অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साहित्यशास्त्र

साहित्यसमीक्षा शास्त्र

स्थूलमानाने साहित्यसमीक्षा ज्याच्या आधारे केली जाते ते शास्त्र म्हणजे साहित्यशास्त्र असे म्हणता येईल; पण ते गणित, भौतिकी, रसायनविज्ञान यांसारखे नियम-पोटनियमांच्या भाषेत बोलणारे काटेकोर शास्त्र नव्हे. ज्या साहित्याचे ते शास्त्र आहे, त्याची लक्षात घेण्याजोगी काही गमके असली, तरी त्याची एकंदर प्रकृतीच अशी आहे, की त्याचे नियम-पोटनियमयुक्त काटेकोर शास्त्र होऊ शकत नाही. असे शास्त्र न बनण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक साहित्यकृती ही प्रकृतीने व प्रतिज्ञेने अनन्यसाधारण असते आणि कोणत्याही गोष्टीचे साधारणीकरण केल्याशिवाय तिचे शास्त्र बनवता येत नाही. साहित्याचे शास्त्र बनवणे म्हणजे जे प्रकृतिप्रतिज्ञेने अनन्यसाधारण, त्याचे साधारणीकरण करणे होय. त्यामुळे असे शास्त्र बनवण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा त्या शास्त्राच्या आधारे होणारी समीक्षा ही साहित्याला बाधक ठरण्याचा संभव असतो. साहित्यसमीक्षा ही समीक्षकाच्या साहित्यदृष्टीवर अवलंबून असल्यामुळे ती व्यक्तिनिष्ठ होणे, ही अपरिहार्य गोष्ट होय. याउलट वस्तुनिष्ठता हा कोणत्याही शास्त्राचा मूलभूत पाया आहे.

साहित्यविचारांचे, समीक्षाप्रणालींचे शास्त्र होऊ शकते का, यासंबंधी अशा प्रकारे अनेक मत-मतांतरे आढळून येतात. इतिहास, मानवशास्त्र, मानसशास्त्र इ. सामाजिक शास्त्रांप्रमाणेच साहित्यसमीक्षेचे शास्त्र होऊ शकते, असे एक मत आहे. निरीक्षण, वर्गीकरण, विश्लेषण, सिद्घांतन हे टप्पे अन्य सामाजिक शास्त्रांप्रमाणेच समीक्षेतही असतात. मात्र भौतिक शास्त्रांचे सिद्घांत जितके सार्वत्रिक व सार्वकालिक असतात, तसे साहित्यशास्त्राच्या सिद्घांतांबाबत म्हणता येत नाही. पाश्चात्त्यांचा नीतिविषयक दृष्टिकोण, त्या आधारे होत गेलेली साहित्यचर्चा व मांडले गेलेले सिद्घांत ह्यापेक्षा भारतीयांचा दृष्टिकोण व सिद्घांत वेगळे असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे साहित्यशास्त्राला स्थलसापेक्षता प्राप्त होते. प्राचीन काळातील धर्मकल्पनाधिष्ठित साहित्यविचार व अर्वाचीन काळातील भौतिकतासापेक्ष साहित्यविचार यांतही कालानुरूप अंतर पडलेले दिसते. तसेच प्राचीनांची रसचर्चा आधुनिक समीक्षेत अडगळीची ठरली असून ती बाजूला सारली पाहिजे, असा काही समीक्षकांचा दृष्टिकोण दिसतो. ह्यावरून साहित्यशास्त्रविचारात कालसापेक्षताही दिसून येते. तथापि शास्त्र या संकल्पनेमागील तर्कशुद्घ, सुसंगत व सुव्यवस्थित विचारांची मांडणी व त्याची सिद्घांतप्रस्थापनेत झालेली परिणती, ह्या शास्त्रीय कसोट्या समीक्षेलाही लागू पडत असल्याने काही एका मर्यादेपर्यंत ते शास्त्र मानावे, असाही एक मतप्रवाह दिसतो. ह्या शास्त्रीय कसोट्यांनुसार प्राचीन काळी संस्कृत, ग्रीक, पाश्चात्त्य साहित्यमीमांसकांनी साहित्यशास्त्रे निर्माण केली व त्यांनी दिलेला समीक्षाविचार आजच्या समीक्षेलाही पायाभूत, मूलगामी स्वरूपाचा ठरला. त्यातील काही सैद्घांतिक तत्त्वे, विचारप्रणाली, उपपत्ती आजवरच्या एकूण समीक्षाव्यवहारात मौलिक व उपयुक्त ठरत आली आहेत. उदा., या शास्त्रांनी केलेली साहित्यप्रकारांची मांडणी काही एका मर्यादेपर्यंत पुढेही ग्राह्य ठरली.

ग्रीक साहित्यशास्त्र

प्राचीन ग्रीक साहित्यशास्त्राने महाकाव्य (एपिक) व शोकात्मिका (ट्रॅजिडी) असे दोन वर्ग मानले होते. पुढे त्यात भावकाव्य (लिरिक) या तिसऱ्या वर्गाची भर पडली. वाङ्‌मयाच्या बाह्य रूपाप्रमाणेच अंतरंगाचाही विचार करून हे वर्ग मानलेले असावेत, असे दिसते. पुढे सतराव्या-अठराव्या शतकांत जॉन ड्रायडन  (१६३१–१७००), अलेक्झांडर पोप  (१६८८–१७४४) इत्यादिकांचे उपहासप्रधान काव्य व त्यानंतर उदयास आलेला कादंबरी हा वाङ्‌मयप्रकार ह्यांची व्यवस्था लावण्याकरिता इंग्रजी साहित्यशास्त्राने उपरोध (सटायर) व कादंबरी या दोन वर्गांची त्यात भर घातली.

संस्कृत साहित्यशास्त्र

संस्कृत साहित्यशास्त्राने वाङ्‌मयप्रकारांचे वर्गीकरण वेगळ्या दृष्टीने केलेले दिसते. सर्व ललित वाङ्‌मयाला–मग ते पद्यात असो वा गद्यात– ‘काव्य’ ही व्यापक संज्ञा योजून त्याचे श्राव्य व प्रेक्ष्य असे दोन वर्ग कल्पिलेले आहेत. प्रेक्ष्य काव्याचे प्रेक्ष्यपाठ्य व प्रेक्ष्यगेय असे दोन उपवर्ग कल्पिलेले असून प्रेक्ष्यपाठ्यमध्ये नाटक, प्रकरण, नाटिका इ. बारा प्रकार आणि प्रेक्ष्यगेयामध्ये डोम्बिका, प्रस्थान इ. दहा प्रकार समाविष्ट केले आहेत.

प्राचीन काळ

प्राचीन काळी काव्यशास्त्र (पोएटिक्स) व साहित्यशास्त्र या दोन्ही संज्ञा समानार्थी मानल्या जात होत्या. शब्द आणि अर्थ हे माध्यम असलेल्या ‘काव्य’ या कलेची मीमांसा म्हणजे काव्यशास्त्र. हे शास्त्र प्राचीन भारतीय साहित्यविचारात अनेक नावांनी ओळखले जात होते. ‘क्रियाकल्प’ हे या शास्त्राचे सर्वांत जुने नाव होते. क्रियाकल्प अथवा काव्यक्रियाकल्प म्हणजेच काव्यरचनाशास्त्र. ‘काव्यलक्षण’ या नावानेही हे शास्त्र ओळखले जात होते. काव्यालंकारशास्त्र अथवा अलंकारशास्त्र हे या शास्त्राचे नावही रूढ होते. भामहाच्या (इ. स. ६०० ते ७५० च्या दरम्यान) ‘शब्दार्थौ सहितौ काव्यम्’ या सूत्रातील ‘सहितौ’ हे पद काव्यविवेचनात महत्त्वाचे ठरले व त्यावरूनच ‘साहित्य’ हा शब्द आला. शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे साहित्य. काव्यशास्त्राचाच पुढे इ. स. ९०० च्या सुमारास साहित्यशास्त्र असा निर्देश होऊ लागला.  राजशेखराने (नववे व दहावे शतक) ‘साहित्यविद्या’ असा शब्द प्रथम वापरला. साहित्यविद्या या संज्ञेत साहित्यसिद्घान्त व साहित्यसमीक्षा या दोन संज्ञांनी निर्देशित अभ्यासाचा समावेश करता येईल. साहित्यसिद्घान्त या संज्ञेखाली साहित्यविषयक तात्त्विक विचार आणि साहित्यसमीक्षा या संज्ञेखाली साहित्यकृतीची समीक्षा व तिच्याशी निगडित विचारव्यूह यांचा समावेश केला जातो. शब्द आणि अर्थ यांच्या सहभावाचे स्पष्टीकरण करणारी विद्या म्हणजे साहित्यविद्या. साहित्यविद्या हे शास्त्र असून कोणत्याही इतर शास्त्रांप्रमाणेच याही शास्त्राचे प्रणयन सूत्र, भाष्य, वृत्ती, टीका, समीक्षा आदींच्या द्वारा केले जाते. साहित्यशास्त्र हे साहित्याचा समग्रतेने, साकल्याने विचार करणारे शास्त्र असल्याने त्यात निर्मितिप्रक्रियेबरोबरच आस्वादक्रिया, वाचनतत्त्वे आदींचाही विचार अंतर्भूत होतो. तात्त्विक व उपयोजित पातळ्यांवर लिहिणे व वाचणे ह्या दोन्ही क्रियांचा समग्रतेने विचार करणारे हे शास्त्र आहे.

प्राचीन भारतीय ( संस्कृत ) साहित्यशास्त्राचा उगम भरतमुनीच्यानाट्यशास्रात आहे. त्यात नाट्याचे दहा प्रकार व आठ रसांचे स्पष्टीकरण तसेच अलंकारविषयक चर्चाही असल्याने हे विवेचन संस्कृतसाहित्यशास्त्राच्या पुढील वाटचालीस पायाभूत ठरले. इ. स. पाचव्याशतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत संस्कृत साहित्यशास्त्रातीलमहत्त्वाचे लेखन झालेले दिसते. भामहाने काव्यालंकार   या ग्रंथातसाहित्यशास्त्रविषयक विचार मांडले. तो अलंकार मताचा प्रवर्तक मानलाजातो.  दंडी ने (सु. ६०० ते ७५० दरम्यान) वक्रोक्ती व स्वभावोक्तीयांसंबंधीचे विवेचनकाव्यादर्शात केले.उद्‌भटाने (सु. ८००)अलंकारचर्चेला प्रथमच शास्त्रीय रुप दिले.वामनाने (सु.८००)रीती हा काव्याचा आत्मा असल्याचा सिद्घांत काव्यालंकारसूत्रात मांडला.  आनंदवर्धनाने (नववे शतक)  ध्वनिसिद्घांत   मांडून त्याद्वारेध्वनी हाच काव्याचा आत्मा असल्याचे प्रतिपादन ध्वन्यालोकात केले.राजशेखराने वाड्‌मयाचे शास्त्र व काव्य असे वर्गीकरण करुन त्याचेविवेचन काव्यमीमांसे त केले. अभिनवगुप्ताने (सु.९५०–सु.१०२०) आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकावर लोचन   ही टीका लिहिली.  क्षेमेंद्रा ची औचित्यविचारचर्चा   व कुंतकाचे वक्रोक्तिजीवित  हेसाहित्यशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जातात. मम्मटा चा (सु.११००) काव्यप्रकाश  हा साहित्यशास्त्रावरील प्रमाणभूत ग्रंथ मानलाजातो. त्यात काव्यशास्त्रविषयक सर्वांगीण, व्यापक विवेचन आहे. हा ग्रंथपुढे खूपच प्रसिद्घी पावला व त्यावर अनेक टीका व भाष्ये लिहिलीगेली. रुय्यकाने केलेले अलंकारांचे वर्गीकरण ( अलंकारसर्वस्व ) पुढेमान्यता पावले.  विश्वनाथाचा (चौदावे शतक) साहित्यदर्पण  हा ग्रंथ संस्कृत साहित्यशास्त्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘वाक्यंरसात्मकं काव्यम्’ ही त्याची काव्याची व्याख्या पुढे मान्यता पावली.त्याने केलेली रसचर्चाही महत्त्वाची ठरली.  जगन्नाथपंडिताचा(सतरावेशतक) रसगंगाधर  हा संस्कृत साहित्यशास्त्रावरील अखेरचा मौलिकग्रंथ असून त्यातही सखोल, सांगोपांग रसचर्चा आहे. रससिद्घांत   ही संस्कृत साहित्यशास्त्रीय विचाराची परिणत अवस्था होय. याखेरीजकाव्यलक्षण, काव्यप्रयोजन, प्रतिभाशक्ती, शब्द व त्यांचे अर्थ, काव्यगुण, काव्यदोष, अलंकार इ. अनेक विषयोपविषयांची विस्तृत, सखोल चर्चा-चिकित्सा संस्कृत साहित्यशास्त्रकारांनीकरुन साहित्यशास्त्र प्रगतावस्थेला नेऊन पोचवले.

ॲरिस्टॉटलच्या (इ. स. पू. ३८४–३२२)पोएटिक्सने (काव्यशास्त्र ) पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा पाया घातला. त्यात शोकात्मिकाहा मध्यवर्ती विषय व महाकाव्य हा उपविषय असून काव्यशास्त्राचीमूलगामी सखोल चर्चा आहे. त्याने मांडलेला अनुकृति-सिद्घांत व भावविरेचन ( कॅथार्सिस ) उपपत्ती ह्यांतून पुढे पाश्चात्त्य साहित्यशास्त्र विकसितझाले. त्यामुळे तो पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा उद्‌गाता मानला जातो. रोमन कवी  हॉरिसने( इ. स. पू. ६५–८) आर्स पोएटिका ( इं. शी. ‘ आर्टऑफ पोएट्री’ ) या काव्यप्रबंधात आनंद आणि प्रबोधन ही साहित्याचीप्रयोजने मानली. लाँजायनसने ( इ. स. पहिले शतक ) पेरी हुपस्यूस( इं. भा. ऑन द सब्लाइम ) ह्या ग्रीक प्रबंधात वाड्‌मयीन महात्मता हीचसाहित्याची कसोटी मानणारा भव्योदात्ततेचा सिद्घांत मांडला.चौदाव्याशतकापासून सोळाव्या शतकापर्यंतच्या प्रबोधनयुगात या ग्रंथकारांच्याविचारधनाची ओळख यूरोपीय साहित्यविश्वात झाली. ॲरिस्टॉटलचेकाव्यशास्त्र सोळाव्या शतकात उजेडात आले. त्यामुळे यूरोपमधीलसाहित्य-कलामीमांसेचा उदय खऱ्या अर्थाने पंधराव्या-सोळाव्या शतकांतझाला, असे म्हणता येते.  सर फिलिप सिडनी  (१५५४–८६) यांचाडिफेन्स ऑफ पोइझी (प्रकाशन, १५९५) हा ग्रंथ महत्त्वाचा असून त्यात ॲरिस्टॉटलचा अनुकृति-सिद्घांत तसेच साहित्याची आनंद व प्रबोधनही प्रयोजने स्वीकारली व त्याचबरोबर नीतिशिक्षणाला विशेष महत्त्व देऊननैतिक आशय हा काव्याचा आवश्यक घटक मानला.  बेन जॉन्सन(१५७२–१६३७), जॉन ड्रॉयडन व अलेक्झांडर पोप ह्या नव-अभिजाततावादी कवी-नाटककार-समीक्षकांनी पाश्चात्त्य साहित्यशास्त्रीय विचारात मोलाची भर घातली. पोपचा एसे ऑन क्रिटिसिझम  हा हॉरिसच्या आर्स पोएटिकाच्या परंपरेतला प्रबंध असून, पोपने निसर्ग हाकलाकृतीच्या अनुकृतीचा विषय असतो, असे प्रतिपादन केले. सतराव्या-अठराव्या शतकांतील  जोसेफ ॲडिसन (१६७२–१७१९) व जी. ई. लेसिंग (१७२९–८१) हे साहित्यशास्त्रीय सिद्घांताची मांडणीकरणारे महत्त्वाचे समीक्षक-मीमांसक होते. ॲडिसनने अनुकृति-सिद्घांतस्वीकारला; पण अशा अनुकृतीत लेखकाच्या कल्पनाशक्तीचा सहयोगहीमहत्त्वाचा मानला. त्याच्या मते आल्हादक वस्तूची अनुकृती कल्पनाशक्तीच्या सहयोगाने अधिक आल्हाददायक होते. ॲडिसनने द्दक्‌प्रत्ययालाअधिक महत्त्व दिले. काव्य आणि द्दश्यकला यांतला संबंध हा त्याकाळातला महत्त्वाचा चर्चाविषय होता. लेसिंग या जर्मन कलामीमांसकानेचित्र आणि काव्य यांतील साम्यापेक्षा भेदाला महत्त्व दिले. कालमाध्यमव अवकाशमाध्यम यांतला हा भेद असल्याचे त्याने म्हटले आहे.अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील  सॅम्युएल जॉन्सन (१७०९–८४),  विल्यम वर्ड्‌स्वर्थ  (१७७०–१८५०),  एस्. टी. कोलरिज(१७७२–१८३४),  जॉन रस्किन (१८१९–१९००),  मॅथ्यूआर्नल्ड (१८२२–८८) हे साहित्यशास्त्रीय विचारधारा पुढे नेणारेमहत्त्वाचे सिद्घांतकार-समीक्षक होते. कवीने आपल्या काव्यकृतीतूनदेशकालाच्या मर्यादा ओलांडल्या पाहिजेत, वर्तमानकालीन तथ्यांऐवजीत्याने विश्वात्मक सत्याचा शोध घेतला पाहिजे, अशी डॉ. जॉन्सनचीभूमिका होती.वर्ड्‌स्वर्थ व कोलरिज हे स्वच्छंदतावादी सिद्घांतप्रणालीचेभाष्यकार कवी होते. मॅथ्यू आर्नल्ड यांनी साहित्यसमीक्षेलासमाजव्यवहारात मध्यवर्ती स्थान दिले. चिकित्सक वृत्तीतून वृद्घिंगतहोणारी ज्ञानव्यवस्था, विचारव्यवस्था ही उत्तम साहित्यनिर्मितीला उपयुक्त,परिपोषक ठरु शकते, असे त्यांचे प्रतिपादन होते. एकोणिसाव्या-विसाव्याशतकांतील  बेनीदेत्तो क्रोचे चा (१८६६–१९५२) अंतःप्रज्ञेवर आधारितआविष्कारवाद, तसेच  आय्. ए. रिचर्ड्‌स  (१८९३–१९७९) व टी. एस्. एलियट  (१८८८–१९६५) यांच्या नवसमीक्षाप्रणाली यांनीआधुनिक पाश्चात्त्य साहित्यशास्त्रीय विचारांत मोलाची भर घातली आहे.विशेषतः रिचर्ड्‌सचे प्रेरणासंतुलन व भावनात्मक भाषा आणि एलियटच्यावस्तुनिष्ठ सहबंध आणि व्यक्तित्वलोप ह्या उपपत्ती आधुनिक साहित्य-शास्त्रीय विचारधारेत महत्त्वाच्या मानल्या जातात.

मराठी साहित्यव्यवहार

मराठी साहित्यव्यवहारात संस्कृत साहित्यशास्त्रातील तसेच पाश्चात्त्यसाहित्यशास्त्र व समीक्षा यांतील विविध संकल्पनांचा आढळ होतो.संस्कृत साहित्यशास्त्र हे वारशाने चालत आले आहे, तर ब्रिटिश राजवटीमुळेव नंतरच्या विद्यापीठीय शिक्षणामुळे पाश्चात्त्य साहित्य, साहित्यसिद्घांतव समीक्षा यांचा परिचय होत गेला. मराठीचे स्वतंत्र असे साहित्यशास्त्रमांडता येईल का, याबाबतही विचार झाला. श्री.व्यं.केतकर(१८८४–१९३७) यांनी महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण (१९२८) याग्रंथात तेराव्या शतकातील मराठी कवींच्या काव्यातूनच त्यांचे साहित्यशास्त्रव्यक्त झाले आहे, असा अभिप्राय नोंदवला आहे. ज्ञानेश्वर ते रामदासया कालखंडात साहित्यशास्त्रीय विचार बऱ्याच प्रमाणात विकसित झाला,या गृहीतकावर आधारित मराठीचे साहित्यशास्त्र  (१९४०) हा ग्रंथमा. गो. देशमुख यांनी सिद्घ केला. आनंदवर्धन व अभिनवगुप्त यांनीसंस्कृत साहित्यशास्त्रात शांत रसाचा पुरस्कार सैद्घांतिक पातळीवर केला.त्याचा परिपूर्ण काव्यात्म आविष्कार ज्ञानेश्वरांनी केला. भक्ती ही दहावा रसमानून त्याला प्रस्थापित करण्याचे श्रेय देशमुख यांनी  वामनपंडिताला(१६०७–९५) दिले आहे. त्याने आपल्या काव्यात रसांचे वर्णन केले.संतकवींमध्ये रामदासांनी साहित्यशास्त्र सांगितले, असा केतकरांचाअभिप्राय आहे. निरंजनमाधव (१७०२–९०) या कवीने छंदशास्त्रावरवृत्तावतंस  आणि वृत्तमुक्तावलि   हे ग्रंथ रचले. शाहीर  रामजोशी  यांचाछंदोंमंजरी   ( संपा. रंगाचार्य रेड्डी ) हा ग्रंथ उपलब्ध आहे. कृष्णशास्त्रीराजवाडे यांचा अलंकारविवेक (१८५३), परशुरामपंत तात्या गोडबोले-कृत वृत्तदर्पण (१८६०), गणेशशास्त्री लेले यांचा साहित्यशास्त्र  (१८६२),दाजी शिवाजी प्रधान यांचा रसमाधव (१८६८), बळवंत माकोडे(१८५५–१९००) यांचा रसप्रबोध (१८९२) हे एकोणिसाव्या शतकातील साहित्यशास्त्रविषयक काही उल्लेखनीय ग्रंथ होत. संस्कृत साहित्यशास्त्रातील विचार मराठीत आणण्याचे कार्य या ग्रंथांनी केले. ग. त्र्यं.देशपांडे यांचा भारतीय साहित्यशास्त्र (१९५८) हा महत्त्वपूर्ण ग्रंथ असूनभारतीय ( संस्कृत ) साहित्यशास्त्रातील महत्त्वाच्या सिद्घांत-संकल्पनांचीचिकित्सक ओळख करुन देण्याचे कार्य या ग्रंथाने केले.  श्री. के.क्षीरसागर  यांनी टीकाविवेक (१९६५) या ग्रंथात पाश्चात्त्य समीक्षेतीलकाही तत्त्वप्रणालींचा परिचय करुन दिला. मराठीत समीक्षाविचारालाशास्त्रीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न काही समीक्षकांनी केला.  न. चिं.केळकर  ( सविकल्प समाधी ),  ना. सी. फडके ( कलावादी भूमिका, पुनःप्रत्यय-सिद्घांत ), मा. गो. देशमुख ( भावगंध ) इत्यादींचा उल्लेख यासंदर्भात करता येईल.  बा. सी. मर्ढेकर  ह्यांनी मराठीमध्ये सौंदर्यशास्त्रीय विचारसरणीचा पाया घातला. सौंदर्य आणि साहित्य  (१९५५)या पुस्तकात त्यांचा सौंदर्यशास्त्रीय व वाङ्‌मयीन विचार आला आहे.सौंदर्यभावनेची स्वायत्तता, संवादलय-विरोधलय-समतोललय हीलयतत्त्वे, वाङ्‌मयीन घाटाचे चैतन्यतत्त्व म्हणजेच लयतत्त्व हा विचार,भावनानिष्ठ समतानतेची संकल्पना ही त्यांच्या वाङ्‌मयीन सैद्घांतिक भूमिकेची काही सारतत्त्वे वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. प्रभाकर पाध्ये  यांचे सौंदर्यानुभव (१९७९) व  रा. भा. पाटणकर  यांचे सौंदर्यमीमांसा  (१९७४) ही पुस्तकेही साहित्यशास्त्रीय विचारांत मोलाची भर घालणारी आहेत.

संदर्भ : १. देशपांडे, ग. त्र्यं. भारतीय साहित्यशास्त्र,  मुंबई, १९५८.

२. देशमुख, मा. गो. मराठीचे साहित्यशास्त्र,पुणे, १९४०.

३. क्षीरसागर, श्री. के. टीकाविवेक,मुंबई, १९६५.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate