অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूचि

सूचि

ग्रंथ, नियतकालिके यांच्या मजकुरात आलेली नावे, विषय इत्यादींची, त्यांचा उल्लेख असलेल्या पृष्ठक्रमांकांसह, वर्णक्रमानुसार केलेली यादी म्हणजे सूची. सूची ही संज्ञा ‘इंडेक्स’ व ‘कॅटलॉग’ ह्या इंग्रजी संज्ञांसाठी मराठी पर्यायी संज्ञा म्हणून वापरली जाते. सूची ही सामान्यतः ग्रंथाच्या शेवटी दिली जाते, तर अनुक्रमणिका (टेबल ऑफ कन्टेंट्स) ग्रंथाच्या प्रारंभी दिली जाते व त्यात ग्रंथातील प्रकरणांची शीर्षके, त्यांच्या आरंभपृष्ठक्रमांकासह दिली जातात. ग्रंथात ज्याची थोडीफार माहिती वा निर्देश असतील असे सर्व विषय व नामे पृष्ठक्रमांकांसह नोंदवून त्यांच्याकडे वाचकाचे लक्ष वेधणे, हे सूचीचे प्रधान उद्दिष्ट असते. विषय व तत्संबद्घ माहिती वा उल्लेख असलेले ग्रंथातील पृष्ठक्रमांक यांच्या एकत्रित नोंदीला सूचीची ‘निर्देशनोंद’ (इंडेक्स एन्ट्री) म्हणतात. ग्रंथातील निर्देशनोंदी अनेकविध प्रकारच्या असतात. त्यांत अनेकविध विषयोपविषय, व्यक्तिनामे, स्थलनामे, संज्ञा-संकल्पना, ग्रंथनामे, ग्रंथकारनामे, संकीर्ण बाबी वगैरे अनेक निर्देशांचा समावेश होऊ शकतो. अर्थातच ग्रंथाच्या स्वरुपानुसार निर्देशनोंदींची संख्या व व्याप्ती ठरते, हे उघडच आहे. ग्रंथ, नियतकालिके व त्यांचे संच, वृत्तपत्रांचे संच, कोशवाङ्‌मय, संशोधनपर प्रबंध, माहितीसंकलक दप्तरे (इन्फर्मेशन फाइल्स) अशा नानाविध प्रकारच्या व स्वरुपाच्या मुद्रित वाङ्‌मयाची सूची केली जाते व वाचकांना, अभ्यासकांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ती उपयुक्त ठरते. ग्रंथाच्या वा अन्य मुद्रित वाङ्‌मयाच्या मजकुरात विखुरलेली एखाद्या विषयाची माहिती शोधण्यासाठी, ती मिळवून एकत्रित करण्यासाठी व त्या विशिष्ट निर्देशसंबद्घ माहितीचे, तपशिलांचे संकलन करण्यासाठी वाचकाला सूचीचा विशेषेकरुन उपयोग होतो. त्या दृष्टीने वाचकाच्या विशिष्ट, अपेक्षित गरजा नेमकेपणाने ओळखून त्याला उपयुक्त ठरतील अशा ग्रंथांतर्गत निर्देशनोंदी निवडणे व निश्चित करणे, त्यांच्यापुढे संबंधित पृष्ठक्रमांक आवश्यक तेथे ‘अ’/‘आ’ अशा स्तंभनिर्देशांसह नोंदवून अशा निर्देशनोंदींची वर्णक्रमानुसार यादी तयार करणे व सूचीची अंतिम छपाई सिद्घ होईपर्यंत सूचीच्या मुद्रितांवर देखरेख करणे, अशा स्वरुपाची अनेकविध कामे सूचिकाराला पार पाडावी लागतात. सूचीच्या निर्देशनोंदीपुढे पृष्ठक्रमांक (स्तंभनिर्देशांसह) देणे अनिवार्यच असते. काही विशिष्ट प्रकारच्या सूचींमध्ये अन्य स्थान-निर्देशक (लोकेटर) वापरले जातात. उदा., नकाशा-संग्रहसूचीमध्ये स्थाननिश्चितीदर्शक अक्षांश-रेखांश, वा पृष्ठक्रमांक व चौकटी, रंगरेषादी संकेतचिन्हे अशा निर्देशकांचा वापर केला जातो. पृष्ठक्रमांक वा अन्य निर्देशक दिले नसतील, तर ती सूची अपूर्णच राहते व वाचकांनाही विशिष्ट माहिती नेमक्या ठिकाणी सापडत नाही. सारांश, सूची म्हणजे ग्रंथातील विशिष्ट विषयाच्या माहितीचा वा निर्देशाचा नेमका ठावठिकाणा सांगणारी, अचूक पत्ता देणारी एक प्रकारची निर्देशिकाच होय. सूचीचे अभ्यासकांच्या दृष्टीने असलेले महत्त्व व संदर्भमुल्य निर्विवाद आहे. निव्वळ माहिती देण्यासाठी लिहिलेल्या माहितीपर ग्रंथात जर सूचीची जोड दिली नसेल, तर त्या ग्रंथाच्या संदर्भमुल्यात उणेपणा जाणवतो.

ऐतिहासिक आढावा : सर्वांत आद्य, ज्ञात असलेली शोधसाहाय्यक यादी (फाइंडिंग लिस्ट) प्राचीन ग्रीक कवी व विद्वान ⇨ कॅलिमाकस (इ. स. पू. सु. ३१५–२४०) याने तयार केली. ईजिप्तच्या टॉलेमी फिलडेल्फसने ॲलेक्झांड्रियाच्या विख्यात ग्रंथालयात त्याची ग्रंथसूचीकार म्हणून नेणूक केली. तेथे पिनाकीज (टॅब्लेट्स-इष्टिका ग्रंथ) ह्या नावाने १२० खंडांची एक महत्त्वाची ग्रंथसूची त्याने तयार केली. त्यात हजारो भूर्जपत्र गुंडाळ्यांतील (पपायरस रोल्स) माहितीचे संदर्भस्रोत दिले होते. आद्य व प्राथमिक स्वरुपाची वर्णानुक्रमे सूची जोडलेली हस्तलिखिते साधारणतः सोळाव्या शतकापासून आढळू लागली. अशा प्रकारच्या आद्य सूचींमध्ये साधारणत: एका वर्णाखाली येणाऱ्या निर्देश-नोंदी एकत्र दिल्या जात; तथापि त्यांची एकूण मांडणी वर्णक्रमानुसार केली जात नसे. सोळाव्या शतकात अशा सूचिसदृश यादीसाठी ‘इंडेक्स’ ही संज्ञा सर्रास वापरली जात असे; मात्र सतराव्या शतकापर्यंत ही यादी वर्णक्रमानुसार क्वचितच रचली गेली. त्यात सुधारणा होत जाऊन वर्णक्रमे सूची करण्याची पद्घती खऱ्या अर्थाने अठराव्या शतकात विकसित झाली. ह्याचे उत्तम उदाहरण ⇨ दनी दीद्रो  (१७१३–८४) ह्याच्या लांसिक्लोपेदी   (१७५१– ७२) ह्या फ्रेंच विश्वकोशात आढळते. त्यात सूचीतील निर्देशनोंदींची वर्णक्रमानुसार नेमकी व काटेकोर मांडणी आढळून येते. नंतरच्या काळात ग्रंथ व नियतकालिके अशा स्वरुपाच्या वाङ्‌मयाला सूची जोडण्याची प्रथा सर्वत्र रुढ होत गेली. मात्र एकोणिसाव्या शतकातच खऱ्या अर्थाने सर्वांगीण व समग्र ज्ञानक्षेत्रांना सामावून घेणाऱ्या सर्व-समावेशक, व्यापक व विस्तृत सूचींची संकलने-संपादने करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाले. लंडनच्या ‘इंडेक्स सोसायटी'ने प्रकाशित केलेल्या हेन्री बी. व्हीटलीच्या व्हॉट इज ॲन इंडेक्स? (१८७८) व हाऊ टू मेक ॲन इंडेक्स  (१९०२) ह्या प्रारंभीच्या प्रमाणभूत सूचिविषयक ग्रंथांत सूची या संज्ञेची व्याख्या, सूचीकरणाचा (इंडेक्सिंग) ऐतिहासिक आढावा, तत्त्वे व कार्यपद्घती यांचा विस्तृत ऊहापोह आढळतो. सूची व सूचीकरण यांविषयी नंतरच्या काळात जे अभ्यासग्रंथ निर्माण झाले, त्यांमुळे सूची एक महत्त्वपूर्ण संदर्भसाधन म्हणून उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगत होत गेली. सूचीची गरज व उपयुक्तता ह्यांसंबंधी लेखक-प्रकाशकांत जागरुकता निर्माण करण्यात, तसेच सूचीकरणाची तत्त्वे व तंत्रे अधिक विकसित करण्यात ही ग्रंथनिर्मिती साहाय्यभूत ठरली. वर्गीकरणयुक्त वा वर्गीकृत सूची (क्लासिफाइड इंडेक्स) व विषयसूची (सब्जेक्ट इंडेक्स) हे सूचीचे अधिक प्रगत प्रकार, त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे व त्या तयार करण्याच्या कार्यपद्घती ह्या ग्रंथांतून विकसित होत गेल्या, तसेच सर्वसामान्य सूचीची (जनरल इंडेक्स) प्रमाणबद्घ व पद्घतशीर मूलतत्त्वे प्रस्थापित करण्याचे प्रयत्नही ह्या काळात प्रामुख्याने झाले. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्टँर्डड्स इन्स्टिट्यूट’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या यू एस् ए स्टँडर्ड बेसिक क्रायटेरिआ फॉर इंडेक्सेस  आणि ‘ब्रिटिश स्टँर्डड्स इन्स्टिट्यूशन’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या रेकमेंडेशन्स फॉर द प्रेपरेशन ऑफ इंडेक्सेस  ह्या महत्त्वाच्या संदर्भ-पुस्तिकांचा उदाहरणादाखल उल्लेख करता येईल.

नियतकालिकांची सूची साधारणपणे त्या प्रकाराच्या प्रारंभाइतकी जुनी आहे. १८४८ मध्ये अमेरिकेत तत्कालीन सर्वाधिक खप असलेल्या नियतकालिकांची सर्वसाधारण सूची विल्यम फ्रेडरिक पूल (१८२१–९४) ह्या अमेरिकन ग्रंथपालाने तयार केली. पूल्स इंडेक्स टू पीरिऑडिकल लिटरेचर.... ह्या नावाने ही सूची ओळखली जाते. पूल्स इंडेक्स  हे नंतरच्या काळातही १९०७ पर्यंत सहकारी तत्त्वावर संकलितसंपादित व प्रकाशित होत राहिले. पुढील काळात त्याची जागा रीडर्स गाइड टू पीरिऑडिकल लिटरेचर  नामक सूचि-संकलनाने घेतली. ॲन इंटरनॅशनल इंडेक्स टू पीरिऑडिकल लिटरेचर  ही आंतरराष्ट्रीय कालिक वाङ्‌मयसूची १९१३ पासून प्रकाशित होत असते. वर्षभर विशिष्ट कालावधीने प्रसिद्घ होणाऱ्या नियतकालिकांतील (उदा., मासिके, द्वैमासिके, त्रैमासिके इ.) घटना, लेख व लेखक यांच्या सूचीची पुरवणी वर्षाखेरीस प्रसिद्घ केली जाते.

सूची : स्वरुप, रचनातत्त्वे व प्रकार : सूचीचे स्वरुप, उद्दिष्टे व कार्यपद्घती यांनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. बहुतांशी ग्रंथ, नियतकालिके यांच्या सूची सर्वसाधारण स्वरुपाच्या (जनरल इंडेक्स) असतात. त्या वर्गीकरणयुक्त वा विषयवार नसतात. त्यांतील निर्देशनोंदींची रचना वर्णक्रमानुसार असते. अनेकखंडी विश्वकोश वा ग्रंथसंच यांच्या सूचींमध्येही वर्णक्रमानुसार रचनाक्रम पाळला जातो. सूचीमधील निर्देश-नोंदींची वर्णक्रमानुसार रचना साधारणतः दोन प्रकारे केली जाते : (१) शब्दानुक्रमे (वर्ड बाय वर्ड) वर्णक्रमरचनापद्घती व (२) अक्षरानुक्रमे (लेटर बाय लेटर) वर्णक्रमरचनापद्घती. ही दुसरी पद्घती अनेक विश्वकोशां त तसेच दर्शनिकांमध्ये (गॅझेटीअर्स) अनुसरली जाते. यू.एस्.ए. स्टँडर्ड पद्घतीमध्ये मात्र शब्दानुक्रमे रचनाक्रम अनुसरला आहे. काही विशिष्ट सूचींमध्ये गरजा व उपयुक्तता यांनुसार निर्देशनोंदींचे वेगवेगळे रचनाक्रम अनुसरले जातात. काही सूचींमध्ये कालक्रमानुसार (क्रॉनॉलॉजिकल) निर्देशनोंदींची मांडणी केली जाते. उदा., ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार जंत्री असलेली सूची इतिहासविषयक ग्रंथांतून आढळते. काही सूचींमधील निर्देशनोंदी संख्याक्रमानुसार (न्यूमेरिकल) रचल्या जातात. उदा., सांख्यिकीय आकडेवारी असलेल्या अहवालांच्या सूची. वर्गीकृत सूची ह्या प्रकारात सूची तयार करण्याचे प्रमुख उद्दिष्ट विशिष्ट वर्गवारीनुसार त्या त्या वर्गाखाली येणारी माहिती संकलित करणे हे असते. उदा., एखाद्या वाङ्‌मयीन सूचीमध्ये कथा, काव्य, कादंबरी, नाटक अशा वाङ्‌मयप्रकारांखाली ग्रंथशीर्षकांची वर्गवारी करुन सूची दिली जाईल; तद्वतच ग्रंथकारांची वेगळी नामसूचीही दिली जाईल. कित्येकदा नामनिर्देशांच्या (उदा., व्यक्तिनामे, स्थलनामे, संस्था/संघटनांची नावे इ.) वेगळ्या सूचीही वाचकांच्या सोयीसाठी दिल्या जातात. शीर्षकसूचीमध्ये साहित्यकृतींची शीर्षके, चित्र-शिल्पादी कलाकृतींची शीर्षके, संगीतकृतींची शीर्षके, नाटके-चित्रपटादिंची शीर्षके इत्यादींचा समावेश केला जातो. कित्येकदा त्यांचे अन्य सूचिनिर्देशांहून वेगळेपण दर्शविण्यासाठी ते तिरप्या ठशात (इटॅलिक्स) छापले जातात, तसेच सूचीतील प्रमुख निर्देशनोंदी वेगळ्या ओळखू येण्यासाठी त्या जाड, ठळक ठशात (बोल्ड टाइप) दर्शविण्याची पद्घतीही अनेक सूचींमध्ये वापरण्यात येते. विषयसूची या प्रकारात विशिष्ट विषयांची शीर्षके, मुख्य सूत्र वा तत्त्वनिर्देशक कळीचे शब्द (की वर्ड्‌स ), पारिभाषिक संज्ञा, संकल्पना इ. बाबी ठळकपणे दर्शविल्या जातात. वर्गीकृत सूचीमध्ये मुख्य विषय व त्याच्या पोटात – म्हणजे त्या विषयशीर्षकाखाली – थोडा समास सोडून दुय्यम विषय दर्शविले जातात, मुख्य शीर्षके (हेडिंग्ज) व त्याच्या पोटातील उपशीर्षके (सब्‌हेडिंग्ज) वेगवेगळी ओळखू येण्यासाठी वेगळे ठसे वा टंक (टाइप्स) वापरण्याची पद्घती सूचीमध्ये अवलंबली जाते. मुख्य निर्देश ठळक, जाड ठशात व त्याच्या पोटातील दुय्यम निर्देश मध्यम वा साध्या ठशात दर्शविले जातात, तसेच एका मुख्य विषयाकडून त्याच्याशी आशयदृष्ट्या संबद्घ दुसऱ्या मुख्य विषयाकडे वा उपविषयाकडे निर्देश करणारे पूरक संदर्भही (क्रॉस रेफरन्सेस) काही सूचींमध्ये दर्शविले जातात. कोशवाङ्‌मय, बृहद्‌ग्रंथ, ग्रंथसंच अशा व्यापक व विस्तृत ग्रंथांच्या सूचीमध्ये ही पद्घती विशेषेकरुन अवलंबली जाते. एका नोंदीची माहिती दुसऱ्या नोंदीत आली असेल, तर ‘पहा :’ असा निर्देश करुन त्यांच्यातील परस्परसंबंधित्व दर्शविणे हे सूचीचे पूरक कार्य असते. एका विषयाची संहितेत विखुरलेली माहिती एकत्रकरण्यासाठी वाचकाला ह्या पूरक संदर्भाचा उपयोग होतो. एखादी नोंद माहिती न देता ‘पोकळ नोंद’ म्हणून उल्लेखिली असेल व तिची माहिती तिच्याशी विषयदृष्ट्या संबंधित अशा दुसऱ्या भरीव नोंदीत आली असेल, तर त्या पोकळ नोंदीपुढे ‘पहा :’ अशा निर्देशाने ती भरीव नोंद दर्शविली जाते. साधारणपणे कोशवाङ्‌मयात ही पद्घती अनुसरली जाते. सूचीचा सर्वसाधारण परिचित व बव्हंशी रुढ प्रकार म्हणजे ग्रंथसूची आणि ही सूची सामान्यतः ग्रंथाच्या शेवटी दिली जाते; तथापि विश्वकोशा सारख्या सर्वविषयसंग्राहक व अनेकखंडी कोशग्रंथात सूचीसाठी स्वतंत्र खंड सामान्यतः योजिला जातो. मासिके, नियतकालिके, वृत्तपत्रे इत्यादींच्या सूचीही विस्तृत वा बहुखंडी असतात. लेखक, लेखशीर्षके, विषयादी तपशील त्यांत आढळतात.

सूची ही संज्ञा कित्येकदा काही विशिष्ट संकलन-संपादनांच्या संदर्भातही वापरली जाते. वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील विविध संदर्भस्रोतांचे एकत्रीकरण करुन ह्या सूची तयार केल्या जातात व त्या ज्ञानशाखेच्या अभ्यासकाला समग्र व सर्वांगीण माहिती मिळवण्याचे महत्त्वपूर्ण व मौलिक संदर्भसाधन म्हणून फार उपयुक्त ठरतात. उदा., आर्ट इंडेक्स  (कलासूची), इंडेक्स मेडिकस  (वैद्यक-सूची ) इत्यादी. वाचकाला अभिप्रेत असलेली माहिती त्वरित उपलब्ध होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे हे सूचीचे प्रधान उद्दिष्ट, तसेच सूचीची सर्वसाधारण तत्त्वे, कार्यपद्घती व संपादनप्रक्रिया ह्या दृष्टींनी सूचीशी संलग्न व साधर्म्यदर्शक असे काही प्रकार आहेत. उदा., विषयसंबद्घ अकारविल्हे शब्दसूची (कन्कॉर्डन्सेस), संदर्भग्रंथसूची (बिब्लिऑग्रफी), ग्रंथालयीन सूची (लायब्ररी कॅटलॉग), नकाशासंग्रह (ॲटलास) सूची, दर्शनिका सूची इत्यादी. ग्रंथालयीन सूचीमध्ये तालिका (कॅटलॉग) व तालिकीकरण (कॅटलॉगिंग), तसेच ग्रंथसूची व ग्रंथसूचीक्रमाचे (बिब्लिओग्रॅफिक) वर्गीकरण यांचा अंतर्भाव होतो. एखाद्या लेखकाने लिहिलेल्या, वा एखाद्या विषयावर प्रकाशित झालेल्या किंवा एखाद्या विशिष्ट भूभागात प्रसिद्घ केलेल्या साहित्याची तयार केलेली यादी म्हणजे ग्रंथसूची होय; परंतु एखाद्या विशिष्ट ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याची यादी म्हणजे तालिका होय. तालिकेमध्ये लेखकाचे नाव, ग्रंथनाम, प्रकाशक, प्रकाशनस्थल, प्रकाशनकाल, आवृत्ती, पृष्ठे इ. तपशील दिलेला असतो. सारांश, वर्गीकृत व विषयवार, ग्रंथशीर्षके व ग्रंथकार यांची वर्णनात्मक सूची असे ग्रंथालयीन तालिकेचे स्थूल स्वरुप असते. आधुनिक ॲटलासचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भौगोलिक स्थानांची त्यांच्या नावांच्या उच्चारांसहित दिलेली सूची. त्याबरोबरच त्यांच्या अक्षांश-रेखांशांचाही उल्लेख केलेला असतो, तथापि अलीकडे प्रसिद्घ झालेल्या अनेक उत्तम ॲटलासांमध्ये अक्षांशरेखांश न देता, ते ठिकाण नकाशासंग्रहात कोणत्या पानावर व कोणत्या चौकटीत सापडेल ते दिलेले असते. त्याबरोबरच ते गाव आहे, की बेट, की नदी इ. माहिती देऊन ते कोणत्या देशात आहे, तेही देतात. हल्ली बहुतेक नकाशासंग्रहांच्या शेवटी गॅझेटीअर असते. त्यात त्या संग्रहातील नकाशांत दाखविलेल्या भौगोलिक बाबींची वर्णानुक्रमाने यादी व त्या कोणत्या नकाशात कोठे सापडतील ते दिलेले असते. काही नकाशासंग्रहांत स्थळांचे अक्षांश, रेखांश, लोकसंख्या इ. माहितीही त्याबरोबर असते.

सूचीकरण : पद्घती व प्रक्रिया : अचूक, प्रमाणभूत व विश्वसनीय सूची शास्त्रोक्त पद्घतीने तयार करण्यासाठी सूचिकाराला काही विशिष्ट तांत्रिक कौशल्ये अवगत असावी लागतात, तसेच ज्या ग्रंथाची सूची तयार करावयाची, त्या ग्रंथाच्या वर्ण्य विषयाचे पर्याप्त ज्ञान असावे लागते. काही तंत्रकौशल्ये अनुभवाने आत्मसात करता येतात. सूचिकाराला अपेक्षित अशा गुणविशेषांमध्ये उत्तम प्रतीची निर्णयक्षमता, विविध ज्ञानक्षेत्रांतील पारंगतता, संक्षेपदृष्टी आणि विशिष्ट प्रकारची कल्पकता असावी लागते. स्वत:ला वाचकाच्या जागी कल्पून व त्याच्या माहितीज्ञानविषयक गरजा नेमकेपणाने ओळखून त्या भागवण्याची, तसेच त्याला सूचीचा सर्वांगीण उपयोग व्हावा ही दृष्टी ठेवून त्याला सूची तयार करावी लागते. त्यासाठी निर्देशनोंदी निवडाव्या लागतात आणि ही कामगिरी पार पाडण्यासाठी विशिष्ट ज्ञानविषयक व तंत्रसंबद्घ कौशल्ये आत्मसात व विकसित करावी लागतात. ग्रंथातील वा नियतकालिकातील मजकुरात विखुरलेली व्यक्तिनामे, स्थलनामे, संस्था-संघटनांची नावे, संज्ञा-संकल्पना, वस्तुस्थितिदर्शक तथ्ये व तपशील, अन्य विषयोपविषयांचे निर्देश अशा नानाविध प्रकारच्या निर्देशनोंदी निवडून त्यांची वर्णक्रमानुसार यादी तयार करावी लागते. ह्यासाठी ग्रंथाची पृष्ठमुद्रिते ही कार्यप्रत म्हणून वापरली जातात. निवडलेल्या निर्देशनोंदी अधोरेखित करण्यासाठी ह्या पृष्ठमुद्रितांचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच सूचीमध्ये अंतर्भूत करावयाचे पूरक संदर्भ, विषय-पोटविषय इत्यादींची नोंद मुद्रितांच्या समासांत केली जाते. सूचिकार्याच्या सोयीच्या व सुलभतेच्या दृष्टीने सूचीच्या प्रत्येक निर्देशनोंदीचे स्वतंत्र कार्ड करणे इष्ट ठरते. त्या कार्डावर निर्देशनोंदीचे शीर्षक व त्यापुढे ज्या ज्या पृष्ठांवर ते निर्देश आले असतील ते पृष्ठक्रमांक (आवश्यक तिथे डावीकडचा ‘अ’ स्तंभ व उजवीकडचा ‘आ’ स्तंभ ह्या प्रकारे स्तंभनिर्देशांसह) नोंदवले जातात. ही कार्डे वर्णक्रमानुसार लावणे व त्यावरुन सूचीची मुद्रणप्रत तयार करणे सोयीचे होते. तसेच कामाच्या गरजेनुसार ही कार्डे त्यांची विभागणी करुन, वेगवेगळी ठेवता येतात. उदा., विषयवार सूची तयार करावयाची झाल्यास त्या विषयांची कार्डे इतर कार्डांपासून वेगळी काढून त्यांचा स्वतंत्र गठ्ठा करणे सोयीचे होते. वर्गीकृत सूची करावयाची झाल्यास मुख्य निर्देश व दुय्यम निर्देश अथवा मुख्य विषय व त्याखाली पोटविषय अशा प्रकारे कार्डांची वर्गवारी व मांडणी करता येते. उदा., व्यक्तिनामांची (लेखक-ग्रंथकार नामे इ.) वेगळी सूची द्यावयाची झाल्यास अशा नामांची कार्डे इतर कार्डांमधून वेगळी, अलग करुन त्यांचा स्वतंत्र गठ्ठा करणे व ती कार्डे वर्णक्रमानुसार लावणे सोयीचे ठरते. थोडक्यात म्हणजे सूचीकरण हे ग्रंथालयशास्त्रपद्घती, संपादन, मुद्रण अशा वेगवेगळ्या शाखांशी निकटत्वाने संबंधित असून ह्या शाखांचे संयुक्त व सम्यक ज्ञान सूचिकाराला असावे, हे अभिप्रेत आहे. सूचिकाराने सूची तयार करण्यासाठी अन्य संदर्भसाधनांचा वापर करणेही अचूकतेच्या दृष्टीने इष्ट ठरते. उदा., शब्दांचे शुद्घलेखन वा वर्णलेखन (स्पेलिंग्ज) तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश; स्थलनामे तपासण्यासाठी दर्शनिका, नकाशासंग्रह इ.; व्यक्तिनामे व त्यांचे उच्चार तपासण्यासाठी चरित्रकोश, उच्चारकोश इत्यादी. त्यांच्या साहाय्याने सूचीमधील निर्देशनोंदींची अचूकता पडताळून पाहता येते. सूचीमधील नोंदी अचूक व निर्दोष असाव्यात, ह्याची दक्षता सूचिकाराने घेणे आवश्यक असते. विषयसूचीच्या तुलनेत नामसूची करणे सकृत्‌दर्शनी सोपे वाटले, तरी त्यातही काही अडचणी उद्‌भवतातच. उदा., व्यक्तिनामांच्या संदर्भात लेखक जर टोपणनावाने लिहीत असेल, तर त्या नावाची सूची कशी करावी; तसेच धार्मिक वा राजकीय पदांच्या उच्च-नीच श्रेणींच्या संदर्भात पदस्थ व्यक्तींची सूची वर्णक्रमाने करावी, की श्रेणीक्रमाने करावी, असे गुंतागुंतीचे प्रश्न उद्‌भवतात व त्यांतून सूचिकाराला वाट काढावी लागते. ह्या संदर्भात अँग्लो-अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स (१९६७) हे नियमावलींचे पुस्तक मार्गदर्शक ठरले आहे.

सूचीची गुणवत्ता ही सूचिकाराच्या सूची करण्याच्या जाणकारीवर व तांत्रिक कौशल्यावर अवलंबून असते. सूचीची विषयव्याप्ती व खोली, तांत्रिक परिभाषेची समावेशकता, सूचीची मांडणी व रचना (फॉर्‌मॅट) या घटकांचे यथोचित ज्ञान सूचिकाराला असणे गरजेचे असते.

सूचीची विषयव्याप्ती ठरवण्यासाठी सूचिकाराला काही बाबतींत निर्णय घ्यावे लागतात. उदा., ग्रंथातील सर्व निर्देशांच्या नोंदी सूचीत घ्याव्यात, की काही निवडीचे तत्त्व अवलंबावे, हा निर्णय. ग्रंथातील काही निर्देश केवळ उल्लेखवजा असतील, तर त्यातून वाचकाला फारशी माहिती मिळणार नाही; तथापि काही उल्लेखवजा निर्देश ज्या संदर्भांत येतात ते संदर्भ महत्त्वाचे असतात. त्यामुळे अशा निर्देशांच्या नोंदी सूचीमध्ये घेणे इष्ट ठरते. तसेच विस्तृत व सर्वसमावेशक सूचीचा उपयोग ग्रंथाची एकूण विषयव्याप्ती वाचकाच्या लक्षात येण्याच्या दृष्टीनेही होऊ शकतो. त्यामुळे सूचीमध्ये कोणत्या निर्देशनोंदी घ्याव्यात, हे सूचिकाराला तारतम्यानेच ठरवावे लागते. यू एस् ए स्टँडर्ड्‌स  ह्या ग्रंथात सूचिकाराने ग्रंथातील समग्र नोंदींची सूची करावी, असे सुचविले आहे. तसेच ग्रंथात नसलेले काही तपशील सूचीमध्ये पुरवून सूचिकाराने वाचकांच्या माहितीत भर घालावी, असेही या ग्रंथात सुचविले आहे. उदा., ग्रंथात एखाद्या व्यक्तीचे केवळ आडनाव वा नावांची आद्याक्षरे यांचे उल्लेख आले असतील, तर सूचिकाराने त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, जन्म-मृत्यूची वर्षे व संक्षिप्त परिचय सूचीमध्ये दिल्यास त्यायोगे वाचकाला त्या व्यक्तीविषयी अधिक माहिती मिळून त्याच्या ज्ञानात भर पडेल. उदा., ‘कोलरिज’ असा उल्लेख आला असेल, तर सूचीमध्ये त्याची नोंद ‘कोलरिज, सॅम्युएल टेलर (१७७२–१८३४)– इंग्रज कवी’ अशी केली जावी, तसेच ग्रंथातील माहितीशी संबद्घ असे स्थल-काल संदर्भ शोधून ते सूचीत समाविष्ट करणे, असे तपशील सूचिकार सूचीमध्ये पुरवू शकेल; जेणेकरुन सूचीची उपयुक्तता व संदर्भमुल्य अधिक वाढेल. सूची जास्तीत जास्त सर्वांगपरिपूर्ण, बहुपयोगी व महत्त्वपूर्ण संदर्भसाधन ठरावी हा उद्देश त्यामागे असतो. यू एस् ए स्टँडर्ड्‌स प्रमाणे टेओडर आउफ्रेख्ट या जर्मन-भारत विद्यावंतांच्या कॅटलॉगस कॅटलॉगोरम  (१८९१; नवी आवृत्ती १९६२) या सूचिग्रंथात हस्तलिखित पोथ्या, संस्कृत ग्रंथ, ग्रंथकार यांचा वर्णक्रमाने नामनिर्देश आहे. त्यात स्थल-कालाचेही उल्लेख आहेत.

सूचीची व्याप्ती व खोली ही सामान्यतः ग्रंथाच्या संहितेत सूचीसाठी दिली जाणारी जागा वा स्थलमर्यादा (स्पेस) अथवा पृष्ठमर्यादा, सूचीमधील निर्देशनोंदींची एकूण संख्या आणि सूचीची विशेषीकृत अथवा विनिर्दिष्ट पातळी (स्पेसिफिसिटी) यांवर अवलंबून असते. संहितेच्या स्वरुपानुसार व वाचकांच्या गरजेनुसार सूचीमध्ये कोणत्या विवक्षित नोंदी अंतर्भूत कराव्यात हे ठरते; म्हणजेच सूचीच्या विनिर्देशनाचे (स्पेसिफिकेशन) स्वरुप ठरते. सूची वर्गीकृत असावी, की विशिष्ट विषयांपुरती मर्यादित असावी, तसेच सूचीमध्ये कोणत्या विषयविशिष्ट वा सर्वसाधारण निर्देशनोंदी असाव्यात, ह्या सर्व बाबतींतले निर्णय सूचिकाराला संहितेच्या स्वरुपानुसार व वाचकांच्या संभाव्य गरजेनुसार घ्यावे लागतात.

सूचीकरणाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे परिभाषानिश्चिती व नियंत्रण करणे. संहितेत विखुरलेल्या पारिभाषिक संज्ञांचे सुसूत्रीकरण तसेच त्यांच्या वापरात एकवाक्यता राखणे; समानार्थी वा परस्परसंबद्घ संज्ञांच्या वापरामध्ये विसंगती टाळून त्यांच्यांत समानीकरण व सुसंवादित्व साधणे, ही आनुषंगिक कार्येही सूचीकरणामुळे साधली जातात. अशा पारिभाषिक संज्ञांची कार्डे केल्याने त्यांत जर काही विसंगती वा अर्थभेद आढळले तर ते टाळणे व संहितेतील त्यांच्या वापरात सर्वत्र सुसंगती व एकवाक्यता राखणे, हे सूची केल्यामुळेच शक्य होते.

सूचीच्या आकारिक रचनाबंधात सामान्यतः पुढील घटकांचा अंतर्भाव होतो : सूचीमधील निर्देशनोंदींचा रचनाक्रम, प्रत्यक्ष मांडणी, टंकांचे वा ठशांचे आकार-प्रकार व वळणे (साधा टंक, तिरपा टंक वा ठसा, ठळक, जाड ठसा इ.). काही विशिष्ट निर्देशनोंदी ह्या सर्वसामान्य निर्देशनोंदींहून वेगळ्या ओळखता याव्यात म्हणून हे वेगळे टंक वा ठसे वापरले जातात. सर्व सूचींसाठी एकाच प्रकारचा रचनाबंध वा संघटनतत्त्व वापरले जाईल असे नव्हे. त्यांत अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. सूची करण्यामागचा दृष्टिकोण, संहितेच्या स्वरुपानुसार सूचीची विषयव्याप्ती व व्यामिश्रता, सूचीचा वापर करणाऱ्या विशिष्ट वाचकवर्गाच्या संभाव्य गरजा व त्यांविषयी सूचिकाराने बांधलेले अंदाज व आडाखे अशा अनेक बाबी सूचीची रचनात्मकता निश्चित करीत असतात.

यांत्रिकीकरणाद्वारे सूचीकरण : सूची करण्याच्या यंत्रतंत्राधिष्ठित पद्घतींमध्ये आता खूपच लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यात पुढील बाबींचा समावेश होतो : सूचीतील निर्देशनोंदींची जुळणी, वर्गवारी वा पृथक्करण, विषयवार पुनर्रचना, जादा प्रती तयार करणे, आंतर-दप्तरीकरण (इंटर फायलिंग), वर्णक्रम अशी अनेक प्रकारची कामे यंत्राद्वारा करुन घेता येतात. संगणकाला आज्ञावली, प्रक्रिया-नियम व कार्यपद्घती एकदा ठरवून दिल्यानंतर त्याला सूचिनिर्देशांची यादी, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सोपविता येते व संपूर्ण सूचिकार्यही संगणकाकडून करुन घेता येते. उदा., संगणकावर सूचीकरण प्रक्रिया पूर्णत: सोपवून द न्यूयॉर्क टाइम्स इंडेक्स ही सूची तयार करण्यात आली आहे.

समानार्थी तसेच सहसंबंधदर्शक शब्दकोश (कन्कॉर्डन्सेस) हा सूचीचा प्राथमिक पातळीवरचा प्रकार आता संगणकाच्या साहाय्याने पूर्णत: यशस्वी रीत्या संकलित-संपादित केला जातो. मात्र सहसंबंधदर्शक शब्दकोशांमध्ये संहितेतील मुख्य वा कळीच्या शब्दांचे सूचीकरण ज्या सहजतेने सुलभ रीत्या करता येते; तसे संज्ञासंकल्पनात्मक (कन्सेप्ट) सूचीकरणाच्या प्रकारात करता येत नाही; कारण ह्या प्रकारात सूचिकाराला संहितेच्या आशय-विषयाचे किमान आकलन व ज्ञान असणे गरजेचे ठरते. अशा सूचीकरणासाठी संहितेतील परिभाषासूचीच्या संदर्भात सूचीकाराला विशिष्ट प्रशिक्षणाची व कौशल्याची आवश्यकता असते. संज्ञा-सूचीमध्ये (कन्सेप्ट इंडेक्सिंग) संहितेत आलेले मूळ शब्द जसेच्या तसे बव्हंशी वापरले जातात; किंवा त्या मूळ शब्दाचे समानार्थी पारिभाषिक संज्ञेत रुपांतर करुन त्या संज्ञा (मूळ संहितेत नसलेल्या) वापराव्या लागतात. ह्या संज्ञा मूळ शब्दांपेक्षा बाह्यत: भिन्न भासतात, तेव्हा त्यांचे अर्थविवरण करुन मूळ शब्दांशी असलेले साधर्म्य स्पष्ट करावे लागते. संगणकाच्या साहाय्याने हे काम करणे जिकिरीचे ठरते.

सूचीकरण-संघटना व विशेषीकृत सूची : सूचीकरणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच सूचीकरण तंत्रामध्ये सर्वत्र एकसूत्रीपणा व सुसंवादित्व राखण्याच्या दृष्टीने काही समान तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने दोन सूचीकरण-संघटना वा संस्था निर्माण झाल्या. ‘द सोसायटी ऑफ इंडेक्सर्स’ ही संघटना लंडनमध्ये १९५७ मध्ये स्थापन करण्यात आली. ह्या संस्थेच्या सभासदांमध्ये ग्रंथ व नियतकालिके यांची सूची करणारे सूचिकार, तसेच सर्वांगपरिपूर्ण व आदर्श सूची तयार करण्याच्या दृष्टीने प्रगत सूचिकार्यामध्ये आस्था दाखविणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. सूचींचे प्रकाशक तसेच सूचिकार्याशी संबंधित असलेल्या विविध संघटना-संस्था यांचाही समावेश सदस्यांमध्ये आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेसह इतर देशांतील सूचिकार्याशी संबंधित असलेले सभासदही आहेत. सूची तयार करु शकणाऱ्या प्रशिक्षित सूचिकारांची यादी ही संस्था प्रसिद्घ करते, तसेच इंडेक्सर  हे अर्धवार्षिक नियतकालिकही संस्थेमार्फत प्रकाशित होते. तसेच सूचीकरणविषयक ग्रंथ, शोधनिबंध, प्रबंध, टीपा-टीप्पणी इ. संदर्भसाहित्यही संस्था प्रकाशित करीत असते. सूचिक्षेत्रात कार्य करणारी दुसरी संस्था म्हणजे ‘द अमेरिकन सोसायटी ऑफ इंडेक्सर्स’ ही १९६९ मध्ये स्थापन झाली. तिच्या सभासदांमध्ये व्यावसायिक सूचिकारांचा समावेश असून, या संस्थेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये सूचीकरणाची उच्च दर्जाची मानके प्रस्थापित करणे, सूचीकरणाच्या माहितीतंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि सूचि-प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे आदींचा अंतर्भाव होतो.

पाश्चात्त्य सूचिवाङ्‌मयाच्या क्षेत्रात विविध विषयांच्या विपुल व दर्जेदार सूची उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही निवडक, महत्त्वाच्या सूचींचा पुढे उदाहरणांदाखल उल्लेख केला आहे : न्यूयॉर्कच्या एच्. डब्ल्यू. विल्सन कंपनीने प्रकाशित केलेल्या रीडर्स गाइड टू पीरिऑडिकल लिटरेचर  आणि द क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स   ह्या सूची महत्त्वाची संदर्भसाधने म्हणून सर्वत्र मान्यता पावल्या आहेत. एच्. डब्ल्यू. विल्सन कंपनीने अन्य वेगवेगळ्या क्षेत्रांतील साहित्यसामग्रीच्या सूची तयार करुन त्या त्या क्षेत्रांना पुरवल्या आहेत. उदा., उपयोजित विज्ञाने व तंत्रविद्या, ललित व उपयोजित कला, उद्योग व व्यापार क्षेत्रे, विधी व कायदे, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या अशा सर्व ज्ञानक्षेत्रांमधील सूची तयार करुन प्रकाशित केल्या आहेत. अमेरिकेतील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ ही सूचिकार्य व सेवा पुरविणारी अग्रगण्य प्रमुख संस्था असून, त्याचबरोबर अमेरिकन शासनाच्या अन्य अभिकरण-संस्थां मार्फतही (एजन्सीज) उपयुक्त व बहुमोल सूचिकार्य सेवा पुरवल्या जातात. अशा काही अभिकरण-संस्था व त्यांनी तयार केलेल्या सूची उदाहरणादाखल पुढे दिल्या आहेत :

‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’ (इंडेक्स मेडिकस अँड MEDLARS – मेडिकल लिटरेचर ॲनॅलिसिस अँड रिट्रीव्हल सिस्टिम ह्या वैद्यक सूची ); ‘ द नॅशनल ॲग्रिकल्चरल लायब्ररी ’ (बिब्लिऑग्रफी ऑफ ॲग्रिकल्चर  ही कृषिविषयक सूची); ‘नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस ॲड्‌मिनिस्ट्रेशन’ (सायंटिफिक अँड टेक्निकल एअरोस्पेस रिपोर्ट्‌स  ही वैमानिकी सूची ) इत्यादी. अन्य महत्त्वाच्या विषयसूचींमध्ये एंजिनियरिंग इंडेक्स  (अभियांत्रिकी-सूची ), केमिकल टायटल्स   (रसायन-शीर्षक सूची), पॅन्‌डेक्स   (विज्ञानसूची), सायन्स-साइटेशन इंडेक्स (विज्ञानअवतरण सूची) इ. सूचींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. वृत्तपत्रीय सूचींमध्ये लंडन टाइम्स  (१९०६ पासून) व न्यूयॉर्क टाइम्स  (१९१३ पासून) ह्या सूची विशेष प्रसिद्घ आहेत.

पाश्चात्त्य वाङ्‌मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण, आगळीवेगळी सूची म्हणजे इंडेक्स लिब्रोरम प्रोहिबिटोरम  (इं. शी. ‘इंडेक्स ऑफ प्रोहिबिटेड बुक्स ’) : निषिद्घ ग्रंथांची यादी. रोमन कॅथलिक पंथीयांना वाचण्यासाठी प्रतिबंध केलेल्या निषिद्घ ग्रंथांची पहिली सूची रोमन कॅथलिक चर्चने १५५७ मध्ये प्रसिद्घ केली. ही पुस्तके कॅथलिक श्रद्घा व नीतिमूल्ये यांच्याविरोधी असल्याचे, तसेच ती श्रद्घा, मूल्ये यांवर आघात करणारी असल्याचे ठरविण्यात आले व त्यांच्यावर कॅथलिक चर्चकडून बंदी घालण्यात आली. पुढे या निषिद्घ ग्रंथांच्या यादीत वेळोवेळी फेरबदल करण्यात आले व सुधारित सूची प्रसिद्घ करण्यात आल्या. १९६६ मध्ये मात्र ही निषिद्घ ग्रंथांची यादी रद्द करण्यात आली.

संस्कृत कॅटलॉगस कॅटलॉगोरम  शिवाय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्स  (भाग १, १९७०) ही वैदिक वाङ्‌मयाची सूची; एस् सोरेन्सेन यांची ॲन इंडेक्स टू द नेम्स इन द महाभारत   (१९०४, पुनर्मुद्रण १९६३) ही विशेषनामांची आद्य सूची आणि महाभारताच्या चिकित्सक पाठावृत्ती ची भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरकृत श्लोकपादसूची  (प्रतीकसूची; एकूण ६ खंड, १९६७–७२) या संस्कृत भाषाभ्यासकांना उपयुक्त आहेत.

मराठीतील सूचिकार्य : एकोणिसाव्या शतकातील मराठी वाङ्‌मयाचा आढावा घेताना न्या. महादेव गोविंद रानडे यांनी मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या याद्या तोपर्यंत प्रसिद्घ केल्या. मराठीतील सूचीचा हा एक आद्य प्रयत्न म्हणता येईल. पहिली महत्त्वाची ग्रंथरुप सूची म्हणून ⇨ यशवंत रामकृष्ण दाते  (१८९१–१९७३) यांनी रा. त्र्यं. देशमुख यांच्या साहाय्याने तयार केलेल्या महाराष्ट्रीय वाङ्‌मय-सूची चा (१९१९) उल्लेख करावा लागेल. त्यात इ. स. १८१०–१९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची व ग्रंथकारांची, तसेच सु. १००–१२५ महत्त्वाच्या नियतकालिकांतील लेख, कविता इत्यादींची सूची तयार केली. ही सूची महाराष्ट्रीय ज्ञानकोशा ची पूर्वतयारी म्हणून सिद्घ केली व ती ज्ञानकोश कार श्री. व्यं. केतकर यांनी प्रकाशित केली. शं. ग. दाते यांच्या मराठी ग्रंथसूची च्या आधीचा एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून त्याची नोंद करावी लागेल. शं. गो. तुळपुळे यांनी मराठी ग्रंथनिर्मिती ची वाटचाल (१९७४) ह्या ग्रंथात एका आद्य सूचीचा उल्लेख केला आहे; ती सूची म्हणजे जस्टिन ॲबट यांनी तयार केलेली, इ. स. १८१३ ते १८९२ या सु. ऐंशी वर्षांतील ख्रिस्ती मराठी वाङ्‌मयाची सूचि (१८९२). महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे यांनी मराठीतील प्राचीन कवींची व त्यांच्या काव्याची एक सूची तयार करुन छापली (१९०७-०८). आद्य सूचीचा हा एक उल्लेखनीय प्रयत्न होय. मराठी हस्तलिखित ग्रंथांची सूची करण्याचे काम प्रथमतः भावे ह्यांनीच हाती घेतले. पुढे भावे यांच्या सूचीत भर घालून गो. का. चांदोरकर यांनी आपली संतकवि-काव्यसूचि (१९१५) प्रसिद्घ केली. १९२४ मध्ये भावे यांनी महानुभाव विकाव्यसूचि तयार केली. ह्या सर्व सूची अगदी प्राथमिक स्वरुपाच्या, याद्यांच्या रुपातील आहेत. सूचिकार ⇨ शंकर गणेश  ते (१९०५–६४) यांनी मराठी ग्रंथसूची  : खंड १ (१९४४) व खंड २ (१९६१) ह्याप्रमाणे दोन खंडांत सिद्घ करुन मराठीतील सूचिकार्याचा व्यापक व विस्तृत पाया घातला. इ. स. १८०० ते १९५० या दीडशे वर्षांतील मराठीतील ग्रंथांची ही वर्णनात्मक, विस्तृत व विषयवार बृहत्‌सूची आहे. ‘मुद्रित मराठी ग्रंथांचा कोश’ असे तिचे वर्णन संपादक दाते यांनी केले आहे. सूचीच्या पहिल्या खंडात १८०० ते १९३७ या काळातील, तर दुसऱ्या खंडात १९३८ ते १९५० या काळातील मराठी पुस्तकांची वर्णनपर माहिती आहे. दोन्ही खंडांत मिळून एकूण २६ हजार ६०७ ग्रंथांची नोंद करण्यात आली आहे. शास्त्रशुद्घ पद्घतीने सिद्घ केलेली अशी ग्रंथसूची केवळ मराठी भाषेतच नव्हे, तर अन्य भारतीय भाषांतही अपूर्व आहे. या सूचीचे राज्य मराठी विकास संस्थेने २००० मध्ये यथामूल पुनर्मुद्रण करुन ती अभ्यासकांना उपलब्ध करुन दिली आहे. मराठी ग्रंथसूची चे हे महत्त्वपूर्ण कार्य राज्य मराठी विकास संस्थेने शरद केशव साठे यांच्या साहाय्याने पुढे चालवले असून, ह्या मराठी ग्रंथसूची चे चार भाग प्रसिद्घ झाले आहेत. दरम्यानच्या काळात म. श्री. दीक्षित यांनी मराठी ग्रंथसूची   (१९५९–६२) तयार करुन प्रसिद्घ केली (१९६२). मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने ‘शं. ग. दाते सूचिमंडळ’ ही शाखा स्थापन करुन दाते यांचे सूचिकार्य त्यांच्या निधनानंतर पुढे चालवले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील मराठी दोलामुद्रिते  (मुं. म. ग्रंथसंग्रहालयातील इ. स. १८६७ अखेर पर्यंतच्या मराठी मुद्रित ग्रंथांची वर्णनात्मक नामावली) ही सूची पु. ग. सहस्त्रबुद्घे यांनी प्रथम सिद्घ केली (१९४९).त्याची दुसरी आवृत्ती सु. आ. गावस्कर यांनी तयार केली (१९६१), तर तिसरी आवृत्ती गं. ना. मोरजे यांनी संपादित केली (पणजी, १९९५). कलकत्त्याचे राष्ट्रीय ग्रंथालय १९५८ पासून राष्ट्रीय ग्रंथसूची  तयार करुन खंडशः प्रकाशित करीत असते; त्याचा एक भाग म्हणून मराठी ग्रंथसूचीही प्रकाशित होत असते. या मराठी ग्रंथसूचीचे १९७० पर्यंतचे खंड निघाले आहेत. महाराष्ट्राच्या भावनिक व बौद्घिक विकासात मानदंड ठरलेल्या निवडक सु. १७७ ग्रंथांची वर्णनात्मक सूची दीपक घारे यांनी मराठीतील साहित्यलेणी  (१९८६) ह्या शीर्षकाने केली आहे.

मराठीतील आणखी एक विशेष उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण बृहत्‌सूची म्हणजे मराठी नियतकालिकांची सूची  होय. सूचिकार शं. ग. दाते, दि. वि. काळे, शं. ना. बर्वे यांनी ह्या सूचीचे संपादन केले. ही सूची म्हणजे मराठी नियतकालिकांचा वर्णनात्मक कोश होय. ह्या सूचिग्रंथात १८३२–१९५० पर्यंतच्या काळातील पाक्षिके, मासिके, द्वैमासिके, त्रैमासिके, वार्षिके अशा एकूण १३८९ नियतकालिकांची नोंद करण्यात आली आहे व त्या नियतकालिकांतील वैचारिक गद्य लेखांची सूची केली आहे. ह्या सूचीचे एकूण तीन खंड प्रकाशित झाले आहेत : खंड १ : शारीर खंड -कालिक वर्णनकोश   (१९६९); खंड २ : कालिक लेख-लेखक कोश, एकूण पाच भाग (१९७४–७८). पहिल्या सूचीतील नियतकालिकांच्या लेखांचे विषयवार वर्गीकरण, लेखकांची अकारविल्हे सूची, लेखकांच्या टोपणनावांची सूची अशा प्रकारे वर्गीकृत सूची यात दिली आहे. खंड ३ : नव्याने उपलब्ध झालेली नियतकालिके व लेख यांची विशेष पुरवणी (१९८१). शास्त्रशुद्घ कार्यपद्घती अवलंबून काटेकोरपणे, दक्षता घेऊन तयार केलेली ही सूची अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे व उपयुक्त संदर्भ-साधन ठरली आहे. ह्याशिवाय बहुसंख्य नियतकालिकांच्या सूची मराठीत विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांतील काहींचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल : मराठी ज्ञानप्रसारक मासिकाची सूची वा. ल. कुळकर्णी यांच्या मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास व वाङ्‌मयविचार (१९६५) ह्या पुस्तकात आढळते. ज्ञानोदय : लेखनसार सूची  गं. ना. मोरजे यांनी संपादित केली आहे. एकूण सहा खंड व प्रत्येक खंडाचे दोन भाग अशी योजना असून, त्यांपैकी खंड १ : भाग १ (१९८६) व भाग २ (१९८७) आणि खंड २ : भाग १ (१९८९) हे प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे लोकशिक्षण  (१९६३)–विविधज्ञानविस्तार लेख-सूची, संपादक : पुष्पा भावे (१९६८), अबकडई  (लघुनियतकालिकसूची विशेषांक, १९६९), महाराष्ट्र साहित्य पत्रिका (१९७२), मराठी संशोधन पत्रिका  (१९८२), रत्नाकर साहित्यसूची  (१९२६–३३) संपादक : शुभांगी वाड (१९८७),युगवाणी  (१९९१) तसेच केशव जोशी यांनी केलेली सत्यकथे ची सूची, आलोचना, नवभारत, पंचधारा  इ. कालिकांच्या सूचीही उपलब्ध आहेत. यांपैकी काही सूची वर्षाखेरीस त्या त्या नियतकालिकांच्या पुरवण्या म्हणून प्रसिद्घ झाल्या आहेत, तर काही स्वतंत्र पुस्तकरुपात उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात मीरा घांडगे यांनी अनुष्टुभ्  (२००३), महाराष्ट्र-साहित्य-पत्रिका  (२००६) व अस्मितादर्श   (२००८) या कालिकांच्या सूची परिश्रमपूर्वक सिद्घ केल्या आहेत व त्या उल्लेखनीय आहेत. उपरोल्लेखित सर्व कालिक-सूची ह्या संदर्भसाधन म्हणून महत्त्वाच्या आहेत.

सु. रा. चुनेकर यांचे सूचींची सूची   (१९९५) हे सूचि-संकलनात्मक पुस्तक मराठी साहित्य व भाषा यासंदर्भात झालेल्या सूचिकार्याची यथार्थ माहिती देणारे तर आहेच; शिवाय संशोधनासाठी एक संदर्भ साधन म्हणूनही ते उपयुक्त आहे. ह्या वर्गीकृत सूचीमध्ये एकूण ६७३ नोंदी आहेत. मराठीमध्ये सूचिकार्य किती विस्तृत व व्यापक प्रमाणावर चालू आहे, ह्याची कल्पना ह्यावरुन येते.

प्राचीन मराठी हस्तलिखिते, संतवाङ्‌मय, विद्यापीठीय संशोधने व प्रबंध, सूक्ष्मपट अशा विविध क्षेत्रांत अनेक उपयुक्त व संदर्भमूल्य असलेल्या सूची प्रकाशित झाल्या आहेत; त्यांतील काही निवडक सूची उदाहरणादाखल पुढे दिल्या आहेत : हस्तलिखितांच्या सूचीमध्ये तंजावर महाराज शरफोजी  यांच्या सरस्वती महाल ग्रंथसंग्रहातील मराठी ग्रंथांची बयाजवार यादी   (भाग पहिला : तंजावर, १९२९; भाग दुसरा : १९३०; भाग तिसरा : १९३८; भाग चौथा : १९६३). ही सूची रामचंद्र भाऊस्वामी नरसिंहपूरकर ऊर्फ टी. बी. रामचंद्रराव यांनी संपादित केली आहे. मराठी संशोधन मंडळातील हस्तलिखितांची वर्णनात्मक नामावली : सु. आ. गावस्कर (मुंबई, १९७२); मराठी संशोधन मंडळातील सूक्ष्मपटांची सूची   : वि. भा. प्रभुदेसाई (१९७८) ही सूचिक्षेत्रातील उल्लेखनीय कार्ये होत. मराठी प्रबंध सूची : संकलन व संपादन – वसंत विष्णू कुलकर्णी (नागपूर, १९९१)– भारतातील विद्यापीठांतून मराठी वाङ्‌मय, तौलनिक साहित्याभ्यास, भाषाशास्त्र, शिक्षणविचार या विषयांमधील डी.लिट्. व पीएच्.डी. या पदव्यांसाठी १९३८-३९ ते १९८८-८९ या कालावधीत स्वीकृत झालेल्या प्रबंधांची साकल्याने व पद्घतशीरपणे केलेली सूची. प्रबंधसार : संपादक – विजया राजाध्यक्ष; नंदा आपटे (मुंबई, १९९३) – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील मराठीतील पीएच्.डी. पदवीसाठी स्वीकृत प्रबंधांचे सारांश. मुंबई विद्यापीठ : मराठी साहित्य संशोधन सूची  (खंड पहिला ) : संपादक – उषा मा. देशमुख; अलका दी. मटकर (मुंबई, १९९४).

मराठीत अनेकविध, भिन्न भिन्न क्षेत्रांतील विषयांवर उल्लेखनीय सूची तयार करण्यात आल्या आहेत. त्यांतील काही निवडक, प्रमुख विषयसूची पुढीलप्रमाणे : प्रयोगक्षम मराठी नाटके   (वर्णनात्मक सूची). सूचिकार : मु. श्री. कानडे. मराठीतील ५०० प्रयोगक्षम नाटकांची वर्णनात्मक सूची (नागपूर, १९६२). मराठी चित्रपटांची समग्र सूची (१९३२–८९) संकलन-संपादन – शशिकांत किणीकर (मुंबई, १९८९). चित्रपट-ग्रंथसंदर्भसूची  : संपादक – प्रसन्नकुमार अकलूजकर (पुणे, १९९१). महाराष्ट्र राज्य ग्रामसूची  (महाराष्ट्र राज्यातील सु. ४०,००० गावांची वर्णानुक्रमे यादी) – सूचिकार न. गं. आपटे (महाराष्ट्र राज्य ग्रामकोश मंडळ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, १९६७). महाराष्ट्राच्या कालमुद्रा  (महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांच्या कालानुक्रमे नोंदी ) — म. वि. सोवनी (पुणे, १९८३). संतवाङ्‌मयातील उल्लेखनीय सूची : संतसाहित्य : संदर्भ-कोश –मु. श्री. कानडे (पुणे, १९९५) : विविध २०० ग्रंथांतील मराठी संत व संतसाहित्यविषयक सु. २००० लेखांची वर्णनात्मक सूची. संतवाङ्‌मयाविषयी प्रकाशित झालेल्या (१८४५–१९९४) मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतील सु. ६०० ग्रंथांची सूची. त्यात संतवाङ्‌मयावरील पीएच्.डी. प्रबंधांचा अंतर्भाव. मुद्रित तुकाराम वाङ्‌मय – अ. का. प्रियोळकर (मुंबई, १९५६). ज्ञानदेव वाङ्‌मयसूची  – म. प. पेठे (मुंबई, १९६८). अनुभवामृताचा पदसंदर्भ कोश – शरद केशव साठे (मुंबई, १९८९). गं. दे. खानोलकर यांनी आपल्या अर्वाचीन मराठी वाङ्‌मयसेवक  (खंड १ ते ७) ह्या ग्रंथमालेत त्या त्या वाङ्‌मयसेवकावरील लेखांच्या अखेरीस ‘चरित्र, चर्चा, अभ्यास’ या सदराखाली विस्तृत संदर्भसूची जोडल्या आहेत. तसेच खानोलकरांनी संपादित केलेल्या साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशित, मराठी वाङ्‌मयकोशा च्या मराठी ग्रंथकार : विभाग पहिला  (इ. स. १०५०–१८५७) या पहिल्या खंडाला (१९७७) ‘चरित्र, चर्चा, अभ्यास’ या सदराखाली संदर्भसूची बहुसंख्य नोंदींना जोडल्या आहेत. व्यक्तिगत ग्रंथकार व ग्रंथसूचीही मराठीत विविध व विपुल प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. त्यांतील काही निवडक व उल्लेखनीय सूची पुढीलप्रमाणे : सु. रा. चुनेकर यांनी प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या वाङ्‌मयाची सूची  (१९९५) व डॉ. माधवराव पटवर्धन : वाङ्‌मयसूची  (वर्णनात्मक व समीक्षात्मक, १९८३) ह्या पद्घतशीर व शास्त्रोक्त सूची तयार केल्या आहेत. जया दडकर यांनी वि. स. खांडेकर वाङ्‌मयसूची  (१९८४–८७); चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात ह्या पुस्तकात अंतर्भूत असलेली खानोलकरांची वाङ्‌मयसूची व चरित्रपट (१९८३) तसेच श्री. दा. पानवलकरांच्या वाङ्‌मयाची सूची   (१९८७) असे महत्त्वपूर्ण सूचिकार्य केले आहे. अविनाश सहस्रबुद्घे यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वाङ्‌मयसूची  (१९९१) व ज्ञानकोश कार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर वाङ्‌मयसूची (वर्णनात्मक; १९९३) ह्या महत्त्वाच्या सूची तयार केल्या आहेत. सुषमा पौडवाल यांनी गो. वि. (विंदा) करंदीकर सूची   (वर्णनात्मक-चरित्रात्मक ,१९९२); आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर सूची  (१९९५) ह्या सूची तयार करुन सूचिवाङ्‌मयात मोलाची भर घातली आहे. यांखेरीज काही व्यक्तिगत ग्रंथकार-सूचींचा उल्लेख करणे आवश्यक आहे, त्या अशा : राम गणेश गडकरी वाङ्‌मयसूची  (वर्णनात्मक) – सुधा भट (१९८६), बालकवि-संदर्भसूची   — प्रा. एस्. एस्. नाडकर्णी   (१९९२), गंगाधर गाडगीळ : वाङ्‌मय सूची - सुधा जोशी (१९८७), व्यंकटेश माडगूळकर समग्र वाङ्‌मयसूची –य. श्री. रास्ते (१९९६). विजया राजाध्यक्ष यांनी मर्ढेकरांची कविता : स्वरुप आणि संदर्भ (खंड १ व २; १९९१) या ग्रंथात संशोधनपूर्वक तयार केलेल्या, समग्र मर्ढेकर वाङ्‌मयसूची दिलेल्या आहेत. मराठीतील पद्घतशीर व शास्त्रोक्त सूचिकार्याला चालना व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पुणे व मुंबई विद्यापीठांचे मराठी विभाग तसेच श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक अनेक संदर्भसूची तयार करुन घेतल्या आहेत व प्रकाशितही केल्या आहेत, तसेच मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साहित्यसूची, आलोचना  इ. नियतकालिकांनीही सूचि-प्रकाशनाच्या संदर्भात मोलाचे कार्य केले आहे.

मराठी विश्वकोशाची सूची : मराठी विश्वकोशाचा तेविसावा खंड हा स्वतंत्र सूचिखंड असेल. त्याचे स्वरुप सर्वविषय-संकलक असेल व निर्देशनोंदींची रचना वर्णक्रमानुसार अकारविल्हे असेल. मराठी विश्वकोशात येणाऱ्या सर्व विषयोपविषयांतील तपशीलवार माहिती मिळविणे सुलभ व्हावे, म्हणून सूचिखंडाची योजना आहे. विश्वकोशातील सर्वच नोंदींची शीर्षके त्यात असतीलच आणि ती इतर निर्देशनोंदींपासून वेगळी ओळखू यावीत म्हणून जाड ठळक ठशात दर्शविली जातील. ह्या स्वतंत्र नोंदशीषर्कांपुढे खंड व पृष्ठक्रमांक दिले जातील; मात्र स्तंभनिर्देश नसतील. ज्यांवर स्वतंत्र नोंदी नाहीत, अशा सर्व विषयोपविषयांचा समावेश सूचीमध्ये असेल व अशा निर्देशनोंदी साध्या, नेहमीच्या (रनिंग) ठशात दर्शविल्या जातील आणि त्यांच्यापुढे, त्यांचे उल्लेख ज्या ज्या ठिकाणी आले असतील, ते खंडक्रमांक व पृष्ठक्रमांक – स्तंभनिर्देशांसह (डावीकडील ‘अ’ व उजवीकडील ‘आ’ स्तंभ अशा प्रकारे) दिले जातील, जेणेकरुन वाचकाला एखाद्या विषयाची माहिती सत्वर व तत्परतेने मिळू शकेल. तसेच एखाद्या विषयाची माहिती विश्वकोशाच्या अनेक खंडांतून व अनेक पृष्ठांमध्ये विखुरलेली असेल, तर ती एकत्र गोळा करणे सोयीचे व सुलभ होईल. सूचीमध्ये नानाविध प्रकारच्या विपुल व बहुसंख्य निर्देश-नोंदींचा समावेश असेल. उदा., सर्व ज्ञानक्षेत्रांतील अनेक विषयोपविषय, त्यांतील महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना, वेगवेगळ्या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिनामे, स्थलनामे (खंड, देश, प्रदेश, गावे, नद्या, पर्वत इ.), संकीर्ण बाबी इ. अनेक प्रकारच्या निर्देशनोंदी सूचीत समाविष्ट होतील; मात्र ज्या पृष्ठांवर त्यांचे उल्लेख आले असतील, त्या ठिकाणी त्या विषयाची किमान काही ना काही महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे; अथवा ज्या संदर्भांत ते उल्लेख आले असतील ते संदर्भ महत्त्वाचे असले पाहिजेत, हे सूचीतील निर्देशनोंदींची निवड करण्यामागचे धोरण ठरविण्यात आले आहे. वाचकास जिज्ञासा असलेल्या परंतु अकारविल्हे आलेल्या नोंदशीषर्कांत समाविष्ट नसलेल्या संज्ञेची, व्यक्तीची, स्थळाची वा संकल्पनेची थोडीफार माहिती विश्वकोशात दुसऱ्या कोणत्या तरी शीर्षकाने आलेल्या एक किंवा अनेक नोंदींतून विखुरलेली असेल तर ही सर्व विखुरलेली माहिती वाचकांना सापडावी, हे सूचिखंडाचे मुख्य प्रयोजन आहे. सूची जास्तीत जास्त सर्वसमावेशक, व्यापक व विस्तृत व्हावी, हे उद्दिष्ट आहे. मराठी विश्वकोशात आलेली विषयोपविषयांची विखुरलेली माहिती मिळविण्याचे महत्त्वाचे संदर्भसाधन म्हणून ती उपयुक्त ठरावी, तसेच विश्वकोशात समाविष्ट असलेल्या सर्व विषयांचे समग्र, सर्वांगीण ज्ञान व माहितीचा एकंदर आवाका व व्याप्ती लक्षात यावी, हाही सूची करण्यामागचा एक हेतू आहे.

सूचिखंडात एखादा निर्देश नेमका कोणत्या विषयाचा आहे, हे जिथे लक्षात येणार नाही, तेथे कंसात आवश्यक ते स्पष्टीकरण दिले जाईल. उदा., डी न्यूमेरो इंडोरम् (ग्रंथ ) १ : ४ अ. सूचीमध्ये ग्रंथनामे, नियतकालिकांची नावे, कलाकृतींची नावे (चित्र, शिल्प, नाटक, चित्रपट इत्यादींची शीर्षके) इ. तिरप्या ठशात दिली जातील. तसेच निर्देशनोंदींपुढे त्यांचे पत्ते देताना खंडक्रमांक ठळक ठशात व पुढे विसर्गचिन्ह (:) देऊन पृष्ठक्रमांक साध्या ठशात दिले जातील. सूचीत एकच समान संज्ञा दोन भिन्न विषयांत येत असेल, तर कंसात विषयवाचक निर्देश केला जाईल.

उदा., (१) पेरु –१ (फळ) ९ : ११२८

(२) पेरु –२ (देश) ९ : ११३०

सूचीमध्ये वरील स्वतंत्र नोंदशीर्षके असल्याने ती जाड ठळक ठशात दर्शविली आहेत, तसेच त्यांच्या पुढील पत्त्यात पृष्ठक्रमांकांपुढे स्तंभनिर्देश नाहीत.

विश्वकोशा च्या संकल्पित सूचीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही मोठ्या, प्रदीर्घ व विस्तृत नोंदी तसेच व्याप्तिलेख ह्यांच्या वर्गीकृत सूची दिल्या जातील. नोंदशीर्षक वा मुख्य विषय जाड, ठळक ठशात व त्याच्या पोटात येणारे दुय्यम निर्देश वा उपविषय साध्या वा मध्यम ठशात आणि समासाचे थोडे अंतर सोडून एकाखाली एक अशा प्रकारे दिले जातील व त्यांच्यापुढे पत्त्यासाठी खंड (आवश्यकतेनुसार – वेगळ्या खंडात उल्लेख असेल तर) व पृष्ठक्रमांक, स्तंभांसह दिले जातील. उदा., विश्वकोशात ‘राजकीय पक्ष’ अशी स्वतंत्र व प्रदीर्घ नोंद (३० पृष्ठे) आहे. या नोंदीची वर्गीकृत सूची साधारणपणे खालीलप्रमाणे होईल :

राजकीय पक्ष १४ : ६६२

संकल्पना व स्वरुप १४ : ६६३ अ

जगातील राजकीय पक्ष १४ : ६६६ आ

ग्रेट ब्रिटन १४ : ६६६ आ; ५ : ४५९ आ, ४६० अ, आ; ४६१ अ

फ्रान्स १४ : ६६८ अ; १० : १०७० आ

भारतातील राजकीय पक्ष १४ : ६७१ आ

भारतीय जनता पक्ष १४ : ६७६ अ

सोशालिस्ट पार्टी-समाजवादी पक्ष १४ : ६७८ अ, आ, ६७९ अ

जनता पक्ष १४ : ६७९ अ, आ, ६८० अ.

भारतातील प्रादेशिक पक्ष १४ : ६८० अ

अकाली दल १४ : ६८० अ, आ

द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्ष १४ : ६८४ अ, आ

शिवसेना १४ : ६८९ आ, ६९० अ

तेलुगू देसम् १४ : ६९१ अ, आ

ही केवळ नमुन्यादाखल दिलेली वर्गीकृत सूची आहे. शिवाय वरील सूचीच्या पोटातील सर्व निर्देश अकारविल्हे यथास्थळी स्वतंत्र निर्देशनोंदींच्या रुपात येतील. याखेरीज सूचीमध्ये विषयदृष्ट्या परस्परसंबद्घ व पूरक नोंदींचे संदर्भ प्रमुख विषय व त्याच्या पोटात दुय्यम विषय अशा प्रकारे दिले जातील.

उदा., ख्मेर संस्कृति ४ : ७४१

अंकोरथोम* १ : १८ आ

अंकोरवात* १ : १९ अ

वरील उदाहरणातील पोटनिर्देश ह्या स्वतंत्र नोंदी असल्याने त्यांच्या शिरोभागी ताराचिन्ह (ॲस्टेरिक) देऊन तसे सूचित केले आहे.

अशा प्रकारे विश्वकोशा च्या संकल्पित सूचीमध्ये सर्व नोंदशीर्षके, विविध विषयोपविषयांच्या असंख्य साध्या निर्देशनोंदी, तसेच मोठ्या व विस्तृत नोंदींबाबत काही प्रमाणात वर्गीकृत सूची ह्यांचा समावेश असेल. ही सूची जास्तीत जास्त सर्वसमावेशक, उपयुक्त व महत्त्वपूर्ण संदर्भ-साधन आणि विश्वकोशा ची एकूण व्याप्ती व आवाका दर्शविणारी असावी, हे अभिप्रेत आहे. विश्वकोशा चे एकूण वीस संहिताखंड छापून झाल्यावर व त्यांतील सर्व निर्देशनोंदींचा समावेश केल्यानंतर ह्या सूचिखंडाची सिद्घता होईल.

संदर्भ : 1. Anderson, M. D. Book Indexing, 1971.

2. Collison, R. L. Indexes and Indexing, 1972.

३. चुनेकर, सु. रा. सूचींची सूची, पुणे, १९९५.

४. मराठे, ना. बा. ग्रंथसूचिशास्त्र, मुंबई, १९७३.

५. लेले, रा. के. ग्रंथवर्णन आणि ग्रंथसूचि, पुणे, १९७३.

६. वैद्य, सरोजिनी व इतर, संपा. कोश व सूची वाङ्‌मय : स्वरुप आणि साध्य, मुंबई, १९९७

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate