অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शुद्धलेखन (ऑर्थोग्राफी)

प्रस्तावना

भाषेच्या प्रमाण रूपाचे प्रमाण लेखन म्हणजे शुद्धलेखन, असे सामान्यपणे म्हणता येईल. समाजात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेच्या लेखनाचे संकेत हे पुढील घटकांवर अवलंबून असतात : त्या भाषेचे प्रमाण स्वरूप, तिची उच्चारणपद्धती, त्या समाजाने लेखनासाठी स्वीकारलेल्या लिपीची क्षमता, भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरणिक भेद दाखवण्यासाठी त्या समाजाने घेतलेली भूमिका, लेखनाची रूढ झालेली पद्धत इ. सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन जी समाजमान्य लेखनपद्धती अस्तित्वात येते; तिला त्या समाजाच्या भाषेचे शुद्धलेखन म्हणतात. शुद्धलेखनाच्या नियमांना आणि संकेतांना धरून त्या भाषेतील लेखन व्हावे, अशी अपेक्षा असते.

भाषेचे उच्चारण व लेखन

भाषेचे उच्चारण आणि तिचे लेखन ही दोन्ही सारखीच असतात, लेखन हे बोली भाषेचा जणू आरसाच होय, या समजुती चुकीच्या आहेत. भाषा ही मानवनिर्मित मौखिक ध्वनींपासून बनलेल्या चिन्हांची सामाजिक संप्रेषणासाठी आवश्यक ठरलेली एक व्यवस्था आहे. कोणतीही चिन्ह-व्यवस्था ही मूळ वास्तवाची प्रतीकमात्र असते; ती त्या वास्तवाचे एकास एक तंतोतंत जुळणारे प्रतिरूप सहसा होऊ शकत नाही. लेखन हीसुद्धा भाषिक चिन्हांचे प्रतिनिधित्व करणारी व भाषिक संदेशांना स्थैर्य देणारी अक्षररूप अशा दृश्य चिन्हांची व्यवस्था आहे. ही व्यवस्था भाषेतील शब्दांचे प्रतीक म्हणून वापरली जाते; ती भाषिक वास्तवाचे हुबेहूब प्रतिरूप ठरेल, अशी काटेतोल लेखनपद्धती जगात कोणत्याही भाषेला नाही. प्राचीन काळी बोली भाषेचे हुबेहूब प्रतिरूप निर्माण करण्याच्या उद्देशाने लेखनव्यवस्था अस्तित्वात आली असे मानले, तरी ती काळाच्या ओघात तशी राहूच शकणार नाही. मौखिक भाषेच्या परिवर्तनाचा वेग हा लिखित भाषेच्या परिवर्तनाच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक असतो. लिखित भाषेची प्रवृत्ती स्थैर्याकडे असून त्यामानाने बोली भाषा ही अधिक परिवर्तनशील असते. त्यामुळे दोहोत एकरूपता कधीकधी असलीच, तरी ती काळाच्या ओघात ढळते. परिणामतः लेखनव्यवस्था ही बोलीस्वरूपातील भाषाव्यवस्थेपेक्षा भिन्न होत जाते. त्यामुळे भाषा व तिची लिपी यांच्यात विसंगती निर्माण होते. अशा वेळी तडजोड स्वीकारूनच काम चालवले जाते. याबाबतीत त्या त्या समाजाचे संकेत ठरलेले असतात. 'मुलगा' या शब्दातील 'ल' हे अक्षर उच्चारणात स्वररहित असले, तरी लेखनात मात्र ते स्वरयुक्त दाखवले जाते. शब्दांचे बोलीतील रूप लेखनात ज्या रूपात व्यक्त होते, त्याला त्या शब्दाचे स्पेलिंग म्हणतात. स्पेलिंग म्हणजे शब्दलेखनाचे रूढ संकेत. प्रत्येक लिखित भाषेला स्पेलिंग अथवा शब्दलेखनसंकेत असतातच.

शुद्धलेखनाची व्याप्ती

शुद्धलेखनाच्या संदर्भात पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत : (१) शुद्धलेखनाचा प्रश्न फक्त प्रमाणभाषेच्याच लेखनाशी निगडित आहे. बोली भाषेच्या लेखनाला तो लागू नाही. बोली भाषेच्या लेखनात उच्चारणानुसार लेखन एवढे एकच तंत्र वापरले जाते. अर्थात तेथेही संकेत नसतातच असे नाही. मराठी साहित्यात ग्रामीण, दलित इ. साहित्यप्रकारांत वास्तवदर्शनासाठी विविध बोलींचा वापर होत असतो. तेथे शक्यतो उच्चारानुसार लेखन होत असते. शुद्धलेखनाच्या इतर नियमांकडे लक्ष द्यावे, अशी तेथे अपेक्षा नसते. वास्तविक पाहता बोली व्यवहारात शुद्ध-अशुद्ध असा भेद केला जात नाही. ज्यायोगाने संप्रेषण चांगले होईल, ते सर्व शुद्धच मानायला हवे. पण लेखनव्यवहारात मात्र आदर्शवादी भूमिका घेतली जाते. तेथे लेखन तात्कालिक व्यवहारासाठी करायचे नसते. उपस्थित-अनुपस्थित, सद्यःकालीन-भविष्यकालीन अशा सर्वच लोकांसाठी ते करावयाचे असल्याने तेथे मात्र आदर्शवादी, प्रामाण्यवादी भूमिका स्वीकारावीच लागते. (२) वर्तमानपत्रे, नियतकालिके, नभोवाणी, दूरचित्रवाणी यांसारखी प्रसारमाध्यमे; शासकीय तथा न्यायालयीन कामकाज, तसेच शैक्षणिक संस्था, उद्योगव्यवहारकेंद्रे, खाजगी संस्था यांचे कामकाज; जाहिराती, पाठ्यपुस्तके, वैचारिक पुस्तके इ. बाबतींत प्रमाण भाषेचाच वापर होत असतो. तेव्हा तेथे मात्र शुद्धलेखनाचीच अपेक्षा असते. (३) शुद्धलेखन विचारात केवळ लेखनाच्या संदर्भातीलच प्रश्न नसतात, तर इतरही अनेक बाबींचा विचार असतो. लेखनाचे पुनर्वाचन करताना ते अपेक्षित शब्दांपेक्षा वेगळे होऊ नये, यासाठी लेखन सुवाच्य आणि रूढ संकेतांना धरून व्हावे, अशी अपेक्षा असते. मराठी लिपीतील काही अक्षरे इतर अक्षरांशी इतकी मिळतीजुळती असतात, की त्यांमुळे खूप घोटाळे होण्याची शक्यता असते. उदा., य-थ, म-भ, र-ट, ट-ढ, ख-र व, ड-इ या अक्षरांचे लेखन सुवाच्य आणि सावधपणे केले जाणे, हा लेखनाच्या संदर्भातील प्रश्न म्हणता येईल. ऐ (ए), एै (ऐ) असे चुकीचे लेखन केवळ लेखनसंकेतांच्या अज्ञानामुळेच होते. द्ध (द्ध), न्ती (त्नी), व्द (द्व), ब्द (द्ब), त्प (प्त) या जोडाक्षरांच्या लेखनातील बारकाव्यांचे अज्ञान हा प्रश्नही लेखनाशीच निगडित आहे. शिरोरेखा, अक्षरांची वळणे, उकार, वेलांटी, रफार इत्यादींबाबतचे अज्ञान हे सर्व लेखनाच्या संदर्भातील प्रश्न आहेत. ऱ्हस्व-दीर्घ, विरामचिन्हे, काही अनुस्वार (शरणांगत, संयुक्तिक) इ. प्रश्न उच्चारणांशी संबंधित आहेत. इतर अनेक प्रश्न भाषेचे अज्ञान, व्याकरणाचे अज्ञान, व्युत्पत्तीचे अज्ञान यांच्याशी संबंधित आहेत. उपहारगृह (उपाहारगृह), पुनरावलोकन (पुनरवलोकन), कोट्याधीश (कोट्यधीश), पुनर्प्रक्षेपण (पुनःप्रक्षेपण) वगैरे संधिनियमांच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका आहेत. पृथःकरण (पृथक्करण), अंधःकार (अंधकार), (अल्पसंख्यांक) अल्पसंख्याक इ. चुका शब्दसिद्धीच्या अज्ञानातून निर्माण होतात. सहस्त्र (सहस्र), पूर्वापार (पूर्वापर), दक्षणा (दक्षिणा) इ. चुका भाषेच्याच अज्ञानामुळे होतात. कंडॉक्टर (कंडक्टर), ओव्हरऑयलिंग (ओव्हरहाउलिंग) इ. शब्द अज्ञान अथवा अतिदक्षता यांमुळे निर्माण होत असतात. (४) शुद्धलेखन हे फक्त सुट्या शब्दांपुरतेच मर्यादित असते, ही चुकीची समजूत आहे. सुट्या शब्दांचे लेखन, शब्दान्तर्गत संधी, शब्दांचे सामान्यरूप तसेच अनेकवचनी रूप इ. विकार, समासान्तर्गत रूपे, शब्दसिद्धी यांच्याबरोबरच कर्तुपदाचा क्रियापदाशी मेळ (येथे फूले, फुलांचे हार, फुलांचे गुच्छ मिळेल). विशेषणांचा विशेष्यांशी मेळ (मोहमयी वातावरण), चुकीचे प्रयोग (असंदिग्ध बोलू नकोस, संदिग्ध बोल, माझ्या अपरोक्ष बोलू नकोस, परोक्ष बोल); संबंधी शब्दांचा असमतोल (जो-तो, जेव्हा-तेव्हा, जरी-तरी, जर-तर इ.), एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी अनुबंध नसणे, लेखनातील विचारांचा परस्परांशी ताळमेळ नसणे इ. लेखनदोषही शुद्धलेखन विचारात समाविष्ट करण्याची गरज आहे. (५) लिपिसुधारणा, लिपिज्ञान, अक्षरांची वळणे, वर्णमाला, वर्णांची आनुपूर्वी परिभाषानिर्मिती, भाषाप्रदूषण (फार्सी शब्दप्रचुर भाषा, इंग्रजी शब्दप्रचुर भाषा, संस्कृतप्रचुर भाषा, ग्राम्य शब्दप्रचुर भाषा इ.), विरामचिन्हे इ. विषय प्रत्यक्ष शुद्धलेखनाचे नसले, तरी तत्संबंधातील आहेत. भाषालेखनाच्या विचारात संलग्न ज्ञानविषय म्हणून तेही विषय शुद्धलेखनाच्या जोडीने विचारात घेतले पाहिजेत.

अधिक माहिती साठी क्लिक करा मराठी विकासपीडिया

माहिती स्रोत: मराठी विकासपीडिया

अंतिम सुधारित : 5/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate