অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाङ्‌मयचौर्य (प्लेजिअरिझम)

वाङ्‌मयचौर्य (प्लेजिअरिझम)

एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास‘वाङ्‌मयचौर्य’ म्हणतात (अन्य कलाकृतींच्या–उदा., चित्र, मूर्तिशिल्प, संगीतकृती, इ.–संदर्भांतही कलाकृतिचौर्य संभवते). असे हे वाङ्‌मयचौर्य करणारा लेखक त्या मूळ साहित्यकृतीचा मूळ निर्माता नसतानाही त्या साहित्यकृतीचा निर्माता असल्याचा दावा करतो. मूळ साहित्यकृती लपविणे, किंवा रूपांतरात तिचा मुळीच उल्लेख न करणे, याला वाङ्‌मयचौर्य असे संबोधतात. वाङ्‌मयचौर्याची कृती ही प्रक्षिप्त वाङ्‌मयाच्या नेमकी उलटी असते. आपले स्वतःचे लेखन सहेतुकपणे पूर्णतः किंवा अंशतः दुसऱ्याच्या, विशेषतः पूर्वकालीन लेखकाच्या नावे, खपविण्याचा जो प्रयत्नत असतो; त्यास प्रक्षिप्त वाङ्‌मय म्हणतात. प्रक्षिप्त वाङ्‌मय लिहिणारा लेखक स्वतःचे लेखनकर्तृत्व नाकारून ते इतराच्या नावावर दडपतो. याउलट वाङ्‌मयचौर्य करणारा लेखक दुसऱ्याच्या लेखनाची अंशतः वा पूर्णतः सहीसही किंवा आपली उचलेगिरी लपेल इतके फेरफार करून चोरी करतो आणि ते लेखन आपलेच आहे, असे दडपून भासवितो. अनेकदा समीक्षकांनी आणि वाङ्‌मयेतिहासकारांनी अशी वाङ्‌मयचौर्ये उजेडात आणण्यात आपली शक्ती खर्च केलेली दिसते. मूळ कलावंताला वा लेखकाला त्याच्या कलाकृतीच्या संभाव्य चौर्यकर्मापासून कायदेशीर संरक्षण देणाऱ्या काही खास तरतुदी आहेत. त्याची कलाकृती वा साहित्यकृती प्रदर्शित/प्रकाशित होऊन ती जनतेसमोर येईपर्यंतच्या कालावधीत तिचा अनधिकृत रीत्या गैरवापर होऊ नये, म्हणून खास कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. कलाकृतीचा अनधिकृत उपयोग करणारी व्यक्ती व दुसऱ्याच्या साहित्याची हुबेहुब प्रतिकृती करून ती स्वतःच्या नावावर खपविणारी व्यक्ती ह्या ⇨लेखाधिकार अधिनियमान्वये गुन्हेगार ठरून त्यांना दंड वा कारावासाची शिक्षा सुनावली जाते.

काही विषय आणि काही कल्पना वाङ्‌मयात सर्वसाधारणपणे व संकेतार्थाने रूढ असतात. त्या कल्पनांची व विषयांची वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्यकृतींमध्ये अनेकदा पुनरावृत्ती होते, तरीही ते तसे वाङ्‌मयचौर्य ठरत नाही. कोणत्याही लेखकाच्या वाङ्‌मयीन जडणघडणीत त्याच्या आधीच्या तसेच समकालीन लेखकांचा व त्यांच्या साहित्यकृतींचा संस्कार होत असतो. त्या साहित्यातील मूळ आशयद्रव्याचे, कल्पनांचे, तंत्र वा मांडणीचे, शैलीचे कळत-नकळत अनुकरण, उसनवारी त्या लेखकाच्या उमेदवारीच्या काळात होत असते. तेही वाङ्‌मयचौर्य मानता येणार नाही. पण अशी एखादी पूर्वलिखित वा पूर्वप्रकाशित साहित्यकृती जशीच्या तशी हुबेहूब तिचा आशयविषय, मांडणी व शैली यांसहित पूर्णतः वा अंशतः, मूळ लेखकाचा उल्लेख न करता दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावावर छापल्यास ते वाङ्‌मयचौर्य ठरते. एखाद्या परभाषेतील साहित्यकृतीचा अनुवाद वा रूपांतर मूळ लेखकाच्या पूर्वसंमतिविना तसेच मूळ लेखकाचा व मूळ साहित्यकृतीचा उल्लेखही न करता एखाद्या लेखकाने स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केल्यास तेही वाङ्‌मयचौर्य ठरते.

इतिहास, पुराणे, मिथ्यकथा, मौखिक लोकसाहित्य आदी साधनांचा कच्ची सामग्री म्हणून आधार घेऊन त्यांवर आधारित स्वतंत्र साहित्यकृती निर्मिल्यास ते वाङ्‌मयचौर्य ठरत नाही. तसेच परभाषेतील एखाद्या साहित्यकृतीच्या मूळ आशयावर वा मध्यवर्ती कल्पनेवर आधारित साहित्यनिर्मिती केल्यास व ‘अमुक अमुक साहित्यावर आधारित’ असा मूळ साहित्यकृतीचा उल्लेख केल्यास तेही वाङ्‌मयचौर्य ठरत नाही. कधीकधी दोन लेखकांना एकच कल्पना सुचू शकते. कथा, कादंबरी किंवा नाटक लिहिताना एकाच तऱ्हेचा प्रसंग दोघांनाही सुचणे सहज शक्य आहे. अशा बाबतीत मात्र कोणावरही वाङ्‌मयचौर्याचा आरोप करणे सयुक्तिक नाही. कोशवाङ्‌मयादी सर्वसाधारण संदर्भसाहित्याचा उपयोग अध्यापन, संशोधन, वृत्तपत्रीय लेखन इत्यादींसाठी केल्यास तेही वाङ्‌मयचौर्य म्हणता येणार नाही.

साधारणपणे बहुतेक साहित्यिक पूर्वप्राप्त उपलब्ध साहित्याचा व संदर्भसाधनांचा आधारभूत कच्ची सामग्री म्हणून उपयोग करतात व तीतून स्वतःच्या सर्जनशील प्रतिभेने अनन्यसाधारण साहित्याची निर्मिती करतात. उदा., जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर ह्याने तत्कालीन इतिवृत्ते, पूर्वप्रसिद्ध साहित्य, घटना-घडामोडी आदी सामग्रीचा वापर करून स्वतःच्या प्रतिभाशक्तीच्या बळावर खास स्वतःचे असे श्रेष्ठ नाट्यवाङ्‌मय निर्माण केले, त्याचे जनकत्व शेक्सपिअरकडेच जाते. ज्यावेळी एखाद्या साहित्यकृतीचे पूर्णतः वा अंशतः भाषांतर केले जाते; वा त्यातील काही भागांचा वापर केला जातो, त्यावेळी तसा स्पष्ट उल्लेख करणे हे सभ्यतेचे व कृतज्ञताबुद्धीचे लक्षण ठरते. अशी सभ्यता व कृतज्ञताबुद्धी न बाळगता केवळ उचलेगिरी करून केलेले लेखन वाङ्‌मयचौर्य ठरते.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate