অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामलिंग घाट अभयारण्य

रामलिंगला जायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उस्मानाबादच्या दिशेने रवाना झालो. पहाटेचा गार वारा मन प्रसन्न करत होता. रामलिंगला जाण्याआधी येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं ठरलं. देवीचं मंदिर लांबूनच दिसलं… हिरवागार डोंगर आणि झाडांच्या गर्दीतून मंदिराचा डोकावणारा कळस खूप छान दिसत होता. 200 पायऱ्या चढायच्या होत्या. ‘गार डोंगराची हवा अन् आईला सोसना गारवा’… आराधी लोकांचं गाणं आणि त्याला संबळाची जोड, व्वा ! मन आनंदून गेलं. देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही रामलिंगला जायला निघालो.

पोचण्याचा मार्ग

रामलिंग, उस्मानाबादपासून 20 कि.मी तर बीडपासून 95 कि.मी अंतरावरचं ठिकाण. अतिशय सुंदर वनपर्यटन स्थळ. पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला.. येडेश्वरीच्या मंदिराला पायऱ्या चढाव्या लागल्या.. इथं पायऱ्या उतरायच्या होत्या. दरीत उतरून जातांनाच माकडांचा झुंड समोर आला… तिथल्या लोकांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं.. खाद्यपदार्थ, प्रसाद हातात उघडा नेऊ नका… माकडं ओढून नेतात… ती सावधानता बाळगतच आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं फक्त महादेवाचं मंदिर आहे… पण तसं नव्हतं.

खाली उतरून गेलो.. महादेव मंदिराचा जिर्णोद्धार नव्याने झालेला.. त्याचं कोरीव बांधकाम आणि भिंतीवरील देवदेवतांच्या मूर्ती लक्ष वेधत होत्या. महादेव मंदिराकडे तोंड करून एक पितळेचा सुंदर नक्षीकाम केलेला नंदी आहे. शांत वातावरणात महादेवाचं दर्शन घेतलं आणि आमची पाऊलं पुन्हा हिरव्या वाटांकडे वळाली. मंदिराला वळसा घालून धावणारी नदी आम्हाला खूप आवडून गेली. तिच्या पाण्यात पाय टाकून बसण्याचा आनंद काय सांगावा? छोटीशी नदी पण नितळ पाणी… लहान मुलं पाण्यात खेळत होती.. आम्ही ही लहान होऊन थोडीशी आणखी मजा घेतली.. मला वाटलं रामलिंग पाहून झालं… पण तसं नव्हतं… महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीच्या पाठीमागे एक समाधी आहे. त्यावर एका पक्षाला दोन पुरुष हातात धरून उभे असल्याचे चित्र कोरले आहे. मी विचारलं ही समाधी कोणाची आहे… त्यावर पुजाऱी म्हणाले, रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर जटायू पक्ष्याने त्याला अडवलं.. त्या दोघात युद्ध झालं. त्यात जटायू जखमी होऊन इथे खाली कोसळला… रावण निघून गेला. पुढे सीतेच्या शोधात राम इथून जात असतांना त्यांना जटायू जखमी अवस्थेत येथे पडलेला दिसला.. या जटायूला पाणी पाजण्यासाठी रामाने इथे एक बाण मारला… त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली… रामाने पाणी आणून जटायूला पाजलं, इथेच जटायूचा मृत्यू झाला… ही समाधी जटायू पक्षाची आहे…

रामायणातील प्रसंग जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. नदीजवळ वाटेत मध्येच आम्हाला एक तपकिरी रंगाचा, त्यावर पांढरे ठिपके असलेला साप आडवा गेला, पुढे जाऊन त्याने नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या माणसाच्या काढून ठेवलेल्या कपड्यामध्ये आश्रय घेतला. आम्ही त्या माणसाला तसं सांगितलं… मग काठीनं डिवचून कपडे हलवले तेंव्हा तो साप तेथून सळसळत बाहेर निघून गेला.. कोणी त्याला मारलं नाही. पर्यटनाला जातांना सततची सावधानता बाळगायला हवी हे शिकवणारा हा अनुभव होता.

रामानं जिथं बाण मारून पाणी काढलं त्या परिसराला रामबाण असं देखील म्हटलं जातं. उन्हाळ्यात या पाण्याची धार लहान होत जाते. पण पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रपात कोसळत राहातो. या धबधब्याला पाहण्यासाठी, येथील महादेवाचं आणि जटायूचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण मोठ्यासंख्येने येथे येत असतात.

स्थापना

हा परिसर खुप हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने 1997 मध्ये 2237.46 हे. आर क्षेत्राला ‘रामलिंग घाट’ अभयारण्य म्हणून घोषित केले. उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे स्थळ पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं स्थळ आहे. येथे पक्षांच्या 100 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पाणगळीचे वने व काटेरी वने या प्रकारात हे वन मोडतं.

वनस्पती व प्राणी

वन विभागाने विविध योजनेअंतर्गत इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यात प्रामुख्याने ग्लिरीसीडीया, सुबाभूळ, सिरस, शिसू, बोर यासारख्या झाडांचा समावेश आहे. या झाडांबरोबर नैसर्गिकरित्या आढळून येणाऱ्या खैर, धावडा, सालई, बोर, बाभूळ, सीताफळ, धामण, आपटा, हिवर, अजंन, साग, चंदन, अर्जून, सादडा, बेल, मेहसिंग, मोहा, बेहडा या वृक्षप्रजातीही येथे आढळतात. करवंद आणि घाणेरीची जाळी येथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. अभयारण्यात कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडे, मोर असे वन्यजीव आपण पाहू शकतो.

उस्मानाबाद जिल्हा अवर्षपणप्रवण क्षेत्रात येतो. असे असले तरी पर्जन्यराजाची कृपा झाल्या क्षणी हा परिसर कात टाकतो. हिरवाईची चादर ओढून झाडांच्या खोप्यातून असंख्य निर्झर खळाळत राहतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिराला वळसा घालुन वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागील बाजूस कोसळणारा धबधबा आणि डोंगराच्या अंगा खांद्यावर असलेल्या झाडीमध्ये इकडून तिकडे उड्या मारणारी माकडे असं सुंदर वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह आहे. अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या दुर्गादेवी टेकडीवर रेल्वेचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय वन्यजीव विभागाची निरिक्षण कुटी देखील पर्यटकांना उपलब्ध आहे. अभयारण्य पाहण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते जून असा आहे. जवळ तुळजापूरची तुळजाभवानी आहे. येडेश्वरी देवीचं जागृत देवस्थान आहे. नळदुर्गचा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ल्यापासून जवळच आंदूरचा खंडोबा आहे. सगळंच पहायचं असेल तर किमान दोन-तीन दिवसाचा निवांत वेळ हवा… तो काढायलाच हवा… इतकं हे पर्यटनस्थळ सुंदर आहे.

लेखक-डॉ.सुरेखा म.मुळे

ईमेल- drsurekha.mulay@gmail.com

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate