অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्मृति ग्रंथ व स्मृतिकार

स्मृति ग्रंथ व स्मृतिकार

स्मृतिग्रंथ

गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे यांच्याप्रमाणेच स्मृतिग्रंथांत वैदिकांचे धर्मशास्त्र सांगितले आहे. ह्या सर्वांना  पूर्वमीमांसेत आणि  मनुस्मृतीत ‘स्मृती ’ म्हटलेले आहे. वैदिकांच्या समाजसंस्थेत वेदपूर्वकालापासून सूत्रकालापर्यंत जे सामाजिक-धार्मिक आचार वा कायदे रूढ होते, त्यांचा संग्रह स्मृतिग्रंथांमध्ये कमीजास्त प्रमाणात केलेला आहे. स्मृती म्हणजे आठवण. हे सामाजिक-धार्मिक कायदे ग्रंथरूप होण्यापूर्वी सूत्रकालापर्यंत स्मरणपरंपरेच्या आधारावरच समाजाचे आचरण-नियमन चालत असल्यामुळे या कायद्यांच्या ग्रंथांना ‘स्मृती’ असे म्हणतात. गृह्यसूत्रांत, धर्मसूत्रांत व स्मृतिग्रंथांत वेदपूर्वकालीन रानटी स्थितीपासून सूत्रकालातील सुधारलेल्या स्थितीपर्यंतचे आचार ग्रथित केले आहेत.उदा., गृह्यसूत्रांत रानटी स्थितीतील आर्यांचा शूलगवासारखा विधी सापडतो. आपस्तंब धर्मसूत्रा च्या प्रारंभी सामयाचारिक धर्म सांगतो, असे म्हटले आहे. ‘समय’ म्हणजे माणसांनी ठरविलेला संकेत.  आपस्तंबा चा असा अभिप्राय दिसतो, की स्मृतीतील धर्म म्हणजे मुख्यतः वैदिक लोकांनी संकेताने निर्माण केलेले आचार होत. ह्यांतील काही आचार वेदांतही सापडत असल्यामुळे वेदही धर्माचे प्रमाण होय, असे आपस्तंबाने म्हटले आहे. आपस्तंबा ने धर्मज्ञांनी केलेल्या ठरावावर मुख्य भर दिला आहे. आपस्तंबाने असेही म्हटले आहे, की आर्य ज्याचे आचरण करतात, ज्याची प्रशंसा करतात, तो धर्म होय. स्त्रिया व शूद्र यांची आचारपद्धती रूढीवरून समजून घेतली पाहिजे, असेही आपस्तंबाने म्हटले आहे. ज्या चालीरीती प्रत्यक्ष स्मृतिशास्त्रात वर्णिलेल्या नव्हत्या, त्यांनाही स्मृतिकारांनी प्रामाण्य दिले; कारण गृह्यसूत्रे व धर्मसूत्रे यांत वैदिक समाजातील केवळ निवडक आचारांचे आणि कर्मकांडांचे विवरण आहे. त्यांत ज्याचा उल्लेख नाही, तो आचारमार्ग रूढीवरूनच समजून घेतला पाहिजे. शिवाय नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक गटातील अनुशासन स्मृतिग्रंथांत सापडत नसल्यामुळे स्मृतिग्रंथांनी रूढीला प्रामाण्य दिले.

धर्मशास्त्रविषयक ग्रंथ

धर्मशास्त्रविषयक ग्रंथांत गृह्यसूत्रे व धर्मसूत्रे ही अधिक प्राचीन आहेत. १७ गृह्यसूत्रे आज उपलब्ध आहेत. त्यांत आश्वलायन, बौधायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक अशा काही गृह्यसूत्रांचा समावेश होतो. आप-स्तंब, गौतम, वसिष्ठ व बौधायन अशी केवळ चारच धर्मसूत्रे आज काहीशी निर्भेळ स्वरूपात उपलब्ध आहेत. अनेक धर्मसूत्रांची वचने धर्मनिबंधकारांनी संगृहीत केलेली आहेत; पण मूळ ग्रंथ मात्र नष्ट झाले आहेत. धर्मसूत्रांनंतर अनेक श्लोकात्मक स्मृतिग्रंथ भरभराटीस आले. त्यांत मनुस्मृति आणि  याज्ञवल्क्यस्मृति ह्या स्मृती हिंदू समाजात विशेष महत्त्व पावल्या. मिताक्षरा आणि कृत्यकल्पतरू या धर्मनिबंधांनी स्मृतींचा त्या-त्या विषयावर मोठा संग्रह सुरू केला. त्यांत उल्लेखिलेली अनेक धर्मसूत्रे व श्लोकात्मक स्मृतिग्रंथ आज उपलब्ध नसले, तरी मिताक्षरा, कृत्यकल्पतरू किंवा त्या प्रकारचे नंतर झालेले निबंधग्रंथ यांत नष्ट स्मृतींतील जी वचने संगृहीत केलेली आढळतात, ती सर्व एकत्र केल्यास असे दिसते, की नष्ट स्मृतिग्रंथांत यांपेक्षा अधिक महत्त्वाचा विषय शिल्लक राहिला नसावा. न्यायालयीन व्यवहारावर (‘ व्यवहार ’ हा स्मृतिशास्त्रातील पारिभाषिक शब्द आहे. कायदा लागू असलेले मानवी वर्तन हा त्याचा मुख्य अर्थ होय. ‘ कायदा ’ असाही त्याचा अर्थ होतो. ) नारदस्मृति हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे.  पराशर,  बृहस्पति, कात्यायन यांचेही अनुक्रमे पराशरस्मृति, बृहस्पतिस्मृति व कात्यायनीस्मृति हे स्मृतिग्रंथ तितकेच महत्त्वाचे असले पाहिजेत, असे त्यांच्या उपलब्ध होणार्‍या श्लोकसंग्रहांवरून निश्चित अनुमान होते. सध्या उपलब्ध नसलेल्या ४६ स्मृतींची निबंध-ग्रंथांतील व टीकाग्रंथांतील व्यवहारविषयक वचने वाई ( जि. सातारा ) येथील प्राज्ञपाठशाळेच्या तर्फे प्रसिद्ध झालेल्या धर्मकोशाच्या व्यवहार-कांडात संपूर्णपणे संगृहीत केलेली आहेत.

वर्णधर्म व आश्रमधर्म हे धर्मसूत्रे व श्लोकात्मक स्मृती यां चे मुख्य विषय होत. धर्मसूत्रांमध्ये राजधर्म व न्यायव्यवहारधर्म यांचे विवेचन त्रोटक असले, तरी मनुस्मृति, विष्णुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति आणि नारदस्मृति  यांत राजधर्म व न्यायव्यवहारधर्म यांचे सविस्तर प्रतिपादन केले आहे.

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करणारा विराट पुरुष स्वतःतून निर्माण केला आणि त्या विराट पुरुषापासून आपला जन्म झाला, असे मनूने मनुस्मृतीच्या आरंभीच सांगितले आहे. ‘ जो जागा झाल्यावर सृष्टी अस्तित्वात येते व हालचाल सुरू होते, त्या आदिपुरुषाने हे धर्मशास्त्र निर्माण करून मला दिले; ते मी भृगू मुनीला दिले; तो ते तुम्हास सांगेल ’, अशा आशयाचे मनूचे उद्गारही आरंभी दिले आहेत. म्हणूनच मनुस्मृतीला भृगुप्रोक्त मानवधर्मशास्त्र असेही पर्यायी नाव आहे. इ. स. पू. दुसरे शतक हा मनुस्मृतीचा काळ असावा, असा काही विद्वानांचा अंदाज आहे. सध्याच्या मनुस्मृतीवर इ. स. च्या नवव्या शतकापासून पंडितांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या टीका उपलब्ध झालेल्या आहेत. मेधातिथी, गोविंदराज, कुल्लूक, असहाय, भागुरी, भोजदेव, धरणीधर, राघवानंद, नंदन, रामचंद्र, नारायण इ. मनुस्मृतीचे टीकाकार होत. सध्या उपलब्ध असलेल्या मनुस्मृतीचे बारा अध्याय असून श्लोकसंख्या २,६८४ आहे. मनुस्मृतीच्या चार संहिता प्रसिद्ध झाल्या, असा निर्देश संस्कारमयूख आणि चतुर्वर्गचिंतामणि-दानखंड या दोन धर्मनिबंधग्रंथांत आढळतो. वैदिकांच्या समाजविषयक विचार-सरणीला ऐहिक दृष्टी लाभल्याचे लक्षण मनुस्मृतीत सापडते. धर्मसूत्रांत ते सापडत नाही. मनुस्मृतीत परिस्थितिभेदाप्रमाणे किंवा कालभेदानुसाराने वेळोवेळी अनेक संस्कार झालेले आहेत. त्यामुळे धर्मपरिवर्तनाचा क्रम तीत उपलब्ध होतो. उदा., मनुस्मृतीत  नियोगाच्या चालीचे एकदा विधान केले आहे व दुसर्‍या ठिकाणी या चालीला विरोध केला आहे. धर्मसूत्रांत असा इतका अंतर्विरोध आढळत नाही.

मनुस्मृतीतील समाजरचना म्हणजे चातुर्वर्ण्यव्यवस्था होय आणि राजसत्ताप्रधान समाजसंस्था म्हणजे हा भारतीय मनुप्रणीत राजनीतिशास्त्राचा मुख्य आदर्श होय. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांच्यात पारंगत असलेला राजा हाच राजपदास पात्र होय, हे मनूने अनेक प्रकारे सांगितले आहे. सगळे आश्रमधर्म, वर्णधर्म, देशजातिधर्म, कुलधर्म, राजधर्म या सगळ्यांची कसोटी सार्वत्रिक धर्म होय. या सार्वत्रिक धर्माची दहा लक्षणे मनूने मानवधर्मशास्त्रात सांगितलेली आहेत. ती म्हणजे संतोष; क्षमा—म्हणजे दुसर्‍याने अपकार केला असता आपण उलट त्याला अपकार न करणे; दम—म्हणजे मनाला व इंद्रियाला चलित करणार्‍या परिस्थितीत मनाचा निग्रह; अस्तेय—म्हणजे परधनाचा अपहार न करणे; शौच—म्हणजे देहाची स्वच्छता; इंद्रियनिग्रह; ज्ञान; विविध विद्यांचा अभ्यास; सत्य आणि अक्रोध.

हिंदू समाजात विशेष महत्त्व पावलेल्या ज्या दोन स्मृतींचा वर उल्लेख येऊन गेला, त्यांपैकी मनुस्मृतीखेरीज दुसरी म्हणजे याज्ञवल्क्यस्मृति होय. या स्मृतीतील एका निर्देशानुसार बृहदारण्यकाचा द्रष्टा याज्ञवल्क्य ऋषी हाच या स्मृतीचा कर्ता असल्याची सूचना मिळते; तथापि मिताक्षरा कार  विज्ञानेश्वर ( सु. १०७०—११०० ) यांनी टीकेच्या प्रस्तावनेतच मनुस्मृति ज्याप्रमाणे भृगूने रचिली, त्याप्रमाणे याज्ञवल्क्याच्या कुणी एका शिष्याने याज्ञवल्क्यप्रणीत धर्मशास्त्र संक्षेपाने या स्मृतीत सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे. भाषाशैलीच्या दृष्टीनेही याज्ञवल्क्यस्मृति व बृहदारण्यक यांचा कर्ता एक असावा, असे वाटत नाही. महोपाध्याय पां. वा. काणे यांनी या स्मृतीचा काळ इ. स. १००—३०० असा मानला आहे. आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त अशा तीन प्रकरणांत ही स्मृती विभागलेली आहे. मनुस्मृतीत आलेले विषय याज्ञवल्क्यस्मृती ने पुनरुक्ती टाळून, संक्षेपाने परंतु अधिक सुसंगत रीतीने मांडले आहेत. मनुस्मृतीत २,६८४ श्लोक आहेत, तर याज्ञवल्क्यस्मृती ने मनुस्मृती च्या विषयांचा संक्षेप १,००३ श्लोकांत केलेला आहे. याज्ञवल्क्यस्मृतीत आलेले काही विषय मनुस्मृती त नाहीत. उदा., गणपतिकल्प आणि ग्रहशांती. तसेच मनुस्मृती त आलेले विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्याचे विवेचन याज्ञवल्क्य-स्मृती त नाही. याज्ञवल्क्यस्मृतीत मनू , अत्री, विष्णू , हारित, उशनस् , अंगिरस्, यम, आपस्तंब, कात्यायन, व्यास, गौतम, शातातप, वसिष्ठ इ. वीस ऋषींचा धर्मशास्त्रप्रवर्तक म्हणून उल्लेख केला आहे. या स्मृतीच्या अनेक टीकाकारांपैकी प्राचीन टीकाकार विश्वरूप याचा काळ ८०० ते ८२५ च्या सुमाराचा आहे. उपर्युक्त विज्ञानेश्वरांबरोबरच अपरार्क, शूलपाणी हेही याज्ञवल्क्यस्मृतीचे टीकाकार होत.

स्मृतिग्रंथांत नित्यनूतन असणार्‍या धर्माचे प्रतिबिंब आढळते; तसेच समाजात वाढू लागलेले भक्तीचे महत्त्वही ध्वनित झालेले दिसते.गोपीचंदन, तुलसीमाला इ. चे महत्त्व, विष्णूचे मूर्तिभेद , पूजाविधींचे प्रकार यांचे तपशीलवार वर्णन लघुहारितस्मृती सारख्या स्मृतींमध्ये आढळते.

भारतीय समाजाच्या इतिहासाचे स्मृती हे एक महत्त्वाचे साधन होय.

संदर्भ : जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९९२.

लेखक: लक्ष्मणशास्त्री जोशी ; त्रि. ना. धर्माधिकारी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate