অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक तापमान वाढीशी दोन हात: 'अनुकूलन' आणि 'उपशमन'

जागतिक तापमान वाढीशी दोन हात: 'अनुकूलन' आणि 'उपशमन'

गेल्या काही दशकांपासून ‘जागतिक तापमान वाढी’च्या समस्येने संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. पृथ्वीच्या वातावरणात व हवामानात अनपेक्षितपणे व तीव्र वेगाने बदल होत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आणि त्यांची कारणमीमांसा करत असताना ह्या वैश्विक समस्येचे निदान झाले. पृथ्वीच्या तापमान नियंत्रणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या हिमकड्यांचे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेले स्खलन, त्यामुळे समुद्राच्या पातळीत होत असलेली वाढ, जगाच्या बहुतेक सर्वच भागात बदलत्या हवामानाचा शेती आणि विविध उद्योगांना बसत असलेला फटका, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे आर्थिक नुकसान, वारंवार उद्भवणाऱ्या गारपीट, पूर, रीटा आणि कॅटरिनासारख्या नैसर्गिक आपत्ती, तसेच चीन आणि कुवेत मधील धुळीच्या वादळांचे तांडव अशा अनेक घटनांतून हरीतगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे, हे आता सिद्ध झालेले आहे.

आपल्या ‘पृथ्वी’ ग्रहाचा इतिहास लक्षात घेतला, तर तज्ज्ञांच्या मान्यतेनुसार सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, आणि सुमारे साडे तीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला सजीव निर्माण झाला. ह्या जवळजवळ १ अब्ज वर्षे इतक्या मोठ्या कालावधीत पृथ्वीच्या वातावरणात अनेक स्थित्यंतरे झाली. पृथ्वीचे सूर्यमालेतील विशिष्ट स्थान म्हणजेच तिचे प्रामुख्याने सूर्यापासूनचे अंतर ह्या प्रमुख आधाराला अनुसरून पृथ्वीवर सजीवांच्या उत्पत्तीसाठी आणि उत्क्रांतीसाठी पोषक असे अनुकूल वातावरण या कालावधीत तयार होत गेले, ज्यावर सजीवांचे आजचे अस्तित्व टिकून आहे. हे वातावरण जर नष्ट झाले, तर पृथ्वीचे तापमान १५ ते १६ अंश सेल्सियसने घसरेल, ज्याचा परिणाम पृथ्वीवरील जीवावरणाचा संपूर्ण विनाश घडून येण्यात होईल. आणि म्हणूनच ह्या विलक्षण आणि अद्वितीय अशा हवामानचक्राच्या आकृतिबंधाला अतिशय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

परंतु, गेल्या शंभर वर्षांपासून विकासाच्या नावाखाली पृथ्वीवरील पर्यावरणात जागतिक स्तरावर झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा आणि परिणामी हवामानाचा समतोलच बिघडला आहे. पृथ्वीच्या सूर्याशी निगडीत स्थानानुसार चालू असलेल्या परिवलन आणि परिभ्रमण चक्रांमुळे नैसर्गिकरित्या तापमानात चढ उतार होत असले तरी त्यांचा वेग अत्यंत मर्यादित असतो, आणि त्या बदलांशी स्वतःला जुळवून घेण्यासाठी पृथ्वीवरील प्रजातींना पुरेसा वेळही मिळतो. पण, गेल्या शतकात घडून आलेल्या औद्योगिक क्रांती पासून प्रमाणापेक्षा तिपटीने जास्त कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडला जाऊ लागला. साहजिकपणे, हा अधिकचा कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे नैसर्गिकरीत्या शोषण करण्याची पृथ्वीची क्षमता कमी पडू लागली, ज्यामुळे हे हरितगृह वायू वातावरणात साठून राहून पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत चाललेले आहे. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका मधील बर्फाचे थर लक्षणीयरित्या वितळत चालल्याने मालदीव सारखी बेटे, बांग्लादेश आणि श्रीलंका सारख्या देशांचा मोठा भूभाग आणि समुद्र किनाऱ्यालगतची महत्त्वाची शहरे समुद्राच्या पातळीतील संभाव्य वाढीच्या धोक्यामुळे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत.

गेल्या काही दशकांत १ ते २ अंश सेल्सियस इतकी तापमान वाढ नोंदवण्यात आली, जी भयंकर दुष्काळ, शक्तिशाली समुद्री वादळे यांसारख्या संहारक नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देण्यास आणि त्यांच्या माध्यमातून पृथ्वीवरील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास घडवून आणण्यास पुरेशी आहे.

जागतिक तापमान वाढीचे हे विनाशकारी स्वरूप पाहता, जागतिक स्तरावरील तज्ज्ञांनी ह्या समस्येला तातडीने तोंड देण्यासाठी दोन प्रबळ मार्ग सुचवले. ‘अनुकूलन’ आणि ‘उपशमन’.

‘अनुकूलन’ म्हणजेच, वातावरणातील बदलांना अनुसरून आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणणे, जेणेकरून बदलत्या हवामानाच्या हानिकारक परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी करणे शक्य होईल. ‘इंटरनॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ च्या मते, आगाऊ आणि प्रतिक्रियात्मक, खाजगी आणि सार्वजनिक, तसेच स्वयंशासित आणि नियोजित अशा विविध पातळ्यांवर हवामान बदलासंदर्भातील ‘अनुकूलन’ कृतींचे नियोजन करता येते. आपत्ती प्रतिबंधित बांधकामे, पाण्याची पातळी रोखून धरू शकतील आणि पाण्याच्या मोठ्या लोंढ्यास शहरात शिरण्यापासून मज्जाव करतील अशा मजबूत रोधक भिंती समुद्रकिनाऱ्यालगत बांधणे, बदलत्या हवामानाला अनुकूल अशा पिकांची लागवड करणे, नद्या, तळी आणि तलाव यांतील पाण्याचे व्यवस्थापन, सिंचन योजना, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विषयक संशोधने, हवामानाचे बिनचूक अंदाज बांधू शकतील अशा अत्याधुनिक उपकरणांच्या शोधास प्रोत्साहन देणे व ती विकसित करणे, ही हवामान बदलाच्या अनुकूलनाच्या कृतींची काही उदाहरणे सांगता येतील.

‘उपशमन’ म्हणजेच अर्थातच हवामान बदलाच्या दाहकतेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने व्यक्तिगत तसेच राजकीय स्तरावर अंमलबजावणी करण्यायोग्य कृतींना चालना व प्रोत्साहन देणे. वातावरणात उष्णता रोखून धरून हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न ‘उपशमन’ माध्यमातून केला जातो. हवामानातील लक्षणीय बदलास कारणीभूत असलेला पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप कमी करणे, हे उपशमनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गरज आणि हव्यास यातील फरक ओळखून त्यानुसार, ‘आवश्यक आणि अनावश्यक’ अशा प्रकारे रोजच्या वापरातील वस्तूंचे वर्गीकरण करून त्यांचा वापर मर्यादित करणे, त्याचप्रमाणे, वस्तूंचा व साधनांचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्याची आणि पुनर्चक्रीकरण करण्याची सवय अंगी बाणवून घेणे हे उपशमनामध्ये अपेक्षित आहे, ज्यातून प्रामुख्याने कागद, वीज व अन्न यांच्या नासाडीवर नियंत्रण आणले जाईल. व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा दोन पातळ्यांवर विविध ‘उपशमन’ कृती अंमलात आणावयाच्या आहेत. वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी जास्तीतजास्त वनीकरण करणे, पर्यावरणाला घातक ठरणारी उप-उत्पादिते निर्माण करणाऱ्या इंधनांना पर्याय शोधून त्यांचा प्रसार व वापर करण्यावर भर देणे, उदाहरणार्थ, जीवाश्म इंधनांच्या ऐवजी सौर उर्जेसारख्या पूर्णतः हरित उर्जेच्या अधिकाधिक वापराला सर्व सामाजिक स्तरांवर चालना देणे, विविध दैनंदिन कार्यांमध्ये उपयुक्त ठरतील अशी हरित उर्जेवर चालणारी संयंत्रे बनवणे व त्यांचा प्रसार करणे, सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांच्या वापरास प्राधान्य देणे, अशा काही कृती ‘परिणामकारक उपशमन कृती’ म्हणून नमूद करता येतील.

थोडक्यात असे म्हणता येईल की, तापमान वाढीच्या समस्येवरचा ‘अनुकूलन’ हा उपचारात्मक प्रतिसाद आहे तर ‘उपशमन’ हा समस्या निर्मूलनाच्या दृष्टीने केलेला एक प्रतिबंधात्मक प्रयत्न. जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांची संहारकता लक्षात घेता, सध्याच्या परिस्थितीत तात्काळ मलमपट्टी म्हणून ‘अनुकूलन’ आणि त्याचबरोबर या समस्येचे भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी ‘उपशमन’ अशा दोन्ही क्रियांना एकमेकींची जोड देऊन एकत्रितरित्या अंमलात आणणे निश्चितच हितावह ठरेल.

 

-    प्राजक्ता जाधव

७०३९२२६२४८

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate