অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिशुगीत

शिशुगीत

लहान मुलांसाठी रचलेली कविता म्हणजे शिशुगीत वा बालगीत. बरीचशी शिशुगीते ही लोकसाहित्याच्या मौखिक परंपरेतून चालत आलेली असतात आणि अर्थातच त्यांचे रचनाकार अज्ञात असतात. काही शिशुगीते त्या-त्या भाषेतील ज्ञात कवींनीही रचलेली असतात. सहजसोप्या तालासुरांत व ठेक्यांत गवसणारी सुबोध शब्दकळा; बालसुलभ कल्पकतेला रुपास आणणारा व रमविणारा नाट्यपूर्ण आशय व प्रतिमा आणि परिणामत: मुलांच्या हावभावांना, साभिनय प्रतिसादाला प्रवृत्त करणारी छोट्या चणीची बांधणी, ही शिशुगीताची काही वैशिष्ट्ये होत. शिशुगीत लहान मुलांच्या आंतरिक जीवनाशी, भावविश्वाशी जिव्हाळ्याचा संवाद साधते. त्यासाठी मुलांच्या स्वाभाविक वृत्ति-प्रवृत्तींशी समरस व्हावे लागते. वास्तव-अवास्तवांतील मर्यादेची रेषा सहजपणे पुसून टाकणारी विलक्षण कल्पनाशक्ती, इतरांचे अनुकरण करण्याच्या सहजप्रवृत्तींतून येणारी नाट्याभिनयाची आवड, लयतालांचे आकर्षण, निसर्गातील चंद्र-सूर्य, दिवस-रात्र, वृक्ष-वेली, फुले-फुलपाखरे, पशु-पक्षी, पाऊस-नद्या-समुद्र ह्यांविषयी वाटणारे प्रेम आणि कुतूहल ही बालमनाची वृत्तिवैशिष्ट्ये होत. शिशुगीतकाराला ह्या वृत्ति-प्रवृत्तींशी एकरूप होता येत असेल, तरच त्याच्याकडून चांगले ‘शिशुगीत’ निर्माण होऊ शकते.

‘आपडी थापडी, गुळाची पापडी’, ‘अडम तडम तडतड बाजा’, ‘अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं’, ‘इथे इथे बस रे मोरा, बाळ घाली चारा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का’, ‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली’, ही मराठीतल्या काही प्रसिद्ध शिशुगीतांची उदाहरणे. मराठीत कवी रेव्हरंड टिळक, मायदेव, दत्त, माधव जूलियन्, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशा काही आधुनिक कवींनी शिशुगीते लिहिलेली आहेत. त्यांपैकी विंदा करंदीकरांचे एक शिशुगीत असे: पेन्सिलीचे टोक न मोडावे म्हणून म्हणावयाचा हा ‘मंत्र’ पुढे दिला आहे -

तीन साले शाळेची l तीन साले वेळेची l

तीन साले चाकूची l तीन साले डाकूची l

तीन चोक तेरा l एक चाकू मारा l

डाकू डाकू डाकू l धारवाला चाकू l

पोलादाचे पान l टोक झाली छान l

लेखक: अ.र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate