অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जायकवाडी पक्षी अभयारण्य

मी ज्या बीड जिल्ह्यातून येते तो आणि ज्या जिल्ह्यात माझं शिक्षण आणि करिअरची सुरुवात झाली तो औरंगाबाद जिल्हा मनाच्या जवळ असणं खूपच स्वाभाविक. घाटी रुग्णालयाच्या सरकारी क्वार्टरपासून हाकेच्या अंतरावर बिवी का मकबरा आणि पाणचक्की… विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात गेलं की शेजारी असलेला सोनेरी महल आणि पाठीमागे डोंगराच्या कुशीतून साद घालणाऱ्या औरंगाबाद लेण्या, जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत कैलास लेण्यासमोर साजरा होणारा वेरुळ महोत्सव, कोरीव घृष्णेश्वराचे मंदिर, झोपलेला भद्रा मारोती, कितीदा तरी शर्यत लावून चढलेला दौलताबाद किल्ला… नागमोड्या घाटातून सामोरं येणारं म्हैसमाळ, जग प्रसिद्ध अजिंठा या सगळ्याच गोष्टी आकर्षणाचा विषय होत्या.

मला आठवतं, कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री अकरा-बाराला वेरुळ महोत्सवाहून परततांना केलेली मस्ती, मित्र-मैत्रिणींचा मेळा आणि अंगावर शहारा आणणारा थंडगार वारा… सगळंच कसं एकदम भन्नाट होतं. या आठवणीतलं एक पान म्हणजे दर पावसाळ्यात पैठणला जाऊन नाथसागर किती भरला हे पाहणं. नाथसागरात पाण्याचा साठा वाढला म्हटलं की आमचे पाय आपोआप पैठणच्या दिशेने धावायला लागायचे. डोळ्यात न मावणारा एवढा मोठा जलाशय पाहातांना मन मोहरून जायचे. एकमेकांवर आदळणाऱ्‍या लाटा पाहणं मजेशीर वाटायचं.

तेंव्हा मुंबईचा समुद्र पाहिला नव्हता.. पण आम्हा मराठवाडावासिंयाकरिता नाथसागर समुद्रापेक्षा कमी नव्हता.. कितीदा तरी या नाथसागरावरच्या भिंतीवर उभं राहून पाण्यात बुडणारी संध्याकाळ मी पाहिली आहे. सुर्याचे पाण्यावर तरंगणारे प्रतिबिंब पाहिले आहे. मावळतीच्या सूर्यकिरणांनी सोनसळी झालेलं नाथसागराचं पाणी पाहिलं आहे. म्हैसूरच्या धर्तीवर नाथसागराला लागून तयार केलेले संत ज्ञानेश्वर उद्यान पाहिलं आहे. येतांना किंवा जातांना संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शनही घेतलं आहे. गाडीवरून फेरफटका मारतांना संत ज्ञानेश्वरांच्या जन्मगावी म्हणजे आपेगावला जाणं झालं आहे.

पैठण, औरंगाबाद जिल्ह्याचा केवळ एक तालुका का? तर नाही. पैठणची स्वत:ची अशी एक ओळख आहे. शालीवाहन राजाची राजधानी म्हणून पैठण शहराचे महत्व वेगळे आहे. राजा रामदेवरायच्या काळात ज्या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळाली ते हेच पैठण. औरंगाबाद पासून दक्षिणेकडे 50 कि.मी अंतरावर असलेला पैठण तालुका गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. पैठण तालुक्याला मराठवाड्याचं प्रवेशद्वार असंही म्हणतात. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ याच शहरात आहे. नाथषष्टीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. लाखोच्या संख्येने वारकरी या यात्रेत सहभागी होतात. येथेच संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पैठण

पदरावरती नाचरा मोर विणणाऱ्या गर्भ रेशमी पैठणीचं शहर पैठण. या शहराची आणखी एक ओळख आहे. ती म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. हजारो स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांनाही नाथसागराच्या जलाशयाचं आकर्षण आहे.

दक्षिण गंगा म्हणून ज्या गोदावरीला मान मिळाला, त्या गोदावरीवर बांधलेला प्रकल्प मराठवाड्याच्या विकासाला संजीवन देणारा ठरला. सुमारे 55 कि.मी लांब आणि 27 कि.मी रुंद असा अथांग जलाशय सपाट जमिनीवर पसरलेला असल्याने त्याला उथळ बशीसारखं रुप मिळालं आहे.

प्रकल्पासाठी संपादित जमीन

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून 118 गावातील 34105 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. जलाशय क्षेत्रात झाडोरा कमी असला तरी जलाशयाच्या बाहेरच्या बाजूने लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, वड, ऊंबर, शिसम, सुबाभूळ, आमलतारा चंदन यासारखी झाडं आहेत. 10 ऑक्टोबर 1986 रोजी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

नाथसागर जलाशयात माशांच्या 50 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. पाणपक्ष्यांना प्रिय असणारी दलदल, शेवाळ, पानवनस्पती, छोटे मासे, कीटक या खाद्य पदार्थांची आणि वैविध्यपूर्ण जलीय अधिवासाची विपुलता यामुळे नाथसागराचा जलाशय देशी-विदेशी पक्ष्यांचे माहेरघरच बनला आहे.

स्थलांतरीत पक्षी

कायम वास्तव्यास असलेल्या 200 प्रजातींच्या पक्षांशिवाय हिवाळ्याची चाहूल लागताच विविधरंगी मनोहरी पक्षी नाथसागर जलाशयाच्या आश्रयास येतात. दक्षिण आफ्रिका, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया येथून दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांच्या 70 च्या आसपास प्रजाती इथं पहायला मिळतात.. फ्लेमिंगो, पिनटेल, शॉवेलर, व्हीजन, कॉमन टिल, ब्ल्यू विंगटिग, सॅडपायपर, स्टील करल्यू, रफ अॅन्ड रिव्ह असे अनेक प्रजातीचे पक्षी जायकवाडी जलाशयावर पहायला मिळातात. त्याशिवाय राखी बदक, काळा शेराटी, पांढरा शेराटी, पाणडुबा, पाणकावळे, वंचक, जांभळा, बगळा, कठेरी, चिलावा, मुग्धबलाक, रंगीत चमचा, सागरी घार, करकोचे, रोहित, तुतारी, गरुड, मैना, पोपट, दयाळ, खाटिक, कोकिळ, शिंपी, सुतार, तांबट, भारद्वाज, सातभाई, सुर्यपक्षी सारखे अनेक पक्षी आपल्याला इथे दिसतात. पाणमांजर, भेकर, मुंगूस, ससे, उदमांजर, काळवीट यासारख्या अन्य वन्यजीवांचे दर्शनही आपल्याला होते. इथे फुलांच्याही 37 प्रकारच्या प्रजाती आहेत.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर पर्यंत वास्तव्यास असलेले हे पक्षी आपल्या लकबी आणि लक्षवेधी हालचालींनी पक्षीप्रेमींना आपल्याकडे आकृष्ट करतात. एक संतपीठ म्हणून पैठण शहरात भक्तगणांची नेहमीच वर्दळ असते. त्या आणि खास पक्षीदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी हा परिसर नेहमीच गर्दीने फुललेला दिसतो. संत ज्ञानेश्वर उद्यानात रात्री सूर्यास्तानंतर संगीत आणि प्रकाशाच्या रोषणाईवर पाण्याचे होणारे जलनृत्य आपल्याला मोहून टाकते.

खरं तर आपण जेंव्हा पर्यटनाला जायचा विचार करतो तेंव्हा कमी वेळेत जास्तीत जास्त स्थळं कशी पाहाता येतील असा आपला प्रयत्न असतो. पण तुम्ही जर औरंगाबादला पर्यटनाला जाण्याचा विचार करत असाल तर भरपूर निवांत वेळ काढून जा असंच मी म्हणेन… केवळ एक किंवा दोन दिवसात इथल्या सगळ्याच गोष्टी पाहाता येत नाहीत इतका हा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने समृद्ध आहे. हिवाळा हा पर्यटनासाठी आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम ऋतू आहे. औरंगाबादसह पैठणमध्ये खाजगी-सरकारी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्याला जाण्यासाठी पैठणला जावे लागते. पैठण शहर औरंगाबाद हून 50 कि.मी आणि अहमदनगरहून 75 कि.मी अंतरावर आहे.

लेखक - डॉ.सुरेखा म. मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate