অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य सतरावे आणि अठरावे शतक

इटालियन साहित्य सतरावे आणि अठरावे शतक

इटालियन साहित्यातील अवनतकाल

सतरावे शतक आणि अठराव्या शतकाचा पूर्वार्ध हा इटालियन साहित्यातील अवनतकाल होय. सखोल आणि परिणामकारक आशयाचे दारिद्र्य आलंकारिक शैलीने झाकून टाकण्याची प्रवृत्ती ह्या कालखंडात प्राधान्याने प्रत्ययास येते. साहजिकच अभिजात अभिरुचीची भूक भागविण्याचे सामर्थ्य ह्या साहित्यात नव्हते. ह्या प्रवृत्तीचा प्रकर्ष विशेषतः जांबात्तीस्ता मारीनो अथवा मारीनी (१५६९–१६२५) ह्याच्या काव्यात आढळतो. पराकोटीचे अलंकारप्राचुर्य आणि शब्दांचा सोस ह्यांतून ह्या काव्यशैलीचा पोकळ डौल निर्माण झालेला असला, तरी ती लोकप्रिय झाली; एवढेच नव्हे, तर तिचा एक संप्रदायही निर्माण झाला. ‘मारीनीस्मो’ किंवा ‘मारीनीझम’ ह्या नावाने तो ओळखला जातो. विस्मयाचे धक्के देण्यापलीकडे कवितेचे काही प्रयोजन असू शकेल, ह्याची जाणीव ह्या संप्रदायाला नव्हती. स्वतः मारीनोने अनेक भावकविता लिहिल्या. तथापि व्हीनस आणि अडोनिस ह्यांच्या मिथ्यकथेवर आधारलेली Adone (१६२३) ही त्याची प्रमुख काव्यकृती होय.

मारीनीझमच्या प्रभावकाळातही गाब्रिएल्लो क्याब्रेअरासारख्या (१५५२–१६३८) कवी आपले वेगळेपण टिकवून होता. अभिजात काव्यकृतींतील छंदांचे– विशेषतः ग्रीक भावकवी पिंडरच्या छंदांचे– त्याला आकर्षण होते. हे छंद त्याने अत्यंत सफाईने हाताळले. त्याची शैलीही बरीच सौम्य आणि संयत होती. त्याने काही उद्देशिका आणि उपरीधिकाही लिहिल्या.

सतरावे शतक

आलेस्सांद्रो तास्सोनी (१५६५–१६३५) हा सतराव्या शतकातील आणखी एक महत्त्वाचा कवी. La Secchia rapita (१६२२, इं. शी. द कॅप्‌चर्ड बकेट) ही त्याची महाकाव्यविडंबिका (मॉक-हिरीइक एपिक) विशेष उल्लेखनीय आहे. अशा विडंबनात एखादा क्षुल्लक विषय घेऊन त्यासाठी महाकाव्याचा घाट आणि भारदस्त शैली वापरण्यात येते.

सतराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ तोम्माझो कांपानेल्ला (१५६८–१६३९) ह्याने केलेली काव्यरचना काहीशी ओबडधोबड असली, तरी तीत उत्कटता आहे. फ्रांचेस्को ब्रात्‌चोलीनी (१५६६–१६४८), लोरेंत्सो लीप्पी (१६०६–१६६४) आणि साल्व्हातोर रॉझा (१६१५–१६७३) हे सतराव्या शतकातील आणखी काही उल्लेखनीय कवी. त्यांची कविता मुख्यतः उपरीधप्रचुर आहे.

गद्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट गद्यलेखनाचे आदर्श निर्माण करण्याची स्थितीही ह्या काळातील वाङ्‌मयीन परिस्थितीवर प्रकाश टाकते. Dialogo Sopra i due massimi sistemi del mondo सारख्या (१६३२, इं. शी. डायलॉग ऑन द टू प्रिन्सिपल सिस्टिम्स ऑफ द युनिव्हर्स) त्याच्या ग्रंथांतून शास्त्रीय स्वरूपाचे प्रतिपादनही किती स्पष्ट आणि सुबोध करता येते, ह्याची कल्पना येते.

इटलीवरील स्पॅनिश वर्चस्वाबद्दलचा आत्यंतिक तिटकारा आणि स्वदेशप्रेम बोक्कालीनीच्या (१५५६–१६१३) लेखनात आढळते. तीव्र उपरीध हा त्याच्या लेखनाचा विशेष Ragguagli di Parnaso मध्ये (२ खंड, १६१२, १६१३, इं. शी. डिस्पॅचिस फ्रॉम पार्नासस) प्रकर्षाने प्रत्ययास येतो. Istoria del Concilio di Trento (१६१९, इं. शी. द हिस्टरी ऑफ द कौन्सिल ऑफ ट्रेंट) हा पाओलो सार्पीचा (१५५२–१६२३) इतिहासग्रंथ पूर्णतः निःपक्षपाती नसला, तरी त्यातील गद्यशैली प्रभावी वाटते. तो म्माझो कांपानेल्लाचाLacitta del sole (सु. १६०२, इं. शी. द सिटी ऑफ द सन) हा यूटोपियन ग्रंथ विख्यात आहे. अनेक यूरीपीय भाषांतून त्याचे अनुवाद झालेले आहेत. एका निसर्गजात धर्माच्या आधिपत्याखाली सारी मानवता एखाद्या कुटुंबाप्रमाणे प्रेमाने नांदावी, अशा विचार त्याने मांडला आहे.

इटालियन साहित्याच्या अवनतावस्थेने अनेक समकालीनांना अस्वस्थ केले होते. ह्या अस्वस्थतेतूनच इटालियन साहित्याला इष्ट आणि प्रगतिपर दिशा दाखवून देण्याच्या उद्देशाने सतराव्या शतकाच्या अखेरीस 'अकॅडमी ऑफ आर्केडिया' ह्या नावाची एक संस्था स्थापन झाली (१६९०). मारीनीझमला विरीध करून सुबोध आणि प्रासादिक आविष्काराचे महत्त्व ह्या अकॅडमीने प्रस्थापित केले. प्राचीन ग्रीस मधील आर्केडियन मेढपाळांच्या साध्यासुध्या आनंदी जीवनाने अकॅडमीच्या कवींना आकर्षित केले होते. त्याचे चित्रण काव्यातून होऊ लागले. पण लवकरच साध्या आणि सुबोध आविष्काराची ही आवडही कृत्रिमतेच्या पातळीवर उतरली. एकसुरी ठरलेल्या एका प्रवृत्तीऐवजी तशीच एकसुरी वाटणारी दुसरी प्रवृत्ती प्रभावी झाली.

अकॅडमीच्या संप्रदायातील  प्येअत्रो मेतास्ताझ्यो (१६९८–१७८२) हा सर्वश्रेष्ठ कवी होय. अकॅडमीने पुरस्कारिलेल्या वाङ्‌मयीन ध्येयांचा उत्स्फूर्त आविष्कार त्याच्या भावकवितांतून प्रकटला. तथापि त्याचे खरे कर्तृत्व अतिनाट्यलेखनातच (मेलोड्रामा) दिसून आले. Didone Abbandonata ह्या त्याच्या नाट्यकृतीने तो प्रसिद्धीस आला. Attilio Regolo सारख्या (१७४०) नाटकांवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. त्यांतून समर्थ भावकवीचे मन उत्कटतेने प्रत्ययास येते. मेतास्ताझ्योच्या काळी अतिनाट्य हे संगीतिका (ऑपेरा) ह्या प्रकारातच मोडत असे.

इटालियन सुखात्मिकांची कालजीर्ण चौकट मोडून तिला नवे रूप आणि चैतन्य  कार्लो गोल्दोनीने (१७०७–१७९३) प्राप्त करून दिले. ठोकळेबाज व्यक्तिरेखा, निश्चित नाट्यसंहितेच्या अभावामुळे बरेचसे संवाद उत्स्फूर्तपणेच म्हणण्याचा संकेत, त्यांतून पुष्कळदा अटळपणे येणारा विदूषकीपणा यांमुळे ऱ्हासाला लागेल्या इटालियन सुखात्मिकेला त्याने सावरण्याचा प्रयत्‍न केला. आपल्या सुखात्मिकांना सुसंबद्ध स्वरूप, संहिता आणि वास्तववादाची बैठक त्याने दिली. गोल्दोनीने अनेक सुखात्मिका लिहिल्या. तथापि La bottega del Caffe (इं. शी. द कॉफी शॉप), Il ventaglio (इं. शी. द फॅन), La locandiera (इं. शी. द मिस्ट्रेस ऑफ द इन) आणि La casa Nuova (इं. शी. द न्यू हाऊस) या त्याच्या विशेष महत्त्वाच्या सुखात्मिका होत.

अठरावे शतक

अठराव्या शतकाच्या आरंभी फ्रेंच शोकात्मिकांच्या धर्तीवर प्येर याकोपो मारतेल्ली (१६६५–१७२७) ह्याने काही शोकात्मिका लिहिल्या होत्या. तसेच फ्रांचेस्को शीप्योने दी माफ्फेई (१६७५–१७५५) ह्याने Merope (१७१३) ही शोकात्मिका लिहून इटालियन शोकात्मिकेला काही दिशा दाखवून दिली होती. तथापि व्हीत्तॉर्यो आल्फ्येअरी (१७४९–१८०३) ह्याची Saul (१७८२) ही शोकात्मिका इटालियन रंगभूमीवर अवतरताच इटालियन शोकात्मिकेचा एक नवाच प्रवास सुरू झाला. इतिहास, बायबल आणि पुराणकथा ह्यांतून त्याने आपल्या नाट्यकृतींचे विषय निवडले. देशभक्तीच्या भावनेला आल्फ्येअरीने आपल्या शोकात्मिकांतून आवाहन केले आणि राजेशाहीचा व जुलमी सत्ताधीशांचा प्रखर निषेध केला. आल्फ्येअरीच्या शोकात्मिकांचे एकूण स्वरूपच काहीसे राकट आहे. तथापि आल्फ्येअरीने इटालियन साहित्यावर काही काळ, विशेषतः स्वच्छंदतावादाच्या कालखंडात, निश्चितच प्रभाव गाजविला.

प्येअत्रो क्यारी (१७११–१७८५) आणि  कार्लो गोत्सी (१७२०–१८०६) हे ह्या कालखंडातील आणखी दोन उल्लेखनीय नाटककार. गोत्सीने जुन्या सुखात्मिकांचे समर्थन करून गोल्दोनीला विरीध केला. प्येअत्रो क्यारीने नवसुखात्मिकेचे काही प्रमाणात अनुकरण केले; तथापि गोल्दोनीला विरोधच केला.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात  जूझेप्पे पारीनी (१७२९–१७९९) ह्याने Il giorno (इं. शी. द डे) हे चार भागांचे दीर्घकाव्य लिहून इटालियन भाषेतील उपरोधपूर्ण काव्यात मोलाची भर घातली. उच्चवर्गीयांच्या दिखाऊ आणि पोकळ मनोवृत्तीवर त्याने टीका केली.

<>कार्लो गोत्सीचा वडील बंधू गास्पारी गोत्सी (१७१३–१७८६) ह्याने विविध साहित्यप्रकार हाताळण्याचा प्रयत्‍न केला; पण त्यात तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. तथापि त्याने काढलेली Gazzetta Veneta (१७६०–१७६१) आणि L' osservatore (१७६१–१७६२) ही दोन नियतकालिके उल्लेखनीय आहेत. स्पेक्टेटर आणि टॅटलर  ह्या इंग्रजी नियतकालिकांचा प्रभाव त्यांवर दिसून येतो. Gazzetta Veneta म्हणजे व्हेनिसमधील तत्कालीन जीवनाची एक दैनदिनीच होय. L' osservatore मध्ये वाङ्‌मयीन आणि तात्त्विक स्वरूपाचे लेखन असे, जूझेप्पे बारेत्ती (१७१९–१७८९) ह्याने La frusta letteraria (१७६३, इं. शी. द लिटररी व्हिप) हे वाङ्‌मयीन समीक्षापर नियतकालिक काढून इटालियन साहित्यातील अनिष्ट प्रवृत्तींवर व त्यांना जबाबदार असणाऱ्या साहित्यिकांवर टीकेची झोड उठविली. बारेत्तीच्या समीक्षेपेक्षा त्याची घणाघाती शैलीच अधिक महत्त्वाची आहे.

 

वैचारिक लेखनाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रांत  जांबात्तीस्ता व्हीको (१६६८–१७४४) आणि लोदोव्हीको मूरातोरी (१६७२–१७५०) ही नावे विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या Scienza nuova मधून (१७२५–१७४४, इं. शी. न्यू सायन्स) व्हीकोने मानवी प्रगती, इतिहास आणि विविध संस्कृतींचा उत्कर्षापकर्ष ह्यांसंबंधीचे नियम चिकित्सक विवेचन करून प्रतिपादले आहेत. मूरातोरीने ५०० ते १५०० ह्या कालखंडातील अनेक इतिवृत्ते, चरित्रे, पत्रे, रोजनिशा इ. इतिहाससामग्री Rerum italicarum scriptores च्या (१७२३–१७५१) एकूण अठ्ठावीस खंडांत प्रसिद्ध केली. तसेच Antiquitates italicae medii aevi मध्ये (६ खंड, १७३८–१७४३) ह्याच कालखंडातील चालीरीती, सामाजिक संस्था इत्यादींसंबंधीचे चिकित्सक लेखन करून इतिहासातील अनेक गुंतागुतीच्या प्रश्नांची चर्चा केली. Annali d' Italia (१२ खंड, १७४४–१७४९) ह्या नावाचा इटलीचा इतिहास याने लिहिला. त्याला इटलीतील आधुनिक इतिहासलेखनाचा संस्थापक मानण्यात येते. इतिहासलेखनाखेरीज आपल्या Della perfetta Poesia italiana मध्ये (१७०६) त्याने आपले वाङ्‌मयविषयक सिद्धांत मांडले. वाङ्‌मयविषयक लेखन करणाऱ्यांत जोव्हान्नी ग्राव्हीना (१६६४–१७१८) आणि जिरॉलामो तीराबॉस्की (१७३१–१७९४) ही नावेही उल्लेखनीय होत. ‘अकॅडमी ऑफ आर्केडिया’चा ग्राव्हीना हा एक संस्थापक होय. आपल्या Della Ragion Poesia मध्ये (२ खंड, १७०८, इं. शी. ऑन द नेचर ऑफ पोएट्री) त्याने काव्यातील मूलभूत प्रश्नांचा विचार केला आहे. तीराबॉस्कीने Storia della letteratura italiana हा इटालियन साहित्याचा इतिहास बावीस खंडात लिहिला (१३ खंड, १७७२–१७८२ आणि ९ खंड, १७८७–१७९४).

वाङ्‌मय आणि इतिहास ह्यांखेरीज इतर विषयांतही लक्षणीय स्वरूपाचे लेखन झाले. चेझारे बेक्कारिआ (१७३८–१७९४) ह्याने आपल्या Dei delitti e delle pene (१७६४, इं. भा. ऑफ क्राइम्स अँड पनिशमेंट्स, १९६५) ह्या ग्रंथात पुरीगामी दंडव्यवस्थेविषयी विचार मांडले, तर जोव्हान्नी मारीआ ओर्तेस आणि फेर्नादो गाल्यानी (१७२८–१७८७) ह्या दोघांनी अर्थशास्त्रविषयक मौलिक लेखन केले. विविध विषयांवरील ह्या आस्थापूर्वक लेखनातून नवजागृतीची जाणीव सुस्पष्टपणे प्रतीत होते. प्येअत्रो व्हेर्री (१७२८–१७९७) ह्याने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांचा सुरस्कार करण्यासाठी १७६४ मध्ये Il caffe (इं. शी. द कॉफी हाऊस) हे नियतकालिक सुरू केले होते. नव्या जाणिवा वाढीला लावण्यास ह्या नियतकालिकाने महत्त्वाचा हातभार लावला.

लेखक : कुलकर्णी, अ. र.; आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) शिरोडकर, द. स. (म.)

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate