অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुभाषित वाङ्‌मय

सुभाषित वाङ्‌मय

सुभाषिते ही  संस्कृत साहित्या तील एक अमूल्य आणि समृद्घ भांडार होत. ही सुभाषिते जीवनाच्या सर्व अंगोपांगांना स्पर्श करणारी आहेत. साहित्यगुणांनीही ही सुभाषिते समृद्घ आहेत. चार पुरुषार्थ, नवरस, षड्‌रिपू ह्यांसारखे विषय ह्या सुभाषितांत येतातच; पण त्यांत उपहास, उपदेश आणि विनोदही वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आढळतो. केवळ सुभाषितनिर्मितीच्याच हेतूने लिहिलेल्या काव्यपंक्तिखेरीज कालिदास, भारवी, माघ, भवभूती इ. अनेक श्रेष्ठ संस्कृत साहित्यिकांच्या लेखनातून अनेक वैदग्ध्यपूर्ण आणि मनोवेधक सुभाषिते आढळून येतात. संस्कृत साहित्यातील ऐतिहासिक महत्त्वाचे असे जे काही सुभाषितसंग्रह आहेत. त्यांत कवीन्द्रवचनसमुच्चय  हा सर्वांत प्राचीन मानला जातो. बाराव्या शतकातील एका नेपाळी हस्तलिखितावरुन हा प्रकाशित करण्यात आलेला असून त्यात ११३ कवींच्या ५२५ सुभाषितांचा समावेश आहे. ह्या कवींपैकी एकही इ. स. १००० नंतरच्या काळातील आहे, असे दिसत नाही. त्यामुळे हा संग्रहही त्या काळाच्या नंतरचा असणार नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. ह्या संग्रहाचा संकलक अज्ञात आहे; तथापि ह्या संग्रहाच्या आरंभी बुद्घ आणि अवलोकितेश्वर ह्यांना वाहिलेले काही श्लोक पाहता तो बौद्घ असावा असे वाटते. मात्र ह्या श्लोकांखेरीज बौद्घ धर्माशी निगडित म्हणता येईल, असे ह्या संग्रहात काहीही नाही. त्यातले बरेचसे श्लोक प्रेम आणि प्रेमिक ह्या विषयांवर आहेत. ह्यानंतरचा निर्देशनीय सुभाषितसंग्रह श्रीधरदासाने संकलित केलेला सदुक्तिकर्णामृत  हा होय. हा १२०५ किंवा १२०६ मधला आहे. ४४६ कवींची सुभाषिते यात आहेत. जल्हणाचे सुभाषितमुक्तावलि  हे संकलन त्याने १२५७ मध्ये तयार केले. हा संग्रह बराच विस्तृत असून तो लघू आणि दीर्घ अशा दोन स्वरूपांत अस्तित्वात होता असे दिसते. परंतु त्याच्या मुद्रित स्वरूपात लघू आणि दीर्घ असा भेद न करता निवडक असे २,७९० श्लोक १३३ विभागांत समाविष्ट केलेले आहेत. २४० हून अधिक कवींच्या रचना ह्यात आहेत. ह्या संग्रहाच्या आरंभी, एका विभागात संस्कृत कवी आणि काव्य ह्यांवर काही श्लोक असून ते वाङ्‌मयेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दैव, प्रेम, राजसेवा, दातृत्व इ. अनेक विषयांवरची सुभाषिते यात आहेत. शाङ्‌र्गधर ह्याच्या शाङ्‌र्गधरपद्घती  त (१३६३) १६३ विभाग असून ४,६८९ श्लोक आहेत. सुमारे २९२ कवींच्या रचना ह्यात आहेत. काही श्लोक संकलकाचेही आहेत. वल्लभदासाची सुभाषितावली  ही महत्त्वाची आहे. हिचा काळ पंधराव्या शतकाच्या अलिकडे जात नाही. तीत १०१ विभाग वा पद्घती असून ३,५२७ श्लोक आहेत. तीत समाविष्ट केलेल्या रचना ३६० कवींच्या आहेत. प्रेम ह्या विषयावर तीत अनेक श्लोक आहेत. विविध विषयांवरील अन्य श्लोकांत जीवनातील वर्तन, निसर्ग ऋतू, व्यावहारिक ज्ञान आणि नर्मविनोद आढळतो. रूप गोस्वामीची पद्यावली   कृष्ण आणि कृष्णलीला ह्यांना वाहिलेली आहे. कृष्णभक्तीच्या संप्रदायाच्या विविध पैलूंनुसार आणि कृष्णाच्या शृंगारिक जीवनातील कथांनुसार ह्या संग्रहातील विभागांची व्यवस्था आहे. त्यात १२५ हून अधिक कवींचे ३८६ श्लोक आहेत. पंधराव्या शतकातील श्रीवराच्या सुभाषितावली  त ३८० कवींच्या सुभाषितांना स्थान मिळाले आहे.

त्यांशिवाय लक्ष्मणभट्टाची पद्यरचना, हरी भास्कराची पद्यामृततरंगिणी, हरी कवीची सुभाषितहारावली, वेणीदत्ताची पद्यवेणी  ही संकलने सतराव्या शतकातली.

विविध सुभाषितसंग्रहांतून काही स्त्रियांच्या रचना आलेल्या आहेत. अशा सु. ४० कवयित्रींचे सु. १५० श्लोक ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आपल्याला उपलब्ध आहेत. विज्जा, विकटनितंबा, भावदेवी, गौरी, पद्मावती आणि विद्यावती ह्या त्यांतील काही विशेष उल्लेखनीय कवयित्री होत. कोणत्या ग्रंथांतून त्यांच्या रचना संकलनासाठी घेतल्या ह्याची माहिती नसल्यामुळे त्यांच्या एकंदर वाङ्‌मयीन कर्तृत्वाचे स्वरूप समजणे कठीण आहे. प्रेम हा जवळपास सर्वच कवयित्रींचा आवडता विषय आहे आणि वर्णनात्मक श्लोकांतूनही रतिभावना गर्भितार्थाने असलेली दिसते. मात्र स्त्रीत्वाचा खास ठसा ह्या रचनांवर सामान्यतः दिसत नाही. त्यामुळे ह्या रचना पुरुषांच्याच असून स्त्रियांच्या काल्पनिक नावांनी त्या रचिल्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली जाते.

काही ग्रंथ–उदा., पंचतंत्र, हितोपदेश – हे नीतिबोधक असल्यामुळे त्यांमधून तर अनेक सुभाषिते आढळतात. भर्तृहरी आपल्या शतकत्रयांतून अनेक उत्तमोत्तम सुभाषिते सादर करतो. भल्लटाचे भल्लट शतक, सिल्हणाचे शांतिशतक  ह्यांत सुभाषिते आहेतच.

लेखक: ग. मो. पाटील ; अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate