অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहली साहित्य

सिंहली साहित्य

‘श्रीलंका’ ह्या दक्षिण आशियाई द्वीपराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या सिंहली ह्या भाषेतील साहित्याचे सर्वांत प्राचीन नमुने श्रीलंकेच्या उत्तरमध्य भागात असलेल्या  सिगिरिया  किल्ल्याच्या एका भिंतीवर कोरलेल्या लहान लहान कवितांच्या स्वरुपात आढळतात. ह्या कवितांपैकी काही इ. स. पाचव्या शतकातल्या असाव्यात असे म्हटले जाते; तथापि संहितांच्या स्वरुपातले सिंहली साहित्य इ. स. दहाव्या शतकापासूनचे आहे. त्यात बौद्घ धर्मावरचे पाली ग्रंथ समजून घेण्याच्या दृष्टीने केलेले शब्दसंग्रह, टीका, टिपणे ह्यांचा समावेश होतो. बुद्घाच्या जीवनावरही काही लेखन झालेले आहे. गुरुलुगोमीचे Amavatura (इं. शी. ‘फ्लड ऑफ द अँब्रोशिया’) हे अठरा प्रकरणांचे बुद्घचरित्र उल्लेखनीय आहे. मार्ग चुकलेल्या लोकांना आपल्या प्रभावाने सन्मार्ग दाखविण्याच्या बुद्घाच्या सामर्थ्यावर ह्या चरित्रात विशेष भर दिलेला आहे. बौद्घ धर्माला अभिप्रेत असलेल्या सद्‌गुणांचा गौरव करणारे भक्तिप्रधान साहित्यही निर्मिले गेले.

इतिवृत्तलेखनातही सिंहली लेखकांना स्वारस्य होते. पालीमध्ये  दीपवंस,  महावंस  ह्यांसारखे इतिहासकथनपर असे जे ग्रंथ झाले, त्यांच्यापासून सिंहली लेखकांनी काही प्रेरणा घेतली असणे शक्य आहे. सिंहली भाषेतील थूपवंसय (बाराव्या शतकाचा उत्तरार्ध, इं. शी. ‘क्रॉनिकल ऑफ द ग्रेट स्तूप’) हे अशा प्रकारचे सर्वांत जुने लेखन होय. पराक्रम पंडित हा त्याचा लेखक. ह्यानंतरच्या लेखनात बौद्घांच्या सर्व महत्त्वाच्या स्थळांचा इतिहास आढळतो. हे सर्व लेखन बव्हंशी गद्यात आहे. सिंहली काव्यलेखनाचे नमुने गद्याच्या पूर्वीचे. हे काव्यलेखन पुढेही चालू राहिले. बुद्घाच्या जातककथा हा ह्या कवितांचा मुख्य विषय आहे. बौद्घांच्या अन्य कथाही काव्यबद्घ केलेल्या आहेत. जातकाच्या शैलीत महाभारताचेही एक सिंहली रुप (महापदरंग -जातकय ) घडविण्यात आले. कालिदासाच्या मेघदूता   वरुन प्रेरणा घेऊन संदेश काव्य हा नवीन काव्यप्रकार चौदाव्या शतकाच्या अखेरीस उदयास आला. संदेश काव्याच्या बरोबरीने काही कथाकाव्येही लिहिली गेली. श्री राहुलाचे काव्यशेखर  आणि वाट्टावेचे गुट्टिलकाव्यय  ही काव्ये ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत.

युद्घकाव्य आणि विलापिकाही रचल्या गेल्या. Parakumbasirita  ह्या काव्यात जयवर्धनपूर येथील राजा पराक्रमबाहू सहावा ह्याचा इतिहास आहे. बोधकाव्येही लिहिली गेली व ती लोकप्रियही होती. कुसजातक (सतरावे शतक) हे अलागियावन्ना मोहोत्तालाकृत ६८७ कडव्यांचे काव्य उल्लेखनीय आहे.

एकोणिसाव्या शतकात सिंहली साहित्यिक यूरोपीय साहित्याच्या प्रभावाखाली आले. हा प्रभाव कादंबऱ्यांतून विशेष दिसतो. कवितेच्या क्षेत्रातही बदल जाणवतात. कथाकाव्याकडून कवी भावकवितेकडे वळलेले दिसतात. नाटकांवरही यूरोपीय नाटकांचे संस्कार दिसून येतात.

लेखक:  अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate