन सोव्हिएत रशियात वादग्रस्त ठरले आणि १९७४ साली त्याला देश सोडावा लागला.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अन्य उल्लेखनीय साहित्यिकांपैकी काही असे : वरीस स्लट्‌स्की (कवी, १९१९–), लिओनिद मार्टिनॉव्ह (कवी, १९०५–), आर्सेनी तारकोव्हस्की (कवी, १९०७– ), बुलात ओकुडझावा (कवयित्री,१९२४–), वेल्ला आख्मादुलीना (कवयित्री, १९३७–), ग्लेब गॉर्वोव्हस्की (कवी, १९३१), अल्यिक्सांडर कुशनर (कवी, १९३७–), गेन्नादी आय्‌गी (कवी, १९३४–), व्हासिली अक्‌स्यॉनॉव्ह (कथाकार, १९३२–   ), फाझिल इस्कंदर (कवी आणि कथालेखक, १९२९– ), बरीस वाल्टर (कथा-कादंबरीकार, १९१९–७४), अंड्रयेई सिन्याव्हस्की (कादंबरीकार आणि समीक्षक १९२५–) इत्यादींचा समावेश होतो. १९६० नंतरच्या रशियन नाट्यलेखनाच्या संदर्भात व्हित्कोर रोझॉव्ह आणि अलेस्की अर्बुझॉव्ह ही नावे विशेष उल्लेखनीय होत.

संदर्भ : 1. Alexandrove, Vera, A History of Soviet Literature, New York, 1964.

2. Baring, Maurice, Landmarks in Russian Literature, New York, 1960.

3. Brown, Edward J. The Proletatian Episode in Russian Literature, 1928-1932, 1953.

4. Chandwick, Nora K. Russian Heroic Poetry, 1932.

5. Hayward, Max; Crowley. Edward L. Ed. Soviet Literature in the Sixties ,1964.

6. Lindstrom, T.S. A Concise History of Russian Literature, Vol. I. 1966.

7. Mirsky, D. S. History of Russian Literature, London, 1949.

8. Reavey, George. Soviet Literature To-day, 1947.

9. Slonim, Mark. Modern Russian Literature, Oxford, 1953.

10. Slonim. Mark. Outline of Russian Literature, Oxford, 1958.

11. Slonim, Mark, Soviet Russian Literature, Oxford, 1964.

12. Stacy, R. H. India in Russian Literature, Delhi, 1985.

13. Struve, Glub, Soviet Russian Literature, 1917-1950, 1951.

14. Swayzc, Harold, Political Control of Literature in the U. S. S. R. 1946-1959, 1962.

15. Vickery, Walter N. The Cult of Optimism: Political and Ideological Problems of Recent Soviet Literature, 1963.

लेखक: म. प. पांडे; अ. र.कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate