অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांवत्सरिक (ॲन्युअल, यिअर बुक)

सांवत्सरिक (ॲन्युअल, यिअर बुक)

प्रतिवर्षी नियमितपणे प्रकाशित होणारे व संदर्भमूल्य असलेले नियतकालिक वा पुस्तक. ‘वार्षिक’ हा मराठी पर्याय जास्त रूढ आहे. साधारणपणे वर्षभरात घडलेल्या राजकीय-सामाजिक घटना-घडामोडी व तथ्ये, आर्थिक व अन्य स्वरूपाची आकडेवारी, सांख्यिकी, विद्यमान वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती, सांस्कृतिक प्रवाह इत्यादींची सारांशरूपाने संक्षिप्त माहिती सांवत्सरिकात दिली जाते. साधारणपणे ज्या वर्षी ते प्रकाशित होते, त्याच्या आधीच्या वर्षातील घटनांची जंत्री व माहिती वार्षिकात समाविष्ट केली जाते. ‘संवत्सर’ (वर्ष) यावरून ‘सांवत्सरिक’ (वार्षिक) ही संज्ञा रूढ झाली. कोशासारख्या संदर्भग्रंथांचे प्रकाशक आपल्या कोशातील माहिती व आकडेवारी अद्ययावत करण्यासाठी वार्षिके वा वार्षिक पुरवण्या दरवर्षी नियमितपणे प्रकाशित करतात. अशा वार्षिक ज्ञानकोशात अनेकविध विषयांवर तज्ज्ञांनी लिहिलेले विपुल लेख संकलित केलेले असतात.सातत्याने व नियमितपणे प्रदीर्घकाळ प्रकाशित होणारे सुरुवातीचे विक्रमी वार्षिक म्हणून ‘ॲन्युअल रजिस्टर’ चा उल्लेख करावा लागेल. ते इंग्लंडमध्ये कवी, नाटककार व ग्रंथविक्रेता रॉबर्ट डॉड्झ्ली (१७०३–६४) याने सुरू केले. प्रख्यात ब्रिटिश राजकीय विचारवंत  एडमंड बर्क (१७२९–९७) हा या वार्षिक नोंदणीग्रंथाचा सुरुवातीपासून सु. ३० वर्षे संपादक होता. अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल यिअर बुक  हे १८९९ पासून १९०३ पर्यंत प्रतिवर्षी प्रकाशित होत होते. पुढे १९०७ पासून ते द न्यू इंटरनॅशनल यिअर बुक  या नावाने प्रसिद्घ होऊ लागले.द अमेरिकाना ॲन्युअल  हे एनसायक्लोपीडिया अमेरिकाना  या ज्ञानकोशाचे वार्षिक १९२३ पासून प्रतिवर्षी नियमितपणे प्रकाशित होऊ लागले. अन्य ज्ञानकोश वार्षिकांत द बुक ऑफ नॉलेज ॲन्युअल (१९३९ मध्ये प्रारंभ; १९७० पासून द न्यू बुक ऑफ नॉलेज ॲन्युअल या शीर्षकाने प्रकाशित); ब्रिटानिका बुक ऑफ द यिअर (१९३८ पासून); कोलिअर्स यिअर बुक (१९३९पासून) व एन्‌सायक्लोपीडिया यिअर बुक (१९५६ पासून) यांचा समावेश होतो. अन्य वार्षिक संदर्भकोशांत द स्टेट्समन यिअर बुक (१८६४ पासून), द यूरोपा वर्ल्ड यिअर बुक (१९५९ पासून) इत्यादींचा उल्लेख करता येईल.

सांवत्सरिकाचा आणखी एक प्रकार म्हणजे वाङ्‌मयीन वार्षिके. एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्य जगात अशी वाङ्‌मयीन वार्षिके लोकप्रिय होती. त्यांत उत्कीर्णने, रंगीत चित्रपत्रे इ. अंतर्भूत करून त्यांची सजावट केली जाई व ही वार्षिके प्रायः नाताळसारख्या सणप्रसंगी भेटीदाखल दिली जात. या प्रकारातील पहिले वार्षिक फरगेट-मी-नॉट  हे १८२३ मध्ये इंग्लंडमध्ये अवतरले. अमेरिकेतील पहिले वाङ्‌मयीन वार्षिक अटलांटिक सूव्हेनिअर  हे फिलाडेल्फियात १८२६ मध्ये प्रकाशित झाले. १८३२ पर्यंत इंग्लंडमध्ये ६३ वार्षिके व भेट पुस्तके प्रकाशित झाली आणि अमेरिकेत १८५१ मध्ये सु. ६० वार्षिके प्रसिद्घ झाली. अशा वाङ्‌मयीन वार्षिकांना लेखनसाहाय्य करणाऱ्या ख्यातनाम साहित्यिकांत बायरन, स्कॉट, वर्ड्‌स्वर्थ, हॉथॉर्न, पो, इमर्सन, लाँगफेलो आदींचा समावेश होता. अनेक वार्षिके फक्त एकदाच प्रकाशित झाली; तथापि कीपसेक  हे वाङ्‌मयीन वार्षिक सातत्याने जवळजवळ ३० वर्षे, १८५७ पर्यंत प्रकाशित होत राहिले व ते या प्रकारातले अखेरचे वार्षिक होते.

भारताविषयीची अद्ययावत सर्वांगीण माहिती व आकडेवारी देणाऱ्या वार्षिकांत भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रतिवर्षी प्रकाशित होणारे इंडिया: रेफरन्स ॲन्युअल (१९५३ पासून), तसेच मनोरमा यिअर बुक (१९६५ पासून) ही विशेष उल्लेखनीय आहेत. द टाइम्स ऑफ इंडिया डिरेक्टरी अँड यिअर बुक (१९८४ पर्यंत) हेही संदर्भमूल्य असलेले, महत्त्वाचे वार्षिक प्रकाशन होते. या प्रकाशनाची सुरुवात १८४९ मध्ये द बाँबे कॅलेंडर अँड ऑल्मनॅक या शीर्षकाने झाली. पुढे त्याची दोन वेगवेगळी प्रकाशने झाली: द इंडियन यिअर बुक अँड हूज हू  आणि द टाइम्स ऑफ इंडिया डिरेक्टरी. १९५३ मध्ये मात्र त्यांचे एकत्रीकरण करून द टाइम्स ऑफ इंडिया डिरेक्टरी अँड यिअर बुक  या शीर्षकाने त्याचे प्रकाशन होऊ लागले.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन ही जिल्हानिहाय, प्रतिवर्षी अद्ययावत आकडेवारी व माहिती देणारी वार्षिके नियमितपणे प्रकाशित होत असतात. संतोष दास्तानेसंपादित महाराष्ट्र (१९८२ पासून) हेही उपयुक्त संदर्भमूल्य असलेले वार्षिक प्रतिवर्षी प्रकाशित होते. मराठी विश्वकोशा चे माजी प्रमुख संपादक डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या संपादकत्वाखाली तयार झालेली विश्वकोश वार्षिकी २००५ ही संदर्भसाधन म्हणून उपयुक्त आहे. दर वर्षी दिवाळीच्या दरम्यान नियमितपणे प्रसिद्घ होणारे दिवाळी विशेषांक हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य  मानले जाते. अशा वाङ्‌मयीन दिवाळी वार्षिकांत मौज, दीपावली, अक्षर, हंस, नव-अनुष्टुभ् इ. उल्लेखनीय होत.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate