অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शोक-सुखात्मिका (ट्रॅजिकॉमेडी)

शोक-सुखात्मिका (ट्रॅजिकॉमेडी)

शोकात्म व सुखात्म जीवनानुभूतींचे मिश्रण साधणारा एक नाट्यप्रकार.  सॉफोक्लीझ ह्या गीक नाटककाराच्या अँटिगॉन (इ. स. पू. ४४१) या शोकात्मिकेतील द्वाररक्षकाचे पात्र हे शोकात्म व सुखात्म घटकांच्या मिश्रणाचे आद्य प्रारूप म्हणता येईल. रोमन नाटककार  प्लॉटस (इ. स. पू. सु. २५४-१८४) याने आपल्या अँफिट्रिऑन ह्या सुखात्मिकेला लिहिलेल्या प्रस्तावनेत ‘ट्रॅजिकॉमेडी ’ही संज्ञा प्रथम वापरली. त्याने देव आणि मानव, मालक आणि गुलाम ह्यांच्या परंपरागत भूमिकांची अदलाबदल करून देव आणि दैवी नायक यांना विनोदी प्रहसनात्मक भूमिका, तर गुलामाला शोकात्म धीरोदात्त भूमिका बहाल केल्या. हा प्रकार त्या काळात तसा धाडसी व नावीन्यपूर्ण होता. अशा प्रकारच्या प्राचीन नाटकांत शोक-सुखात्मिकेचे मूळ शोधता येते. प्रबोधनकाळात (चौदावे-सोळावे शतक) शोक-सुखात्मिकेला वैशिष्ट्यपूर्ण व पृथगात्म असा रचनात्मक घाट लाभला. मूलत: प्रकृतीने सुखात्म असलेल्या नाटकांत काही शोकात्म घटक मिसळले जात. इटालियन नाटककार बात्तीस्ता ग्वारीनीचे (१५३८१६१२) इल पास्तर फिदो (१५९०) हे शोक-सुखात्मिकेचे उल्लेखनीय उदाहरण होय. या नाटकाच्या संदर्भात टीकाकारांनी ‘ ट्रॅजिकॉमेडी ’ही संज्ञा वापरली व पुढे ती रूढ झाली. इंग्रज नाटककार मजॉन फ्लेचर (१५७९१६२५) याने द फेथफुल शेफर्डेस (१६१०) हे नाटक लिहिले. तेही या प्रकारचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. ग्वारीनीच्या इल पास्तर फिदो चेच हे पुनर्रचित रूप होय. या नाटकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत फ्लेचरने ट्रॅजिकॉमेडीची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, ट्रॅजिकॉमेडी ही संज्ञा वापरताना आनंद आणि हत्येचा संदर्भ नसतो; तर एखादया नाट्यगत पात्राचा प्रत्यक्ष मृत्यू घडत नाही म्हणून शोकात्म नाही, पण मृत्यूच्या इतक्या जवळ येते म्हणून सुखात्म नाही, अशा नाटकांचा विचार या संज्ञेत अभिप्रेत आहे.

‘ जो घडू शकला असता तो टळलेला मृत्यू ’असे या नाटकांच्या संहितांचे रूप असे. मात्र त्या काळी ह्या संज्ञेचा विनोदाशी वा विनोदाच्या अभावाशी काही संबंध नव्हता. नाट्यांतर्गत घटनांची उलटापालट, टळलेली संकटे आणि सुखान्त शेवट ही तत्कालीन शोक-सुखात्म नाटकांच्या रचनात्मक घाटाची ठळक वैशिष्ट्ये होती.  शेक्सपिअर ची द मर्चंट ऑफ व्हेनिस (१५९६), मेझर फॉर मेझर (१६०४), सिंबेलाइन (१६०९), द विंटर्स टेल (१६१०) ही नाटके शोक-सुखात्मिकेची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात. सर्वनाशाच्या छायेतील संघर्षापासून सुटका हा अनुभव सुखात्म आणि शोकात्म या दोन्ही वृत्ती घेऊन येतो. नाटककाराने त्याची कशी हाताळणी केली आहे, त्यावर त्या नाटकाचे स्वरूप ठरते.  हेन्रिक इब्सेन च्या घोस्ट्स (१८८१) व द वाइल्ड डक (१८८४) ह्या नाटकांतून उपरोधात्म विनोदी घटकांचा वापर शोकात्म भाव जास्त गडद करण्यासाठी केला आहे.  जॉर्ज बर्नार्ड शॉ ने इब्सेनच्या शोक-सुखात्मिका ह्या शोकात्मिकांहूनही जास्त गांभीर्यपूर्ण व अन्वर्थक असल्याचे म्हटले आहे.

शोकात्मिकेसारख्या नाट्यप्रकारात सुखात्म ताणपरिहारासाठी (कॉमिक रिलीफ) जी विनोदी पात्र-प्रसंगांची योजना केली जाई, त्यातून पुढे शोक-सुखात्मिका हा प्रकार विकसित झाला. सुखात्म ताणपरिहारामागे  ॲरिस्टॉटलच्या भावविरेचन वा संशुद्धि (कॅथर्सिस) ह्या उपपत्तीमधील विचार अध्याहृत आहे. ॲरिस्टॉटलच्या मते शोकात्मिकेतील हास्योत्पादक प्रवेश ही एक प्रकारची तडजोड आहे. मात्र  आर्थर केस्टलर,  सुसान लँगर प्रभृती आधुनिक समीक्षकांनी या मताचा प्रतिवाद केला आहे. सुखात्म ताणपरिहारासाठी शोकात्मिकेमध्ये जी विनोदी पात्रे वा विनोदी प्रवेश योजिले जातात, त्यांचा प्रेक्षकांवर प्रत्यक्षात काय परिणाम होतो, ह्याविषयी समीक्षकांत मतभेद आहेत. काहींच्या मते अशा पात्र-प्रवेशांच्या योजनेमुळे प्रेक्षकांच्या मनावरील ताण हलका होण्याऐवजी उलट शोकात्म ताण जास्त गहिरा होतो. यातूनच पुढे सुसान लँगर यांनी शोकात्मिका ही सुखात्म पोटरचनेवर उभी राहू शकते, अशी उपपत्ती मांडली. शोकात्मिका आणि सुखात्मिका यांतील नातेसंबंध शोधताना पाश्चात्त्य समीक्षकांनी नीत्शेच्या द बर्थ ऑफ ट्रॅजेडी आउट ऑफ द स्पिरिट ऑफ म्यूझिक (१८७२) ह्या शोकात्मिकेवरील प्रबंधाचा आणि आंरी बेर्गसाँच्या ले रिरे (१९००, इं. भा. लाफ्टर, १९११) ह्या हास्यावरील प्रबंधाचा आधार घेतलेला दिसतो. नीत्शेने डायोनायसस ह्या सुखात्मिकेशी निगडित अशा गीक दैवताचा शोकात्मिकेशी अन्वय साधला. संयम, सुसंवाद, प्रमाणबद्घता यांवर भर देणारी अपोलोनियन प्रवृत्ती व साऱ्या मर्यादा झुगारून देण्याच्या दुर्दम्य ओढीत व्यक्त होणारी डायोनायसियन प्रवृत्ती यांत नीत्शेने साधलेला समन्वय शोक-सुखात्मिकेच्या अर्थान्वयाला पूरक ठरला.  आर्थर शोपेनहौअर यांनी शोकात्मिकेच्या संदर्भात मांडलेली शांत चिंतनाची कल्पना नीत्शेने नाकारली. नीत्शेच्या मते गीकांचे आंतरिक नाते अंत:प्रेरणा, प्रमाथी स्वभाव यांच्याशी होते; पण त्यांचे लक्ष्य मात्र तर्क आणि सहजपणे येणारी नैतिकता साधणे ह्यांकडे होते. या दोहोंमधील ताण हे गीक नाटकांचे वैशिष्ट्य होय. अशा प्रकारे शोक-सुखात्मिकेचे मूळ गीक नाटकांत शोधता येते.

शोक-सुखात्मिका या संज्ञेऐवजी शोकात्म सुखान्तिका ही संज्ञा काही वेळा योजिली जाते; पण केवळ नाटकाचा शेवट विचारात घेण्याऐवजी त्याच्या गाभ्याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे आहे. ‘ टळलेली शोकांतिका’हे शोक-सुखात्मिकेचे आशयसूत्रही लक्षात घेणे गरजेचे आहे.

आधुनिक काळात उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अभाव, सर्वांचा एकाच नैतिक व्यवस्थेत सहभाग नसणे, तसेच नागरीकरणाचे आणि सांस्कृतिकीकरणाचेभिन्नभिन्न परिणाम यांमुळे शोकात्मिका आणि सुखात्मिका यांची रूपे बदलली, संमिश्र रूपे निर्माण झाली. त्यामुळे केवळ नाटकाचा अंत व त्याचा शोकात्म वा सुखात्म परिणाम एवढ्यापुरताच हा विचार मर्यादित राहिला नाही. संवेदनांच्या संमिश्रतेचे, त्यातून येणाऱ्या संदिग्धतेचे वेगळे परिमाणही नाट्यकृतींना लाभत गेले. तसेच हा प्रश्न केवळ मिश्रतेचा (इटालियन नाटककार जीराल्दी चींत्स्यो याच्या भाषेत 'tragedie miste'- मध्ययुगात जीराल्दी याने सुखान्त शेवट असलेल्या अनेक शोकात्मिका लिहिल्या, त्यांना त्याने 'tragedie miste'- मिश्र शोकात्मिका  असे नाव दिले.) नसून, नाट्यानुभव घेण्याच्या व त्याहूनही नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाच्या शैलीचाही आहे.

विसाव्या शतकात व्यस्ततावादी नाटककारांनी निर्माण केलेली कृष्ण-सुखात्मिका वा विषादगर्भ-सुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी वा डार्क कॉमेडी) हा नाट्यप्रकार शोक-सुखात्मिकेशी जवळचे नाते सांगणारा आहे. ब्लॅक वा डार्क हे विशेषण कॉमेडीला लावून एक नवाच नाट्यप्रकार निर्माण करण्याचे श्रेय  झां आनुईय या फेंच नाटककाराकडे जाते. ‘Comedie noire ’ ही संज्ञा त्याने वापरली, तर  आंद्रे बताँ ने Antho-logie del'  humeur noire (१९४०) हे शीर्षकच आपल्या नाट्यसंग्रहाला दिले. ब्लॅक कॉमेडीलाच काही समीक्षकांनी ‘ट्रॅजिकॉमेडी’ असेही संबोधले आहे. उदा., रिचर्ड डटन याने मॉडर्न ट्रॅजिकॉमेडी अँड द ब्रिटिश ट्रॅडिशन (१९८६) व डी. एल्. हर्स्ट याने ट्रॅजिकॉमेडी अशीच शीर्षके आपल्या नाट्य-समीक्षात्मक गंथांना दिली.  सॅम्युएल बेकेट ने वेटिंग फॉर गोदो (इं. भा. १९५४) या नाटकाच्या शीर्षकपृष्ठावर ‘ ट्रॅजिकॉमेडी’असे म्हटले आहे, तर अझॅन योनेस्को ने आपल्या ले शॅझ (प्रथम प्रयोग १९५२, इं. शी. ‘ द चेअर्स ’) या नाटकाचे वर्णन शीर्षकपृष्ठावर ‘ शोकात्म प्रहसन’(ट्रॅजिक फार्स) असे केले. १९५० ते १९८० या काळात विपुल प्रमाणात लिहिल्या गेलेल्या ब्लॅक कॉमेडी प्रकारातील शोक-सुखात्म संदिग्ध नाटकांची मुळे इटालियन नाटककार जीराल्दी चींत्स्यो व गांबारिस्ता गारिनी यांची नाटके, तसेच ब्रिटिश नाटककार जॉन फ्लेचर आणि शेक्सपिअर यांची उत्तरकालीन नाटके यांच्यांत शोधण्याचा प्रयत्न डटन, हर्स्ट प्रभृती टीकाकारांनी केला. तथापि प्रबोधनकालीन शोक-सुखात्मिकेत कथानकाचे वळण शोकात्म भावाकडून सुखात्म शेवटाकडे ठळकपणे जाताना दिसते. तशा प्रकारचे सुस्पष्ट वळण आधुनिक कृष्ण-सुखात्मिकांत दिसत नाही. एकाच वेळी वेदना आणि आनंद असा दुधारी अनुभव देणाऱ्या या नाटकांची जातकुळी स्वरूपत:च शोक-सुखात्मिकांहून भिन्न आहे. जे. एल्. स्टायन ह्या नाट्यसमीक्षकाने आपल्या द डार्क कॉमेडी ह्या पुस्तकात आधुनिक विषादगर्भ-सुखात्मिकांची मीमांसा केली आहे. मानवी अस्तित्वातील जे भयावह, भेसूर आहे; त्याला विनोदाच्या माध्यमातून सामोरे जाणे, ही वृत्ती विषादगर्भ सुखात्मिकेमागे आहे. दु:खाला शरण न जाण्याची पण सत्याकडे पाठ न फिरविण्याची भूमिका अशा नाटकांत नाटककार घेतो. शोक-सुखात्मिकेत शोकात्म व सुखात्म संवेदनांचे मिश्रण आढळते; तथापि विषादगर्भ सुखात्मिकेत मानवी अस्तित्वाचे जे दर्शन आहे, तेच काळ्या रंगातील कडवट चवीचे आहे. त्यात जसे नायकाच्या हौतात्म्याला स्थान नाही, तसेच दु:खाचे प्रहार संयततेने सहन करण्यालाही नाही. म्हणून मग प्रेक्षकांसाठी हसणे आणि रडणे ह्यांच्या सीमारेषेवरील अनुभव उभा करणे, त्यांना संभमात टाकणे महत्त्वाचे मानले जाते. अशा नाटकांचा गाभा अतिगहन, शोकात्म संवेदनायुक्त; मात्र आविष्काराच्या साऱ्या रीती व्यंग्य अथवा तिरकस असतात. विदूषकी प्रहसनात्मक थाटाचा विनोदी बाज उभा करून मानवी अस्तित्वाचे कारूण्यपूर्ण दर्शन घडविणे, ही अशा नाटकांची प्रकृती असते. त्यामुळे शोक-सुखात्मिकेला जवळ जाणारा हा नाट्यप्रकार आहे. स्टायन यांनी द डार्क कॉमेडी  ह्या पुस्तकाला ‘ आधुनिक सुखात्म-शोकात्मिकेचा विकास ’ असे उपशीर्षक देऊन त्याचे स्पष्टीकरण केले आहे.

शोक-सुखात्म मराठी नाटके : मराठी नाटय्परंपरा एका बाजूने भरताचे संस्कृत  नाट्यशास्त्र; तर दुसऱ्या बाजूने पाश्चिमात्य शोकात्मिका अशा दुहेरी पण परस्परविरोधी प्रेरणा-प्रभावांतून विकसित होत गेलेली दिसून येते.  गोविंद बल्लळ देवलांना (१८५५१९१६) शारदा (१८९९) या नाटकाची शोकात्मतेच्या स्वाभाविक दिशेने जाणारी गती बदलून ते सुखान्त करावे लागले. जरठ-बाला विवाह व कन्याविक्रय ह्या तत्कालीन ज्वलंत सामाजिक समस्यांना थेटपणे भिडणाऱ्या ह्या नाटकाचा गाभा करूणगंभीर खरा; पण त्याचा शेवट सुखान्त केल्याने ती शोकात्मिका होऊ शकली नाही. त्या मागील परंपरा  भवभूतीच्या  उत्तररामचरित या संस्कृत नाटकाच्या सुखान्ताची असावी. कारण प्राचीन संस्कृत नाट्यशास्त्रात व नाट्य लेखनपरंपरेत शोकात्मिका, शोकनायक, शोकान्त अशा स्पष्ट संकल्पना नव्हत्या. दुसऱ्या बाजूने पाश्चात्त्य नाट्यपरंपरेत जरी शोकात्मिका व शोक-सुखात्मिका या नाट्यप्रकारांच्या सुस्पष्ट व सुविहित संकल्पना आणि दीर्घ, समृद्घ लेखन-परंपरा असल्या, तरी त्यांच्या प्रेरणा-प्रभावांतून मराठी नाट्यवाङ्‌मयात हे नाट्यप्रकार सुघटित रूपबंध व लेखनपरंपरा ह्या द्विविध दिशांनी फारसे विकसित झालेले दिसत नाहीत. तद्वतच ह्या नाट्यप्रकारांना पाश्चिमात्य परंपरेत जे तत्त्वज्ञानात्मक वजन लाभले, तेही मराठीत अभावानेच आले. परिणामी शोकात्मिका व शोक-सुखात्मिका ह्या नाट्यप्रकारांत नेमकेपणाने व चपखलपणे बसतील अशी मराठी नाटके मोजकीच आहेत. सवाई माधवराव यांचा मृत्यु (कृ.प्र. खाडिलकर, १९०६); एकच प्याला (राम गणेश गडकरी, १९१९), नटसमाट (वि. वा. शिरवाडकर, १९७१) ह्या रूढार्थाने मराठी शोकात्मिका मानल्या जातात. सुखदु:खमिश्रित अनुभूतींचे प्रभावी चित्रण अनेक मराठी नाटकांतून आढळते; त्यांत शोक-सुखात्मिका या प्रकाराची काही लक्षणे आढळतात. सामाजिक नाटकांची समृद्घ व दीर्घकालीन परंपरा मराठीत आहे. अशा, सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या नाटकांतून त्या प्रश्नांच्या अनुषंगाने स्त्रियांचे दु:खभोग, पुरूषांचे जुलमी अन्याय-अत्याचार, पुरूषी वर्चस्व व सर्वंकष शोषण यांमुळे स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या व्यथा-वेदना, त्यांतून येणारे नैराश्य, वैफल्य व पराभूत-शरणागत मनोवृत्ती यांचे अनेकपदरी, वैविध्यपूर्ण चित्रण मोठया प्रमाणात आजवर झाले आहे. ह्या नाटकांतून कधी सूचकतेने, कधी सूक्ष्म-तरल पातळीवर, तर कधी तीव्र दाहकतेने शोकात्म भाव प्रकटले आहेत. अशा काही मोजक्या, निवडक शोकमिश्र सुखात्म नाटकांचे, तसेच गंभीर शोकात्म आशय असलेल्या नाटकांचे सोदाहरण विवेचन पुढे केले आहे.

आचार्य  प्र. के. अत्रे यांनी उद्याचा संसार (१९३६) या नाटकातून मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रीची शोकांतिका रंगविली आहे. नवऱ्याचा बदफैलीपणा, मुलीचे विवाहपूर्व मातृत्व आणि मुलाचा बेछुटपणा या घटनांनी जीव नकोसा झाल्याने आत्महत्या करणाऱ्या स्त्रीची ही करूण कहाणी आहे. तो मी नव्हेच (१९६२) या नाटकात प्रौढ कुमारिकांच्या विवाहाची उग बनत चाललेली सामाजिक समस्या अत्रे यांनी हाताळली व त्या प्रश्नाच्या अनुषंगाने बदमाश, धूर्त व स्त्रीलंपट पुरूषाकडून फसविल्या गेलेल्या प्रौढ लग्नेच्छू स्त्रियांच्या मनोव्यथा, मोहवशता व दारूण भमनिरास यांचे परिणामकारक, प्रभावी चित्रण केले आहे. श्री. ना. पेंडसे यांनी रथचक्र या कादंबरीवरून केलेल्या नाट्यरूपांतरात (१९८०) हालअपेष्टा, काबाडकष्ट व जिद्द यांच्या बळावर मुलाचे आयुष्य घडवू पाहणाऱ्या स्त्रीला तो मुलगा दुरावल्याने सर्वस्व गमावल्याची, आयुष्याच्या निरर्थकतेची जाणीव होते व पुढे ती आत्महत्येला प्रवृत्त होते. कादंबरीचा हा करूणगंभीर आशय नाट्यरूपात साकारल्याने ह्या नाटकाला शोकात्म वजन प्राप्त झाले आहे. जयवंत दळवी यांच्या पुरूष (१९८३) या नाटकात पैसा व सत्ता यांचा माज असलेल्या पुरूषाच्या बलात्काराला बळी पडलेल्या अभागी स्त्रीने त्या अन्यायाविरूद्घ पेटून उठून उगवलेल्या सूडाचे प्रक्षोभक, करूणगंभीर चित्रण आहे. दळवींनी पर्याय (१९८४) या नाटकात हुंड्यासारख्या प्रश्नावरून, किंवा लग्नानंतर माहेराहून पैसे आणण्यावरून तरूण विवाहितेच्या होणाऱ्या छळाचे करूण, भेदक दर्शन घडविले आहे. या नाटकांत एक सामाजिक अदृश्य शक्ती ‘ बंडा ’या प्रतीकात्मक पात्राव्दारे शोषित-पीडित स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरूद्घ बंड करून उभी ठाकते व त्या अबला स्त्रियांना न्याय मिळवून देते, अशी सकारात्मक भूमिकाही मांडली आहे. त्यामुळे एका व्यापक अर्थाने ही नाटके शोक-सुखात्म अनुभूतींचा प्रत्यय देतात, असे म्हणता येईल. पुरूषी अन्याय, अत्याचार, जुलूम-जबरदस्ती आणि पुरूषवर्गाचे सत्ताधारी वर्चस्व यांच्या विरूद्घ बंड करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व शोधणाऱ्या, स्वयंपूर्ण व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व घडवू पाहणाऱ्या आधुनिक स्त्रीचे दु:खभोग, व्यथावंचना, मनोयातना, वैफल्य व पराभूतता यांचे प्रभावी व प्रत्ययकारी चित्रण अलीकडच्या अनेक नाटकांतून आढळते. उदाहरणादाखल काही नाटके व नाटककार यांचे निर्देश करता येतील : जयवंत दळवी (महासागर, १९८०; सावित्री, १९८२), सई परांजपे (माझा खेळ मांडू दे, १९८६), प्रशांत दळवी (चारचौघी, १९९१) इत्यादी. १९९०-९३ या काळात सामाजिक जाणिवांचे चित्रण करणारी नाटके लक्षणीय प्रमाणात निर्माण झाली. त्यांत शोषित-पीडित स्त्रियांच्या समस्यांवर लिहिलेली नाटके जास्त होती. या कालखंडाच्या थोडे आधी आलेले सई परांजपे यांचे माझा खेळ मांडू दे हे नाटक स्त्रियांच्या सुखदु:खमिश्रित जाणिवांचे प्रगल्भ चित्रण करणारे होते. त्यातील संसारसुखापासून वंचित असलेल्या दु:खीकष्टी तीन स्त्रियांपैकी दोघींना भावी सुखाचे काही आशादायी मार्ग दिसतात. या अर्थाने हे नाटक शोक-सुखात्म म्हणता येईल. प्रशांत दळवींच्या चारचौघी या धक्कादायक नाटकाने पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व-‘ स्त्रीत्व ’ जपत, आधुनिक जीवनशैलीने जीवन जगणाऱ्या चार स्त्रियांची नाना परीची दु:खे, यातना, मनोभंग यांचे चित्रण तर केले आहेच; पण स्त्री ही पराभूत होणारी नसून धैर्याने परिस्थितीला सामोरी जाऊन त्यावर मात करणारी आहे, ह्याचीही सत्त्वसंपन्न जाणीव या नाटकाने करून दिली. १९९०-९३ ह्याच काळात आलेली जयवंत दळवी लिखित लग्न (१९९१) व चेतन दातार यांचे सावल्या ही नाटकेही स्त्रीच्या वेदना मुखर करणारी होती. लग्न हे नाटक एकूण लग्नसंस्थेच्या साफल्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आणि त्यातून उद्भवणाऱ्या संतापातून तिटकारा निर्माण करणारे, स्त्रीची विवाहोत्तर दुर्दशा कशी घडते हे दाखविणारे होते; तर सावल्या हे नाटक स्त्रीच्या प्रश्नाभोवती फिरणारे, तिची शोकाकुल परिस्थिती व जीवनसंघर्ष यांसंबंधी होते.  विजय तेंडुलकरां च्या काही नाटकांचाही स्त्रियांचे प्रश्न व त्यांतून उद्‌भवलेल्या व्यथा यांच्या संदर्भात उल्लेख करता येईल. शांतता ! कोर्ट चालू आहे (१९६८) या नाटकात कुमारी मातृत्व आणि भ्रूणहत्या या समस्यांचा वेगळ्या, नावीन्यपूर्ण धाटणीने घेतलेला वेध आहे व त्या अनुषंगाने त्या अभागी स्त्रीच्या मनोव्यथा, आंतरिक तडफड व जिवाचा आकांत नाटकाच्या अखेरीस एका तीव्रोत्कट स्वगताव्दारे व्यक्त झाला आहे. तेंडुलकरांच्या मित्राची गोष्ट (१९८१) या नाटकातील तरूण मैत्रिणींच्या समलिंगी ओढीतून निर्माण झालेली गंभीर शोकात्मिका अस्वस्थ व अंतर्मुख करणारी आहे. आजच्या आधुनिक समाजात स्त्री ही एखादया गुलामाप्रमाणे खरेदी केली जाते, या जळजळीत वास्तवाचे अत्यंत परिणामकारक चित्रण तेंडुलकरांनी कमला (१९८२) या नाटकात केले आहे, तर कन्यादान (१९८३) या नाटकात समाजवादी विचारसरणीच्या ब्राह्मण कुटुंबात वाढलेली मुलगी व दलित तरूण यांच्या विवाहातून कुटुंबात निर्माण होणारे ताणतणाव आणि त्या मुलीच्या भोगव्यथांचे दाहक चित्रण आहे. स्त्रियांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांतून निर्माण झालेली त्यांची दु:खे यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या गंभीर, शोकात्म आशय असलेल्या नाटकांची लक्षणीय परंपरा आधुनिक मराठी नाट्यवाङ्‌मयात निर्माण झाली आहे. आधुनिक नाटकांचे अंतही अर्थपूर्णतेने संदिग्ध असल्याचे दिसून येते. विजय तेंडुलकरांची नाटके या दृष्टीने उदाहरणादाखल पाहता येतील. पु. ल. देशपांडे यांच्या तुझे आहे तुजपाशी (१९५७) या सुखात्मिकेचा गंभीर अंत असाच सुखदु:खमिश्रित संदिग्धतेच्या जवळ जाणारा आहे.

आधुनिक प्रयोगशील वृत्तीच्या नाटककारांनी आपल्या वेगळ्या, नव्या वळणाच्या प्रायोगिक नाटकांतून शोक-सुखात्म मिश्र अनुभूतींचे संदिग्ध व असांकेतिक स्वरूपाचे चित्रण केले. अशा काही नाटकांचे व नाटककारांचे उदाहरणादाखल थोडक्यात निर्देश करता येतील.  चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या एक शून्य बाजीराव (१९६६) या मराठीतील आद्य असंगत-नाट्यात (ॲब्सर्ड ड्रामा) मानवी अस्तित्वाचा शोध व त्यातली अर्थहीनता; वास्तव व विभम यांतल्या पुसट झालेल्या सीमा; न्याय, अन्याय, आरोप, शिक्षा या संदर्भात उपस्थित केलेले प्रश्न अशी अनेकविध आशयसूत्रे आहेत आणि त्यांचे चित्रण विदुषकी प्रहसन व शोकात्म भाव यांच्या मिश्रणातून केले आहे. मराठीतील विषादगर्भ-सुखात्मिकेची (ब्लॅक कॉमेडी) काही लक्षणेही त्यात आढळतात. सतीश आळेकरांचे महानिर्वाण (१९७४) हे विषादगर्भ-सुखात्मिकेचे मराठीतील सर्वोत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मृत्यू व अंत्यविधी ही वास्तविक मानवी आयुष्यातील करूणगंभीर घटना; पण इथे तिचे विडंबन व विरूपीकरण करून त्यातली दांभिकता व उपरोध सूचित केला आहे. अच्युत वझे, शफाअत खान यांनीही आपल्या नाट्यलेखनातून विषादगर्भ-सुखात्मिकेची वृत्ती प्रकट केली आहे. पण या संदर्भात मुख्य उल्लेख करावा लागेल, तो  श्याम मनोहर यांच्या हृदय, यकृत, यळकोट या नाटकांचा. मध्यमवर्गीय जीवनचित्रणाच्या अनुषंगाने मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत व त्यातून उद्‌भवणारे समकालीन समाज व संस्कृती या संदर्भातले नीतिमूल्यादी प्रश्न उपस्थित करणारी ही नाटके शोकात्म जाणीव व्यक्त करणारी आहेत. त्याचे संयमी, संयत चित्रण त्यांत आढळते. परात्मभावाचा प्रत्यय देणारा विकट विनोद (ब्लॅक ह्यूमर) त्यांनी ताकदीने वापरला आहे. कडवट चवीच्या विनोदामागील कारूण्य, गांभीर्य यांचे सूचक प्रकटीकरण त्यात आहे. इथे हास्यास्पद वाटणारी पात्रे एक थंड कौर्यही घेऊन येतात. आधुनिक काळातील आणखी एक महत्त्वाचे नाटककार महेश एलकुंचवार यांची वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी व युगान्त ही नाट्यत्रयी पारंपरिक वाडासंस्कृती व एकत्र कुटुंबपद्धती यांचा ऱ्हास व सर्वंकष विनाश सूचित करणारी आहे व त्या वाड्यात राहणाऱ्या खानदानी घराण्यातल्या व्यक्तींच्या नाना परींच्या दु:खभोगांचे, वैफल्याचे सूक्ष्म व सखोल शोकात्म चित्रण या नाट्यत्रयीत केले आहे.

संदर्भ : Herrick, M. T. Tragicomedy : it's Origin and Development in Italy, France And England, IIinois, 1955.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate