অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्प

देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वन्यप्राण्यांचा असलेला अधिवास हा प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पाची सफारी करताना येथील निसर्ग संपदा तसेच पट्टेदार वाघांसह बिबट, अस्वले, रानडुकर, नीलगाय, सांबर, चितळ, भेडकी, रानकुत्री, खवले-मांजर आदी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार करताना वेगळाच आनंद देऊन जात असल्याने पर्यटकांची गर्दी सातत्याने वाढत आहे.

मध्य भारतासह देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहेत. या प्रकल्पाविषयी जाणून घेऊया...राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प तसेच सहा राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये असून विदर्भात प्रामुख्याने मेळघाट, ताडोबा, पेंच आंधारी, नवेगाव आणि करांडला (उमरेड) आदी व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्यांना भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतानाच वाघांच्या अधिवासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बोर व्याघ्र प्रकल्पाची ठरत आहे. आकाराने लहान असले तरी येथील जंगलाला अत्यंत महत्त्व आहे.

जंगलाच्या सलगतेचा विचार केला तर इतर प्रकल्पांना जोडलेला आहे आणि ही सलगताच वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघांच्या संवर्धनासाठीच महत्त्वपूर्ण ठरत आहे.

बोर व्याघ्र प्रकल्प, बोर धरण यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बोर व न्यू बोर अभयारण्याचा भाग असून हे वर्धा व नागपूर जिल्ह्यात व्यापलेले आहे. या प्रकल्पांतर्गत 13 हजार 812.32 हेक्टर (138.12 चौ.किमी) क्षेत्रात असून व्याघ्र प्रकल्पातून वाहणाऱ्या बोर नदीवर सिंचन प्रकल्प असून वन्य प्राण्यांना या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांसह विविध प्रजातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात.

वन्य प्राण्यांसह फुलांच्या विविध वनस्पती तसेच पक्षांसाठी विविध ऋतूमध्ये आवश्यक असणारे खाद्य येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या व्याघ्र प्रकल्पामध्ये 185 प्रकरणांच्या विविध पक्षांची नोंद झालेली आहे.

हमखास वाघाच्या दर्शनासह विविध प्रकारचे वन्य प्राणी एकाच ठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळे पर्यटक येथे आकर्षित होत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्याय म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प पुढे येत आहे. वर्धा नागपूर मार्गावर असलेल्या सेलू येथून हिंगणी या गावाजवळ बोर व्याघ्र प्रकल्प आहे. दक्षिण सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी वनविभागातर्फे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

बोर धरण प्रवेशद्वारावरच पर्यटकांसाठी पर्यटक माहिती केंद्र असून येथूनच बोर व्याघ्र प्रकल्पाला भेटीसाठी परवानगी देण्यात येते. तसेच वन सफारीसाठी जिप्सी गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. जंगल भ्रमंतीसाठी सोबत असलेल्या चारचाकी वाहनास परवानगी दिली जात असून प्रवासी वाहन, व्यक्ती आणि गाईड वनविभागाचा वनरक्षक यासाठी रितसर शुल्क भरून परवानगी देण्यात येते.

पर्यटकांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे जंगल सफारीची सुविधा निर्माण केलेली आहे. तसेच स्थानिक बेरोजगार युवक व बचत गटांच्या माध्यमातून जंगल सफारीसाठी गाईड, जिप्सी उपलब्ध असून पर्यटकांना पर्यटन निसर्ग संकुलामध्ये आवश्यक सुविधाही उपलब्ध आहेत. मागील वर्षी मार्चअखेरपर्यंत 11 हजार 388 पर्यटकांनी भेट दिली.

पर्यटकांकडून 8 लाख 67 हजार 100 रूपये शुल्कही गोळा झाला आहे. पर्यटकांना दररोज सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ६ पर्यंत जंगल पर्यटनांचा आनंद घेणे सुलभ झाले आहे. स्थानिक बेरोजगार युवकांनी नागरिकांच्या सफारीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खुल्या जिप्सीचीही व्यवस्था केली आहे. तसेच पर्यटन करताना व्याघ्र प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी गाईडची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वन विभागातर्फे पर्यटकांसाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध असल्यामुळे पर्यटनाचा आनंदही घेणे सुलभ झाले आहे. एप्रिल ते मार्चअखेरपर्यंत सुमारे 1 हजार पर्यटकांनी भेट दिली असून दररोज सकाळी व सायंकाळी पर्यटकांची गर्दी सातत्याने वाढत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनर यांनी दिली.

बुद्ध विहार


बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बाजूलाच बोर धरण आणि जंगलाच्या सानिध्यात हे बुद्ध विहार वसले आहे. हे ठिकाण उंचावर असल्याने अत्यंत शांत तसेच वातावरण थंड असल्याने प्रार्थनेसाठी लोकप्रिय आहे.

कसे जाल

हा व्याघ्र प्रकल्प नागपूर-वर्धा महामार्गालगत आहे. नागपूरपासून केवळ 60 किमी तर वर्धा येथून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. तर, महामार्गापासून आत अवघ्या चार-पाच किमी. आहे.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे येथे विश्रामगृह आहे. येथे जेवणाची व राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे.

-अनिल गडेकर,
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा.

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ०२ जुलै, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate