অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिरियाक साहित्य

सिरियाक साहित्य

तुर्कस्तानातील इडेसा ह्या ख्रिस्ती प्रांताची अधिकृत भाषा म्हणून सिरियाक भाषेला मान्यता मिळाल्यानंतर सिरियाक साहित्याची निर्मिती तेथे होऊ लागली. इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत ही साहित्यनिर्मिती चालू होती. सेंट ईफ्रेएम सायरस (इ. स. चौथे शतक) ह्याचे ग्रंथ ह्या साहित्याच्या आरंभीच्या काळातले. तो धर्मोपदेशक होता. बायबल वर आणि ईश्वरविद्येवर त्याने भाष्ये लिहिली. त्याने लिहिलेल्या काही युक्तिवादात्मक (पॉलेमिकल) ग्रंथांचा ग्रीक आणि लॅटिन चर्चवर (चर्चेस) फार मोठा प्रभाव पडला. इडेसाच्या ॲकॅडेमीत तो अध्यापनही करत असे. त्याचे जन्मस्थळ निसिबिन, मेसोपोटेमिया हे इ. स. ३६३ मध्ये पर्शियनांच्या ताब्यात गेले. त्या संदर्भातल्या घटना त्याने ‘साँग्ज ऑफ निसिबिन’ (इं. अर्थ) ह्या त्याच्या काव्यातून वर्णन केलेल्या आहेत. तो इतिहास समजून घेण्याचे एक साधन म्हणून हे काव्य महत्त्वाचे मानले जाते. काव्य हा त्याचा आवडता साहित्यप्रकार होता; म्हणून त्याने काव्यातच त्याची प्रवचने, स्तोत्रे, विवेचक निबंध असे साहित्य लिहिले. त्याच्या काळातल्या प्रमुख पाखंडी मतांवरही त्याने लिहिले आहे. ह्या पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या अस्तित्वाच्या सातत्याचे दर्शन चर्चच्या रुपाने घडते, अशी त्याची धारणा होती. त्याने आपल्या लेखनातून केलेले स्वर्गाचे आणि नरकाचे तपशीलवार वर्णन ⇨ दान्ते ला आपल्या ⇨ दिव्हीना कोम्मेदीआ   ह्या जगप्रसिद्घ काव्यासाठी प्रेरणादायी ठरले. नरसाई (मृ. सु.– ५०३) हा पूर्व सिरियनांचा सर्वश्रेष्ठ कवी. त्याच्या सुंदर कवितांनी त्याला ‘पवित्र आत्म्याची वीणा’ अशी उपाधी त्याच्या समकालीनांनी दिली. पहिला पॅट्रीआर्क मायकेल ह्याने २१ भागांत लिहिलेल्या इतिवृत्तात (क्रॉनिकल) ११९५ पर्यंतचा चर्च आणि लौकिक जीवन ह्यांचा इतिहास सांगितला आहे. ऐतिहासिक साधनांच्या आणि अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने हे इतिवृत्त अतिशय महत्त्वाचे आहे.

ग्रीक ख्रिस्ती साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनेही सिरियाक भाषांतरांच्या माध्यमातून सिरियाक साहित्याचे आरंभीचे वाङ्‌मयीन प्रयत्न झाले. मूळ आणि अनुपलब्ध अशा ग्रीक ख्रिस्ती साहित्याचे स्वरुप जाणून घेण्याच्या दृष्टीने ह्या भाषांतरांचे महत्त्व मोठे आहे. ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल आणि अन्य प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ ह्यांचे तसेच प्राचीन ग्रीकांचे वैद्यक व अन्य शास्त्रे ह्यांवरील साहित्यही अनुवादरुपाने सिरियाक भाषेत आणले गेले. हे सर्व साहित्य ग्रीकमधून अरबी भाषेत आणण्यापेक्षा सिरियाक भाषेतून अरबीमध्ये आणणे अधिक सोपे असल्यामुळे त्याचा लाभ इस्लामी संस्कृतीलाही झाला. उदा., गालेन (इ. स. दुसरे शतक) ह्या ग्रीक वैद्याच्या ग्रंथाची थेट ग्रीक सिरियाक भाषेतून अरबी भाषेत १३०, तर थेट ग्रीकमधून अरबी भाषेत केवळ ९ भाषांतरे झाली. सिरियाक भाषेच्या माध्यमातून ग्रीकांच्या ज्ञानग्रंथांचा प्रभाव इस्लामी जगावर पडला.

लेखक: अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate