অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वक्रोक्ती

वक्रोक्ती

संस्कृत साहित्यशास्त्रातील एक काव्यसिद्धांत. दैनंदिन व्यवहारात लोक भाषेचा वापर करीत असतात. ही लौकिक भाषा सुगम, साधी, सरळ आणि अनलंकृत असते. ह्याउलट काव्यातील भाषा लोकविलक्षण, चमत्कृतिजनक, वैचित्र्यपूर्ण आणि शब्दालंकार व अर्थालंकार यांनी नटलेली असते. नेहमीच्या वापरातील लौकिक भाषाच कवीच्या दिव्य प्रतिभेने उजळून निघते आणि अलौकिक स्वरूप धारण करते. ह्या अलौकिक भाषेचा वक्रोक्ती अथवा अतिशयोक्ती हा अलोकसामान्य, असाधारण आणि प्राणप्रद असा धर्म होय. संस्कृत अलंकारशास्त्रत सर्वप्रथम भानहाने आपल्या काव्यालंकार या ग्रंथात वक्रोक्तीचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. त्याच्या मते काव्याचे सर्व प्रकार वक्रस्वरूप उक्तीने युक्त असणे इष्ट आहे. भामह अतिशयोक्ती अलंकाराचे स्वरूप प्रतिपादन करताना अतिशयोक्ती आणि वक्रोक्ती एकच असे म्हणतो. ‘कोणत्या तरी निमित्ताने (कारणामुळे) लौकिक अनुभवाच्या पलीकडे गोष्टीविषयीचे केलेले विधान म्हणजे अतिशयोक्ती’. असे प्रतिपादन करून त्याने ह्या अलंकाराचे उदाहरण पुढीलप्रमाणे दिले आहे :

"अपां यदि त्वक्छिथिला च्युता स्यात्फणिनामिव |

तदा शुक्लांशुकानि स्युरड्गेष्वम्भम्मसि योषिताम् ||"

(काव्यालंकार २.८३)

अर्थ: ‘जर सापांच्याप्रमाणे पाण्याची कात ढिली होऊन पडली, तर (जलक्रीडा करणाऱ्या) रमणींच्या देहावर शुभ्र वस्त्रे असल्यासारखे होईल’. ह्या वर्णनात 'सापांच्याप्रमाणे पाणी जर कात टाकेल, तर त्या कातीमुळे जलविहार करणाऱ्या स्त्रियांचे देह शुभ्र वस्त्राने झाकल्यासारखे दिसतील’ ही उक्ती अतिशय (अलौकिक, लोकोत्तर) स्वरूपाची आहे. कारण ‘पाणी कात टाकू शकेल’ ही गोष्ट अनुभवाच्या पलीकडील आहे. लौकिक व्यवहारात असे (कल्पनाप्रधान) विधान कोणी करत नाही. भामह म्हणतो, की सर्व प्रकारच्या अतिशयोक्ती ह्या या ना त्या गुणाच्या अतिशयावर आधारित असतात. पूर्वीच्या आलंकारिकांनी स्वीकारलेले हेतू, सूक्ष्म व लेश हे तीन अलंकार त्यांच्यात वक्रोक्तीचा अभाव असल्याने भामहाच्या मते अलंकार या संज्ञेस पात्र नाहीत. भामहाने वक्रोक्तीचे लक्षण कोठेही सांगितले नाही. पण वक्रोक्तीशिवाय अलंकार नाही, वक्रोक्तीशिवाय काव्य नाही, असा त्याचा ग्रंथाचा एकंदर अभिप्राय आहे. अतिशयोक्ती आणि वक्तोक्ती एकच असेही तो ठासून सागंतो. अलंकारांना अलंकारत्व देणारा शब्दार्थधर्म म्हणजे वक्रोक्ती अथवा अतिशयोक्ती, असा भामहाचा अभिप्राय आहे. ‘अतिशय’ आणि ‘वक्र’ हे दोन्ही शब्द त्याच्या दृष्टीने समानार्थक असून ते लोकोत्तरता, अलौकिकता, लोकविलक्षणता या अर्थाचे द्योतक आहेत. काव्यसौंदर्याची निर्मिती ह्या ‘अतिशय’ अथवा ‘वक्र’ स्वरूपाच्या उक्तीवरच अवलंबून आहे, असे भामहाचे ठाम मत होते.दंडी आपल्या काव्यादर्श या ग्रंथात म्हणतो : स्वभावोक्ती आणि वक्रोक्ती असे वाङ्मयाचे दोन प्रकार असून श्लेष हा प्रायः सर्व प्रकारच्या वक्रोक्तींची शोभा (सौंदर्य) वृद्धिंगत करतो. या ठिकाणी वक्रोक्ती म्हणजे सर्व प्रकारचे अलंकार हाच अर्थ दंडीला अभिप्रेत आहे, हे अगदी उघड आहे. भामहाप्रमाणेच दंडीनेही वक्रोक्तीचे लक्षण कोठेही दिलेले नाही. परंतु भामहाप्रमाणेच अतिशयोक्ती आणि वक्रोक्ती ही एरच असे दंडीचेही मत होते.

आपल्या काव्यालंकारसूत्र या ग्रंथात वामनाने वक्रोक्ती आणि अतिशयोक्ती हे दोन स्वतंत्र, वेगळे असे अलंकार मानून, त्यांची लक्षणे व उदाहरणे देऊन निरूपण केले आहे. अतिशयोक्तीची व्याख्या त्याने वेगळ्या शब्दांत केली असली, तरी तिचे स्वरूप भामह व दंडी यांच्या अतिशयोक्तीच्या स्वरूपासारखेच आहे. परंतु ‘सादृश्यावर आधारलेली गौणी लक्षणा म्हणजे वक्रोक्ती’ अशी वक्रोक्तीची व्याख्या (लक्षण) करून त्याने वक्रोक्ती ही संज्ञा फक्त एका अलंकारापुरतीच सीमित केली आहे.

रुद्रटाने वक्रोक्तीचा शब्दालंकारांत समावेश करून श्लेष–वक्रोक्ती आणि काकु–वक्रोक्ती असे त्याचे दोन प्रकार वर्णिले आहेत. मम्मट, रुय्यक आदींनी रुद्रटाचे अनुकरण केले आहे. राजशेखर, हेमचंद्रयांसारखे आलंकारिक काकु-वक्रोक्तीचे अलंकारत्व स्पष्टपणे नाकारतात आणि त्याचे कारण ‘काकु हा पाठधर्म आहे’ असे देतात.

वक्रोक्ती आणि नाट्यधर्मी यांमधील परस्परनात्यासंबंधी अभिनवगुप्तानेध्वन्यालोक (कारिका २.४) वरील आपल्या लोचनटीकेत विवेचन केले आहे. रसाचे स्वरूप आणि रसप्रतीती यांविषयी इतरांची मते सांगून झाल्यावर स्वतःच्या मताचे तो विवरण करतो. या विवरणाच्या सुरूवातीलाच तो म्हणतो: ‘काव्यामध्ये स्वभावोक्ती आणि वक्रोक्ती हे जे दोन वर्णनाचे प्रकार असतात, ते नाट्यातील अनुक्रमे लोकधर्मी व नाट्यधर्मी या दोहोंसारखे असतात. ह्या दोन प्रकारांमुळे आणि प्रसन्न, मधुर आणि ओजस्वी शब्दांनी अलौकिक विभावादिक वाचकांपुढे मांडले जात असल्यामुळे काव्यातही रसप्रतीतीचा प्रकार असाच (अर्थात नाट्यातल्या प्रकारासारखाच) असतो. किंवा काव्यतून होणाऱ्या रसप्रतीतीचे स्वरूप नाट्यातून होणाऱ्या रसप्रतीतीच्या स्वरूपाहून निराळे आहे असे मानले, तरी चालण्यासारखे आहे. कारण काव्यातून अवलंबिली जाणारी रसप्रतीती घडवण्याची साधने नाट्यातील साधनांपेक्षा वेगळी असतात. कारण नाट्य हे मुख्यत्वेकरूनही दृश्य अभिनवावर आधारलेले असते, तर काव्याचा सर्व भार श्राव्य वर्णनावर असतो’.

या परिच्छेदात अभिनवगुप्त स्वभावोक्ती व वक्रोक्ती यांचे नाते नाट्यातील लेकधर्मी व नाट्यधर्मी यांच्याही जोडतो. स्वाभावोक्तीमध्ये वस्तूचे यथातथ्य स्वरूपवर्णन असते, तर वक्रोक्तीमध्ये वस्तूचे सालंकारवर्णन असते. नाट्यातील जो भाग लोकानुकरणात्मक असतो, त्याला भारताने ‘लोकधर्मी’ अशी संज्ञा दिली आहे. नाट्य हे‘लोकवृत्तानुकरण’असल्यामुळे त्यात लोकव्यवहाराचेच चित्रण येते. साहजिकच त्यात निरनिराळ्या स्त्री-पुरूषांच्या वास्तव जीवनातील तपशिलांचे-त्यांचे बोलणेचालणे, वेशभुषा, आचारविचार इत्यादींचे प्रतिबिंब हमखास आढळते. याशिवाय नाटकात लौकिक जीवनात अथवा वास्तव व्यवहारात न आढळणारा असा दुसरा भाग असतो. तो फक्त नाट्यातच आढळतो, म्हणून त्याला भरताने ‘नाट्यधर्मी’ अशी संज्ञा दिली आहे. या दुसऱ्या भागात नाट्यातील कृत्रिम संकेत आणि त्यांवर आधारलेले नटनटींचे व्यवहार येतात. उदा., स्वगत भाषणे, जानान्तिक, आकाशभाषित, अपवारितक; चार प्रकारचा अभिनय (आंगिक, वाचिक, सात्विक आणि आहार्य); खोटी पण खरी भासणारी शस्त्रे (खड्ग-गदादी); ध्रुवा, पार्श्वसंगीत इत्यादी. लोकधर्मी हा प्रकार स्वभावेक्तीच्या रूपात, तर नाट्यधर्मी हा प्रकार (कविसंकेत, लक्षणा व अतिशयोक्ती वगैरे अलंकार) वक्रोक्तीच्या स्वरूपात आढळतो.

कुंतकाने आपल्या वक्रोक्तिजीवित या ग्रंथाच्या पहिल्या उन्मेषात (कारिका १.१० व त्यावरील वृत्ति) वक्रोक्तीचे लक्षण (व्याख्या) देऊन संक्षिप्त विवरण केले आहे. वक्रोक्ती म्हणजे लोकव्यवहारातील उक्तीहून भिन्न, चमत्कृतियुक्त आणि सौंदर्यपूर्ण असे वचन. वक्रोक्ती म्हणजे ‘वैदग्घ्य-मङगी-भणिती’ हिचा स्फुटार्थ हा ‘वैदग्घ्य’ म्हणजे विदग्धभाव, अर्थात काव्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे कवीचे कौशल्य. कवीच्या विदग्धतेतून स्फुरलेली ‘भङगी’ म्हणजे ‘विच्छित्ति’ म्हणजे विचित्रता (चमत्कारकारी शोभा, चारूता), तिच्या योगाने आविष्कृत झालेली विशिष्ट ‘भणिती’ अथवा उक्ती म्हणजे वक्रोक्ती. कविप्रतिभेमुळेच जी चमत्कृतिपूर्ण, नित्यनूतन, रमणीय, अलौकिक अशी उक्ती निर्माण होते, ती वक्रोक्ती होय. ह्या वक्रोक्तीमुळे काव्याला काव्यत्व प्राप्त होते. कुंतकाने वक्रोक्तीची संकल्पना भामहापासून घेऊन आपल्या प्रतिभेच्या, पांडित्याच्या व विश्लेषणशक्तीच्या बळावर तिचा खूप विस्तार केला आहे. वक्रोक्ती हेच काव्याचे जीवित होय, असा सिद्धांत मांडून, वक्रोक्तीचे अनेक प्रकार कल्पिले आहेत.वक्रतेच्या म्हणजे उक्तीच्या वैचित्र्याच्या सहा मुख्य भेदांचे आणि त्यांच्या अनेक उपभेदांचे विचरण त्याने विस्ताराने केले आहे. हे सहा मुख्य प्रकार असे: (१) वर्णविन्यासवक्रता: या प्रकारात प्राचीन आलंकारिकांनी सांगितलेले अनुप्रास, यमक इ. शब्दालंकार येतात. (२) पदपूर्वार्धवक्रता: यात प्रातिपदिकाचा म्हणजे मूळ शब्दाचा चमत्कृतिजनक वापर केलेला असतो. उदा., कालिदासाच्या रघुवंशातील–‘न खल्वनिर्जित्य रघुं कृती भवान्’ (३.५१). अर्थ-रघूला जिंकल्याशिवाय तुमची कार्यसिद्धी होणार नाही. ह्या उद्गारात केलेला ‘रघु ’ शब्दाचा अर्थपूर्ण उपयोग. प्रस्तुत उदाहरणात वापरलेला रघु हा शब्द रघूच्या ठिकाणी असलेल्या अपूर्व पौरूषाचा द्योतक आहे. ह्या प्रकारचे रूढिवैचित्र्यवक्रता, पर्यायवक्रता (म्हणजे अनेक पर्यायी शब्द उपलब्ध असता एका विशिष्ट शब्दाचीच निवड करून त्यायोगे चमत्कृती साधणे), उपचारवक्रता (गौणी लक्षणेवर आधारित), विशेषणवक्रता इ. अनेक भेद निर्दिष्ट करून त्यांची उदाहरणे दिली आहेत. (३) प्रत्ययवक्रता: नाम व धातू यांना लागणाऱ्या प्रत्ययांच्या वैशिष्ट्यामुळे निर्माण होणारी चमत्कृती. याचे संख्यावक्रता (उदा., ‘मैथिली तस्य दाराः ’ यातील पत्नी या अर्थाच्या ‘द्वारा’ शब्दाचे बहुवचन), पुरूषवक्रता (उदा., ‘मी’या अर्थी वापरलेल्या ‘अयं जनः’ यातील प्रथमपुरूषाऐवजी तृतीय पुरूषाचा उपयोग), कारकवक्रता (एका विभक्तीऐवजी दुसऱ्या विभक्तीची योजना) इ. भेद आहेत. (४) वाक्यवक्रता: ही हजारो प्रकारची असून तिच्यात सर्व अलंकारांचा अंतर्भाव होतो. या वाक्यवक्रतेत रस, भाव यांची अभिव्यक्ती समाविष्ट आहे. कुंतकाच्या मते रसवत्, प्रेयस्, ऊर्जस्वी इ. हे अलंकार नव्हेत, तर ते अलंकार्य आहेत. (५) प्रकरणवक्रता : प्रकरण म्हणजे नाटक, महाकाव्य यांसारख्या प्रबंधातील अंश वा प्रसंग. त्याची चमत्कृतिपूर्ण योजना म्हणजे वक्रता. मूळ रामायणात मायावी कांचनमृगाच्या मागे गेलेल्या रामाचे करूण आक्रंदन ऐकून त्याच्या रक्षणार्थ सीता लक्ष्मणाला पाठवते, असा प्रसंग आहे. पण हा प्रसंग अनुचित आहे. अनुचर लक्ष्मण जवळ असता प्रधान पात्र राम असा वागेल, हे असंभवनीय आहे. शिवाय रामासारख्या महावीराच्या प्राणरक्षणासाठी त्याच्या धाकट्या भावाला धाडण्याची कल्पना अयोग्य आहे. यास्तव मायुराजाच्या उदात्तरावण नाटकात मृगाच्या वधार्थ लक्ष्मणाला पाठवून त्याचे रक्षण करण्यासाठी रामाला प्रेरित केले आहे, अशी त्या प्रसंगाची नवीन मांडणी करून प्रकरणवक्रता साधली आहे. कालिदासाने रघुवंशाच्या पाचव्या सर्गात कुबेरावर स्वारी करून जाण्याच्या रघूच्या निर्धाराचा प्रसंग रंगवला आहे. गे प्रकरणवक्रतेचे उदाहरण आहे. तसेच शाकुंतलातील दुर्वास ऋषीच्या शापाचा प्रसंग व अन्य काही प्रकरणवक्रतेची उदाहरणे कुंतकाने निर्दिष्ट केली आहेत. (६) प्रबंधवक्रता: संबंध काव्यात अथवा नाटकात एका प्रधान रसाची योजना करून त्याच्या अनुरोधानेच इतर रसांच्या समुचित आविष्काराने निर्माण होणारी चमत्कृती म्हणजे प्रबंधवक्रता होय. इतिहासादिवरून आपल्या प्रबंधासाठी कथानक घेताना त्यातील नीरस भागाचा त्याग करणे हा प्रबंध वक्रतेचाच प्रकार होय. भारवीच्या किरातार्जुनीयाचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. मूळ महाभारताचा प्रधान रस शांत आहे. त्याची उपेक्षा करून अभिजात रसिकांना आनंद देणारा वीररस प्रधान ठेवून भट्टनारायणाने वेणीसंहार हे नाटक लिहिले आहे. कवीने केलेल्या या मूलगामी बदलामुळे हे नाटक सहृदय वाचकांना विशेष रमणीय आणि आस्वाद्य वाटते.

काव्याचे मूळ वक्रोक्तीत आहे, ह्या प्रारंभीच्या विचारचे विस्तृतपणे विश्लेषण करून कुंतकाने आपला सिद्धांत मांडला आहे. पण त्याच्या मताची नंतरच्या आलंकारिकांनी फारशी दखल घेतली नाहीवक्रोक्तीतील उक्तीमुळे तो केवळ काव्याच्या बाह्य स्वरूपावरच लक्ष केंद्रित करणारा सिद्धांत असल्याचा आक्षेप घेतला गेला. तसेच कुंतकाची काव्यविषयक भूमिका ध्वनिसिद्धांताहून फारशी वेगळी नाही, असाही आक्षेप घेतला गेला. पण कुंतकाचे वक्रोक्तितत्त्व ध्वनितत्त्वाहून अधिक व्यापक असून तेच प्रधान आहे.

संर्दभ: १. अर्जुनवाडकर, कृष्ण श्री. संपा. काव्यप्रकाश, पुणे, १९६२.

२. कंगले, र. पं. प्राचीन काव्यशास्त्र, मुंबई, १९७४.

३. वीरकर, पु. ना.;पटवर्धन,मा. वा. संपा. ध्वन्यालोक, दोन खंड, मुंबई, १९८३, १९८९.

लेखक: वा. म. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate