অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लीलावती

लीलावती

महाराष्ट्री प्राकृत भाषेतील एक प्रसिद्ध काव्य. कोऊहल (कौतूहल) ह्याने आपल्या पत्नीच्या आग्रहावरून ह्या काव्याची रचना केली. राजा सातवाहन आणि सिंहलद्धीपाची राजकुमारी लीलावती ह्यांच्या प्रेमकथेवर हे काव्य रचलेले आहे. प्रायः अनुष्टुभ छंदात रचिलेल्या 1,800 गाथा ह्या काव्यात आहेत. अधूनमधून गद्यरचनाही आढळते. इ. स. सु. आठवे शतक हा ह्या काव्यकृतीचा काळ मानला जातो. तिची कथा थोडक्यात अशी : सातवाहन राजाचे चित्र पाहून लीलावती मोहीत होते आणि आपल्या आईवडिलांच्या अनुमतीने त्याच्या शोधार्थ बाहेर पडते. गोदावरीतीरावर तिला विरहिणी असलेली आपली मावसबहीण महानुमती ही कुवलयावलीनामक दुसऱ्या विरहिणीसह राहात असलेली भेटते. त्या तिघी एकत्र राहू लागतात.

राजा सातवाहन आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या हेतूने सिंहलद्वीपावर आक्रमण करतो. तथापि राजाचा सेनापती विजयानंद त्याला सल्ला देतो, की सिंहलद्वीपाच्या राजाशी मैत्री करणे उचित ठरेल. हा सल्ला मान्य करून राजा विजयानंदाला आपला दूत म्हणूनसिंहलद्वीप येथे पाठवितो. तथापि वाटेत वादळ झाल्यामुळे विजयानंदाची नाव तुटते व त्याला गोदावरीतटावर थांबणे भाग पडते. सिंहलराजाची कन्या लीलावती येथेच राहत असल्याची वार्ता त्याला कळते. विजयानंद सातवाहनाकडे जाऊन ते वृत्त त्याला सांगतो. सातवाहन लिलावतीशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो. तथापि महानुमती व कुवलयावली ह्यांचे प्रियकर प्राप्त होईपर्यंत विवाह करणे आपणास प्रशस्त वाटत नसल्याचे लीलावती सांगते. त्यामुळे राजा सातवाहन आपले गुरू नागार्जुन ह्यांच्यासह पाताळात जाऊन महानुमतीचा प्रियकर माधवानील ह्याला सोडवतो. राक्षसयोनीत अडकलेल्या चित्रांगद गंधर्वाची मुक्तता करून कुवलयावलीचा प्रियकरही तिला भेटवतो. त्यानंतर सातवाहन-लीलावती, चित्रांगद-कुवलयावली आणि महानुमती-माधवानील ह्यांचे विवाह होतात.

ह्या काव्याची भाषा आलंकारिक पण ओघवती असून तिच्यावर कालिदास, बाण व सुबंधू ह्यांची छाप जाणवते. कोण्या अज्ञात टीकाकाराने ह्या काव्यावर लीलावती-कथा-वृत्तिनामक संस्कृत टीका लिहिली आहे. हा टीकाकार गुजरातचा व श्र्वेतांबर जैन असावा, तसेच 1172 ते 1404 पर्यंत केव्हा तरी होऊन गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. आ. ने. उपाध्ये ह्यांनी हा ग्रंथ संपादिला आहे (1949).

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate