অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षा

शिक्षा

वेदमंत्रांचे उच्चारण शुद्ध, अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून वैदिकांनी रचलेल्या शास्त्राला ‘शिक्षा’ म्हणतात. सहा वेदांगांपैकी शिक्षा हे पहिले वेदांग होय. यज्ञाचे इष्ट फल साध्य होण्यासाठी ऋत्विजांना मंत्रोच्चार शुद्ध व बिनचूक करणे, आवश्यक असल्यामुळे अशा शास्त्राची आवश्यकता होती. वेदमंत्रांतील अक्षरांच्या शुद्ध उच्चारांबरोबरच उदात्त (उच्च स्वर), अनुदात्त (नीच स्वर) आणि स्वरित (उच्च व नीच ह्या दोहोंच्या मधला स्वर) हे स्वरांचे प्रकार, छंदांचे प्रकार, पठनाच्या विविध पद्धती व व्याकरण ह्यांसंबंधीचे शिक्षा-ग्रंथ वैदिकांनी निर्माण केले. मूळचे शिक्षा-ग्रंथ सूत्रबद्ध असावेत; तसेच वेदांच्या वेगवेगळ्या शाखांसाठी ते वेगवेगळे असावेत, असा तर्क आहे. प्राचीन शिक्षा-ग्रंथ उपलब्ध नाहीत. तथापि ध्वनिशास्त्राविषयी मान्यताप्राप्त अशा सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या वैदिक शाखेनुसार विचार करणारे शास्त्रग्रंथ - प्रातिशाख्ये – मिळतात.

‘शिक्षा’ या विषयात, म्हणजे वेदमंत्रपठनात, काय शिकले पाहिजे, ह्याचे क्रमवार वर्णन तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीमध्ये आले आहे. वर्ण (अक्षर), स्वर, मात्रा (स्वरोच्चार करावयास लागणारा वेळ) –ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असे मात्रेचे तीन प्रकार, बल (उच्चाराची शक्ती), साम (पठनाची सुस्वरता वा समता) आणि संतान (अखंड पठन) ह्या सहा गोष्टी महत्त्वाच्या म्हणून तेथे सांगितल्या आहेत.

सध्या प्रचारात असलेल्या शिक्षा-ग्रंथांत पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा, वासिष्ठी शिक्षा शिक्षाअशा काही-ग्रंथांचा अंतर्भाव होतो. हे ग्रंथ बरेच अलीकडचे आहेत. त्यांतील पाणिनीय शिक्षा हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. ह्याच्या कर्त्यासंबंधीची माहिती मिळत नाही. पाणिनीच्या मतांना अनुसरुन रचलेल्या ह्या ग्रंथात ६० श्लोक आहेत. वर्णोच्चाराचे नियम व माहिती ह्यात दिलेली आहे.

लेखक: ना. ज. शेंडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate