অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांख्यकारिका

सांख्यकारिका

कपिलप्रणीत सांख्यदर्शनावरील एक प्राचीन ग्रंथ. कर्ता ईश्वरकृष्ण. सांख्यदर्शनाचा मूळ प्रणेता कपिल होय; तथापि कपिलाचा सांख्यदर्शनावरील कोणताही ग्रंथ उपलब्ध नाही. सांख्यसूत्रे वा सांख्यप्रवचन ह्या नावाचा सहा अध्यायांचा जो ग्रंथ आहे, तो कपिलाचा असावा, असे सांगितले जात असले, तरी सांख्यसूत्रे चौदाव्या शतकापर्यंत अस्तित्वात नव्हती. माधवाचार्यांच्या ( सु. १२९६–१३८६) सर्वदर्शनसंगहात ह्या ग्रंथाचा निर्देश नाही. कपिल  आसुरी  पंचशिख  ईश्वरकृष्ण अशी सांख्यदर्शनाची परंपरा सांख्यकारिकेत सांगितली आहे. तेथे म्हटले आहे, की हे श्रेष्ठ आणि पवित्र ज्ञान मोठ्या कृपेने कपिलमुनींनी आसुरीला दिले आणि आसुरीने पंचशिखाला दिले. पंचशिखाने ह्या ज्ञानाचे विस्तारपूर्वक विवेचन (षष्टितंत्रात ) केले (कारिका ७०). पंचशिखाने सांख्यदर्शनावरील षष्टितंत्र हा ग्रंथ लिहिला होता, असेही मानले गेले आहे; तथापि हा ग्रंथ आज उपलब्ध नाही. ह्याच ग्रंथाचा सारभूत भाग ईश्वरकृष्णांनी सांख्यकारिकेत आणला आहे. सांख्यकारिकेत एकूण ७० आर्या असल्याचा निर्देश सांख्यकारिकेच्या उपसंहारात्मक अशा ज्या तीन आर्या आहेत, त्यांतील बहात्तराव्या आर्येत आलेला आहे. तेथे म्हटले आहे, की ह्या ७० कारिकांत जे विषय आहेत, ते संपूर्ण षष्टितंत्रातलेच आहेत. षष्टितंत्रातील आख्यायिका व परमतखंडन एवढा भाग मात्र येथे वगळला आहे. उपसंहारात्मक तीन आर्या धरुन पाहिल्यास सांख्यकारिकेत ७३ कारिका होतात. ईश्वरकृष्णांनी सांख्यदर्शनाचे ७० कारिकांत संक्षेपाने विवेचन केले, असे जरी ह्या ग्रंथात म्हटले असले, तरी मुंबईत कोलब्रुक आणि विल्सन ह्यांच्या भाषांतरासह प्रसिद्घ झालेल्या सांख्यकारिकेच्या प्रतीत मूळ विषयावर ( सांख्यदर्शन ) फक्त ६९ कारिकाच आहेत; तेव्हा सत्तरावी कारिका कोणती, अशी शंका येऊ शकते. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्या तील एका तळटीपेत ह्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘आमच्या मते ही आर्या हल्लीच्या एकसष्टाव्या आर्येपुढे असावी. कारण एकसष्टाव्या आर्येवर गौडपादांचे जे भाष्य आहे, ते एका आर्येचे नाही, दोन आर्यांचे आहे, आणि ह्या भाष्यातील प्रतीकपदे घेऊन आर्या बनवली तर ती अशी होते’ :

कारणमीशरमेके बुवते कालं परे स्वभावं वा ।

प्रजाः कथं निर्गुणतो व्यक्तः कालः स्वभावश्च ॥

अर्थ –कित्येकांचे म्हणणे असे, की सृष्टीचे कारण ईशर आहे. कित्येक काल, तर दुसरे स्वभाव ह्यांना मूलकारण मानतात; पण ते बरोबर नाही. ईश्वर एकतर निर्गुण असेल नाही तर सगुण असेल. निर्गुण ईश्वरापासून (त्रिगुणात्मक) सृष्टी होणेच शक्य नाही आणि सगुण ईश्वर व्यक्तातच येतो. काल आणि स्वभाव हे तर व्यक्तच आहेत.

ही आर्या (कारिका) मागल्या-पुढल्या संदर्भालाही धरुन आहे; परंतु ती निरीशरवादी असल्यामुळे ती नंतर कोणीतरी काढून टाकली असावी.

ह्या ग्रंथावरील गौडपादाचार्यांचे (इ. स. चे सातवे शतक सामान्यतः) सांख्यकारिकाभाष्य प्रसिद्घ असून वाचस्पतिमिश्रांची (इ. स. चे नववे शतक) सांख्यतत्त्वकौमुदी ही टीका सर्वोवत्कृष्ट मानली जाते. सांख्यकारिकेवरील माठराची माठरवृत्ति ही टीका सर्वांत प्राचीन आहे. तिचे भाषांतर इ. स. ४५० च्या सुमारास चिनी भाषेत झालेले आहे.

लेखक: अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate