অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शब्दार्थविद्या (सिमॅंटिक्स)

शब्दार्थविद्या (सिमॅंटिक्स)

भाषिक संदर्भातील 'अर्था'चे शास्त्रीय विवरण करणारे शास्त्र. यासाठी 'अर्थस्वरूपमीमांसा' अशाही पर्यायी संज्ञा वापरता येतात. भाषा ही प्रामुख्याने शब्दांची बनलेली असते आणि अर्थाचा विचार म्हणजे मूलतः शब्दांच्या अर्थाचा विचार, अशी समीकरणे सर्वसामान्यपणे रूढ असली, तरी भाषिक अर्थ हा केवळ शब्दार्थापुरता मर्यादित नसतो. सुट्या ध्वनींना स्वतंत्रपणे अर्थ नसतात, तर शब्दांना असतात, हे खरे; परंतु शब्द एकत्र आल्यानंतर परस्परांच्या सान्निध्यात त्यांचे अर्थ काही प्रमाणात वेगवेगळे होऊ शकतात. मराठीमध्ये 'ओढणे' हे क्रियापद 'गाडी' या नामाबरोबर आले, की त्याचा एक अर्थ होतो, परंतु `विडी' या नामाबरोबर आले, की त्याचा अर्थ वेगळाच असतो; दुसरे म्हणजे सर्वसामान्य वापरामध्ये एकूण संदर्भाच्या स्वरूपानुसारही शब्दांचे अर्थ बदलतात. उदा., 'तू रोज उशिरा येतेस याचा अर्थ काय?' असे एखादी आई आपल्या मुलीला विचारते; त्या वेळी तिला अर्थाविषयीची चर्चा अभिप्रेत नसते, तर तिला मुलीला रागवायचे असते. तिसरे म्हणजे, शब्दाला आणि शब्दसमूहाला वाच्यार्थाबरोबरच वाक्यप्रचारात्मक किंवा लाक्षणिक अर्थही असू शकतो. उदा., गाडा ओढणे म्हणजे 'प्रपंच चालवणे'.

भाषेतील ध्वनी वा स्वप्न यांना स्वतंत्र वा अंगभूत असा अर्थ नसतो. त्यांच्या एकत्रीकरणातून शब्द वा पद निर्माण होताना अर्थनिष्पत्ती व्हावी लागते. क्वचित एकस्वनात्मक शब्दही आढळतात; उदा., मराठीतील 'ऊ' या शब्दात एकच स्वप्न आहे. मात्र सामान्यतः शब्द हे स्वनांच्या एकत्रीकरणातून घडलेले असतात. उदा., 'आ' व 'ई' या दोन अर्थहीन ध्वनींचे `आई' व 'ईआ' असे दोन प्रकारे एकत्रीकरण होऊ शकते. त्यांपैकी 'आई' या एकत्रीकरणालाच मराठी भाषेत अर्थपूर्णता लाभलेली असल्याने तो शब्द म्हणून ओळखला जातो. कोणत्याही भाषेचे मूलध्वनी किंवा स्वनिम एकत्र आले की, अर्थनिर्मितीची शक्यता निर्माण होते व एक अर्थपूर्ण रूप म्हणून भाषेने त्या रूपाचा स्वीकार केला की, अर्थनिष्पत्ती होते. त्यामुळे शब्द वा पद ही अर्थमीमांसेची किमान पातळी मानता येईल व त्यामुळे सिमॅंटिक्ससाठी 'शब्दार्थविद्या' हा पारिभाषिक शब्द स्वीकारता येईल. तथापि भाषिक अर्थाची अनेक पातळ्यांवर शास्त्रीय मीमांसा करणारे अभ्यासक्षेत्र, ही त्याची व्याप्ती आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य प्राचीन परंपरांमध्ये, तसेच आधुनिक पाश्चात्त्य विचारपरंपरेमध्ये अर्थाचा विचार वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक अंगांनी झालेला आहे. केवळ शब्दांच्या पातळीवर होणाऱ्या अर्थविचाराला लेक्झिकल सिमॅंटिक्स असे म्हटले जाते.

भाषेतील शब्द व त्यांचा अर्थ यांचा विचार अनेक अभ्यासक्षेत्रांमध्ये आवश्यक व महत्त्वाचा ठरलेला आहे. भाषाविज्ञानामध्ये ध्वनी (किंवा स्वन), शब्द (किंवा पद) आणि वाक्य या पातळ्यांबरोबरच अर्थ ही एक चिन्हव्यवस्था असते, असा विचार मांडणाऱ्या चिन्हमीमांसेमध्ये चिन्हार्थाचा विचार फार महत्त्वाचा ठरतो. तत्त्वज्ञानाच्या तर्कशास्त्र या शाखेमध्ये विधाने, अनुमाने इत्यादींचे, तसेच `आणि', 'किंवा' यांसारख्या उभयान्वयी अव्ययांचे विश्लेषण केले जाते. आधुनिक तत्त्वज्ञानात भाषेच्या सर्वसामान्य वापराची चिकित्सा करणारा एक महत्त्वाचा प्रवाह सर्वसामान्य भाषेचे तत्त्वज्ञान (ऑर्डिनरी लॅग्वेज फिलॉसॉफी) म्हणून ओळखला जातो. या तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतामध्ये भाषिक अर्थाच्या चिकित्सेला केंद्रवर्ती स्थान आहे. त्यातूनच भाषेच्या संदर्भनिष्ठ अभ्यासाचे क्षेत्र (प्रॅग्मॅटिक्स) उदयाला आलेले आहे. सामाजिक विज्ञानांमध्ये अर्थाच्या विश्लेषणाचा उपयोग करण्यात आला आहे. आणि अर्थविश्लेषणाची काही तंत्रेही विकसित झालेली आहेत. उदा., मानववंशशास्त्रात अर्थक्षेत्र व अर्थघटक या संकल्पनांच्या साहाय्याने सांस्कृतिक अभ्यासाला उपयुक्त अशी एक विश्लेषणपद्धती विकसित झाली. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मानवी नातेसंबंध कोणत्या प्रकारचे आहेत, हे समजण्यासाठी अभ्यासकांनी नातेवाचक शब्दसंग्रहाची तपासणी केली आहे.

मानवी अनुभव व ज्ञान, सत्य, भौतिक वास्तव इ. संकल्पनांशी अर्थ या संकल्पनेचा संबंध काय, हाही तत्त्वज्ञानातील एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. खरे म्हणजे, अर्थ ही संकल्पनाच अत्यंत गुंतागुंतीची आहे. सी. के. ऑग्डन व आय. ए. रिचर्डस या अभ्यासकांनी द मीनिंग ऑफ मीनिंग (१९२३) या इंग्रजी ग्रंथामध्ये मीन या क्रियापदाचे सोळा अर्थ दिलेले आहेत. या संदर्भात केवळ जंत्री देऊन स्पष्टीकरण मिळणार नाही. भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या भाषाविज्ञानामध्ये अर्थाचा विचार कसा केला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र भाषेतील मूलध्वनींची संरचना किंवा वाक्यरचना यांच्या तुलनेने अर्थरचनेचा विचार तितकासा प्रगत झालेला नाही.

भाषा ही बाह्य वास्तवाचा निर्देश करते. उदा.,खुर्ची या शब्दाने वास्तव जगातील एका व्यक्तीचा निर्देश होतो; किंवा आजी या शब्दाने एका व्यक्तीचा निर्देश होतो. हा निर्देश दोन प्रकारे होत असतो; एक म्हणजे वर्गवाचक सामान्य नाम रूप व दुसरा म्हणजे विशिष्टवाचक निर्देश म्हणून (उदा., माझी आजी, तुझी खुर्ची). तेंव्हा, अर्थ म्हणजे वास्तवाचा निर्देश अशी एक भूमिका आहे. परंतु ही भूमिका स्वीकारण्यात काही मूलभूत अडचणी आहेत. पहिली अडचण अशी की, भाववाचक नामे वस्तूंचा वा व्यक्तींचा निर्देश करीत नाहीत, तर एखाद्या अमूर्त गुणाचा वा मनःस्थितीचा वा भावस्थितीचा निर्देश करतात. उदा., 'न्याय', देशभक्ती'. दुसरी अडचण अशी की, अनेक भाषिक शब्द वा वाक्यप्रयोग वास्तवातील कोणत्याही वस्तूचा, व्यक्तीचा वा गुणाचा निर्देश करीत नसूनही आपल्याला त्यांचा अर्थ समजू शकतो. उदा., देवदूत, परी यांसारखे शब्द काल्पनिक वास्तवाचा निर्देश करतात, असे म्हणावे लागते; तरी 'भारताची आजची राणी' हा वाक्यप्रयोग निर्देशहीन असला, तरी अर्थहीन नाही. भाषा शिकणे म्हणजे शब्दांच्या साहाय्याने वास्तवाचा निर्देश करायला शिकणे, हा दृष्टिकोन भाषावैज्ञानिकांना फारच अपुरा वाटलेला आहे. मात्र या संदर्भातील एक मूलभूत भेद येथे नोंदवून ठेवायला हवा. भाषिक घटक आणि अ-भाषिक आनुभविक विश्व यांच्यात जे नाते मानवी मन प्रस्थापित करीत असते, त्याला 'निर्देश' (रेफरन्स) म्हणता येईल. याचबरोबर भाषेच्या विविध घटकांमध्ये उदा., शब्दांमध्ये नाती असतात. मराठीतील 'झाड' या शब्दाचे नाते झुडूप, रोप, वेल इ. शब्दांशी आहे. या नात्याला भाषागत अर्थ म्हणता येईल.

शब्दांमागे अमूर्त संकल्पना असतात व तोच त्यांचा अर्थ होय, अशी आणखी एक भूमिका घेतली जाते. परंतु ही भूमिकाही अपुरी आहे. एका शब्दामागे एकच संकल्पना असते की अनेक? आजी या शब्दामागे नेमक्या किती संकल्पना आहेत? शब्दाचा अर्थ म्हणजे संकल्पना हे मान्य केले, तरी शब्दांचे जे व्याकरणिक गुणधर्म असतात, त्यांचा अर्थाशी काही संबंध असतो का? उदा., मराठीमध्ये शब्द एकत्र येऊन पदबंध, वाक्ये व इतर भाषिक वाक्यप्रयोग बनत असतात. त्यांचे अर्थ निश्चित करताना संकल्पनांचे काय करायचे? शब्दक्रम, अन्वय इ. भाषिक रचनातत्त्वांमध्ये शब्दांमागच्या संकल्पनांना कोठे बसवायचे? यांसारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. अर्थाचा विचार संकल्पनांच्या परिभाषेत करायचा, तर त्यासाठी मूलभूत संकल्पनांची एक चौकट लागते. अशी चौकट शास्त्रीय पातळीवर मांडण्यामध्ये फारसे यश मिळालेले नसले, तरी सांकल्पनिक अवयवांमध्ये वा घटकांमध्ये शब्दांच्या अर्थांचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत.

वेगवेगळ्या संस्कृतींमधील शब्दसंग्रहाचा अभ्यास करताना मानववंशशास्त्रज्ञांनी अर्थघटक (सिमँटिक कॉपोनंट्स / फीचर्स) आणि 'अर्थक्षेत्र' (सिमँटिक फील्ड) या संकल्पना वापरून शब्दांच्या अर्थाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. मानवी भाषेचा शब्दसंग्रह हा रचनाबद्ध असतो, त्यात अर्थाची काही 'क्षेत्रे' निश्चित झालेली असतात आणि या क्षेत्रांची उपविभागणीही सुनिश्चित असते. उदा., रंगविषयक शब्द, नातेसंबंधवाचक शब्द, आवाजविषयक शब्द, पाकक्रियाविषयक शब्द यांसारखी अनेक सुरचित अर्थक्षेत्रे मानवी भाषांमध्ये आढळतात. भाषाभाषांची तुलना करताना या अर्थक्षेत्रांची अंतर्गत विभागणी कशी झाली आहे, याचा विचार करता येतो. मराठीमध्ये अनेक गोंगाटवाचक शब्द आहेत : गलका, गलबला, गोंगाट, गदारोळ, बोंब, शंख इ. नामे; तसेच ओरडणे, कडाडणे, गलका/ गोंगाट करणे, गदारोळ माजवणे, बोंब मारणे, शंख करणे इ. क्रियापदे. परंतु मेक्सिकोमधील एका भाषेत गोंगाटवाचक शब्दांच्या उपक्षेत्रात सहा प्रकारचे शब्द आढळतात: मुलांचे ओरडणे, मोठ्याने बोलणे, भांडण वा वादविवाद (तोच शब्द टर्की पक्षाने केलेल्या आवाजासाठी), वाढत जाणारा गोंगाट आणि शवयात्रेच्या वेळी होणारा गोंगाट, असे सहा वेगळे शब्द या भाषेत आढळतात. नातेसंबंधकवाचक शब्दसंग्रहाचा विचार केला, तर मराठीमध्ये आईकडून आणि वडिलांकडून असा भेद होऊन शिवाय पुरूषवाचक व स्त्रीवाचक असा भेद होतो व त्यातून मामा–मामी, काका–काकू इ. त्याचप्रमाणे मावसभाऊ/बहीण; आतेभाऊ/बहीण इत्यादी शब्द आढळतात. याउलट इंग्लिशमध्ये आईकडून आणि वडिलांकडून असा भेद न होता अंकल–आँट (uncle-aunt) या जोडीत केवळ पुरूषवाचक व स्त्रीवाचक असा भेद होतो आणि कझिन (Cousin) या शब्दात तोही होत नाही. कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर हे शब्द इंग्रजांच्या वा अमेरिकनांच्या इंग्लिशमध्ये नाहीत, ते भारतीयांनी आपल्या भाषांवरून बनविलेले आहेत. मराठीमध्ये आजा-आजी या जोडीत आईकडून आणि वडिलांकडून असा भेद होत नाही; तर केवळ पुरूषवाचक व स्त्रीवाचक असा भेद होतो. उलट हिंदीमध्ये दादा–दादी आणि नाना–नानी या जोड्यांत दोन्ही भेद होतात.

अर्थघटक ही संकल्पना अर्थक्षेत्र या संकल्पनेला साहाय्यभूत ठरणारी आहे. अधिक (+) व उणे(–) ही चिन्हे वापरून शब्दांचे अर्थघटकांत विश्लेषण करता येते. आई आणि वडील या शब्दांत 'जनकत्व' हा अर्थघटक आहे, असे म्हणता येईल. आई या शब्दाचे घटक (+जनक,+स्त्री) व वडील या शब्दाचे घटक (+ जनक,–पुरुष) असे दाखविता येतील. अंकल–आँट या शब्दांत (+ जनकांचे भावंड) असा अर्थघटक आहे. तर 'मामा–मामी' म्हणजे (+ जनकांचे भावंड, +आईकडूनचे) आणि 'काका-काकू; म्हणजे (+जनकांचे भावंड, वडिलांकडूनचे) असे अर्थघटक दाखविता येतील. अर्थघटकांच्या संकल्पनेचा वापर शब्दार्थविश्लेषणासाठी केल्याने काही नवे प्रश्न उपस्थित होतात. मूलभूत वा पायाभूत अर्थघटक किती व कोणते? ते पूर्णपणे भाषानिरपेक्ष, संस्कृतिनिरपेक्ष व सार्वत्रिक असू शकतात का? लिंगदर्शक संकल्पना (+स्त्री) व़ (–स्त्री) अशी दाखवायची की (+पुरुष) व (–पुरुष) अशी दाखवायची? या प्रश्नांना फारशी समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.

शब्दार्थविचारामध्ये विविध प्रकारच्या अर्थ-संबंधांचाही अंतर्भाव होतो. समानार्थता, विरुद्धार्थता, अनेकार्थता आणि अर्थ-समावेश या संबंधांची काही उदाहरणे येथे घेता येतील. परस्परांऐवजी वापरता येणारे शब्द हे समानार्थी असतात, कारण त्यांचे सांकल्पनिक अर्थघटक बव्हंशी सारखेच असतात. 'जन्मदाता–पिता–वडील–बाप', किंवा `जन्मदात्री–माता–आई–माय' या शब्दांमधील नाते समानार्थतेचे आहे, असे म्हणता येईल. मात्र आदरसूचन वगैरे भावव्यंजनात्मक अर्थ-घटकांचा विचार केला, तर भाषेतील कोणतेही दोन शब्द पूर्णपणे समानार्थी असणार नाहीत ही गोष्ट उघड आहे.

विरुद्धार्थता हा एक गुंतागुंतीचा अर्थ-संबंध असून त्याचे तीन उपप्रकार मानले जातात. एक म्हणजे व्यत्यासात्मक विरोध. उदा., 'विवाहित–ब्रह्यचारी', 'जिवंत–मृत' या शब्दांच्या जोड्यांपैकी एकाला नकार दिला की दुसऱ्याचे सूचन होते, दुसरा सापेक्ष विरोध. उदा., छोटा–मोठा या विशेषणांच्या जोडीमध्ये व्यत्यासात्मक विरोध नाही; त्यांच्या पुढे येणाऱ्या, नामावर अवलंबून असणारा एखादा विशिष्ट निकष येथे अध्याहृत धरलेला असतो व त्याच्या आधारे विशेषणाचा अर्थ निश्चित होतो. छोटा देवमासा व छोटा उंदीर यांतील छोटेपणाचा निकष एक नाही ही गोष्ट उघड आहे. तिसरा उपप्रकार हा बहुविध विरोधाचा संबंध आहे. 'लाल–निळा–हिरवा–पिवळा' या शब्दांमध्ये व्यत्यासात्मक विरोध नाही किंवा सापेक्ष विरोधही नाही; एकच वस्तू एकाच वेळी पूर्णपणे लाल वा पूर्णपणे निळी असू शकणार नाही; परंतु एखादी वस्तू लाल नसली, तर ती निळीच असायला हवी असे नव्हे, तर ती हिरवी वा पिवळी असू शकेल.

अनेकार्थता या अर्थ-संबंधाचे दोन प्रकार आढळतात. एक म्हणजे एकाच भाषिक रूपाला केवळ योगायोगाने अनेक अर्थ प्राप्त झालेले असतात व या अनेक अर्थांमध्ये साम्य नसते. याला सरूपता असे म्हणतात. म्हणजे येथे रूप सारखे असते; परंतु अर्थ अनेक व परस्परांशी असंबंधित असतात. उदा., 'सांड' या मराठी शब्दाचे अनेक अर्थ होतात : मोकळा सोडलेला बैल, उंटीण, जास्त झालेले पाणी निघून जावे म्हणून केलेली वाट, उपेक्षा, कोपरा, टाकलेली बायको, 'सांडणे' या क्रियापदाचे आज्ञार्थी रूप इत्यादी. परंतु काही वेळा एका भाषिक रूपाला अनेक अर्थ असले, तरी ते परस्परांशी संबंधित असतात. त्यामुळे येथे योगायोगाने निर्माण झालेली सरूपता आहे असे म्हणता येत नाही. मराठीत नेहमी घेतले जाणारे उदाहरण म्हणजे 'नदीतला गोटा', 'चमन गोटा' आणि 'गोटा नारळ' या वाक्यप्रयोगांमध्ये 'गोटा' या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असले; तरी ते परस्परांशी असंबंधित नाहीत, तर त्यांच्यात आकारसादृश्याचे नाते आहे.

अर्थ-समावेश या अर्थ-संबंधाचे उदाहरण घ्यायचे तर 'लाल', 'निळा', 'हिरवा' हे रंगवाचक शब्द आहेत. म्हणजेच 'रंग' या शब्दाच्या अर्थामध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र येथे भाषिक वर्गीकरण आणि बाह्य विश्वाचे तार्किक वर्गीकरण यांची गल्लत करून चालणार नाही. 'पांढरा' या शब्दाचा अर्थ हा जर 'रंग' या शब्दाच्या अर्थामध्ये समाविष्ट असेल, तर तार्किकदृष्ट्या `पांढरी वस्तू' ही 'रंगीत वस्तू' मध्ये समाविष्ट व्हायला हवी, परंतु भाषांतर्गत अर्थरचनेमध्ये तसे केले जात नाही.

भाषा ही एक चिन्हव्यवस्था असून अर्थाचे वा आशयाचे संप्रेषण करणे म्हणजेच संदेशन करणे हे तिचे मुख्य कार्य आहे, हे आधुनिक भाषाविज्ञानामधील एक मुख्य प्रमेय आहे. या विचारातूनच भाषिक चिन्हमीमांसेचे (सेमिऑटिक्स) क्षेत्र उदयाला आलेले आहे. भाषिक संप्रेषणाचे स्वरूप उलगडून सांगणे, हा चिन्हमीमांसेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. भाषिक चिन्हांना दोन पैलू असतात. एक म्हणजे ध्वनी. हा चिन्हक असतो. दुसरा पैलू म्हणजे अर्थ. याला चिन्हित म्हणतात. चिन्हक आणि चिन्हित यांच्यातील संबंध हे तर्काधिष्ठित नसतात वा निसर्गदत्तही नसतात, तर ते यादृच्छिक आणि संकेतनिष्ठ असतात असा एक मूलगामी स्वरूपाचा सिद्धांत आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक फेर्दिनां द सोस्यूर याने मांडला. रोमान याकबसन याने या संदर्भात केलेल्या विवेचनामधून चिन्हव्यवस्थांच्या कार्याचा विचार सुरू झाला आणि आधुनिक अर्थविचारामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. केवळ शब्दांच्या अर्थविषयीची ही तत्त्वे नसून ती समग्र भाषिक व्यवहारामध्ये होणारे अर्थाचे संप्रेषण स्पष्ट करणारी आहेत. कोणत्याही भाषिक घटनेत वा प्रयोगामध्ये सहा मूलघटक असतात : (१) प्रेषणकर्ती व्यक्ती, (२) ग्रहण करणारी व्यक्ती, (३) संप्रेषणाचा संदर्भ, (४) संप्रेषणाचे माध्यम म्हणजेच भाषिक नियमव्यवस्था, (५) प्रेषक व ग्रहणकर्ती व्यक्ती यांच्यातील संपर्क आणि (६) अभिप्राय वा संदेश. हे सहा घटक प्रत्येक भाषिक प्रयोगामध्ये उपस्थित असतात, मात्र त्यातल्या कोणत्या घटकावर संप्रेषणाचा भर आहे यावरून संप्रेषणाचे स्वरूप बदलते. (१) प्रेषणकर्त्या व्यक्तीवर भर असेल, तर तेथील भाषेच्या कार्याला आविष्कारात्नक (एक्सप्रेसिव्ह) कार्य म्हणतात; येथे प्रेषणकर्त्या व्यक्तीच्या मनातील भावभावना व मूल्यदृष्टी यांचा आविष्कार करणे, हा मुख्य हेतू असतो. (२) ग्रहणकर्त्या व्यक्तीवर परिणाम करण्याचे मुख्य कार्य असेल, तर त्याला प्रभावपर (कोनेटिव्ह) कार्य म्हणतात, उदा., जाहिरातींमध्ये हे कार्य महत्त्वाचे असते. (३) संप्रेषणाचा भर जेव्हा एकूण संदर्भावर वा संदर्भनिष्ठ घटकांवर असतो, तेंव्हा त्या कार्याला वाच्यार्थपर वा वर्णनात्मक (रेफरेन्शियल) कार्य म्हणतात. (४) संप्रेषणाचा भर जेव्हा प्रामुख्याने संपर्कावर असतो, त्या वेळी त्या कार्याला संपर्कात्मक (फॅटिक) कार्य म्हणतात. या ठिकाणी संभाषण चालू आहे हवापाण्याविषयी, परंतु हेतू आहे एकमेकांशी संपर्क साधण्याचा, असा प्रकार असतो. (५) भाषेविषयी म्हणजेच संप्रेषणाच्या माध्यमाविषयीच जेव्हा आपण संप्रेषण करू लागतो, तेव्हा त्याला अधिभाषात्म (मेटॅलिंग्वल) कार्य म्हणतात. भाषेचे स्वरूप सांगणारे कोणतेही वाक्य हे या प्रकारचे कार्य बजावीत असते. (६) संप्रेषणाचा भर हा जेव्हा संदेशावर किंवा अभिप्रायाच्या विवक्षित स्वरूपावर असतो, त्या वेळी त्याचे कार्य काव्यात्म वा सौंदर्यात्म (पोएटिक/इस्थेटिक) म्हटले जाते. उदा., झाडे दुःखभोर आहेत, या भाषिक प्रयोगामध्ये संदेशाच्या विवक्षित स्वरूपाकडे आपले लक्ष खेचले जाते. याकबसन याने दिलेली सहा प्रकारची कार्ये म्हणजे सहा प्रकारचे अर्थ आहेत असेही म्हणता येते.

संस्कृत परंपरेमध्ये शब्द हा अर्थाच्या दृष्टीने 'अखंड' असतो की नाही, यावर वाद झालेले आहेत. पाणिनी, कात्यायन, पतंजली आणि यास्क यांसारख्या वैय्याकरणांनी शब्दाला अर्थाचे किंवा विचाराचे एक अखंड वा स्वायत्त रूप मानून त्याच्या आधारे वाक्यमीमांसा केलेली आहे. याउलट, औदंबरायण आणि वर्ताक्ष यांच्या परंपरेला अनुसरून भर्तृहरीने अर्थाच्या दृष्टीने अखंड वा स्वायत्त दर्जा शब्दाला न देता वाक्याला दिलेला आहे. त्याच्या मते ध्वनी हे भाषिक प्रयोगाचे बाह्य रूप असते, तर अर्थ हे त्याचे आंतरिक रूप असते. या आंतरिक अखंड रूपालाच तो 'स्फोट' असे म्हणतो. प्राचीन भारतीय परंपरेतील बौद्ध दर्शनामध्ये 'अपोहवाद' ही भूमिका आधुनिक चिन्हमीमांसेमधील ध्वनी व अर्थ यांच्यातील नाते यादृच्छिक व सांकेतिक असते, या तत्त्वाशी अगदी जवळचे नाते सांगणारी आहे. आनंदवर्धनाने काव्यभाषेच्या संदर्भात मांडलेला ध्वनिसिद्धांत हा अर्थाविषयीचाच सिद्धांत असून काव्यातील शब्दांच्या अर्थाचे दोन प्रकार त्याने मानलेले आहेत. एक 'वाच्य' किंवा उघड झालेला, तर दुसरा 'प्रतीयमान' किंवा 'व्यंग' यांतला दुसरा काव्याच्या संदर्भात महत्त्वाचा असतो व त्याचा संबंध रसाशी असतो, असे संस्कृत परंपरेत मानले जाते.

विसाव्या शतकाच्या अखेरीला संगणक या यंत्राने अनेक क्षेत्रांत क्रांती घडवून आणली. भाषिक संशोधनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भाषेच्या शब्दसंग्रहाचे संशोधन करण्यासाठी, विशेषतः शब्दांच्या अर्थाची व्यवस्था लावण्यासाठी संगणकाचा उपयोग करता येईल, ही जाणीव निर्माण झाली. मानवी मनामध्ये शब्द व त्यांचे अर्थ हे सुटे-सुटे साठवलेले नसतात, तर विविध संबंधांनी बांधले गेलेले एक शब्दजाल वा अर्थजाल भाषा शिकताना निर्माण होत असते. खुर्ची या शब्दाचा अर्थ बसण्यासाठी वापरले जाणारे एक साधन असा केला, तर त्यात बसणे, वापरले जाणे, साधन अशा संकल्पना येतात; तसेच खुर्चीचे पाय, (असेल तर) हात, पाठ, बैठक, (असली तर) चाके इ. भागांनी मिळून खुर्ची बनते, त्याचप्रमाणे खुर्ची व बैठक, टेबल-खुर्ची, खुर्चीचे वेगवेगळे प्रकार (उदा., कार्यालयीन खुर्ची, आरामखुर्ची, जेवणाच्या टेबलाची खुर्ची इ.) असे सर्व पैलू मिळून शब्दांचे व अर्थाचे एक जाळेच आपण आत्मसात केलेले असते आणि विविध प्रकारेच अर्थ-संबंध (समानार्थता, विरुद्धार्थता इ.), असे दोन पैलू आपल्या मनोगत शब्दसंग्रहाला व अर्थसंग्रहाला (मेंटल लेक्झिकॉन) असतात. संगणकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही माहितीचा प्रचंड साठा करून त्याचा विविध प्रकारे वापर करण्याची त्याची शक्ती. या शक्तीचा वापर करून मनोगत शब्दसंग्रहासारखा संगणकीय शब्दसंग्रह तयार करता येईल, ही संकल्पना प्रिन्स्टन विद्यापीठातील भाषाविज्ञान व मनोविज्ञान या क्षेत्रांत संशोधन करणारे जॉर्ज मिलर व त्यांचे सहकारी यांनी १९८५ च्या आसपास मांडली आणि इंग्लिश भाषेचे संगणकीय शब्दजाल (वर्ड-नेट) निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. युरोपीय भाषांच्या संशोधकांना ही संकल्पना फार महत्त्वाची वाटली आणि फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, डच, जर्मन, मध्य व पूर्व युरोपातील बाल्कन भाषा-या भाषांचा मिळून `युरो-वर्ड-नेट' हे संगणकीय शब्दजाल उभारले गेले आहे. युरोपाबाहेर चिनी व रशियन संशोधकांनी या शब्दजालात भर घालून शब्दार्थाचे एक महाजालच निर्माण केले आहे. भारतीय भाषांच्या संदर्भात तमीळ, हिंदी व मराठीत संगणकीय शब्दजाल निर्माण करण्याचे मोठे प्रकल्प सुरू झालेले आहेत.

संदर्भ : 1. Fellbaum, Christine, Word Net : An Electonic Lexical Database, Cambridge, 1999.

2. Jacobovits, L. A.; Steinberg, D. D. Eds. Semantics : An Interdisciplinary Reader in Philosophy,

Linguistics and Psychology, Cambridge, 1971.

3. Leech, G. Semantics, Harmondsworth, 1974.

4. Lyons, J. Semantcs (2 Vols.), Cambridge, 1977.

5. Palmer, F. R. Semantics, Cambridge, 1981.

6. Pandeya, R. C. The Problem of Meaning in Indian Philosophy, Delhi, 1963.

७. काळे, कल्याण; सोमण, अंजली, संपा. वर्णनात्मक भाषाविज्ञान : स्वरूप आणि पद्धती, नासिक, १९८२.

८. केळकर, अशोक रा. मराठी भाषेचा आर्थिक संसार, औरंगाबाद, १९७७

९. मालशे, मिलिंद स. आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपाययोजना, मुंबई, १९९८.

लेखक: मिलिंद मालशे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate