অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसुदेवहिंडि

वसुदेवहिंडि

कृष्णपिता वसुदेव याची भ्रमणगाथा. संघदासगणी ह्याने माहाराष्ट्री-पाकृतमध्ये ह्या ग्रंथाची रचना केली. जैनांच्या आगमबाह्य वाङ्‍मयातील हा सर्वांत प्राचीन व त्यामुळे उत्तरकालीन लेखकांचे स्फूर्तिस्थान असलेला कथासंग्रह. भाषा, साहित्य व इतिहास या दृष्टींनी तो महत्त्वाचा असून, गुणाढ्याच्या आज लुप्त असलेल्या बृहत्कथेचे हे जैन रूपांतर असावे, असे डॉ. लुड्‍विग् आल्सडॉर्फ मानतात. चम्पूस्वरूपाच्या या ग्रंथाचे २९ लंभक (गुणाढ्याच्या परिभाषेत ‘लंबक’ = अध्याय- ११,००० श्लोकप्रमाण) आहेत. ह्या २९ लंभकांपैकी १९ व २० हे अनुपलब्ध आहेत; २८ वा लंभक अपूर्ण आहे. या कथेचे एकंदर सहा विभाग (अधिकार) आहेत. ते असे : (१) कहुप्पत्ति (कथोत्पत्ती), (२) पीढिया (पिठिका), (३) मुह (मुख), (४) पडिमुह (प्रतिमुख), (५) सरीर (शरीर), (६) उवसंहार (उपसंहार).

कृष्णपिता वसुदेव हा अंधकवृष्णीचा लहान मुलगा. वसुदेवाचा वडीलभाऊ समुद्रविजय गादीवर आल्यानंतर त्याने पाहिले, की वसुदेवाचे सौंदर्य व कलाप्रेम यांमुळे राजधानीमध्ये तरुण स्त्रिया अस्वस्थ होतात. त्यामुळे त्याने वसुदेवाला स्थानबद्ध केले. तथापि अतिशय गुप्तपणे तो त्यातून निसटला व १०० वर्षे देशोदेशी भ्रमंती करीत राहिला. या भ्रमंतीमध्ये त्याला पडलेले कष्ट, प्रतिवर्षी होत गेलेली त्याची लग्ने व इतर रोमहर्षक घटना वर्णन करताना शलाका-पुरुषकथा, वेदोत्पत्तिकथा इ. विविध कथा व उपकथा या ग्रंथामध्ये रंगविल्या आहेत. कथोत्पत्ती या अधिकारानंतर वस्तुतः मूळ ग्रंथाशी संबंध नसलेले ‘धम्मिलहिंडी’ नामक प्रकरणही समाविष्ट करून त्याचा मूळ कथेशी संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला आहे.

वसुदेवहिंडी हा ग्रंथ मुख्यतः समासप्रचुर गद्यात लिहिला असून मधूनमधून येणारे खुसखुशीत संवाद, पद्यरचना व सुभाषिते त्यामध्ये विपुल आहेत. भाषा प्रसन्न व ओघवती आहे. चरित, कथा आणि पुराण या तिन्हींचे मिश्रण त्यात आढळते. अगडदत्त-चरित, जंबूचरित, समरादित्य इ. कथा उत्तरकालीन लेखकांनी या ग्रंथापासून घेतल्या. यातील कथा सरस असून अरेबियन नाइट्समधील कथांपेक्षाही अद्‍भुत वाटतात.

ह्या ग्रंथाचे संपादन मुनी पुण्यविजयजी ह्यांनी केले असून (१९३०) त्याचा गुजराती अनुवाद प्रा. सांडेसरा ह्यांनी केला आहे (१९४६).

धर्मसेनगणी ह्या ग्रंथकाराने वसुदेवहिंडीचा जणू उर्वरित भाग असल्याप्रमाणे ३० ते १०० लंभक (१७,००० श्लोकप्रमाण) लिहून आपली ही रचना मूळच्या १ ते २९ लंभकांच्या संघदासगणीकृत वसुदेवहिंडीला कौशल्याने जोडण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो. तथापि हे ३० ते १०० लंभक वेगळे काढण्यात आले असून ते अद्याप प्रकाशित करण्यात आलेले नाहीत.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate