অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकगीते

लोकगीते

मौखिक परंपरेने चालत आलेल्या अनेकविध गीतप्रकारांचा निर्देश या संज्ञेने केला जातो. सर्व लोकसाहित्याप्रमाणे लोकगीते ही समूहमनाची व समूहप्रतिभेची निर्मिती आहे. निसर्गाच्या लयबद्धतेशी व तालबद्धतेशी संवाद साधीतच ही गीतनिर्मिती झाली. लोकगीत, लोकसंगीत व लोकनृत्य ही परस्परोपजीवी, परस्परावलंबी व निसर्गसंवादी अशी मानवाची निर्मिती आहे. लोकगीतांची व अन्य लोककलांची निर्मिती निखळ मनोरंजनाच्या प्रेरणेतून झालेली नाही. मात्र रंजन हा सर्व कलांचा आद्य परिणाम निश्चितच आहे. लोकगीताची निर्मिती व्यक्तीची असली, तरी त्या निर्मितीमागची प्रेरणा समूहमनाची असते. त्यामुळे एका अर्थाने ही निर्मिती सामाजिक ठरते. त्यातून सामूहिक जीवनाचा आविष्कार होतो.

लोकगीताची रचना आशयदृष्ट्या साधी, सरळ, एकेरी असून आविष्कारदृष्ट्या लयबद्धता हे लोकगीताचे आकर्षणकेंद्र असते. लोकगीताची आवाहकता स्थलकालातीत असते, ती या लयीमुळेच. शिवाय त्याची आद्य रचना कितीही जुनी असली, तरी लोकाचारात ते गीत नित्य नव्याने आविष्कृत होते. लोकगीते मौखिक परंपरेने चालत आलेली असल्याने त्यांत अनेक उच्चारबदलही होतात. क्वचित काही भाग विस्मृतीत जातो. विविध परंपरांतील गीतांची क्वचित सरमिसळ होते आणि अर्थदृष्ट्या गीत दुर्बोध होत जाते. तरीही स्वर-लयीच्या आकर्षणाने आणि तत्संबद्ध कृतीमुळे ते लोकाचारात टिकून राहते. महाराष्ट्रातील भोंडल्याची किंवा हादग्याची गाणी हे याचे उत्तम उदाहरण होय.

लोकगीतांची रचना बहुधा चारचरणी आणि सुगम असते. त्यांचा आविष्कार (गायन) सामूहिक असतो. निदान ध्रुवपदगायन सामूहिक असते व ते घोळून घोळून म्हणणे हे लोकगीताचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे अनेकदा श्रोत्याला ते कंटाळवाणे वाटते. लोकगीताचे गायन बहुधा एकसुरी व संथ असते.

दैनंदिन श्रमाची कामे, एखादे विधिविधान किंवा क्रिडा अशांसारख्या कृतींबरोबर बहुधा लोकगीत येते. त्यामुळे कृतिसंबद्ध शारीरिक हालचालींशी गीताची लय बांधलेली असते. आविष्कार व शब्दरचना या दोन्ही दृष्टींनी लोकगीत  लवचिक असते. गायकाची कृती व भावावेग यांबरोबर ते आपले रूप थोडेफार बदलते.

लोकगीते ही संस्कृतीच्या आद्यावस्थेतील मंत्रांचे काम अनेकदा करतात. ती गीते ज्या कृतींशी बांधलेली असतात, त्या कृती हे आद्यावस्थेतील यात्वात्मक विधी होते. पाऊस पडावा म्हणून पावसाची नक्कल हे पर्जन्यनृत्याचे आद्यरूपही असते व त्याचबरोबर पावसाला केलेले लयताबद्ध शाब्दिक आवाहनही असते. ते आद्य मंत्र व गीत दोन्ही असते. समूहाचे आवाहन अधिक सामर्थ्यशाली होते. ही जाणीव असल्याने त्या मंत्ररूप ध्रुवपदाचे गायन समूहाचे असते. लोकगीत, संगीत व नृत्य असे परस्परोजीवी असतात.

लोकाचारातील अनेक मंत्रही गीतरूपच असतात. रोगनिवारणासंबंधीचे मंत्र, सर्पविष उतरविण्याचे मंत्र (वाऱ्याची भजने) ही मंत्रसदृश लोकगीतेच आहेत. अनेक विधींत अशी मंत्रसदृश लोकगीतेच आहेत. अनेक विधींत अशी मंत्रसदृश गीते असतात. आदिवासी समाजात लग्न लावणारी स्त्रीपुरोहित ‘धवलेरी’ जी गीते गाते, ती विवाहविधीच्या मंत्राचे काम करतात. धवलेरी जी गीते गाते, त्यांना ‘धवळे’ असे म्हणतात. महानुभाव साहित्यात महदंबेने चक्रधरांच्या विवाहसमयी गायिलेली गीते ‘महदंबेचे धवळे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. काही आदिवासी जमातींत अजूनही स्त्रीपुरोहित (धवलेरी) धवळे गाऊन लग्नीविधी करते.

भारतीय संतांनी लोकप्रचलित गीतसरणींचा उपयोग करून लोकछंदांत रचना केल्या आहेत. हिंदी संतांचे दोहे, चौपाई, छप्पय, पदे ही सर्व लोकगीतसरणींची गीते आहेत. मराठी संतांनी वैपुल्याने वापरलेला ओवी हा छंद लोकछंदच आहे. अभंग हे ओवीचेच रूप आहे. त्याखेरीज गौळण, भारूड, पदे या सर्व लोकगीतसरणींचाच उपयोग संतांनी केलेला दिसतो. पुराणग्रंथांची फलश्रुतीही आख्यान मंत्रसामर्थ्ययुक्त असल्याची धारणाच व्यक्त करते. देवतांची स्तोत्रे व देवतांची लीला-कथा स्तोत्रे ही मंत्रसामर्थ्ययुक्त लोकगीते होत.

लोकगीते लोकबोलीतच उत्स्फूर्तपणे रचली जातात. लोकगीतांचा प्रत्येक पाठ अधिकृत असून त्यांच्या चाली पारंपरिक असतात. लोकगीते कृतिसंबद्ध असल्याने ती प्रयोगरूप असतात. लोकजीवनाची व समूहमनाची अभिव्यक्ती, धर्मविधीचा एक भाग, श्रम हलके करणे अशा अनेक गरजांची पूर्ती लोकगीते करतात. लोकगीतावर कर्त्याची नाममुद्रा नसते, त्यावर समूहाचे स्वामित्व असते. तथापि शाहिरी रचनांमध्ये जरी व्यक्तिनाममुद्रा असली, तरी त्यांच्यावरही समूहाचे स्वामित्व असते. त्या गीतांची रचनासरणी लोकपरंपरेतूनच आलेली असते.अशा गीतांना लौकिकगीते म्हटले जाते. लोककथांमध्ये जसे काही आवर्ती कल्पनाबंध (मोटिफ) व मूलकल्पनाबंध (आर्किटाइप) पुन्हापुन्हा येतात, तसेच ते लोकगीतांतही येतात.

लोकगीत ही खूपच व्यापक संज्ञा असून, देशोदेशींच्या अनेकविध गीतप्रकारांचा त्यात समावेश होतो. लोकगीतांचे वर्गीकरण कथागीते व अन्य लोकगीते अशा दोन गटांत केले जाते. यूरोपीय, विशेषतः इंग्रजी लोकसाहित्यातील बॅलड हा कथाकाव्याचा एक प्रकार आहे. मराठीतील पोवाड्याशी त्याचे साधर्म्य दिसून येते. भारतातील कथाकाव्यपरंपरा अत्यंत समृद्ध आहे. नाताळसारख्या ख्रिस्ती सणोत्सवानिमित्त गायिली जाणारी कॅरोल नामक आनंदगीते, निग्रोखलाशांची सागरी गीते, सागरकिनाऱ्यावरील कोळीगीते, लोकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबद्ध श्रमपरिहारार्थ गायिली जाणारी गीते, लष्करी संचलनगीते, पारंपरिक सणोत्सवानिमित्त गायिली जाणारी गाणी वगैरे अनेक प्रकारांचा समावेश लोकगीतांमध्ये होतो. लोकगीतांचे वर्गीकरण स्वतंत्र स्त्रीगीते, पुरूषांची गीते, स्त्री-पुरूषांची संयुक्त गीते अशा प्रकारेही करता येते. त्यांत सामान्यतः स्त्रीगीतांचे प्रमाण अधिक दिसून येते. शिवाय बालकांची बडबडगीते, शिशुगीते, अंगाईगीते, नृत्य-खेळगीते इ. अनेक प्रकार आढळतात. स्त्री-पुरूषांच्या गीतांमध्येही श्रमगीते, धर्मविधिगीते, नृत्य-उत्सवगीते, खेळगीते, भगतांची उपासनागीते असे ढोबळ मानाने वर्गीकरण करता येईल.

यूरोपीय साहित्यातही लोकगीतांची प्राचीन व प्रदीर्घ परंपरा आहे. देशोदेशींच्या लोकगीतांमध्ये त्या त्या देशांच्या प्रदेशविशिष्ट भौतिक लोकसंस्कृतींचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. उदा., रशियन लोककाव्यात ‘बिलीनी’ ह्या काव्यप्रकाराचा अंतर्भाव होतो. ही रशियन महाकाव्ये म्हणता येतील. त्यांची रचना सामान्यतः निर्यमक छंदात असते. दहाव्या शतकापासून ती रचली जाऊ लागली. लोकविद्येचे (फोकलोअर) आजचे अभ्यासक ह्या महाकाव्यांची विभागणी कीव्हची महाकाव्ये व नॉव्हगोरॉडची महाकाव्ये अशा दोन प्रकारांत करतात. कीव्हच्या महाकाव्यांत काव्यनायकाचे असामान्य शौर्य व त्याची निरपेक्ष सेवावृत्ती ह्यांचे चित्रण असते; तर नॉव्हगोरॉडच्या महाकाव्यांत कौटुंबिक जीवनाची आणि व्यापार-उद्योगातील समाजाची चित्रे आढळतात. लिथ्युएनियन व लॅटव्हियन लोकगीतांचा Dainos हा प्रकार भावगीतात्मक व आत्मपर आहे. Giesmes हा लिथ्युएनियन लोकगीतांचा दुसरा प्रकार प्राचीन आहे. त्याची रचना वॅलडसदृश असते. युक्रेनियन साहित्यातून उगम पावलेले ड्यूमी हे भावमेय महाकाव्य होय. ह्या लोकगीत-प्रकाराचा विकास सोळाव्या शतकात घडून आला. Narodne Pesme म्हणजे लोकांची गीते. ही गीते यूगोस्लाव्हियात प्रचलित आहेत. ऐतिहासिक घटनांवर आधारित पारंपरिक कथाकाव्ये ह्या प्रकारात मोडतात. ‘गुस्लरी’ हा दक्षिणी स्लाव्ह जमातीतील भटक्या गायकांचा वर्ग असून तो ‘गुस्‌ल’ नामक एकतारी फिड्‌लच्या साथीने, Narodne Pesme ही यूगोस्लाव्हियन राष्ट्रीय वीरकाव्ये गात रस्तोरस्ती भटकत असे.

भारतात प्राचीन काळापासून लोकगीतांची परंपरा असून ती समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. प्राचीन काळापासून प्रचलित असलेला गाथा हा लोकगीतांचा एक प्रकार म्हणता येईल. ऋग्वेदात गीत किंवा गेय मंत्र ह्यांना उद्देशून गाथा हा शब्द वापरला आहे. त्यात ‘रैभी’ (कर्मकांडविषयक गीत) व ‘नाराशंसी’ (राजाच्या दानस्तुतिपर गीत) असे दोन पद्मप्रकार गाथेशी संबंधित आहेत.ऐतरेय ब्राह्मणात यज्ञात दान करणाऱ्या राजांच्या प्रशंसापर अनेक गाथा आहेत. जैन व बौद्ध साहित्यातही गाथा हा प्रकार आहे. धम्मपद व थेरीगाथा यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल.

लोकगाथा हा मौखिक परंपरेने चालत आलेला प्रदीर्घ कथनपर गीतकाव्याचा प्रकार होय. त्यात एखादी पारंपरिक लोकप्रिय कथा गीतांमध्ये गुंफलेली असते. गेयता हा त्याचा अनिवार्य घटक असतो. स्त्रीरचित आख्यानकाव्येही मराठीत भरपूर आहेत.प्राचीन भारतीय लोकगाथांमध्ये गीतांच्या साथीने नृत्येही केली जात. अजूनही ग्रामीण भागात क्वचित कथागीत-नृत्ये आढळतात. इंग्रजीतील वॅलड वा मराठीतील पोवाडा ह्या वीरगाथा−लोकगाथाच म्हणता येतील, गुजरातीमध्ये ‘कथागीत’ व राजस्थानीमध्ये ‘गीतकथा’ हे असे प्रकार आहेत. स्थूलमानाने प्रेमकथात्मक गाथा, वीरगाथा, रोमांचकारी गाथा असे त्यांचे विषयानुसारी प्रकार मानले जातात. प्रणयपर लोकगाथांमध्ये  राजस्थानी घोला−मारू, पंजाबी हीर−रांझा, सोहनी−महिवाल इ. लोकप्रिय आहेत. वीरगाथा ह्या एखाद्या प्रसिद्ध वीरपुरूषास नायक कल्पून त्याच्या चरित्राभोवती गुंफलेल्या असतात व त्यांत त्याच्या शौर्यसाहसाची प्रशंसा असते. भोजपुरीमध्ये लोरकी, विजयमल, नथकवा, बनजारा, राज भरथरी (भर्तृ हरी), राजा गोपीचंद व आल्हा ह्या लोकगाथा प्रचलित आहेत. ह्यांपैकी आल्हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. तद्वतच शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वीरनायक बाबू कुँवरसिंहवर रचलेल्या भोजपुरी लोकगाथाही प्रसिद्ध आहेत. रोमांचकारी लोकगाथा बव्हंशी नायिकाप्रधान असतात. त्यांत नायिकेच्या जीवनातील रोमहर्षक घटनांचे चित्रण असते. राजस्थानी ‘सोरठी’ नामक प्रेमगाथा प्रसिद्ध आहेत. ‘बिहुला’ नामक भोजपुरी लोकगाथेत स्त्रीच्या पातिव्रत्याचे प्रभावी चित्रण आढळते.

भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील प्रदेशविशिष्ट संस्कृतीचे व लोकाचारांचे दर्शन घडवणारी लोकगीते विपुल आहेत व त्यांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार दिसून येतात. व्यक्तिजीवनाशी संबद्ध अशी संस्कारगीते, ऋतुगीते, श्रमगीते, नृत्यसंबद्ध गीते, विविध सण-उत्सवप्रसंगी गायिली जाणारी गाणी, जाति-व्यवसायसंबद्ध गीते अशी अनेकविध प्रकारची लोकगीते सर्वत्र विपुलतेने आढळतात.

व्यक्तिजीवनातील जन्म, विवाह, मृत्यू अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर व प्रसंगांवर आधारित असंख्य संस्कारगीते भारतात विविध प्रदेशांत रूढ आहेत. स्त्रियांच्या गर्भधारणेची व डोहाळ्याची गाणी, बालकांच्या जन्मासंबंधीची गीते, बाळाला जोजविण्याची गीते, अंगाईगीते, मुंडन, उपनयनयादी संस्कारांची गीते, विवाहसोहळ्याच्या प्रत्येक विधीसंबंधीची गीते, व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीप्रसंगी गायिली जाणारी गीते असे विविध प्रकार त्यात आढळतात. स्त्रीच्या गर्भावस्थेच्या पाचव्या व सातव्या महिन्यांमध्ये ते साजरे करण्यासाठी भारतभरच्या वेगवेगळ्या जमातींतल्या स्त्रिया गाणी गातात, त्यांत गर्भवती स्त्रीला सीतामाई कल्पून तिची स्तुती केली जाते,तसेचकौटुंबिकगृहजीवनातील भावभावनांचे हृद्य चित्रण आढळते. बिहारमधील छोटा नागपूरपासून ते पश्चिम भारतातील भिल्ल जमातीच्या स्त्रियांपर्यंत ही गीते सर्वत्र प्रचलित आहेत. अशा आदिवासी लोकगीतांचे संकलन व्हेरिअर एल्वितसारख्या तज्ञ संशोधकांनी केले आहे. जन्मगीतांची दोन गटांत विभागणी केली जाते: (१) सोहर व (२) ‘खेलवाणा’ नामक भोजपुरी गीते. कुटुंबामध्ये बालकाचा जन्म झाला, की जी गीते गायिली जातात, अशा गीतांना हिंदी भाषिक प्रदेशात ‘सोहर’ म्हटले जाते. त्यांना मंगलगीते असेही म्हणतात. राजस्थानीमध्ये सोहरगीतांना ‘हालरा’अशी संज्ञा आहे. खेलवाणा गीतांमध्ये कुटुंबातील नवजात अर्भकाच्या आगमनाचा आनंद वर्णिलेला असतो. बंगाली साहित्यातही अशा प्रकारची अपत्यजन्मासंबंधीची अनेक लोकगीते रूढ आहेत. काश्मीरची अंगाईगीतेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांत काश्मीरी स्त्रियांच्या आवडत्या कर्णकुंडलांची उपमा बालकाला कित्येकदा दिलेली आढळते. मुलाच्या मुंडन, जनेऊ (मुंज) अशा विधींप्रसंगी गायिली जाणारी संस्कारगीते राजस्थानी, भोजपुरी आदी हिंदीभाषिक प्रदेशांत रूढ आहेत. उत्तर भारतातील ब्राह्मणवर्गातही अशी मुंजविधीची गीते आहेत.

विवाहप्रसंगी गायिली जाणारी लोकगीते भारतात सर्वत्र प्रचलित आहेत. आदिवासी जमातींत अशा गीतांबरोबर समूहनृत्येही केली जातात. लग्नागीतांत वरपक्षांची व वधुपक्षाची अशी वेगवेगळी गीते आहेत. त्यांत वधुविषयक गीतांचे प्रमाण विपुल आहे. कन्येची सासरी पाठवणी करताना गायिली जाणारी वियोगाची गाणी अधिक उत्कट भावपूर्ण असतात. भोजपुरीमध्ये अशी ‘गौना’ गीते रूढ आहेत. काश्मीरमध्ये सामुदायिक रीत्या गायिली जाणारी विवाहाची गाणी विपुल आहेत. ही लग्नगीते हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांतही प्रचलित आहेत. पंजाबमध्येही विवाहाच्या वेगवेगळ्या विधींच्या प्रसंगी गायिली जाणारी लोकगीते बहुविध आहेत. ह्या मांगलिक गीतांत ‘सुहाग’ (वधुगृही गायिली जाणारी गीते) व ‘घोडियाँ’ (वरगृही गायिली जाणारी गीते) ह्यांचा समावेश होतो. लग्नानंतर वरात निघताना जी गीते गायिली जातात, त्यांना ‘वधावा’ म्हणतात. ती अत्यंत करूणरम्य असतात. गुजराती लग्नेगीतांत वधु-वर हे राम-सीता वा कृष्ण-रूक्मिणी कल्पून अनेक गीते रचली गेली आहेत. गुजराती लोकगीतांत विरहभावाला प्राधान्य दिसते. या संदर्भात काही काठियावाडी सोरठे उल्लेखनीय आहेत. ओरिसाच्या छोटा नागपूरमधील आदिवासी जमातींत वधूने स्वतः गावयाच्या गीतांचे प्रमाण विपुल आहे. नवऱ्या मुलीने आपल्या माहेरच्या नात्यातील व्यक्तींची−आईवडील, बहीणभावंडांची -ताटातूट होताना गायिलेली ही गाणी आर्त वियोगभाव व्यक्त करणारी, भावनोत्कट गीते असतात. काश्मीरी स्त्रियांमध्ये युद्धावर गेलेल्या पतीच्या विरहाचे दुःख वर्णन करणारी गीते रूढ आहेत. गुजराती लोकगीतांचा स्त्री हा मुख्य केंद्रबिंदू आहे. स्त्रीचे गृहजीवन, प्रेम, वात्सल्य, विरह इ. भावभावनांचे चित्रण करणारी अनेक गीते आढळतात. सासू−सून, नणंद−भावजय या संबंधांवर आधारित अनेक स्त्रीगीते आहेत. तेलुगू स्त्रीगीतांत मातृत्वाचा गौरव करणारी अनेक गीते आहेत. राजस्थानी लोकगीतांत दांपत्यजीवनातील सुखानुभूतींचे चित्रण आढळते. तसेच विरहाची गीतेही आहेत, ह्या विरहगीतांना ‘झोरावा’ म्हणतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीप्रसंगी गायिली जाणारी शोकगीतेही अनेक आदिवासी जमातींत रूढ आहेत. ऋतुगीतांमध्ये होलिकोत्सवाची व वर्षाऋतूची अनेक गीते वेगवेगळ्या प्रदेशांत रूढ आहेत. अवधी, ब्रज, राजस्थानी, बुंदेलखंडी, छत्तीसगढी, भोजपुरी इ. अनेक बोलीभाषांमध्ये होळीगीते विपुल व वैविध्यपूर्ण आहेत. वर्षाऋतुसंबंधीच्या गाण्यांतही अशीच विविधता दिसते. अवधी व भोजपुरी भाषांत त्यांचे प्रमाण अधिक दिसते.

उत्तर भारतात श्रावण महिन्यात जी वर्षागीते गातात, त्यांना ‘कजरी’ (वा कजली) असे म्हणतात. मिर्झापूरला कजरी गाण्यांचे मोठे फड रंगतात, त्यांत पुरूषांबरोबरच स्त्रियाही भाग घेतात. कित्येकदा दोन फडांमध्ये सवाल−जबाबही रंगतात. ह्या गीतांमध्ये शृंगाररसाला प्राधान्य असते. कजरी व होरी गीतांप्रमाणेच चैताँ, बारहमासा ही गीतेही सर्वत्र रूढ आहेत. चैताँ गीते प्रायः  शृंगारप्रधान असतात, तर बारहमासा गीते विरहभाव आळवणारी असतात. वर्षाच्या बारा महिन्यांमध्ये बदलणाऱ्या निसर्गाच्या अवस्थांच्या पार्श्वभूमीवर विरहिणीच्या परोपरीच्या दुः खाचे वर्णन बारहमासा गीतांमध्ये केलेले असते. अशी गीते आदिवासी जमातींतही रूढ आहेत. राजस्थानात चैत्रातील गणगौर, श्रावणातील तीज ह्या स्त्रियांच्या सण−उत्सवप्रसंगीची अनेक गीते आहेत. सावण जाडो, चो मासो इ. ऋतुगीतेही आहेत. पंजाबमध्ये प्रत्येक ऋतूशी संबद्ध अशी वेगवेगळी ऋतुगीते आहेत. तीयाँ, रख्खडी, रामधुन, संक्रांती, लोहडी, होहली, दीगा, साँझी, इक्करी इ. ऋतुविषयक गीते आहेत. पंजाबात श्रावण महिन्यात तीयाँ हा मोठा सण साजरा करतात. त्यावेळी जत्रेत स्त्रिया मुक्तपणे गातात, नाचतात. गुजरातच्या ऋतुगीतांत वैशिष्ट्यपूर्ण वर्षागीते आहेत. धार्मिक गीतांमध्ये निरनराळ्या प्रदेशांतील लोकदैवतांच्या उपासनापर गीतांचा समावेश होतो. बंगालमधील तूसू, भडू, गंभीरा ही काही उदाहरणे होत. बंगाली बाउल गीते हाही धार्मिक लोकगीतांचा प्रकार म्हणता येईल. बाउल संप्रदायी साधक खेडोपाडी रस्तोरस्ती फिरून ती गातात. बाउल गीते वैदिक ऋचांसारखी मौखिक परंपरेने चालत आली आहेत. उत्तर बंगालमध्ये या गीतांना ‘शब्दगान’ ही संज्ञा आहे. स्त्रियांच्या निरनिराळ्या व्रतगीतांचाही धार्मिक लोकगीतांमध्ये समावेश होतो. भाद्रपदातले बहुला व्रत, कार्तिकातले षष्ठीमातेचे व्रत, शीतला व्रत, नागपंचमी व्रत, पिडीया व्रत, सूर्यषष्ठी व्रत इ. प्रसंगी गायिली जाणारी स्त्रीगीते भोजपुरीमध्ये आहेत. मैथिली लोकसाहित्यात मधुसावनी फाग (होळी), छठ (षष्ठीपूजा) इ. उत्सवप्रसंगी विशिष्ट प्रसंगोचित गीते गाऊन लोक आनंदाचा जल्लोष करतात. छठगीते प्राधान्याने सूर्यस्तुतिपर असतात. काही लोकगीते ही लोकनृत्यांच्या साथीने गायिली जातात. गुजरातमध्ये नवरात्रात घटस्थापनेनंतर गरबा नृत्यगीते गायिली जातात, ती राधाकृष्णाच्या वर्णनपर असतात. कर्नाटकमधील यक्षगान ह्या पारंपरिक नृत्यनाट्यप्रकारात अनेक लोकगीतांचा वापर केला जातो. पंजाबमध्ये भांगडा नृत्याच्या साथीला काही लोकगीते गायिली जातात. राजस्थानमध्ये घुमर, डंडिया, रास इ. नृत्यांसह गायिली जाणारी गीते विपुल आहेत.

शेतकरी, विणकर, कोळी, नावाडी अशा विविध व्यवसायांशी निगडित कार्यसंबद्ध लोकगीते असतात. ती श्रमपरिहारार्थ गायिली जातात. कष्टकरी स्त्रियांची दैनंदिन कामकाजाशी संबद्ध गीतेही असतात. अशी लयतालबद्ध रंजक श्रमगीते देशाच्या विविध भागांत प्रचलित आहेत. राजस्थानात स्त्रिया सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरताना सामुदायिक ‘पणिहारी’ गीते गातात. ती खूप लोकप्रिय आहेत. भोजपुरीमध्ये स्त्रिया धान्य दळताना जी गीते गातात, त्यांना ‘जँतसार’ गीते म्हणतात. महाराष्ट्रात जात्यावरच्या ओव्या प्रसिद्ध आहेत. कृषिकर्मांपैकी लावणीच्या गीतांना ‘रोपनी’ गीत व निंदणीखुरपणीच्या गीतांना ‘सोहाई’ गीत म्हणतात. काश्मीरमधील ग्रामीण स्त्रिया पाणी भरताना वा कृषिकर्मे करताना सामुदायिक रीत्या विरहिणींची आर्त गीते गातात. जात्यावरच्या ओव्या, भलरी गीते, जानपद गीते वगैरेंचा समावेश श्रमगीतांमध्ये होतो. काही जाति-व्यवसायविशिष्ट अशी लोकगीतेही भारतातल्या निरनिराळ्या जातिजमातींमध्ये रूढ आहेत. उदा., अहीर (गवळी), दोसाध (डुकरे पाळणारी जमात), चर्मकार, कहार (भोई, पाणक्या), गोंड, धोबी, कातकरी, धनगर इ. जमातींची जातिविशिष्ट गीते आहेत. अहीर लोक मुख्यत्वे बिरहागीते गातात. दोसाध लोक ‘पचरा’ गीते गातात. चर्मकार ‘डफरा’ व ‘पिपीहरी’ गीते गातात.

भारतातील प्रत्येक राज्याच्या लोकगीतांची खास प्रदेशविशिष्ट प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन घडविणारी काही वैशिष्ट्ये आढळून येतात. बंगाली लोकगीतांचे दोन गटांत वर्गीकरण केले जाते: (१) सारी-हे समूहगीत असून जास्त लयतालबद्ध असते. (२) भटियाली-हे एकाकीपणाचे गीत असून त्यात तालबद्धता कमी प्रमाणात असते. बंगालची धार्मिक आशयाची लोकगीतेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. राजस्थानच्या विभिन्न बोलींपैकी मारवाडी बोलीमध्ये सर्वाधिक लोकसाहित्य आहे. राजस्थानी धोला-मारू हे सर्वांत प्रसिद्ध व प्राचीन लोकगीत असून त्यात घोला हा राजपुत्र व मारू ही राजकन्या यांच्या प्रेमाचे गंभीर आख्यान वर्णिलेले असते. पुढे अनेक लोककवींनी मूळ गीतात बरीच भर घातली. ‘बीसलदेव रासो’ हे सु. ३५० पद्यांचे प्रदीर्घ लोकगीत असून ते १७ व्या शतकात लिखित रूपात ग्रंथबद्ध झाले. कृष्ण-रूक्मिणी यांच्या विवाहकथेवर आधारित ‘रूक्मिणीमंगल’ हेही असेच लोकप्रिय कथाकाव्य आहे. ‘नरसी जी माहेरो’ हेही असेच प्रसिद्ध परंपरागत लोकगीत आहे. ही काव्ये गाऊन लोकरंजन करणे हा काही जातींचा व्यवसाय आहे. पँवाडानामक वीरगाथांमध्ये पाबूजीचे पँवाडे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. काश्मीरी लोकगीतांनी पूर्वापार चालीरीती ,पुराणकथा, दंतकथा यांचे जतन केले आहे. काश्मीरमध्ये भटक्या शाहीरांचा एक वर्ग असून ते खेडोपाडी हिंडून लावण्या, गीते, पोवाडे गातात. काश्मीरी लोकगीतांची परंपरा जिवंत ठेवून, त्यांचा दूरवर प्रसार करण्याचे श्रेय या शाहीरांना आहे. अनेक काश्मीरी लोकगीतांमध्ये संथ वाहणारी झेलम नदी, चिनार वृक्ष, केशर फूल अशा खास प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे वर्णन आढळते. हिमाल-नागराय, युसूफ-जुलेखा, लैला-मजनू, हातीम-ताई अशा प्रेमिकांच्या मुग्ध प्रणयभावनांची रोचक वर्णने अनेक दीर्घ कथाकाव्यांतून आढळतात. ही कथाकाव्ये पोवाड्यांसारखी असून ती शाहीर सारंगी वा रबाब यांच्या साथीवर गातात. पंजाबी लोकगीतांमध्येही पोवाडा हा खास वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. तो वीरवर्णनात्मक असून त्याला ‘वार’ म्हणतात. ही वीरगीते भाट-चारणांनी रचून गायिली आहेत. वीररसाला चेतावणी देणारी ‘नादीरशाह की वार’ ही पिढ्यान्‌पिढ्या लोकगायकांकडून गायिली जात असे. सामाजिक आशयाची निंदा-उपहास यांनी युक्त अशी लोकगीते पंजाबमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांना ‘बोली’ म्हणतात. ही विशिष्ट गायकवृंदाकडून वाद्यांच्या साथीने गायिली जातात. मैथिली लोकसाहित्यात शुभकार्यप्रसंगी गायिला जाणारा ‘नचारी’ नामक लोकगीतप्रकार रूढ आहे. शिवशक्ती माहात्म्यासंबंधीची अनेक लोकगीते आहेत. धार्मिक उत्सवाच्या प्रारंभी ‘गोसाऊनी’ नामक शक्तिविषयक गीत गायिले जाते. महाराष्ट्रीय तमासगिरांच्या परंपरेत कलगी (शक्तिविषयक) व तुरा (शिवविषयक) गीते आहेत. गुजराती लोकगीतांमध्येही गाथा, पोवाडे, नृत्यगीते इ. प्रकार आढळतात. गुजरातमधील पठार जमातीत अनेक प्रकारची लोकगीते आहेत. तेथील रोड नावाच्या नदीचे वर्णन माता म्हणून केले जाते. चुंदडी (चुनडी) अनेक लोकगीतांतून येते. ‘अबवाणी’(आयत्या वेळची गाणी) हा गुजराती श्रमगीतांचा प्रकार असून, त्यांतली बरीच गीते कोळी-नावाड्यांनी रचली आहेत.

तेलुगू लोकगीतांची परंपरा फार प्राचीन आहे. तेलुगू भाषेत लोकगीतांना ‘पल्लेपाटलू’ किंवा ‘जानपद गीतमुलू’ म्हणतात. तुम्मेदपदभुलू (भ्रमरगीत), गोब्बिपदमुलू, यक्षगानमुलू, मेलुकोलु-मुलू, सद्दुल अशांसारखी लिपिपूर्वकाळातील लोकगीते तेलुगू भाषेत निर्माण झाली आहेत. प्राचीन गीते गेय अशा मात्रिक छंदात आढळतात व ती खंडकाव्यासाऱखी प्रदीर्घ असतात. त्यांत धर्मांगदचरित, बालनागम्मा कथा, बोब्बिली-राजू कथा (वीरगाथा) वगैरे प्रसिद्ध आहेत. रामायण कथेतील उर्मिलेची निद्रा ह्या विषयावर प्रदीर्घ स्त्रीगीत असून, ते अनेक स्त्रिया सामुदायिक रीत्या गातात. तेलुगू लोकगीतांवर शैव संप्रदायाचा पगडा आहे. शिवाशी संबंधित अनेक लोकगीते आढळतात. ‘बुर्रकथा’ हा तेलुगू लोकगीतांचा आणखी एक प्रकार. जंगम जातीचे लोक ही गीते गाऊन लोकांचे मनोरंजन करतात. ही गीते गाणारा तीन लोकांचा संच असतो: एक गायक, दुसरा तंबोरावादक व तिसरा ढोलक्या. कांभोजराज, हरनाथ, बसवदेव, रूद्रमदेवी इ. आख्याने त्यात असतात. हरिकथा हा बुर्रकथेचा आणखी एक पर्याय होय. ह्या प्रकारची लोकगीतेही विपुल आहेत.

मराठी लोकसाहित्यातही लोकगीतांची प्रदीर्घ व प्राचीन परंपरा आहे. स्त्रीगीते, जात्यावरच्या ओव्या, अंगाईगीते, डोहाळेगीते, सणउत्सवांची गाणी, खेळगाणी, नृत्यगीते ,श्रमपरिहारार्थ गायिली जाणारी भलरी गीते अशा अनेक शाखांनी ही लोकगीत-परंपरा बहरली, समृद्ध झाली आहे.

लेखक: तारा भवाळकर; श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate