অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रमेशचंद्र दत्त

रमेशचंद्र दत्त

(१३ ऑगस्ट १८४८–३० नोव्हेंबर १९०९). प्रख्यात बंगाली साहित्यिक, अर्थशास्त्रवेत्ते, प्रशासक, इतिहास–संशोधक व देशभक्त. त्यांचा जन्म रामबागान, कलकत्ता येथील प्रसिद्ध व सुसंस्कृत अशा दत्त घराण्यात झाला. त्यांचे कुटुंब विद्वत्तेच्या व साहित्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध होते. रासमय दत्त (कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजचे पहिले प्राचार्य), शशीचंद्र  दत्त (इंग्रजी लेखक), तोरू दत्त आणि अरू दत्त (इंग्रजी व फ्रेंच लेखिका आणि कवयित्री) ह्या त्यांच्याच घरातील प्रसिद्ध व्यक्ती. त्यांचे वडील ईशानचंद्र हे उपजिल्हाधिकारी होते.एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून रमेशचंद्रांचा लौकिक होता आणि त्यांना अनेक शिष्यवृत्त्याही मिळाल्या. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. बी. ए. ला असतानाच (१८६२) ते इंग्लंडला गेले आणि आय्. सी. एस्. झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी कलकत्त्याचे नवगोपाल बोस यांची कन्या मातंगिनी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. १८७१ मध्ये ते भारतीय सनदी सेवेमध्ये रुजू झाले व १८९४ मध्ये ते विभागीय आयुक्ताच्या हुद्द्या‌वर चढले. भारतातील ते पहिले विभागीय आयुक्त होत. १८९७ मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक होता. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला लेखनास व लोकसेवेस वाहून घेतले. सरकारी नोकरीत असतानाही स्वतंत्र विचाराचे निर्भय वक्ते म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. १८९९ मध्ये ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झाले. राष्ट्रीय आंदोलनातील सुशिक्षित वर्गाचा प्रभावी प्रतिनिधी म्हणून रमेशचंद्रांना मानाचे स्थान होते.

सेवानिवृत्तीनंतर त्यांची लंडन विद्यापीठात भारतीय इतिहासाचे अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९०४ मध्ये ते भारतात परतल्यावर बडोदा संस्थानात महसूलमंत्री म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. १९०८ मध्ये ते विकेंद्रीकरण आयोगाचे सदस्य म्हणून नेमले गेले. १९०९ मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बडोद्यास त्यांचे निधन झाले. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण वैचारिक व ललित ग्रंथ लिहिले.

भारताचा इतिहास व बंगाली साहित्याचा परियच पाश्चात्त्यांना व्हावा म्हणून त्यांनी इंग्रजीत काही ग्रंथ लिहिले. द लिटरेचर ऑफ बेंगॉल (१८८७), हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन इन एन्शन्ट इंडिया (खंड, १८९०), लेज ऑफ एन्शन्ट इंडिया (पद्य, १८९४), महाभारत व रामायण यांचा इंग्रजी काव्यानुवाद (१८९९) इ. ग्रंथांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. याशिवाय त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत थ्री यीअर्स इन यूरप (१८७२), पीझंट्री ऑफ बेंगॉल (१८७५) आणि यांखेरीज इंग्रजी अंमलाखालील भारताच्या आर्थिक परिस्थितीसंबंधी व दारिद्रद्र्यासंबंधी मूलगामी संशोधन व विवेचन करणारे ग्रंथ इत्यादींचा समावेश होतो. भारतीयांच्या हितार्थ रमेशचंद्रांनी केलेल्या कार्याची विस्तृत माहिती त्यांच्या स्पीचेस अॅँड पेपर्स (२ खंड, १९०२) या इंग्रजी ग्रंथात आली आहे. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांना त्या काळी बरीच प्रतिष्ठा व प्रसिद्धी लाभली होती.

बंकिमचंद्रांच्या प्रोत्साहनाने रमेशचंद्र बंगालीत लिहू लागले आणि एक थोर बंगाली साहित्यिक म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यांची पहिली ऐतिहासिक बंगाली कादंबरी वंगविजेता (१८७४) ही अकबरकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधिष्ठित आहे. त्यानंतर रमेशचंद्रांनी माधवीकंकण (१८७७), महाराष्ट्र जीवन प्रभात (१८७८) आणि रजपूत जीवन संध्या (१८७९) अशा तीन ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. संसार (१८८६) व समाज (१८९४) या मध्यमवर्गीय जीवनावर आधारित अशा दोन सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या.

वंगीय साहित्य परिषदेचे रमेशचंद्र हे पहिले अध्यक्ष (१८९४). परिषदेला वळण लावून तिला विकसित करण्यासाठी रमेशचंद्रांनी केलेले परिश्रम उल्लेखनीय होत.

बंगालच्या साहित्यिक व सांस्कृतिक प्रगतीत रमेशचंद्र दत्त यांचा वाटा मोठा आणि महत्त्वाचा आहे. १८८५–८७ मध्ये त्यांनी ऋग्वेदाचे बंगालीत भाषांतर केले. सतत सव्वीस वर्षे सरकारी नोकरीत राहूनही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने व कर्तृत्वाने राजप्रीती व लोकप्रीती दोन्ही संपादन केली. सरकारी नोकरीत असतानाच इतिहासाचा अभ्यास व संशोधन करून त्यांनी उपर्युक्त कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या शक्यतो इतिहासाला धक्का लागू न देता लिहिलेल्या आहेत. त्यांची भाषा मात्र तितकीशी धारदार नाही. त्यामुळे क्वचित कथेचा रसपरिपोष व्हावा तसा होत नाही; परंतु रमेशचंद्रांनी बंगाली गद्यात नवीनता आणली. ल. ना. जोशी, आ. अ. पांडे, वि. सी. गुर्जर, वा. पु. साठे, शांताराम, बा. न. भावे, अ. गो. वैद्य प्रभृतींनी रमेशचंद्रांच्या काही ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले आहेत.

रमेशचंद्र दत्तांचे आर्थिक इतिहासासंबंधी गाजलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : इंग्‍लंड अँड इंडिया (१८९८); फॅमिन्स इन इंडिया (१९००); इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया–दोन खंडांमध्ये, इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया अंडर अर्ली ब्रिटिश रूल (१७५७–१८३७) हा पहिला खंड १९०२ मध्ये प्रसिद्ध झाला; इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया इन द व्हिक्टोरियन एज (१८३७ ते विसाव्या शतकाचा प्रारंभ) हा दुसरा खंड १९०४ मध्ये प्रसिद्ध झाला.

रमेशचंद्र दत्तांची भारताच्या आर्थिक स्थितिविषयक मते त्यांच्या वरील तीन प्रमुख ग्रंथांत आलेली आहेत. फॅमिन्स इन इंडिया  या ग्रंथात दत्तांनी दुष्काळाची वास्तव कारणे आणि भारतीय शेतकरी व शेतमजूर यांचे दारिद्र्य आणि कष्टमय जीवन यांबद्दल चर्चा केली आहे. जमीनमहसुलाच्या भारामुळे भारतीय शेतकऱ्याला लागोपाठ येणाऱ्या दोन–तीन दुष्काळी वर्षांना तोंड देणे अतिशय कठीण जाते, असे दत्तांचे मत होते. इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया अंडर अर्ली ब्रिटिश रूल या पहिल्या खंडात दत्तांनी भारतामधील दारिद्र्य व दुष्काळ यांसंबंधी काही इंग्रज इतिहासकारांनी केलेल्या विधानांचा परामर्श घेतला आहे. भारतातील दारिद्र्य व त्याची कारणे दत्तांच्या मते पुढीलप्रमाणे होती : (१) ब्रिटिश सरकारने उद्योगधंदे व शेती यांना उत्तेजन न देता त्यांची गळचेपी केली; (२) अयोग्य करनिर्धारण तत्त्वांचा पाठपुरावा केला; (३) ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ब्रिटिश सरकारने मायदेशास भारतातून बेसुमार पैसा नेला (होम चार्जेस).

कररूपाने जमा झालेला पैसा हा त्या राष्ट्रातील जनतेमध्येच व जनतेसाठीच खर्च केल्यास तेथील उद्योगधंदे व व्यापार यांची भरभराट होते. इंग्रजांच्या अगोदरच्या भारतावरील बहुतेक सर्व राज्यकर्त्यांनी असेच धोरण अवलंबिले. तथापि ईस्ट इंडिया कंपनीने मात्र आपल्या कारभाराच्या प्रारंभापासून याउलट धोरण अवलंबिले. कंपनीने भारतातील उच्च पदे इंग्रजांना दिली; व्याजरूपाने भरपूर मालमत्ता भारतातून मायदेशी नेली. दत्तांनी आपले हे प्रतिपादन तत्कालीन स्थिती व आकडेवारी यांसहित केले. या परिस्थितीवर उपाय म्हणून भारतीय उद्योगधंद्यांना सक्रिय साहाय्य द्यावे; भारतीय कापडउद्योगावरील उत्पादनशुल्क रद्द केले जावे; इंग्लंडमध्ये मुलकी व लष्करी कार्यावर होणाऱ्या खर्चातील आपला वाटा ब्रिटिश सरकारने उचलावा; अधिकाधिक भारतीयांच्या उच्च पदांवर नेमणुका करून नागरी खर्चांत काटकसर करावी; जलसिंचन कामांचा विस्तार; वर्षाकाठी देशाबाहेर जाणाऱ्या अर्थप्रवाहात कपात आणि विधानपरिषदांमधून अधिक भारतीयांचा सहभाग इ. गोष्टी दत्तांनी या द्विखंडीय ग्रंथामधून सुचविल्या आहेत.

रमेशचंद्र दत्त हे भारताच्या आर्थिक इतिहासाचे सखोल विवेचक व भाष्यकार होते. भारतीय अर्थव्यवस्था ही अविकसित नसून तिचा विकास व गतिमानता कुंठित (बद्ध) झाल्याचे दत्तांचे ठाम मत होते. सबंध असमाधानकारक कृषिस्वरूप, विशेषतः भारतातील भूधारणव्यवस्था, ह्या गोष्टी आर्थिक विकासाला अडथळा आणीत असून त्यांयोगे शेतमजूर कुळे, तसेच लहान व मध्यम शेतकरी या सर्वांचे जीवनमान निराशाजनक बनले आहे इत्यादीसंबंधी दत्तांनी केलेल्या विश्लेषणामध्ये पुढे पन्नास वर्षांनंतर उदयास आलेली नवीन विचारबीजे आढळतात. दत्तांच्या लेखनशैलीतील सौंदर्य, आवेश व जोम हा सर्वांना आकृष्ट करीत असे आणि त्यांच्या कल्पनाविचारांचा आशय सर्वांवर प्रभाव पाडीत असे. त्यांनी प्रतिपादिलेली काही सत्ये, सुधारित स्वरूपात, अर्थशास्त्रीय मूलसिद्धांतांप्रमाणे आजही टिकून राहिली आहेत, असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी दत्तांविषयी म्हटले आहे.

संदर्भ : 1. Dutt, R. C. Romesh Chander Dutt, New Delhi, 1968.

2. Madan, G. R. Economic Thinking in India, New Delhi, 1966.

लेखक / लेखिका :१) वि. रा. गद्रे,

२) सुकुमार (बं.) सेन,

३) सरोजिनी (म.) कमतनूरकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate