অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामायण

प्राचीन भारताच्या दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या पहिल्या दोन महाकाव्यांपैकी वाल्मीकि रामायण हे आहे. दुसरे महाकाव्य महाभारत  होय. कमीतकमी दोन हजार वर्षे भारताच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक वैभवाला या दोन महाकाव्यांनी शोभा आणली आहे; कारण विविध आकृतिबंध असलेल्या साहित्यसंपदेच्या निर्मितीचे ही दोन महाकाव्ये मूलस्त्रोत बनले आहेत. संस्कृतमधील काव्याच्या अभिजात आकृतिबंधाचा पहिला व उत्कृष्ट नमुना म्हणजे वाल्मीकिरामायण होय. विविध प्रकारच्या अलंकारांच्या सूचकतेतून अभिव्यक्ती, हे अभिजाततेचे लक्षण आहे. वाल्मीकिरामायण आणि महाभारत यांची तुलना करताना महाभारत हे समग्र स्वरूपात पाहता, एका लेखकाची कृती म्हणून दिसत नाही. लाख श्लोकांच्या या ग्रंथामध्ये त्याच्या मूळ लेखकाचा ग्रंथ सरासरी चतुर्थांश वा पंचमांश आणि बाकीची मागाहून दीर्घकालपर्यंत प्रसंगोपात्त कथानकांची आणि उपदेशांची सैलपणाने पडलेली भर, असे दिसते. चोवीस सहस्त्र श्लोकांचे वाल्मीकिरामायण तसे नाही. हे एका लेखकाने योजनाबद्ध रीतीने सुरेख रचलेले अद्भूतरम्य महाकाव्य म्हणून रसिक वाचकावर याच्या केंद्रवर्ती रचनेची छाप पाडते. त्यात भागाहून पडलेली भर अल्प आहे. दुय्यम दर्जाच्या घटनांच्या स्वरूपात असलेली, अगदी मर्यादित प्रमाणातली भर कोणती ते लक्षात येते. महाभारताचा गाभा म्हणजे कौरव-पांडवांचे युद्ध होय. शूर-वीर माणसांच्या दोन विरोधी पक्षांचे हे युद्ध होय. रामायणामध्ये एका बाजूला लढणारा सेनापती मानव असून, दुसऱ्या बाजूने लढणारा मुख्य शत्रू राक्षस आहे. एकदम लक्षात येते, की ही कल्पित कथा आहे. भारताच्या पश्चिमेस महाभारत घडले, त्याच्या उलट रामायण भारताच्या पूर्वेस असलेल्या प्राचीन कोसल देशात निर्माण झाले.

रामायणाचे मुख्य महत्त्व म्हणजे ते उत्कृष्ट काव्य आहे; मुळात तो धर्मग्रंथ नव्हे. धर्मग्रंथ म्हणून हळूहळू बनला. भारतीय आणि विशेषतः संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श म्हणून त्याला मान्यता मिळाली. वाल्मीकी मुनी हे आदिकवी ठरले. संस्कृतमधील कालिदासाच्या रघुवंश या महाकाव्याला, भवभूतीच्या उत्तररामचरिताला, संस्कृतमधील आणि अन्य भारतीय भाषांमधील विविध प्रकारच्या साहित्यप्रकारांना रामायण या आदिकाव्याने विषय पुरवला. परंतु या विषयात वारंवार अधिक भर पडत गेली. मूळच्या विषयात अनेक बदलही झाले. संस्कृतमध्ये विसांपेक्षा अधिक रामायणे झाली. अद्भुत रामायण, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, इ. संस्कृत रामायणे हे रामभक्तांचे आणि वैष्णव संप्रदायातील स्त्री पुरुषांचे धार्मिक ग्रंथ होत. अनेक भारतीय लोकभाषांमध्ये लोकप्रिय अशी रामायणे बाराव्या शतकापासून रचलेली आढळतात. त्यांत उत्कृष्ट साहित्यमूल्यांचा पवित्र धर्मग्रंथ तुलसीदासाचे (१५३२-१६३०)रामचरितमानस (१५७४) वा तुलसीरामायण होय. तो उत्तर भारतातील हिंदी भाषिक बहुजनसमाजाचा भक्तिभावाने वाचन आणि श्रवण करण्याचा धर्मग्रंथ ठरला. हिंदीतील, रामकथेवरील अन्य कोणतेही काव्य तुलसीदासाच्या ह्या काव्याइतके लोकप्रिय झालेले नाही.रामलीला हा पवित्र धार्मिक उत्सव मोठ्या धामधुमीने भारतभर साजरा होत असतो. वाल्मीकिरामायणाच्या प्रथम रचनेमध्ये राम हा पराक्रमी व आदर्श माणूस म्हणून वर्णिलेला आहे; परंतु तो कालांतराने विष्णूचा अवतार म्हणून वाल्मीकिरामायणातील प्रक्षिप्त भागात नोंदलेला आढळतो. बाकीची संस्कृत रामायणे, प्रादेशिक लोकभाषांतली रामायणे व नाटकादी साहित्य यांच्यामध्ये राम हा बहुतेक ठिकाणी विष्णूच्या दशावतारांतील सातवा अवतार म्हणूनच मानलेला आहे, हे लक्षात घेऊन अनेक पश्चिमी संस्कृत विद्वानांनी असा अभिप्राय व्यक्त केला आहे, की जगातील आजपर्यंतच्या साहित्यामध्ये मुळात रसिकांना रज्रविणारे एक काव्य म्हणून प्रसिद्ध झालेले काव्य-वाल्मीकिरामायण-हे बिनतोड आहे. भारतासह अनेक राष्ट्रांतील जनतेच्या जीवनावर आणि विचारांवर इतका खोल प्रभाव पाडणाऱ्या या साहित्यग्रंथासारखा कोणताही दुसरा ग्रंथ जगात नसेल.

वाल्मीकिरामायणाचे बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड असे सात भाग आहेत आणि श्लोक चोवीस सहस्त्र आहेत. साहित्यिक शैलीच्या दृष्टीने बालकांड आणि उत्तरकांड यांचा दर्जा खालचा दिसतो. बालकांडातील पहिल्या आणि तिसऱ्या सर्गांत विषयानुक्रमणिका आल्या आहेत. या दोन विषयानुक्रमणिकांमध्ये फरक आहे. एका विषयानुक्रमणिकेत पहिले आणि शेवटचे कांड वगळलेले आहे. महाभारताच्या जशा भिन्नभिन्न आवृत्ती सापडतात, तशाच वाल्मीकिरामायणाच्या देखील सापडतात. त्यांत मुंबईची आवृत्ती सगळ्यात प्राचीन होय, असे आधुनिक समीक्षक विद्वानांचे मत आहे.

रामायण आणि महाभारत यांपैकी रामायण मूळच्या स्वरूपात महाभारताच्या अगोदर अस्तित्वात आले असावे. महाभारतातील चरित्रविषय असलेल्या प्रमुख व्यक्तींचा रामायणात उल्लेख येत नाही. त्याच्या उलट रामचरित्राचा वारंवार उल्लेख महाभारतात सापडतो. रामायणातील श्लोक महाभारतात उद्धृत केलले दिसतात. एवढेच नव्हे, तर रामकथा ‘रामोपाख्यान’ या संज्ञेने महाभारतात आलेली असून त्यावरून भर पडलेले रामायण महाभारतकारांच्या समोर होते, हेही सिद्ध होते. भर पडलेल्या रामायणात राम हा देव व विष्णूचा अवतार म्हणून निर्दिष्ट आहे. रामायण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात, आज उपलब्ध असलेल्या स्वरूपात विद्यमान होते आणि प्रस्तुतचे लक्ष श्लोकांतील महाभारत चौथ्या शतकात पूर्ण स्वरूपात वाचकांच्या हाती आले होते. परंतु बऱ्याच संशोधकांचे असे मत आहे, की महाभारताचा अगदी पहिला गाभा रामायणापूर्वी तयार झाला असावा, कारण वाल्मीकीच्या शैलीपेक्षा मूळच्या महाभारताची शैली अधिक जुनाट दिसते. ‘ युधिष्ठिर उवाच-भगवानुवाच’ असा संवादात बोलणाऱ्याचा निर्देश महाभारतात सर्वत्र आहे. परंतु संवादात बोलणाऱ्याचा निर्देश श्लोकांमध्येच गुंतवलेला रामायणात सर्वत्र आहे. ‘ उवाच’ पद्धती त्यात नाही. इ. स. पू. चौथ्या शतकात तयार झालेल्या बौद्ध त्रिपिटकात दशरथजातक आले आहे. रामायणातील रामचरित्राचा हा प्रारंभ असावा, असे काही विद्वानांचे मत आहे; दशरथजातकात रामायणातील एक श्लोक उद्धृत केलेला दिसतो. परंतु रामायणावर बौद्ध धर्माचा प्रभाव पडला होता याचे सूचक असे काहीही आढळत नाही. बुद्धाचा उल्लेख असलेला रामायणातील श्लोक उघडउघड प्रक्षेप आहे, कारण तो मागच्यापुढच्या मजकुराशी विसंगत आहे. जर्मन संस्कृती पंडित वेबर याने होमरचे इलिअड आणि रामायण यांची तुलना करून इलिअडचा प्रभाव रामायणावर पडला असावा, असे अनुमान केले आहे; पण ही तुलना तसे अनुमान करण्याइतकी ताकदीची नाही. जर्मन पंडित हेर्मान याकोबी याच्या मते रामायण हे बौद्ध धर्माच्या अगोदरचे म्हणजे इ.स.पू. सातव्या किंवा आठव्या शतकातले आहे. याकोबीने दिलेली कालनिर्णयाची कारणे दिसायला सबळ वाटली, तरी त्यांवरून कालनिर्णय निश्चित होऊ शकत नाही. साधारणपणे रामायणाचा पहिला व मूळचा गाभा म्हणजे वाल्मीकी कवीची कृती, इ. स. पू. चौथ्या शतकाच्या सुमारास झाली असावी आणि आज उपलब्ध असलेले स्वरूप दुसऱ्या शतकात सिद्ध झाले असावे.

रामायणातील मूळ कथेत दोन निरनिराळे भाग एकत्र झालेले दिसतात. दशरथाच्या राजमहालातील अयोध्येच्या राजसिंहासनासंबंधी झालेली कारस्थाने आणि ज्येष्ठ पुत्राला-म्हणजे रामाला वनवासात पाठविल्यामुळे दशरथाचा अंत होणे हा मूळचा भाग, यातच पुत्रविरहामुळे दशरथाचा मृत्यू ओढवतो; रामाचा सावत्र बंधू भरत सिंहासनाबद्दल विरक्ती दर्शवितो, परंतु रामाचाच प्रतिनिधी म्हणून राज्याच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकरतो. हा या पहिल्याच भागातला अखेरचा अंश होय. दुसरा भाग म्हणजे दंडकारण्यातील आणि एकंदर भारताच्या दक्षिणेतील राम-लक्ष्मणांची शौर्यकथा. त्यात विविध विचित्र सामर्थ्याचे नरभक्षक राक्षस, जटायूसारखे पक्षी, सुग्रीव-वाली-हनुमानासारखे शूर वानर, जांबुवानासारखी बळकट आणि दणकट अस्वले इ. अनेक शत्रुमित्रांच्या अद्भुत घटनांनी रंगलेला हा दुसरा भाग होय या एकंदर कथानकाच्या मुळाशी भारताच्या इतिहासातील अतिप्राचीन काळी घडलेली संस्कृतिप्रसाराची वास्तव कथा आहे, असे काही पश्चिमी विद्वान मानत होते. मूळच्या आर्यपूर्व भारतामध्ये आर्य संस्कृतीचे व्यापक प्रमाणात आक्रमण रामायण सूचित करते; असे त्यांचे म्हणणे होते.

मूळचे वाल्मीकिप्रणीत रामायण अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंतच असावे, असे सुसंघटितपणा आणि विशिष्ट सुंदर शैली यांवरून निश्चितपणे अनुमानिता येते. बालकांड व उत्तरकांड ही नंतरची भर होय. मधल्या कांडांतील ठिकठिकाणी पडलेले प्रक्षेप हेही ध्यानात घ्यावे लागतात. या विद्यमान उपलब्ध असलेल्या रामायणाचा सारांश खालीलप्रमाणे.

बालकांड

७७ सर्ग. वाल्मीकी ऋषींनी विचारल्यावरून नारदमुनी त्यांना सांगतात की, इक्ष्वाकुवंशीय राम हा सर्वगुणसंपन्न आणि अमोघ पराक्रमी असा पुरुष होय. नारदमुनी वाल्मीकी ऋषींना भविष्यात जन्माला येणाऱ्या रामाचे चरित्र थोडक्यात सांगतात. नारदमुनी देवलोकी गेल्यानंतर वाल्मीकी तमसा नदीच्या तीरी येतात. तेथे क्रौंच पक्ष्याच्या एका जोडीतील नराला एक पारधी बाण मारतो. त्या पक्ष्याची मादी आक्रोश करू लागते. तो ऐकून वाल्मीकींचे कविहृदय शोकाकुल होते व अगदी सहजस्फूर्तीने एक श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडतो. त्यानंतर ते आश्रमात येतात, तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्यांच्यापुढे प्रकट होऊन त्यांना सांगतात, की तू रामाचे संपूर्ण चरित्र वर्णन कर.

त्यानंतर वाल्मीकी मुनींनी रचिलेले रामायण सर्वांनी श्रवण करावे, असे सांगितले जाते.

एकूण रामकथेचा बालकांडात आलेला भाग थोडक्यात असा : अयोध्या नगरीत दशरथ राजा राज्य करीत होता. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा त्याच्या तीन राण्या होत्या. तथापि त्याला वंश चालविण्यासाठी पुत्रसंतती नव्हती. ती व्हावी, म्हणून त्याने ऋष्यशृंग ऋषींच्या मुख्य पौरोहित्याखाली अश्वमेध यज्ञ केला आणि नंतर पुत्रकामेष्टिनामक याग केला. दशरथाच्या पोटी जन्म घेऊन रावणाचे पारिपत्य करावे, अशी प्रार्थना देवांनी भगवान विष्णूंना केली होती. ‘ मनुष्याखेरीज इतर कोणत्याही प्राण्यापासून तुला भीती नाही’ असा वर रावणाला ब्रह्मदेवांकडून मिळालेला असल्यामुळे मनुष्याकडूनच रावणाचा वध होणे शक्य होते. भगवान विष्णूंनी ही विनंती मान्य केली. दशरथ राजाचा पुत्रकामेष्टियाग चालू असताना अग्नीतून एक महापुरुष अवतीर्ण झाला. त्याने संतान देणारे, देवनिर्मित पायस दशरथास दिले. हे पायस दशरथाने कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी ह्या प्रियपत्नींना वाटून दिले. ह्या पायस प्रसादाच्या योगे दशरथाला राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र झाले. राम कौसल्येचा, लक्ष्मण-शत्रुघ्न सुमित्रेचे आणि भरत हा कैकेयीचा.

हे पुत्र वाढत असता, एके दिवशी विश्वामित्र मुनी दशरथाकडे आले. मारीच आणि सुबाहू असे दोन पराक्रमी राक्षस ते करीत असलेल्या यज्ञास सारखे विघ्न करीत होते. त्यांचे पारिपत्य करण्यासाठी रामाची त्यांना आवश्यकता होती. राम आणि रामाच्या पाठोपाठ लक्ष्मण असे दोघे बंधू विश्वामित्रांसह गेले. रामाने राक्षसांचा समाचार घेतला. ताटकेचाही वध केला. पुढे विश्वामित्रांनी त्यांना विदेहराज जनकाकडे नेले, जनकाकडे शंकराचे श्रेष्ठ धनुष्य होते. ते धनुष्य त्याने राम-लक्ष्मणांना दाखवावे, अशी इच्छा विश्वामित्रांनी व्यक्त केल्यावरून जनकाने त्या धनुष्याची हकीकत त्यांना सांगितली. त्याने पुढे सांगितले, की भूमी नांगरत असताना त्या नांगराला लागून एक कन्या वर आली. शेत नांगरताना ती मिळाली, म्हणून तिचे नाव सीता ठेविले. हे प्रचंड शिवधनुष्य पेलू शकेल अशा वीरपुरुषालाच ती द्यावयाची असा जनकाचा निश्चय होता. अनेक राजांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात ते अयशस्वी झाले होते. रामासमोर ते धनुष्य आणले गेले, तेव्हा मात्र त्याने ते सहज उचलले. त्याला प्रत्यंचा चढवून कानापर्यंत ओढले आणि मोडून टाकले. त्यानंतर रामाचा विवाह सीतेशी आणि लक्ष्मणाचा विवाह जनकाचीच दुसरी कन्या उर्मिला हिच्याशी झाला. विश्वामित्रांच्या सांगण्यावरून जनकराजाचा धाकटा भाऊ कुशध्वज याच्या दोन कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या अनुक्रमे भरत आणि शत्रुघ्न ह्यांस दिल्या गेल्या.

बालकांडात ही रामकथा सुरू असताना मधेमधे इतर अनेक कथांची भर पडलेली आहे. क्षत्रिय विश्वामित्र आणि ब्राह्मण ऋषी वसिष्ठ ह्यांच्यातील संघर्षाची कथा, विश्वामित्राला दीर्घ तपश्चर्येने ब्राह्मण्य प्राप्त झाल्याची कथा, वामनावताराची कथा, शिवपुत्र कार्तिकेय वा कुमार ह्याच्या जन्माची कथा इ. साहित्य या पहिल्या कांडात भरले आहे.

अयोध्याकांड

१७७ सर्ग. रामाला यौवराज्याभिषेक करण्याचे राजा दशरथ ठरवतो. परंतु त्याची राणी कैकेयी (भरताची माता) या अभिषेकाच्या वार्तेने संतप्त होते आणि दशरथाने पूर्वी दिलेल्या दोन वरांची त्याला आठवण करून देते. भरताला राज्याभिषेक आणि रामाला चौदा वर्षे वनवास असे दोन वर ती मागते. अभिषेक व्हावयाच्या दिवशी कैकेयी रामाला या दोन वरांची माहिती देते आणि चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी त्याने गेले पाहिजे, असे त्यास सांगते. दशरथ राजा शोकाकुल होतो; पण तो असहाय असतो. राम शांत चित्ताने वनवासाकरता सिद्ध होतो. सीता आणि लक्ष्मण यांच्या सह वनवासाला निघून जातो. भरत त्यावेळी राजधानीत नसतो. तो त्याच्या आजोळी गेलेला असतो. तेथून त्यास ताबडतोब अयोध्येस आणले जाते. भरतास सर्व वस्तुस्थिती समजते. तो स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावयाचे साफ नाकारतो. रामाला भेटण्याकरता व परत आणण्याकरता तो दंडकारण्यात निघून जातो. अयोध्येस परत येऊन राजसिंहासनावर विराजमान होण्याची प्रार्थना भरत रामाला करतो. तथापि राम परत येत नाही. भरताने सुवर्णमंडित पादुका रामासाठी आणलेल्या असतात. ‘रामा ह्या पादुका पायात घाल. त्याच सर्व जनांचा योगक्षेम उचित रीतीने ठेवतील’ अशी विनंती भरत करतो. त्या पादुका एकवार पायांत घालून राम त्या भरताला परत देतो. त्यानंतर त्या पादुका राज्यतंत्रावर ठेवून रामाच्या वतीने राज्य चालविण्यास भरत तयार होतो. आधुनिक समीक्षकांच्या मते येथपर्यंतचा हा भाग कल्पितापेक्षा वास्तवच होय. यापुढील युद्धकांडापर्यंतचा भाग हा अद्भुतरम्य कथाप्रसंगांनी भरलेला आहे.

अरण्यकांड

७५ सर्ग. दंडकारण्यात जिकडेतिकडे ऋषिमुनींचे प्रशस्त आश्रम असतात; परंतु ऋषिमुनींना राक्षसांचा सतत उपद्रव होत असतो. ऋषिमुनी रामाकडे आपल्या संरक्षणाची मागणी करतात. राम त्यांना संरक्षणाचे आश्वासन देतो. रावणाची बहीण शूर्पणखा रामाला भेटते. रामाशी लग्न करण्याची तिला इच्छा होते. रामाने नाकारल्यावर ती लक्ष्मणाकडे जाते. तोही तिला नाकारतो. त्यानंतर शूर्पणखा जेव्हा सीतेला ठार मारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा रामाच्या आज्ञेने लक्ष्मण तिचे नाक आणि कान तोडून टाकतो. तेव्हा ती आपला भाऊ खर यास त्याच्या चौदा हजार राक्षस सैनिकांसह रामावर हल्ला करण्यास पाठवून सूड उगविण्याचा प्रयत्न करते. त्या सैन्याचा निःपात राम करतो. ह्या प्रकाराची वार्ता अकंपन नावाच्या एका राक्षसाकडून रावणाला समजते. अकंपन रावणाला सांगतो, की रामाला ह्या जगातून नाहीसे करायचे असेल, तर त्याच्या पत्नीला-सीतेला-पळवून आण. तिच्यावाचून राम जगू शकणार नाही. रावण आपल्या सोनेरी रथातून पंचवटीकडे येतो. ताटकेचा पुत्र मारीच ह्याला तो भेटतो. मारीचाला रावणाचा हेतू कळताच तो त्याला सीतेला पळविण्यापासून परावृत्त करतो आणि रावण त्याचा सल्ला मानतो. पण नंतर शूर्पणखेच्या चेतावणीमुळे तो सीतेला पळविण्याच्या विचारावर पुन्हा एकदा येतो. मारीच हा अनेक रूपे धारण करण्यात कुशल असतो. तो कांचनमृगाचे रूप धारण करतो. त्या कांचनमृगाचा लोभ सीतेला उत्पन्न होतो. हा मृग जिवंत हाती लागला, तर एक सुंदर वस्तू म्हणून त्याला जपता येईल आणि तो मृतावस्थेतच मिळाला, तर त्याच्या सोनेरी कातड्याचा बसण्यासाठी उपयोग होईल असे तिला वाटत असते. म्हणून राम हा कांचनमृगाच्या मागे वनात दूरवर धावत जातो. त्याच्या पाठीमागून लक्ष्मणालाही धावावे लागते. लक्ष्मण जाताच रावण साधूच्या वेशात सीतेकडे येतो आणि तिला जबरदस्तीने रथात घालून लंकेकडे जातो. रामाचा मित्र गृध्रराज जटायू हा सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणावर त्वेषाने हल्ला करतो; पण रावण त्याला ठार मारतो. सीतेला लंकेत नेल्यानंतर रावण आपल्या वैभवाचा दिमाख तिला दाखवितो व माझ्याशी लग्न कर, अशी याचना करतो. ती त्याला धुडकावून लावते. सीतेला अशोकवनात राक्षसींच्या पहाऱ्याखाली रावण बंदिस्त करून ठेवतो. राम व लक्ष्मण कांचनमृगाच्या शिकारीनंतर आश्रमात परततात. सीता आश्रमात नाही हे पाहून राम शोकाकुल होतो. वनात सीतेच्या शोधाकरता राम आणि लक्ष्मण भटकत राहतात. आसन्नमरण जटायूकडून त्यांना रावणाने सीतेला पळवून नेल्याचे कळते. पुढे त्यांना कबंध नावाचा राक्षस भेटतो. मानेपासून वर डोकेच नसलेला, फक्त धड आणि तोंड पोटात असलेला असा हा राक्षस. तो रामलक्ष्मणांना खाऊ पाहतो. ह्या राक्षसाचे बाहू तोडून रामलक्ष्मण त्याला ठार मारतात. त्याचे दहन केल्यानंतर तो तेजःपुंज स्वरूपात चितेतून वर उडतो व अंतरिक्षातून रामाला सीताप्राप्तीचा उपाय सांगतो, की तू सुग्रीव या वानरराजाशी मैत्री कर. तो तुला सीतेची प्राप्ती करून देईल. त्यानंतर कबंधाच्या सूचनेवरून राम मतंगवनात जातो. तेथे त्याला शबरी भेटते. त्या तपस्विनीच्या तपस्येची अत्यंत आस्थेने राम चौकशी करतो. शबरी त्याला तिने गोळा केलेली फळे देते.

किष्किंधाकांड

६७ सर्ग. पंपा सरोवराच्या परिसरात रामाची सुग्रीवाशी भेट होते. राम सुग्रीवाशी सख्य करतो. वाली हा सुग्रीवाचा ज्येष्ठ बंधू. तो महापराक्रमी असतो. तथापि ह्या वालीने बंधू सुग्रीवाच्या पत्नीचा अपहार करून त्याला वनवास पतकरावयास लावलेले असते. वालीचे पारिपत्य करून मी तुला तारीन, असे आश्वासन राम सुग्रीवास देतो. सुग्रीवही सीतेचा शोध करण्याचे अभिवचन रामास देतो. त्यानंतर सुग्रीव रामासह किष्किंधेस जातो आणि वालीला युद्धाचे आव्हान देतो. सुग्रीव व वाली ह्यांचे युद्ध चालू असता रामाने बाण सोडून वालीला ठार मारावयाचे असे ठरलेले असते. परंतु वाली आणि सुग्रीव अश्विनीकुमारांप्रमाणेच दिसण्यात एकसारखे असल्यामुळे राम गोंधळतो. बाण कोणावर सोडावा हे त्याच्या लक्षात येत नाही. परिणामतः सुग्रीव वालीकडून मार खाऊन पळून जातो. राम त्याला आपली काय अडचण झाली, हे सांगतो आणि वालीला पुन्हा आव्हान देण्याचा सल्ला देतो. ह्या खेपेला मात्र ओळखीची खूण म्हणून गजपुष्पी वेल सुग्रीवाच्या गळ्यात घालण्यात येते. वाली आणि सुग्रीव ह्यांचे पुन्हा द्वंदयुद्ध होते आणि ते चालू असतानाच ठरल्याप्रमाणे राम वालीवर बाण सोडून त्याचा वध करतो. किष्किंधा नगरीच्या सिंहासनावर सुग्रीवाला राज्याभिषेक केला जातो. सुग्रीवही सीतेचा शोध घेऊ लागतो. त्यासाठी वानरांची पथके सर्व दिशांना धाडण्यात येतात. दक्षिणेकडे गेलेल्या वानरांत हनुमंत आणि वालीपुत्र अंगद हे असतात. एका पर्वताच्या पठारावर त्यांना गृध्रराज जटायूचा वडील भाऊ संपाती भेटतो. ज्याने सीतेला पळवून नेली, तो रावण लंका नावाच्या रमणीय द्वीपावर राहतो, हे संपातीकडून त्यांना कळते; परंतु आता सागर लंघून लंकेत जाण्याचा प्रश्न उभा राहतो. हनुमान ती जबाबदारी स्वीकारतो व उड्डाणासाठी महेंद्र पर्वताच्या शिखरावर चढतो.

सुंदरकांड

६८ सर्ग. यामध्ये अधिक चमत्कारपूर्ण अशा कथा भरल्या आहेत. महेंद्र पर्वतावरून हनुमान आकाशात उड्डाण करतो. शंभर योजनांचा सागर ओलांडून तो त्रिकूटाचल नावाच्या पर्वतावर वसलेल्या लंकेचे दर्शन घेतो. कडेकोट बंदोबस्त असलेल्या त्या नगरीत प्रवेश करणे कठीण आहे असे त्याला दिसते. रात्रीच्या अंधःकारात तो लंकेत शिरतो. पहाऱ्यावर असलेल्या अनेक राक्षस-राक्षसींना चुकवून तो रावणाच्या महालात जातो. परंतु त्याला तेथे सीता आढळत नाही. सगळीकडे शोध घेताघेता अशोकवनिकेत सीता त्याला दिसते. पहाऱ्यावर असलेल्या राक्षसिणींनी तिला वेढलेले असते. रावण तेथे येऊन तिला वश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्याला दिसते. सीता त्याची कानउघडणी करीत आहे, हेही तो पाहतो. त्याला सीतेची अवस्था पाहून दुःख होते. नंतर सीतेला भेटून तो तिला ओळखीसाठी राममुद्रिका दाखवतो. राम तिच्या मुक्ततेसाठी प्रचंड सैन्य घेऊन येईल असे आश्वासन हनुमान तिला देतो. हनुमान स्वतःही तिला रामाकडे घेऊन जाण्याची तयारी दर्शवितो; परंतु रामाने स्वतः येऊन मला सोडवून न्यावे, असे सीता त्याला सांगते. हनुमानास ते पटते. सीतेने दिलेला चूडामणी म्हणजे वेणीत घालावयाचे रत्न घेऊन तो रामाकडे निघतो. तथापि जाण्यापूर्वी रावणाला आपल्या पराक्रमाची जाणीव करून देण्यासाठी आणि त्याचीही एकंदर शक्ती जोखण्यासाठी हनुमंत रावणाचे सुंदर उपवन उद्ध्वस्त करतो आणि नंतर लंकादहनही करून रामाकडे परततो. हनुमान रामाकडे येऊन सीतेसंबंधीचा सर्व वृत्तांत सांगतो.

युद्धकांड

१२८ सर्ग. ह्यात राम आणि रावण ह्यांच्या युद्धाचा वृत्तांत आहे. वानरसेनेसह राम-लक्ष्मण समुद्रतीरी येतात. परंतु समुद्र उल्लंघून लंकेत जायचे कसे, हा प्रश्न असतो. इकडे हनुमानाच्या पराक्रमामुळे रावण अस्वस्थ झालेला असतो. एकट्या हनुमानाने लंकेत येऊन सीतेची भेट घ्यावी, लंकाही उद्‌ध्वस्त करावी हा प्रकार त्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्यामुळे तो आपल्या मंत्र्यांशी चर्चा करू लागतो. त्या वेळी सीतेला परत करण्याचा शहाणपणाचा सल्ला विभीषण रावणाला देतो. रावण हा सल्ला झिडकारून विभीषणाला अपमानित करतो आपल्या चार सहकाऱ्यांसह विभीषण लंका सोडून रामाला येऊन मिळतो. सेनेने सागर कसा तरून जावा? असा प्रश्न हनुमान आणि सुग्रीव विभीषणास विचारतात. रामाने समुद्राला शरण जावे, असे विभीषण सुचवतो. राम तीन रात्री सागराची उपासना करतो आणि समुद्राची उदासीनता पाहून अखेरीस धनुष्याला तेजस्वी बाण लावून समुद्र सुकवून टाकावयास निघतो, तेव्हा समुद्र रामास सांगतो, की निसर्गनियमानुसार माझे रूप आहे असेच राहिले पाहिजे; पण मी तुझा मार्ग सुकर करून देईन. विश्वकर्म्याचा पुत्र नल ह्याच्याकरवी सेतू बांधून लंकेकडे जावे असे सागर रामास सांगतो; नलाचा रामाशी परिचय करून देतो. वानरांच्या साहाय्याने नल सागरावर सेतू बांधतो. युद्ध सुरू करण्यापूर्वी राम वालीपुत्र अंगद ह्याला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठवतो. राम रावणाला कळवतो, की तुझे ऐश्वर्य संपले आहे. सीतेला प्रणाम करून सन्मानपूर्वक तू जर माझ्याकडे परत पाठविले नाहीस, तर तुला मी ठार मारीन आणि तुझे राज्य विभीषणाला देईन. ही अंगदाची शिष्टाई अर्थातच विफल होते. लढाईला तोंड लागते. शूरांच्या झटापटी होतात. इंद्रजित राम-लक्ष्मणांना नागपाशांनी बांधून टाकतो; परंतु तेथे गरुड येतो आणि त्याला पाहून नाग पळून जातात. रावणाचा सेनापती प्रहस्त हा अग्निपुत्र नीलाकडून ठार करतो. त्यानंतर रावण स्वतः युद्धात प्रवेश करतो. राम रावणाचा रथ तोडून टाकतो आणि त्याच्या छातीवर जोरदार प्रहार करून त्याला मूर्छित करतो. पण राम त्याला ठार मारीत नाही. त्यानंतर रावण लंकेत येऊन कुंभकर्णाला जागा करतो; कुंभकर्ण प्रथम रावणाची, त्याने केलेल्या पापकर्माबद्दल, निर्भत्सना करतो; परंतु नंतर लढायला निघतो. युद्धात कुंभकर्णाला राम ठार मारतो. इंद्रजित स्वतः अदृश्य राहून वानरसेनेवर हल्ला करू लागतो. ब्रह्मास्त्राच्या साहाय्याने इंद्रजित राम-लक्ष्मणांना आणि वानरसेनेला निश्चेष्ट करतो. तथापि हनुमान दिव्य औषधी धारण करणारा एक पर्वत घेऊन येतो व त्या पर्वतावरील महौषधींचा वास देऊन हनुमान राम-लक्ष्मणांना आणि वानरवीरांना जागे करतो. पुढे इंद्रजित मायावी सीता निर्माण करून तिला वानरांच्या देखत ठार मारतो. सीतावधाच्या वार्तेने राम मूर्च्छित पडतो. इंद्रजिताने केलेला सीतावध खरा नाही, असे म्हणून विभीषण रामाला शोक आवरण्यास सांगतो. इंद्रजित ज्याप्रमाणे वानरांना फसविण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे रावणानेही सीतेला फसविण्याचा प्रयत्न केलेला असतो. राम युद्धात मारला गेला असे सीतेला सांगून रामाचे मायामय शिर रावणाने सीतेला दाखविलेले असते; परंतु सीतेवर प्रेम करणाऱ्या सरमा नावाच्या राक्षसीने राम जिवंत असल्याची तिची खात्री पटवलेली असते. इंद्रजिताने हा मायावी सीतेच्या वधाचा डाव खेळल्यानंतर लक्ष्मण त्याचा वध करण्यासाठी निघतो. दोघांचे युद्ध होते आणि त्यात इंद्रजित मारला जातो. नंतर राम-रावणाचे युद्ध होते. ह्या युद्धात रावण मारला जाणार, असे वाटल्यावरून त्याचा स्वामिभक्त सारथी रथ युद्धभूमीपासून बाजूला नेतो. रावण त्याच्यावर संतापतो. रथ युद्धभूमीत पुन्हा आणला जातो. तुंबळ युद्ध होते आणि अखेरीस एक बाण सोडून राम रावणाचे हृदय विदीर्ण करून टाकतो. रावण ठार झाल्यावर राम विभीषणाला रावणाची उत्तरक्रिया करावयास सांगतो. रावणाचे राज्य विभीषणाला दिले जाते. सीतेला रामाजवळ आणले जाते. तथापि राम सीतेच्या चारित्र्याविषयी शंका प्रदर्शित करतो. सीता अग्निदिव्य करते. सीता शुद्ध असल्याची ग्वाही प्रत्यक्ष अग्नीकडून मिळाल्यानंतर राम तिचा स्वीकर करतो. पुष्पक विमानातून राम अयोध्येला परततो. रामाला राज्याभिषेक होतो.

उत्तरकांड

१११ सर्ग. हे कांड म्हणजे मूळच्या काव्यात नंतर पडलेली भर आहे, असे संशोधकांचे मत आहे. राम अयोध्येस परतल्यानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी अनेक ऋषिमुनी जमतात. राम त्यांचा आदरसत्कार करतो. पुढे सीतेला दिवस जातात. राम तिला तिच्या डोहाळ्यांसंबंधी विचारतो, तेव्हा तपोवनात, तपस्व्यांच्या पायांपाशी राहावे, अशी आपली तीव्र इच्छा असल्याचे सीता त्याला सांगते. पुढे सीतेच्या शुद्धीबद्दल लोकपवाद पसरतो. परगृही दीर्घकालपर्यंत एखादी विवाहीत स्त्री राहिली, तरी तिला पतीने शुद्ध मनाने परत घेतली हे चांगले उदाहरण नव्हे. अशा उदाहरणामुळे लोकही असे करायला लागतील, म्हणून लोकांना उदाहरण घालून देण्याकरिता सीतात्याग करण्याचा निर्णय राम घेतो. सीता शुद्ध आहे, ह्याबद्दल रामाच्या मनात मात्र यत्किंचितही संशय राहिलेला नसतो. तो लक्ष्मणाला आज्ञा करतो, की ‘गंगेच्या पलीकडे, तमसा नदीच्या काठी, वाल्मीकिमुनींचा आश्रम आहे. त्याच्या जवळ असलेल्या निर्मनुष्य प्रदेशात तू सीतेला सोडून ये’. अत्यंत दुःखी मनाने राम ही आज्ञा देतो. सीतेने आपल्याला तपोवनात राहण्याचे डोहाळे लागल्याचे सांगितले होते, हेही त्याला आठवते. त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. ‘ तुझ्या इच्छेनुसार राजाने तुला तपोवनात सोडण्यास मला सांगितले आहे,’ एवढेच लक्ष्मण सीतेला सांगतो. सीतेला फार आनंद होतो. परंतु रथात बसल्यानंतर मात्र तिला अस्वस्थ वाटू लागते. अशुभ चिन्हे जाणवू लागतात. गंगेपलीकडे गेल्यानंतर लक्ष्मणाला सत्य सांगणे भाग पडते. त्या सत्यकथनाचे दुःख लक्ष्मणालाही झेपण्यासारखे नसते. ते कर्म करण्यापेक्षा मरण बरे, असेच त्याला वाटत असते; पण अखेर तो सर्व काही सांगून टाकतो. पण वाल्मीकिमुनींच्या छायेखाली तुला येथे राहता येईल हेही तो तिला सांगतो. सीत्या अत्यंत व्यथित होते. माझा देह विधात्याने केवळ दुःखा साठीच निर्माण केला असावा, असे उद्गार तिच्या तोंडून निघतात. आपल्या पतीचा राजवंश नष्ट होऊ नये, एवढ्यासाठीच आपण प्राण देत नाही, हे ती लक्ष्मणास सांगते. रामासाठी ती लक्ष्मणाला असा निरोप देते, की लोकांकडून निंदा होणार नाही, अशाच प्रकारे आपल्या पतीने वागले पाहिजे आणि पतीचे  हित मी प्राणांपेक्षा अधिक मोलाचे मानते. लक्ष्मण गेल्यानंतर सीतेला रडू अनावर होते.

लवकरच वाल्मीकिमुनींची आणि सीतेची भेट होते. ते तिला आश्रय देतात. तेथेच पुढे तिला कुश आणि लव हे दोन जुळे पुत्र होतात. आश्रमातच ते वाढतात. रामाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा होते. तो यज्ञ चालू असताना वाल्मीकी आपल्या शिष्यगणासह तेथे येतात. लवकुशांना ते रामायण गाण्यास सांगतात. दुसऱ्या दिवशी, प्रभातकाली, लवकुश रामायण गाऊ लागतात. राम ते  ऐकतो. त्या मुलांबद्दल त्याला कुतूहल उत्पन्न होते. हे आपलेच पुत्र आहेत, हे रामाच्या नंतर लक्षात येते. त्यानंतर राम ‘सीतेची इच्छा असल्यास तिने आपल्या शुद्धतेचा प्रत्यय देण्यासाठी येथे यावे’, असा निरोप वाल्मीकींकडे देतो. वाल्मीकी सीतेस घेऊन येतात. राम जनसमुदायासमोर स्पष्ट करतो, की सीता शुद्ध असल्याबद्दल त्याच्या स्वतःच्या मनात आजिबात शंका नाही. सीतेने आपल्या शुद्धतेचा प्रत्यय पूर्वीच दिलेला आहे; परंतु लोकापवादामुळे सीतात्याग करावा लागला; तेव्हा लोकसमुदायापुढेच सीता शुद्ध आहे, हे सिद्ध व्हावे; पण सीता आपली शुद्धता सिद्ध करण्यासाठी असे म्हणते, की जर मी शुद्ध असेन तर हे पृथ्वीमाते, तू मला पोटात घ्यावेस आणि तसे घडून येते. सारा लोकसमुदाय ते दृश्य पाहून थक्क होतो. राम दुःखी होतो.

त्यानंतर लवकुश रामाला त्याचे भविष्यचरित्र सांगणारे उत्तरकाव्य गाऊन दाखवितात. त्याचा आशय थोडक्यात असा : रामाला सीतेचे विस्मरण कधीही झाले नाही. रामाने सीतेखेरीज अन्य कोणाही स्त्रीशी विवाह केला नाही. कोणत्याही यज्ञाच्या वेळी तो पत्नीच्या ठिकाणी सीतेची सुवर्णमूर्ती बसवीत असे. रामाने अनेक धर्मकार्ये पार पाडली; अश्वमेध यज्ञ केले. त्याच्या राज्यात सर्वत्र सुबत्ता होती. कोठेही अनर्थ नव्हता.

उत्तरकांडाच्या अखेरीअखेरीस तापसाच्या रूपात प्रत्यक्ष काळ रामाला कसा येऊन भेटतो, ते सांगितले आहे. काळाला रामाची भेट एकान्तात हवी असते. ती तशी न होणे अहितकारक असून तेथे जो येईल तो तुझ्याकडून मारला जावा, असे काळ रामाला सांगतो. लक्ष्मण दारावर रक्षक म्हणून थांबतो. काळाने रामासाठी ब्रह्मदेवाचा असा निरोप आणलेला असतो, की आता तुझे अवतारकार्य संपले आहे; परतण्याची वेळ झाली आहे.

पण हे बोलणे चालू असतानाच दुर्वासमुनी येतात. रामाची भेट ताबडतोब दिली नाही तर मी देशाला, नगराला आणि रामाला शाप देईन असे सांगतात. नाइलाजाने लक्ष्मण दुर्वास आल्याचे आत जाऊन सांगतो.

लक्ष्मणाने अगदी नाइलाजाने का होईना, पण हा नियमभंगच केलेला असतो. त्यामुळे त्याला शासन करणे रामाला भाग असते. सज्जनांचा त्याग करणे आणि वध करणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असे मानून राम लक्ष्मणाला ठार न मारता त्याचा त्याग करतो. लक्ष्मण सरयूतीरी जातो. तेथे त्याचे निर्वाण होते. तो स्वर्गात प्रवेश करतो. त्यानंतर कुशलवांना राज्याभिषेक करून राम सर्व निरवानिरव करतो. महाप्रस्थानासाठी निघतो. सर्व बंधू, प्रजाजन, वानर, राक्षस ह्यांसह राम सरयू नदीत प्रवेश करतो. सर्वजण प्राणत्याग करतात. रामासोबत आलेल्या सर्वांना उत्तम गती प्राप्त होते.

कथानकाचा धागा निरनिराळ्या असंबद्ध कथानकांनी पहिल्या कांडात व शेवटच्या कांडात सारखा तुटत असतो. पहिल्या कांडातील काही कथानकांचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे. उत्तरकांडात ययाती देवयानी कथा, इंद्राने केलेल्या वृत्रवधाची कथा, मित्र आणि वरुण यांची व पुरूची कथा आणि ब्राह्मणांचे माहात्म्य वाढवणारा मजकूर यांमुळे या रम्य व भव्य काव्याचा महिमा मर्यादित होतो.

काशीनाथ वामन लेले ह्यांनी श्रीवाल्मीकिरामायण ह्या ग्रंथाचे मराठी सुरस भाषांतर तीन भागांत केले आहे (१९०३, १९०३, आणि तिसऱ्या भागाची दुसरी आवृ. १९३०). त्यांनी मराठी भाषांतरासहित रामायणाचे बालकांड ते उत्तरकांड असे ७ भागही तयार करून प्रसिद्ध केले (१८९९ – २२). अलीकडच्या काळात पुण्याच्या श्रीरामकोश मंडळातर्फे काढल्या गेलेल्या श्रीरामकोशाचा खंड दुसरा : भाग दुसरा (उपभाग १ व २) वाल्मीकिरामायणाच्या मराठी अनुवादाचा आहे. हा समग्र शब्दशः अनुवाद भाऊ धर्माधिकारी ह्यांनी  केलेला आहे. (१९८१).

मूळ रामायण हे वाल्मीकिमुनींनी रचिलेले असेल, तरी त्यानंतर अनेक रामायणे रचिली गेली. त्यांतून रामाच्या आणि सीतेच्या व्यक्तिरेखांना आपल्या विशिष्ट तात्विक-धार्मिक दृष्टिकोणांशी सुसंगत असे रूप देण्याचे प्रयत्न झालेले दिसतात आणि अशा प्रयत्नांतूनही काही रामायणे तयार झालेली आहेत. संस्कृतातील रामायणांत भुशुंडी रामायण, अद्भुत रामायण, अध्यात्म रामायण आणि आनंद रामायण ही विशेष उल्लेखनीय. भुशुंडी रामायणात मधुरा भक्तीचा पुरस्कार केला आहे. अद्भुत रामायणात सीतेच्या व्यक्तिरेखेला दुर्गेची भव्यता देण्यात आली असून शतमुखी रावणाचा वध सीतेने केल्याचे दाखविले आहे. सीता ही रावणाची मुलगी कशी झाली, ह्याचाही वृत्तांत ह्या रामायणात आहे. आनंद रामायणात अनेक कथा-विशेषतः रामाच्या राज्यकारभाराशी संबंधित अशा आलेल्या असून कथाकीर्तनांत त्या वैपुल्याने वापरल्या जातात.

महाराष्ट्री प्राकृतांतीलपउमचरिय (कर्ता-विमलसूरी इ. स. च्या पहिल्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत केव्हा तरी होऊन गेला असावा) आणि अपभ्रंश भाषेतीलपउमचरिउ (कर्ता-महाकवी स्वयंभू; आठवे शतक) ही जैन महाकाव्ये रामकथेवर आधारलेली आहेत. ह्या महाकाव्यांच्या कर्त्यांनी रामकथेला जैन धर्मानुकूल रूप दिलेले आहे. पउमचरिऊत सीता अग्निदिव्यानंतर विरक्त होऊन मुनी सर्वभूषणांकडून दीक्षा घेते असे दाखविले आहे. लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर रामही जैन यती होतो. जैनांनी राम-लक्ष्मणांचा अंतर्भाव आपल्या शलाकापुरुषांत केलेला आहे. जैनांच्या दृष्टीने राम-लक्ष्मण हे आठवे बलदेव-वासुदेव होत. विमलसूरीच्या पउमचरियातील रावण जिनेंद्राचा भक्त आहे; आणि तो अनेक जिनमंदिरे उभारतो. रावण सीतेला पळवून नेण्याचे कारण पउमचरियात वेगळेच दाखविण्यात आले आहे. रावणाच्या चंद्रनखा नावाच्या बहिणीचा पुत्र शंबूक ह्याला लक्ष्मण ठार मारतो आणि चंद्रनखेच्या दुःखामुळे रावण सीतेस पळवून नेण्यास प्रवृत्त होतो. पुढे जे युद्ध होते त्यात लक्ष्मण रावणाला ठार मारतो; राम नव्हे. अग्निदिव्यानंतर सीता जैन धर्माची दीक्षा घेते; लवकुशही दीक्षा घेतात. स्वयंभूच्या पउमचरिऊवर विमलसूरीचा प्रभाव आहे.

विविध भारतीय भाषांत जी रामायणे झाली आहेत, त्यांत तुलसीदासांचे रामचरितमानस हे अत्यंत लोकप्रिय आहे. धार्मिक-सांप्रदायिक मतभेद मिटवावे आणि आदर्श जीवन जगावे, हे ध्येय रामचरितमानसाने लोकांपुढे ठेविले. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग ह्यांनी रामावतार ह्या नावाने एक रामायण लिहिले. दक्षिणेकडेकंबनाचे (सु. बारावे शतक) तमिळ भाषेतील कंब रामायण विख्यात आहे. कंबनाने हे रामायण जरी वाल्मीकिरामायणाच्या आधारे लिहिले असले, तरी त्यानेही आपल्या तमिळ पार्श्वभूमीला अनुसरून त्याची पुनर्निर्मिती केली आहे. कन्नड भाषेतील कौशिक रामायण आहे; तेलुगूत रंगनाथ रामायणम्, भास्कर रामायणम् अशी रामायणे आहेत. मराठीत संत एकनाथांनी (१५३३-९९) भावार्थ रामायण रचिले. त्यात त्यांनी आध्यात्मिक रूपकांबरोबरच सामाजिक रूपकात्मकताही आणली.रामदासांनी रामायणाची ‘सुंदर’ आणि ‘युद्ध’ ही दोनच कांडे रचिली आणि ‘निमित्य मात्र ते सीता विबुधपक्ष पुरता’ असे त्यांच्या दृष्टीने रामायणाचे सार सांगितले. बंगाली, ओडिया, मणिपुरी, असमिया भाषांच्या साहित्यांतही रामायण आहेच. परंतु रामायणाचा प्रभाव केवळ भारतीयांपुरताच राहिलेला नाही. आशियाई-विशेषतः आग्नेय आशियातील-लोक-मानसावर रामायणाचा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. प्राचीन जावानीज भाषेत एक रामायण रचिले गेले आहे. नेपाळ व श्रीलंकेत रामायण आहेच; परंतु जपान, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, लाओस, ब्रह्मदेश अशा अनेक देशांतही रामायण पोहोचलेले आहे.

रामकथेवर आधारित असे काव्यनाटकादी विपुल साहित्य विविध भाषांत झालेले आहे. तसेच शिल्पकृती आणि रूपण कलांतूनही तिचा प्रभावी आविष्कार झालेला आहे.

संदर्भ : 1. Altekar, G. S. Studies on Valmiki’sRamayan, Pune, 1987.

2. Bhatt, G. H.; Diwanji, P. C.; Jhala, G. C.; Mankad, D. R.; Shah, V. P. and Vaidya, P. L. Ed. The Valmiki Ramayana, 7Vols., Baroda, 1960-75.

3. Raghavan, V. The Ramayana Tradition in Asia, New Delhi, 1980.

4. Rajagopalachari, C. The Ramayana, Bombay, 1956.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी; अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate