অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिशुपालवध

शिशुपालवध

अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. कर्ता माघ. इ. स. सातव्या शतकाचा उत्तरार्ध हा माघाचा काळ मानला जातो. शिशुपालवधाच्या अखेरीस जोडलेल्या पाच श्लोकांत माघाविषयीची माहिती तृतीय पुरुषी निवेदनात दिलेली आहे. त्यावरून त्याच्या पित्याचे नाव दत्तक सर्वाश्रय होते, असे दिसते. त्याचा आजा सुप्रभदेव हा वर्मल नावाच्या कोणा राजाचा मंत्री होता, अशी माहिती ह्या श्लोकांतून मिळते.

ह्या महाकाव्याचे वीस सर्ग असून त्याची श्लोकसंख्या १६४५ आहे. शिशुपालवधाचा आरंभ आणि प्रत्येक सर्गाचा शेवट ‘श्री’ कारने झाला आहे. प्रस्तुत काव्याचा नायक कृष्ण असून ते वीररसप्रधान आहे.

ह्या महाकाव्यातील मूळ कथा, महाभारताच्या सभापर्वातील असून मूळ कथा थोडक्यात अशी: राजसूय यज्ञाच्या प्रसंगी अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्याचा सल्ला भीष्माने युधिष्ठिराला दिला; परंतु शिशुपालाने त्यास आक्षेप घेऊन कृष्ण-भीष्मांची अतिशय निर्भत्सना केली. शिशुपालाच्या आईस दिलेल्या वचनानुसार कृष्णाने त्याचे शंभर अपराध पोटात घातले; परंतु शिशुपालाने राजसूय यज्ञाच्या प्रसंगी वरीलप्रमाणे वर्तन करून ही मर्यादा ओलांडल्यानंतर कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. महाभारतातील ह्या मूळ सरळ कथेत माघाने बरीच भर घातली आहे. कृष्णाचा इंद्रप्रस्थापर्यंतचा प्रवास, वाटेतील रैवतक पर्वताचे वर्णन, श्रीकृष्णाला आपली फलपुष्पसेवा अर्पण करण्यासाठी त्या पर्वतावर प्रकटलेल्या सहा ऋतुंचे वर्णन, यादवांच्या विलासक्रीडा, प्रभाव इ. अनेक वर्णनविषय माघाने आपल्या काव्यात गोवले आहेत. ते काव्यानुकूल असले, तरी ते कथेचा ओघ खंडित करतात. त्यामुळे पहिल्या तीन सर्गानंतर लुप्त झालेले कथासूत्र नंतर तेराव्या सर्गात प्रकट होते.

माघाने शिशुपालवधाची रचना भारवीकृत किरातार्जुनीय या महाकाव्याच्या नमुन्यावर आणि भारवीला काव्यगुणांमध्ये मागे सारण्याच्या हेतूने केली आहे; हे दोन्ही काव्यांची संरचना, त्यांचा घाट, वृत्तयोजना, अलंकाररचना, चित्रबंध आणि प्रसंगसाम्य पाहता दिसून येते. व्याकरण, राजनीती, काव्यशास्त्र, वैद्यक इ. विविध विषयांतील आपले प्राविण्य दाखविण्याची वृत्ती, तसेच चित्रबंधरचना, अलंकारांची अतिरेकी सजावट ह्यांमुळे माघाची कवित्वशक्ती अनेक ठिकाणी गुदमरून गेली आहे, तसेच काव्यरचनेत कृत्रिमताही आलेली आहे. भाषाप्रभुत्व, अभिनव शब्दयोजना, कल्पनाविलास ह्यांतून रसिकांना आव्हानप्रद ठरणारी जटिल गुणवत्ता या महाकाव्यात निर्माण झाली आहे. उत्तरकालीन अभिरुचीचा आणि काव्यरचनेचा माघ हा आदर्श ठरला. कालिदासाचे उपमाकौशल्य, भारवीचा अर्थगौरव आणि दंडीचे पदलालित्य हे तीनही गुण माघाच्या या महाकाव्यात एकवटले आहेत, असे प्राचीनांचे मत होते. भारवीच्या किरातार्जुनाप्रमाणे माघाचे शिशुपालवधही लोकप्रिय होते, हे त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक टीकांवरून स्पष्ट होते.

लेखक: अरविंद मंगळूरकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate