অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शैलीविचार

शैलीविचार

साहित्याच्या भाषेतील विविध प्रकारची आलंकारिकता, वाक्यविन्यास, पदबंध तसेच सामान्य व्यवहारातील भाषेपासूनचे विचलन आदी भाषिक वैशिष्ट्यांचा पद्घतशीर, शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे शैलीविचार वा शैलीविज्ञान (स्टायलिस्टिक्स) होय. वरील भाषिक वैशिष्ट्यांनी साहित्याची शैली घडत असते.

सामान्य व्यवहारात शैली या शब्दाचे रीत, पद्घत, लकब, वळण, ढब, धाटणी, कौशल्य, वैशिष्ट्य, तंत्र असे अनेक अर्थ संभवतात. शैली हे मानवी व्यवहारांना आल्हाददायक रूप देणारे एक तत्त्व आहे. एखादया द्रव्याला विशिष्ट माध्यमाव्दारे विशिष्ट रूपामध्ये प्रकट करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या तंत्रसमुच्च्याची पद्धती म्हणजे शैली, अशी व्याख्या स्थूलमानाने करता येईल.

कला-साहित्यव्यवहारातदेखील ‘ शैली ’ (स्टाइल) ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. साहित्यकृतीचे द्रव्य (आशय = अर्थ), माध्यम (भाषा) आणि रूप (वाङ्‌मयप्रकार) ही शैलीची तीन परिमाणे असल्यामुळे शैलीला अनेक बाह्य संदर्भही आपोआप लागू होतात. हे संदर्भ एकाच साहित्यकृतीतील असल्यामुळे ते परस्परव्यापी व परस्परसंलग्न असतात. व्यापक अर्थाने शैलीच्या अभ्यासात वरील तिन्ही परिमाणे येत असल्याने, शैलीच्या अभ्यासातून अशा रीतीने सबंध कृतीचे अंतरंग स्पष्ट होऊ शकते. आशय, भाषा आणि वाङ्‌मयप्रकार यांचा संयोग घडून येताना जी विविध तंत्रे वापरली जातात, त्या तंत्रांचा अभ्यासही शैलीविचारात मोडतो.

शैलीचा पारंपरिक साहित्यसमीक्षेत होणारा विचार हा अनेकदा सुस्पष्ट नसतो. शैलीला प्रासादिक, ओघवती, नाट्यमय इ. विशेषणे यावेळी विभिन्न अर्थच्छटांनी लावली जातात. भाषाशास्त्राच्या आधारे शैलीचा करण्यात येणारा विचार म्हणजे शैलीविज्ञान होय. हा विचार वस्तुनिष्ठ, लेखक-वाचक-निरपेक्ष असल्याने त्याची विज्ञानात गणना केली जाते. पाश्चात्त्य विद्वान शैलीचे साहित्यशैली आणि भाषाशैली असे दोन भाग मानतात. भाषाशैलीचा विचार हा प्रामुख्याने आधुनिक भाषाशास्त्राच्या आधाराने होतो.

प्राचीन काळापासूनच शैली हा अभ्यासाचा विषय ठरला आहे.  ॲरिस्टॉटल,  सिसरो,  मार्कस फेबिअस क्विंटिल्यन  आदी प्राचीन विचारवंतांनी शैली हे ‘ विचाराचे यथार्थ अलंकरण ’ मानून तिचा अभ्यास केला. प्रबोधनकाळातही हाच दृष्टिकोण प्रभावी होता व त्यातून शैलीत वापरल्या जाणाऱ्या तंत्र-प्रयुक्त्यांचा अभ्यास सुरू झाला.  जॉनाथन स्विफ्ट चे शैली म्हणजे ‘ योग्य जागी योग्य शब्द ’ हे अवतरणही (१७२१) त्या काळी प्रसिद्घ होते. साहित्यकृतीचे बाह्य संदर्भ टाळून केवळ तिच्या रूपांतर्गत घटकांचाच प्रामुख्याने विचार व्हावा, असा प्रवाह एकोणिसाव्या शतकात सुरू झाला.  सॅम्युएल टेलर कोलरिज,  एडगर ॲलन पो,  टी. ई. ह्यूम,  टी. एस्. एलियट व प्रामुख्याने  आय्. ए. रिचर्ड्स  प्रभृतींनी कलाकृतीच्या संरचनेवर अधिक भर देणारे विवेचन केल्याने शैलीविचाराला टीकाशास्त्रात असाधारण महत्त्व प्राप्त झाले. साहित्यकृतीच्या संहितेत लेखकाने जाणीवपूर्वक योजिलेल्या भाषेचा अभ्यास हा पर्यायाने शैलीचाच अभ्यास ठरला. आय्. ए. रिर्चड्सच्या प्रॅक्टिकल किटिसिझम (१९२९) या गंथामुळे भाषिक प्रयोगांच्या विशिष्ट योजनेचा अभ्यास रूढ झाला. आधुनिक शैलीविज्ञानाचा उदय विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला.  फेर्दिनां द सोस्यूर  व त्याचा शिष्य स्विस भाषाशास्त्रज्ञ चार्ल्स बॅली (१८६५-१९४७) यांनी महत्त्वपूर्ण शैलीविचार मांडले. बॅलीच्या अनुयायांच्या मते, अभिव्यक्तीच्या अनेक पर्यायी रूपांतून निवडीची जी शक्यता उद्‌भवते, तीतून भाषिक शैली जन्म घेते. या विचारांचा प्रभाव आधुनिक शैलीविज्ञानावर विशेषत्वाने पडला. शैलीत भाषेचा वापर निवडीच्या तत्त्वानुसार होत असतो, निवड हा शैलीचा महत्त्वाचा धर्म आहे, अशा स्वरूपाची विचारधारा त्यातून विकसित झाली.  एडवर्ड सपीर ने रूपाधिष्ठित व आशयाधिष्ठित असे साहित्याचे वर्गीकरण लँग्वेज (१९२१) या गंथात करून शैलीविचारात महत्त्वाची भर घातली. साधारणत: १९५० च्या दशकापासून आधुनिक शैलीविज्ञान खूपच प्रगत होत गेले. तत्कालीन प्रचलित अशा व्यक्तिनिष्ठ व संस्कारवादी समीक्षापद्धतीला विरोधी अशी वस्तुनिष्ठ व शास्त्रीय वाङ्‌मयीन शैली-विश्लेषणपद्धती या शाखेने  विकसित  केली.  रशियन  भाषाशास्त्रज्ञ,  चिन्हमीमांसक  व साहित्यसमीक्षक रोमान याकॉपसन (१८९६-१९८२) व अन्य रूपवादी पंथाच्या समीक्षकांनी शैली-विश्लेषणाच्या शास्त्रीय पद्धतीवर भर देणारी विचारसरणी प्रामुख्याने विकसित केली व तिला अनुसरून उपयोजित शैलीनिष्ठ समीक्षेचे नमुनादर्श प्रस्थापित केले. याकॉपसनप्रमाणेच आर्चिबॉल्ड हिल, रूलॉन वेल्स आदी भाषावैज्ञानिकांनीही मौलिक लिखाण करून शैलीविचारात महत्त्वपूर्ण भर घातली. या सर्वांचे लेख सीमोर चॅटमन व सॅम्युएल आर्. लेव्हिन यांनी संपादिलेल्या एसेज ऑन द लँग्वेज ऑफ लिटरेचर (१९६६) या गंथात संगृहीत केलेले आहेत.

भाषाशास्त्रीय दृष्ट्या  साहित्यातील  भाषेची  पदरचना  तपासणे,  साहित्यातील शैलीची वस्तुनिष्ठ तत्त्वे शोधणे, शैलीचे सौंदर्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय संदर्भ शोधणे, शैलीच्या विविध परिमाणांवरून साहित्यिक भाषेचे विश्लेषण करणे आणि भाषाशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे शैलीचे स्वरूप ठरविणे, ही आजच्या शैलीविचाराची प्रमुख अंगे आहेत. साहित्यात वापरलेल्या भाषेत काही विशिष्ट खुब्या, तंत्रप्रयुक्त्या वा क्लृप्त्या (डिव्हाइसेस) इ. वैशिष्ट्ये असतात. त्यांचा शोध घेण्यासाठी संहितेची भाषा पिंजून काढण्याकडे आधुनिक शैली-विज्ञानाचा कल दिसतो. शैलीविज्ञानात अनेक संप्रदाय, पंथ-उपपंथ, विचारप्रवाह आहेत. शैलीच्या घटकांवरून साहित्यिकाच्या मनोवृत्तीचा निर्देश करणे, प्रतिमांचा अभ्यास करून त्यांच्या अर्थव्यामिश्रतेतून आशयाचे दर्शन घडविणे, पदरचनांमधील लयतत्त्वे शोधून काढणे, वाक्यरचनाभ्यास पद्धतीने संहितेतील शब्द  शब्दसमुच्च्य  वाक्यांश  वाक्य यांच्या  रचनेची वैशिष्टये शोधणे, सांख्यिकी पद्धतीने भाषिक वैशिष्टयंच्या पुनरा-वृत्ती यांसारख्या विविध प्रवृत्ती शोधून शैलीसंबंधी आडाखे पुरविणे, संदर्भांवरून भाषिक वैशिष्ट्यांचा अर्थलावणे, असे विविध संप्रदाय शैलीविज्ञानात आहेत.

शैलीविज्ञानाच्या व्यापक कार्यक्षेत्रात साधारणपणे पुढील बाबींचा समावेश होतो : एखादया राष्ट्रातील साहित्याच्या भिन्नभिन्न कालखंडांतील शैलींत पडलेल्या फरकांचा अभ्यास करणे; एका कालखंडातील भिन्नभिन्न लेखकांच्या शैलींतील सामान्य गुणधर्मांचा शोध घेणे; एकाच लेखकाच्या साहित्यातील अलंकार, प्रतिमासृष्टी यांचा अभ्यास करणे; विशिष्ट साहित्यकृतीची संरचना आणि तिची शैली यांच्यांतील संबंध तपासणे; लेखकाच्या शब्दसंग्रहाचा अभ्यास करणे, त्यातील व्याकरणिक वैशिष्ट्यांचा (उदा., भाववाचक नामे, विशेषणे, गौण वाक्ये, प्रश्नार्थक वाक्ये इ.) संख्यात्मक अभ्यास करणे; भाषेच्या विविध उपयोगांचे, आकृतिबंधांचे, साहित्यकृतीच्या भाषिक आणि कलात्मक पैलूंचे अध्ययन करणे इत्यादी.

पारंपरिक साहित्यसमीक्षेत शैलीचा विचार हा प्रामुख्याने साहित्य-कृतीच्या बाह्यरंगाचा होता. अलंकरण हे शैलीचे वैशिष्ट्य प्राचीन पाश्चात्त्य आणि भारतीय साहित्यचिकित्सकांनी मानले होते. भरताच्या नाट्यशास्त्रात गुण, रस, अलंकार या तिहींचा उल्लेख होतो; परंतु अलंकारशास्त्र आणि रससिद्धांत यांची वाढ संस्कृत साहित्यविचारात जोमाने झाली.  मम्मटा च्या काव्यशास्त्रावरून याची कल्पना येईल. अलंकारशास्त्रात साहित्यकृती सजविण्याच्या प्रयत्नांची चर्चा येते. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध यांदरम्यानच्या काळातील मराठी साहित्यसमीक्षेचा आढावा घेतला, तर संस्कृतातील याच परंपरेचा पगडा मराठी साहित्यसमीक्षेवर दिसतो.

ॲरिस्टॉटलचा साहित्यविचार हा तत्त्वज्ञानाच्या अंगाने आला. संस्कृतातील अलंकारशास्त्र मात्र व्याकरणाच्या अंगाने आले. अलंकार आणि गुणदोष यांची चर्चा संस्कृत साहित्यचिकित्सकांनी प्राय: व्याकरणाच्या पायावरच केली. रसचर्चा मात्र याला अपवाद होती. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना असे तीन अर्थभेद संस्कृत व्याकरणकार मानतात. अलंकाराचा विचार हा प्रामुख्याने लक्षणेवर आणि व्यंग्यार्थावर अवलंबून आहे.  भाषेचे  विशेषत: शब्दाचे किंवा पदाचे   रूप याचा विचार गुणदोष विचारात होतो. भामह, रूद्रट आणि दंडी यांनी गुणविचार विस्ताराने मांडला; पण ध्वनी आणि अर्थ, पदरचना आणि वाक्यरचना या दोहोंच्या आधारे भाषेच्या रूपाचा विस्तृतपणे विचार केला, तो वामना ने. शब्दांची विशिष्ट ठेवण म्हणजे रीती आणि रीती हे काव्यत्वाचे प्रमुख कारण, असा  रीतिसिद्धांत वामनाने मांडला. इतर शास्त्रांना दूर ठेवून केवळ भाषेच्या अंगाने साहित्य-कृतीचा विचार करणारा वामन आणि त्याचा रीतिसिद्धांत हा आधुनिक शैलीविज्ञानाला खूपच जवळचा वाटतो. शब्दगुण आणि अर्थगुण अशी विभागणी करून संस्कृत साहित्यातील उदाहरणे देत वामन रीती  म्हणजे शैली  हा काव्याचा अंतर्भाग आहे असे सांगतो; अलंकार हे वरून सजवायचे बाह्य उपचार होत. गुणाविना काव्य नाही. सर्वगुणसंपन्न अशी ‘ वैदर्भी ’ रीती; तर ओज आणि कांती या गुणांना प्राधान्य देणारी ‘ गौडी ’ रीती, असे वर्गीकरण त्याने केले आहे. गुणांचा ‘ विपर्यय ’ म्हणजे अभाव किंवा विरोध  हा दोष होय. वामनाच्या चिकित्सेत संस्कृतचे भाषिक बारकावे सहजपणे मांडले जातात. उदा., खटकणाऱ्या शब्दांचा वापर टाळणे यात ‘ सौकुमार्य ’ हा गुण आहे; तर काव्यपंक्तींमध्ये सुटीसुटी पदे वापरली, तर ‘ माधुर्य ’ हा गुण येतो. काव्यपंक्तीतील पदरचना ही नृत्यातील पदन्यासाप्रमाणे असली, तर ‘ उदारता ’ हा गुण येतो. हे सर्व शब्दरूपाचे गुण होत. काव्यकल्पतेत असंबद्धता नसणे हा अर्थगुण सौकुमार्य; तर उक्तिवैचित्र्य जाणविणे म्हणजे अर्थगुण माधुर्य होय.

जुन्या पठडीतले, व्युत्पत्तिशास्त्राकडून शैलीचिकित्सेकडे वळलेले काही अभ्यासक पाश्चात्त्य साहित्यविचाराच्या परंपरेत दिसतात. दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या छळाला कंटाळून देशांतर करणारे हे अभ्यासक होते. लिओ स्पिट्झर (१८८७-१९६०) हा भाषाभ्यास आणि वाङ्‌मयेतिहास यांची सांगड घालणारा शैलीचिकित्सक होता. एरिक आउरबाक (१८९२-१९५७) या जर्मन भाषातज्ज्ञाने  होमर चे इलियड हे महाकाव्य, ओल्ड टेस्टामेंट आणि  व्हर्जिनिया वुल्फ चे काव्य असा मोठा पट मांडून पाश्चात्त्य साहित्यातील वास्तवदर्शनाचा वेध घेतला आणि त्यातून पाश्चात्त्य संस्कृतीविषयी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. ऑलॉन्सोने साहित्याच्या आस्वादनाच्या तीन पद्धती मांडून शैलीचिकित्सकाचे महत्त्व विशद केले. फेर्दिनां द सोस्यूरने १९१६ मध्ये चिन्हव्यवस्थेचा सिद्धांत मांडला. त्याचा साहित्यविचाराच्या संदर्भात झालेला परिणाम म्हणजे रशियन रूपवाद आणि प्राग पंथाची शैलीचिकित्सा या प्रणाली होत. साहित्याची आणि साहित्याभ्यासाची विशेषता व स्वायत्तता मानणारा साहित्यविचार रशियन साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात १९१४ ते १९३० या कालखंडात विकसित झाला, तो ‘ रशियन रूपवाद ’ या नावाने ओळखला जातो. व्हीक्तर श्क्लॉव्हस्की (१८९३-१९८४) हा रशियन साहित्यमीमांसक या  पंथाचा आद्य प्रणेता होता. मॉस्को भाषाविज्ञान मंडळाच्या (१९१५) व्यासपीठावरून रूपवाद मांडला गेला; तर प्राग भाषामंडळाच्या (१९२६) व्यासपीठावरून प्रथम रूपवादी आणि नंतर संरचनावादी भाषाविचार व साहित्यविचार मांडला गेला. रोमान याकॉपसन हा भाषाशास्त्रज्ञ या दोन भाषामंडळांना जोडणारा दुवा होता. या पंथातील श्‌क्लॉव्हस्कीचे विचार स्वतंत्र होते; तथापि याकॉपसनच्या विचारसरणीवर मात्र सोस्यूरचा प्रभाव आढळतो. साहित्य ही एक चिन्हव्यवस्था आहे, ती स्वतंत्र रचना आहे,  हा यामागील मूलभूत सिद्धांत होय. साहित्यकृतीमध्ये वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जातात आणि या क्लृप्त्यांची गुंफण करणारे तत्त्व म्हणजे शैली, असे श्‌क्लॉव्हस्की म्हणतो. विशिष्ट क्लृप्ती वापरून विशिष्ट परिणाम घडेल, असे समीकरण मांडता येत नाही; कारण संदर्भानुसार परिणाम बदलतो. उदा., दोन परस्परविरोधी शब्दांतून विनोदही निर्माण होतो आणि कारूण्यही निर्माण होते. ‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ’ यात संदर्भामुळे कारूण्य जाणवेल, तर ‘ भिकारनगरीचा राजा ’ यात संदर्भामुळेच विनोद जाणवेल. देशकाळाच्या मर्यादा ओलांडून साहित्यातील क्लृप्त्या या सौंदर्यनिर्मिती करत असतात. उदा., कवितेतील अनुप्रास ही क्लृप्ती विशिष्ट देशाची, विशिष्ट भाषेची मक्तेदारी असत नाही. साहित्याच्या निर्मितीचा विचार केवळ आर्थिक व सामाजिक स्तरांवर करण्यात साहित्याचा अंतरात्मा हरवला जातो. साहित्याला निर्मितीचे स्वायत्त नियम आहेत. या आंतरिक नियमांचा शोध घेणारे रूपवादी हे शैलीविज्ञानाच्या मूलभूत तत्त्वाशी नाते जोडणारे आहेत. रशियन समीक्षक व्लादिमीर प्रॉप (१८९५-१९७०) यांनी मार्‌फॉलॉजी ऑफ द फोक टेल (१९२८) मध्ये रशियन लोककथांची केलेली चिकित्सा, ही याचे एक चांगले उदाहरण आहे.

रशियन रूपवादाचेच एक अंग असणारे प्राग भाषामंडळाचे शैलीविज्ञान हे भाषाशास्त्राच्या भक्कम पायावर उभारलेले आहे. अभिव्यक्तींच्या पर्यायी पद्धतींचा विचार म्हणजे शैलीविज्ञान, अशी या पंथाची धारणा आहे. केवळ साहित्यालाच नव्हे, तर प्रत्येक अभिव्यक्तीला शैली असते. शैलीचा असा व्यापक विचार प्राग पंथात होतो. अभिव्यक्तीमागचे प्रयोजन, अभिव्यक्ती कोण कुठे करतो हा संदर्भ, अभिव्यक्तीसाठी वापरलेला भाषेचा ढाचा   लिखित वा मौखिक  इ. घटकांवरून शैली ठरते. तीत व्यक्तीची इच्छा  हा आणखी एक घटकही असतो. जेव्हा व्यक्तीची इच्छा, आवड यांचा प्रभाव क्षीण असतो, तेव्हा वस्तुनिष्ठ शैली तयार होते. संशोधनपर लेखन, निबंधलेखन, कार्यालयीन पत्रव्यवहार, न्यायालयातील विविध लेखी  व्यवहार, वाणिज्य क्षेत्रातील निविदा, प्रकटन, नोटीस यांसारख्या लेखनप्रकारांत वस्तुनिष्ठ शैली आढळते. लेखकाच्या व्यक्तिगत आवडीनिवडींचा, किंबहुना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा साहित्यनिर्मितीत जिथे मोठया प्रमाणात उमटलेला दिसतो, त्यातून व्यक्तिनिष्ठ शैली निर्माण होते. काव्याची शैली व्यक्तिनिष्ठ असते. वैज्ञानिक, तंत्रविषयक, संभाषणात्मक, काव्यलक्षी असे विभिन्न शैलीप्रकार मानून प्राग पंथाने सर्वच भाषिक अभिव्यक्ती  शैलीचिकित्सेत आणली.

प्राग पंथाच्या मते भाषा आणि भाषाव्यवहार हा सवयीचा भाग आहे. भाषासंप्रेषणात  संभाषण किंवा लेखन यांत  काही रूढी पाळल्या  जातात; व्यक्तीला त्या पाळाव्या लागतात. ‘ काय कसं काय? ’ म्हटल्यावर ‘ ठीक आहे ’ किंवा ‘ छान ’ यासारखे प्रतिसाद संकेताने दिले जातात. पत्रलेखनात ‘ सप्रेम नमस्कार ’येतेच; त्याची अखेर ‘ आपला ’, ‘ स्नेहांकित’ वगैरे शब्दांनी करण्याचा रिवाज आहे. सामाजिक स्तरावरचा भाषाव्यवहार हा असा मोठया प्रमाणात संकेतबद्घ असतो. ‘ तानमान राखा ’, ‘ मानपान राखा ’, ‘ त्याला बोलण्याचा पाचपोच नाही ’, ‘ तो औचित्यपूर्ण बोलतो ’, ‘ भलतंच काय बडबडतोयस् ? ’, ‘ असं म्हणू नये ’ -यांसारखी वक्तव्ये ही संकेत मोडल्याची प्रतिक्रिया म्हणून येतात. काव्यात्मतेचे प्रमुख लक्षण म्हणजे हे संकेत मोडणे. सीमित अर्थाने यास ‘नियमोल्लंघन ’, ‘ विपथन ’ वा ‘ विचलन ’ असे म्हणतात. मर्ढेकरांची ‘ पिपांत मेले ओल्या उंदिर ’ ही काव्यपंक्ती म्हणजे स्पष्टपणे जाणवणारे नियमोल्लंघन होय. प्रत्यक्ष संभाषण आणि नाटकातील संवाद यांची भाषिक संकेतांच्या आधारे तुलना केली, तर संकेतभंगातून साहित्यिकता कशी येते, हे लक्षात येईल. लहान मुलाला भाषा ही सर्वस्वी नवीन असते; संकेत अजून कळायचे असतात. त्यामुळे  ते मूल भाषेकडे एका सतेज दृष्टीने पाहू शकते, खेळू शकते. ‘ बदक ’, ‘ तबक ’ यांतील ध्वनिसाधर्म्य त्याला आकर्षित करते. ‘ ती नाकात गाते ’ या वाक्यातील ‘ नाकात गाणे ’ असे क्रियापद न करता ‘ नाक ’ हे गाण्याचे स्थलदर्शक विशेषण घेऊन ते हसू शकते. ‘ तो रडत बसलाय ’ असे मोठया माणसाने म्हटल्यावर ‘ तो रडत उभा आहे ’ असे म्हणून चूक दाखवू शकते. साहित्यकार हा लहान मुलाच्या सतेज दृष्टीने भाषेकडे पाहू शकतो. साहित्यनिर्मितीला अशी टवटवीत दृष्टी आवश्यक असते. संकेत बाजूला सारणे म्हणजे अनोखीकरण करणे. अनोखीकरण (डी-फॅमिल्यरायझेशन) हे साहित्याचे मुख्य सूत्र प्राग पंथ मानतो.

रशियन रूपवाद आणि प्राग पंथीय भाषाविज्ञान यांचा उत्तम संगम याकॉपसनच्या शैलीविचारात दिसतो. काव्यशास्त्र हे भाषाविज्ञानाचे एक उपांग आहे, असा याकॉपसनचा दावा आहे. भाषेची विविध कार्ये तो मानतो. कोणत्याही भाषाव्यवहारात एकापेक्षा जास्त कार्ये घडत असतात. फक्त त्यांतील एक कार्य प्रधान असते. भावना व्यक्त करणे हे त्यांपैकी एक कार्य होय. माणसे स्वतःविषयी कळकळीने बोलतात, तेव्हा हे कार्य होते. काव्यत्व हे साहित्यामध्ये दिसणारे कार्य. ‘ ने मजसी ने परत मातृ-भूमीला । सागरा प्राण तळमळला ’ या सावरकरांच्या काव्यपंक्तीत भावना व्यक्त होते; पण प्राधान्य मात्र काव्यत्वाला राहते. संदर्भ-निर्देश हेही भाषेचे आणखी एक कार्य. सामान्य वर्णनात, तपशील देण्यात ते प्रधान असते. कादंबरीतही संदर्भाला महत्त्व असते; पण काव्यत्वाच्या कार्यापुढे ते गौण ठरते. इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरीत हा फरक असतो. तपशिलातील गफलत इतिहासलेखनात अक्षम्य आहे; तर केवळ तपशिलांत हरवून  जाणे हे कादंबरीत अक्षम्य आहे. साहित्यात काव्यत्व किंवा काव्यात्मकता आणणे हे प्रधान कार्य असते; मात्र इतर कार्ये नसतात असे नाही. उलट काव्यत्व हे कार्य साहित्याची मक्तेदारी नव्हे. जाहिरातीत, उखाण्यात, बडबडगीतातही काव्यत्व असते; फक्त ते गौण स्थानावर असते.

सोस्यूरने सांगितलेले भाषेतील भाषाघटकांचे संबंध याकॉपसन स्वीकारतो. भाषाघटकांचे एकमेकांशी जे संबंध असतात, तो संबंधांचा एक प्रकार होतो. उदा., ‘ दूर ’ या शब्दाचे ‘ लांब ’ या शब्दाशी साधर्म्य आहे; तथापि ‘ जवळ ’ या शब्दाशी विरोध आहे. ‘ पूर ’ या शब्दाशी ध्वनि-साधर्म्य आहे; तर ‘ वाट ’, ‘ प्रवास ’, ‘ नाते ’, ‘ क्षितिज ’,  ‘ आकाश ’, ‘ अंतर ’ या शब्दांशी संपर्क-शक्यता आहे. या सर्व संबंधांना ‘ क्षेत्र-संबंध ’ म्हणतात. भाषेची उक्ती ही कमानुसारी असते. ‘ दूरची ’ म्हटल्यावर वरीलपैकी फक्त ‘ वाट ’ हाच शब्द जोडता येतो. ‘दूरचे ’ म्हटल्यावर ‘ नाते ’, ‘ क्षितिज ’, ‘ आकाश ’, ‘ अंतर ’ हे शब्द जोडता येतात. हे संबंध म्हणजे जोडणीचे संबंध होत. क्षेत्र-संबंध हे जोडणीचे संबंध असणाऱ्या कमबद्घ घटकांवर लादले जातात; तेव्हा काव्यत्व  निर्माण होते, असा याकॉपसनचा सिद्धांत आहे. उदा., ‘ वितर वारिद वारि दवातुरे । चिरपिपाक्षित चातक पोतके ’ या शब्द-कमात र, रि, रि, रे, र  हे समान ध्वनी जोडले गेले आहेत; तसेच ‘ त ’, ‘ द ’, ‘ च ’ या ध्वनींच्या बाबतही ही जोडणी दिसते. म्हणून यात काव्यत्व निर्माण होते.

भाषिक क्षमतेतून निर्माण होणाऱ्या आस्वादन-क्षमतेच्या आधारे आय्. ए. रिर्चड्सने काव्याचा विचार केला आहे. साहित्याचा अभ्यास करणाऱ्या हार्व्हर्ड विदयापीठातील विदयार्थ्यांची साहित्यकृती समजून घेण्याची रीत तपासून त्याने साहित्याच्या आस्वादनात आड येणारे घटक शोधले. शब्दांचा सांकल्पनिक अर्थ न समजणे, ठराविक टप्प्यातूनच साहित्य पहाणे, स्वतःचा अनुभव, स्वतःचे भाव साहित्यकृतीवर लादणे, परंपरागत समीक्षेच्या मोजमापाच्या पट्ट्या प्रत्येक साहित्यकृतीला लावणे यांसारख्या गोष्टी साहित्यकृतीपासून रसिकाला दूर ठेवतात, असे रिर्चड्सने दाखविण्याचा प्रयत्न केला. ज्या समाजात काव्याचा आस्वाद घेण्याची क्षमता क्षीण आहे, तो समाज सांस्कृतिक अधोगतीच्या मार्गावर आहे, असाही एक विचार रिर्चड्सने मांडला. जोडणी आणि पर्याय हे भाषेच्या रचनेचे तत्त्व आहे, हा सोस्यूरचाच सिद्धांत विस्ताराने मांडून ब्रिटिश भाषावैज्ञानिक  हॅलिडे याने शैलीचिकित्सा केली. साहित्यातील शैली ही विशिष्ट पर्यायांची निवड साहित्यकाराने केल्यामुळे ठरते, अशी हॅलिडेची मुख्य भूमिका आहे. अनेक कथा-कवितांचे प्रत्यक्ष विश्लेषण हॅलिडेने केले. या पद्धतीचा  स्वीकार पुढे लीचसारखे अभ्यासक करताना दिसतात.

एखादया साहित्यकृतीची शैलीचिकित्सा करणारे अनेक समीक्षक आहेत. त्यांचे विश्लेषणही त्या त्या साहित्यकृतीचे अंतरंग उलगडून दाखविण्यात यशस्वी झाले आहे. हॅलिडेचे सर्व लेखन या प्रकारात मोडते. रशियन रूपवादयांनीही पुष्किनच्या काव्यरचनांची भाषिक अंगाने चिकित्सा केली आहे; तीतून रशियन वृत्तरचनेवर प्रकाश पडतो. एका लेखकाच्या  समग कृतींची शैलीचिकित्सा ही यापुढची पायरी होय. तीतून त्या व्यक्तीची शैलीवैशिष्टये सांगता येतात. रोमान्स भाषांतील साहित्यावर अशा प्रकारचे काम झालेले दिसते. मराठीत तुकारामांचे अभंग, जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा यांची शैलीवैज्ञानिक समीक्षा झाल्याचे दिसून येते. एखादया विशिष्ट काळातील सर्वच किंवा महत्त्वाच्या साहित्यकृतींची शैलीचिकित्सा ही यानंतरची अवघड पायरी म्हणता येईल. संख्याशास्त्राचा आधार यासाठी आवश्यक ठरतो. जोसेफिन माईल्स यांनी इंग्रजीत, तर सुजाता महाजन यांनी मराठीत असा प्रयत्न केलेला दिसतो. विशिष्ट साहित्यकृतीची शैलीचिकित्सा, विशिष्ट साहित्यिकाच्या सर्वच साहित्यकृतींची शैलीचिकित्सा आणि विशिष्ट काळातील सर्वच साहित्यकृतींची शैलीचिकित्सा, असे हे विस्तारणारे क्षेत्र आहे.

शैलीवैज्ञानिक चिकित्सा हे साहित्यकृतीचे सौंदर्य, तिचे अंतरंग भाषाघटकांच्या आधारे उलगडून दाखविते. साहित्यकृतीचे पारंपरिक मूल्यांकन त्यात अपेक्षित नसते. चरित्रसंदर्भाला तिथे स्थान नसते; मात्र चिकित्सकाने चिकित्सेसाठी साहित्यकृतीची केलेली निवड, तिच्या सौंदर्याचे अंतरंग उलगडून दाखविताना केलेली साधकबाधक चर्चा यांतून पर्यायाने मूल्यांकन सूचित होते. ते अटळही आहे; पण कोणतेही पूर्वगह न ठेवता थेट साहित्यकृतीच्या संरचनेतील सौंदर्याचा वेध शैलीविज्ञानच घेऊ शकते. शैलीविज्ञानात आजपर्यंत तरी भाषिक घटकांच्या आधारेच शैलीचिकित्सा झालेली आहे. भाषाचिन्हांतील रूप आणि संकल्पना यांतील सोस्यूरने सांगितलेला अभेद लक्षात घेतला, तर संकल्पनेच्या आधारेही शैलीचिकित्सा संभवते. संकल्पना-व्यूह हा घटक धरून शैलीचिकित्सा प्रथमत: मराठीमध्ये झालेली दिसते, हा एक विशेष मानावा लागेल.

संदर्भ : 1. Enkvist, N. E. Linguistic Stylistics, Paris, 1973.

2. Freeman, D. C. Ed. Essays in Modern Stylistics, London, 1981.

3. Hough, G. Styles and Stylistics, London, 1964.

4. Leech, Geoffrey N. A Linguistics Guide  to English Poetry, London, 1969.

5. Sebeok, T. A. Ed. Style in Language, London, 1969.

6. Turner, G. W. Stylistics, London, 1973.

7. Widdowson, H. G. Stylistics and the Teaching of Literature, Harlow, 1975.

८. धोंगडे, रमेश; धोंगडे, अश्विनी, मराठी भाषा आणि शैली, पुणे, १९८५.

९. धोंगडे, रमेश, शैलीवैज्ञानिक समीक्षा, पुणे, १९९६.

१०. धोंडगे, दिलीप, शैलीमीमांसा, श्रीरामपूर, २००१.

लेखक: रमेश वा. धोंगडे; श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate