অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हिब्रू पुराणकथा

हिब्रू पुराणकथा

हिब्रूंच्या पुराणकथा प्रामुख्याने बायबलच्या ‘जुन्या करारा’त आढळतात. विश्वाची निर्मिती आणि हिब्रू लोकांच्या  पूर्वजांची वंशावळ हे त्यांच्या पुराणकथांचे दोन मुख्य  विषय आहेत.

प्रारंभीच्या काळात हिब्रू लोक अश्तार्ती, अशेराह इ. देवतांची पूजा करीत होते; परंतु नंतर मात्र त्यांनी विश्वनिर्माता येहोवा हा सर्वश्रेष्ठ व एकमेव ईश्वर मानला. एका कथेनुसार ईश्वराने स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मितीनंतर निर्मिलेल्या धुक्यामुळे जमीन ओली होऊन गवत व रोपे तयार झाली. त्यानंतर क्रमाने ईडनमधील बाग, आदम हा मानव, वृक्ष, पशू, स्त्री इत्यादींची निर्मिती करण्यात आली. ‘जुन्या करारा’ तील निर्मितिकथेनुसार प्रारंभी ईश्वराच्या भोवती तोहू (केऑस) आणि बोहू (रिक्तता) होती. मग ईश्वराने सहा दिवसांत प्रकाश, स्वर्ग, पृथ्वी व समुद्र, चंद्रसूर्य व तारे इत्यादींच्या निर्मितीनंतर सहाव्या दिवशी मानवाची निर्मिती करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली. ईनॉच, आयझॅक, याकोब, मोझेस इ. लोक जिवंतपणीच ईडन बागेत गेले होते. ईडनच्या उत्तरेला जेहेन्ना हा नरक असून दुष्ट तेथे जातात. झेभुल नावाच्या स्वर्गात स्वर्गीय जेरूसलेम व मंदिर आहे. विश्वाच्या निर्मितीनंतर तिसऱ्या दिवशी देवाचा मुख्य दूत लूसिफर याला आपण देवाच्या बरोबरीचे व्हावे असा अहंकार झाल्यामुळे त्याला ईडनमधून हाकलण्यात आले.

ईश्वराने सहाव्या दिवशी उत्कृष्ट मातीपासून आदम या मानवाची निर्मिती केली. नंतर देवाने लिलिथ नावाची स्त्री निर्माण केली. दोघांचाही जन्म मातीपासूनच झालेला असल्यामुळे दोघे समान आहोत आणि त्यामुळे समागमप्रसंगी मी तुझ्या खाली झोपणार नाही, असे म्हणून ती रूसून गेली. नंतर देवाने पहिली ईव्ह निर्माण केली; परंतु आदमने तिला स्वीकारले नाही. मग ईश्वराने त्याच्या बरगडीपासून (वा शेपटीपासून) दुसरी ईव्ह निर्माण केली. ईश्वराने आदम आणि ईव्ह यांना ईडनच्या बागेतील ज्ञानवृक्षाचे फळ खाऊ नका, असे सांगितले होते. ईश्वराने तुम्हाला फसवले आहे, असे सांगून सॅमेलने म्हणजेच सापाच्या रूपात असलेल्या सैतानाने ईव्हला फळ खावयास लावले.

त्यानंतर मृत्यू दिसू लागताच आपल्या मृत्यूनंतर आदम दुसरे लग्न करील या भावनेने तिने त्यालाही फळ खायला लावले. त्यांना लगेच नग्नतेची जाणीव झाली आणि ईश्वराने त्यांना मर्त्यतेचा शाप देऊन बागेतून बाहेर घालवून दिले. फीनिक्स पक्ष्याने  फळ खाल्ले नसल्यामुळे तो अमर झाला. सॅमेलने ईव्हशी समागम करून तिला भ्रष्ट केले आणि तिला केन हा मुलगा झाला. आदमपासून तिला एबेल हा मुलगा झाला. त्याला केनने ठार केले. आदम एकूण ९३० वर्षे जगला व त्याच्या वंशजांचे आयुष्य क्रमाक्रमाने कमी होत गेले. आपल्या दुसऱ्या मुलालाही केन मारेल, असे वाटल्यामुळे आदमने १३० वर्षे ईव्हशी संबंध ठेवला नाही; त्यानंतर त्याना सेत हा पुत्र झाला. केनचा मुलगा ईनॉच हा स्वर्गात जाऊन ईश्वराचा मुख्य सल्लागार बनला. केनची इतर मुले मात्र अत्यंत अधःपतित झाली. एकदा केनच्या वंशातील आंधळा लामेख आपल्या तुबल केन या मुलाबरोबर शिकारीला गेला होता.

मुलाने शिकार समजून केनचाच निर्देश केल्यामुळे केन मारला गेला. मग लामेखने मुलालाही मारले. त्यामुळे लामेखाच्या बायका रागावल्या आणि त्या त्याच्याबरोबर झोपेनात. परंतु आदमने दिलेला आदेश मानल्यामुळे झिल्लहला लामेखपासून सुंता झालेल्या अवस्थेतच नोआ नावाचा मुलगा झाला. त्याचवेळी आदमचा मृत्यू झाला. ईनॉचची मुलगी नेमा हिच्याबरोबर नोआचा विवाह झाला. त्यांना शेम, हॅम आणि जापेत हे तीन मुलगे झाले. प्रलयाच्या वेळी नोआने नाव बांधून प्रत्येक प्राण्याचे एक जोडपे वाचवले. पुढे नोआने दिलेल्या गुलाम व कुरूप बनण्याच्या शापामुळे कनानची मुले निग्रो बनली. नोआच्या वंशात जन्माला आलेल्या अब्राहमने देवांच्या लाकडी मूर्ती कुऱ्हाडीने फोडून टाकल्या. म्हणूनच त्याला एकेश्वरवादी ज्यू धर्माचा प्रवर्तक मानले जाते. राजाने त्याला पेटलेल्या भट्टीत टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; परंतु भट्टीची बाग झाल्यामुळे तो वाचला. सावत्र बहीण साराय ही त्याची पत्नी होती.

अब्राहम १०० वर्षांचा आणि साराय ९० वर्षांची असताना आणि तिची ऋतुनिवृत्ती झाली असतानाही ईश्वरी कृपेने त्यांना आयझॅक हा मुलगा झाला.पुढे ईश्वराच्या आदेशावरून अब्राहम आयझॅकचा बळी देण्यासाठी मोराइया पर्वतावर गेला असताना, त्याची तयारी पाहून ईश्वराने तेथे मेंढा निर्माण केला आणि त्याचा बळी घेतला. अब्राहम १३७ वर्षांचा झाला, तरी तो आयझॅकसारखाच दिसत असल्यामुळे अब्राहमच्याच प्रार्थनेवरून ईश्वराने त्याचे केस पांढरे केले. पुढे अब्राहमचा पुतण्या बीथूएल याला लेबन हा मुलगा आणि रीबेख ही मुलगी झाली. आयझॅकचे तिच्याबरोबर लग्न झाले. त्यांना याकोब व ईआसू हे मुलगे झाले. याकोब हा सुंता केलेल्या अवस्थेत जन्मला होता. एकदा प्रवासात याकोब झोपलेला असताना त्याला देवदूत शिडीवरून स्वर्गात जात असलेले दिसले. ते स्थान म्हणजेच बेथल हे देवाचे घर होय. आदम, नोआ इत्यादींमध्ये काहीतरी उणीव होती; परंतु योकोब निर्दोष असल्यामुळे ईश्वराने देवदूतांना त्याची स्तुती करावयास सांगून त्याचे नाव इझ्राएल ठेवले.

पुढे त्याने आपला मामा लेबन याच्याकडे सेवा करून त्याच्या लीह आणि रेचेल या मुलींशी विवाह केला. त्या दोघींच्या दोन दासीही त्याच्या स्त्रिया बनल्या. ज्यांना इझ्राएलचे पितृत्व दिले जाते ते बाराजण म्हणजे याकोबपासून या चौघींना झालेले पुत्र होत. रेचेल ही याकोबची लाडकी पत्नी होती. दीर्घकालीन वंध्यत्वानंतर एका वनस्पतीच्या भक्षणामुळे तिला जोसेफ आणि बेंजामिन हे दोन पुत्र झाले. जोसेफ सोडून इतर सर्वांना जुळ्या बहिणी होत्या व त्याच त्यांच्या पत्नी झाल्या. लीहचा मुलगा जुडा याला तीन मुलगे होते. एर या थोरल्या मुलाची बायको तामार ही पुढे इझ्राएलची वीरमाता मानली गेली. तिला सासऱ्यापासून पेरेझ आणि झरोह असे दोन पुत्र प्राप्त झाले. जोसेफला त्याच्या भावांनी खड्ड्यात टाकल्यावर तो दैवयोगाने ईजिप्तमध्ये पोचून तेथील राजाचा मुख्य मंत्री बनला. त्याने दूरदृष्टीमुळे सात वर्षांच्या दुष्काळात अनेक लोकांचे व आपल्या भावंडांचेही प्राण वाचवले. मोझेस, सॉलोमन इत्यादींविषयीच्या पुराणकथाही आढळतात.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends,        4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate