অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मामा परमानंद

मामा परमानंद

मामा परमानंद : (३ जुलै १८३८–१३ सप्टेंबर १८९३). प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक. जन्म कोकणात सावंतवाडी नजिकच्या माणगाव या खेड्यात. संपूर्ण नाव नारायण महादेव परमानंद; तथापि मामा परमानंद ह्याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. मामांचा जन्म झाल्यावर वडील महादेव दुसऱ्या वर्षीच वारले. आई गंगाबाई हिने तिच्या भावाच्या मदतीने असलेले दुकान चालवून मामांचे प्राथमिक शिक्षण केले. दहाव्या वर्षी मामा मुंबईस बहिणीकडे गेले असताना, त्यांची हुशारी व महत्त्वाकांक्षा पाहून त्यांचे मेहुणे कृष्णशेट तिरवेकर यांनी पुढील शिक्षणार्थ त्यांना मुंबईसच ठेवून घेतले. पूर्वी अत्यंत गरिबीत झालेले अर्धवट मराठी शिक्षण पुरे करून मामा सरकारी सेंट्रल स्कूलमध्ये चार वर्षे शिकले. पुढे कॉलेजातही गेले. मेहनती व जात्याच बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळे मामांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवून पहिल्या वर्गातील ‘स्कॉलर’ म्हणून लौकिक संपादन केला.

मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा देऊन ते बी. ए. परीक्षेसही बसले होते; पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि एल्फिन्स्टन हायस्कूलात शिक्षकाची नोकरी धरावी लागली. तेथे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यांच्या हाताखाली नामवंत अनेक विद्यार्थी तयार झाले. उदा., प्रसिद्ध संशोधन काशिनाथपंत तेलंग यांचेच विद्यार्थी. पुढे सिंधमध्ये बदली झाली. तिकडेही त्यांनी उत्तम काम केले; पण हवा न मानवल्यामुळे मुंबईसच यावेलागले. शिक्षकी पेशा सोडून वृत्तपत्र संपादन व लेखन ह्या सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी आमरण मोठे यश व कीर्ती मिळविली. इंदुप्रकाश, पुढे  नेटिव  ओपिनिअन, इंडियन स्पेक्टॅटर व विशेषतः सुबोध पत्रिका (मुंबई प्रार्थना समाजाचे मुखपत्र) ह्या वृत्तपत्रांची जबाबदारी अंगावर घेऊन ती निर्भीड व निस्पृहपणे पार पाडली.  मामांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांचे लेखन सुबोध, चटकदार, मार्मिक व निश्चयात्मक मते मांडणारे होते. दैनंदिन राजकीय घडामोडींवरील त्यांची टीका भारदस्त व न्यायनिष्ठुर असे. तत्कालीन अनेक भ्रष्टाचारी प्रकरणांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला; यूरोपिअन अंमलदारांचा देखील बेबंदपणा त्यांनी उघडकीस आणला व हाच रोष त्यांना सरकारी नोकरीत नडला.

संस्थानी कारभार व त्याची सुधारणा ह्यावरही मामांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले, कच्छच्या संस्थानिकाने त्यांना नायब दिवाण नेमले. तेथील गुंतागुंतीचा कारभार मामांच्या सरळ, शांत व सभ्य स्वभावाला मानवला नाही आणि राजीनामा देऊन ते मुंबईस परत आले. हिंदी लोकांचे मित्र व हितचिंतक सर विल्यम वेडरबर्न हे मामांची योग्यता व कार्यक्षमता जाणणारे होते. त्यांनी ते मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक असताना मामांना उपप्रबंधक म्हणून नेमले. पुढे त्यांनीच मामांना मजूर खात्याचे सेक्रेटरी केले. नंतर मामा महसूल व सामान्य खात्याचे अधीक्षक देखील झाले. पण कामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली व शेवटपर्यंत (१८८३ ते ९३) त्यांना घरीच बिछान्यावर पडून रहावे लागले.

हिंदी राजकारणाचा त्यांना अभ्यास सखोल होता. सयाजीराव गायकवाड, सर विल्यम वेडरबर्न, रानडे, तेलंग, चंदावरकर, मलबारी, मोतीलाल घोष वगैरे ख्यातनाम मंडळी मामांचा सल्ला घेत असत. साधुशील मामा मुंबई प्रार्थनासमाजाचे एक ध्येयनिष्ठ, निष्ठावंत व समर्पित कार्यकर्ते होते. बिछान्यास खिळून असतानाही त्यांनी शेवटपर्यंत सुबोध पत्रिकेसाठी लेखन केले. ते एक कृतिशील धर्म व समाजसुधारक होते. धर्म सुधारल्याशिवाय आपल्या देशाची सर्वांगीण उन्नती होणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते

बेंजामिन फ्रँक्लिनच्या चरित्राचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. न्या. रानडे यांनी मामांना ‘राजकीय ऋषि’ ह्या महनीय पदवीने गौरविले. मामांचा अवघा संसार परमार्थावर आधारलेला होता. त्यांचे घर म्हणजे विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान, अनेक परस्थ थोर थोर पुढाऱ्यांच्या व पाहुण्यांच्या वर्दळीचे ठिकाण व पुनर्विवाहितांचा आश्रम असेच होते. त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी सहधर्मचारिणी या नात्याने मामांना अखेरपर्यंत चांगली साथ दिली. मामांचा स्वभाव प्रसिद्धीविन्मुख व सोशिक होता.

तरुणास उपदेश-पितृबोध (१८८५), पितृबोधाच्या इंग्रजी, मराठी व गुजराती भाषेतही आवृत्त्या निघाल्या. मामांची एका संस्थानिकास बारा पत्रे (मूळ इंग्रजी – १८९१, म. भा. १९६३), एच्. ए, ॲक्‌वर्थ यांना मराठी पोवाडे संकलित करण्याच्या कामी मामांनी बहुमोल सहकार्य केले. त्यांचा उपलब्ध असलेला इंग्रजी व मराठी पत्रव्यवहार आजही महत्त्वाचा आहे. सयाजीराव गायकवाड यांनी मामांची योग्यता व कार्य चांगले जाणले होते. म. जोतीराव फुले यांच्या शेवटच्या आजारात आर्थिक साह्य मिळावे म्हणून बडोदे सरकारला मामांनी लिहिलेली पत्रे फुल्यांच्या चरित्रावर व कार्यावर चांगला प्रकाश टाकणारी ठरली आहेत. सर्व वर्ग व सर्व थरांतील समकालीन मोठमोठ्या कर्त्या पुढाऱ्यांचे ते सल्लागार होते. मुंबईस त्यांच्या राहत्या घरी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांचे मित्र व सहकारी डॉ. रामकृष्ण भांडारकर, शांताराम विठ्ठल, तुकाराम तात्या, नारायण चंदावरकर, भास्कर हरि भागवत, श्रीधरपंत भांडारकर वगैरे जीवाभावाची मंडळी सभोवती जमली असताना मामांचे प्राणोत्क्रमण झाले.

 

संदर्भ : १. कुलकर्णी, प्र. बा. मामा परमानंद आणि त्यांचा कालखंड,मुंबई, १९६३.

२. वैद्य, द्वा. गो. प्रार्थनासमाजाचा इतिहास, मुंबई, १९२७.

 

लेखक - रा. ना. चव्हाण

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate