অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाहिली साहित्य

स्वाहिली साहित्य

स्वाहिली ही एक बांतू भाषा आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून उत्तरेस लामू आयलंड, केन्या आणि दक्षिणेकडे टांझानिया अशा विस्तृत प्रदेशांत ही मातृभाषा वा द्वितीय भाषा (सेकंड लँग्वेज) म्हणून प्रचलित आहे.

स्वाहिली भाषेतील लिखित साहित्य अठराव्या शतकाच्या आरंभा-पासूनचे असून ते अरबी लिपीत लिहिलेले आहे. त्यानंतरचे स्वाहिली साहित्य तीन बोली भाषांत लिहिले गेले : (१) किउंगुजा, (२) किम्व्हिटा आणि (३) किआमू . १९३० मध्ये वसाहतवादी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रमाण स्वाहिली भाषा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी काही आफ्रिकन विद्वानांची आणि लेखकांची मदत घेतली. अखेरीस झांझिबार येथे बोलली जाणारी किउंगुजा ही बोली भाषा प्रमाण स्वाहिली भाषेसाठी पायाभूत म्हणून धरली गेली. संपूर्ण पूर्व आफ्रिकेत पुस्तके आणि अन्य प्रकाशने, शिक्षण इत्यादींसाठी ही प्रमाण भाषा म्हणून वापरण्यात येऊ लागली.

आरंभी स्वाहिली भाषेतील कथात्मक साहित्य कथानिवेदनाच्या मौखिक परंपरेतून अवगत झालेल्या कथा, तसेच अरबी कथासाहित्य आणि यूरोपियन लेखकांनी केलेले अनुवादित साहित्य ह्या स्रोतांनी प्रभावित झाले होते. याला अपवाद म्हणजे जेम्स एंबोताला ह्याची ‘फ्रीडम फॉर द स्लेव्ह्ज’ (१९३४, इं. शी.) ही ऐतिहासिक कादंबरी होय; परंतु शाआबान रॉबर्ट (१९०९-६२) याने प्रमाण भाषेतील स्वाहिली साहित्याला खरी चालना दिली. ह्या टांझानियन कवी-कादंबरीकार आणि निबंधकाराच्या साहित्याला १९४० च्या दशकापासून १९६० च्या दशकापर्यंत वाचकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि आजही त्याचे साहित्य पूर्व आफ्रिकेत वाचले जाते. महंमद फार्सी आणि महंमद सैद अब्दुल्ला हे दोन लेखकही महत्त्वाचे आहेत. महंमद फार्सीकृत ‘कुर्वा अँड दोतो’ (१९६०, इं. शी.) ही कादंबरी आणि महंमद सैद अब्दुल्ला ह्याची ‘श्राइन ऑफ द ॲन्सेस्टर्स’ (१९६०, इं. शी.) ही स्वाहिलीतील पहिली गुप्तहेर कथामाला. ह्या साहित्यकृती स्वाहिली साहित्यातील एका नव्या संक्रमणाच्या द्योतक आहेत. पूर्व आफ्रिकेतील औद्योगिकीकरणाच्या अनुभवाचे संस्कार त्यांवर आढळतात. संस्कृतीचे पश्चिमीकरण, स्वराज्यासाठी दिलेला लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील विकास हे विषयही स्वाहिली साहित्याने आपल्या कथात्मक साहित्यातून आणलेले दिसतात. टांझानियन साहित्यिक फराजी कटालांबुला ह्याची ‘डेथ कॉल’ (१९६५, इं. शी.) ही भयकथाही उल्लेखनीय आहे. स्वाहिली वाङ्मय १९६० च्या दशकात जलद गतीने प्रकाशित होऊ लागले.

हे साहित्य नंतरही लिहिले जात होतेच; पण त्याच वेळी अनेक कादंबऱ्यांतून आणि नाटकांतून ऐतिहासिक घटनांची चिकित्सा केली जात होती. तसेच समकालीन सामाजिक-राजकीय समस्यांचाही परामर्श घेतला जात होता. स्वाहिलीत आता केवळ पश्चिमी लेखकांच्या साहित्यकृतींचाच नव्हे, तर आफ्रिकन साहित्यकृतींचाही अनुवाद केला जाऊ लागला होता. ज्यांना स्थानिक, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली, अशा स्वाहिली साहित्यिकांत यूफ्रेझ केझिलाहाबी, महंमद एस्. महंमद (दोघेही टांझानियन कादंबरीकार), नाटककार एब्राहिम हुसेन आणि पेनिना ओ मिआमा हेही टांझानियाचे. त्याचप्रमाणे अली जमादार अमीर आणि पी. ए. कारेथी हे केन्याचे कादंबरीकारही उल्लेखनीय आहेत.

अशा सर्जनशील साहित्याच्या जोडीला इतिहासलेखनाचीही दीर्घ परंपरा स्वाहिली भाषेला लाभली आहे. अलीकडच्या काळात भाषाशास्त्रीय अभ्यास आणि वाङ्मयीन समीक्षाही विकसित होत आहे.

लेखक: अ. र. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate