অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद जिल्हा

महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जिल्हा. उत्तर अक्षांश १९०१८' ते २००४०' व पूर्व रेखांश ७४०४०' ते ७६०४०'. क्षेत्रफळ १६,७१८.२ चौ. किमी.; लोकसंख्या १९,७१,००६ (१९७१). या जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव, पूर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेस बीड व अहमदनगर आणि पश्चिमेस अहमदनगर व नासिक हे जिल्हे येतात. जिल्ह्याचे जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर १६१ किमी. व पूर्व - पश्चिम अंतर २०१ किमी. आहे. औरंगाबाद, पैठण, सिल्लोड, जालना, अंबड, भोकरदन, वैजापूर, गंगापूर, कन्नड हे तालुके व खुल्दाबाद, सोयगाव व जाफराबाद हे महाल असे जिल्ह्याचे बारा शासकीय पोटविभाग असून महाराष्ट्राच्या ५.५ टक्के क्षेत्रफळ व ३.८९ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

भूवर्णन

या जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून सातमाळा, इंध्याद्री अथवा अजिंठा या नावांनी प्रसिद्ध असलेली पर्वतरांग जाते. बुलढाण्यात गेलेल्या हिच्या पुढील रांगेलाच तेथे बालाघाट पठार असे नाव प्राप्त झाले आहे. सातमाळचीच जालनारांग ही एक शाखा जिल्ह्याच्या मध्यभागातून पूर्वेकडे जाते. याशिवाय स्थानपरत्वे प्रसिद्ध असलेल्या दौलताबाद, चौका, जोत्स्ना ह्यांसारख्या सपाट माथ्याच्या डोंगररांगाही या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याचे स्थूलमानाने पुढील तीन नैसर्गिक विभाग पडतात : अजिंठ्याच्या उत्तरेतील भाग, पूर्णा खोऱ्याचा भाग व गोदावरी खोऱ्याचा भाग. पहिला विभाग जिल्ह्याच्या ३.२ टक्के असून तेथील जमीन निकृष्ट आहे. दुसऱ्या विभागातील पश्चिम भाग पठारी व समुद्रसपाटीपासून ६७५ मी. हून अधिक उंचीचा आहे. त्याचा पूर्वभाग अधिक सुपीक आहे. तिसऱ्या विभागाचा आग्नेय भाग अतिशय सुपीक आहे. जिल्ह्याच्या ५.२ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेले असून औरंगाबाद व कन्नड हे तालुके आणि सोयगाव महाल येथील जंगले मोठी व दाट आहेत. काही तालुक्यांतून चंदन सापडते; परंतु एकंदरीत जंगले कनिष्ठ प्रतीची आहेत. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची अशी फारच थोडी खनिजे ह्या जिल्ह्यात सापडतात. चुनखडी आणि बांधकामासाठी उपयुक्त दगड येथे मिळतात. गोदावरी ही ह्या जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी होय. ही जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून २०४ किमी. वाहते. कन्नड डोंगरामधून येणारी शिवना, दौलताबादजवळ उगम पावणारी धडा, औरंगाबादच्या पूर्वेकडील टेकड्यांमधून वाहणारी दुधना, औरंगाबाद तालुक्यातील खाम, वैजापूर तालुक्यातील ढेकू, पैठण तालुक्यातील येरभद्रा आणि अंबड तालुक्यातील गाहती ह्या तिच्या मुख्य उपनद्या होत. पूर्णा ही गोदावरीची सर्वांत मोठी उपनदी कन्नड तालुक्यात उगम पावते. तिच्या महत्त्वाच्या उपनद्या खेळणा आणि गिरणा ह्या होत.

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोरडे व आल्हाददायक आहे. उन्हाळ्यात सरासरी ३२.८० से. तर हिवाळ्यात १८.७० से. तपमान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७५.२२ सेंमी. आहे; तथापि कन्नड, जालना, अंबड तालुके व सोयगाव महाल ह्या भागांत जास्त पाऊस, तर गंगापूर व वैजापूर तालुक्यांत कमी पाऊस पडतो. गंगापूर व वैजापूर ह्या तालुक्यांत दहा वर्षांतून एकदा दुष्काळाची संभाव्यता निर्माण होते. गोदावरी (जायकवाडी) प्रकल्प तसेच ढेकू, जुई, शिवना, पूर्णा, खेळणा, सुखना, दुधना इ. नद्यांवरील पाटबंधाऱ्यांच्या योजनांमुळे जिल्ह्यातील परिस्थितीत सुधारणा होत आहे.

आर्थिक परिस्थिती

गोदावरी व पूर्णा खोऱ्यांतील काळ्या, कपाशीच्या जमिनीमुळे जिल्हा शेतीप्रधान झाला आहे. कामकरी लोकांपैकी ७७.१८ टक्के लोग शेती-व्यवसायात आहेत. पेरणीचे निव्वळ क्षेत्र ८१.५ टक्के (१९६८-६९) असून त्यापैकी ६.२ टक्के क्षेत्र ओलीत आहे. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके जिल्ह्यात काढली जातात. ज्वारी हे येथील महत्त्वाचे पीक असून पिकांखालील एकूण क्षेत्राच्या २८.३ टक्के (१९६८-६९) क्षेत्र ज्वारीने व्यापलेले आहे. त्याखालोखाल कापूस १५.३ टक्के, बाजरी १७.४ टक्के, कडधान्ये २० टक्के, गळिताची धान्ये ११.७ टक्के यांचा क्रमांक लागतो. याशिवाय जिल्ह्यात भात, गहू, ऊस, तंबाखू, कांदा ही पिके; तसेच लिंबू, द्राक्षे, मोसंबी, संत्री, चिकू, आंबा इ. फळे होतात. गहू उत्पादनात जिल्ह्याचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक लागतो. औरंगाबाद येथे फळ-संशोधन केंद्र असून जालना तालुक्यातील बदनापूर येथे गहू, कापूस व जवस यांवर संशोधन करणारे केंद्र आहे. वैजापूर येथे बाजरीवर संशोधन करण्यासाठी असेच केंद्र स्थापन होणार आहे. जिल्ह्यात १९६६ मध्ये सु. १३ लाख जनावरे होती; त्यांपैकी साडेचार लक्ष बैल, दोन लक्ष गायी, ऐंशी हजार म्हशी-रेडे व ऐंशी हजार शेळ्या-मेंढ्या होत्या. याशिवाय कोंबड्या-बदकांची संख्या दोन लक्ष होती. औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच मागासलेला आहे. १९६१ साली लोकसंख्येच्या २.८९ टक्के लोक निर्मिती-उद्योग-धंद्यांत होते. १९६९ मध्ये नोंदणी झालेले १०९ कारखाने व त्यांत काम करणारे ५,४८३ कामगार होते. औरंगाबाद येथील एक कापड गिरणी, दोन कृत्रिम रेशमाच्या गिरण्या, एक पिठाची गिरणी, गंगापूर, सिल्लोड व वैजापूरजवळील साखर कारखाने एवढेच मोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. १९७३ मध्ये औरंगाबाद येथे एक पोलाद कारखाना निघाला आहे. कापूस पिंजण्याचे व गठ्ठे बांधण्याचे अनेक छोटे कारखाने जिल्ह्यात असून १९६६ मध्ये कामगारांपैकी २७.८ टक्के लोक त्यांमध्ये काम करीत होते. याशिवाय तेलाच्या गिरण्या, भरतकाम, रेशीम विणणे, लोकरीचे विणकाम, कातडी कमावणे व कातड्याच्या वस्तू बनविणे, विडी, कागद इत्यादींचे अनेक लघुउद्योग जिल्ह्यात आहेत. हिमरू, मशरू आणि किनखाबाचे विणकाम हे या जिल्ह्यातील फार जुन्या काळाचे आणि नावाजलेले उद्योगधंदे आहेत. आजही याला देशी व परदेशी बाजरपेठ आहे. पैठण हे पूर्वी रेशमावरील जरीकामासाठी प्रसिद्ध होते; परंतु आता हा उद्योग फार कमी झाला आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेचा मनमाड - सिकंदराबाद हा मीटरमापी फाटा जिल्ह्यातून १५४ किमी. जातो. हे प्रमाण दर चौ. किमी. क्षेत्रास २.५ पडते. नगरपालिकांच्या सडकांशिवाय इतर सडकांची लांबी १,९७७ किमी. (१९७०) असून त्यांपैकी १५.५७ किमी. सिमेंट काँक्रीट व ७२० किमी. डांबरी आहेत. १९७० मध्ये जिल्ह्यात ३२९ डाकघरे, २५ तारघरे व १,९४८ दूरध्वनियंत्रे होती.

लोक व समाजजीवन

१९६१-७१ या काळात जिल्ह्याची लोकसंख्या २७.७८ टक्क्यांनी वाढली. १९६१ मध्ये जिल्ह्यात १,९७६ खेडी होती. कन्नड, भोकरदन, खुल्दाबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, औरंगाबाद कँटोनमेंट, जालना, पैठण व अंबड अशी दहा शहरे जिल्ह्यात असली, तरी औरंगाबाद व जालना हीच खरी मोठी शहरे होत. १९७१ मध्ये एकूण नागरी वस्तीचे प्रमाण १६.८२ टक्के, जिल्ह्यातील लोकवस्तीचे प्रमाण दर चौ. किमी.ला १२१ माणसे आणि साक्षरता २८ टक्के होती. १९६१ मध्ये ७६.१९ टक्के लोक मराठी बोलणारे, १३.७० टक्के लोक उर्दू बोलणारे होते. याशिवाय जिल्ह्यात वंजारी, लंबाडी, भिल्ली, गुजराती, हिंदी, तेलुगू भाषिक लोकही होते. लोकसंख्येच्या ७५.६० टक्के हिंदू, १३.८५ टक्के मुसलमान, ८.५७ टक्के बौद्ध, १.१० टक्के ख्रिश्चन व ०.७८ टक्के जैन होते. जिल्ह्यातील डोंगराळ भागांत भिल्ल, आंध, गोंड व परधान या अनुसूचित जमाती राहतात. यांची संख्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या १.६० टक्के असून त्यांतील १.५८ टक्के भिल्ल होते. १९६८-६९ मध्ये जिल्ह्यात १,९६५ प्राथमिक शाळा, १६४ माध्यमिक शाळा व १७ उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था होत्या. ११ खेड्यांना प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती (१९७०). औरंगाबाद हे मराठवाडा विद्यापीठाचे केंद्र असून बहुतेक ज्ञानशाखांची महाविद्यालयेही औरंगाबाद येथे आहेत. जिल्ह्यात दोन मोठी रुग्णालये औरंगाबाद येथे असून तालुक्यांच्या गावी दवाखान्यांच्या सोई आहेत. १९७० मध्ये जिल्ह्यात ५९ मुद्रणालये असून औरंगाबाद येथून चार दैनिके, आठ साप्ताहिके, चार मासिके आणि जालन्याहून एक दैनिक, एक साप्ताहिक व एक मासिक प्रसिद्ध होत होते. जिल्ह्यात १९६९ मध्ये २४ चित्रपटगृहे होती.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate