অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेणीसंहार

वेणीसंहार

भट्टनारायण (इ. स. सु. सातवे-आठवे शतक) ह्याने लिहिलेले सहा अंकी संस्कृत नाटक. ‘वेणीसंहार’ म्हणजे दुःशासनाने मोकळे केलेले द्रोपदीचे केस दुर्योधनाच्या मांडया फोडून त्याच्या रक्ताने माखलेल्या हातांनी  भीमाने एकत्र बांधणे. वेणीसंहाराचा हा प्रसंग, कौरव-पांडव युद्धातील घटना एका विशिष्ट सूत्रात गोवून त्यांचे नाट्यीकरण करण्यासाठी  भट्टनारायणाने   योजिला आहे. या नाटकाच्या पहिल्याच अंकात, कौरवांच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचीत संतापलेला भीम रंगभूमीवर प्रवेश करतो. द्रौपदीची भर-सभेत विटंबना ह्यापुढे सहन करीत राहणे त्याला अशक्य आहे. त्यातच दुर्योधनाची पत्नी भानुमती हिने द्रौपदीच्या केलेल्या अपमानाबद्दल द्रौपदीची दासी बुद्धिमतिका भीमाशी बोलते. बारा वर्षे वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगून हस्तिनापुरात आलेले पांडव राज्यातला आपला हिस्सा मागत होते आणि कौरव काही तो द्यावयास तयार नव्हते. ह्याच वादातून मार्ग काढण्यासाठी श्रीकृष्ण कौरवांकडे गेला होता आणि ‘फक्त पाच गावे द्यावीत’ ह्या अटीवर संधी करायला धर्मराज तयार होता. ‘असा समेट करायचे ठरले असेल, तर तुम्ही आपले मोकळे सोडलेले केस आता बांधत का नाही?’ असा प्रश्न विचारुन भानुमतीने द्रौपदीला डिवचल्याचे भीमाला बुद्धिमतिका सांगते. भीम अधिकच संतापतो, वेणीसंहाराची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर कृष्णशिष्टाई अयशस्वी होऊन युद्ध अटळ असल्याची वार्ता लगेच येते आणि भीम आनंदित होतो. दुसऱ्या अंकातील घटना कौरव-पांडवांचे युद्ध सुरु झाल्यानंतरच्या आहेत. अनेक वीर धारातीर्थी पडले आहेत. त्यातच भानुमतीला एक वाईट स्वप्न पडते. एका मुंगसाने शंभर सापांना मारले, असे ती स्वप्नात पाहते. इतरही काही अपशकुन होतात. भानुमतीबरोबर शृंगार करण्याच्या मनःस्थितीत असलेल्या दुर्योधनावर ह्याचा परिणाम होत नाही. तो वल्गना करीत युद्धभूमीकडे निघतो. तिसऱ्या अंकात, युद्धभूमीवर चाललेला अनर्थ एका राक्षस जोडप्याच्या संवादातून कळतो. रणभूमीवर मृत्यू पावलेल्या वीरांच्या रक्तमांसासाठी हे जोडपे आलेले असते. त्यातच द्रोणाचार्यांच्या वधाची वार्ता येते. त्यानंतर कौरवांचे सेनापतिपद मिळवू इच्छिणारा अश्वत्थामा आणि द्रोणाचार्यांची निंदा करणारा कर्ण ह्यांच्यात वादावादी होते. भांडण कसेबसे मिटविले जाते, पण ‘कर्ण जिवंत असेतोवर शस्त्र हातात धरणार नाही’ अशी प्रतिज्ञा अश्वत्थामा करतो. ह्याच वेळी दुःशासनाचे वक्ष फोडून त्याचे रक्त पिण्याची भीमाची प्रतिज्ञा ऐकू येते. ती ऐकताच दुर्योधन बावरतो. कर्ण मोठया प्रौढीने रणांगणाकडे वळतो. अश्वत्थाम्यालाही शस्त्रत्याग केल्याचे दुःख होते. प्रतिज्ञा मोडावी, असेही त्याला वाटते; पण तेवढयात आकाशवाणी होते व तो शस्त्राकडे वळलेला हात मागे घेतो. चौथ्या अंकात दुःशासन भीमाच्या ‘बाहूंच्या पिंजऱ्यात‘ त सापडलेला आहे. अर्जुन भीमाच्या मदतीला धावलेला आहे. कौरव सैन्याची दाणादाण उडालेली आहे. स्वतः दुर्योधन अनेक घाव लागल्यामुळे रथातच मूर्च्छित पडतो. त्याचा सारथी एका वटवृक्षाच्या छायेखाली त्याचा रथ आणून ठेवतो. दुःशासन आता रक्षणाच्या पलीकडे गेला आहे, हे त्याला कळते. त्यातच सुंदरक नावाचा दूत दुर्योधनाला शोधत तिथे येतो. कर्णाचा पुत्र वृषसेन ह्याला ठार करुन अर्जुनाने अभिमन्यूच्या वधाचा बदला घेतल्याची वार्ता सुंदरकाने आणलेली असते. सुंदरक दुर्योधनाला कर्णाचे पत्र देतो. दुर्योधनाला त्या पत्राची भाषा निरवानिरवीची वाटते. तो युद्धभूमीकडे निघतो. तोच गांधारी आणि धृतराष्ट्र दुर्योधनाला शोधत तिथे येतात. त्यामुळे त्याला थांबणे भागच पडते. पाचव्या अंकात धृतराष्ट्र आणि गांधारी दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करण्याचा निष्कळ प्रयत्न करतात. तोच कर्णाच्या मृत्यूची वार्ता येते. दुर्योधनाला जबर धक्का बसतो. दुर्योधन युद्धभूमीवर जाऊ देण्याची अनुज्ञा आईवडिलांजवळ मागतो; परंतु ह्याच वेळी त्याचा शोध घेत भीम आणि अर्जुन तिथे येतात. भीम आणि अर्जुन धृतराष्ट्र-गांधारींना वंदन करतात; परंतु भीम धृतराष्ट्राशी अपमानकारक रीतीने बोलतो. धृतराष्ट्र संतापतो. भीम आणि दुर्योधन ह्यांचे भांडण जुंपते. पण सूर्यास्त झाल्यामुळे भीम आणि अर्जुन आपल्या शिबिराकडे परततात. अश्वत्थामा येतो. दुर्योधन त्याला टाकून बोलतो. अश्वत्थामा निघून जातो. भरतकुलाच्या विनाशाचे चित्र धृतराष्ट्राच्या आंधळ्या डोळ्यांना दिसू लागते. सहाव्या अंकात युधिष्ठिर काळजीत दिसतो. सूर्योदयाच्या आत दुर्योधनाला ठार मारण्याची प्रतिज्ञा भीमाने केली आहे; पण दुर्योधन कोठेतरी लपून बसला आहे. लवकरच तो एका सरोवरात दडून बसल्याचे कळते. सरोवर तळापर्यंत ढवळून भीम दुर्योधनाला बाहेर यायला लावतो. भीम दुर्योधनाला ठार करणार हे निश्चित असल्यामुळे युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाची तयारी करण्याचा आदेश श्रीकृष्ण देतो. असे आनंदाचे वातावरण असतानाच दुर्योधनाचा मित्र चार्वाक राक्षस मुनिवेषाने तिथे येऊन भीम ठार झाल्याचे खोटेच सांगतो. द्रौपदी सती जाण्याची तयारी करते. युधिष्ठिरही अग्निप्रवेश करायला निघतो. तेवढयात रक्ताने न्हाऊन निघालेला भीम तेथे येतो. आधी भीमाची ओळख पटत नाही; पण नंतर सारा खुलासा होतो. भीम आपल्या रक्तरंजित हातांनी द्रौपदीची वेणी घालतो. युधिष्ठिराला राज्याभिषेक करण्यासाठी मुनिजन हातांत रत्नकलश घेऊन उभे राहतात.

नाटयपरिणाम साधण्यासाठी भट्टनारायणाने महाभारताच्या मूळ कथेत काही फेरफार केले आहेत. मुळात द्यूतप्रसंगी झालेल्या अपमानाने दौपदीने आपले केस मोकळे ठेवले ही कल्पनाच भट्टनारायणाची आहे. नाटकाचा विषय काव्यरचनेला- किंबहुना महाकाव्याला- अनुकूल असा आहे. युद्धाची निवेदने करण्यात बरेच नाटक खर्ची पडते. नाटक वीररसप्रधान आहे. श्लेषाची दुहेरी सूचकताही त्यात दिसते आणि पताकास्थानासारखे नाटकी खटकेही आहेत. वेणीसंहार ह्या नाटकाला लोकप्रियता लाभली; पण साहित्यिक थोरवी त्या मानाने लाभली नाही. तथापि संस्कृत साहित्यशास्त्रात नाटयांतील वेगवेगळ्या अंगांची किंवा अलंकारादिकांची वेगवेगळी उदाहरणे देताना एकटया वेणीसंहार नाटकातून जेवढी अवतरणे घेतली आहेत, तेवढी कालिदास-भवभूती यांच्या नाटकांतूनही घेतली नसतील.

लेखक: गो. के. भट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate