অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शतकवाङ्‌मय

शतकवाङ्‌मय

संस्कृत व प्राकृत भाषांतील पद्यरचनेचा एक प्रकार किंवा आकृतिबंध. या शतकरचनेत अगदी शंभरच श्लोक किंवा कडवी असतात असे नाही. ही संख्या थोडी कमीजास्तही असू शकते. दुसरे म्हणजे. शतकरचनेतील सर्व पद्ये स्वतः कवीनेच रचलेली असतात असे नाही, इतरांच्याही काही पद्यरचना त्यांत आढळतात.  भर्तृहरीच्या शृंगार, नीती व वैराग्य या तिन्ही शतकरचनांतील काही श्लोक इतर काव्य-नाटकांमधूनही आढळतात. या शतकरचनेत वेगवेगळ्या अक्षरवृतांचा व छंदांचा उपयोग केलेला आढळतो. एखादा महत्त्वाचा अनुभव विषय, गुंतागुंतीची भावना, आदर्श आचारविचार तसेच देवदेवता, थोर व्यक्ती वगैरेंचे माहात्म्यवर्णन यांसारखे विषय शतकरचनांतून आढळतात. त्यांतून काव्यगुणांचाही प्रत्यय येतो.

संस्कृतमध्ये शतककाव्यांची संख्या मोठी आहे. तसेच शतकांच्या पटीत केलेल्या प्रदीर्घ पद्यरचनाही संस्कृत-प्राकृत भाषांत आढळतात. उदा, हाल कवीची गाहा सत्तसई (गाथा सप्तशती), परमानंद कवीची शृंगार सप्तशती, कामराज दीक्षिताची शृंगार-कलिका-त्रिशती, काश्मीरच्या गोवर्धन कवीची आर्यासप्तशती, लक्ष्मणार्य कवीची चंडिकुच-पंचशती इत्यादी. शतकरचनेप्रमाणेच सहस्रकरचनाही संस्कृत भाषेत आढळतात. उदा., वेंकटाध्वरीचे लक्ष्मीसहस्रम, वसिष्ठगणपतिमुनीचे उपासहस्रम इत्यादी. सामान्यपणे सहस्रकरचना म्हणजे देवदेवतांची स्त्रोत्रेच म्हणता येतील. शतककाव्यात स्तोत्रांचाही समावेश होतो. जगन्नाथपंडिताच्या गंगालहरी, अमृतलहरी, करुणालहरी यांसारख्या रचना त्यांतील श्लोकसंख्या शतकाहून कमीअधिक असली, तरी शतकसाहित्यातच मोडतात. आधुनिक श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी संस्कृत भाषेत रचलेली थोर भारतीयांची अनेक स्तुतिकवने शतकरचनेतच समाविष्ट होऊ शकतील.

काही उल्लेखनीय इतर शतकरचना पुढीलप्रमाणे :  अमरुशतक (अमरु), चण्डीशतक (बाण्णभट्ट), सूर्यशतक (मयूर), शतश्लोकी (आद्य शंकराचार्य), उपदेशशतकम (गुमानी), ब्रह्यचर्यशतकम (रत्नमेधाव्रत) भक्तामरस्तोत्रम (अप्पय दीक्षित), अन्योक्तिमुक्तालता (शम्भू), शांतिशतक (शिल्हण), भल्लटशतक (भल्लट), दृष्टान्त-शतक (कुसुम-देव), सभा-रंजन-शतक (नीलकण्ठ दीक्षित), सुभाषितनीवी (वेंकटाचार्य), सुदर्शनशतक (श्रीकुसुमनारायण कवी), देवीशतकम (आनंदवर्धन), ईश्वरशतकम (अवतार), भक्तिशतकम (रामचंद्र कविभारती), लोकेश्वरशतक (वज्रदत्त), भिक्षाटन व सुन्दरीशतक (उत्प्रेक्षावल्लभ), मीनाक्षीशतकम (पारिथीयूर कृष्णकवी), गणेशशतकम (अम्बिकादत्त व्यास), (कस्तूरी श्रीनिवासशास्त्री), धर्मशतकम व अर्थशतकम (जयराम पाण्डे), भारतीस्तव: (कपालिशास्त्री) इत्यादी. इतर भारतीय भाषांतही उल्लेखनीय शतकरचना आढळते. उदा., तेलुगूतील वृषाधिपशतक (पाल्कुरिकी सोमनाथ), वेमनाशतकम (वेमना), दाशरथिशतक (कंचेर्ल गोपना) इत्यादी.

लेखक: वि.बा. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate