অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सट्टके

सट्टके

प्राकृतातील एक नृत्यप्रधान नाटयप्रकार. डॉ. आ. ने. उपाध्ये ह्यांच्या मते सट्टक हा शब्द द्राविडी ‘ आट्ट ’ किंवा ‘ आट्टम् ’ (नृत्य वा अभिनय) ह्या शब्दापासून आलेला असून नृत्ययुक्त नाटयविष्कार असा त्याचा अर्थ आहे. काही विव्दानांच्या मते भारहूत (इ. स. पू. दुसरे शतक) येथील शिलालेखांत वापरलेला सादिक किंवा सट्टिक हा शब्द सट्टक या शब्दाचे पूर्वरूप असावा. त्यावरून या नाटयप्रकाराची प्राचीनता दृष्टोत्पत्तीस येते.भारताच्या नाटयशास्त्रा त सट्टकाचा उल्लेख नाही; तथापि  अभिनवगुप्ता ने भरताच्या नाट्यशास्त्रा वर लिहिलेल्या अभिनवभारती ह्या टीकेत सट्टक हा नृत्तात्मक प्रबंध मानलेला आहे. हेमचंद्राच्या मते सट्टकात एकच भाषा (प्राकृत) असते; नाटिकेप्रमाणे त्यात संस्कृत-प्राकृत अशी व्दैभाषिकता नसते. हेमचंद्राचा शिष्य रामचंद्र याने नाटयदर्पण ह्या गंथात सट्टकाचा समावेश ‘ अन्य रूपकां ’ त करून, विष्कंभक, प्रवेशक नसलेला, तसेच केवळ एका (प्राकृत) भाषेत असलेला, नाटिकेसारखा प्रकार म्हणजे सट्टक, अशी आपली कल्पना मांडली. शारदातनयाने (सु. तेरावे शतक) आपल्या भावप्रकाशन या बृहद्‌गंथात सट्टक हा नृत्यावर आधारलेला नाटिकाप्रकार असून त्यात कैशिकी व भारती ह्या वृत्ती असतात; मात्र रौद्ररस व संधी नसतात; त्यात चार अंक असून त्यांना ‘ जवनिका ’ म्हणतात. अंकाच्या शेवटी ‘ यवनिकान्तर ’ (पडदा-बदल) असते; पण ‘ छादन ’, ‘ स्खलन ’, ‘ भ्रान्ती ’ किंवा ‘ निन्हव ’ नसते, असे म्हटले आहे. साहित्यदर्पण कार विश्र्वनाथाच्या मतानुसार सट्टक हे संपूर्ण प्राकृतात असून त्यात अद्भुतरसाला प्राधान्य असते. धनंजय सट्टकाला नाटक मानतो. हेमचंद्र-रामचंद्र यांच्या मते ते रूपकासमान आहे, तर विश्र्वनाथ याच्यामते उपरूपक आहे. राजशेखराने (८६४ -९२५) आपल्या कर्पूरमंजरी त सट्टकाच्या वरील काही लक्षणांखेरीज आणखी एक लक्षण सांगितले आहे. सट्टकाचे नाव नायिकेच्या नावावरून ठेवतात, असे त्याने म्हटले आहे. सट्टकात भडक शृंगारवर्णने विपुल आढळतात; तसेच स्त्रीपात्रेही बरीच असतात.

संस्कृत नाटयनिर्मितीच्या मानाने सट्टकांची संख्या अत्यल्प आहे. उपर्युक्त राजशेखरकृत कर्पूरमंजरी, नयचंद्रकृत रंभामंजरी (चौदावे शतक), रूद्रदासविरचित चंदलेहा (१६६०), घनश्यामकृत आनंदसुंदरी (सतरावे शतक) आणि विश्वेश्वराचे शृंगारमंजरी (अठरावे शतक) एवढीच सट्टके आज उपलब्ध आहेत. तथापि मार्कंडेयकृत विलासवती, घनश्यामकृत वैकुण्ठचरित या सट्टिकांचा नामनिर्देश आढळतो, पण त्यांची हस्तलिखिते अदयापि उपलब्ध नाहीत. नयचंद्राच्या रंभामंजरी या सट्टकात काही मराठी पदये आहेत. उदा., त्याने केलेल्या काव्यमय स्त्री-वर्णनातील काही ओळी अशा :

जरी पेखिला मस्तकावरी केशकलापु ।

तरी परिस्ख लिला मयूरांचे पिच्छप्रतापु ॥

(अर्थ : जर त्या (सुंदरीच्या) मस्तकावरील केशकलाप पाहिला, तर तो मोरपिसाऱ्याच्या सौंदर्यास मागे टाकतो).

संदर्भ : १. जैन, जगदीशचन्द्र, प्राकृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९६१.

२. तगारे, ग. वा. प्राकृत साहित्याचा इतिहास, औरंगाबाद, १९८७.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate